Showing posts with label वाचाल तर.... Show all posts
Showing posts with label वाचाल तर.... Show all posts

Tuesday, January 7, 2020

आंद्रेचं खुलं आयुष्य अर्थात "ओपन"

मला मी कधीही न खेळल्यामुळे खेळाडूंचं आयुष्य कसं असेल त्याबद्दल एक सुप्त आकर्षण आहे. विशेष करून टेनिस खेळाडूंचं. तुम्ही डबल्स खेळणारे नसल्यास हा प्रवास प्रेक्षकांसाठी तरी तुमचा एकट्याचा. त्यातही निदान खेळाच्या मैदानावर तर नक्कीच एकट्याचा. यश, अपयश तुमच्या माथी. कुठून आणतात ही जिद्द आणि कसे सांभाळतात यातले उतार चढाव? हे सर्व जाणून घेण्यासाठी ओपन वाचलं आणि माझ्या टेनिस पाहायच्या सुरुवातीच्या काळात मला आवडणाऱ्या स्टेफीशी त्याचं लग्न झालंय म्हणूनही असेल अगास्सी काय चीज आहे हे वाचायला सुरुवात केली. 
पुस्तक सुरु होतं त्याच्या २००६ च्या यूएस ओपन च्या सामन्याच्या दिवशी आणि मग ते आपल्याला मागे घेऊन  त्याच्या तिथवरचा सगळं जीवन प्रवास उलगडून दाखवतं. 

जन्मापासून स्पॉण्डीलोलिस्थेसिस म्हणजे एक मणका साधारण निसटलेला असा दोष असलेला हा अगास्सी, पिजन टोड का चालतो त्याचं हे उत्तर आहे. त्याच्याच शब्दात सांगायचं तर 
Throw in two herniated discs and a bone that won't stop growing in a futile effort to protect the damaged area, and those nerves start to feel downright claustrophobic. यामुळे येणारी जीवघेणी कळ सामना सुरु असतानाही येऊ शकते; नव्हे ती येतेच. अशावेळी खेळी फक्त बदलू शकतो. शेवटच्या मॅचआधी कॉर्टिझोन घेऊन त्याने या वेदनेला विसरायचा प्रयत्न केला असतो. शेवटच्या सामन्याचा त्याने स्वतः वर्णिलेला आँखो देखा हाल पुस्तकाचं पहिलं प्रकरण आहे. मी तर तशीही टेनिस फॅन आहे पण कुणाही वाचकाच्या मनाचा ठाव घेईल. हे पुस्तक नंतर हातातून काढून घेणं अशक्य. खरंच कसं असतं टेनिस लाईफ? 

कट टू आंद्रे वय वर्ष सात. तो मनातल्या मनात अनेक वेळा I hate Tennis म्हणत असतो. त्याच्या टेनिसच्या तिरस्काराचा उल्लेख नाही असं प्रकरण नसेल आणि तरीही ही व्यक्ती जागतिक टेनिसपटू होती याचं आर्श्चय वाटल्याशिवाय राहवत नाही असो. तर या सुरुवातीच्या काळात त्याचा टेनिसचा तिरस्कार त्याच्या बाबानी बनवलेल्या ड्रॅगन अर्थात चेंडू फेकायच्या मशीनवर फोकस्ड आहे. त्याच्या मते त्याच्या बाबानी या ड्रॅगनला थोडी जास्त लांबुळकी मान अँड निमुळतं ऍल्युमिनियम डोकं असं डिझाईन करून थोडं भीतीदायक बनवलं आहे. त्याच्यापुढे आंद्रे एकदम  छोटा, असहाय दिसतो.  चेंडू लवकर (अर्ली) आणि जोरात  मारायला हवा म्हणून बाबा अनेकदा त्याच्यावर ओरडत असतात. त्याने कितीही आणि कसाही चेंडू मारला तरी बाबांचा ओरडा थांबणार नसतो. त्याच्या बाबांच्या दहशतीचा नमुना मजेत सांगायचं तर तो म्हणतो, Step on one of my father's tennis balls and he'll howl as if you stepped on his eyeball. आंद्रेने या चेंडूंना तडाखेबंद मारून ड्रॅगनला हरवावं हे त्याच्या बाबानी ठरवून दिलेलं एक टार्गेट होत. अर्थात वर्षाला १ मिलियन (१० लाख) चेंडू मारणे हेही. म्हणजे पहा, जर त्याने दिवसाला २५०० म्हणजे आठवड्याला साधारण १७,५०० चेंडू मारले तर वर्षाला १० लाख चेंडू मरणारा हा मुलगा अजिंक्य तर होणारच. त्याच्या टेनिसच्या तिरस्काराच बीज बहुदा इथं पेरलं गेलं असावं आणि अर्थात यशही :) सारखे सारखे बॅकहॅन्ड मारून दुखावलेल्या हातांबद्दल बाबांकडे तक्रार करण्यात काही अर्थच नसतो. मग त्यावर उपाय काय तर त्यात सुख शोधणं. तो म्हणतो On one swing, I surprised myself by how hard I hit, how cleanly. Though I hate Tennis, I like the feeling of hitting a ball dead perfect. Its the only peace.

आंद्रेचे बाबा, ज्यांचं स्वतःचं बालपण तेहरानमध्ये गेलं होतं, लास वेगसच्या एका कॅसिनोमध्ये कॅप्टन होते. कामाच्या जागेपासून दूर त्यांनी हे घर घेऊन तिथे आपल्या मुलाला टेनिसचा सराव करता येईल अशी सोय केली होती. जसा ड्रॅगन तसंच एका ब्लोअरला आंद्रे पाच वर्षांचा असताना एका मेकॅनीककडे नेऊन त्याने चेंडू उचलता येतील अशी रचना करून घेतली होती. आता दिवसाला २५०० चेंडू मारायचे म्हणजे इतकी सोय तर हवीच ना? तर घर घेतानाच मागे टेनिस कोर्ट बनवता येईल अशी जागा असणारं घर बनवून घेऊन सामान आणायच्या आधीच ते कोर्ट बनवायच्या तयारीला लागले. यासाठी काम करणाऱ्या कामगारांना जेवण आणून दयायला आंद्रेला फार आवडायचं. Suddenly my father had this backyard tennis court, which meant I had my prison. I'd helped feed the chain gang that build my cell. तो त्याची विनोदबुद्धी शाबूत ठेऊन लिहितो. आपण इथे फक्त दिग:मूढ होऊन त्याच्याबरोबर पुढच्या प्रवासाला लागतो. 

अगदी लहान वयाचा असल्यापासून वेगसमध्ये आलेल्या दिग्ग्ज टेनिस खेळाडूंबरोबर आंद्रेला त्यांनी टेनिस खेळायला लावलं आहे. जिमी कॉनर्सच्या रॅकेट्स तो वेगसला आला की त्याचे बाबा स्ट्रिंग करत.  त्याच्याही सुरुवातीच्या रॅकेट्स बाबांनीच स्ट्रिंग केल्यात. अर्थात "बाबांशिवाय कोण  तो ताण बनवून टिकवणार म्हणा?"-  इति आंद्रे. आपल्या या आत्मचरित्रात त्याने दिलखुलासपणे आपल्या बाबांच्या लहानपणापासून ते त्याच्या आई-बाबांची भेट, प्रेम, पळून जाऊन वेगसला स्थायिक होणं याचा प्रवास रंगवला आहे. मला सर्वात आवडले ते  या पुस्तकातील इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व. हे पुस्तक त्यातल्या भाषेच्या वेगामुळे, तसेच त्याच्या वर्णनांमुळे आपल्याला खिळवून ठेवते. 

दहा आणि आतील ज्युनियर लेव्हलच्या टेनिस स्पर्धा खेळल्यावर दहाच्या पुढे तो नॅशनल लेव्हलचे सामने खेळतो. अशावेळी त्याला जास्त टेन्शन असतं कारण हे सामने अमेरिकेत कुठेही होतात आणि त्याचा खर्च त्याचं कुटुंब करत असतं. सामना हरला की त्यांची इन्व्हेस्टमेंट फुकट जाणार असते. तसं तर त्याच्या बाबांनी त्यांच्या सर्व भावंडांना टेनिससाठी प्रवृत्त केलेलं असतं पण आपला धाकटा मुलगा आंद्रे हाच "चोजन वन" आहे यावर त्यांचा विश्वास असतो. त्याच्या भावाला "फिली"ला ते बरंच हिणवायचे. तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर भांडत नसे किंवा त्यांनी चुकीचा गूण दिला तरी काही बोलत नसे. तो टेनिसशी संबधीत राहिला पण आंद्रेप्रमाणे खेळला नाही; पण त्याची आणि आंद्रेची गट्टी होती. आंद्रे नॅशनल्स खेळू लागला तेव्हा सामन्याच्या आधी बाबानी जर एक छोटी पांढरी  गोळी दिली तर ती घेऊ नकोस म्ह्णून त्याने आधीच बजावलं. पण मग बाबांपासून सुटका कशी करायची तर गोळी घेऊन वाईट खेळ म्हणजे पुन्हा घ्यायला नको ही  युक्ती सुचून त्यांने तीच अमलात  आणायचा प्रसंग आपल्याला पालकांचं वेगळं रूप दाखवतात. 

घराजवळच्या केम्ब्रिज नावाच्या क्लब मध्ये आणि या टुर्नामेंट्स खेळून फार मोठं होता येत नाही हे जाणून आंद्रेला फ्लोरीडाला तीन महिन्यासाठी निक बोलेटरीच्या ऍकेडमीमध्ये पाठवायचं ठरतं. त्याला अर्थात इतक्या लांब जायचं नसतं. त्याचा जिवलग मित्र पेरी त्याला सोडायला येतो. या पेरीबद्दल जवळजवळ एक प्रकरण या पुस्तकात आहे. 

तर इथल्या प्रवासाचं सुरुवातीचं वर्णन म्हणजे People like to call it a Boot Camp, but it is really a glorified prison camp. Like most prisoners, we do nothing but sleep and work,  and our main rock pile is drills. Serve drills, net drills, backhand drills, forehand drills, with occasional match play to establish the pecking order, strong to weak. इथे गब्रीएल नावाचा ट्रेनर त्याला प्रत्यक्ष निकसमोर आणतो. त्याचा खेळ पाहून त्याचे तीन महिने अर्थातच वाढतात आणि निक त्याच्या बाबांशी बोलून त्याच्या फुकट ट्रेनींगची सोय करतो. The warden has tacked several years to my sentence, and there is nothing to be done but pick up my hammer and return to the rock pile. त्याचा टेनिसबद्दलचा तिरस्कार शब्दाशब्दांतून डोकावतो. 

बोलेटरीमध्ये शिकणारी मुलं टेनिसवर लक्ष देताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून जवळच्या  शाळेत पाठवली जातात. इथे आंद्रेची प्रगती यथातथाच असते. बोलेटरीमध्ये निदान टेनिसतरी शिकलं जायचं पण इथे मात्र इंग्रजी सोडलं तर त्याची प्रगती शून्य होती. त्याने लिहिलेले छोटे परिच्छेद इंग्रजीच्या तासाला वाचून दाखवले जायचे. त्याचं आत्मचरित्र इतकं वाचनीय का आहे त्याच्या भाषेचं रहस्य मला इथे उलगडलं. बाकी काही नाही तरी अतिशय सुलभ तरीही समृद्ध इंग्रजी वाचनासाठी हे पुस्तक नक्की संग्रही असावं. आणि लगेच पुस्तक आपल्या मुलांच्या हातात द्यायच्या आधी त्यात वाईट शब्द/प्रसंगाचा "फ"काणाहि भरला आहे हेही लक्षात असू द्या 

शाळेबद्दल एकंदरीत रस वाटत नसल्यामुळे सुटकेचा एक प्रयत्न म्हणून एके दिवशी अचानक आंद्रे त्याच्या केसाचा गुलाबी मोहॉक कट करतो. त्यानंतरच्या नाताळात जेव्हा तो घरी जातो त्याच्या बाबांना अर्थातच त्याचे हे केस, कानात बाळी वगैरे अवतार आवडत नाही पण त्याचा भाऊ फिली  मात्र त्याचं कौतुक करतो. त्याच्याकडे फार कपडे नसतात म्हणून जुगारात जिंकलेले सहाशे पैकी तीनशे डॉलर्स खर्च करायलाही देतो. 

पुन्हा एकदा बोलेटरीचा वनवास सुरु होतो आणि एका टुर्नामेंटला आंद्रेमधला बंडखोर जागा होतो. तिथे तो चक्क जीन्समध्ये खेळतो आणि इथेच निकची सटकते, त्याने दिलेल्या जबरी शिक्षा आणि अपमानामुळे यातून सुटका म्हणणं आंद्रे पळून जायचा प्रयत्न करतो पण मधेच रस्त्यात त्याच्यामागे त्या अकादमीमधला गब्रीएल येतो आणि त्याचबरोबर बाबांचा फोन त्यामुळे आंद्रेची इच्छा सहजी पूर्ण होत नाही; पण आपलं निकच्या लेखी असलेलं महत्व त्यालाही कळतं पण तो निकशी बोलणं टाळतो. त्यानंतर तो युक्तिचातुर्याने त्याचा मित्र पेरीला तिथे बोलवून घेतो आणि योगायोगाने त्यांनी खेळात जिंकलेल्या पांडावर निकच्या मुलीचा जीव जोडल्यामुळे त्याच्या बदल्यात आपली काही तहाची कलमे मांडून आंद्रे निदान शाळा नावाच्या जाचातून आपली सुटका करून घेतो. तसंच थोड्या मोठ्या टुर्नामेंट्स साठी सहभागी होण्याची पण  सोय करतो. 

