Saturday, March 30, 2013

गाणी आणि आठवणी १३ - हाय रामा


काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीने इतक्यात झालेल्या हिंदी सारेगमप मध्ये एका स्पर्धकाने गायलेल्या "हाय रामा"ची लिंक पाठवली होती.ती पाहात असताना मनातल्या मनात मूळ हाय रामा वाजायला लागलं आणि "रंगिला रे" आणि "तनहा, तनहा" प्रमाणेच हेही आशाताईंचं असं उगीच मनात आलं. म्हणजे हा आवाज थोडा वेगळा आहे असा काही विचारही करत नव्हते तोच तिथे स्क्रीनसमोर "स्वर्णलता" असं गायिकेचं नाव समोर आलं. आता अगदी प्रत्येक गाण्यातली कलाकार मंडळी ओळखण्यात मी पटाईत आहे अशातला भाग नाही. पण तरी हे नाव आपण कधीच नोंद केलं नाही हे मात्र लगेच जाणवलं. 

रंगिला चित्रपट आला तेव्हा मी डिप्लोमा करत होते. प्रत्येक चित्रपट पाहायची ऐपतही नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे रंगिलाच्या प्रोमोजमध्ये उर्मिलाला ज्याप्रकारे दाखवण्यात यायचं ते निदान तेव्हाच्या काळात तरी बापरे वगैरे वाटूनही तो चित्रपट बाहेर जाऊन पाहाणं झालं नाही. अर्थात नंतर मग कधीतरी केबलवर यथावकाश पाहिला. शिवाय  आमिर आवडत असल्याने मनातल्या मनात तो पाहायची इच्छाही होतीच. त्यावेळी आमच्या वर्गमित्रांचा एक ग्रुप होता त्यांनी मात्र आवर्जून हा चित्रपट फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो पाहून "हाय उर्मिला" वगैरेही केलं होतं. अर्थात याची गाणी मात्र भरपूर गाजली होती. रेडिओवर सकाळच्या साडेआठ ते साडेनऊच्या वेळात ती येत आणि चित्रहारमध्येही.त्यामुळे माझ्या बर्‍यापैकी लक्षात राहिली होती. 

मला रंगिलाची सगळी गाणी अगदी अजूनही आवडतात. त्यातल्या त्यात हाय रामाबद्दल सांगायचं तर त्याआधीची "पायलिया झनकाई" ही बंदिश हरिहरनजींनी इतक्या नजाकतीने गायलीय की या गाण्यानंतर या बंदिशीमुळे माझ्या मनात त्यांच्यासाठी खास स्थान निर्माण झालं. नंतर सारेगमच्याच मंचावर ते जज म्हणून असताना बहुतेक एका स्पर्ध्याने हीच बंदिश त्यांच्यासमोर गायल्यावर त्यांनी त्याचं मनमुराद कौतुक केलं होतं आणि पुन्हा त्यांच्या आवाजात त्या मंचावर ती बंदिश ऐकताना भान हरपलं होतं. 

वर म्हटल्याप्रमाणे या बंदिशीपाठोपाठ येणारा मदभरा आवाज मला आपसूक आशाताईंचाच वाटायचा. माहित नाही का कदाचीत तेव्हा इंटरनेट नव्हतं म्हणून असेल किंवा माझ्याकडे टेपरेकॉर्डर किंवा सिडी प्लेयर नसल्यामुळे कव्हरवर कलावंत वाचणं झालं नसावं, मी असं गृहितच धरलं होतं की या आशाताई आहेत म्हणून. तर त्यादिवशी हे गाणं पाहताना स्वर्णलताचं नाव पाहून सहज या कलावंताचा मागोवा घ्यावासा वाटला. शिवाय दिग्गज ए आर रहमान सारख्या संगीतकाराकडे गायला मिळायचं भाग्य असणारी ही व्यक्ती कोण आहे याचीही उत्सुकता होतीच.

