Monday, March 1, 2010

आपणचं होऊया आपल्या खारुताईंचे डेव्ह...

२००७ च्या शेवटी कधीतरी alvin and the chipmunks चित्रपट पाहिला. ऍनिमेटेड चित्रपट पाहायला वयाचं बंधन नाही हे पाहताना जाणवतं पण हे चित्रपट आपल्याला एक छान संदेश देऊन जातात हे पुन्हा एकदा पटलं...त्यानंतर भोवताली घडणार्‍या बर्‍याच घडामोडींच्या निमित्ताने हा चित्रपट सारखाच आठवतो. कितीतरी ठिकाणी मी या चित्रपटातल्या खारुताई भेटतात असं मनाशीच म्हणते त्याची आठवण म्हणून ही पोस्ट.


ही गोष्ट आहे तीन चिपमक्सची. आपल्या सोयीसाठी त्यांना खारुताई म्हणूया हवंतर. तर तीन गाणार्‍या खारुताई, त्यांचं गाण्याचं कौशल्य ओळखणारा एक धडपड्या गीत/संगीतकार डेव्ह सेव्हिल आणि त्यांच्या या कौशल्याचं मोठ्या चतुरपणे मार्केटिंग करणारा इयान. बाकीचे नेहमीचे लोकं आहेतच म्हणजे हिरो डेव्हची एक गर्लफ़्रेंड वगैरे पण ही गोष्ट मुख्यपणे घडते ती या पाच जणांच्या आयुष्यात. योगायोगाने डेव्हच्या घरी आलेल्या या तीन गाणार्‍या खारुताईंचं कौशल्य ओळखून डेव्ह त्यांच्या बरोबर एक आल्बम काढतो, त्याच्या धडपडीला यश येतं आणि तरी ते यश तो खारुताईंच्या डोक्यात जाऊ देत नाही.. पण एका मोठ्या संगीत कंपनीचा मालक इयान, खोटं खोटं अंकल इयान बनुन यांच्यात फ़ुट पाडून या तिघांना डेव्हपासुन वेगळं करुन आपल्या घरी आणतो.

यांचं गाणं जगावेगळं आहे हे ओळखून या तिघांच्या कॉन्सर्ट्सचे एकापाठी एक शो लावतो. परिणाम तिघांच्या स्वरयंत्रावर अधिक ताण आणि एकंदरित तब्येत बिघडण्यावर होते. मग त्यांची डॉक्टर त्यांना विश्रांतीचा सल्ला देते. पण धंद्याचं होणारं नुकसान आणि भावी फ़ायदा लक्षात घेऊन इयान त्यांना लिपसिंगिग करायला लावतो. दरम्यान डेव्हला आपल्या आयुष्यात मुलांसारखी झालेली या तीन खारुताईंची सवय लक्षात येते आणि यांना परत आणण्यासाठी तो एका शोमध्ये जाऊन त्यांना शोधायचा प्रयत्न करतो. खारुताईंनाही तोपर्यंत डेव्ह आणि इयान मधला फ़रक कळला असतो..इयानने केलेलं लिपसिंगिगचं गुपीत लोकांना कळतं...एकंदरित बरंच काही फ़िल्मी चक्कर घडून शेवटी ही मुलं आपल्या मानलेल्या बाबाकडे येतात. आणि मग त्यांनाही बाबाचं आपल्या भविष्यासाठी काळजी, पैशाची बचत करणं हे सगळं कळतं. ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड...

ही कथा म्हटलं तर लहान मुलांसाठी आहे पण नीट लक्ष देऊन पाहिलंत तर कळतं असे कितीतरी जगावेगळी कौशल्य असणार्‍या खारुताई आपल्यात आहेत आणि आपल्यासारख्या सर्वच पालकरूपी डेव्हनी आता जागं व्हायला हवंय. मला हे जाणवलं जेव्हा हिंदीतल्या एका गाण्याच्या रिऍलिटी शोमध्ये छोट्या छोट्या मुलांना गाताना. शेवटपर्यंत टिकणार्‍या मुलांना फ़क्त कार्यक्रमासाठीच नाही तर इतर ठिकाणीही गायला लावुन काय होत असेल त्यांच्या छोट्याशा स्वरयंत्राचं हे मनात आल्याशिवाय राहावलं नाही. नंतर पाहिलं ते हिंदीमधलाच एक नाचाचा कार्यक्रम यातही मोठ्यांनाही न कळणार्‍या भावना चेहर्‍यावर आणून, सगळं अंग लचकवुन ही मुलं नाचत होती. म्हणायचं तर कदाचित मोठीही इतकी छान अदाकारी करु शकणार नाहीत पण म्हणून आतापासुनंच हे? असंही मनात आल्याशिवाय राहावलं नाही. आणि मग नेहमीप्रमाणे याच स्पर्धा मराठीतही पाहिल्या गेल्या. मुलं कार्यक्रमाबाहेर गेली की हताश, रडवेल्या चेहर्‍याचे पालक आणि कार्यक्रम संपला की मग इतर ठिकाणी या मुलांचे गुणदर्शन सुरू...

या सगळ्यांनीच हा चित्रपट एकदा मन लावुन पाहावा असं मला वाटतं...युग स्पर्धेचं असलं तरी ’लहानपण देगा देवा’ असं नंतर ही मुलं म्हणू शकणार नाहीत इतकंही त्यांना राबवावं का? एक दोनदा ठीक आहे पण हिंदीत हरलं की मराठीत..तिथुन बाहेर पडलं की एखाद्या कार्यक्रमात असं सगळीचकडे आपल्या मुलांना पुढे पुढे करायचं याला काय अर्थ आहे? आणि मग सारखं सारखं टिव्हीवर झळकायचं व्यसन मुलाला लागलं तर दोष कुणाचा? आता वेळ आहे आपल्या लहानग्याचा कल पाहुन ती कला डेव्हलप करायची, त्यातलं पुढंचं शिक्षण देऊन मोठेपणी या स्पर्धेत आपले गुण तो योग्य प्रकारे दाखवु शकेल याची तयारी करायची.