त्यांनतर तो "ला किंता" खेळताना दुसऱ्या  राउंड पर्यंत पोचतो. त्याला तो जर प्रो असता तर  दोन हजार सहाशे डॉलर्स मिळाले असते पण तो नवखा (अमॅच्युअर) असल्याने त्याला ते दिले जात नाहीत. पण त्याला स्पर्धेला यायचा खर्च मिळू शकतो. खरं तो त्याच्या भावाकडे लॉस एंजल्सला राहून त्याच्याच गाडीतून आलेला असतो पण मग भावाच्या मदतीने तो काही खर्चाचा हिशेब मांडतो जो योगायोगाने दोन हजार सहाशेच निघतो पण मग त्याला दोन हजार मिळतात. त्यातले हजार तो भावाला सहजपणे देतो. 

इथून पुढे निकचे आणि त्याचे संबंध थोडे सुधारतात. आणि वयाच्या १६ व्या वर्षी त्याला प्रो व्हायची संधी मिळते. आता मात्र त्याला कळत नाही काय निर्णय घ्यायचा कारण एकदा तुम्ही प्रोफेशनल स्टेटला आलं की मग मागे पाहायचं नाही. तेव्हा तो बाबांना सल्ल्यासाठी फोन करतो. 
You've dropped out of school! You have an eighth-grade education. What are your choices? Be a doctor?
त्यानंतर त्याचे बाबा त्याच्याबरोबर त्याचा भाऊ फिलीला पाठवतात. त्याची बाकीची कामं सांभाळायला. तो प्रो झाल्याच्या दिवशी फिलीला नाईकीचा फोन येतो. त्यांचं दोन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं. फिली आणि आंद्रेला स्वर्ग दोन बोटे उरलेला असतो. 

आता फक्त खेळावर लक्ष केंद्रीत करायचं (आणि नाइकीचें कपडे इ. वापरायचे) तो पहिली न्यू यॉर्कची एक टूर्नामेंट रमेश क्रिष्णनबरोबर हरतो आणि त्यानंतर व्हरमॉंटला जॉन मॅकेन्रोबरोबर हरतो. पण तरीही त्याची टेनिसमधली क्रमवारी सुधारण्यास मदत होते. १९८६ मध्ये आपल्या पहिल्या यु.एस.ओपन पहिल्याच राउंडला हरतो. हा हारण्याचा सिलसिला जारी राहण्याच्या काळात एकदा तो वॉशिंग्टन डीसीच्या भागातल्या बेघर लोकांना आपल्या सर्व रॅकेट्स वाटून टाकतो आणि कायमचं टेनिस सोडायचं पक्क करतो. नाईकीने दिलेले पैसेही काही शेच उरलेले असतात. योगायोगाने दुसऱ्या एका टूर्नामेंटमधल्या एका खेळाडूने आधीच माघार घेतल्याने त्याला बोलावलं जातं आणि त्याला निदान दोन हजार डॉलर्स मिळतील हेही नक्की असतं. जाताजाता थोडे पैसे कमवून निघू म्हणून तो पुन्हा खेळायला सुरु करतो आणि अजून एका टूर्नामेंटमध्ये पॅट कॅशला हरवतो ज्याच्याकडून तो विम्बल्डनला हरला होता. त्यानंतरच्या वर्षी जेव्हा त्याला नव्वद हजाराचा चेक बक्षीस म्हणून मिळतो तेव्हा बाबांच्या परवानगीने तो त्याची तेव्हाची ड्रीम कार कोर्व्हे घेतो. त्याच्या बाबांच्या आपलाच मुद्दा खरा करायची (किंवा ओढवून भांडणं करायची) आणखी एक चुणूक दाखवणारा हा प्रसंग आंद्रेला अंतःर्मुख करतो. अर्थात तेव्हा तो अवघा सतरा वर्षांचा असतो त्यामुळे अजून घर सोडायची वेळ आलेली नसते पण त्याला घोडामैदान जवळ दिसत असतं. 



आता मात्र तो सतत खेळत राहतो. त्याचबरोबर त्याच्या फिटनेसकडे मुख्यतः पायाच्या फिटनेसवरही लक्ष केंद्रित करतो. त्यासाठी  त्याच्याबरोबर काम करतो तो पॅट. हे दोघे वेगसच्या त्याच्या घराजवळची एक टेकडी चढून जायचे. आंद्रे दमून जाई. याच दरम्यान तो जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर येतो. अशावेळी यु एस ओपनच्या क्वार्टरफायनलला त्याचा सामना जिमी कॉनर्सबरोबर असतो. सामन्याआधी तो त्याला आपली पूर्वीची वेगसची ओळख, त्याच्या बाबांनी रॅकेट्स विणल्या वगैरे संदर्भ द्यायला जातो पण कॉनर्स अजीबात ओळख दाखवत नाही. मग तो जिद्दीने त्याला हरवतो. त्यानंतरच्या लेंडलबरोबरच्या सामन्यात मात्र तो हरतो. 

अजूनही त्याची ते पंक केस, जीन्स घालणं यामुळे मीडियामधली इमेज फार छान नसतेच. या आणि इतर नकारात्मक प्रसंगातून स्वतःला शोधण्याचा त्याचाही प्रयत्न सुरु असतो. त्यावेळी त्याच्या मित्राच्या सल्ल्याने जे.पी. नावाच्या एका पास्टरसोबत तो मैत्री करतो. त्याला तो डेव्हिस कप पाहायला घेऊन जातो. इथे त्याची कामगिरी मनासारखी होत नसते. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याला आपल्या या अपयशाचं एक कारण मिळतं . निकनं स्वतःच्या स्वार्थासाठी एका दुसऱ्या रॅकेट कपंनीसोबत करार करून त्याला वेगळी रॅकेट खेळायला दिली असते. तू आरामात खेळू शकशील हा विश्वास दाखवून. पण पुन्हा जुनी रॅकेट ट्राय करताना आंद्रेला आपली ती चूक कळून येते. 

त्यानंतर पुन्हा तो फ्रेंच ओपन साठी प्रयत्न करतो पण मायकल चँग ती जिंकतो. खरं चँगला आंद्रेने याआधी इतर टुर्नामेंट्समध्ये हरवलं असतं पण आपल्याला एकही स्लॅम मिळण्याआधी चँगला ते मिळतं याचा त्याला आणखी वैताग येतो. मग पुन्हा एकदा तो विम्बल्डन खेळायला जात नाही. अशा प्रकारे पत्रकारांच्या आणखी टीकेचा धनी होतो. 

जिल या त्याच्या ट्रेनर + मित्र  + पितासमान व्यक्ती याबद्दल लिहिलं नसतं तर आंद्रे आपल्याला कळला नसता. जिलबरोबरचं त्याचं बोलणं वाचलं तर त्या काळात आंद्रे किती एकटा होता आणि त्याचबरोबर त्याचा स्वतःचा शोध कसा सुरु होता याची कल्पना येते. जिलने त्याला कुणा इतरांसारखं नाही तर तो त्या खेळात जे करू इच्छितो त्यासाठी त्याचं शरीर तयार केलं. जिल वॉटर नावाने जी वेगवेगळ्या रंगांची पेय तो आन्द्रेसाठी बनवत असे त्याचा फॉर्मुला खुद्द आंद्रेलाही माहित नसेल. जिलसारखा सखा प्रत्येक खेळाडूला मिळाला तर खरंच त्यांचा एकदंरीत फिटनेस राखून खेळाचा स्टॅमिना वाढायला मदत होईल. तुम्ही टेनिस पाहणारे असाल तर आंद्रेच्या स्टॅन्डमध्ये या सहा फुटी आंद्रेच्याच भाषेत भल्या मोठ्या माणसाला नक्की पाहिलं असेल आणि त्याचा आंद्रेच्या आयुष्यातला/करियर मध्ये काय सहभाग होता हे पुस्तक वाचून कळेल. त्याच्या एका एकत्र ट्रिप  नंतर आंद्रे म्हणतो Outside, we stand in the parking lot and look at the stars. I feel such overwhelming love, and gratitude, for Gil. I thank him for all he's done, and he tells me I never need to thank him again. 


जवळजवळ दोन वर्षे ग्रँड स्लॅमच्या यशाने हुलकावणी दिल्यानंतर ९२ चा विम्बल्डन जिंकला त्या सामन्याचं अगास्सीच्या भाषेतलं आणि खरं तर इतरही त्याच्या यशापयशाची त्याच्या शब्दात वर्णनं वाचणं ही वाचकांसाठी आणि मुख्यतः टेनिस कळणाऱ्या वाचकांसाठी मोठी पर्वणी आहे. अर्थात जसं यश येतं तसंच  पुढच्या वर्षात इतरही काही गोष्टी होतात. त्यावेळी तो त्याच्या वेन्डी नावाच्या मैत्रिणीबरोबर असतो ती त्याला सोडून जाते. त्याच्या पुढच्या विम्बल्डनला तो पीट सॅम्प्रास कडून हरतो आणि मग परत वेगसला आल्यावर निक त्याची बोलेटरी ऍकॅडमी बंद करून बसला होतो तो आंद्रेला आपण सोडल्याचं जाहीर करतो. जिलच्या शब्दात Well I say , I guess it's Break-Up-With_Andre time. First Wendy, now Nick. त्याचवेळी त्याला टेण्डनायटिस पण झाला असतो. 

या शस्त्रक्रियेमधून बरं होण्याच्या काळात त्याच्या आयुष्यात ब्रुक शिल्ड येते किंवा तिला आणलं जातं. त्यांची सुरुवातीची कोर्टशीप फॅक्सने सुरु होते कारण त्यावेळी आंद्रे वेगस आणि ती साऊथ आफ्रिकेत एका तंबूत राहून शुटिंग करत असते. त्यानंतर ती परत आल्यावर एकमेकांना भेटणे, डेटिंग आणि एकंदरीत ब्रुक बरोबरचा त्याचा इतिहास बराच माहीत आहे. 

याच दरम्यान तो आपल्या टीममध्ये काही बदल करतो आणि त्याचा तो जुना मित्र "पेरी"ला मॅनेजर म्हणून नेमतो. पेरीच्या सल्ल्याने मग ब्रॅड गिलबर्ट त्याचा ट्रेनर म्हणून नेमला जातो. सुरवातीला तो त्याला त्याच्या बॅकहॅन्डवर विशेष करून ज्याला backhand up the line म्हणतात त्यावर लक्ष केंद्रीत करायला सांगतो. आंद्रेला पहिल्याच भेटीत त्याने सांगितलं असतं की तुझा मुख्य प्रश्न तुझं स्वतःला परफेक्ट करण्यात आहे. ते सोड आणि त्यालाही ब्रॅडसोबत काम करताना ते पटतं. आंद्रे म्हणतो I've always assumed  perfectionism was like my thinning hair or my thickened spinal cord. An inborn part of me. त्यानंतर आंद्रेच्या शब्दात सांगायचं तर THEN THE TEAM goes on an epic losing streak. Adopting Brad's concepts is like learning to write with my left hand. He calls his philosophy Bradtennis. I call it Bratitude. 

त्याच्या जवळजवळ प्रत्येक हार नंतर ब्रॅड त्याला म्हणतो तुला एक निसटता विजय मिळेल आणि तिथून पुढे तू सतत जिंकत जाशील. अर्थात त्यासाठी जवळजवळ १९९४ ची कनेडीयन ओपन उजाडते. त्यानंतर होणाऱ्या यूएस ओपनला तो अनसीडेड जातो. फायनलला त्याचा मुकाबला मार्टिन विरुद्ध असतो, ज्याने त्याला आधीच्या विम्बल्डनला हरवलं असतं. १९६६ नंतर तो पहिलाच अनसीडेड विजेता असतो. योगायोगाने ६६ मध्ये चा विजेता फ्रॅंक शिल्ड्स हा त्याच्या तेव्हाच्या गर्लफ्रेंड ब्रुक शिल्ड्सचा आजोबा असतो. 

त्याच्या एकदंरीत वागणे आणि त्याला सामना आयोजकांकडून मिळणारी वागणूक याबद्दल बोरिस बेकरने रान उठवलं असतं. त्यामुळे त्याची बेकरला हरवण्याची चुरस असते जी तो ९५ च्या उन्हाळ्यात यु एस ओपनच्या सेमी फायनलला पूर्ण करतो. मला हे पुस्तक वाचेपर्यंत बेकरचा खेळ आणि एकंदरीत त्याच्याबद्दल जे काही चांगलं वाटत होतं ते मत हे पुस्तक वाचून बदललं. या सामन्यात दोघेही आपली चुरस दाखवणार होते हे निश्चित. आंद्रे म्हणतो He tries to play my mind. He's seen me lose my cool before, so he does what he thinks will make me loose my cool again, the most emasculating thing one tennis player can do to another: He blows kisses at my box. At Brooke. मला वाटतं  पुढचं काही लिहायची गरजच नाही. बेकरला तो हरवतो पण या सामन्यानंतरची फायनल तो त्याचं शरीर साथ देत नसल्याने पीट विरोधात हरतो.   

 त्याच्या प्रवासात साथ देणारी त्याची मैत्रीण ब्रुक शिल्ड आणि त्याच लग्न होतं पण याच दरम्यान त्यांच्यात दुरावा येऊन दोन वर्षांत ते विभक्त होतात. त्याचवेळी स्टेफीने त्याच्या आयुष्यात येणं जास्त योग्य ठरेल असं ब्रॅडचं म्हणणं ठरतं. खरं तर आंद्रेच्या टेनिसच्या सुरुवातीच्या काळातलं अगदी वेन्डी त्याच्या आयुष्यात असतानाही असणारं क्रश म्हणजे स्टेफी. त्याच्या पहिल्या विम्ब्लडन विजयाच्या वेळी स्टेफीहि विजयी झाली होती आणि त्यावेळी तिच्याबरोबर त्या सेलिब्रेशन बॉलला नाचायला मिळेल म्हणून तो फार उत्सुकही होता. नेमका त्या वर्षी तो नाच रद्द केला होता. आता त्याने पुन्हा आपल्या जुन्या आवडीकडे जरा सिरियसली लक्ष दिलं. 