हे असे शोध घेणं आता मायाजालामुळे फ़ारच सहज शक्य झालं आहे. त्यामुळे लागलीच स्वर्णलताचं विकीचं पान मी उघडलं. तिथे उजवीकडे died 12th September 2010 (age 37) हा उल्लेख पाहून मात्र मला एकदम कसंतरी झालं.अवघी १९८७-२०१० या काळातली अनेक भाषांतली जवळजवळ ७००० गाण्याची कारकिर्द. त्यात एक नॅशनल अवॉर्डदेखील प्राप्त. किती सुंदर आवाज, गायकी आणि ज्याने हे दिलं त्याने तिला इतक्या लहान वयात श्वासाच्या त्रास देऊन परत माघारी बोलवूनही घेतलं. म्हणजे ज्या श्वासावर कंट्रोल ठेऊन इतकी सुंदर गायली नेमका त्यातच दगा. किती दुर्दैवी योगायोग असं नकळत मनात आलं. त्यानंतर उरलं गाणं ऐकताना हा स्वर इतक्या लवकर हरवल्याचं सारखं वाईट वाटत राहिलं. 

खरं सांगायचं तर मला रंगिला चित्रपटाची सगळीच गाणी आवडतात. ए.आर. ने त्याच्या स्टाइलने खूप छान काम केलंय आणि सर्वच गायकांनी या गाण्यांना योग्य न्याय दिला आहे. त्यात "हाय रामा" गाणंही आवडतं, ती आवडणारी बंदिश या पलिकडे त्याला काही आठवण नव्हती. असायचं काही कारणही नव्हतं. पण त्यादिवशी सहज म्हणून एका कलावंताची माहिती मिळवायला गेले आणि अर्ध्या मैफ़िलीतून गेलेली ही स्वर्णलता माहित झाली. खरं तर इतकं मदभरं गाणं पण इथून पुढे मला उगाच चुटपूट लावून जाणार. यापुढे कधीही कुठच्याही मैफ़िलीत हे गाणं ऐकलं तर आठवेल ती फ़क्त स्वर्णलता आणि तिचं हे अकाली जाणं. 

स्वर्णलताचं विकीपेज इथे आहे. 

Friday, March 8, 2013

जिनेट


जिनेट मला भेटली ती मागच्या जानेवारीत मी योगाभ्यास सुरू करायचं पुन्हा मनावर घेतलं तेव्हा. म्हणजे झालं असं होतं की सारखं घरातून काम केल्यामुळे मला माणसं दिसायची वानवा होती. शिवाय माझा छोटा मुलगा वर्षाचा झाला होता. त्यामुळे तो त्याच्या पाळणाघरात रूळला होता.त्याच्या निमित्ताने वाढवलेलं वजन कमी करण्यापेक्षाही त्याच्यावेळी झालेल्या काही गुंतागुंतीनी पुढे जाऊन मोठं काही होऊ नये म्हणून व्यायामात नियमितपणा आणायचं मनात होतंच. चालण्याचा एकमेव व्यायाम सोडून मागची काही वर्षे काहीच केलं नाही म्हणून मग मार्गदर्शनाखाली व्यायाम आणि आपल्याला झेपेल असं म्हणून योग असा तो योगायोग होता. 

तर मी ज्या जिममध्ये जाऊ शकते तिथे प्रत्येक बुधवारी योग शिकवायला येणारी ही व्यक्ती म्हणजे जिनेट. उंचीला साधारण पाच फ़ूट चार इंच, निमुळता चेहरा, गव्हाळ रंग आणि कमालीची सडसडीत. म्हणजे तिला दोन टीनएर्जस आहेत हे मला तिने सांगितलं म्हणून कळलं. नाहीतर तसंही कुणाचं वय वगैरे गेस करायच्या बाबतीत माझी प्रगती शून्य पण बांध्यावरून काही वेळा निदान मूलं झाल्याचं लक्षात येतं. अर्थात जिनेट त्यातल्या अपवाद गटात.

तिच्या या क्लासला माझ्या आधीपासून नियमित येणारे तिचे जे काही शिष्य होते, त्यात मला पाहून कदाचित जानेवारीत बरीच जणं व्यायामाचा निश्चय करतात त्यातलीच मी असेन असं तिला वाटलं असावं.त्यामुळे तेव्हा तशी आमची जुजबीच ओळख झाली. मग नंतर साधारण चार-पाच वर्ग मी नियमितपणे गेल्यावर मात्र तिलाही माझ्याबद्दल थोडा विश्वास वाटला. आणि मग पुन्हा एकदा माझं नाव लक्षात ठेऊन विचारणं वगैरे झालं. या पुनरओळखीत मला आवडलं ते म्हणजे तिने मला मी भारतीय दिसते म्हणून तुला योग येतो का हे अजिबात विचारलं नाही. म्हणजे तसं ते विचारलं असतं तर माझी हरकत नव्हती, पण असं विचारलं की मला कसंतरी व्हायला होतं. कारण मी देशात असताना अगदी बेसिक योग शिकले पण त्यात सातत्यता वगैरे काहीच नव्हती. त्यामुळे इथे हा प्रश्नच आला नाही हे माझ्यासाठी बरंच होतं.

