Thursday, September 13, 2012

खाद्ययोगायोग


मला जायचं होतं कुठे? मिडवेस्टात..
मी राहाते कुठे? नॉर्थ वेस्टात....
आणि मधल्या मध्ये हे नॉर्थ इस्टात, डेट्रॉइटला एक तीन तासाचा हॉल्ट मिळतो काय...मला माझ्या भाच्याला फ़ोन करायचं सुचतं काय? आणि मामीच्या इतक्या आयत्या वेळेच्या नोटीसीवर पण ते गूणी बाळ पाउणेक तास उशीराने का होईना पण येतंय काय आणि मग मला आग्रह करून "शटिला"ला नेतो काय....’दाने दाने पे लिखा है’ चा अनुभव आला की याच म्हणीची सार्थकता पटते तसंच काहीसं...
हम्म....काय बोलतेय मी?? मी काहीच बोलणार नाहीये...फ़क्त फ़ोटोच बोलणार आहेत......ते वर म्हटल्याप्रमाणे त्याने आग्रहाने "तुला हे आवडेल" म्हणून नेलेलं एक नवीन ठिकाण..पुन्हा जायचा योग येणं म्हटलं तर कठीण म्हणून संधीचा फ़ायदा घेऊन एक छोटं सेलेब्रेशन त्याच्याबरोबर तिथे आणि घरच्यासाठी पण एक पेस्ट्री...बॅगेत जागा नसल्याचं मोठ्ठं दुःख मला तिथे गेल्यावर झालं....हाय राम....या पोस्टच्या निमित्ताने समस्त फ़्रेंच बेकर्सचा विजय असो...आणि ते विकणार्‍या अरब कन्यकांचाही....आणखी काय....
चला आहात नं तयार....एका योगायोगाने घडलेल्या खाद्ययोगाच्या छोट्या सफ़रीला...म्हणून वर खाद्ययोगायोग लिहिलंय :) 

डेट्रॉइट विमानतळापासून साधारण अर्धा एक तास ड्राइव्हवर असणार्‍या डिअरबोर्न नावाच्या गावातल्या एका रस्त्यावर बरीच मिडल इस्टर्न/अरेबिक पद्धतीची दुकानं आहेत. त्यातली एक प्रसिद्ध बेकरी म्हणजे "शटिला". इथे गेल्या गेल्या एक नंबर घ्यायचा आणि आपल्याला काय हवं (खरं तर मला सगळंच हवं होतं) याची मनातल्या मनात नोंदणी करायला सुरूवात करायची.

गेल्या गेल्या दिसतात त्या आपल्याकडे परळला गौरीशंकरकडे वगैरे जसे काचेच्या आत मिठाया आणि वर जिलेबीचे डोंगर आणि आणखी काही निवडक मिठाया तसंच दृश्य. एक एक कप्पा विशेष प्रकारच्या गोडांसाठी. जसं वरचे सगळे मूसचे वेगवेगळे प्रकार. मूस हे साधारण थोडे कमी गोड आणि अत्यंत मुलायम म्हणून मला प्रचंड आवडणारं डेझर्ट.



इथल्या केकच्या सजावटी मनमोहक तर आहेतच शिवाय काही प्रकार छोट्या सिंगल सर्व्हिंगमध्येही ठेवलेले दिसताहेत. बच्चे कंपनीसाठी एकदम यम्म ओ..



हे टु गो बॉक्सेस आणि त्यातली अरेबिक मिठाई खरं तर मला फ़ार घ्यावीशी वाटत होती पण मला लॅपटॉप उचलून पाठदुखी वाढवायची नसल्याने बॅगमध्ये जागाच नव्हती. मग नाहीतरी मुलाला काही नट्सची अ‍ॅलर्जी आहे असं एक आंबट कारण मनात येऊन फ़ोटोवर समाधान मानलं ;)





केकच्या आणखी काही सजावटी पाहत बसता आमचा नंबर आल्याने भाच्याने मला भानावर आणलं. आता आम्हाला जे काही हवं होतं ते काचेपल्याडच्या मुलीला सांगून मग ती आमची ऑर्डर स्वतः चेक आउटकडे आणणार होती.