त्याचवेळी त्याने पुढची फ्रेंच ओपन जिंकून ग्रँड स्लॅम जिंक्यचा मनाचा तुरा आपल्या मुकुटात खोचला. स्टेफीच्या येण्याबरोबर पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर मुसंडी मारतो. स्टेफीपण रिटायर होऊन त्यांच्याबरोबरचे आपले संबंध जाहीर झाले तरी चालतील या मताला येते आणि पुन्हा एकदा आंद्रे आणि टेनिस सूरु  राहतं. 

या ठिकाणी असं वाटणं साहजिक आहे की आता त्याला टेनिस आवडायला लागलं आहे पण तोवर त्याने त्याचा भाऊ आणि तो याचं जुनं स्वप्न गरजू मुलांसाठी शाळा सुरु करणं हे सत्यात आणलं होतं आणि आंद्रेने ते वयाच्या चोविसाव्या वर्षीच सुरु केलं त्यामुळे त्याची कमाई आता जास्त महत्वाची ठरत होती. त्याचं टेनिसमध्ये असणं, त्यामुळे होणारया मोठ्या लोकांशी ओळखी याचा फायदा देणग्या मिळवण्यासाठी होत होता. तो खेळत राहायचं हे एक महत्वाचं कारण ठरलं. त्याच्या अर्ध्या वयाची मुलं म्हणजे अँडी रॉडिक आणि फेडरर येईपर्यंतही तो खेळत होता. त्याने एका एटीपी मध्ये फेडररला हरवलंही  आहे. त्यांनतर मात्र फेडरर नेहमीच अव्वल ठरला आणि त्याने फेडरर बद्दल अतिशय चांगले मुद्दे नमूद केले आहेत. ते सर्व मुळातूनच वाचलं पाहिजे. 

दरम्यान २००२ मध्ये त्याने आणि ब्रॅडने एकमेकांना अलविदा म्हणून डॅरेनची कोचिंग घेतली. डॅरेनने त्याच्या रॅकेटचा स्ट्रिंग बदलली. त्यामुळे कधी न जिंकीलेली इटालियन ओपन आपण जिंकू शकलो असं त्याला वाटतं . तरीही पुढचे काही सामने तो वाईट हरला मग डॅरेनने पुन्हा काही बदल केलेली स्ट्रिंग त्याच्यासाठी निवडली. २००३ च्या ऑस्ट्रेलियन ओपनला त्याचं सिडींग दुसरं होतं. तिथे त्याने त्याचं शेवटचं स्लॅम जिंकलं वयाच्या ३२ व्य वर्षी हे खरं तर तेव्हाच्या काळी आश्र्चर्यच. 

त्यांनतर जेव्हा त्याने आपलं शेवटचं विम्बल्डन आणि यु एस ओपन असण्याची म्हणजेच निवृत्ती जाहीर केली त्यावेळी नदाल बरोबर तो विम्बल्डन हरला त्यावेळी शिस्तप्रिय स्पर्धाआयोजकांनी त्यांची रीत बदलून त्याची मैदानावर मुलाखत घेतली. त्यांनतर तो यु एस ओपनसाठी गेला आणि बगदातिसला हरवल्यावर त्याची खरं तर उभं राहायची पण ताकत नव्हती. तो ज्यातून जात होता ते पाहून पहिल्यांदी त्याच्या बाबांनीदेखील त्याने आताच बाहेर व्हावं म्हणून सांगून पाहिलं पण अशा प्रकारे जाण्यापेक्षा त्यापुढचा सामना लढून तो निवृत्त झाला. 

पुस्तक इथे सुरु होतं.त्याची तयारी, त्याच्या भावना यात आपण गुंतत जातो आणि त्यामुळे त्याचं थोडं उद्दाम वागणं, ड्रग्जचा आधार घेणं हे सारं काही आपण त्याला माफ करतो. आपल्याला दिसलेला आंद्रे आणि प्रत्यक्षातला आंद्रे यातला फरक आपल्याला त्याच्या जवळ आणतो. तो सारखा स्वतःला शोधत असतो आणि  कुठलाही सामान्य माणूस करेल त्याच चुका तोही करतो. त्याच्या आयुष्यात आलेली तीन महत्वाची माणसं म्हणजे त्याचे बाबा, जिळ आणि स्टेफी यांच्याबरोबर तो घडत जातो. पण त्याबरोबर तो माणूसकी विसरला नाही त्यामुळे त्याच्या फाउंडेशनला लागणाऱ्या पैशासाठी फक्त दानशूर लोकांवर अवलंबून न राहता तो खेळत राहतो. आपला खेळ मुलांनी पुढे नाही नेला तर बरं विचाराने त्या दोघांनी आपल्या घराला टेनिस कोर्ट नसावं याची काळजी घेतली आहे. त्याने आणि स्टेफीने तळागाळातील मुलांना शिक्षण द्यायचं कार्य सुरु केलं आहे हेही कदाचित मला त्याच्या बाकी इतर गुन्ह्यांना माफ करायला वाटायचं कारण असू शकेल. पण व्यक्तिगत लिहिताना त्याच्याबरोबर त्याच्या अगदी एटीपीचे आपण न पाहिलेलं सामनेही आपण त्याच्याबरोबर जगत जातो. त्याच्या फिटनेस रुटीनची वर्णनं वाचून त्याची मेहनत आपण समजून घेतो. एखाद्याने आत्मचरित्र लिहिताना किती "ओपन" लिहावं याचा हा उत्तम 

हे पुस्तक संपवताना त्याचं त्याच्या मुलांसाठी लिहिलेलं वाक्य वाचताना मला वाटतं त्याचां पुस्तक लिहायचा आणखी एक हेतू आपल्याला कळेल. तो म्हणतो I was late in discovering the magic of books. Of all my many mistakes that I want my children to avoid, I put that one near the top of the list.     


टीप - यातले फोटो मागे एकदा लिजण्ड सिरीजमध्ये आंद्रेला प्रत्यक्ष खेळाताना पाहायचा योग आला होता त्यातले आहेत. हा लेख "मिसळ पाव" या मराठी संस्थळाच्या २०१९ जालीय आणि पहिल्यावहिल्या छापील अंकात समाविष्ट आहे. ही लिंक 


#AparnA #FollowMe

Saturday, December 1, 2018

जॉर्जची कहाणी George - Be Who you Are

"यंदाचं आपल्या स्कुल डिस्ट्रिकचं OBOB बहुतेक रद्द होईल" , जेनी माझ्या मुलाच्या मित्राची आई शाळांना सुट्ट्या लागताना भेटली तेव्हा सांगत होती. "तुला त्या वादग्रस्त पुस्तकाबद्दल माहित असेलच". "नाही अजून", मी पुटपुटले. हे एक मॉरमॉन कुटुंब असल्याने काय वादग्रस्त असू शकेल याचा मला साधारण अंदाज आलाच. 

OBOB म्हणजे Oregon Battle of Books ही तिसरी नंतरच्या मुलांमध्ये पुस्तकवाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून घेतली जाणारी एक स्पर्धा. गेले दोन वर्षे माझा मुलगा त्यात भाग घेतोय. आमची गाडी अजून रिजनललादेखील गेली नाही; पण त्याला आवड म्हणून त्यातली एक दोन पुस्तकं वाचणे, थोडंफार volunteering करणे हे मीही करते. 

यावर्षी मात्र शाळा सुरु व्हायच्या आधीच हा वर म्हटला तो नन्नाचा पाढा ऐकायला येऊ लागला आणि कुठलं पुस्तक काय वगैरे मनात यायला लागलं. तरीही प्रत्यक्ष पुस्तक हातात यायला सप्टेंबर उजाडलाच.

George पुस्तकाचं इतकं साधं कव्हर मी पाहिलं नाही. फोटोत दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या रंगात रंगवलेलं प्रत्येक अक्षर आणि o मधून अर्धवट दिसणारा एक लहान चेहरा. नीट पाहिलं तर हे रंग LGBT सपोर्टवाला झेंडा असतो तेच रंग. मागच्या पानावर  Be Who you Are च्या o मधेही तोच चेहरा. त्याखालचा अल्पपरिचय वाचला आणि त्याने चित्र बरचसं स्पष्ट झालं; शिवाय जेनीची प्रतिक्रियादेखील आठवली. पुस्तक वाचायला हवं हेही तितकंच पक्कही झालं. OBOB रद्द वगैरे न झाल्याने मुलाने आधीच पुस्तक वाचलंही होतं. त्याला ते खूप नॉर्मल वाटलं ही बाब मला फार महत्त्वाची वाटली.  

सध्या शब्दात सांगायचं किंवा भांडाफोड करायची तर जॉर्ज नावाचा एक मुलगा जनसामन्यासाठी मुलगा असला तरी स्वतःला मुलगा न समजता मुलगी समजत असतो. किंबहुना आपण मुलगीच आहोत याची खात्री तिला असते. अशा मुलीचं आपल्या कुटुंबीयांना आपलं मत पटवून देतानाची ही कथा. सम्पूर्ण कथेत जॉर्जचा उल्लेख "ती (she)" म्हणूनच केला आहे हे उल्लेखनीय आहे. 

जॉर्ज न्यू यॉर्क राज्यात आपली आई आणि मोठा भाऊ स्कॉट यांच्याबरोबर राहत असते. तिचा  बाबा फियोना नावाच्या एका बाईबरोबर लग्न करून पेन्सिल्व्हेनियामध्ये राहत असतो. पुस्तकाच्या सुरुवातीला जॉर्ज मुलींची चित्र असणारी लपवलेली मासिकं पाहताना तिचा भाऊ स्कॉट दारावर टकटक करतो कारण त्याला जॉर्जच्या खोलीतलं बाथरूम वापरायचं असतं. तिला दार उघडायला वेळ लागतो कारण ती मासिकं पुन्हा लपवायची असतात पण रूम वापरून झाल्यावर स्कॉटला ती गंमत माहित झाल्याने तो "I won't tell Mom. I will let you get back to thinking about girls", म्हणून चिडवून जातो तेव्हा जॉर्जला खरं तर मी दुसरं कुणीतरी असायला हवं ही इच्छा होते. या मासिकातल्या मुली म्हणजे तिच्या मैत्रिणी होत्या. तिला प्रकर्षाने आपण त्यांच्यासारखं मुलगी असायला हवं असायचं. कधीतरी ही मासिकं फेकली पाहिजेत हेही तिला माहीत होतं पण ते तितकं सोपं नव्हतं. 

नेहमीप्रमाणे शाळा सुरु असते आणि इ.बी.व्हाईट यांचं "शार्लट्स वेब" हे पुस्तक मिस उदेल चौथीच्या वर्गात वाचून घेतात. शेवटच्या भागात शार्लट ही कोळी जेव्हा मरते तेव्हा जॉर्जला अश्रू आवरत नाहीत. याबाद्दल त्याच्या वर्गात असणारे रिक आणि जेफ त्याची टिंगलपण करतात. नन्तर जर्नलमध्ये याबद्दल मुलांना लिहायला लावताना बाई जवळ येऊन जॉर्जची चौकशी करतात. शाळेची एक प्रथा म्हणजे दरवर्षी वसंत ऋतूमध्ये पहिली ते चौथीची मुलं एकच पुस्तक वाचतात आणि चौथीचे दोन्ही वर्ग मिळून त्या पुस्तकाचं नाटुकलं खालच्या वर्गांसाठी सादर करतात. यंदा तो मान "शार्लट्स वेब" या पुस्तकाला जातोय.

पुढच्या आठवड्यात नाटकाची पात्रनिवड होणार म्हणून विकांताला त्याची तयारी करण्यासाठी जॉर्ज आणि त्याची बेस्ट फ़्रेंड "केली" तिच्या घरी भेटतात. त्याआधी तो केलीला आपलं रहस्य सांगण्याआधी नाटकाच्या विषयामुळे विल्बर (Wilbur , the dirty pig) ही पुरुष भूमिका करण्यापेक्षा शार्लटची स्त्री भूमिका करायची इच्छा प्रकट करतो. केलीच वय पाहता तिला त्यात काही विशेष वाटत नाही. तू ये बिनधास्त, आपण तयारी करू आणि आपल्या बाई तुला तीच भूमिका देतील असा विश्वास ती जॉर्जवर दाखवते. प्रत्यक्षात जॉर्जला ती भुमिका मिळत नाहीच शिवाय बाईंचा विश्वासघात केल्याचा ओरडा, रिक आणि जेफचे टोमणे हे सर्व होतं. बाई जॉर्जला विल्बर किंवा दुसरी कुठलीही पुरुष भूमिका द्यायला तयार असतात पण जॉर्ज मागच्या पटात मदतनीस म्हणून राहतो. शार्लटची भूमिका केलीला जाते. 

केलीला वाटतं जॉर्जला शार्लटची भूमिका मिळाली नाही म्हणून आता ती आपल्याशी बोलणार नाही पण त्याचवेळी मला मी मुलगी असल्यासारखं वाटतं हे आपलं गुपित जॉर्ज केलीला सांगतो. त्यावेळचा त्याचा केलीचा संवाद उल्लेखनीय आहे. या वयातली मुलं काय विचार करत असतील त्याचा लेखिकेने बरोबर विचार केला आहे. 