जानेवारीत सगळी जणं सुट्ट्यांमध्ये भरपूर खाऊन, आराम करून आलेले असतात. अगदी जिनेटही मला वाटतं दहा एक दिवसांची सुट्टी घेऊन मग अवतरली होती. त्यामुळे तिच्या जानेवारीच्या वर्गाची पेस एखाद्या संगीत मैफ़िलीत सुरूवातीला मंद्र सप्तकात धीम्या गतीने "सा" आळवला जातो तशी. मग जसजसं बाहेरचं वातावरणही हळूहळू कोंब येणार्‍या चेरी वृक्षासारखं बहरत जातं, तसतसं योगवर्गातल्या आसनांनी गती पकडली असते आणि एखादा नामवंत गायक वेगवेगळ्या रागांनी मैफ़िलीत रंग भरतो तसं वेगवेगळी आसनं आम्हाला दाखवली जातात. आणि मग पुन्हा शिशिर येतो तेव्हाचा बाज आणखी वेगळा. पुन्हा एकदा मैफ़िलीचे सूर धीमे करणारा.
योगासनं करताना स्वतःला आव्हान देणे हा उद्देश नसावा याबाबत जिनेटचं आग्रही असणं मला फ़ार आवडायचं. म्हणजे कुठल्याही आसनाची अंतिम स्थिती कशी असते हे स्वतः दाखवताना त्याचवेळी जर त्या स्थितीपर्यंत जाणं शक्य नसेल तरचे दोन-तीन पर्याय ती तिथेच दाखवत असे. 

खरं सांगायचं तर तिला योगासन करताना पाहाणं हीच मोठी पर्वणी असं जसजसे ती बेसिकच्या पुढची आसनं शिकवत गेली तसतसं आम्हा सर्वांनाच वाटायचं. शिवाय हे सगळं करताना प्रत्येक स्टेप ती शब्दातही मांडत असे. अगदी एक वाक्य आणि मग तिचं त्याबरहुकूम ती स्थिती दाखवणे आणि स्टेपप्रमाणे त्यातले बदल दाखवणे. नाचातलं मला फ़ार कळत नाही. पण तिचं आसन दाखवताना एका स्थितीमधून दुसर्‍या स्थितीत जाणे एखाद्या निष्णात नर्तकीच्या पदन्यासासारखं दिसे. त्यातही विन्यासातले तिचे एकापाठी एक करायचे जे प्रकार होते ते जवळजवळ नृत्यच होतं. काही वेळा अगदी मीच नाही तर बाकीचे साथीदारही तिचं आम्हाला हे असे प्रकार दाखवताना मुग्ध होऊन पाहात आणि मग आम्ही सर्वच तिला सांगत असू की आम्ही हे करण्यापेक्षा तू आम्हाला दाखवतेस हे पाहाणं ही आमच्यासाठी जास्त मेजवानी आहे. मग त्यावर तिचं पोनिटेल हलवून खळखळा हसणं माझी बुधवारची दुपार हसरी करून जाई.

साधारण चाइल्ड पोजमध्ये थोडं अंग ताणून मग मार्जारासनाने आमची सुरूवात असे. नंतर फ़र्माईश केली असेल तर त्याप्रमाणे किंवा जिनेटने प्लान केलं असेल त्याप्रमाणे इतर आसनं, यात निदान एकतरी विन्यासाचा प्रकार, शेवट जवळ आला की पाठीवर किंवा पोटावर झोपायची आसनं आणि मग त्यादिवशी किती काम केलं असेल त्याप्रमाणे पाच किंवा दहा मिनिटं शवासन असं एका तासाचं सत्र असे. तिच्याबरोबर वॉरियरमधले काही बारकावे तिने प्रत्यक्ष शिकवले आणि माझ्या आसनातल्या त्रुटी मला कळल्या. तसंच त्या त्या पोजमधले करेक्शन्स दाखवली की मग त्या आसनाचा फ़ायदाही मिळतो याचाही प्रत्यय आला. मला कंबरदुखी आहे मी सुरूवातीलाच सांगितल्यामुळे बर्‍याच आसनांसाठी आमच्यासाठी "काय करू नये", याविषयीच्या तिच्या सुचना तर नेहमीच फ़ायद्यासाठी असत. तसंच कधीतरी Can I touch you to give you some adjustment? असं म्हणून तिने हाताने थोडं मणक्याला ताणणं म्हणजे मला कुणीतरी माझं दुखणं जाणून त्यावर मायेने केलेला उपाय वाटे.