इतक्या कमी वेळात या दुकानाला न्याय देणं तसं कठीण पण नेहमी न खाल्ला गेलेल्या पिस्ता मूसला संधी द्यायचं मी ठरवलं. शिवाय त्याच्याभोवतीचं चॉकलेटचं कुंपणही फ़ार मोहक दिसत होतं की हीच पेस्ट्री पाहिजे असं त्या ललनेला मी सांगितलं.



माझ्या भाच्याने पायनापल खाणार म्हणून आधीच सांगितलं. मी त्याची चव अर्थातच घेतलीच.

खरं तर पाय निघत नव्हता पण आधीच त्याने यायला उशीर केल्यामुळे लगेच न निघाल्यास विमान चुकायची दाट शक्यता होती. म्हणून मुलांसाठी चॉकोलेट रोल्स घेऊन पटकन निघालो. 

तुमचं जर या भागात (माझ्यासारखंच चुकून का होईना) जाणं झालं तर हे दुकान अजीबात विसरू नका. खरं तर निव्वळ या दुकानासाठी पुढच्या एखाद्या ट्रिपसाठी व्हाया डेट्रॉइट जावं का असा विचारही मी करतेय. 

एंजॉय :) 


तळटीप: ही पोस्ट खरं तर कधीपासून लिहायची होती पण फ़ोटो धुवायला टाकायचा मुहुर्त शोधता शोधता आज आणखी एका चांगल्या योगायोगाचं निमित्त.आज ब्लॉगने एक लाख वाचकसंख्या ओलांडली.जेव्हा हा ब्लॉग सुरू केला तेव्हापासून आपण काय लिहिणार किंवा लिहिणार तरी का याचाही नीट अंदाज नव्हता आणि त्यापुढे जाऊन इतक्या वेळा तो वाचला जाईल वगैरे गोष्टी तर मनातही आणल्या नव्हत्या. त्यामुळे या निमित्ताने मी जास्त नियमीत न लिहिताही माझ्या जुन्या पोस्ट वाचून आणि नव्याला प्रोत्साहन देऊन या यशात सामील झाल्याबद्दल सर्वच वाचकांने मन:पूर्वक आभार. केक/पेस्ट्रीज आवडल्या असतील अशी आशा :)

Thursday, September 6, 2012

४५ - ३५ - २५


तीन आकडे पाहिले की कोणाचं काय आणि कोणाचं काय सुरू होतं. तसं म्हटलं तर आमचा हेतू चांगला स्पष्ट, चांगला इ.इ. होता पण नेमका या तीन आकड्यांनी आणि मुख्य त्यांच्या क्रमाने केलेल्या घोळाने आम्ही नशीबाने हे आकडा प्रकरण महागात पडता पडता वाचलो. 

त्याचं झालं असं, म्हणजे घरातलं दूध जवळजवळ संपतंय आणि घरात दोन मुलं आहेत तर वेळकाळ न पाहता दूध आणायला जायचं  होतं. आता हे एक वेळ समजलं आणि त्यात अनायासे गाडीची चक्कर होतेय तर मूलं झोपतील हा सुप्त हेतू होताच पण त्यातही सगळी काम करून संपली तरी दोन्ही मुलं जागी. अशावेळी आम्ही डोकं कुठे चालवावं?