त्याचवेळी जॉर्जच्या आईला जॉर्जची ती मासिकं मिळतात आणि ती जॉर्जला सज्जड दम देऊन आई घेऊन टाकते. आता तिच्या या आभासी मैत्रिणीही नाहीश्या होतात. जॉर्ज दु:खी होते पण आईला आपल्या मनातला गोंधळ सांगायची वेळ अजून आली नसते. मग ती जेव्हा एका प्रसंगावरून तो गोंधळ आईला सांगते तेव्हा तीही केलीप्रमाणे ते चटकन स्वीकारते का? जॉर्जला आईला समजावण्यासाठी किंवा स्वतःसाठी शार्लटच्या भूमिकेचा वापर कसा होतो. यात शाळेतल्या बाई किंवा मुख्याध्यापिका यांची काय मतं असतात या सर्व प्रश्नांची उत्तर शोधायची तर मुळातून "जॉर्ज" हे पुस्तक वाचायला हवं. 



या पुस्तकाची लेखिका ऍलेक्स जिनो हिचं हे पहिलंच पुस्तक आणि तेही २०१७ साली प्रसिद्ध झालेलं आहे. याला लहान मुलांच्या पसंतीचे लेखकाच्या पदार्पणाचे पारितोषिक मिळाले आहे. (Winner of the Children's Choice Book Award for Debut Author of the Year) आणखीही काही पारितोषिके त्याला आहेत. इतर पुस्तकात न पाहिलेली एक गोष्ट म्हणजे पुस्तक संपल्यावर लेखिकेची छोटेखानी मुलाखतही आहे. ती स्वतः genderqueer आहे. म्हणजे मुलगाही नाही आणि मुलगीही नाही. तिला हा शब्दही वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कळला. तिने हे पुस्तक लिहिलं जे तिला ती लहान असताना वाचायला आवडलं असतं. जॉर्जला "मेलिसा" जे तिचं आवडतं नाव आहे याने हाक मारा किंवा "ती" असा उल्लेख करा पण :तो" नाही याकडे तिचा आग्रह आहे. मेलिसा ही एक ट्रान्सजेंडर मुलगी आहे. ती मुलगी म्हणून मोठी होणार तेच तिला तिचं  शरीर यात अडकलं आहे (body is trapped or stuck in) वगैरे म्हणू नका हे ती आवर्जून सांगते. आणखीही माहितीपूर्णप्रश्नांची उत्तर यात आहेत. हे पुस्तक ज्या जॉर्जबद्दल लिहिलेलं आहे ती या दशकातील असल्यामुळे तिला अशा शरीराविषयी आणि इतर माहिती आंतरजालावर खुली आहे हेही इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. 

एक आई म्हणून मी हे पुस्तक वाचलं कारण माझ्या मुलाच्या वयाच्या मुलामुलींनी जेंडर समजून घेताना समाजमनाचं भान ठेवायला हवं हे जे मला शब्दात शिकवता येणार नाही ते अशी पुस्तकं समजावू शकतील का? मुलांना आतापासून या विषयातील किती माहिती कळायला हवी म्हणजे त्यांचं बालपण न हरवता त्यांना ही माहितीही राहील हे मला हवं होतं. तिसरी ते पाचवीपर्यंतच्या मुलांनी वाचावं म्हणून OBOB च्या स्पर्धेसाठी हे पुस्तक लावलं आहे. मला वाचताना काही वावगं वाटलं नाही; उलट जॉर्जची मेलिसा होतानाची घालमेल कळली आणि तसंच तिच्या आईचीही. या स्पर्धेनिमित्ताने बरीच मुलं हा पुस्तकं वाचतील आणि आपली मतं बनवतील हे यशच आहे. वर उल्लेखलेली जेनी मात्र तिच्या धार्मिक भावनांच्या विरोधात असणारं हे पुस्तक तिच्या मुलाला वाचायला देणार नाही हेही जाताजाता.  

हा लेख मिसळ पावच्या यंदाच्या दिवाळीत प्रकाशीत झाला आहे त्याचा दुवा. 

#AparnA #FollowMe

Saturday, September 13, 2014

रेषेवरचा लढा On the line

काहीवेळा एखादी सुप्रसिद्ध व्यक्ती विशेष करून खेळात प्राविण्य मिळवणारी, त्या क्षेत्रात कितीही माहीर असली तरी काही कारणांनी आपल्याला ती तितकी भावेल असं नसतं. माझं अगदी तसं विल्यम्स भगिनीबद्दल होतं.अगदी आता आतापर्यंत सरीनाबद्दलही काही आस्था नव्हती. आणि एकदा एका पुस्तकांच्या दुकानात "On the line" सेलवर दिसलं. जिचा समोर येणारा खेळ पाहणे सोडून आणखी काही माहिती मिळवायचा प्रयत्न केला नाही ती समोरून स्वत:ची माहिती देते, यापेक्षा इतक्या लवकर ही बया आत्मचरित्र लिहून पार झालीदेखील अशा काही मिश्र विचारात मी ते पुस्तक घेतलं. 
मला आधी वाटलं होतं की एवढ्या लवकर हे पुस्तक का आलं पण वाचून संपल्यावर मात्र ते वाचलं म्हणून या व्यक्तीने किंवा खरं तर या दोघी बहिणींनी या टप्प्यावर यायला किती मेहनत केली आहे हे कळलं हे बरचं झालं हे मान्य करायला हवं. 

पुस्तकाची सुरुवात अर्थातच तिच्या लहानपणी तिच्या बाबांनी या पाच बहिणींना  टेनिसचे धडे देता देता सरीना आणि विनसवर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आणि एकंदरीत त्यावेळची बिकट परिस्थिती, त्याचा विचार न करता एक दोन गावातील पब्लिक कोर्टमध्ये मुलींना खेळायला घेऊन जाणे. एल ए चे बरेच नेबरहुड्स तसे कुप्रसिद्ध. काही वेळा आदल्या रात्री गर्दुल्यांच्या वावरामुळे कोर्टवर काचा,बियरच्या बाटल्या असं काहीबाही पडलं असे. खेळताना कधी कधी आसपासहून येणारे बंदुकांचे आवाज तिला आधी फटाक्यांचे वाटत पण या पेक्षा माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे विनस आणि सरीना खेळताना त्यांना पहाणारी काही मुलं त्या दोघींना blackie one आणि blackie two म्हणून टोमणे मारत होती. बरंच ऐकून घेतल्यावर शेवटी टुंडेने त्यांना पळवून लावलं. मला उल्लेखनीय वाटतं ते यावर ती म्हणते 

As kids, I don't think we heard those taunts as racist remarks. They were just taunts. Those kids were just being mean. If Venus and I had been more typical California golden girls,these kids might have called us Blondie One and Blondie Two. We were just different;that's how I took it at the time.But may be Tunde heard these remarks differently and that's why she chased these boys down.   

त्यावेळी तिची आई नर्स म्हणून काम करी तर बाबांची स्वतःची सेक्युरिटी फर्म होती. आई बाबांनी आपल्या आपल्या कामातून विशेषतः बाबांना त्यांच्या कामाच्या वेळा थोड्याफार बदलून मुलींवर केलेली मेहनत पुस्तक वाचताना जागोजागी दिसून येते. 

तिच्यापेक्षा थोड्याच मोठ्या, तिच्यायचं शब्दात सांगायचं तर "One year, three months and Nine days. Thats the age difference between me and Venus. These days,it doesn't seem like much, but when we were kids it felt like I'd never fill the gap." या दोन बहिणींमधली चुरस आणि प्रेम याची एकाचवेळी होणारी घालमेल सरीनाने अनेक प्रसंगातून डोळ्यासमोर उभी केली आहे. विशेषतः तिने विनसला हरवताना तिचं एक खेळाडू आणि मग नंतर लाडकी बहिण म्हणून  स्वतःच्या मनाशी होणारे संवाद. विनसमुळे  जरी सुरुवातीला तिला तो फोकस, ते लक्ष मिळालं नाही तरी विनस नसती तर आपला आताचा खेळ नसता हेही ती खुल्या दिलाने मान्य करते. Me and V असा एक संपूर्ण लेख या दोघींबद्दल लिहून जणूकाही वाचकांची मागणी पूर्ण केली आहे. 

त्याचप्रमाणे एक लेख आहे तो त्यांच्या २००१ च्या Indian Wells ला खेळल्या गेलेल्या ATP tournamment बद्द्ल.तेव्हा खर या दोघी तशा लहान म्हणजे एकोणीस विशीतल्या. त्यामुळे अजून खेळाडू म्हणून आपल्याला असणारे हक्क वगैरेमध्ये फारशा न मुरलेल्या. नेमक्या एका सामन्यात विनसला दुखापत होते आणि पुढच्या सेमीफायनलमध्ये तिला खेळता येणार नसतं. पण जेव्हा या दोघींची नुकतीच हवा सुरु असते आणि दोघी आपापल्या गटात जिंकल्या तर आमनेसामने होणारी संधी संयोजक सोडणार नसतात. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ते तिला भरीस घालतात आणि सामना सुरु होण्याच्या अगदी पाचेक मिनिटं आधी विनस सामना सोडतेय असं कळल्यामुळे प्रेक्षक नाराज होतात. त्याचा परिणाम म्हणजे नंतरची सरीना आणि किम क्लायस्टर्सच्या सामन्याच्यावेळेस प्रेक्षक तो राग सरीनावर काढतात. म्हणजे अगदी सामना सुरु व्ह्यायच्या आधी किमसाठी ते उभे वगैरे राहतात आणि सरीनाची माहिती सांगत असताना तिची हुर्यो उडवणे अशा सलामीने सामना सुरु होतो. सरीना म्हणते हा सामना खर किम आणि मी नसून प्रेक्षक विरुद्ध मी. आणि फक्त हुर्यो म्हणजे "बू" करणे नाही तर सगळ्या जगात निषिद्ध मानलेल्या शब्दाचा कोरस "निगर" . इतक्या दडपण आणि हुल्लडीमध्ये तिने हा सामना ४-६,६-४,६-२ ने जिंकून सगळी तोंडं गप्प केली. त्या सगळ्या विखारातही मध्ये एका आवाजाने तिला साद घातली होती "Come on, Serena!" ती ते विसरू शकत नाही. या सामन्याचा आंखो देखा हाल लिहिताना ती अखेरीस लिहिते की अशा मानहानीपुर्वक प्रसंगानंतर मी आणि V पुन्हा कधीच इंडिअन वेल्सला गेलो नाही आणि जाणारही नाही. गम्मत म्हणजे दरवर्षी पत्रकार तिला विचारतात आणि प्रत्येकवेळी तिचं तेच उत्तर असतं. 

No I won't go back. I will not give this people the validation. I will not stand down. It's a point of pride. I don't care what these folks say about me, about how I'm vindictive or stubborn or reading too much into the situation. I actually heard that one, early on,from some official. Remember, I was there. I was the target. I know what I know. All I have to do is set a positive example.

माझ्यापुरता सांगायचं तर गेली कित्येक वर्षे या स्पर्धा पाहताना मला सरीना नेहमी आक्रमक, फायरी आणि थोडक्यात "माज असलेली" वाटून मी कधी प्रेक्षक म्हणून तिला पाठिंबा दिला नाही. ती जिंकली, तरी नाही. पण हा वर उल्लेखलेल्या प्रसंगात मला तिच्या आक्रमकतेचं बीज दिसलं आणि इथून पुढे तिच्या खेळाकडे पाहायचा माझा दृष्टीकोण बदलला. कदाचित ती चीड, ते एक प्रकारचं वर्णभेदाचं ragging तिला आयुष्यभरासाठी झोंबलं असेल, त्या प्रसंगामुळे ती बदलली असेल आणि तिची मुळात आक्रमक दिसणारी शरीरयष्टी त्यात आणि भर घालत असेल. तसंही काही वर्षांपूर्वी कोच बदलल्यानंतरची सरीना बरीच मवाळ आणि प्रत्येक गुणावर जोरदार प्रतिक्रिया देण्यापेक्षा विचारी झाली आहे असे मला तरी वाटतेय. हे पुस्तकदेखील मी त्यामुळेच घेतलं. अर्थात त्यामानाने हे आत्मचरित्र लिहायला तिने घाई केली आहे कारण हे पुस्तक प्रसिध्द झाल्यानंतर तिने आणखी स्पर्धा जिंकल्या आहेत. या पुस्तकापेक्षा आताची सरीना फार वेगळी वाटते. 

पुस्तकात पुढे  तिने तिच्या येशु ख्रिस्तावरचा विश्वास आणि त्यावर एक मोठा (माझ्यासाठी कंटाळवाणा) धडा लिहिला आहे त्याची तशी गरज नव्हती पण तिला वाटली असावी. मग त्या बहिणींनी एकत्र फ्लोरिडाला राहणं, तिच्या आईवडिलांचा घटस्फोट, तिचा स्वतःचा पहिला ब्रेक ऑफ वगैरे घरगुती उल्लेख शिवाय तिने आफ्रिकेमध्ये केलेली मदतीची कामं आणि त्यानिमित्ताने झालेली नेल्सन मंडेला यांच्याबरोबरची पंधरा मिनिटांची अमुल्य  भेट हेही प्रसंग आहेत. सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे तिच्या लाडक्या मोठ्या बहिणीचा (वर एकदा उल्लेख झालेली Tunde) एल ए मध्ये स्वतःच्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना त्याचं दुसऱ्या कुणाबरोबर भांडण झाल्यामुळे झालेल्या गोळीबारात झालेला मृत्यू. चुकीच्या वेळी तिचं चुकीच्या माणसाबरोबर असणं तिचा जीव घेऊन गेलं आणि तिच्या पाठी हिचा छोटा भाचा आणि सगळे  दु:खात.   

सरीनाला सामना सुरु असताना तिच्या match book मध्ये काही तरी लिहायची सवय आहे. संपूर्ण पुस्तकात अशा बऱ्याच entries आहेत. एक धडा तर तिच्या २००८ च्या युस ओपनच्या जर्नलवर आहे. आपण जर टेनीस आवडीने पाहत असाल तर हे डीटेल्स वाचायला नक्की आवडतील. तिच्या वानगीदाखल काही entries पहा 

Breathe. Remember, there are so many more important things. This is so small. 