त्या जानेवारीनंतर बुधवारचा लंच टाइम इतका हवासा वाटायला लागला की तिच्याबरोबर फ़ॉल कसा आला ते कळलंच नाही. आणि मग जिनेटने एक छोटी अनाउंसमेंट केली. ती होती आठवड्यातून एकदा असं सहा आठवड्याच्या Retreat Yoga ची. मी हा प्रकार आधी कधी ऐकलाही नव्हता. फ़क्त ती म्हणाली की यात आपण एकाच आसनात पाच ते दहा मिनिटं राहणार आहोत आणि अशी साधारण पाच आसनं एका सेशनमध्ये आणि मग शवासन, असा एक तास. त्यादिवशी आठवणीने मी गेले आणि मला आवडलं ते तिचं शांतपणे बोलणं. काही कारण असो पण या क्लासला सुरुवातीला पाच सहा लोकं होती आणि शेवटी मी आणि आणखी एक नियमित धावणारे गृहस्थ अशा दोघांनीच हा क्लास पूर्ण केला. 

या क्लासमध्ये मी एक गोष्ट शिकले ते म्हणजे वर्षभर व्यायाम केल्यावर जसजसं बाहेरचं वातावरण थंड होत जातं तसं आपण आपल्या शरीरालाही योगमाध्यमातून थोडा आराम द्यायला हवं. यातली आसनं म्हणजे बरेचदा पाठीशी थोडं जाड ब्लॅंकेट घेऊन तिने दाखवलेल्या विशिष्ट पोझमध्ये तसंच पडून राहण. जिनेटच्या शब्दात सांगायचं We all worked very hard towards reaching our goals, we run after every small things and try to find out something for us. But sometimes the best thing that our body as well as our mind needs is to do nothing. This retreat yoga will help your body to do nothing but at the same time it will get the energy to perform again next time, may be with more strength than it had before. But at this point stay in the position and enjoy this moment of doing nothing. 

डिसेंबरमध्ये मी भारतात जाणार म्हणून मी जिनेटला आवर्जून ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. मला यायला तसंही जानेवारीचा शेवट उजाडला आणि पुन्हा तिला भेटायला अगदी आठवणीने मी फ़ेब्रुवारीच्या बुधवारी जिममध्ये गेले आणि तिथे तिला न पाहून मला गलबललं.तिथे काम करणार्‍या ऍंजीने मग मला बातमी दिली की जिनेटला फ़ुल टाइम इंस्ट्रक्टर म्हणून नोकरी मिळाली. not a ton of money in teaching classes हे तिचं म्हणणं मलाही जमिनीवर आणून गेलं.

खरं सांगायचं तर आम्ही दोघी एकमेकींचे कुणी नव्हतो, होणारही नव्हतो अगदी मैत्रीण वगैरेही नाही.या नात्याला तसा काही अर्थ नव्हता. पण तरी तिचं त्या बुधवार दुपारसाठी असणं माझ्यासाठी खास असायचं. एकदा बाबा आले तेव्हा मी तिच्यासाठी थोडी काजूकतली नेली होती. मग पुढच्या क्लासला आवर्जून तिनं तिच्या नवर्‍याला ती आवडल्याचं सांगणं, माझ्याकडे एखादी सोपी चिकनची रेसिपी सांग म्हणून विचारणं किंवा कधी मी जाऊ शकले नाही तर मग पुढच्या क्लासला माझी चौकशी, हे छोटे छोटे प्रसंग माझ्या त्यावेळच्या एकटेपणात मोलाचे होते.मला आठवतं ते काही वेळा परत जाताना माझ्या गाडीपुढे तिची गाडी असली आणि स्टॉप साईनला आमचे रस्ते बदलले की काचेतून हसून तिचं मला  हात हलवून निरोप देणं. 

