Monday, December 20, 2010

दत्तजयंती

परदेशात आल्यावर जेव्हा इथे हॉलिडे टाइम आणि हॅपी हॉलिडेचा उठसूठ गजर सुरु होतो त्यावेळी खरंच दया येते इथल्या लोकांची. तो नोव्हेंबरमध्ये आलेला ’थॅंक्सगिव्हिंग’ नामक घरगुती जेवणाचा कार्यक्रम आणि त्याच्या दुसर्‍या दिवशीचा खरेदीचा धुमाकूळ आटपला की वेध लागतात ते नाताळचे. म्हणजे नक्की काय? तर घर सजावट, ख्रिसमस ट्री आणि कुठेकुठे रंगणारे ख्रिसमस कॅरोलचे कार्यक्रम..पण तरी हे सगळं घोटाळतं ते ख्रिसमस या एकाच सणाच्या भोवती. त्यानंतर पाहिलं तर अगदी हाताच्या बोटावर मोजणारे इथले सण, अद्यापही त्यांना उत्सव म्हणायचं जीवावर येतं.. असो..या पार्श्वभूमीवर यांच्या ख्रिसमसच्याच आसपास येणारी दत्तजयंती केवळ तेवढ्यासाठी आठवते असं नाही.


माझं लहानपण वसईतल्या एका छोट्या गावात गेल्याने दत्तजयंतीचाही उत्सव पाहायचं आणि तिथे असेपर्यंत जवळजवळ दरवर्षी तो साजरा करायचं भाग्य मला लाभलंय़. वसई पश्चिमेला "गिरीज" नावाचं एक छोटं गाव आहे, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र "निर्मळ"च्या जवळ. तिथे पर्वतीपेक्षा कदाचित थोडी कमी उंचीची असेल एक टेकडी आहे, "हिराडोंगरी" तिचं नाव. दरवर्षी इथे असणार्‍या दत्ताच्या देवळात दत्तजयंती साजरी होते आणि त्यानिमित्ताने देवळाच्या आसपास एक छोटी जत्रा पण भरते (किंवा तेव्हातरी भरायची...मला साधारण ९५ नंतरचं विशेष माहित नाही)

वसईतील आसपासच्या गावातील बरीच लोकं न चुकता या यात्रेला जायचे आणि त्यात माझे आई-बाबाही होते. माझी आई तशी भाविक आहे..देव खरंच आपल्याला मदत करतो वगैरे गोष्टींवर तिची भाबडी श्रद्धा आजही आहे. मी गमतीत म्हणते की गुरुवारची लक्ष्मीव्रताची पोथी तू वाचायचीस पण लक्ष्मीने मात्र आम्हाला तुझ्यापेक्षा साथ दिलीय...अर्थात तिने ही सर्व भक्ती तिच्या मुलांसाठीच केली असणार याची खात्री आहे मला...असो..

तर आम्ही प्रत्येक दत्तजयंतीला गिरीजला जायचो. बरेचदा पायीच जायचो. त्याचं कारण माझ्या बाबांना चालायला आवडतं हे जरी असलं तरी मुख्य त्यावेळी जरी एस.टी.महामंडळाने जादा बसेस सोडल्या तरी आमच्या स्टॉपला येईपर्यंत थांबायचं त्राण त्यांच्यात नसायचं म्हणून मग निदान जाताना तरी ’वन टु, वन टु’च करावं लागे. ते लवकर अंधार पडायचे दिवस आणि आमच्याबरोबर चालणारे इतर लोकही असायचे शिवाय बाबांच्या गप्पा त्यामुळे तो अर्धा-पाऊण तास कळायचाही नाही कसा जायचा ते. डोंगरीची चढणही अगदी फ़ार नाही आणि पायर्‍या आहेत. त्यामुळे मग रांगेत पोहोचायचो तेच केव्हा केव्हा पायर्‍या संपत आलेल्या असायच्या त्यावेळी.

या दर्शनातलं मला आठवतं ते म्हणजे बहुधा हे देऊळ आणि डोंगरी कुणा तरी पाटलांच्या मालकीची आहे आणि त्यांचा राजू म्हणून एक मुलगा माझ्या बाबांचा विद्यार्थी देव्हार्‍यात असे. आम्ही दिसलो की तो आम्हाला थोडा जास्त भाव देई. मूर्तीसमोर रेंगाळणं आणि हक्काचा नारळ "गुरुजी घ्या ना" म्हणून बाबांना तो देई. ते वय(आणि काळ) असं होतं की अशावेळी माझे बाबा सगळ्यांचे "गुरुजी" असल्याचा मला खूप अभिमान वाटे (खरं तर तो आजही वाटतो जेव्हा हे त्यांचे विद्यार्थी अचानक कुठे भेटतात आणि आवर्जुन हाक मारतात त्या त्या वेळी).

दर्शन झालं की मग हवं तसं त्या छोट्या जत्रेत फ़िरायची मोकळीक असे, अर्थात आई-बाबांबरोबरच.. त्यावेळच्या त्या जत्रा म्हणजे आणि त्यातूनही ही डोंगरीवर असल्याने मोठे पाळणे इ. नसत पण ती गोल गोल घोडे घेऊन फ़िरणारी आणि चार-पाच लाकडी पिंजरेसदृश्य पाळणे उभ्याने गोल गोल फ़िरतात म्हणजे तो पाळणेवाला हातानेच ते फ़िरत असतो ते असत आणि मला हे प्रकार विशेष आवडायचे नाहीत त्यामुळे त्यातली लोकांची मजा पाहाणे हेच होई. बाकी छोटी छोटी दुकानं मात्र बरीच असत. हातातल्या रबरी नळी कम दोर्‍याने वरखाली करणारे पाण्याने भरलेले फ़ुगे, आपटीबार (हा एक मस्त प्रकार नंतर काही आठवडे आम्हाला एकमेकांच्या पायाखाली अचानक फ़ोडून दचकवायला कामी येई) एखादं भातुकलीतलं खेळणं अशी खेळण्यांची छुटकू-मुटकू खरेदी होई.