Believe it, Act it. Become it. 

Hold serve,hold serve,hold serve. Focus,focus,focus. Be confident.be confident.be confident. Hold,hold,hold,Move up. Attack. Kill, Smile. Hold!!!

तसं पाहिलं तर साहित्याच्या किंवा आत्मचरित्र या प्रकारात कुठेही ठसा उमटवणारं हे पुस्तक नाही. त्यासाठीचे सगळे मार्क मी अजूनही आन्द्रेच्या "ओपन"ला देईन. तरी देखील हे पुस्तक मी वाचलं, हे मला आवडलं कारण मला यातून सरीनाद्वारे काळ्या लोकांना अजूनही किती वर्णद्वेषाला सामोरं जावं लागतं हे कळलं. तिच्यासारखे सगळेच स्वतःला वेगळं सिद्ध करू शकत नसतील पण तिनं ते केलं. स्वतःचा स्वभाव अतिशय चांगला आहे अशा बतावण्या तिने या पुस्तकात केल्या नाहीएत. किंबहुना लहानपणापासून मी अतिशय चुरसी आणि जमल्यास चीटिंग करूनही जिंकावं, लहान असल्यामुळे बहिणीवर कुरघोडी करता यावी असं वाटायचं हे सुरुवातीलाच दाखले देऊन प्रांजळपणे कबुल केले आहे. आणि मांडलेल्या प्रसंगातून कुठेही स्वतःला किंवा कुटुंबाला सहानुभूती मिळावी म्हणून लिहिले आहेत असं देखील वाटत नाही. पण तिने स्वतःला ठरवून वलयात ठेवलं त्यासाठी कष्ट केलेत  आणि त्या कष्टाचं फळ तिचं तिने मिळवलं आहे, प्रतिकूल परिस्थितीत सुरुवात होऊन. 

टेनिस खेळताना सर्विस करताना खेळाडू सीमारेषेवर जातात आणि मग खेळ बहरेल तसं प्रसंगी पुढेही येतात. पण खरा लढा असतो तो रेषेवरून चेंडू समोरच्याला सहजगत्या मारता येणार नाही अशा जागी टोलवायचा. परवाच्या त्या सुप्रसिद्ध १८ व्या जेतेपदाच्या विजेत्या चेंडूने सरीनाकडची ही सीमारेषा पार केली आणि ती आनंदाश्रू न आवरल्याने तिथेच कोसळली. रेषेवरचा तिचा आतापर्यंतचा लढा तेव्हा तिला आठवला असेल का?




सरीनाचं तिच्या १८ व्या जेतेपदाबद्द्ल खास अभिनंदन !!!

Wednesday, May 15, 2013

रुपेरी पडद्यामागचं आत्मकथन अर्थात Diary of A Stage Mother's Daughter


मेलिसा फ़्रान्सिस, ऐंशीच्या दशकातली एक बालअभिनेत्री. अगदी लहानपणापासून जाहिराती,इतर छोटी मोठी कामं करता करता, वयाच्या आठव्या वर्षी Little House on the Prairie या तेव्हा गाजलेल्या सोप ऑपरामध्ये तिला काम मिळतं आणि तिनं काम करणं हे एक प्रकारे तिच्या आईची मानसिक (आणि कदाचीत आर्थिक) गरज बनते हे एक प्रकारे अधोरेखित होतं. तिच्या आईचं तिने  बालअभिनेत्री व्हायचं करियर सांभाळताना मेलिसाची झालेली कुतरओढ, जोडीला तिच्या मोठ्या बहिणीच्या आयुष्याची परवड, हे सगळं हताशपणे पाहणारे तिचे बाबा, आणि अर्थात या सर्वांवर मेलोड्रामाटिक वागणूकीने अंश ठेवणारी तिची आई, हे सगळं मोजक्या प्रसंगात आपल्यासमोर उभं करणारं एक आत्मकथन म्हणजे Diary of A Stage Mothers Daughter.  


हे पुस्तक सुरू होतं तिच्या आठवणीतल्या एका प्रसंगाने. तिच्या लहरी आईने तिला एका रस्त्यावर गाडीतून सोडून दिलं असतं आणि मग हट्टाने ती आई परत आलेल्या गाडीला दिसू नये अशी लपून बसते आणि अखेरीस चालत घरी जाते. मेलिसा, तिची मोठी बहिण टिफ़नी आणि तिचे आई-बाबा या लॉस एंजेलिसजवळच्या एका गावात राहणार्‍या या वरकरणी सगळं ठीक सुरू आहे असं दिसणार्‍या कुटुंबात लहरी स्वभावाची आई म्हणजे या कुटुंबालाच लागलेली एक कीड आहे असं या पुस्तकात आलेल्या बर्‍याच प्रसंगातून एकंदरित वाटतं.

मेलिसा निदान तिला एक मोठी सिरीज मिळाल्यामुळे बहुतेक आईच्या प्रेमाला थोडीफ़ार पात्र असते पण त्याचवेळी ऍक्टिंगमधून एक्झिट घेणारी तिची मोठी बहीण टिफ़नी मात्र आईसाठी अस्तित्वातच नसते.कुठल्यातरी डिप्रेशनमध्ये घरातल्या कुठल्याही कामात लक्ष न दिसणारी ही आई काहीवेळा आपल्या मुलींना शाळेतून परत आणायला जायला विसरते काय किंवा कारपुलसाठी स्वतःची वेळ असेल तेव्हा उशीराने पोहोचून इतर मुलांनाही उशीर करते, घरात बरेचदा नीट ग्रोसरी पण आणलेली नसते, घर साफ़ ठेवलेलं नसतं आणि ते साफ़ करून मैत्रीणीला घरी खेळायला बोलावणार्‍या मेलिसाला तू परस्पर असं कसं मैत्रीणींना बोलवू शकतेस असं सांगणारी आई, असे बरेच प्रसंग एकामागोमाग एक येतच जातात. 

This was half of my life. When we were at home, my sister and I lived in a state of constant wariness, always reading my Mom's mood and bracing for impact when that mood turned ominous. We were treated to riding lessons, skating lessons, the best school my parents could afford. But her vigilance was also a leash, one she could pull tight enough to strangle. 

हे एक टोक आणि मग दुसरं मेलिसाबरोबरचं तिच्या ऑडिशन्स, शुटिंगच्या वेळेसचं आईबरोबरचं तिचं टिमिंग याचे चांगल्या दृष्टीचेही उल्लेख आहेत. तिला लिटिल हाउसमध्ये काम मिळणं आणि एकंदरित तो काळ तिच्या आईच्याही भरभराटीचा. फ़क्त प्रत्येक चांगल्या गोष्टीचं श्रेय स्वतःकडे कसं ठेवता येईल हे पाहताना ही नक्की यांची आईच आहे का हा प्रश्न पडावा. त्यातही चुकीच्या मार्गावर जाणार्‍या टिफ़नीला आई म्हणून कुठलाच आधार तिने देऊ नये हेही मोठं कोडंच. 

साधारण कळत्या वयात म्हणजे हिशेब वगैरेचं कळायला लागल्यावर मेलिसा आपल्या आईला आपल्यासाठी ठेवलेल्या खात्यात किती पैसे असतील असं आईला विचारते. त्यावेळचा तिच्या आईचा त्रागा म्हणजे हद्द आहे. म्हणजे मुलांना महागड्या वस्तू, प्रायव्हेट शाळा हे सगळं पुरवायला त्यांनीच कमवायला लागणं आणि वर हे सगळं तुला मिळावं म्हणून मीच प्रयत्न करतेय. मी माझं करियर न करता फ़क्त तुला ऑडिशन्ससाठी फ़िरवतेय वगैरे वगैरे ऐकवणं म्हणजे पराकोटीची हद्द आहे. तोवर मेलिसाला कॉलेज करायचं असतं आणि त्याला पैसे लागणार हे माहित असतं त्यामुळे आईच्या नकळत ती कामं करून आलेले काही चेक्स एका वेगळ्या अकाउन्टला ठेवून तिला स्टॅनफ़र्डच्या समर प्रोगामसाठी ऍडमिशन मिळाल्याचं घरात सांगते आणि त्यावेळी आईचं पहिलं वाक्य असतं हे तू कसं काय ठरवलंस? आणि मुख्य स्टॅनफ़र्डसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. तुला तर अजून काम करायचंय. म्हणजे मुलीने काय करायचं, रुपेरी पडद्यावर राहायचं की नाही हे आई ठरवणार आणि तिने लहानपणापासून केलेल्या मेहनतीचं चीज तिला नाहीत.अर्थात मेलिसाला माहित असतं हे असंच होणार म्हणून ती देखील म्हणते माझ्याकडे तेवढे पैसे आहेत मग पुन्हा तमाशा, त्या बॅंकेला जाऊन धमकावणं की तुम्ही मुलांचे पालक नसताना असं अकाउंट कसं उघडू दिलं इ.इ. 

well that account was closed and she did not even have a gun.

इथून पुढे मग मेलिसाला हार्वडला ऍडमिशन मिळणं, तिचं लग्न, त्यावेळी तिच्या सासरकडच्यांना (ते सदर्न आणि हे वेस्टर्न अमेरिकेतले म्हणून) आईने कसं वागवणं आणि तोवर पूर्ण वाया गेलेल्या टिफ़नीचं लग्नात दारू पिऊन बेताल वागणं सारंच वाचायचं म्हणजे हे पुस्तक एकदा घेतलं की खाली ठेवताच येणार नाही.

हे सगळं जसं घडलं असावं तसं कमीत कमी प्रसंगातून आपल्यासमोर उभं करायचं मेलिसाचं लेखनकौशल्य कमाल आहे. तिचं लहानपण, कलाकार म्हणून सेटवरचे अनुभव, कॉलेजमधले प्रसंग, तिच्या आयुष्यात आलेली मुलं आणि तिच्यापाठी उभा असलेला तिचा नवरा, त्या दोघांचं भेटणं हे सगळं तिच्याच शब्दात वाचायला हवं. 

जाता जाता एक सांगितल्याशिवाय राहावत नाही. तिचं तिच्या बहिणीबद्दलचं प्रेम आणि आपण काही करू शकलो नाही याची तिची खंत जितकी जाणवते तितकीच जाणवते स्वतःच्या स्वार्थापोटी सगळ्याच कुटुंबाचं नुकसान करणारी तिचीच आई. स्वतःच्या आईबद्दलचे हे प्रसंग अशा प्रकारे लिहायलाही धैर्य लागतं. शेवटी शेवटी आईच्या थेरपीज आणि टिफ़नीच्या बाय पोलर डिसॉर्डरवर होणारा खर्च, शिवाय आईने घर सजवायला म्हणून घेतलेल्या महागड्या वस्तुंची बिलं हे सर्व खर्च करून जेरीला आलेले तिचे बाबा मेलिसाला घरातली सत्य परिस्थिती सांगतात (तेव्हा तिचं लग्न होऊन ती काही वर्षे सॅन फ़्रॅन्सिस्कोला आली असते). तिच्याबरोबर आपलंही डोकं सुन्न होतं. मग घर विकायचं ठरतं तशी तिची आई, बाबा आणि टिफ़नीला जणू वार्‍यावरच सोडते. नेमकं ज्यादिवशी मेलिसा आपल्या नवर्‍याच्या तिसाव्या वाढदिवसाची पार्टी ऍरेंज करत असते तेव्हाच त्या विकायला लागणा‍र्‍या घराचं कागदपत्री कामं वगैरे आहेत असं सांगून बाबा येत नाहीत. पण ही आई मात्र येते आणि पुन्हा एकदा तिच्या सासरच्यांकडे दुर्लक्ष करून जाते. काही दिवसांनी तिला टिफ़नी आणि बाबा भेटतात तेव्हा तिला कळतं की त्या पार्टीला यायच्या आधी आई त्या विकलेल्या घरातून, इतरांची देणी-बिणी देऊन उरलेले सगळे पैसे परस्पर चेक वटवून आणि बाबांच्या धंद्याच्या अकांउन्टमधलेही सगळे पैसे काढून आलेली असते. थोडक्यात स्वतःकडे फ़क्त पैसा ठेऊन रक्ताची नाती तोडून ही इकडे पार्टीमध्ये मजेत वावरून गेलेली असते. 

हे सांगताना टिफ़नी आणखी काहीतरी सांगते जे काळजाला घर पाडतं.
You know, I was lying in the hospital last time and in the middle of the night I was just in so much pain. And ...so scared. All I could think was, it would be so nice to have a mom.

त्यानंतर मात्र मेलिसाने आतापर्यंत स्वतःला सांभाळलेलं असतं ते सारं तुटतं आणि ती आईला फ़ोन करून आपला संबंध संपल्याचं कळवते. त्यानंतर काही दिवसांनी डॉट कॉमचा बबल फ़ुटल्यामुळे मेलिसाची नोकरी दोलायमान होते . ती आणि तिचा नवराही आपापल्या नोकर्‍या सांभाळायच्या की मेलिसाला न्यु-यॉर्कमध्ये न्युजलाइनमध्ये करियर करायचं असतं ते बरं पडेल या विचारात परत इस्ट कोस्टला जायचा निर्णय घेतात. त्याच दरम्यान आजाराने टिफ़नी जाते. मेलिसाला तिचं it would be so nice to have a mom हे वाक्य सारखं आठवत राहातं. आपल्या बहिणीसाठी आपण फ़ार काही करू शकलो नाही हेही तिच्या लिखाणात जाणवतं. 

