Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

Wednesday, April 29, 2020

हम हो गए बेजुबान

शाळेतल्या आपल्या वर्गात एक नेहमी पहिला येणारा मुलगा किंवा मुलगी असते जिच्यापुढे कुणीच जाऊ शकणार नाही हे एकामागोमाग इयत्ता त्याच शाळेत काढल्या की माहित होतं. मग आपण त्या व्यक्तीचा नाद सोडतो पण त्याचबरोबर दुसरी निदान एक व्यक्ती अशी असते की जी या स्पर्धेत कुठंच नसते. ती आपलं नेमून दिलेलं काम चोख करत असते आणि त्यात वैविध्य आणता आणता मग शाळा जेव्हा संपायला येते तेव्हा "आदर्श विद्यार्थ्यांचा" पुरस्कार मिळवून जाते. जसजसं आपण एकेक इयत्ता ओलांडत असतो, आपल्याला या व्यक्तीच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे पैलू कळत जातात. नकळत, आपण त्या व्यक्तीला मनात मानाचं स्थान देतो. तिच्याशी स्पर्धा करावी असं आपल्याला वाटतही नाही. काय म्हणतात ते we look forward to this person and fall in love with this personality and its different aspects. मग जेव्हा निरोप समारंभाची वेळ येते तेव्हा आपलं मन कावरं-बावरं होतं. खरं तर ही व्यक्ती आपली कुणी जवळची मित्र-मैत्रीणही नसते पण आता आपले मार्ग वेगळे होणार या विचाराने आपण हळवे होतो.

आज सकाळी उठल्या उठल्याच इरफानच्या बातमीने मन फार हळवं झालं. तसं पाहायला मी चित्रपट जरा लक्ष देऊन पाहायलाच उशिराने सुरुवात केली. त्यात सिनेमे लक्षात राहायची बोंब आहेच. त्यामुळे आताही मी इरफानचा पहिला चित्रपट कुठला पहिला हे मला ताण दिला तरी आठवणार नाही. पण त्याने फरक पडत नाही. मला वाटतं कदाचीत पानसिंग तोमार असेल कारण चित्रपट जसे प्रदर्शीत झालेत त्याच क्रमाने मी पहिले नाहीत. चंबळाच्या खोऱ्यातल्या या बागीने इतकं रडवलं की मी पाहिल्यापाहिल्या ब्लॉगवर लिहिलं. मग पुन्हा "लाईफ ऑफ पाय" मध्ये त्याच्या आवाजाची, निवेदनाची जादू माझ्यासारख्या सिनेमे विसरणारीला लक्षात राहील अशी कळली. मी या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा "लाईफ ऑफ पाय"चं  पुस्तक वाचलं तेव्हा माझ्याही नकळत "पाय पटेल" म्हणजे इरफान आणि त्याचा आवाज हे आपोआप मनात येत होतं. 

"पिकु" हा चित्रपट मी असंख्यवेळा पाहिला. खरं हा चित्रपट बाप-मुलगी यांचं नातं उलगडणारा आणि त्यांच्या प्रवासाची कहाणी सांगणारा आहे. आता ही "स्टे होम ऑर्डर" आली त्या काळातही पाहिला. नेहमी हा चित्रपट पाहताना ते बाप-मुलीचं नातं जास्त लक्षात यायचं पण मागचे काही वर्षे इरफानच्या आजारपणाच्या बातम्यांमुळेअसेल यावेळी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. लक्षात आलं की इरफान इथं आपल्या व्यक्तिरेखेला कुठेही कमी पडू देत नाही. आखाती देशातली नोकरी गमावलेला आणि आता टॅक्सीचा धंदा पुढे नेणारा "राणा", पिकुवर वैतागणारा आणि तरीही तिच्या वडिलांकडे तिची बाजू मांडताना स्पष्ट सुनावणारा "राणा" आपल्याला त्या आदर्श विद्यार्थ्यांची आठवण करून देतो. "तुम्हारे साथ शादी करनी है तो  तुम्हारे नब्बे साल के बेटे को अडॅप्ट करना पडेगा" हे म्हणताना आपल्याला हसवणारा राणा. त्याच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि इतर भूमिकांच्या वरताण काहीतरी करून भावही तो खात नाही. 

त्याच्या भूमिकांमधून तो आपल्याला आपल्यातलाच कुणीतरी वाटावा इतकं आपलेपण त्याच्या अभिनयात जाणवतं. लिहायचं तर त्याच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीचा प्रत्येक चित्रपट आणावा लागेल इतका विविध भूमिकांमधून तो आपल्या मनातलं ते सुरुवातीला म्हटलेलं मानाचं स्थान पटकावत राहिला.

फार कमी अशी व्यक्तिमत्व, त्यातल्या त्यात बॉलिवूड मध्ये आहेत ज्यांच्याबद्दल इतका जिव्हाळा वाटू शकतो. मला त्याच्या "लन्चबॉक्स" चित्रपटाबद्दल रेकमेंडेशन देणारी "ज्युली" माझ्या एका अपॉइन्टमेन्टला त्याचं खास कौतुक करत होती. लाईफ ऑफ पाय च्या वेळी do you know this guy? great actor असं साशा म्हणाली होती. या दोघींबरोबर माझं थिएटर करणारे नट कसे वेगळे असतात याविषयी बोलणंही झालं होतं. माझ्या पुढच्या भेटीत मी त्याचा विषय काढेन तेव्हा त्याही दुःखी होतील. 


इरफानच्या सर्वच चाहत्यांना तो गेल्याचं दुःख झालं त्याचं मूळ यात आहे की तो सर्वानाच जवळचा, आपल्यातल्याच एक वाटायचा. त्याच्या पिकु चित्रपटातल्या गाण्याच्या भाषेत सांगायचं तर 

इस जीने में कही हम भी थे
थे ज्यादा या जरा कम ही थे 
रुकके भी चल पडे मगर 
रस्ते सब बेजुबान 

लॉकडाऊन मधल्या काळातल्या बेजुबान रस्त्यावरून त्याच्या शेवटच्या प्रवासासाठी जाणारा आपला हा "आदर्श विद्यार्थी" कुणालाही त्याच्यासाठी त्रास न देता लांबच्या प्रवासाला निघून गेला. त्याची तयारी त्याने आधीच केली होती जेव्हा अगदी आता आता आलेल्या "अंग्रेजी मिडीयमच्या प्रोमोचा ऑडिओ त्याने पाठवला होता. 

मागे त्याच्या आजाराबद्दलही त्याने लिहून जणू काही आपल्यासारख्यांची तयारी केली होती. पण खरंच अशी तयारी होते का? मागचा विकेंड मला "अंग्रेजी मिडीयम" पाहायचा होता म्हणून एक हॉटस्टार सोडून सगळीकडे शोधलं. मग शेवटी काल आठवलं; तसा रात्री थोडा पाहू आणि नन्तर थोडा म्हणून त्याला प्रिन्सिपलचा फोन येतो तिथवर पहिला आणि झोपले. मला वाटत, साधारण त्याचवेळी तिकडे मुंबईमध्ये त्याच्यासाठीचे दूत त्याच्या दाराशी उभे होते. हा चित्रपट डोळ्यात पाणी न आणता पाहायचं सामर्थ्य आता तरी माझ्याकडे नाही. 