अशा जत्रांमधुन रिंग फ़ेकणे हाही एक त्यावेळचा लोकप्रिय खेळ होता. तो माझे बाबा आणि दादा खेळत. फ़क्त एकदाच आम्हाला त्यात साबण आणि आगपेटीचं बॉक्स लागलं होतं हे आठवतं आणि तो आनंद मग आम्ही थोडी जादा मिठाई घेऊन साजराही केला होता जसं काही साबण आणि ते बॉक्स म्हणजे काय मौल्यवान वस्तू असाव्यात. बंदुकांनी फ़ुगे फ़ोडणे या स्टॉलवरही गर्दी असे आणि बाबा-दादा तिथेही वेळ घालवत.

खायच्या गोष्टींपैकी एक म्हणजे खजूर आणि दुसरं उकडलेले शेंगोडे आणि शेंगा हे घेतलं म्हणजे घेतलंच पाहिजे या कॅटेगरीतलं. पैकी खजूर आई बहुधा ते थंडीचे दिवस असायचे म्हणून घ्यायची पण मला वाटायचं ते फ़क्त इथेच विकायला येतात.

पण त्याहीपेक्षा माझ्या लहानपणी उकडलेले शेंगोडे हा प्रकार फ़क्त अशा देवाच्या जत्रेतच विकायला परवानगी असावी अशीच माझी समजूत होती.त्याचं काय व्हायचं आधी निर्मळची जत्रा असायची आणि मग वसईतल्या आसपासच्या चर्चेसचे सण म्हणजे एक स्पेशल रविवार जेव्हा तिथेही त्या गावचा उत्सव असे. माझ्या शाळेतल्या ख्रिश्चन मैत्रीणी तिथेही बोलवायच्या त्यामुळे तिथे आणि मग या दत्तजयंतीच्या यात्रेत अशाच ठिकाणी तो उकडलेले शेंगोडेवाला मी पाहायचे त्यामुळे वसईतल्या जत्रा म्हटलं की शेंगोडा माझ्या जीभेवर रूळायला लागतो. नंतर जरी इतर ठिकाणी किंवा भय्याकडूनही शेंगोडे घेतले गेले तरीही निव्वळ तिथले ते शेंगोडे खायला मला या सगळ्या जत्रांमध्ये पुन्हा तसंच जायला आवडेल.

आता ही पायपीट करुन दमलेलो आम्ही जर नेमकंच गिरीजमधलं कुणी ओळखीचं भेटलं तर त्यांच्या घरी दोन मिनिटांसाठी जावं लागे कारण हा त्यांच्या गावातला उत्सव म्हणून त्यांनी अगदी आपण सणाला जसे थोडं खायचं स्पेशल वगैरे केलेलं असतं तसंच केलेलं असे आणि त्यांचा मान मोडायचा नसतो असंही आई म्हणायची. सगळं आटपून किर्र अंधारात मग तिथूनच सुटणारी यात्रा स्पेशल बस पकडून घरी येईपर्यंत जत्रेतल्या आठवणी डोक्यात घोळत असत.

इतकी भाबडेपणे साजरी केलेली दत्तजयंती नेमकी कधी सुटली ते आठवत नाही. पण जवळजवळ विस्मरणात गेलेला हा सण अमेरिकेत आल्यावरही साजरा करायला मिळायला तो आमचा मित्र मंदार जोगळेकराच्या कृपेने. त्याच्या कोकणातल्या गावीही हा उत्सव साजरा होतो आणि त्याच्या मुलांना कळावा म्हणून त्याने त्याच्या घरी सुरु केला होता. मंदारच्या धीरगंभीर आवाजातल्या ॐकाराने सुरु होई. त्याच्या घरी एकत्र म्हटलेल्या आरत्या, जेवण आणि गाण्याचा एखादा कार्यक्रम याने माझ्या काही दत्तजयंत्या आणखी स्पेशल झाल्या.

आता पुन्हा एकदा दत्तजयंतीची पोकळीच आहे पण या आठवणी मात्र मला जेव्हा केव्हा मी माझ्या मुलाला दत्तजयंतीसाठी योग आला तर वर उल्लेखलेल्या मंदिरात घेऊन जाईन त्यावेळेपर्यंत निदान दिलासा देतील याची खात्री आहे. आणि खरं सांगायचं तर ही म्हणजे २०१० ची दत्तजयंती सुद्धा खासच आहे. पण त्याबद्द्ल लवकरच लिहेन त्या क्षणाचीही आठवण झाली की......:)

Wednesday, December 8, 2010

एका (फ़ूड) ब्लॉगरची यशोगाथा....