तर आता इतक्या रात्री पार्किंग लॉटमधून गाडी काढता काढता नेमकं आइसक्रीम खायची इच्छा व्हावी याला अक्षरशः काही म्हणजे काही इलाजच नाही. बरं घरी बारा महिने कुठलं नं कुठलं आईस्क्रीम फ़्रीजमध्ये असतं, ज्या दुकानात दूध घेतलं तिथेच आईस्क्रीमही घेता आलं असतं. म्हणजे घरच्यापेक्षा काही वेगळा फ़्लेवर वगैरे...पण नाही? "खाईन तर तुपाशी"वाली लोकं असतात त्यांना रात्रीचे सव्वा दहा वाजले तरी फ़क्त आणि फ़क्त "डेअरी क्वीन"चंच आइस्र्किम आणि तेही फ़क्त आणि फ़क्त "हवायन ब्लिझर्डच" हवं असतं. मग काय माणसानेच निर्मिलेल्या स्मार्ट फ़ोनच्या अ‍ॅपने अशावेळी पंधरा मिनिटांनी दुकान बंद होतंयची वॉर्निंग दिली तरी आणि त्यात आम्हाला तिकडून साधारण सारख्याच अंतरावर असलेल्या दोन दुकानांपैकी कधीही न गेलेल्या दुकानाचीच आम्ही निवड करावी हे निव्वळ संकेत.बरं मला काय घरी जाऊन झोपायचं खेरीज काही काम नसणार होतं. निदान तिथे पोहोचेपर्यंत मुलं झोपतील म्हणजे जरा निवांतपणे जुने दिवस आठवत आइस्र्कीम खाता येईल असा एक साधा सरळ (आणि स्वार्थी) विचार करून मी पण नव्या जागी पंधरा मिन्टात पोचायचं आव्हान स्विकारायला काही कटकट केली नाही (हो म्हणजे इतरवेळी कटकट करणे हा समोरच्या पार्टीचा लग्नसिद्ध हक्क असतोच नाही का?) 

रात्रीच्या पारी गावांमध्ये दिवाबत्तीची सोय कुणी करावी या भारतात कुठच्या तरी विषयात (इतिहास असणार बहुतेक) शिकलेलं "ग्रामपंचायत किंवा मुन्सिपाल्टीने" हे उत्तर उल्ट्या अमेरीकेत "कुणीच नाही" या धर्तीवरचे काळोखे रस्ते कापत गाडीवान आणि मिनिटांकडे पाहात मी घालमेल न दाखवता वेळ घालवत होते...म्हणजे एकीकडे जिपिएसची रिमेनिंग मिनिट्र्स आणि दुसरीकडे गाडीतलंच घड्याळ यांच्यात वजाबाकीचा खेळ खेळणारी मी आणि मनातल्या मनात नव्या जागचं दुकान शोधताना दहा एकतीस झाले की झालं सगळं मुसळ केरात अशा विचारात. 

खाली पाहता पाहता अचानक वळणावर गाडी वळणं आणि वेग यांच्यात "अर्धगोल-अर्धगोल" आणि "जास्त-कमी-साट्कन कमी" असा खेळ खेळल्याचा भास झाल्याचं वाटून एका प्रचंड काळोख्या वळणावर आता हा ठोकणार असं वाटून ती वजाबाकी सोडून वर पाहिलं आणि एक कावळा, आपलं ते मामा, आपलं ते पोलिस बाजुच्या रस्त्याला जवळजवळ चिकटून आणि प्रचंड काळोखात असलेल्या स्ट्रिप मॉलमधून त्याच्या गाडीत चढताना दिसला. त्याला गाडी लागू नये इतक्या लिलया वळणावर गाडी चालवणार्‍या नवर्‍याचं "कसा दिसला रे तुला तो गाडीत चढताना" असं म्हणून कौतुक करणार तोच अंधारात आमच्या एकमेव चालणार्‍या गाडीवर मागून आलेल्या पांढर्‍या-निळ्या-लाल प्रकाशझोताने माझी ट्युब एकदम पेटली. कौतुकाची जागा लगेच थोडा त्रागा आणि काउन्सिलिंगने घेतली. "सांग त्याला. दोन मूलं आहेत मागे. ती त्रास देत होती." मजा म्हणजे मोठा अजून जागाच होता फ़क्त लहान्याचा निद्रादेवीने ताबा घेतला होता. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी "आरुष पाहिलंस? तू लवकर झोपत नाहीस म्हणून आला बघ पोलिस" हेही म्हणून घेतलं. 