आज सकाळी जेव्हा पटापट सगळीकडून इरफान खानची बातमी आली तेव्हा मला वर सांगितलेला निरोप समारंभाच्या वेळचा मनात मानाचं स्थान असलेला विद्यार्थी आठवला. त्या इंडस्ट्रीमध्ये वर्गात पहिले येणारे विद्यार्थी गेली तीन दशकं बदलत राहिले; त्यात आपला हा आदर्श विद्यार्थी त्याचं काम चोखपणे करत राहिला आणि आज सकाळी त्याचा निरोप समारंभ झाला. फक्त फरक इतका की आता हा निरोप समारंभ म्हणजे पुन्हा केव्हाही न परत येण्यासाठीचा अलविदा. त्याचे कुटुंबीय आणि जवळचे या सर्वाना या प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो. 

आज हम सचमुच हो गए बेजुबान. Irrfan, we will miss you always. This is just not fair. 


वरचं इरफानला श्रद्धांजली म्हणून काढलेलं चित्र माझी भाची अदिती हिचं  आहे. तिच्या इन्स्टा अकाउंटवर ते आहे.  

#AparnA #FollowMe


Saturday, January 10, 2015

सिद्धार्थ - बालमजुरीचं भकास वास्तव

(spoiler alert - खाली या सिनेमाची जवळजवळ संपूर्ण कथा सांगण्यात आली आहे. ज्यांना आधी स्वतः सिनेमा पाहणे आवडते त्यांनी याकडे लक्ष द्यावे)

बारा वर्षाचा पोरगेला हात बसमधून बाबाला टाटा करताना दिसतो. या हाताला चेन दुरुस्त करणाऱ्या आपल्या बाबाला मदत करायची असते, जमलचं तर त्याच्या सातेक वर्षाच्या बहिणीच्या लग्नाच्या हुंड्यासाठी पैसे साठवून कुटुंबाच्या भविष्याची चिंता कमी करायची असते आणि तो काही कायमसाठी जाऊन राहणार नसतो. तो दिल्लीहून लुधियानाला एका कारखान्यात रोजंदारी करून पुन्हा दिवाळीला घरी थोडे दिवस येणार असतो. त्याचा चेहरा नीट पाहतो न पाहतो तोच बस गेलेली पण असते. हा सिद्धार्थ, ज्याच्या चेहरा किंवा ज्याचा फार ठळक नसलेला चेहरा आणि तरीही त्याचं नाव ठळकपणे असलेली कथा साकार करणारा, सत्य कथेवर आधारीत २०१३ मध्ये आलेला हा सिनेमा.

तसं पाहिलं तर मोठ्या शहरात सिग्नलला किंवा कुठे फुटकळ कामं करणारे असे छोटे मोठे सिद्धार्थ आपण कित्येक वर्षे पाहात असतो आणि त्यांची कथा थोडीफार आपल्याला माहित असते. एक असाही असतो किंवा कदाचित जास्त असे असतील ज्यांचा चेहरा खऱ्या अर्थाने हरवतो आणि आपण आपल्या मार्गाने चालताना वाईट वाटणे खेरीज फार काही करणं आपल्या हातीदेखील नेहमीच नसते. ही कथा हा सिद्धार्थ आणि अर्थात त्याच्या पालकांची तगमग मांडताना आपल्याला खऱ्या अर्थाने अंतर्मुख करून जाते.

कथेबाबत विस्तृत लिहायचं तर दिल्लीत, एका छोट्या झोपडीत राहणारं हे छोटं कुटुंब. सिद्धार्थ, चेन दुरुस्त करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे त्याचे बाबा, पिंकी त्याची छोटी बहिण आणि त्यांचा सांभाळ  करणारी त्याची आई.  या कुटुंबाचं दिवसाचं उत्पन्न फार तर अडीचशे रुपये असेल. त्यात त्यांचा रोजच खर्च, झोपडीचं भाडं हे सगळं सांभाळून मुलांना शाळेत पाठवण्याची चैन या कुटुंबाला परवडणार का? यातूनच एका ओळखीच्याच चुलता लुधियानाच्या कारखान्याचा मालक आहे आणि तिकडे संधी आहे म्हणून लहानग्या सिद्धार्थला तिथे पाठवायचं ठरतं. त्याच्या आईला मनातून कितीही वाटलं की मुलाला शिकवलं पाहिजे तरी तो तिकडे सुरक्षित काम करेल अशा भाबड्या आशेने आणि परिस्थितीच्या अतीव गरजेने हा निर्णय घेतला जातो. सिद्धार्थला जरी धोणी सारखं क्रिकेट खेळायचं असतं तरी त्याला आपल्या कुटुंबियासाठी काही करण्याची तयारी असते. त्यानंतर तो जातो, त्याचा एकदा फोनदेखील येतो आणि नंतर संपर्क तुटलेला आणि दिवाळी उलटली तरी परत न आलेला हा सिद्धार्थ शेवटी सापडतो का?

सारासार विचार केला तर त्याच्या अस्तित्वाचं महत्व नक्की कुणाला असायला हवं? त्याच्या पालकांना. बाकी तो कारखानदार, तो मधला एजंट यांना त्याच्या परतण्याशी देणं घेणं असावं का? किंवा आपलं काम नेटाने करू पाहणारे कायदा सुव्यवस्था अधिकारी किंवा एनजीओ कुणीही यासाठी मदत केली आणि त्याचा पाठपुरावा करावा म्हटला तरी किती? उत्तर स्पष्ट आहे आणि तरीही या कथेतून त्याच्या पालकांची लढाई अधोरेखीत करताना हा चित्रपट आपल्यासाठी न संपणारे अनेक प्रश्न मागे ठेवून जातो.

"सिद्धार्थचे बाबा", हा तगमगलेला चेहरा सिनेमा पाहताना आपण वारंवार पाहतो. हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी ओळखीच्या  ट्राफिक पोलिसाला विचारून काही सल्ला मिळतो का ते पाहतो. प्रसंगाचं गांभिर्य ओळखून तो पोलिसस्टेशनला तक्रार नोंदवायला पाठवतो. इथे सिद्धार्थचा चेहरा हा प्रश्न ऐरणीवर येतो. या कुटुंबाकडे एक मोबाईल असतो त्यात पिंकीकडून चार्ज टाकून कधीमधी वापरला जातो. पण एकंदरित मोबाइल जगतात उपऱ्या बापाला कधी आपल्या मुलाचा फ़ोटो काढायचं सुचलंच नसतं. घरी आल्यावर पिंकीचा फ़ोटो काढतानाची तत्परता त्यातल्या त्यात तो दाखवतो. रोजच्या जीवनातलीच लढाई त्याच्यासाठी खरं तर खूप होती. हे संकट म्हणजे अग्निपरीक्षाच. कासावीस होऊन जेव्हा स्वत: लुधियानाला जायचं ठरवतो, तेव्हा होणाऱ्या खर्चाला कसं भागवायचं, याची या कुटुंबाच्या बजेटची चर्चा काळजाला घर पाडते. दिल्लीहून लुधियानाला जायचे ३८९ रू. आणि वरखर्चाच्या तजवीजीसाठी त्याच्याचसारखे हातावर पोट असलेले हात मदतीला येतात. लुधियानाला जी काही माहिती मिळते त्याचं सार इतकच की सिद्धार्थला डोंगरीला नेलं असू शकेल. हा अर्थात त्याच्या रूममेटचा अंदाज.