वाहिन्या, माध्यमं त्यांच इयान अंकल व्हायचं काम नेटाने करताहेत. वेगवेगळे रिऍलिटी शोज आणि स्पर्धा आयोजित केल्या जातील. कदाचित तुमच्या खास कलाकारी अवगत असणार्‍या मुलासाठी एखादा वेगळा कार्यक्रम, स्टेज शो याचंही आमंत्रण पुढ्यात येईल पण आत्ता त्या लहानग्याच्या आयुष्यात एका काळजीवाहु डेव्हची गरज आहे आणि आपल्या मुलांसाठी ती भूमिका आपण स्वतःच पार पाडायला हवी नाही का?

टीप..आज ’मराठी मंडळी’ या संकेतस्थळाचा उद्घाटन सोहळा मोठ्या डौलात पार पडला.त्यासाठी लिहिलेला हा पहिला लेख. मराठी मंडळींसाठी सर्वांनाच शुभेच्छा.

14 comments:

  1. खूपच छान लिहिलंयस ग.. अगदी मनातलं. ते शो संपल्यावर पण त्या छोट्यांची पिळवणूक संपत नाही. हा प्रोग्राम, ती स्पर्धा असं सतत चालूच. आणि त्यासाठी चिपमक्सचं उदाहरण एकदम चपखल.. !!

    ReplyDelete
  2. खूप छान लिहलय!!! आजच्या मुलांच बालपण हरवत चालल आहे. . .हा चित्रपट नक्कीच पाहिला हवा!!!

    ReplyDelete
  3. हेरंब सध्या रिऍलिटी शोचं जे फ़ॅड आलंय नं त्यामुळे पालक विसरलेत की आपल्या मुलांनी थोडं लहान मुलांसारखं राहणं, बोलणंही गरजेचं आहे...उगाच त्यांना आधीच मोठं करताहेत...नंतर मोठं झाल्यावर करतील ना स्पर्धा आणि ताणतणाव याचा सामना..अगदी लहान असल्यापासुन म्हणजे...

    ReplyDelete
  4. मनमौजी, अगदी नक्की पहा..आता तर याचा दुसरा भागही आलाय पण मी तो पाहिला नाहीये..पहिला भाग मात्र नेहमीच आठवतो या स्पर्धा पाहिल्या की...मी शोधणार होते ऑनलाईन लिंक पण वेळ नाही मिळाला..पण डिव्हिडी आली आहे...

    ReplyDelete
  5. सुंदर विचार, आणि लेख...एकदम पटलं...

    ReplyDelete
  6. डिसेंबरमध्ये वेस्ट कोस्टला मित्राकडे गेलो असता त्याच्या लहान मुलांबरोबर पारायणे झाली.हेहे... उत्तम निरिक्षण आणि परिक्षणही...:)

    ReplyDelete
  7. श्रीताई, मी विसरलेच तुला विचारायला की पाहिलास का ते?? :) मुलांना तर आवडतोच कारण चिपमंक्सचं ऍनिमेशन नी गाणी भन्नाट आहेत पण मोठ्यांनाही दिक्षा देऊन जातो हा चित्रपट....

    ReplyDelete
  8. लेख छान झाला आहे.खरच लहान मुलांच बालपण आज हरवत चालल आहे.

    ReplyDelete
  9. खरयं गं अगदी तुझं.......बाल्य आणि बालपण यांच्या व्याख्या आणि पालकत्व ही संकल्पना बदलत चाललीये असे वाटते अनेकदा.....आणि अपर्णा खरं तर हल्ली नितीमत्ता एकूणातच मानणारे आपणच वेडे वाटावे असे अनेक प्रसंग घडतात....
    पण खरयं तुझं आपल्या खारुटल्यांना जपून आपण आपले तरी ’पालकत्व’ पाळावे....

    ReplyDelete
  10. धन्यवाद देवेंद्र. खरंय पालकांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि त्यात मुलं आपलं बालपण हरवून बसलीत...

    ReplyDelete
  11. तन्वी तू तर आमची आदर्श आई आहेस...तुझ्या पोस्ट्स वाचुन तुझी मुलं इतकी गुणी वाटतात आणि याचं श्रेय आई म्हणून तुला आहे..

    ReplyDelete
  12. मला पण चित्र विचित्र कपड्यात तितकेच विचित्र हावभाव करत नाचणार्‍या मुलांना पहायला बिलकुल आवडत नाही.
    TV anchoring करणारी लहान मुलं पण लिहून दिलेले बोलतात खरी पण त्यांना कितपत समजतं देवास ठाउक.

    ReplyDelete
  13. सोनाली, ती ऍंकरिंग करणारी मुले मी एक-दोनदा पाहिली...सॉलिडच डोक्यात जातात ती...त्यांच्या पालकांना कसं काय बघवतं देव जाणे..शिवाय साधारण सहाएक महिने तरी एक एक शो चालतो मग ही अभ्यास कधी करतात हाही एक प्रश्नच आहे...आणि निदान एक साधी पदवी तरी हवी नं इथे तर अजून शालांत परिक्षांचा पत्ता नाही या घडीला इतका वेळ असा घालवणे कसं काय पटतं काय माहित...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.