खरं तर हा विषय तसा आता ब्लॉगविश्वावर जुना पण काही ब्लॉगु-ब्लॉगिनींनी जरा सांगितलं म्हणून किंवा स्वतःलाही लिहायचं होतं पण तेव्हा वेळेत न लिहिता आल्यामुळे उशीरा का होईना...आणि तसंही अजुन मे संपला नाहीये मग काय हरकत आहे?? शिवाय बाकीच्यांचे लेख त्यांचे ते नंतर वाचतील पण माझा अनुभव मी स्वतः नंतर कसा आठवणार (आत्ताच सगळ्ळ सगळ्ळ आठवत नाहीये तर...) या आणि अशा अनेक कारणांमुळे शेवटी मीही माझे दोन पैसे या विषयावर खर्च करायचे ठरवले आहेत (ही या विषयावरची शेवटची पोस्ट असेल अशी आशा..)संदर्भासहित स्पष्टिकरण किंवा कारणे दाखवा नोटीस अशा विषयांवर मी जास्त चांगलं लिहु शकेन हे आतापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या धेनात आलं असेलंच पण तरीबी हे फ़क्त नमनाचं वाटीभर तेल होतं याची कृ.नों.घ्या...
तर ९ मे २०१० नेमकं मायदेशात असणं आणि मेळावाही असणं हा जरी समसमा संयोग असला तरी तो तिथल्या तिथे साधण्याची कसरत साधताना मला नक्की काय काय करावं लागलं (in short किती लोकांना टोप्या घालाव्या लागल्या) हे सांगणं नमनानंतर तितकंच आवश्यक आहे...(त्याने इतरांच्या मेळावासंबंधी लेखांपेक्षा वेगळं काही वाचल्याचं समाधानही वाचकांना लाभेल ही आशा). सगळ्यात प्रथम म्हणजे तिथे हक्काच्या रविवारवर हक्क (so called प्रेमळ) दाखवणार्या प्रेमळ नातलग,मित्रमैत्रीणींची संख्या त्याच आठवड्यात अचानक वाढल्याचं ध्यानात आलं.आयला म्हणजे तुम्ही इतर दिवशी तुम्ही सुट्टी घेऊन मला भेटाच किंवा जेवायला बाहेर/घरी न्याच असा आग्रह नव्हता पण सगळे रविवारसाठी अडून बसल्याने जरा मोठा लोचा झाला होता.कारण मी ब्लॉग लिहिते हे त्यातल्या ९९.९९% लोकांना माहित नाही मग कुठे जायचं हे खरं सांगायचा मार्ग मीच बंद केला होता. पण प्रत्येकाला दुसर्या कुणाचं तरी नाव सांगुन आयत्यावेळी सुटका करुन घेतली. मुख्य प्रश्न होता मुलाला इतका वेळ एकट्याला आईकडे सोडायचा पण नशीब की आईला तसं फ़ार काही सांगावं लागलं नाही पण नेमकी तिलाच त्या दिवशी एक काम (तेही दादरलाच) निघालं आणि आता मेगा ब्लॉकमध्ये ही लवकर आली नाही तर काय या टांगणीत मी दुपारभर होते पण नशीबाने ती तीन वाजता परतली आणि मी तडक सुटलेच..उगाच कुणी घरी टपकलं तर मग सुटका कशी करायची याचा विचार केला नव्हता. आणि लवकर निघाले तरी फ़ायदा झाला कारण इतकं करुन मेगा ब्लॉकमुळे बरोबर वेळेवर म्हणजे पावणे पाचला पोहोचले..(मी रोहन आणि महेंद्रकाकांना थोडी लवकर येईन असं सांगितलं होतं...मग पंधरा मिन्ट तर पंधरा मिन्ट लवकरशी मतलब काय??)
आल्या आल्याच सचिनने बॅच दिला आणि मग एक एक करुन ओळखीच्या मंडळीशी खरा परिचय/गप्पा/खेचाखेची करायला सुरुवात झाली..तसंच एक शुद्धलेखनाच्या नियमासंबंधी छोटेखानी पुस्तकही देण्यात आले (त्यांची संख्या मर्यादित होती त्यामुळे कदाचित उशीरा येणार्यांना मिळालं नसेल) पण माझ्यासारख्या ब्लॉगर्सनी संग्रही ठेऊन वापरावं असंच पुस्तक आहे. त्याबद्द्ल विशेष आभार.
सोनाली आणि आर्यनमुळे खरं तर मी आणि शमिकाही पुढे बसलो. त्यातल्या त्यात फ़ायदा म्हणजे ती जागा पंख्याच्या खाली होती. पण तसं वर असल्यामुळे थोडं कमी उकडत होतं (किंवा सवय झाली असणार) मेळाव्याची सुरुवात कांचनच्या भाषणाने झाली..त्यातला मला लक्षात राहिलेला मुद्दा/सुचना म्हणजे ज्यांना दिर्घ बोलायचं आहे त्यांनी शेवटी परिचय करुन द्यावा..अरे काय डोकं चाललंय यार, यांना नक्कीच आणखी काही मेळाव्यांचे अनुभव असणार असा मी विचार करतच होते आणि मग एक एक करुन परिचयांना सुरुवात झाली. सोनालीचा नंबर तसा लवकर होता आणि आर्यनचा सत्कारही होता.सुरुवातीचे काही थोडक्यात असतानाच एकदम मग आपल्या वयाचा गैरवापर करत काही ज्येष्ठांनी लांबण लावायला सुरुवात केली आणि तेही स्वतःचा ब्लॉग सोडून भलत्याच विषयांवर..’तारतम्य’ हा शब्द मराठीत नक्की आहे का याची शंका यावी असं झालं...त्यात मग उगाच आपण पळून गेलो तर? म्हणून घाईघाईत माझ्या ब्लॉगचं नाव इ. सांगुन पटकन परत आले.