ब्लॉगिंगच्या विश्वात आलं आणि कुठेही दुसरा ब्लॉगर दिसला की का कुणास ठाऊक ’माझिया जातीचा’ मिळाल्यासारखं होतं. ’फ़ूड नेटवर्क’च्या ’नेक्स्ट फ़ूड नेटवर्क स्टार’ मध्ये जेव्हा आरतीच्या नावाखाली फ़ूड ब्लॉगर असं लिहिलेलं दिसलं तेव्हा तिला मी पाठिंबा देणार हे लगेचच लक्षात आलं; म्हणजे एकतर ब्लॉगर आणि त्यातही भारतीय वंशाची म्हणजे दुधात साखर.

आता या विषयावर पुढे लिहिण्याच्या आधी मला थोडं फ़ूड नेटवर्कबद्द्ल लिहून जरासं (किंवा नेहमीप्रमाणे दोन-तीन घडे) नमनाचं तेल घालणं अत्यावश्यक आहे. खाणं हा आपला अगदी आवडता प्रांत आहे हे नक्की केव्हा लक्षात आलं माहित नाही. पण आठवतं तेव्हापासून आपल्या भारतीय दूरचित्रवाणीवर ’खाना खजाना’ पाहणं हा एक आवडता छंद होता. त्यातली खरं सांगायचं एकही प्रकार मी करुन पाहिला नाही; पण त्यातली नावं लक्षात ठेऊन तसलं काही कुठल्या रेस्टॉरन्टमध्ये दिसलं की मनसोक्त हादडणं हे बरीक केलं. त्यानंतरही दावत का काय नावानं एक खास हैद्राबादी खाण्याचा शो रविवारी असायचा तेही आवडीने पाहिलं. एकंदरित कुणाला खाणं करताना पाहणं हे आवडतं इतपत कळलं. आणि त्याचा फ़ायदा असा की नवं काही खाऊन पाहायचं असेल तर साधारण आपल्याला काय आवडेल हेही लक्षात आले.

त्यानंतर जेव्हा अमेरिकेत आले आणि सुरुवातीला इथलं सोशल सर्कल कमी आणि नोकरीही नव्हती त्याकाळी रिकाम्या डोक्याला काही काम म्हणून इथल्या टी.व्ही.ची चॅनल्स धुंडाळायला सुरुवात केली.सध्याच्या घडीला जरी मला इथल्या कार्यक्रमांचीही थोडी-फ़ार सवय झाली असती तरी तेव्हा काही म्हणता काही आवडायचं नाही. अशातच एकदा फ़ूड-नेटवर्क सुरु केलं. साधारण अर्धा तासाचा एक या क्रमाने सतत सुरु असलेल्या कार्यक्रमांमधली विविधता पाहता या चॅनलला मी कधी ’हुक’ झाले कळलंच नाही. फ़क्त ’कुकिंग शो’ इतपत कार्यक्रम असतील असं जर कुणाला वाटलं असेल तर ते सपशेल चुकीचं आहे. खाणं बनवणं हे अर्थातच अविभाज्य अंग आहे पण खाण्याशी संबंधीत इतर कितीतरी गोष्टी जसं एखाद्या गावची स्पेशालिटी असलेल्या खाण्याची माहिती असलेला कार्यक्रम, ४० डॉलरमध्ये एका शहरात एक दिवसाचं तिन्ही-त्रिकाळ खाणं, एखादी विशिष्ट पाककृती बनवण्यासाठी लागणार्‍या सामुग्रीपासून ते भांड्या-कुंड्यापर्यंतच्या गोष्टींची तांत्रिक माहिती पुरवताना ती पाककृती करणं, अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांचं खाद्यवैशिष्ट्य जपणार एखादा उत्सव वा स्पर्धेची माहिती असे अनेकविध कार्यक्रमांनी भरलेलं हे चॅनल आहे.अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशात खाण्याची विविधता, सणां-वारांनिमित्ते केले जाणारे खाद्यप्रकार हे सर्व पाहता हे असं चॅनल आपल्याकडेच सुरु करावं असं मला सारखं वाटायचं. (मला फ़क्त वाटणार पण संजीव कपुरने त्या दृष्टीने सुरुवात केली आहे असं ऐकतेय..’ढापली बघ माझी आयडिया’ इतकंच म्हणू शकते मी) तर असं हे माझं लाडकं फ़ूड नेटवर्क. मागे म्हटल्याप्रमाणे जसं मायदेशातल्या कार्यक्रमामधलं मी काही स्वतः नाही बनवलं तसंच इथंही फ़क्त बाहेर खाताना काय खावं (किंवा खूपदा काय खाऊ नये) यासाठी इथे पाहिलेले विदेशी खाद्यकृती उपयोगी पडतात शिवाय आपल्या देशी पाककृतींना जेव्हा सगळाच देशी माल मिळत नाही तेव्हा पाट्या टाकायलाही इथे पाहिलेल्या माहितीचा उपयोग होतो.

या पार्श्वभूमीवर जेव्हा ’नेक्स्ट फ़ूडनेटवर्क स्टार’ही स्पर्धा भरवण्यात आली तेव्हा सारखं वाटायचं की यांना कुणीतरी थोडं भारतीय खाणंही खिलवलं पाहिजे. मागच्या की त्याच्या मागच्या सिझनमध्ये एक भारतीय महिला होतीही. पण ती फ़ार काळ टिकू शकेल असं सुरुवातीलाच वाटलं नाही. यावेळी मात्र चुलबुल्या (किंवा अगदी नेटका शब्द बबली) आरतीला पाहिलं आणि तिच्या डोळ्यातली चमक काही वेगळं सांगुन गेली. अगदी पहिल्या भागातच हीचं पाणी वेगळं आहे हे जाणवलं. आणखी भरीस भर म्हणजे तिची ओळख एक फ़ूड ब्लॉगर म्हणून करुन दिल्याने तर तिच्या या उडीचं कौतुकच वाटलं.त्यानंतर प्रत्येक भागात तिलाच सपोर्ट करत राहिलो.