जसा सिद्धार्थच्या बाबांचा संघर्ष, तशी एकीकडे झुरणारी त्याची आई. तुमच्या-माझ्या आईसारखीच, मुलासाठी कळवळणारी, तो एजंट नवऱ्याला नीट उत्तर देणार नाही, म्हणून वाघिणीसारखी तरातरा जाऊन त्या लुधियानाच्या कारखानदाराच्या पत्त्याचं पान एजंटच्या डायरीतून फाडून आणणारी, एका बाजूला ज्योतिषाकडे जाऊन त्याचे ग्रह बघणारी, नवरा लांबच्या गावी मुलाला शोधायला जाणार म्हणून त्याच्या धंद्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेणारी. तिची वेदना माझ्यातल्या आईला हुंदके द्यायला भाग  पाडते.

मग सुरू होतो शोध डोंगरीचा. हे गाव नक्की कुठे आहे आणि तिकडे काय आहे हे आम्हा मुंबईकरांच्या तोंडावर असलेलं उत्तर शोधताना तोंडाला मात्र फेस येतो. डोंगरी शोधली तरी सिद्धार्थ मिळणार का? मुंबईत आणखी अशीच रस्त्यावर असलेली मुलं प्रसंगी सिद्धार्थच्या वडिलांना सल्ला देताना त्यांच्यापेक्षा वडिल वाटून जातात. नकळत या सगळ्याच मुलांचे प्रश्न आपल्याला स्पर्शून जातात. पोटच्या मुलाला आपण जवळजवळ हरवून बसलोय या भावनेने आसपास दिसणारी सगळीच मुलं सिद्धार्थसारखी वाटायला लागतात, त्याचा सुरुवातीला पुसट दिसलेला चेहरा आपल्या सर्वांसाठी धूसर होत जातो. आता दरमजल करत भटकणाऱ्या या बापाच्या वेदनेने आपणाला हुरुहूर लावते. चटका लावणारा हा सिद्धार्थ.

मला सिद्धार्थ म्हटलं की तो राजकुमार आठवतो, ज्याने राजवाड्याबाहेर पडण्याआधी दु:ख कधीही पाहिलं नव्हतं. तसं पाहायला गेलं दुःखाची पराकोटी होते, तेव्हा प्रसंगानुरूप आपलाही "सिद्धार्थ" होत असतोच. त्याचं पुढे काही करता येईल का? हे आपल्याला माहित नसतं. पुन्हा "जैसे थे" झालं की आपल्यातला तो "सिद्धार्थ" तात्पुरता गायब होतो. या साऱ्या भावनांचं, हतबलतेचं पुढे काय करायचं याचा नेमका तोडगा मला तरी अजून मिळाला नाही. इथून पुढे मात्र "सिद्धार्थ" म्हटलं की जसा तो राजकुमार आठवेल तसाच आठवेल हा सिद्धार्थ. जो कळत नकळत आपल्या आसपास कुठे न कुठे दिसत राहणार तरी त्याला ठळक चेहरा नाही. त्याचं अस्तित्व असून नाकारणाऱ्यांमध्ये मीही असेन पण तरी फक्त वाईट वाटणे सोडून मी आणखी काय काय करावं या उत्तराचा शोध सुरु राहीलच.  

हा सिनेमा निर्माण करणाऱ्या पूर्ण टीमने त्यांचं काम १०० टक्के केलं आहे. IMDB ने ७.१ मानांकन दिलेला, बेजिंगच्या आणि हॉंगकॉंगच्या २०१४ च्या inernational फिल्म फेस्टिवल ला अवार्ड मिळालेला, इतर ठिकाणीही नामांकन मिळालेला (आणि देशात अर्थात कुठेच नामांकन नसलेला)  हा चित्रपट, नेटफिल्क्सने सजेस्ट केला म्हणून मला पाहायला मिळाला. कदाचित जसा सिद्धार्थ हरवला तसा बॉलीवूडमध्ये दर शुक्रवारी येणाऱ्या करोडोंचा गल्ला भरणाऱ्या चित्रपटांच्या गर्दीत हा हरवला का माहित नाही. पण असे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी तो चुकवू नये म्हणून उशिरा का होईना पण ही पोस्ट.  

चित्रपटाचं पोस्टर साभार IMDB



Tuesday, June 5, 2012

चंबळचा धावपटू की बागी????


एक भांबावलेला पत्रकार घाबरत घाबरत एक मुलाखत घ्यायला जातो. त्याच्या समोर असतो चंबळच्या खोर्‍यातला एक डाकू, नव्हे त्याच्या शब्दात, "बागी". आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बोलण्याच्या शैलीत इरफ़ान खानला या बागीच्या रूपात‘ पाहताना आता आपण काय पाहणार आहोत याची उत्कंठा लागून राहते आणि हळूहळू एक वेगळीच सत्यकथा पडद्यावर आकाराला येते.

ही घटना आहे भारतीय सैन्यातील एका भाबड्या सुभेदाराची. त्याच्या पायातलं विजेचं बळ ओळखून त्याला सैन्यातलं स्पोर्ट्स डिविजन दिलं जातं. त्याला खेळात जायचं असतं कारण तिथे त्याला अनलिमिटेड खायला मिळू शकणार असतं. पण खरं तर त्याच्याइतकं वेगवान धावणारं तिथेही कुणीच नसतं. तरीही सुरूवातीला त्याला तिथल्या गुरूच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ५००० मीटरच्या स्पर्धेऐवजी ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घ्यायला लावलं जातं. 

जे मिळालं त्याचंच सोनं करणारा हा शिपाई, राष्ट्रीय स्पर्धेत सतत सात वेळा ती शर्यत जिंकतो. धावण्यातले स्वतःचे वैयक्तिक रेकॉड्सही तो स्वतःच या दरम्यान मोडतो. मात्र १९५८ च्या टोकियोतील आशियाई खेळात त्याला आयत्यावेळी स्पाइकचे बूट दिले जातात आणि त्याची सवय नसल्याने तिथे मात्र त्याला पदक मिळू शकत नाही. पण निराश न होता तो आपला खेळाचा सराव सुरूच ठेवतो. 

दरम्यानच्या काळात सीमेवरच्या प्रत्यक्ष लढाईमध्ये मात्र स्पोर्ट्समध्ये असल्याने त्याला कितीही इच्छा असली तरी सैन्याच्या नियमाप्रमाणे भाग घेऊ दिला जात नाही. त्यानंतर मात्र वय होत आलं तरी आंतरराष्ट्रीय मिलिटरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून तो आपल्या अंगातल्या संतापाची आग विझवतो..देशाचं नाव अशा प्रकारे खेळाच्या लढाईत उंचावतो. 

त्यानंतर थोडं लवकर निवृत्त होताना खरं तर त्याच्या हातात एकीकडे आर्मीमधलं कोचचं पद असतं पण यावेळी मात्र घरच्या जबाबदार्‍यांना तो महत्व देतो; आणि इथेच आपलं सैनिक असणं, देशासाठी जीवतोड धावणं, ते पदक हे सगळं व्यावहारिक जगात काहीच कामाचं नाही, याची हळूहळू प्रचिती यायला सुरूवात होते...सरळ मार्गाने वागून न्याय तर मिळत नाहीच, शिवाय गावगुंडांकडून म्हातार्‍या आईला मारलं जातं त्यामुळे मग चंबळमध्ये आणखी एक बागी तयार होतो आणि त्याची गॅंग. यापुढचं सगळं कथानक वेगळं सांगायला नको. 