एका अतिमहत्वाकांक्षी आईने आपल्याच मुलांचं केलेलं नुकसान. मेलिसाने खरं तर स्वतःच स्वतःचं आयुष्य घडवलं. ती सीएनबीसीच्या power lunch, The Call, On the Money अशा कार्यक्रमाची निवेदक होती. तसंच सध्या ती फ़ॉक्स बिझनेस नेटवर्कवर Money with Melisa Francis हा बिझनेस शो करते. आपल्या दोन मुलांसह न्यु यॉर्कमध्ये राहणारी मेलिसा स्वतः आई झाल्यावर आपल्या आईकडून आईने कसं असू नये हा धडा शिकल्याचं आवर्जून लिहिते.

तळटीप

हातात धरल्यावर खाली ठेवता येणार नाही असं एखादं पुस्तक मी बर्‍याच दिवसांनी वाचलं आणि त्याबद्दल थोडं लिहावं असं वाटलं.शेवटच्या काही घटनांचा उल्लेख केला नाही तर ही पोस्ट पूर्ण होणार नाही असं वाटलं म्हणून ते लिहिलं. हा ब्लॉग वाचणार्‍या प्रत्येकाला लगेच हे पुस्तक वाचायला मिळेलच असं नाही म्हणून तो उल्लेख गैर नसावा असं वाटतं.
सध्या एकंदरित सगळीकडे आपल्या मुलांना रुपेरी पडद्यावर येनकेन प्रकरणे झळकावं असं वाटायची एक लाट आली आहे. त्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक बर्‍याच पालकांच्या डोळ्यात अंजन घालेल अशी अपेक्षा. आपल्या मुलांनी रुपेरी पडद्यावर यशस्वी व्हावं आणि तिथेच त्यांनी करियर करावं म्हणजे आपल्यालाही इतर पालकांपुढे शेखी मिरवता येईल, पण हे पालकांचं वेड मुलांना आणि पूर्ण कुटुंबाला रसातळाला नेऊ शकेल हे कुणी प्रत्यक्ष अनुभवलं असेल तर ते मेलिसा आणि अर्थात तिच्या बहिणीने. त्यातल्या मेलिसाने ग्लॅमरसोबत वाहावत न जाता स्टॅनफ़र्ड आणि हार्वर्डसारख्या ठिकाणी आपली पात्रता सिद्ध करून यशस्वी होऊन दाखवलं.त्यासाठी आणि हे सगळं या पुस्तकात इतक्या नेमक्या शब्दात ते सत्य मांडायचं धाडस करणार्‍या मेलिसाचं कौतुक करायलाच हवं. 

Friday, February 8, 2013

एका तपस्विनीसोबतचे दोन तास - गप्पा "रेणू गावस्करां"सोबत

यावेळच्या मायदेश दौर्‍यातला योगायोग म्हणजे माझं तिथे पोहोचण्याच्या आठवड्यात सुरू झालेला "शब्दगप्पां"चा भरगच्च कार्यक्रम. शिवाय माझं स्वतःचं बोरिवलीतलं घर त्यांच्या पेंडॉलपासून चालत पाच मिनिटांवर. त्यामुळे नक्की जायचं असा विचार करून मी यावेळी जेटलॅगदेवाची रोज संध्याकाळी प्रार्थना करत होते. यातला मी पोहोचले त्यानंतरचा पहिला कार्यक्रम होता रेणू गावस्करांशी गप्पांचा. तोवर मी हे नाव फ़क्त वृत्तपत्रांत वाचलं होतं आणि अगदी प्रांजळपणे सांगायचं तर मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नव्हतं.सुदैवाने मुले गाढ झोपली होती आणि मी जागी राहू शकत होते. शिवाय तिथेच शब्दचं पुस्तकप्रदर्शन सुरू होतं तेव्हा मी अगदी वेळेवर तिथे जाऊन पोहोचले.
मला पुस्तक पाहायची होती म्हणून मी जिथे मुलाखत सुरू होती तिथे अगदी आयत्यावेळी जाऊया असं ठरवून रेंगाळत होते, तोवर एका अतिशय गोड आवाजाने एका अतिशय गंभीर घटनेबद्दल बोलायला सुरूवात केली. त्यादिवशी "निर्भया" गेल्याची बातमी आली होती आणि दिवसभर जीवाला लागलेली हुरहुर त्यांनी मांडलेल्या श्रद्धांजलीने लागलेल्या धारा हळूच टिपताना शेवटच्या रांगांवर मी जाऊन बसले. त्यानंतरचे दोन तास त्यांनी  "संज्योत" (अनिल अवचटांची कन्या) हिच्याबरोबर मारलेल्या गप्पा म्हणजे माझ्यासाठी एका तपस्विनीच्या उलगडेलल्या कार्याचा निव्वळ परिचय नव्हता तर दुसर्‍यासाठी जीवन वेचताना आपण इतकं मोठं कार्य करतोय याची समोरच्याला जाणीव होऊ न देण्याची त्यांची सहजता, त्यांना आलेले  अनुभव श्रोत्यांपुढे मांडतानाची त्यांनी ओघवती शैली, त्या कधी मनात जाऊन बसल्या कळलंच नाही.
माटुंग्याच्या डेव्हिड ससून या लहान मुलांच्या रिमांडहोममधल्या मुलांच्या खिडकीतून मारलेल्या हाकांना उत्तर देऊन अशा मुलांच्या मानसिक/शैक्षणिक जडणघडणीसाठी त्यांनी कार्य सुरू केलं. ते पुढं नेत असताना वेश्याव्यवसायातल्या स्त्रिया आणि त्यांची मुलं यांच्यासाठीही त्या कार्य करत आहेत. आधी मुंबईत सुरू केलेलं हे कार्य सध्या त्या पुण्यातून करतात. पुण्याला त्यांनी रस्त्यावर भीक मागणार्‍या किंवा छोट्यामोठ्या वस्तू विकणार्‍या मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाऊ नये म्हणून एक शाळाही सुरू केली आहे, जिथे अशा मुलांना रस्त्यावरुन शाळेत आणले जाते आणि त्यांनी पुढे जाऊन आपल्या पायावर उभं राहावं यादृष्टीने प्रयत्न केले जातात. त्यांच्या "no kids on street" योजनेअंतर्गत त्यांनी पाच मुलांपासून सुरू केलेल्या या शाळेची सध्याची पटसंख्या ऐंशीच्या आसपास आहे.
या दोन तासाच्या मुलाखतीत रेणूताईंनी अगदी सुरूवातीपासून ते त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला.त्यांची मैत्रीण तसंच त्यांच्याबरोबर कामाशी संबंधीत असणार्‍या संज्योत यांचा त्यांना बोलकं करण्यातला सहभागही तितकाच महत्वाचा. मला स्वतःला जाणवलं ते म्हणजे एक समाज म्हणून ही मुलं किंवा वर उल्लेखलेल्या स्त्रिया आणि त्यांची मुलं यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणं ही मोठी गरज आहे. फ़क्त त्यांच्यासारख्या समाजसेविकांवर किंवा संस्थांवर त्याची जबाबदारी देऊन हे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. 

दुसरं त्यांनी सांगितलेलं म्हणजे सध्या त्यांच्या पुण्याच्या संस्थेत वॉलंटियर म्हणून कॉलेजमधले विद्यार्थी येतात ही जमेची बाजू असली तरी या येण्यात सातत्य किंवा कमिटमेंट नाही. तिथे असणार्‍या मुलांना कुठेतरी आपल्याला भेटायला येणार्‍या व्यक्तिने नियमित असावं असं वाटणं साहजिक आहे नाहीतर येणारी निराशा आणि आधीच माणसांचे वाईट अनुभव आले असतील त्यात ही भर. त्यामुळे अशा वॉलंटियर्सनी किमान एक वर्षासाठीतरी वेळ काढावा असं एक प्रांजळ आवाहन त्यांनी केलं होतं.
कार्यक्रमानंतर त्यांच्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी घेताना त्यांच्या गोड आवाजात त्यांचं संस्थेला भेट द्यायची असेल तर नक्की या. आपण तिथे सविस्तर बोलू अशा संवादानंतर माझ्या पुणा भेटीत मी हे ठिकाण नक्की जायचं ठेवलं होतं पण काही वैयक्तिक कारणामुळे मला नंतर मुंबई सोडून कुठेच जाता आलं नाही ती खंत ही एक पोस्ट लिहून मी व्यक्त करतेय असं समजलं तरी चालेल.
आता वर उल्लेखलेली ही मुलं कोण असतील, त्यांना रेणूताईंनी कुठल्या गोष्टी सांगितल्या असतील आणि रेणूताईंच्या संपर्कात आलेल्या स्त्रिया आणि त्यांचे अनुभव याविषयी या मुलाखतीत ऐकलेलं आणि न ऐकलेलं असं सगळं तीन पुस्तकांच्या संग्रहात रेणूताईंच्याच गोष्टीवेल्हाळ भाषेत मांडलं आहे. त्यांच्या आठवणींचा ठेवा आपल्या मनातही सेवेचं बीज नक्की पेरून जातो."शब्द" प्रकाशननेच ही पुस्तकं प्रकाशीत करून आणि अशा प्रकारच्या गप्पांच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला जवळून भेटण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके कमीच.
ही तीन पुस्तकं आहेत "आमचा काय गुन्हा", "झुंज" आणि "गोष्टी जन्मांतरीच्या". नक्की वाचा.
 

प्रेक्षकांनी विचारल्या प्रश्नांत त्यांना कार्य करत असताना येणार्‍या अपयशाविषयी विचारलं.ही व्यक्ती स्वतः मुंबईत अशाच एका संस्थेसाठी कार्य करत होती.त्यांचा अनुभव होता की बर्‍याच स्त्रीया पुन्हा स्वतःच या मार्गाला जातात. त्याला त्यांचं उत्तर होतं "असे बदल होण्यासाठी काळ जावा लागतो. या काळाची व्याख्या प्रत्येक घटनेसाठी वेगळी असू शकेल." आपण आपलं कुठे चुकलं ते शोधून निरंतर काम करायच्या त्यांच्या या वृत्तीला माझा मनापासून सलाम.

Tuesday, October 23, 2012

तिचं हरवलेलं आयुष्य अर्थात a Stolen Life


पाचवीत असणार्‍या जेसीला साउथ लेक टाहोमधल्या आपल्या घरातून शाळेत जायचा रस्ता ओलांडताना फ़िलीप आणि त्याच्या बायकोने उचललं. त्यानंतरची एकोणीस वर्षे म्हणजे वय वर्षे ११ ते ३०, आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा, मोठं व्हायचा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन पुढचं जीवन समृद्ध करायचा काळ तिला त्याच्या घरामागच्या अंगणात एका छोट्या तंबुवजा घरात काढावा लागला. या काळात तिला दोन मुलीही झाल्या. तिची आत्ता म्हणजे २०१० मध्ये सुटका झाल्यानंतर, लिहिलेल्या "अ स्टोलन लाइफ़" या पुस्तकात जेसी डुगार्डने ही व्यथा मांडली आहे.

हे पुस्तक वाचताना ती पाचवीतली मुलगी सारखी डोळ्यासमोर येते. तिचं लौकिक शिक्षण पाचवीच्या पुढे झालंच नाही हे तिच्या भाषेवरून कळतं. वाचताना तिचे शब्द, तिचं असणं त्याच वयात थिजल्याचा भास होतो. फ़िलिप तिच्याशी जसा वागला त्यातले ठळक प्रसंग मांडताना आता तिला काय वाटतं (reflection) याबद्दलही थोडं अशी ठळक प्रकरणं आणि मध्ये तिने चोरून लिहिलेल्या डायरीची पानातले उतारे अशी साधारण मांडणी आहे. तिच्याच शब्दात सांगायचं तर हे पुस्तक खूप विस्कळीत होणार याची जाणीव असतानाही ते तसंच केलंय..अत्याचाराच्या परिसीमेची एकोणीस वर्षे पुस्तकाच्या अमुक एक पानात मांडायची आणि खरं तर ते लिहिण्यासाठी पुन्हा आठवायचं, त्याच त्रासातून परत गेल्यासारखंच नाही का?

हा फ़िलिप दुसर्‍या कुठल्यातरी बलात्काराच्या आणि ड्र्गजच्या खटल्यामुळे खरं तर पॅरोलवर होता. त्याला नेहमी पोलीस स्टेशनात जावं लागणं, तुरूंगवास, पोलीसांचा घरी चेक अप इ.इ. सगळ्याचं रूटीन असताना आणि अमेरीकेसारख्या देशात अशा गुन्हेगाराने एकोणीस वर्षे एखाद्या मुलीला घरी डांबून ठेवलंय हे पोलिसांना न कळणं हे माझ्यासाठी थोडं न पटण्यासारखं आहे.म्हणजे अशा देशांतही कायदा हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतोच असं नाही, असंच म्हणायचं का? 

आणखी एक न पटणारी गोष्ट म्हणजे हा फ़िलिप जर ड्रग्ज आणि मनोरूग्ण (सेक्सॉहॉलिक) म्हटला तरी हे कृत्य करताना त्याची बायको त्याच्यासोबत आहे. एक स्त्री म्हणून तिला कधीच जेसीला सोडवावसं वाटलं नाही का? की ती पण ड्रग्ज घ्यायची म्हणून तिची मती गूंग झाली असं समजायचं, का तिला फ़िलिपने आणखी  कुठलं भय घालून ठेवलंय? की तिला स्वतःला मूल झालं नाहीये म्हणून हिच्याकडून मूल हवंय?एक स्त्री म्हणून या प्रसंगाकडे पाहताना खरंच पुरूषांची शारीरीक ताकत हीच त्यांची मोठी शक्ती ठरते का असंही वाटतं. कारण एक अकरा वर्षांची मुलगी तिच्यासमोर एक बंदूक घेऊन बसलेल्या माणसापुढे आणि त्याच्या एका हाताच्या फ़टक्यासरशी पडणारं शरीर सांभाळून पळणार तरी कशी? 