या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय जन्माच्या आणि दुबईत वाढलेल्या आरतीचा ब्लॉग पाहिला आणि ती आपल्यासारखीच एक सर्वसाधारण ब्लॉगर आहे हे लक्षात आलं. तिच्या ब्लॉगवर तिचे यु ट्युबवरचे आरती पार्टी नावाने तिने घरच्या स्वयंपाकघरात बनवलेल्या खाद्यपदार्थांचे व्हिडिओ आहेत आणि बर्‍याच लोकांना त्यामुळे भारतीय पदार्थांची माहिती आवडल्याचं कळतं...शिवाय तिच्या लिहिलेल्या पाककृत्यांनाही तिच्या आईकडच्या किंवा इतर काही छोट्या छोट्या कहाण्या आहेत ज्या ती अतिशय रसभरीत वर्णन करुन मांडते त्यामुळे तिचे पदार्थ, त्यांची नाव, कृती हे सगळं नेहमीसारखं साहित्य आणि कृतींमध्ये अडकलेल्या पाककृतींपेक्षा, वाचताना आणि पाहताना तिच्या जगात आपल्याला घेऊन जातात. माझ्यासारखे प्रेक्षक, सगळेच पदार्थ तयार करणारे नसले तरी अशा कृती लक्षात नक्कीच राहतात आणि कुठेतरी त्यातला काही भाग आपल्या एखाद्या पाककृतीला वेगळा टच द्यायला नक्कीच मदत होते. तिला पदार्थ करताना पाहाणं हाही एक वेगळा अनुभव असतो. तिचं हास्य आणि एकंदरित लाघवी बोलणं तिला पाहत राहायला नक्कीच भाग पाडतं...बाकी नेहमीच्या घरगुती गोष्टी म्हणजे तिच्या कलाकार नवर्‍याची चित्रफ़ीत किंवा एखाद्या ट्रीपचा उल्लेख असं नेहमीचं मॅटरही आहेच..एवढंच नाही तर ही स्पर्धा सुरु झाल्यानंतर घरी केबल नसल्यामुळे सध्या we’ll be watching an episode with a different set of cable-having friends! हे तितक्याच साधेपणाने ती जूनमधल्या एका पोस्टमध्ये लिहून जाते. सध्या तिच्या मेलबॉक्समध्ये १३०० मेल आणि साधारण ५९० कॉमेन्ट्स आहेत आणि सगळ्याच लोकांकडून तिला तुफ़ान कौतुक मिळतंय ही एका ब्लॉगरसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.


दहा आठवडे चालणार्‍या या स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारे स्पर्धकांकडून पाककृती बनवुन घेण्यात येतात.पदार्थांची चव हा मुख्य भाग असला तरी इतर अनेक बाबींवर त्यांचा कस लागतो. आयत्यावेळी देण्यात आलेले मुख्य पदार्थ, एखाद्या थीमप्रमाणे पदार्थ बनवणे म्हणजे जसं बाटलीबंद प्रकार बनवायचा झाल्यास तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्रॅंडसाठी काय बनवाल, मोठ्या पार्टीसाठी दोन स्पर्धकांनी एकत्र खाणं बनवणं किंवा एक दिवस दोघांनी मिळून फ़ूड ट्रक मॅनेज करणं, असं बरचसं काही यावेळी विविध भागात होतं. प्रत्येक भागात निदान एकतरी कॅमेर्‍यासमोर विशिष्ट वेळात एका पदार्थाचं सादरीकरण हेही फ़ार महत्वाचं.कारण शेवटी अंतिम फ़ेरीच्या विजेत्याला फ़ूड नेटवर्कवर स्वतःचा शो मिळणार, तेव्हा त्या व्यक्तीचा कॅमेरासेन्स कसा आहे हे कळणं फ़ार महत्वाचं. शेवटचा भाग म्हणजे अंतिम फ़ेरीला तर एका सेलेब्रिटी शेफ़च्या हाताखाली एक संपुर्ण भागच रेकॉर्ड करणं. हे वाचतानाच थोडं अवघड वाटतं तर प्रत्यक्षात ते सगळं दडपण आणि शेफ़ असणारे इतर स्पर्धक यांच्यावर मात करायची म्हणजे खरंच अंगात खाद्यवेडंच हवं.

आरतीला जेव्हा जेव्हा कॅमेर्‍यासमोर पाहिलं तेव्हा तेव्हा का कुणास ठाऊक हिच्यात हे उपजतच आहे असं नेहमी वाटलं. अपवाद फ़क्त एकाच भागाचा जेव्हा तिला एक मिनिटांत त्या पदार्थाबद्द्ल बोलताना खूप गोंधळायला झालं होतं. पण ती कसर तिने त्याच भागातल्या उरलेल्या पाककृती चविष्टपणे करुन मात केली. प्रत्येक भागात एक त्या भागासाठी विजेता असे आणि त्यातही ती बरेचदा सरस ठरली.