शेवट गोड वगैरे व्हायचं भाबडं बॉलिवूडी स्वप्न पाहायची गरज नाहीये कारण ही आहे एक सत्यकथा....आणि हे सगळं ज्याच्या वाट्याला आलं,एक सैनिक म्हणून इमानाने काम करताना, एक गुंड म्हणून मरणं ज्याच्या नशिबी आलं त्याचं नाव आहे "पान सिंग तोमार". 



काही सत्यकथा पाहताना सारखं वाटत राहातं की यातला अन्याय असणार भाग तरी खोटा निघावा..पण ते तसं झालेल नसतं....अशावेळी आपण अंतर्मुख होतो, कुणाच्या आयुष्यात असंही होतं आपल्याला कळतं आणि नकळत आपली मान शरमेने खाली जाते, डोळ्यातून अश्रु ओघळतात...एका वेगवान धावपटूचं त्याच वेगाने एका गुंडात होणारं हे रूपांतर पाहताना असे किती पान सिंग असतील ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या खेळाने त्यांना त्या एका पदकाशिवाय काहीच दिलं नसेल असं सारखं वाटत राहातं....हे सगळं चित्रपटापुरतंच असतं तर किती बरं झालं असतं?? 

देशासाठी सुवर्ण पदक आणूनही ज्याच्या घरादाराचं रक्षण केलं जाऊ शकत नसल्याने एका भाबड्या सैनिकाचं एका गुंडात रुपांतर होताना हतबलतेनं पाहणं इतकंच प्रेक्षक म्हणून आपण करू शकतो.

वरील चित्र मायाजालावरून साभार

Thursday, May 3, 2012

दिल्ली बिल्ली...

म्हंजे झालं असं की आधीच लई वंगाळ वंगाळ बोल्नं ते आपलं शिव्या का काय हाय म्हंतांन्सी म्हूनशान सम्दी बोलुन राहिले व्हते..त्यात परवा रातीला कुनीतरी आनी बोल्लं की बग पन मग तुमी लोकं संत्र्याचा रस कवा बी पिनार न्हाय..आता ह्ये शिव्या अनं संत्र्याचा रस काय समंदं....आप्लं काय बी डोच्कं चालेना बगा म्हूनशान एगदाचं ते नेटफ़िक्ल्क्ष लावलं आनं दिल्लीची काय ती बिल्ली हाय ती पायला घेतलीच....

ते आदी नेटफ़िक्ल्क्षला कुटलं हिंदी पिच्चर आलं नं का की लगेच बगुन टाकायचं बगा..त्ये ब्येनं लई लब्बाड हायती...काय काय सांगतील...नवीन नवीन पालिसी काढतील अन मग मोडून बी टाकतील..आपन फ़ुकट पैकं कशाला जास्त द्या....त्ये पन एक कारन व्हतं बरं का बगायचं...
 
लावलं तर अक्खी श्टोरी म्हंजे काय ते चार आन्याची... न्हाय चला रुप्याची कोंबडी अवं चार आने ग्येले न्हवं का जुन्या बाजारात आपलं ते मोडीत..म्हंजे त्येच ते...ग्येले ते चार आने आनं रायले ते आठ आने पन न्हाई डायरेक्ट रुपाया आता त्यो पन राहतो का जातो द्येव जाने...हां तर कुटं होतो आपनं...रायले ते आपलं त्येच्या बा...फ़ुल्या फ़ुल्या फ़ुल्या....आसं व्हतं बगा ते पिच्चर पाह्यला म्हून न्हाई समदी हवाच आशी हाय आजकाल....हां तर रुपायाची कोंबडी अनं पाच रुपायाचा मसाला....बरं तो पन कसा तर रंग लावलेली ती तंदुरी कोंबडी अस्ते नं आक्षी तिच्यावानी..नुस्तंच रुपडं...चव समदी सारखीच...

श्टोरी काय वो तीच ती..तीन मित्र त्येला कशापाय नेहमी लागतात काय ठावं न्हाय पन लागतात..बरं लागतात तर घे मुडद्या..पन काय त्ये शिव्या शिव्या म्हटलं तर काय वरायटी हाय का नाय...त्येच ते नेहमीचं ..त त..आपलं फ़ फ़.....म्हंजे आता बाईच्या जातीला आलं म्हुन काय शिव्या ठावं न्हाय व्हयं....म्हंजे बाप्यांना ठावं नस्तील त्येच्यापरीस बाईला शिव्यांची माहिती...कशी म्हंता..अवं ऐकाया तर आम्हालाच लागतात का न्हाय?? सांगा..म्हंजे त्ये तुमी मोट्या सालंत जावा नायतर त्ये काय ते विंजिनियर व्हायच्या कालिजात...ती पाच आट पोरांच्या संगतीत हुब्या दोनेक पोरी त्या पोरांच्या टक्कुर्‍यात तरी असतात का? त्यांचं लक्ष त्ये जुनियर का काय म्हंता त्या पोरींवर आन मग त्ये एकडाव सुरु झाले की भेंडी खेळापरीस शिव्याच शिव्या देऊन राहिले की ऐकनार कोन म्हंते मी??? तर आता आलं ना ध्येनात समद्या शिव्या ऐकायचा मक्ता घेऊन पन मूग आपलं त्ये शिव्या गिळून बसल्येल्या पोरी हे पिच्चर बगनार त्यान्ला वरायटी नको??
 
बरं नको तर नको...त्ये एक कोन ते हिरो कसलं ते काळा डोळा घेऊन समदं पिच्चर फ़िरनार त्येला बगायचं तरी कसं...थोडं काय मोटं कारन नको का डोळा फ़ोडून फ़िरतोय काय? गाडीमध्ये बंदुका घेऊन फ़िरतो काय?? मसाला न्हाइ तर काय?? राहिलं तर त्ये एक संत्र....त्ये हाय तसं नामी पन रातीला पिच्चर पाहिलं नं सक्कालपतुर डोस्क्यातनं पार रस ग्येला बगा..

न्हाइ म्हंजे बगुच नका असा काय नाय....ते शेवटी तरी एक त्ये आमचं लाडकं मिथुनदा श्टाइल डान्स क्येलाय..पन म्हंते हाय नं त्यो जित्ता...उस ग्वाड लागला सारखं मिथुनदा आवडला तर त्याच्यासारकंच आपलं पाय नाचवायचं...बरं त्ये पन बगितलं पन मग त्ये श्टोरीचं काय...त्ये हिरं काय नं डाकु पन येका जागी बसुन...त्यांच्याकडे पन आक्षी म्हटलं तसं वरायटी नाय...का असं म्हनुया नं त्ये लै वंगाळ वाटायची काय ते म्हंता तुमी डेफ़िन्येशन का काय त्ये बदलली आक्शी....रातीला पिच्चर पायला अन वाटलं आता सकाळधरनं शिव्याच येतील का काय तोंडात न्हाय तर डोस्क्यात तरी..पन काय बी नाय....तसं बी माझ्या डोस्क्यात जी पन लोकं पिच्चरचं काय बी घालाया गेलेत, त्येंचंच डोस्कं गरगरलं...तर ह्ये तसं काय म्हनत्यात ते नार्मलच की.....:)

जाऊ दे...उगा आप्लं ह्ये लिवलं...काय त्ये म्हनायचं...खोदा पाड आनि निकली दिल्लीची बिल्ली.... :)