तितक्यात नेमकी वडा-कटलेटची फ़ेरी सुरु झाली. त्यामुळे (बहुतेक) लांबण लावणार्यांनाही पब्लिकने सहन केलं...(कारण टाळ्यांचा कडकडाट करायला हात तर रिकामी हवेत की नाहीत??) असो...मुख्य मुद्दा हा की हा अल्पोपहार (आणि तो अल्प नव्हता..पुरुन उरुन उरेल पेक्षा जास्त म्हणजे किती? तेवढा...), कार्यालय हा सर्व खर्च कुणा अनामिकाने केला होता ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे...
कटलेट हा मला त्यातला त्यात जास्त न भावणारा प्रकार आणि वड्यापेक्षा तर नाहीच नाही (पक्षी: पहा
माझं वडापुराण) आणि वड्याची चव खरंच एकदम हटके होती. मग इतरांचं ऐकता ऐकता कॉफ़ी पानही झालं...कॉफ़ी अशी मसालेदार (म्हणजे तेच ते जायफ़ळ इ. घातली) प्यायची सवय गेलीय त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा कॉफ़ी झाली हे वेगळं सांगायला नकोच...
फ़क्त आता पुढच्या बाकावर बसण्याची सहनशक्ती संपत आली होती. रोहनने ते व्हिडिओ रेकॉर्डिंग गळ्यात दिल्यामुळे तशी अडले होते (आणि त्यात त्यामुळे माझं दोन सेकंदाचं परिचयसत्र रेकॉर्ड झालं नाही ते अलाहिदा) पण मग संधी साधुन मागच्या बाकांवर आले आणि एकदाचं हुश्श केलं..आता हळुहळु काही नंतर आलेले परिचयाचे लोकही भेटले..चुरापावला शोधायला जास्त कष्ट पडले नाहीत त्याच्या टी-शर्टवरच वडा-पाव लिहिलं होतं. मैथिली पुढे जाऊन बसल्याने तिच्यासाठी पुन्हा दोन मिन्टं पुढे जाऊन आले..नशीब नाहीतर ती नंतर लवकर पळालीसुद्धा. माझ्या आधीच्या कल्पनेप्रमाणे जी ओळखीची मंडळी भेटणार होती तीच भेटली. म्हणजे आनंद पत्रे, सुहास,सागर,देवेंद्र तसंच काही नवीनही परिचय झाले सचिन,आनंद काळे, इ. पण जास्त कल्पना नसताना भेटून दिलखुलास गप्पा मारणारी व्यक्ती म्हणजे राजा शिवाजी डॉट कॉमचे मिलिंद वेर्लेकर. त्यांचा खास परिचय रोहनने करुन मग त्यांचं छोटेखानी भाषण ऐकल्यावर त्यांचं अभिनंदन/.आभारासाठी गेले तर आम्ही एकंदरित ब्लॉगविश्व संबंधी बर्याच गप्पा मारल्या आणि नंतर चक्क त्यांनी या ब्लॉगला भेट देऊन कमेन्टही दिलीय.म्हणजे वाटलं होतं तसे काही नवे ब्लॉग परिचय होणं हा एक चांगला भाग म्हणता येईल...काही ब्लॉगर्सनी त्यांच्या ब्लॉगबद्दल थोडक्यात पण रंजक माहिती दिली...महेंद्रकाकांशी कुणी स्पर्धाही करतंय हेही नव्याने कळलं...(आता दुसरं कोण असणार ते....रविंद्र कोष्टी सोडून..पण हे त्यांनी स्वतःच सांगितलंय बरं) आदमी अच्छा होगावाले हरेकृष्णजींशीसुद्धा बोलायला मिळालं..त्याचवेळी महेंद्रकाकांनी आग्रहाने वड्याची आणखी एक प्लेट हातात ठेवली..आता खुद्द पंतप्रधानांना नाही कसं म्हणणार मग त्या वड्याचंही चीज (पोटात घालुन) केलं...:)
सगळे परिचय झाल्यानंतर मग काही तांत्रिक गोष्टींवरही चर्चा झाली ज्यांचा उल्लेख इतरत्र सगळीकडे झालाय..माझं लक्ष होतं त्याकडे पण तोवर घरुन फ़ोनही यायला सुरुवात झाली होती..पण रोहनने आधीच आपण एकत्र जाऊया म्हणून सांगुन ठेवलं होतं मग परत एकदा आईकडे पटवापटवी केली आणि निवांत शमिकाशी गप्पा मारायला सुरुवात केली. एकंदरित वेळ चांगला गेला होता.परत जाताना वाकड्या वाकड्या वाटा करुन रोहनने शेवटी घरापर्यंत सोडणे हा तर अपेक्षेचा परमबिंदु म्हणायला हवा..
सत्तरपेक्षा जास्त ब्लॉगर्सची उपस्थिती आणि फ़क्त मुंबईच नाही तर पुणे, नाशिक अशी महाराष्ट्रातील अन्य शहरे त्याचप्रमाणे हैदाराबाद सारख्या महाराष्ट्राबाहेरचे ब्लॉगर्स आणि last but not the least अमेरिकेतूनही येणारे प्रतिनिधी आणखी काय हवं संमेलन रंगलं हे सांगायला? शेवटी या मेळाव्याचा मुख्य उद्देश ब्लॉगर्स, वाचक या सर्वांमधला स्नेह वाढवणे हा होता आणि त्यात आपण पुरेपुर यशस्वी झालो आहोत.