आमच्यामागे दिवे आणि गाडीत आधी मागून मग पुढपर्यंत टॉर्च मारत मामासाहेब अवतरले.बाकी काही विचारायच्या आधीच त्याने पंचवीसच्या स्पीड लिमिटला तुम्ही पस्तीसवर होता हे पाहिलंत का म्हणून आमची हवा काढून टाकली. आता कागदपत्रांचा पण थोडा झोल होता म्हणजे आमचं कार इंशुरन्सचं लेटेस्ट कागद आम्ही इंश्युरन्सच्या साइटवरुन प्रिंट करून ठेवलं नव्हतं. अंधारात चमकणार्‍या गोर्‍या मामासाहेबाने आधीच "मी हे सगळं रेकॉर्ड करतोय सांगून" माझ्या जागं असणार्‍या मुलाला झोपवायचं काम पण करून ठेवलं होतं. 

मग आधी गाडीचे कागदपत्र, लायसन्स क्रमांक हे जवळच्या वॉकी टॉकीवरुन त्याच्या गाडीतल्या सहकार्‍याला सांगून आमच्या आइस्क्रिमच्या बिलाची तयारी सुरू केली असं मी  मनातल्या मनात विचार करत होते आणि कधी नव्हे ते नवर्‍याने त्याच्याकडे थोडी बाजू मांडायचा प्रयत्न केला. त्याने गाडी चालवताना पाहिलं होतं की त्या रस्त्यावर बराच वेळ असलेलं ४५ चं लिमिट ३५ आणि २५ असं पटापट उतरत होतं आणि नवा रस्ता असल्याने ते झटक्यात पंचवीसवर आणायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न फ़सला होता. हे तसं पटण्यासारखं होतं आणि बालबच्चेवाले म्हणून असेल नशीबाने त्याने विचारलं इथे इतक्या रात्री काय करताय त्यावेळी आम्ही डेअरी क्विनचा दाखला दिला आणि वर ते आता बंद झालं हेही सांगितलं. 

आइस्क्रीमचं नाव ऐकुन बहुदा त्याचं डोकं थंड झाल्याने आमचं लॉजिक पटलं असावं पण कर्तव्य म्हणून आम्हाला वॉर्निंग देऊन सोडलं. आणि ती वॉर्निंग अशी होती की रस्त्याचं लिमिट जरी झटाझट खाली येतंय तरी तुम्ही मुळातच नव्या रस्त्यावर गाडी चालवत असाल तर वेगाला सांभाळून चालवा. आता आइस्क्रीम पण नाही तर या विषयावर आणखी काही बोलून नवी फ़ोडणी पडण्यापेक्षा आम्ही आपलं "व्हय महाराजा" म्हटलं आणि दुकानाचं अपेक्षीत बंद दार उगा आमच्यासाठी उघडतंय का?चा क्षीण प्रयत्न करून घरी आलो. 

परत जाताना मी व्यवस्थित पाहिलं २५ - ३५ - ४५ हे उलट्या दिशेचे वेगाचे बोर्ड आणि अर्थातचं दिवाबत्तीची सोय नसलेला वळणांचा रस्ता. गाडीमध्ये होती एक प्रवासाने आणि एक आपल्याला झोपत नाही म्हणून पोलिस पाहायला आला या विचाराने झोपलेलं, अशी माझी दोन छोटी बाळं त्यानंतर अर्थातच आताच वॉर्निंगने सुधारलेला अगदी पोटातलं पाणी न हलता वळण घेणारा सारथी आणि वजाबाकीचा खेळ संपूनही हातात आइस्र्किमचं ब्लिझर्ड न आल्याने काय करावं हे लक्षात न आल्याने ते आकडे पाहून झाल्या प्रसंगाची उजळणी करत खिदळणारी मी.