तरीही अंतिम भाग हा थोडा रिस्की असतो कारण त्यात आपली खरं तर स्वतःशीच स्पर्धा असते. कारण दुसरा काय करतो, कुठला मुख्य पदार्थ असल्या गोष्टींशी काही घेणं-देणं नसतं. त्यात तुम्ही कुठला पदार्थ निवडता आणि त्यामागची कथा सांगत तो कशा प्रकारे सादर करताना कॅमेर्‍याला कशा प्रकारे सामोरे जाता, वेळेत पदार्थ बनवता तसंच प्रेक्षक जो या पदार्थाची चव पाहणार नाही त्यालाही कशा प्रकारे उत्तेजित करता हे महत्वाचं. आरतीने यात चक्क पिझ्झा बनवला होता आणि तेही त्याला एक भारतीय टच देऊन. एकंदरितच तिच्या पाककृतींची नावं आणि त्यामागची पार्श्वभूमी यामुळे कार्यक्रमात इतकी रंगत येते की तिला ते बोलताना आणि पदार्थ करताना पाहाणं हा एक छान अनुभव असतो. तिच्या या हसतमुख, विनोदी आणि बोलबोलता एखादी जादा माहिती देण्याच्या पद्धतीमुळे शेवटी तीच वरचढ ठरली आणि एका फ़ूड ब्लॉगरने फ़क्त एक स्पर्धाच नाहीतर अमेरिकेच्या फ़ूड नेटवर्कवर आपल्या हक्काची एक जागाही मिळवली.


मला वाटतं ब्लॉगिंग करणार्‍या प्रत्येकानेच कौतुक करावं अशीच ही घटना आहे. ही पोस्ट लिहितानाच आरतीचा ’आरती पार्टी’चा पहिला भाग सुरु आहे आणि प्रथमच फ़ूड नेटवर्कवर आपला अस्सल देशी स्वयंपाकघरी मस्ट असलेला स्टीलचा हळद-मसाल्याचा डब्बा दिसतोय...हे पाहताना मी वाट पाहातेय आपल्या एखाद्या मराठी फ़ूड ब्लॉगरला अशाच प्रकारे स्वतःचा शोची तयारी करताना पाहण्याची.

ता.क. ही पोस्ट दीपज्योतीच्या २०१० अंकासाठी लिहिली होती. ब्लॉगवर पुन्हा प्रकाशीत करतेय.

Monday, December 6, 2010

गाणी आणि आठवणी ७ - सप्तसुर

सारखं जुन्याच गाण्यांनी मन रिझवायचे दिवस सुदैवाने कमी झाले आहेत आणि त्याला कारण आहेत सारे नव्या दमाचे मराठी संगीतकार आणि गायक कलावंत. असंच एकदा ’मराठी बाणा’ पाहायला दिनानाथला गेलो होतो तेव्हा मध्यंतरात लालबागच्या एका विक्रेत्यांचा मराठी सीडीजचा स्टॉल होता. त्यात हपापलेली खरेदी झाली हे वेगळं सांगायला नको आणि त्यातच हाती लागला दोन सीडीजचा हा टवटवीत अल्बम "सप्तसुर"...Generation Next....


मुख्यपृष्ठावर ओळखीचे चेहरे आणि आत पहिलंच ’मन उधाण वार्‍याचे’ हे तेव्हा एकमेव ओळखीचं गाणं पाहून आणि ऐकुया नंतर निवांत असा विचार करुन घेतलेला संच. परदेशात नाइलाज म्हणून गाणी डालो केली जातात पण जेव्हा संधी मिळते तेव्हा संग्रहासाठी मी शक्यतो आवडीच्या गाण्यांना विकत घेतेच.तसंच थोडंसं...

परत परदेशी आल्यावर गाणी अर्थातच ऐकली गेली. पण खर्‍या अर्थानं पारायणं झाली ती बरोबर मागच्या वर्षी ओरेगावात आलो तेव्हा. अरे हो! वर्ष झालं नाही या नोव्हेंबराखेर? नवी जागा आणि नेमका इथल्या भाषेतला "हॉलिडे सिझन".आल्याआल्या कुठली जागा आवडायला आणि इतका ३००० मैलाचा प्रवास, सामान लावणं इ. दगदगीमुळे फ़िरतीचं प्लानिंग करण्याचं त्राण अर्थातच नव्हतं. त्यावेळी मग एखाद्या दुपारी जेवणं झाली की गाडी काढून थोडंफ़ार गुगलून आसपासचा परिसर धुंडाळताना नेमका हाच संच गाडीत असल्यामुळे सारखा ऐकला गेला आणि या गाण्यांशी वेगळं नातं जुळलं गेलं.

त्यात आणखी एक योगायोग म्हणजे यातली जास्तीत जास्त गाणी पावसाची आहेत आणि इथे नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे संततधार (आणि तुरळक बर्फ़) मोसम. त्यामुळे वैशालीच्या आवाजातलं "भुईवर आली सर, सर श्रावणाची" ऐकलं की आम्ही इथल्या एका सिनिक ड्राइव्हला जातोय आणि पाऊस पडल्यामुळे खाली आलेले ढग पाहताना घरी आलेला कंटाळा विसरतोय हेच दृष्य कोरलं गेलंय. तर अवधूतच्या संगीत आणि आवाजातलं "पावसा येरे पावसा" आणि "थेंबभर तुझे मन" थोडं रॉकच्या शैलीत असलं तरी एकदा थंडी असतानाही थोडं ऊन होतं म्हणून गेलेल्या कॅनन बीचवर उधाणलेल्या सागराची आठवण करुन देतो. "स्पर्श" हेही अवधूत आणि वैशालीच्या आवाजतलंच आणखी एक रॉक धर्तीतलच पण एकंदरित आपण "फ़्रेश" म्हणतो तसं गाणं ऐकताना मला इथला पाऊस आठवतो. खरं तर यातल्या जवळजवळ सगळ्याच गाण्यांना मी माझ्या इथल्या सुरुवातीच्या थंडी-पावसाचे दिवसांच्या आठवणींशी जोडू शकते.


