Showing posts with label आई. Show all posts
Showing posts with label आई. Show all posts

Wednesday, March 9, 2011

तीन महिने

कसं करतेस गं एकटीने?? सध्या मला विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न....खरं सांगायचं तर पाण्यात पडलं की पोहावंच लागतं नाही का? अगदी तसच..

पहिले तीन महिने नियमाने बाळाने निदान बावीस तास झोपायचं असतं.. बाहेरच्या थंडीत हिटरने उबदार केलेल्या घरात अंमळ जास्त झोपणार बाळ ही जमेची मुख्य बाजू आणि अंगात कामानिमित्ताने जरा जास्तच मुरलेलं multitasking ही दुसरी...तसा हा प्रगत देश त्यामुळे काही गोष्टी यंत्राने होणार असतात. त्यांचा पुरेपूर फायदा घ्यायचा असतो अशा वेळी..तोच घेतोय...
एक स्वयंचलित पाळणा... "नाच बसंती" म्हटल्याप्रमाणे तो झोके घालतोय, साथीला पद्मजा ताईंचा सुमधुर आवाज "रंग बावरा श्रावण गातोय"... मग एका बाजूने घडाळ्यावर लक्ष ठेवून जमेल तशी खायची तयारी करायची, अधेमध्ये डायपर बदलणे, पिऊ घालणे अशी कामंही सुरु ठेवायची आणि दुसरीकडे स्वत:साठी ब्लूरे वर दुसरी एखादी जगजीत नाही तर शान, सोनू, सुरेश, आशा..... मूड असेल तशी प्लेलिस्ट ऐकता ऐकता कामं मात्र सुरु ठेवायची...एखादा दिवस जास्त शांत वेळ असेल तर एखादा पिक्चर पण टाकू शकले मी अशी एकटी....हे आतमध्ये बाळाचं गाणं आणि बाहेर माझं आणि अविरत सुरु असणारी कामंधामं पाहून मला कधी तरी मी inception जगतेय की काय असही वाटायचं...फक्त इथे किक मारायचं कामं बाळराजाचं....

याच पद्धतीने गरज होती म्हणून चक्क पार्ट टाइम कामं पण करू शकले...काही नाही आता फक्त माझी प्ले लिस्ट थोडा वेळ बंद करून शांतपणे VPNला जोडून घेतलं इतकच...या महिन्यात पूर्ण वेळ करतेय...अर्थात बेटर हाफ ने त्यासाठी खास सुट्टी घेतली कारण दिवसातले चार तास काढण त्यामाने सोप्प होत...उद्या बाळ तीन महिन्यांचा होईल आणि अर्थात त्याच्या हालचाली येत्या काही महिन्यात वाढतील पण जिची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो...माझी आई.... पुन्हा आमच्याकडे असेल...

आज सकाळ सकाळी ती अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर आल्याचा फोन आला आणि गेले कित्येक दिवस जे मनाला सांभाळल होत ते चटकन डोळ्यातून बाहेर आलं..ती आहे हेच पुरेस आहे नाहीतर न बोलता करू शकते म्हणून करण्यासारख्या खूप गोष्टी करतेच आहे... आता काही तासांनी ती इथे पोहोचेल आणि मग मात्र मी पुन्हा तिच्याकडून लाड करून घेताना गेले तीन महिन्याचा दिवसा येणारा एकटेपणा सहजच विसरेन....

आजची पोस्ट अशा सर्व आयांसाठी ज्या लेकीच्या माहेरासाठी कुठलीही अडचण पुढे न करता फक्त मदतीचा हात देतात.....आज पुन्हा म्हणावसं वाटतंय अवे तो मज्जा नी लाईफ ..