फ़ोटो साभार: मायाजाल

Tuesday, March 20, 2012

निळ्या छत्रीचा धडा अर्थात ब्लु अम्र्बेला

हिमाचल प्रदेशातलं एक छोटं गाव. तिथल्या खत्री स्टॉलचा मालक नंदू खत्रीची इंग्रजीत त्याचं भविष्य ऐकताना झालेली गंम्मत आणि मग लगेच पायावर ताल धरायला लावणारं "मेरा डेसू यहीं अडा" हे गाणं म्हणत येणारी गावातली चंदा गोळा करणारी छोट्या मुलांची टोळी याने सुरूवात होणारी ही गोष्ट....लहान मुलांचा एखादा चित्रपट असेल असं वाटून आणि खरं तर रस्किन बॉंड आणि विशाल भारद्वाज ही दोन भारदस्त नावं वाचली म्हणून पाहायला सुरू केलेला हा चित्रपट. दीडच तासाचा आहे ही माझ्यासारख्यांसाठी आणखी जमेची बाजू. शिवाय लहान मुलांना सांगितल्या गेलेल्या कथांमध्ये रमणारी मोठी मंडळी ज्या कुठल्या कॅटेगरीत मोडतात त्यातलीच मी. एखादी कथा जेव्हा दृकश्राव्य माध्यमातून आपल्यासमोर मांडली जाते तेव्हा तिची मांडणी, लोकेशन्स, पात्रपरिचय आणि पार्श्वसंगीत या आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबीही जुळून आल्या की आपण त्या कथेचा एक भाग होऊन जातो. हा चित्रपट पाहताना तसाच काहीसा अनुभव मलाही आला.
इथे पहिल्या पंधरा मिनिटांत पंकज कपूर यांचा "नंदू" आणि श्रेया शर्मा या अत्यंत गोड दिसणार्‍या मुलीने तितकीच सुंदर सादर केलेली "बिनिया" या दोन व्यक्तिरेखा कधी ही कथा ऐकणार्‍यांच्या समुहात आपल्याला सामील करुन घेतात हे कळत नाही. बाकी व्यक्तिरेखा आणि हिमाचलमधल्या हा छोट्या गावाचं रूप हळूहळू अधोरेखित होतानाच या कथेची आणखी एक नायिका जिचं नाव या चित्रपटाला दिलंय ती म्हणजे एक जपानी पद्धतीची निळी छत्री अर्थात "ब्लु अम्ब्रेला"ही लगोलग अवतरते आणि कथा आकाराला घेते.
नंदुचा ती चहा-पाण्याची टपरी सोडून एक आणखी आवडता उद्योग म्ह्णजे गावातल्या लोकांना (किंवा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्याच्याकडे गोळ्या-बिस्किटं घेणार्‍या छोट्या मुलांनाही) उधार पैसे देऊन मग ते परत घ्यायच्या वेळेस दुसरं काही ना काही मागत बसायचं किंवा हडपायचं. हे अर्थात सगळ्यांना माहित आहे पण तरी कुणी नं कुणी बकरा त्याच्याकडे असतोच. चित्रपटाच्या सुरूवातीलाच एका लहान मुलाकडून दुर्बिण बळकावण्याचा त्याचा प्रयत्न पाहिला की हे आपल्यालाही स्पष्ट होतं. "लोणचं" ही त्याला अत्यंत आवडणारी गोष्ट. त्याला आता ही गावात सगळ्यांना हेवा वाटणारी बिनियाकडे असणारी छत्री स्वतःकडे हवी असावीशी वाटणं साहजिकच आहे. बिनियाला तो वार्षिक खाऊचं आमीष दाखवून ती मिळवायचा एक केविलवाणा प्रयत्न करतो त्या प्रसंगात त्या दोघांचा अभिनय, संवादफ़ेक पाहण्यासारखी आहे. इथे हा चित्रपट आपली पकड आणखी मजबूत करायला प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण चित्रपटाला जे विनोदाचं अंग दिलंय त्याने आपल्याला हे सर्व अनुभवतानाची मजा येते.....कुठल्याही लहान गावात कदाचीत अजुनही अशा प्रकारचे प्रसंग होत असतील अगदी असंही वाटून आपण या चित्रपटाशी आणखी समरस होतो...
अर्थात बिनियाही अतिशय हुशार पोरगी आहे. ती काही त्याला दाद लावू देत नाही. तिची ती भूरळ घालणारी निळी छत्री आपल्यालाही भूरळ घालू लागते. या संपुर्ण चित्रपटात आपल्या चेहर्‍याने प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालणारी ही मुलगी फ़ार मनात बसते. तिची विधवा आई जेव्हा ही छत्री कुणा पर्यटकाने ही छत्री अशीच कशी दिली असा तिच्या मागे लकडा लावते त्यावेळी तिच्या पहेलवान भावाने स्वतः अस्वलाच्या दाताचं आणलेलं लकी लॉकेट देऊन घेतलेल्या छत्रीवरचं तिचं प्रेम चित्रपटात जागोजागी दिसतं...त्यानंतर या छत्रीने नेमकं ती तिच्या भावावर हल्ला करायला आलेल्या सापाला पळवून लावते आणि अर्थातच या छोट्याशा गावात ती आणि तिची छत्री याचं कौतुक जास्तच पसरतं. छत्री घेऊन तिच्याबरोबरच्या इतर मुलामुलींबरोबरचं गाणं हे चित्रपट पाहताना आपल्याही मनात रुंजी घालतं...आपणही नकळत म्हणतो "कुक कुकडी कुक, कुक कुकडी कुक".
आता अर्थातच अपेक्षेप्रमाणे ही छत्री हरवते आणि मग त्यानंतरची इतर चित्रपटात प्रेमभंग झालेली नायिका असते तशीच भकास बसलेली बिनिया आणि तिचं सांत्वन (अर्थात बाहेरून) करणारे नंदू आणि गावातल्या इतर काही व्यक्तिरेखा ज्यांना आधी फ़ार फ़ुटेज न खाता व्यवस्थित ओळख करून देण्यात आलंय. जसं अपेक्षेप्रमाणे ही छ्त्री हरवते तसंच अपेक्षेप्रमाणे जेव्हा ती अवतरते तेव्हा किंवा त्याआधी ती नंदूने घेतली असेल असं आपल्याला वाटू न द्यायचं काम दिग्दर्शकाने आधीच्या काही प्रसंगात नंदूचं "चोरी करना पाप है" किंवा त्याचं त्या छत्रीची बाजारतली किंमत काढणारा नंदू या सगळ्याने कमी होतो. पण तरीही बिनिया त्याच्या पोलिसांना घेऊन त्याच्या दुकानावर छापा घालते आणि इथे हा चित्रपट किंवा ही कथा बालकथेतून आपल्याला बाहेर काढून मोठ्या माणसांच्या खर्‍या जगात घेऊन येते.
छत्री अर्थातच नंदूच्या दुकानात सापडत नाही पण झालेल्या अपमानाने त्याच्याबरोबर आपणही व्याकूळ होतो. अर्थात आता ही छत्री जोवर येणार नाही तोवार आपण लोणच्याला हात लावणार नाही असं सांगून गावच्या लोकांसमोर लोणच्याची एक बरणी फ़ोडणारा नंदू पाहिला की चित्रपट पाहणार्‍या आपल्यासाठी मात्र थोडं हलकं होऊन जातं. थोडसं पु.ल.देशपांड्याच्या भानावर आलेल्या गटण्याप्रमाणे...:)
या पार्श्वभूमीवर "पर्बतों पे बर्फ़ा बरसा लागे" हे गाणं हिमाचलमधला विंटर समोर आणतो...त्या हिवाळ्यात छत्रीच्या आठवणीने उदास झालेली बिनिया दिग्दर्शकाने अतिशय मार्मिकपणे टिपली आहे.
दुसर्‍याच काही क्षणात पुन्हा ऋतु बदलतो आणि स्वच्छ सुर्यप्रकाशात तशीच गुलाबी छत्री नंदू गावच्या लोकांच्या समोर टाळ्यांच्या गजरात काढून कथेचा पुढचा टप्पा गाठतो. आता आधीचे काही अतृप्त आत्मे जसे लिलावती आणि तिचा नवरा यांना लोणच्याच्या बदल्यात छत्री भाड्याने देणे वगैरे उद्योग किंवा सगळीकडे ती छत्री मिरवणे हे त्याच्या शब्दात सांगायचं तर आत्मा संतुष्ट करायचे उद्योगही सुरू करतो. गावात अधेमधे येणारी चित्रपटवाली मंडळीबद्दलचे प्रसंगही कथेत थोडीफ़ार मीठ-मिरी घालतात.
आणि मग येतो तो शेवटच्या वळणाआधीचा टप्पा. बिनियाने घेतलेला वेगळ्या पध्दतीने छत्रीचा शोध..यावेळी खरा चोर सापडतो आणि अर्थातच तो नंदूच असतो (ती ते कसं शोधते हे लिहिण्याचा मोह मी टाळते कारण जवळजवळ सगळीच कथा या पोस्टमध्ये आहे) पण यावेळी गावकर्‍यांनी त्याला आधी दिलेल्या मान-मरातबामुळे तो चोरच नाही तर खोटारडाही ठरतो आणि सगळं गाव त्याला वाळीत टाकतं...इथे पुन्हा एकदा हिमाचलमधला हिवाळा...देवदार वृक्षांवरून बरसणारा बर्फ़ आणि आधीचं हिरवगार असणारं आता पांढरंशुभ्र झालेलं कुरण हे दिग्दर्शन  चित्रपट आतपर्यंत पोहोचवायला खूप मदत करतं....
त्यानंतर जे काही प्रसंग दाखवलेत त्यात हवालदिल होऊन मुलांना फ़ुकट चॉकोलेट देऊ करणारा आणि मग मुलांच्या "नंदकिशोर छत्रीचोर" अशा ओरड्यामुळे त्यांच्या मागे लागणारा नंदू....गावकर्‍यांच्या घालून-पाडून बोलण्याने चेहरा पाडून घेणारा नंदू...तो एका ठिकाणी दाढी करायला जातो तेव्हा न्हाव्याला "तिनका जरूर निकाल देना" किंवा त्याने देऊ केलेलं अस्वलाच्या दाताचं लॉकेट नाकारताना "चोरी का होगा तो कहीं भालू न पिछे पडे" अशा प्रकारे त्याला चिडवण्याची संधी न सोडणारे गावकरी या अशा प्रसंगातून त्याचं दीनवाणेपण समोर येतं तसं तसं आता याचं काय होणार हे आपल्यालाही कळत नाही. नकळत या इतक्या छोट्या छत्रीमुळे एखाद्या माणसाचं झालेलं हरण कुठेतरी आपल्याला आजुबाजुलाही असं कुणाला वागवलं जात असेल तर त्याचं कसं होत असेल हा एक अ‍ॅंगल दाखवून देतो.
आता पुढे काय हे आपल्याला जास्त विचारात न पाडता एक सुखद वळण कथाकार आपल्यासमोर घेऊन येतो. हे सगळे प्रसंग पाहून खूप विचार करणारा बिनियाचा चिमुकला जीव यावर एक सुंदर उपाय काढतो आणि नंदूच्या दुकानात असंच काही काम काढून जाताना ती छत्री तिथेच ठेऊन येते. छत्रीमुळे तावून-सुलाखून निघालेला नंदू तिला ती छत्री परत द्यायला जातो आणि आपल्या सुंदर हास्याने ती त्याच्याच लकबीत त्याला ती छत्री स्वतःची नाही म्हणून सांगते...खूप गोड वाटतं तिचं ते "बाय चान्स".....