सगळीच गाणी रॉक स्टाइल आहेत असं नाही आहे. सुरुवात "मन उधाण वार्‍याचे" हे सगळ्यांनाच माहित असलेलं गाणं आणि नंतर साधना सरगम यांच्या आवाजातलं "रंग रंग रंगा ग" हे एकदम झोपाळ्यावर टाळ्या घेत म्हटल्यासारखं, मन ताजंतवानं करणार्‍या गाण्यांनी होते आणि मध्ये पुन्हा मूड बदलुन पावसाची किंवा संगीतकार अशोक पत्की यांचं "राधा ही बावरी"चाही समावेश या अल्बममध्ये आहे. पावसाच्या गाण्याबरोबरच अचानक बासरीसारखं गोड श्रेया घोषालच्या आवाजातलं "हरि हा माझा प्राण विसावा" हे गाणं माझं अत्यंत आवडीचं गाणं झालंय. तिचंच आणखी एक "अजुन तरळते" हेही कृष्णावरचं गीतही सुरेख झालंय.या दोघांचं संगीत "मिलिंद जोशी" यांचं आहे.

हे सगळं इतक्या सविस्तर सांगण्याचा उद्देश म्हणजे जास्त काही माहिती नसताना एखादी सिडी उचलली जाते, ती सुरुवातीला सहज म्हणून ऐकली जाते आणि मग एका विशिष्ट वातावरणाशी तिचा मेळ जुळतो तेव्हा त्यातली सारीच गाणी कशी लाडकी होतात याचं माझ्यासाठी उत्तम उदाहरण माझ्यासाठी हा संच आहे. ही गाणी ऐकली नसती तर कदाचित माझे सुरुवातीचे ते दिवस खूप कंटाळवाणे झाले असते, तो पाऊसही नकोसा झाला असता.

परदेशातली विशेषतः अमेरिकेतली कुठली नवी जागा ज्यांनी हिवाळ्यात पहिल्यांदी पाहिली आहे त्यांना मला काय म्हणायचंय ते नक्की कळेल.अशावेळी अशी फ़्रेश गाणी दिल्याबद्दल मी "सागरिका"चे आभारच मानले पाहिजेत...आणि त्या अनाम विक्रेत्याचे ज्याने त्यादिवशी खूप छान छान मराठी सीडीज तिथे आणण्याचं काम केलं..नाहीतर त्या फ़ेरीत हवी ती मराठी गाणी कुठे विकत घ्यायची हा एक यक्षप्रश्नच झाला होता. (आणि अद्यापही आहे...है क्या कोई मुझे राह दिखानेवाला?)

आता पुन्हा एकदा तोच पाऊस सुरु झालाय आणि त्याच सीडी मी पुन्हा आठवणीने गाडीत ऐकायला सुरुवात केली आहे. फ़रक इतकाच की आता ती गाणी माझ्या तोंडावर कडव्यांसकट आहेत.

Friday, December 3, 2010

बाहुली गं तू.........

बाहुली आणि मुलगी यांचं एक वेगळं भावविश्व, नातं असतं..दोघी वयाप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका जगतात...मर्जी अर्थातच मुलीची.पण आपलं सारं ऐकणारी,कधी खेळातली बबडी, मग थोडं मोठं झाली की विद्यार्थी, मैत्रीण असं वयानुसार बदलत जाणार हे एक वेगळं जग. मला बाहुल्या आवडतात हे मला मी बरीच मोठी झाल्यावर कळलं का असं मला काहीवेळा वाटतं. म्हणजे लहानपणी मला हवीतशी डोळ्यांची उघडझाप करणारी बाहुली मिळणार नाही हे माहित होतं त्यामुळे मी नक्कीच खट्टू झाले नाही. तसंच मावशीकडे तिच्या मुलीला कुणीतरी परदेशातल्या मित्राने दिलेली, भुर्‍या केसांची आणि नुस्तं डोळे उघडमीट करणारी नाही तर चक्क तोंडातलं पॅसिफ़ायर काढल्यावर रडणारी बाहुली पाहिली की तिचा हेवा वाटला तरी ते तेवढ्यापुरतंच होतं. त्यानंतर जेव्हा माझ्या भाचीला सुंदर बाहुलीबरोबर पाहिलं होतं आणि खरं तर तोवर मी नोकरीला वगैरे लागले होते तरी त्यावेळी पुन्हा एकदा बाहुली या प्रकरणाच्या प्रेमात मी पडले होते..एखाद्या खर्‍या व्यक्तीबरोबर बोलावं, वागावं तसे बाहुलीबरोबरचे तिचे संवाद ऐकणं हाही एक मस्त अनुभव होता.त्यानंतर मी जेव्हा बंगळुरुला गेले होते तेव्हा "कावेरी"मध्ये सात-आठ लाकडी छोट्या बाहुल्यांचा एक सेट घेऊन ऑफ़िसमधल्या मैत्रीणींना द्यायलाही सुचलं होतं.