मुलं होणं ही बायकांचीच मक्तेदारी (?) असल्याने अशा अत्याचाराच्या प्रकरणात पदरात मूल आलं की आधीच आपलं नाव हरवून बसलेली जेसी कुठे जाणार? त्यांचं पालनपोषण करण्यासाठी लागणारी शक्ती गोळा करण्यापुरतातरी तिला अशाच नराधमाबरोबर राहावं लागणार, नाही का? त्यात ही तर बंदीवानच. हे पुस्तक वाचताना निव्वळ तिने हे पुस्तक लिहिलंय म्हणून या अत्याचाराचा शेवट असेल अशी आशा वाटते नाहीतर हे असंच सुरू राहील आणि दुसरीकडे कुठेतरी आशा लावून बसलेली जेसीची आई आणि इथे जेसी यांची आयुष्य अशीच संपतील असं सारखं वाटतं. पण भगवान के घर असणारी देर कधीतरी हा अंधेरा दूर करते आणि एका पॅरोलच्या व्हिसिटमध्ये काही एजंट्सना संशय येऊन शेवटी जेसी आणि तिच्या दोन मुली यांची या नराधमाच्या तावडीतून सुटका होते. फ़िलिपने तिला खरं तर लहानपणापासून तिला इतकं घाबरवलेलं असतं की या एजंट्सनाही ती स्वतःविषयी खरं सांगायला सुरूवातीला ती कचरते आणि फ़िलिपलाच कव्हर करण्याचा प्रयत्न करते. अखेरीस एक एकोणीस वर्षे लपवून ठेवलेलं सत्य बाहेर येतं आणि फ़िलिप आणि त्याच्या बायकोवर खटला सुरू होतो. तो मला वाटतं अजूनही सुरू आहे किंवा बहुतेक त्याला शिक्षा झाली असावी. 

हे हरवलेलं आयुष्य जेसीला परत मिळणार नाहीच आहे त्यामुळे ही सुटका म्हणायची की आता पुन्हा एकदा जगाला स्वतःच्या नावाने सामोरं जायची नवी शिक्षा? आपल्या मुलींना तिच्या आईबद्दलची माहिती जी मिडीयाच्या धिसाडघाईमुळे बर्‍यापैकी चघळली गेली आहे, त्यामुळे मिळणार्‍या नजरांपासून वाचवायचं हा एक नवाच प्रश्न. शेवटच्या प्रकरणांमध्ये हा सगळ्याच्या मानसिक परिणामामधून बाहेर येण्यासाठी ती घेत असलेल्या कौन्सिलिंग, बाह्य जगातल्या साध्यासाध्या गोष्टी जसं ड्रायव्हिंग,स्वतःच्या खर्‍या नावाने दुकानात जाणं याबद्दलचे तिचे अनुभव आणि एकंदरितच ही घटना वाचताना आपणही सून्न होऊन जातो. 


थोडंसं जेसीच्या पुस्तकाच्या स्टाईलमध्ये लिहायचं तर माझंही हे पुस्तक वाचतानाच्या वेळचं प्रतिबिंब:

"माझं हे पुस्तक वाचून झालंय. तुला हवंय का?"
चार पाच तासाच्या विमान प्रवासात चार शब्द पण नीटसे न बोललेल्या शेजारणीकडून आलेल्या प्रश्नाने खरं तर थोडं आश्र्चर्यच वाटलं. पण नेहमी विमानात वर्तमानपत्र ठेवणारी लोकं असतात असं ही पुस्तक ठेवणारे असं वाटून मी फ़क्त कुठलं पुस्तक आहे त्याबद्दल विचारलं.
तिच्या उत्तराने मागे ऐकलेल्या बातमीची आठवण झाली आणि एक गंभीर विषय वाचणार हे माहित होतं..पण माझ्या पुढच्या प्रवासात दीड तासाच्या पण धावपट्टीवरच पंधरा विमानांच्या मागे उभ्या असलेल्या विमानात द स्टोलन लाइफ़ सुरू केलं आणि नुस्तं गंभीर नाही तर एकाच वेळी तिचं काय होणार याची प्रचंड काळजी, अमेरीकेतल्या पोलीसांच्या निष्काळजीपणाबद्द्ल वाटणारं आश्र्चर्य, एक स्त्री म्हणून भोगायला लागलेल्या शारीरीक छळाबद्दलचा आणि पुरूषांच्या भोगलालसेच्या सीमेची परिसीमा पाहून झालेला संताप आणि हे जीव कळवळायला लावणारं सत्य वाचताना डोळ्यात आलेलं पाणी लपवताना कधी जेसीच्या आयुष्याने माझ्या मनाचा ताबा घेतला कळलंच नाही. खरं तर हे पुस्तक मी त्यादिवशी पूर्ण वाचूच शकले नाही. 
ज्या अत्याचारांना ती एकोणीस वर्षे सामोरी गेली, त्यातूनही काही चांगले व्हावे म्हणून तिने जी जिद्द दाखवली त्याबद्दल कुंपणावरून वाचायचीही माझी हिम्मत होत नव्हती. 
मला हे पुस्तक देऊ करणारी ती बाई आठवली. तिने हे पुस्तक बहुतेक माझ्या पहिल्या फ़्लाईटला सुरू करून वाचून संपवलं. त्या प्रवासात जेव्हा केव्हा आमच्याकडे खाणं किंवा इतर काही कारणांसाठी एअरहोस्टेस आली तेव्हा तेव्हा ही बाई इतकी बावचळलेली असायची की प्रत्येकवेळी तिने मी जे मागवलं तेच मागवलं. थोडक्यात ती प्रचंड अपसेट होती किंवा काहीतरी ठीक नव्हतं असं तेव्हा मला वाटलं होतं. अगदी एक पर्सर आम्ही एक्झिट विंडोला होतो तर आधी उगाच गप्पा मारून आणि नंतर आग्रह करून आम्हाला वाईन हवी का असं चारेक वेळा विचारून गेला तेव्हाही तिने त्याच्याकडे फ़क्त पाहिलं पण पुन्हा पुस्तकात डोकं खुपसून राहिली. तिला ते पुस्तक नुसतंच संपवायचं नव्हतं तर तिला ते बरोबर घेऊनही जायचं नव्हतं. याचा उलगडा मला मी स्वतः हे पुस्तक वाचलं तेव्हा मला आपोआपच झाला. 
माझं विमान पंधरा विमानांच्या पाठी उभं होतं असं कॅप्टनने सांगितलं. नक्की किती वेळ ते तिथे होतं मला काहीच माहित नाही. पण फ़िलिपने पहिल्यांदी जेव्हा तिच्या शरीराचा ताबा घेतला ते वाचून माझ्या आधीच्या सुकलेल्या अश्रुंवर पुन्हा पुन्हा ओघळणारे अश्रु पुसायला मी रुमाल काढायला लागले तोवर आम्ही हवेत होतो आणि माझा शेजारचा मेक्सिकन नशीबाने झोपून गेला होता. ही फ़्लाईट तशी दीडेक तासाचीच होती. मला जाम जड झालेलं पण तरी नेटाने मी वाचत राहिले, तिच्या प्रश्नात आणखी गुंतत गेले.
नंतर मला मिडवेस्टच्या एका भागात विमानतळापासून तासभर ड्राइव्ह करून हॉटेलला पोचायचं होतं. दिवस मावळताना मी कार रेंट करून प्रवास सुरू केला आणि मैलोनमैल पसरलेली मक्याची आणि सोयाबीनची शेतं लागायला लागली. रस्ताला लोकवस्ती आणि दिवे नाहीत आणि माहितीचा रस्ता नाही म्हणून मी अप्पर लावून गाडी हाकत होते. एखादा ट्रक वगैरे अशी अगदीच तुरळक वाहतूक होती आणि माझ्या बर्‍याच वेळाने लक्षात आलं की समोर एक पिक अप ट्रक फ़ार हळू जातोय म्हणून मी त्याला पास करायला गाडी डावीकडे घेतली. त्याने मला पास होऊ दिलं आणि मग मी त्याच्या पुढे आले तशी तो एकदम त्याचा अप्पर माझ्या डोळ्यावर येईल अशा रितीने मला फ़ॉलो करायला लागला. थोडक्यात माझं अप्पर लावून त्याच्यामागे गाडी चालवण्याचं उट्टं काढत होता. 
माझ्या डोक्यात जेसीची घटना इतकी ताजी होती आणि हा सुनसान भाग म्हणजे कदाचित मी ९११ केलं तरी कुणी येईपर्यंत माझं काय होईल या विचाराने मुकाट्याने मी पुढचे काही मैल तो अप्पर सहन करून चालवत राहिले आणि एकदाची एक्झिट घेऊन हॉटेलला पोहोचले. ती अख्खी रात्र मला अजिबात झोप आली नाही. उगाच माझ्या मुलांशी व्हिडीओ चॅट करण्यात मी दोनेक तास घालवले पण जीव रमत नव्हता. त्यानंतर ते ओझं घेऊन काम संपवून घरी आले आणि उरलेलं पुस्तक वाचायला घेतलं. एकेका प्रसंगाने मी मोडून जात होते.मध्ये काही दिवस मला अक्षरशः कुठल्याही पुरुषजातीशी बोलू नये इतकं पराकोटीचं विचित्र वाटायला लागलं होतं. त्याचवेळी देशातल्या एका गॅंगरेपबद्दलची बातमी वाचल्यामुळे माझ्या नवर्‍याला त्यातल्या स्त्रीसाठी कसंतरी वाटतंय असं त्याने मला सांगितलं आणि मी कोसळलेच..त्यालाही या पुस्तकाबद्दल सांगून कितीतरी वेळ आम्ही सून्न बसून होतो. यानंतरही पूर्ण पुस्तक वाचायला मला बरेच दिवस लागले. थोडं थोडं वाचलं की पोटात ढवळून येऊन मी सोडून द्यायचे. तिच्या डायरीचा कित्येक भाग मी वाचलाच नाहीये. I just could not take it. 
  
एक उदा. म्हणून तिच्या मांजरीसाठी एक डायरी लिहिली होती त्या प्रसंगात म्हटलंय,
I remember, I was so proud that I had written this for my kitty and wanted to share it with someone, I showed it to Phillip and he saw that I had put my name in it. He preached to me for I think an hour about how I really didn't want to write my name, and how dangerous that could be if anyone else ever read it. I thought to myself, I never see anyone, though, but I didn't interrupt because it always ended with why he was right and I was wrong. So I tore out the corners with my names and never wrote my real name on anything again until 2009. 


हे पुस्तक माझ्यासाठी स्त्रीअत्याचाराची पराकोटी होती. या चिमुरडीने जे सहन करून त्यातून बाहेर येऊन आज ती तिचं जग उभं करायचा प्रयत्न करतेय ते सगळं या पोस्टमध्ये मांडणं कठीण होणार आहे हे ठाऊक असतानाही मी याविषयी लिहायला सुरूवात करतेय. त्याचं कदाचित एक कारण हे पुस्तक अमेरिकेबाहेर किंवा स्पेसिफ़िकली भारतात येईल का मला माहित नाही. तरीही झालेल्या घटनेची थोडीफ़ार कल्पना आपल्या वाचकांनाही द्यावीशी वाटली. ही पोस्ट प्रचंड विस्कळीत असणार आहे याची खात्री असूनही प्रकाशीत करतेय. 

सध्या नवरात्रीच्या निमित्ताने एकंदरीत "स्त्री शक्ती" हा विषय थोड्या दिवसांसाठी का होईना पण चघळला जाईल. त्याचवेळी मला काही महिन्यांपूर्वी वाचलेलं हे पुस्तक माझ्या मनात घर करून बसलेली जेसीच नाही तर अनेक स्त्रिया आठवतात. म्हणजे पुरूषांची शारिरीक मक्तेदारी आणि त्यांना आमचं आव्हान देणं अशक्य असणं हे सगळं खरं असलं तरी कुठेतरी ती एक सूप्त शक्ती जात्याच प्रत्येक स्त्रीमध्ये निसर्गदत्त आहे. तिचा संयम, तिचं सकारात्मक असणं, या सगळ्याचा कुठेतरी अंत असेल असं स्वतःलाच सांगायची तिची प्रवृत्ती या सर्वांनीच  जगायचं बळ तिला दिलंय..आणि तिची बाळं हेही तिचं बळ असतं. मग ती चाळीत संसार करणारी पण मुलांना शिक्षण देऊन मोठं करुन आता एकटीने अमेरीकेला नातवडांना भेटायला येणारी माझी आई असो की माझ्या मुलीसाठी मी डोंगरही चढेन असं म्हणणारी बेट्टी असो नाहीतर स्वतःच्याच देशात बंदीवान असणारी हाले आणि काही दिवसांपूर्वी पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या तालिबान्यांविरुद्ध लढणारी मलाला. या सार्‍या स्त्रियांप्रमाणेच जेसीने धीर धरुन आलेल्या संकटाला सामोरं जायचं ठरवलं. तिच्या हरवलेल्या जगातलं सगळंच परत मिळणं तर शक्य नाही पण निदान एक माणूस म्हणून जगायचा अधिकार तिला पुन्हा प्राप्त होतोय हेही नसे थोडके.

नवदुर्गेच्या या सणाला अनेक संकटांना सामोरं जाऊन एका नराधमाला अखेरीस कायद्याच्या ताब्यात देऊन आपल्या पिलांसकट स्वतःची सुटका करणार्‍या या मातेला माझा त्रिवार प्रणाम. वाचकांना नवरात्र आणि दसर्‍याच्या माझिया मनातर्फ़े शुभेच्छा. 