त्यानंतर मग सुरुवातीला म्हटलेला तो इंग्रजीतलं भविष्य ऐकायच्या प्रसंगाने ही कथा एका चांगल्या वळणावर येऊन संपते....खत्रीच्या स्टॉलचं नाव छत्री स्टॉल झालेलं असतं....
गोष्टी ऐकायला ज्यांना आवडतं त्यांना गोष्टीचा हा दृक-श्राव्य परीणाम जरूर आवडेल. कुठल्याही चित्रपटाच्या कथेत न म्हटलेले संवाद हे पार्श्वसंगीत भरून काढू शकतं असं विधान करायचं असेल तर ब्लु अंम्ब्रेलाचं अप्रतिम पार्श्वसंगीत त्या छोट्या गावातल्या हिवाळ्यात आपल्याला नेऊन सोडतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीचा बाऊ करून एक जीवन उदासीनतेच्या वाटेवर लागलेलं असतं त्यावर एक छोटीशी मुलगी किती निरागसपणे उपाय करू शकते हा संदेशही सोप्या भाषेत हा चित्रपट देऊन जातो.
हा चित्रपट मी या हिवाळ्यात एकदा आई आणि एकदा बाबा दोघांबरोबर पाहिला आणि दोघांनाही तो खूप आवडला. २००५ मध्ये आलेला चित्रपट मला नेटफ़्लिक्सवरच्या सजेशन्स मध्ये आला होता...ज्याने कुणी ही सजेशन्सची कल्पना सुरू केलीय त्याचे आभार आहेतच. विशाल भारद्वाज जो लहान मुलांसाठीच्या "मोगली"मुळे मला तेव्हापासून आवडायचा त्याचं सादरीकरण हे या चित्रपटाचं यश आहे. यापूर्वी मी ज्यांना वाचलंय पण आठवत नाही अशा लेखकांमध्ये रस्किन बॉंड यांचं नाव आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं साहित्य मिळवून वाचायचाही प्रयत्न आहेच. त्याबद्दल जर कुणाकडे अधीक माहिती असेल तर नक्की द्या...आणि हो आपणही हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला तो कसा वाटला ते नक्की कळवा....:)