निरोप द्यायची वेळ कधी तरी येणारच ना? असं मागचा महिना मी स्वतःला समजावतेय. फ़क्त आता गरज आहे ती तिने वर्षभर मेहनतीने शिकवलेल्या योगाभ्यासाला न्याय द्यायची आणि तो प्रयत्न माझ्याकडून मी नक्कीच करेन. आजची ही पोस्ट, आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने, माझ्या साध्यासरळ आयुष्यात छोट्या काळासाठी येऊन माझ्यासाठी मोठी आठवण बनलेल्या माझ्या या शिक्षिकेसाठी.तिच्या बोलण्यातून साधारण मला माहित होतं की तिनेही दोन मुलं सांभाळून आपली योगाची आवड आपल्या मर्यादेत जोपासली आणि आता तिलाही गरज आहे मोठ्या करियरची. जगातल्या सगळ्याच देशातल्या बायका कुटूंबासाठी हे सहजी करून जातात, हे तिनं मला वेगळं सांगावं लागलं नाही.कदाचित यासाठीच ती माझ्या जास्त लक्षात राहिली असेल. I love you Jeannette. Happy Women's Day. 

Sunday, March 3, 2013

दक्षिण मुंबईतला खाद्यमिया ए के ए बडेमिया...


कॉलेजमध्ये असताना स्टायपेंडरूपी स्वकमाई सुरू झाली, त्यावेळेपासून मी आणि माझी एक मैत्रीण, आम्ही दोघींनी मिळून मुंबईतल्या बर्‍य़ाच खादाडी जागांना भेटी दिल्या. कुठलं डाएट किंवा बचत वगैरेची चिंता नसलेली, थोडीशीच कमाई असली तरी त्यात दोघींसाठी रविवार टू रविवार परवडेल, असे दिवस होते ते. त्यावेळी एकदा रविवारच्याच एका पुरवणीत खास दक्षिण मुंबईतल्या काही खास जागांबद्दल एक लाळगाळू लेख आला होता. त्याचं कात्रण जवळ ठेऊन त्यातल्या जमेल तशा ठिकाणी खाद्ययात्रा घडली. त्यावेळी नेहमी गेलो ते स्टेडियम, सामोवार, दिल्ली दरबार अशा जागा पटकन आठवतात आणि आठवतं ते बडेमिया. ते संध्याकाळी,गाडी लागते, भरपूर गर्दी, वगैरे वर्णन वाचून दोघी मुलींनीच जावं का हा मुख्य  प्रश्न पडल्यामुळे आणि निव्वळ त्यासाठी तेव्हा कुठल्या मुलाला "चल रे आमच्याबरोबर" असं काही विचारलं नसल्यामुळे राहून गेलेलं बडेमिया. मग देश सोडल्यावरही जेव्हा जाणं होणार तेव्हाही जाणं राहिलं. 

यावेळी तर एकंदरित ट्रिपचा नूर फ़ार बाहेर पडण्यासारखा नव्हताच. पण एखादा दिवस असा येतो जेव्हा काही गोष्टी तुमच्यासाठी लिहिलेल्या असतात त्याप्रमाणे ते घडतं. इतर वेळी कितीही प्लान केलं तरी ते शक्य होत नाही. असा अनुभव जानेवारीतल्या एका रविवारी आला. 

त्यादिवशीची संध्याकाळ मी ठेवली होती ती "सप्तसूर" या महाराष्ट्र सरकार आयोजित एका कार्यक्रमासाठी. म्हणजे नमनाचं तेल आणखी अगदी थेंबभर टाकायचं म्हटलं तर तिथे शान गाणार होता म्हणून मला तिथे जायचंच होतं. तसं गेलोही. नेमकं शानचा घसा बसल्यामुळे त्याने दोन गाणी म्हणून मग सपशेल माफ़ी मागून माझा त्या कार्यक्रमातला उत्साह कमी करून टाकला. म्हणजे बाकीचे कलावंत छान गात नव्हते असं नाही पण मनात "शान, शान"चा जप करत गेल्यामुळे मग मी तिथून उठायचा विचार केला. 