तळटीप: या पुस्तकातला बराचसा भाग मी सहन होत नाही म्हणून वाचू शकले नाही आहे. हे पुस्तक कदाचित भारतात उपलब्ध नसेल. माझं वाचून झालेलं पुस्तक जेव्हा मी मायदेशी येईन तेव्हा माझ्या एक मैत्रीणीसाठी घेऊन येणार आहे. कुणालाही तिच्याकडून ते वाचायला हवं असल्यास संपर्क साधून ठेवा.  

Friday, August 24, 2012

खिडकीपासची चिमुरडी "तोत्तोचान"


पहिलीत शिकणारी एक छोटीशी जपानी मुलगी. तिच्या वयाला साजेशी खोडकर बरं का? शाळेच्या वर्गात तास सुरू असताना तिला मध्येच खिडकीतून दिसणारे बॅंडवाले आणि त्यांना हाक मारायची तिची सवय किंवा मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता?" असं विचारणं. परिणाम शाळेतून काढून टाकलं जाणं. कसं होणार आता असा विचार करता करता आपण तिच्याबरोबर पोहोचतो तिच्या नव्या शाळेत. हिची नवीन शाळा म्हणजे "तोमोई" कशी असेल आणि तिथे ही मुलगी नव्याने आपलं शालेय जीवन सुरू करताना आलेले अनुभव कसे असतील या पार्श्वभूमीवर जपानची एक आगळीवेगळी शाळा एक वेगळं विश्व घेऊन आपल्यासमोर येते. मूळ जपानी लेखिका "तेत्सुको कुरोयानागी" ही ती वर उल्लेखलेली पहिलीतली मुलगी "तोत्तोचान" आणि या सुंदर पुस्तकाचा तितकाच ओघवता अनुवाद आपल्यासाठी केलाय "चेतना सरदेशमुख गोसावी" यांनी. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाने केवळ पन्नास रूपयात उपलब्ध करुन दिलेलं हे पुस्तक मूळ लेखिकेने म्हटल्याप्रमाणे अगदी ५ वर्षांच्या मूलांपासून ते १०३ वर्षांच्या लोकांपर्यंत अगदी सर्वांसाठीच आहे. 


पाच वर्षांच्या आपल्या चिमुरडीला नव्या शाळेत नेताना तिच्या आईबरोबर झालेल्या मजेदार संवादांनी हे पुस्तक सुरू होतं. बरं नव्या शाळेचं प्रयोजन अशासाठी की आधीच्या शाळेतून हिला काढून टाकलंय. त्यामुळे आईच्या जीवाची आपल्या मुलीचं कसं होणार याची घालमेल तर लेक मात्र काल गुप्तहेर व्हायचं ठरवलं होतं आणि आज मात्र तिकिट कलेक्टर व्हावं का या गहन विचारात. मध्येच तिच्या सुपीक डोक्यात तिच्या कल्पनेतली तिकिट विकणारी जी खरी गुप्तहेर असेल असं काहीसं झालं तरची कल्पना आणि शाळा यायच्या आधीपर्यंत हे सगळं डोक्यातून जाऊन त्याची जागा "रस्त्यावरून जाहिरात करत जाणारे बॅंडवाले" यांनी घेतलेली असते. हेच ते आधी उल्लेख केलेले बॅंडवाले. या बॅंडवाल्यामुळे खरं तर आईला तिचं आधीच्या शाळेतलं खिडकीतून बॅंडवाल्यांशी बोलणं न आठवलं तर नवलच. त्या शाळेतून काढलेल्या असंख्य कारणांपैकी हेही एकच. आपण तिच्या आईच्या घालमेलीत अडकलो असतानाच तिच्यासारखंच बाकीची छोटी मुलं कसंकसं डोकं चालवत असतील असा विचार करत खुदकन हसतो. वाचता वाचता हळूहळू आपणच तोत्तोचानच्या वयाचे होतो. म्हणजे काय हरकत आहे नं चित्र काढता काढता झेंडा काढायला जागा पुरली नाही कागदावरून डेस्कवरची जागा व्यापली तर किंवा तास सुरू असताना मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता आहात?" म्हणून विचारणं. अगदी प्रत्यक्षात नसेल पण आपण पहिलीच्या वर्गात असताना हे असं सगळं भरकटायचं कदाचीत आपल्याही बाबतीत झालं असेल.

फ़क्त आपण एका टिपिकल शालेय जीवनाचा भाग होऊन राहिल्याने असं स्वच्छंदी मन नंतर कुठेतरी हरवून आपणही "क ला काना का" गिरवीत जे इतरांनी वर्षानुवर्षे शाळेत जाऊन केलं तेच करून नंतर मग तीच ती दहावी आणि पुढचं शिक्षण, नोकरी या चाकोरीत अडकलो असू. तोत्तोचानचं नशीब इतकं की तिला अशा शाळेतून काढून टाकण्यात आलं आणि त्याहीपुढे जाऊन म्हणायचं तर तिच्या देशात अशी एक शाळा होती जिथं पाठ्यपुस्तकमुक्त अभ्यासक्रम ठेऊन मुलांना मुक्त पद्धतीने आणि त्यांचं भावविश्व खुलेल असं वातावरण होतं.

दोन झाडांच्या खांबांचं गेट आणि आगगाडीच्या डब्ब्यांचे वर्ग असणारी शाळा कुणाला आवडणार नाही? शिवाय बाकीच्या शाळांपेक्षा वेगळं म्हणजे इथे दिवसाचे तास विषयावार ठरलेले नसत. सकाळी बाई त्या दिवसात काय काय करायचं त्याची यादी करुन मग मुलंच आपलं आपलं काय करायचं ते ठरवत. त्यामुळे एकाच वेळी कुणी निबंध लिहित असे तर कुणी गणित सोडवी. यामुळे शिक्षकांना मुलांचं निरीक्षण करता यायचं आणि त्यांचा विचार करायची पद्धत अधिक जवळून समजून त्यांना मार्गदर्शन करणं सोपं व्हायचं. तर मुलांच्या बाबतीत त्यांना आवडत्या विषयाने सुरूवात करायला आवडे आणि नावडत्या विषयासाठी अख्खा दिवस असे. त्यामुळे कसंबसं का होईना सगळं पूर्ण व्हायचं. सगळा अभ्यास स्वतंत्र करायची सवयही लागे आणि हवं तिथे शिक्षकांची मदतही घेता येई. त्यामुळे विद्यार्थी नुसतंच बसून ऐकताहेत असं नसायचं. 

शाळेच्या पहिल्याच दिवशी तोत्तोचानची ओळख यासुआकी यामामोतो नावाच्या एका मुलाशी झाली. त्याला पायाला आणि हाताला पोलिओ झाला होता. तोत्तोचानसाठी हे नवीन होतं. पण पहिल्याच दिवशी झालेला हा मित्र नंतर तिच्या मदतीमुळे आयुष्यात पहिलं आणि शेवटचं झाडावर चढतो तो प्रसंग पुस्तकात वाचताना आपण नकळत त्या दोन छोट्या मित्रांसाठी हळवं करतो. हाच यासुकीचान जातो तेव्हाचा तोत्तोचानचा भाबडेपणा आपल्याही गालावर अश्रू ओघळतो. 

शाळा म्हटली की आपल्या मनात अभ्यासाव्यतिरिक्त आणखी येतं ते म्हणजे शाळेत एकत्र खाल्ला जाणारा डब्बा. तोमोईचा नियम होता की रोज काहीतरी डोंगरावरचं आणि काहीतरी समुद्रातलं आणायचं. म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर धान्य किंवा भाज्या आणि प्रथिनं. किती सोप्या शब्दात हे कोबायशींनी मुलांना शिकवलं. शिवाय ते स्वतः आपल्या पत्नीबरोबर मुलानी काय आणलंय हे पाहायचे. त्यात एखाद्या मुलाकडे यातला एखादा प्रकार नसेल तर त्यांची पत्नी ती भर घालत असे. त्या कोबायशींबरोबर एक माशांच्या सुरळ्यांचं आणि एक बटाटाच्या कापांचं ताट घेऊन फ़िरत. त्याचप्रमाणे प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खायचं एक गाणंही त्यांनी बनवलं होतं. जे रोज गाऊन मग जपानीत कृतज्ञता व्यक्त करून हसतखेळत जेवणं व्हायची.

अशा या आगळ्यावेगळ्या शाळेतले तोत्तोचानचे अनुभव वाचणं आपल्याला तिच्या बालपणात घेऊन जातो. एकदा तोत्तोचानचा बटवा संडासात पडतो त्यावेळी तिला शांतपणे तो काढायची परवानगी द्यायचा प्रसंग असो किंवा तिला वीस पैसे देऊन एका भोंदूबाबाकडून आणलेल्या सालीचा प्रसंग असो, या शाळेने तिच्यासारख्या एका द्वाड ठरवलेल्या मुलीला तिचं मन सांभाळून घेऊन तिच्यावर केले जाणारे संस्कार आपसूक नजरेत भरतात. एका प्रसंगात मोठं झाल्यावर याच शाळेत शिकवायचं वचनही ती कोबायशींना देते.

छोट्या छोट्या गोष्टीतून या शाळेचे मुख्याध्यापक कोबायशी यांनी लहान मुलांशी कशी नाळ जोडली आहे याचा पदोपदी प्रत्यय येतो. लहान मुलांचं भाबडं जग तसंच ठेऊन त्यांना छोट्या छोट्या शिकवणूकी द्यायची पद्धत मुलांना कडक शिक्षा करणार्‍या इतर पद्धतींपेक्षा ती खूप वेगळी आहे हेही लक्षात येतं. उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्या मुलांना एकत्र पोहायच्या तलावावर कपड्यांचं बंधन न ठेवता पोहायचं स्वातंत्र्य देताना त्यांना एकमेकांच्या शरीरांकडे निकोपपणे पाहायचा दृष्टीकोन देणं हे फ़ारच कौतुकास्पद आहे. जसं यामुळे मुलामुलींच्या शरीरात काही विकृत कुतूहल असायचं टळू शकतं तसंच या शाळेत काही व्यंग असणारी मुलंही होती. त्यांना आपल्या शरीराची लाज वाटून न्यूनगंडही निर्माण होणार नाही हा भाव होता. आजकालच्या काळात एकंदरीत स्त्रियांवरील शारीरिक अत्याचाराच्या बातम्या वाचतो तेव्हा अशा व्यक्तींना जर अशा प्रकारचे संस्कार त्यांच्या लहानपणी झाले असते तर या गोष्टी टळू शकल्या असत्या का असं उगाच मनात येतं.

यातले अनुभव मुख्यतः तोत्तोचानचे असले तरीही तिच्यावरची कोबायशींची छाप आपल्याला दिसते. उन्हाळी सुट्टीमध्ये शाळेतल्याच सभागृहात तंबू उभारून सर्वांनी एकत्र केलेल्या गप्पांबद्दल वाचताना मुलांबरोबर मिसळायचं त्यांचं वेगळं तंत्र आपल्या नजरेत भरतं. संगीत कवायत अर्थात "युरिथमिक्स"चा शाळेच्या अभ्यासक्रमात समावेश करून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत करायची त्यांची कल्पनाही खूप मस्त आहे. क्रीडादिन साजरा करतानाचे त्यांचे काही खेळ म्हणजे "आईला शोधा", "माशांची शर्यत" खेळायला कोणाला मजा येणार नाही? आणि मग बक्षिस म्हणून भाज्या नेताना मूलं कंटाळली तर "तुम्ही स्वतःच्या कष्टाने या भाज्या मिळवल्यात आणि तुमच्याबरोबर घरच्यांसाठीसुद्धा जेवण मिळवलंय" असं सांगणारे कोबायशी आपल्यालाही मुख्याध्यापक म्हणून लाभले असते तर? असं मनात नक्कीच येतं. 

खरं तर या छोटेखानी पुस्तकातला प्रत्येक प्रसंग तुम्हाआम्हाला काही ना काही शिकवून जातो. लिहायचंच झालं तर त्यातल्या प्रत्येक प्रसंगाला साधारण समान स्थान द्यायला हवं. पहिली ते तिसरी या शालेय वर्षांत या मुलीने एवढ्या छोट्या वयात किती आगळेवेगळे अनुभव घेतलेत याचा हे पुस्तक वाचताना पदोपदी प्रत्यय येतो. तिचा रॉकी कुत्राही या पुस्तकातले एक महत्वाचे पात्र आहे. 

चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर दुर्दैवी शेवटाचा शाप घेऊन येतात का असं मला बरेचदा वाटतं. तो शेवट लिहून मला हे लिखाण उदासवाणं करायचं नाहीये. हे पुस्तक जेव्हा वाचलं जाईल तेव्हा ओघाने ते कळेलच. 

तूर्तास आपण सगळीजण हे लक्षात ठेऊया की जगाच्या पाठीवर लहान मुलांना त्यांच्या भावविश्वात रममाण करून त्यांना बाहेरच्या जगासाठी तयार करणारी एक शाळा होती. या शाळेचं नाव होतं "तोमोई" आणि तिथले मुख्याध्यापक होते "कोबायशी". हेच ते मुख्याध्यापक ज्यांनी तोत्तोचानच्या पहिल्या दिवशी "हं तुला तुझ्याबद्दल मला हवं ते सांग" असं म्हणून सकाळचे आठ ते दुपारची जेवणाची वेळ होईस्तो म्हणजे तब्बल चार तास तिची बडबड ऐकून मग "आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस हं" असं म्हटलं होतं. त्यांच्या या प्रसंगात ही शाळा निव्वळ तोत्तोचानचीच नाही तर वाचकांसाठीही त्यांचीच शाळा होते. अशी एक शाळा जिथे शिकायला मलातरी नक्कीच आवडलं असतं.


तळटीप - हा लेख मीमराठीच्या पुस्तक परिचय स्पर्धा २०१२ च्या निमित्ताने लिहिला आहे. मीमराठीच्या साईटवर येथेही तो उपलब्ध आहे.