Sunday, January 15, 2012

पन्नासाव्या डेटची पहिली कहाणी

’ल्युसी’, हवाईमध्ये राहणारी एक मुलगी आपल्या बाबांच्या वाढदिवसासाठी अननस आणायला गेली असता झालेल्या अपघातात मेंदुच्या एका विशिष्त भागाला धक्का बसल्याने स्मृतिभ्रंशाच्या वेगळ्याच प्रकाराला सामोरी जाते. त्यानंतर ती रोज फ़क्त तोच १३ ऑक्टोबर जगते, ज्या दिवशी रविवार असतो आणि तिच्या वडिलांचा वाढदिवस असतो.
तिच्या या जागृत समाधीवर काही उपाय नसल्याने तिचे बाबा तिच्यासाठी हेही सुखकर व्हावं म्हणून तिला तोच दिवस आहे असं वाटावं याची शक्य होईल ती सोय करतात. तिच्यासाठी त्या दिवशीचं वर्तमानपत्र ठेवलं जातं. ती रोज तेच वाचते. नेहमीच्या ठिकाणी ब्रेकफ़ास्टसाठी जाते, मागवलेल्या वॉफ़ल्सचे त्रिकोण नाहीतर घरासारखे आकार करुन पुस्तकं वाचायची रविवारची सवय, मग घरी आल्यावर बाबांना तीच sixth sense ची कॅसेट गिफ़्ट देते. आधी ठरल्याप्रमाणे बाबा तिला भिंत रंगवायचं काम देतात. मग वर्तमानपत्रात वाचलं असतं त्याप्रमाणे वायकिंगचा गेम (तिला ठाऊक नसतं तिच्यासाठी कॅसेट टाकून ठेवली आहे) भावाबरोबर पाहताना त्याच पैजा. मग ती आधी दिलेली sixth sense ची कॅसेट पाहून पहिल्यांदीच पाहात असल्यासारखं त्यातल्या सस्पेन्सवर तिचं भाष्य. रोज तेच..तिच्या बेडरुमचा दिवा मालवला की मग लगोलग बाबा आणि भावाचं पुन्हा दुसर्‍या दिवसासाठी सारवासारव करणं...भिंत पुन्हा पांढरी करणं, वर्तमानपत्राची नवी प्रत काढणं, sixth sense ला गिफ़्ट रॅप करणं..
रोज हाच दिवस जगणार्‍या या मुलीच्या आयुष्यात त्या ब्रेकफ़ास्ट रेस्टॉरन्टमध्ये आलेला, एका मत्स्यालयात सील/वॉलरसचा व्हेट असणारा हेन्री येतो. तो तिच्या आयुष्यात येतो म्हणण्यापेक्षा ती त्याच्या आयुष्यात येते असंच म्हणायला हवं कारण सकाळी हिची पाटी पुन्हा कोरी होणार.
इथपर्यंत जर हटके वाटत असेल आणि त्यामानाने थोड्या इमो विषयावरही हलकाफ़ुलका चित्रपट बनू शकतो असं वाटत असेल तर पहायलाच हवा 50 first dates.
२००४ मध्ये आलेल्या हा चित्रपटाबद्दल मी आता का ब्लॉगवर लिहिते असा प्रश्न पडला असेल तर माझं आणि चित्रपटांचं नातं म्हणजे मी अगदी चित्रपटवेडी नाहीये आणि त्यातही मुख्य म्हणजे एकदा चित्रपट पाहिला तरी मी थोड्याच दिवसांत त्या चित्रपटाबद्दल विसरलेले असते. त्यामुळे मी काय पाहिलंय हे माझ्यापेक्षा ज्यांनी तो चित्रपट माझ्याबरोबर पाहिला असतो त्यांना जास्त लक्षात असतं.खूपदा दुसर्‍यांदा चित्रपट पाहताना मी याची शेंडी त्याला लावून एका वेगळ्याच चित्रपटाची पटकथा तयार होते.. आणि नट-नट्या यांच्या नावांबद्दल मी घातलेल्य गोंधळावर तर एक संपुर्ण वेगळी पोस्ट तयार होईल. या पार्श्वभूमीवरही काही हटके चित्रपट लक्षात राहिले जातात. या चित्रपटाततर विसराळूपणालाच खूप छानपणे सादर केल्यागेल्यामुळे हाही लक्षात राहणार हे माहिते त्यामुळे ही पोस्ट थोडीफ़ार माझ्या चित्रपटविसरभोळेपणाची माझी मलाच आठवण राहण्यासाठी.

image credit

Monday, March 1, 2010

आपणचं होऊया आपल्या खारुताईंचे डेव्ह...

२००७ च्या शेवटी कधीतरी alvin and the chipmunks चित्रपट पाहिला. ऍनिमेटेड चित्रपट पाहायला वयाचं बंधन नाही हे पाहताना जाणवतं पण हे चित्रपट आपल्याला एक छान संदेश देऊन जातात हे पुन्हा एकदा पटलं...त्यानंतर भोवताली घडणार्‍या बर्‍याच घडामोडींच्या निमित्ताने हा चित्रपट सारखाच आठवतो. कितीतरी ठिकाणी मी या चित्रपटातल्या खारुताई भेटतात असं मनाशीच म्हणते त्याची आठवण म्हणून ही पोस्ट.


ही गोष्ट आहे तीन चिपमक्सची. आपल्या सोयीसाठी त्यांना खारुताई म्हणूया हवंतर. तर तीन गाणार्‍या खारुताई, त्यांचं गाण्याचं कौशल्य ओळखणारा एक धडपड्या गीत/संगीतकार डेव्ह सेव्हिल आणि त्यांच्या या कौशल्याचं मोठ्या चतुरपणे मार्केटिंग करणारा इयान. बाकीचे नेहमीचे लोकं आहेतच म्हणजे हिरो डेव्हची एक गर्लफ़्रेंड वगैरे पण ही गोष्ट मुख्यपणे घडते ती या पाच जणांच्या आयुष्यात. योगायोगाने डेव्हच्या घरी आलेल्या या तीन गाणार्‍या खारुताईंचं कौशल्य ओळखून डेव्ह त्यांच्या बरोबर एक आल्बम काढतो, त्याच्या धडपडीला यश येतं आणि तरी ते यश तो खारुताईंच्या डोक्यात जाऊ देत नाही.. पण एका मोठ्या संगीत कंपनीचा मालक इयान, खोटं खोटं अंकल इयान बनुन यांच्यात फ़ुट पाडून या तिघांना डेव्हपासुन वेगळं करुन आपल्या घरी आणतो.

यांचं गाणं जगावेगळं आहे हे ओळखून या तिघांच्या कॉन्सर्ट्सचे एकापाठी एक शो लावतो. परिणाम तिघांच्या स्वरयंत्रावर अधिक ताण आणि एकंदरित तब्येत बिघडण्यावर होते. मग त्यांची डॉक्टर त्यांना विश्रांतीचा सल्ला देते. पण धंद्याचं होणारं नुकसान आणि भावी फ़ायदा लक्षात घेऊन इयान त्यांना लिपसिंगिग करायला लावतो. दरम्यान डेव्हला आपल्या आयुष्यात मुलांसारखी झालेली या तीन खारुताईंची सवय लक्षात येते आणि यांना परत आणण्यासाठी तो एका शोमध्ये जाऊन त्यांना शोधायचा प्रयत्न करतो. खारुताईंनाही तोपर्यंत डेव्ह आणि इयान मधला फ़रक कळला असतो..इयानने केलेलं लिपसिंगिगचं गुपीत लोकांना कळतं...एकंदरित बरंच काही फ़िल्मी चक्कर घडून शेवटी ही मुलं आपल्या मानलेल्या बाबाकडे येतात. आणि मग त्यांनाही बाबाचं आपल्या भविष्यासाठी काळजी, पैशाची बचत करणं हे सगळं कळतं. ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड...