माझ्याबरोबर त्यादिवशी आपल्याच ब्लॉगजगतातला माझा मित्र दिपक आणि माझे आणखी एक स्नेही होते. शिवाय बाहेर सचिन उर्फ़ सपा (त्या कार्यक्रमासाठी उशीरा आल्याने) ताटकळत होता.त्यामुळे बाहेर यायच्या कारणात शान बरोबरच सपालाही थोडं श्रेय द्यायला हरकत नसावी.गाण्यातला "सा" अशा प्रकारे आटोपला आणि आम्हा मंडळीत अचानक खायचा "खा" लागला. त्यावर दोनच मिनिटांची एक साधक (खाऊन पोटं बिघडली नसल्याने बाधक चा तसा काही संबंध आलाच नाही) चर्चाही झाली. 

दोन मिनिटं अशासाठी की मी आता इतक्या वर्षांनी जात असल्याने मला ताजच्या जवळचं "दिल्ली दरबार"सोडून एकही नाव आठवत नव्हतं. आणि दिपकला मला वाटतं त्याच्या कुठल्यातरी पुरानी यादें ताजा झाल्याने लगेच "बडेमियां" आठवलं. हे तसं माझ्याही लिस्टवर आधीच्या नमन क्र. १ मध्ये म्ह्टल्याप्रमाणे देशात असल्यापासून होतं.बाकीच्यांनाही चालणार होतं. लगेच  गाण्यासाठी बाहेर असणार्‍या गर्दीला मागे सारून आम्ही खाणार्‍यांच्या गल्लीत आलोही. ताजच्या मागच्या गल्लीत एका गाडीत भटारखाना सुरू आहे, कबाबचा धूर निघतोय, बाजुला गर्दी, रस्ता क्रॉस करणारी गर्दी, ज्या नशीबवंताना गल्लीत गाडी उभी करायला मिळालीय तिथे त्यांची गर्दी या एकंदरीत गर्दीमय वातावरणात गाडीवरचा "बडेमिया"चा बोर्ड संध्याकाळच्या वेळेस झगमगतोय. मला वाटतं दररोज संध्याकाळी लागणार्‍या या गाडीवर पहाटे एक वाजेपर्यंत खवय्यांची गर्दी तशीच असते. 

आम्ही भारतीय रेल्वेला संधी दिल्याने आमच्याकडे गाडी नव्हतीच त्यामुळे उभं राहून खायचा पर्याय होता. पण दिपकचं सजेशन होतं की इथे समोर एक "खंडहर" आहे, आम्ही तिथेच बसायचो हे त्याने इतकं ठामपणे सांगितलं की आता "खंडहर" पाहाणे क्रमप्राप्त.(हे आम्ही कोण हे बहुतेक तोच सांगेल ;) ) खरं अगदी खंडहर नव्हतं पण रस्त्यावरच्या खाण्यासाठी बसून खायचा पर्याय जितका चांगला कल्पू शकाल तितकीच बरी जागा होती."अगं, ताजमधले गोरे पण इथे येतात" - इति दिपू आणि कुठल्यातरी चित्रपटातल्या संवादाचा रेफ़रन्स..जो तिथे लक्षात आला तरी आता बिल्कुल आठवणार नाही. बरं "चल बसूया", असं म्हणायचं तर इथे पण आधी नंबर लावायला लागतो. थोडक्यात रामाची सिता म्हणजे तुफ़ान गर्दी पब्लिक फ़िदा वगैरेवाला जॉइंट म्हणजे बडेमिया. एकदा का आपला नंबर आला आणि आत गेलं की मग त्यांचा मेन्यु पाहाणे आले.