अमेरिकन गर्ल दुकान

हे सगळं खरं तर वैवाहीक आयुष्यात आल्यावर सुरुवातीला तरी विसरायला हरकत नव्हती. पण २००४ मध्ये एक दोनदा नव्हे तर बरेचदा न्यु-यॉर्कला वकिलातीच्या कामासाठी जावं लागलं; त्यावेळी एकटीने भटकताना एक दुकान गवसल्यामुळे पुन्हा एकदा बाहुली प्रकरण माझ्यामागं लागलंच..

काही कामानिमित्त नवर्‍याला युरोप वकिलातीत जवळजवळ संपुर्ण दिवस बसायला लागलं आणि मला तो दिवस एकटीने न्यु-यॉर्क शहर भटकायची संधी मिळाली..खरं तर ही एकदाच नाही बर्‍याचदा मिळाली आणि प्रत्येकवेळी मी वेगवेगळा भाग पालथा घालुन त्या संधीचं सोनं केलंय.पण यावेळी जरा बाहुलीयोग नशीबात होता असं दिसतंय.

मिळून सार्‍याजणी
न्यु यॉर्क हे एकतर माझं लाडकं शहर, माझ्या लाडक्या मुंबईची आठवण (तुलना नाही) करुन देणारं. जिथे अमेरिकेत इतरत्र न दिसणारी माणसांची वर्दळ, रस्त्यावर खाऊच्या आणि छोट्या-मोठ्या खरेदीच्या घासाघीस करायची संधी देणार्‍या गाड्या असं सारं असतं. तिथं माझ्यातल्या मुंबईकरणीला एकटीनं फ़िरण्यात गम्मत न वाटली तर नवलच. यावेळी मी पेनस्टेशनला उतरल्यावर सिटीत शिरण्याच्या आधीच एक छोटं शहर भटकंतीचं पुस्तक होतं ते घेऊन ठेवलं होतं....

विविध रुपातली ’गर्ल’
त्यात कुठेतरी "अमेरिकन गर्ल" असा एका दुकानाचा उल्लेख होता आणि त्याबद्दलचं वर्णन पाहुन मला आतमध्ये हे दुकान कसं असेल याची उत्कंठा होतीच...त्यानुसार माझी पावलं मी मॅनहॅटनच्या अगदी मुख्य विभागात पाचव्या ऍव्हेन्यु आणि एकोणपन्नासाव्या रस्त्याच्या दिशेने पावलं वळवलीच. दुकान उघडायला थोडावेळ होता पण बर्‍याच मायलेकींच्या जोड्या तिथे घुटमळताना दिसत होत्या त्यानुसार आपली निवड चुकली नाही याची खात्री मला आधीच होत होती..थोडावेळ इथे तिथे भटकुन पुन्हा मी दुकानात आले तोवर ये-जा (खरं तर जा नव्हतीच नुस्ती येच होती सकाळी) सुरु झाली होती...आणि मीही आत काय असेल याची कल्पना करत आतमध्ये गेले..



मालिकेत झळकलेली पहिली ’गर्ल’
 थोडी मोठी बाहुली असणार हे अपेक्षित होतं पण तिचं ते हुबेहुब मुलीचं वाटावं असं रुपडं पाहुन मी तर तिच्या प्रेमातच पडले..तिला अनेक रुपात सजवलेलं एक मोठं कपाट स्वागतालाच होतं तिथेच तिला पाहताना बराच वेळ गेला. ही अमेरिकन गर्ल, केली, साध्या शब्दात सांगायचं तर एक ब्रॅन्डेड बाहुली. ही आणि हिच्या अशाच सख्या..त्यात अमेरिकेतल्या टिव्हि शोवर पहिल्यांदा झळकणारी सॅमान्था, माझ्याकडे आता असलेली कर्स्टन आणि अशा बर्‍याच मैत्रीणी आहेत. हे तीन मजली दुकान म्हणजे या बाहुल्यांचा इतिहास (अमेरिकेत इतिहास या शब्दाची व्याख्या वर्तमान अशीही असावी असं माझं मत पक्कं करणारं आणखी एक स्थान..असो...) आहे. हे या बाहुल्यांचं संग्रहालय आहे तसंच तिच्यासाठी वन स्टॉप शॉप म्हणावं अशी जागाही.


केशकर्तनालयात


तळमजल्यावर जवळजवळ सगळ्याच अमेरिकन गर्लचं कलेक्शन, वेगवेगळे कपडे आणि इतर ऍक्सेसरीज घेतलेलं तिचं रुपडं, तिच्या खोल्या, वस्तुंसकटचं तिचं वावरणं याचं दालन आहे...ते सर्व हरखून पाहताना आपण वेळेचं गणित कधीच विसरुन जातो. इतकं तिच्या प्रेमात पडायला होतं की एक घ्यावी का असा खट्याळ विचारही मनात येतो पण १२० डॉलर पाहुन विस्फ़ारलेले डोळे तो खट्याळपणा अर्थातच विसरायला भाग पाडतात...

मग पहिल्या माळ्यावर चक्क या बाहुलीसाठी एक हॉस्पिटल आहे..त्यांची इमर्जन्सी सर्विसपण आहे म्हणे...एखादीच्या (इतक्या महागड्या) बाहुलीला जर काही दुखापत झाली तर मग हॉस्पिटल हवंच नाही का? म्हणजे आणखी थोडे पैसे खर्च करुन का होईना पण परत तिच्याशी खेळता तरी येईल. इथल्या डॉक्टरशी बोलायला हवं होतं पण आणखी एक मजला होता त्यामुळे सरळ पुढे गेले.