ही कथा म्हटलं तर लहान मुलांसाठी आहे पण नीट लक्ष देऊन पाहिलंत तर कळतं असे कितीतरी जगावेगळी कौशल्य असणार्‍या खारुताई आपल्यात आहेत आणि आपल्यासारख्या सर्वच पालकरूपी डेव्हनी आता जागं व्हायला हवंय. मला हे जाणवलं जेव्हा हिंदीतल्या एका गाण्याच्या रिऍलिटी शोमध्ये छोट्या छोट्या मुलांना गाताना. शेवटपर्यंत टिकणार्‍या मुलांना फ़क्त कार्यक्रमासाठीच नाही तर इतर ठिकाणीही गायला लावुन काय होत असेल त्यांच्या छोट्याशा स्वरयंत्राचं हे मनात आल्याशिवाय राहावलं नाही. नंतर पाहिलं ते हिंदीमधलाच एक नाचाचा कार्यक्रम यातही मोठ्यांनाही न कळणार्‍या भावना चेहर्‍यावर आणून, सगळं अंग लचकवुन ही मुलं नाचत होती. म्हणायचं तर कदाचित मोठीही इतकी छान अदाकारी करु शकणार नाहीत पण म्हणून आतापासुनंच हे? असंही मनात आल्याशिवाय राहावलं नाही. आणि मग नेहमीप्रमाणे याच स्पर्धा मराठीतही पाहिल्या गेल्या. मुलं कार्यक्रमाबाहेर गेली की हताश, रडवेल्या चेहर्‍याचे पालक आणि कार्यक्रम संपला की मग इतर ठिकाणी या मुलांचे गुणदर्शन सुरू...

या सगळ्यांनीच हा चित्रपट एकदा मन लावुन पाहावा असं मला वाटतं...युग स्पर्धेचं असलं तरी ’लहानपण देगा देवा’ असं नंतर ही मुलं म्हणू शकणार नाहीत इतकंही त्यांना राबवावं का? एक दोनदा ठीक आहे पण हिंदीत हरलं की मराठीत..तिथुन बाहेर पडलं की एखाद्या कार्यक्रमात असं सगळीचकडे आपल्या मुलांना पुढे पुढे करायचं याला काय अर्थ आहे? आणि मग सारखं सारखं टिव्हीवर झळकायचं व्यसन मुलाला लागलं तर दोष कुणाचा? आता वेळ आहे आपल्या लहानग्याचा कल पाहुन ती कला डेव्हलप करायची, त्यातलं पुढंचं शिक्षण देऊन मोठेपणी या स्पर्धेत आपले गुण तो योग्य प्रकारे दाखवु शकेल याची तयारी करायची.

वाहिन्या, माध्यमं त्यांच इयान अंकल व्हायचं काम नेटाने करताहेत. वेगवेगळे रिऍलिटी शोज आणि स्पर्धा आयोजित केल्या जातील. कदाचित तुमच्या खास कलाकारी अवगत असणार्‍या मुलासाठी एखादा वेगळा कार्यक्रम, स्टेज शो याचंही आमंत्रण पुढ्यात येईल पण आत्ता त्या लहानग्याच्या आयुष्यात एका काळजीवाहु डेव्हची गरज आहे आणि आपल्या मुलांसाठी ती भूमिका आपण स्वतःच पार पाडायला हवी नाही का?

टीप..आज ’मराठी मंडळी’ या संकेतस्थळाचा उद्घाटन सोहळा मोठ्या डौलात पार पडला.त्यासाठी लिहिलेला हा पहिला लेख. मराठी मंडळींसाठी सर्वांनाच शुभेच्छा.

Wednesday, September 30, 2009

गोष्ट छोटी डोंगराएवढी

सध्या आईचा मुक्काम इथे आहे त्यामुळे फ़ारसा विचार न करता मराठी चित्रपट लावते. जास्तीत जास्त काय तर तेच तेच गावरान विनोद नाही आवडले तर नेट सर्फ़ करणं किंवा दुसरं काही काम करणं हा पर्याय असतो. तसंच वाटलं होतं जेव्हा मकरंद अनासपुरेचं नाव सुरुवातीला पाहिलं पण एका संवेदनाशील विषयावरचा गंभीर चित्रपट आहे हा "गोष्ट मोठी डोंगराएवढी". नाही मी पुर्ण कथा वगैरे नाही सांगणार कारण एकतर मुळात मी जास्त चित्रपट पाहात नाही फ़क्त मायदेशात सध्या नसल्यामुळे पाहाणं होतं. पण असे काही विषय असले की तो चित्रपट आपसुक पाहिला जातो.पण ते कथा सांगणं मला जमत नाही.

तर "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मध्ये मुख्य प्रश्न शेतकर्यांच्या आत्महत्या हा आहे आणि त्या अनुषंगाने चालु असलेल्या इतर काही प्रश्नांनाही वाचा फ़ोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातुन शेतकी शिकुन परत गावात गेलेल्या मकरंद अनासपुरेला साधं शेतात विहिर खणायला कर्ज काढताना येणार्या अडचणी, सरकारी खात्यातल्या भ्रष्टाचार ज्या प्रकारे मांडलय त्याने आतुन काळीज हलतं. आपल्याकडच्या शेतकर्यांचा खरंच कोण वाली असावा असा प्रश्न नक्की पडेल हा चित्रपट पाहताना. गावातला त्याचा जिवलग मित्र दुसरा एक शेतकरी आधी एक बैल विकतो मग नांगराच्या दुसर्या बाजुला स्वतःच उभा राहातो. मकरंद त्याला स्वतःचा बैल देऊन मदतही करतो. पण तरी आभाळालाच ठिगळ पडलंय; मग घरावर जप्ती आणि दुसराही बैल सावकाराच्या दारात आणि तिथेही अपमान, बहिणीच्या इज्जतीवरुन.

"मातीत जगणं, मातीत मरणं, आपुल्या हातानी रचिलं सरणं" हे गाणं खूप काही सांगुन जातं. पण मरणानंतरही पोस्टमार्टेमसाठीसुद्धा लाच??? आणि पोस्टमार्टेमशिवाय त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार नाही. कागदावर सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येच्या केसेस एकतर दाखवत नाही आणि दाखवायच्या असतील तर मग पोलिसखात्याला पैसे चारा म्हणजे पोस्टमार्टेम करुन ते पुढंच थोडं बघतील. मरणानंतर असं मग जगतानाचं लाचखाऊपणाचं चक्र गरिबी आणि परिस्थितीमुळे न भेदता आल्यामुळे शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय??

आपण भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्या कृषीप्रधान देशातल्या भुमिपुत्राची ही अवस्था बदलण्यासाठी काही चालु आहे का? आधी हे लाचखाऊपणाचं चक्रव्युह कसं भेदायचं?? एक नागरीक म्हणुन मी काय करु शकते?? याचा आज माझा स्वतःशी संघर्ष चाललाय. मला हे भीषण सत्य नुसतं चित्रपटातही पाहावत नाहीये आणि कुणीतरी रोज त्याला सामोरं जातयं ही कल्पनाही करवत नाहीये. एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का? सरकार सरकार म्हणुन अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच खारीचा वाटा म्हणुनतरी काही ठोस करायला हवय ही भावना आजची रात्र झोप लागु देणार नाही. सध्या आपल्याइथे निवडणुकीचे वारे वाहताहेत त्या पार्श्वभुमीवर नक्कीच हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहिला गेला पाहिजे निदान एक सुजाण नागरीक म्हणुन आपण आपलं पवित्र कार्य बजावताना डोळसवृत्तीने निर्णय घेण्यासाठी.
जाता जाता या चित्रपटातील शेतकर्याचं गार्हाणं सारेखं आठवतयं....

"मातीच्या लेकरांचं मातीमधी मनं सारं.....
वारीत चाललो मी आभाळात ध्यान सारं..... "