मेन्युवरचं सर्वच मागवावं का असा विचार येणं साहजिकच आहे. त्यासाठी खूप वेळ पण मिळाला कारण आम्हाला बसवून गेल्यावर कुणी आमच्याकडे साधं पाणी विचारायला देखील आलं नाही. पण त्यादिवशी उगाच मूड खराब करायला नको म्हणून त्याऐवजी दिपकने मला अगदी ठेवणीतली सलीम फ़ेकुची नक्कल करून दाखवली. म्हणजे आय विश की ते संवाद मला आता तसेच्या तसे आठवावे पण आम्ही बहुदा हैद्राबादीत वाहावले असू त्यामुळे की काय पण एकजण उगवला. तर आधी म्हटलं तसं सगळंच खायचं होतं पण त्यातल्या त्यात आपण इथलं काय खावं असा विचार करून आम्ही बडेमिया फ़ेमस कबाब, चिकन मलई टिका, चिकन रेश्मी टिका रोल (फ़ोटोत शोधू नका तो आधीच खाल्ला गेलाय), आणखी काही चिकनचे प्रकार, रुमाली रोटी इ.इ. मागवली आणि समोर वेटर दुसर्‍या कुणासाठी प्रचंड सजवलेलं रोटीसदृश्य काहीतरी नेताना दिसला त्यामुळे मग आम्ही तो परतला तसं लगेच ते काय होतं हे त्यालाच विचारून आमच्या तोंडातलं पाणी गिळून टाकलं आणि ती बैदा रोटी पण आमच्या ऑर्डरला टाकली. 

आता पुन्हा एकदा वाट पाहाणे आले. साधारणपणे अशा प्रकारे दोन तीन रांगांमधून जायची वेळ आली की समजायचं जे खाणं येणार ते फ़र्मास असणारच. त्यामुळे आमचा हा अंदाज काही खोटा ठरला नाही. त्याने आमची सुरूवातीची सगळी ऑर्डर टेबलावर आणून ठेवली आणि तो सलीम फ़ेकू, आमचा नंबर घेऊन बसवून मग बराच वेळ भाव न देणारा तिथला ऍडमिनवाला, शिवाय न गायलेला तो शान सगळं सगळं विसरून आम्ही तुटून पडलो. ज्यांना मसालेदार खाणं आवडतं त्यांच्यासाठी या खाण्याबद्दल काय लिहायचं..हे फ़ोटोच पुढचं सगळं सांगतील.मला तसंही एकदा का भारतात गेलं की आपल्या चवीचं खायला जवळजवळ सगळंच आवडतं. पण तरी चिकन मलई टिका आणि रोलमधला रेश्मी टिका लाजबाब.


हे सगळं खाल्यावर पुन्हा मी एवढ्या लांब येईन का याची शंका आल्याने बिर्यानीलाही संधी दिली आणि नाही नाही म्हणता तिचाही फ़न्ना उडाला. इतक्या लवकर की उगा तिचा फ़ोटो-बिटो काढायचा प्रयत्नही आमच्या ऑफ़िशियल फ़ोटूग्राफ़रने केला नाही. त्यामुळे या पोस्टला मिळणारे काही दुवा (?) अर्थातच कमी होतील. जाता जाता खरं तर यांच्याकडे शाकाहारीची व्हरायटीदेखील आहे हे लक्षात आलं पण तोवर पोटातली जागा खर्‍या अर्थाने संपली होती. 

इतकं सगळं खाऊन बिल हजारही आलं नाही, ही दक्षिण मुंबईतल्या जागांचे भाव लक्षात घेतले (का यार मला सारखं सारखं दक्षिण मुंबई आणि घर असे संदर्भ लागतात?) हा तर इतलं बिलही नक्कीच सगळ्यांना परवडण्यासारखं आहे. फ़क्त मुंबईच्या या टोकाला, असं रात्रीच्या वेळी जाणं व्ह्यायला हवं. तर मित्रमंडळींबरोबर खाणं झालं आणि जागा संपलीबिंपली काही म्हटलं तरी ते खंडहर उतरून (हो उतरताना पलीकडच्या बाजुला गोरे होत) खाली येईपर्यंत निदान पानाइतकी जागा झाली आणि खरं तर असं मसालेदार सामीष असं सगळं हाणल्यावर एक पान तो बनताही है..

मघई पानं चघळत जो चर्चगेटकडे जाताना अशा अनप्लान्ड खादाडी संध्याकाळी आणखी मिळाव्यात असाच विचार मी तरी करत होते. आणि आजच्या रविवारी इकडे असलं काही शोधूनही सापडणार नाही हाच विचार करून त्या रविवारच्या खाद्य आठवणी जाग्या करत होते. 

ता.क. माझ्या पोस्टमधल्या फ़ोटोंना नेहमी नसणारा एक जास्त प्रोफ़ेशनल लूक असणार्‍या वरील  फ़ोटोसाठी खास आभार दिपकचे.