Sunday, September 13, 2009

एका आईचं पुनरागमन

गेले सत्तावीस महिने ती आपली मुलगी आणि घर यात आनंदाने रमली. इतके दिवस तिने टेनिसचा एकही सामना पाहिला नाही. तिला जमलं नसतं असं नाही पण तिने पुर्णवेळ आपल्या बाळीलाच दिला. आणि आता ही पोस्ट लिहिण्याच्या काही क्षण आधी ती पहिली स्पर्धक आहे की जी वाइल्ड कार्डमधुन खेळुन यु. एस. ओपनच्या फ़ायनला नुसती पोहोचलीच नाही तर तिच्या विरोधातली तरुण तडफ़दार स्पर्धक कॅरोलाइन वोजनियाकी हिचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवून दिमाखात अमेरिकन ओपनचा चषक आपल्या हातात उंचावतेय. "किम क्लाईस्टर्स" २००९ ची अमेरिकन ओपनची विजेती. आजची रात्र तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या पुनरागमन करणार्या सर्वच आया यांच्यासाठी खास...

तसं तिच्या कारकिर्दीतलं हे दुसरं मोठं पदक. पहिलं इथेच २००५ ला घेतलं होतं आणि योगायोगाने पुनरागमनातही तिने इथेच श्रीगणेशा केला. आणि १९८० नंतर टेनिसमधलं कुठलंही मोठं पदक मिळवणारी ही पहिली आई आहे. टेनिसच्या जगतात एका आईसाठी हे नक्कीच कठिण आहे कारण एका बाळाच्या जन्मानंतर पाठीची अवस्था आणि पोटाच्या स्नायुमध्ये आलेली शिथीलता याने टेनिसचा कणा म्हणजे सर्विस करताना its just not the same again. शिवाय या सत्तावीस महिन्यात सगळ्या नव्या दमाच्या तारकांशी सामना करायला तो स्टॅमिनाही हवा. तिला वाइल्ड कार्डजरी मिळालं असलं तरी तिचा ड्रॉ अतिशय कठिण होता आणि उपान्त्य फ़ेरीमध्ये तर विनस विल्यम्सबरोबर तिचा सामना होता. अंतिम फ़ेरीच्या या मॅचमध्ये सुरुवातीला कॅरोलिनाने किमची सर्विस ब्रेक करुन पुढचा रस्ता कठीण आहे याची जाणीव तिला करुन दिली होती. हा सेट जाणार असे कागदावर वाटत असतानाच या कणखर मातेनं ७-५ असा अक्षरश: खेचुन आणला आणि दुसर्या सेटमध्ये मात्र कॅरोलिनाला डोकं वर काढायला दिलं नाही. हा सेट तिने अगदी ६-३ असा अलगद खिशात घातला आणि मग मात्र तिला अश्रु आवरेनासे झाले.

तिची अठरा महिन्यांची छोटी मुलगी जेडसुद्धा मॅच पाहायला आली होती आणि तिच्या चषक घेतानाच्या मुलाखतीत त्याबद्द्ल विचारलं त्यावेळी इतर कुठल्याही पालकाप्रमाणे ती निरागसपणे म्हणाली की आज आम्ही आमच्या मुलीची दुपारची झोप थोडी उशीरा केली म्हणजे ती ही मॅच पाहायला जागी राहील. आणि उद्यापासून मला पुन्हा तिला रुटीन नीट करावं लागेल. तिला तिचं नेहमीचं आईपणाचं आयुष्य उद्यापासून पुन्हा हवय हेही तितकंच महत्वाचं नाही का?
टेनिसच्या इतिहासात मी पहिल्यांदाच चषक वितरण झाल्यानंतर एक संपुर्ण कुटुंब कोर्टवर पाहतेय. त्या छोट्या मुलीला आपल्या आईने काय मिळवलंय हे नक्कीच इतक्यात कळणार नाही पण ती चकाकणारी वस्तु काय आहे याची उत्कंठा नक्कीच आहे आणि त्या आईच्या डोळ्यात आपल्या लेकीची प्रतिक्रिया पाहण्याचा आनंद.
अशा अनेक छोट्या मोठ्या क्षेत्रात आपल्या जिद्दीवर आपलं घर सांभाळुन करिअर मध्ये पुनरागमन करणार्या अनेक मातांना हजारो सलाम....