एकसारख्या मायलेकी

तिथे तर चक्क बाहुलीसाठी सलान म्हणजे आपल्या भाषेत केशकर्तनालय आणि एकंदरित ब्युटिपार्लरही होतं..तिथे बाहुलीला बसवायला छोटीशी न्हाव्याच्या दुकानात असते तशी वर-खाली होणारी खुर्ची आणि बर्‍याचशा स्पेशालिस्ट होत्या...लोकं इथे येत असतील का असा प्रश्नच पडायला नको..गोर्‍या गोर्‍या छोट्या अमेरिकन मुलींची त्यांची त्यांची बाहुली घेऊन रांग लागली होती. कुणाला तिची हेअरस्टाइल बदलुन हवी होती, कुणाला तिचे केस थोडे कमी करायला हवे होते...काहींना चक्क तिची आणि स्वतःची हेअरस्टाइल मॅच करायची होती..हम्म... ’बडे बडे देश में छोटी छोटी बाते’ मी याची देही पाहात होते...

बाहुलीची किंमत एकदा पाहिल्यावर कुठल्याच दुसर्‍या किमती काढायच्या मी भानगडीत पडले नाही. इथे बाहुलीसाठी केसाच्या पिना, मॅचिंग पर्सेस अशा बर्‍याच गोष्टी विकायला होत्या तसंच छोटे आणि मोठे एकसारखे दिसणारे ड्रेसही होते..ती सोय होती तुमची बाहुली आणि तुम्ही एकसारखं दिसण्यासाठी केलेली सोय...माझ्या नशिबाने तशी एक जोडी मला तिथेच दिसली. मग तिच्या आईला विचारुन मी त्या दोघींचा एक फ़ोटोही काढला.


इतक्या सोयी आहेत मग एक छान शेजघर नको?
 बाहुली प्रस्थ कमी पडलं म्हणून की काय इथे एक ऍन्जेलिना नावाची उंदीराच्या कुटुंबालाही ब्रॅन्डेड केलेलं दिसलं..त्याचं इटुकलं घर, त्यातल्या खर्‍याच वाटणार्‍या इटुकल्या घरगुती गोष्टी पाहुन मला तर एक क्षण इथल्या अमेरिकेत वाढणार्‍या मुलींचा हेवाच वाटला...

बघता बघता दोनेक तासही सहज गेले असतील...जेवायची वेळ झाली होती हे पोटात ओरडणार्‍या बाहुल्या आपलं कावळे सांगत होते पण तरी पाय निघत नव्हता..मग शेवटी हो-ना करता मी एक छोटी बाहुली आठवण म्हणून घेतलीच..कर्स्टन नावाची...आमच्या लग्नाच्या मासिक वाढदिवसातला कुठला तरी वाढदिवस तेव्हा नुकताच होऊन गेला होता. हे खेळणं मी त्याचं गिफ़्ट अशा नावाने चिकटवुन नवर्‍याला तेव्हा फ़ोनवर पटवलं होतं...माझी एक सवय आहे मी स्वतः माझ्या मर्जीने काहीही खरेदी करु शकत असले तरी थोडावेळ हो-ना मध्ये त्याचं डोकं खाल्याशिवाय बहुतेक मला करमत नसावं किंवा त्या खरेदीला हे आपण एकत्र ठरवून घेतलंय असं गोंडस नाव त्यामुळे देता असं असंही असेल..असो....

कर्स्टन

या अमेरिकन गर्लनंतर मात्र महागडी कुठलीही बाहुली मी घेतली नाही....बाहुली घेतली तरी तिला घेऊन खेळत बसण्याचे दिवस केव्हाच संपलेत किंवा ते आले तरी होते का असंही वाटावं इतक्या दूर ते गेलेत....पण छोट्या छोट्या बर्‍याच बाहुल्या मी अधेमधे घेतल्या...इथे मिळणार्‍या पाठीला सपोर्ट लावुन उब्या केलेल्या किंवा बसवता येणारी एक कलेक्टिबलमधली बाहुली पण सॅव्हानाच्या ट्रिपमध्ये घेतली...मला वाटतं अमेरिकन गर्ल या दुकानात मांडलेल्या त्या वेगवेगळ्या रुपातल्या बाहुलीने माझ्या मनातही बाहुल्यांसाठी एक घर केलं असावं....फ़िलीमधल्या घरी माझ्या प्रत्येक खिडकीवर एक एक बाहुली होती..त्यावेळी आमच्याकडे घरी आलेल्या कुणीतरी मला म्हटलेलं आठवतं इतक्या बाहुल्या आहेत तुझ्याकडे पुढच्यावेळी तुला काय गिफ़्ट द्यायचं ते बरोबर लक्षात येईल...ओरेगावातही जपुन सार्‍या बाहुल्या आणून त्यांनाही नव्या जागा शोधुन दिल्या...

आज बर्‍याच दिवसानंतर मित्राच्या मुलीला पहिल्या वाढदिवसासाठी भेटवस्तु पाठवायला बाहुल्या आणि असंच टिपिकल मुलींच्या वस्तू शोधताना पुन्हा एकदा हरखलेय आणि लक्षात आलंय की माझ्या कर्स्टनच्या केसांची मुलानं वाट लावलीय...तिला काय आता त्या सलानमध्ये नाही नेणार पण कदाचित ही पोस्ट संपल्यावर ते ठीक करुन तिला कुठेतरी जरा वर ठेऊन देईन....मुलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी आणि अर्थातच माझी एक मलाच माहित नसलेली आवड आठवणीत आणून देण्यासाठी.