परदेशात आल्यावर जेव्हा इथे हॉलिडे टाइम आणि हॅपी हॉलिडेचा उठसूठ गजर सुरु होतो त्यावेळी खरंच दया येते इथल्या लोकांची. तो नोव्हेंबरमध्ये आलेला ’थॅंक्सगिव्हिंग’ नामक घरगुती जेवणाचा कार्यक्रम आणि त्याच्या दुसर्या दिवशीचा खरेदीचा धुमाकूळ आटपला की वेध लागतात ते नाताळचे. म्हणजे नक्की काय? तर घर सजावट, ख्रिसमस ट्री आणि कुठेकुठे रंगणारे ख्रिसमस कॅरोलचे कार्यक्रम..पण तरी हे सगळं घोटाळतं ते ख्रिसमस या एकाच सणाच्या भोवती. त्यानंतर पाहिलं तर अगदी हाताच्या बोटावर मोजणारे इथले सण, अद्यापही त्यांना उत्सव म्हणायचं जीवावर येतं.. असो..या पार्श्वभूमीवर यांच्या ख्रिसमसच्याच आसपास येणारी दत्तजयंती केवळ तेवढ्यासाठी आठवते असं नाही.
माझं लहानपण वसईतल्या एका छोट्या गावात गेल्याने दत्तजयंतीचाही उत्सव पाहायचं आणि तिथे असेपर्यंत जवळजवळ दरवर्षी तो साजरा करायचं भाग्य मला लाभलंय़. वसई पश्चिमेला "गिरीज" नावाचं एक छोटं गाव आहे, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र "निर्मळ"च्या जवळ. तिथे पर्वतीपेक्षा कदाचित थोडी कमी उंचीची असेल एक टेकडी आहे, "हिराडोंगरी" तिचं नाव. दरवर्षी इथे असणार्या दत्ताच्या देवळात दत्तजयंती साजरी होते आणि त्यानिमित्ताने देवळाच्या आसपास एक छोटी जत्रा पण भरते (किंवा तेव्हातरी भरायची...मला साधारण ९५ नंतरचं विशेष माहित नाही)
वसईतील आसपासच्या गावातील बरीच लोकं न चुकता या यात्रेला जायचे आणि त्यात माझे आई-बाबाही होते. माझी आई तशी भाविक आहे..देव खरंच आपल्याला मदत करतो वगैरे गोष्टींवर तिची भाबडी श्रद्धा आजही आहे. मी गमतीत म्हणते की गुरुवारची लक्ष्मीव्रताची पोथी तू वाचायचीस पण लक्ष्मीने मात्र आम्हाला तुझ्यापेक्षा साथ दिलीय...अर्थात तिने ही सर्व भक्ती तिच्या मुलांसाठीच केली असणार याची खात्री आहे मला...असो..
तर आम्ही प्रत्येक दत्तजयंतीला गिरीजला जायचो. बरेचदा पायीच जायचो. त्याचं कारण माझ्या बाबांना चालायला आवडतं हे जरी असलं तरी मुख्य त्यावेळी जरी एस.टी.महामंडळाने जादा बसेस सोडल्या तरी आमच्या स्टॉपला येईपर्यंत थांबायचं त्राण त्यांच्यात नसायचं म्हणून मग निदान जाताना तरी ’वन टु, वन टु’च करावं लागे. ते लवकर अंधार पडायचे दिवस आणि आमच्याबरोबर चालणारे इतर लोकही असायचे शिवाय बाबांच्या गप्पा त्यामुळे तो अर्धा-पाऊण तास कळायचाही नाही कसा जायचा ते. डोंगरीची चढणही अगदी फ़ार नाही आणि पायर्या आहेत. त्यामुळे मग रांगेत पोहोचायचो तेच केव्हा केव्हा पायर्या संपत आलेल्या असायच्या त्यावेळी.
या दर्शनातलं मला आठवतं ते म्हणजे बहुधा हे देऊळ आणि डोंगरी कुणा तरी पाटलांच्या मालकीची आहे आणि त्यांचा राजू म्हणून एक मुलगा माझ्या बाबांचा विद्यार्थी देव्हार्यात असे. आम्ही दिसलो की तो आम्हाला थोडा जास्त भाव देई. मूर्तीसमोर रेंगाळणं आणि हक्काचा नारळ "गुरुजी घ्या ना" म्हणून बाबांना तो देई. ते वय(आणि काळ) असं होतं की अशावेळी माझे बाबा सगळ्यांचे "गुरुजी" असल्याचा मला खूप अभिमान वाटे (खरं तर तो आजही वाटतो जेव्हा हे त्यांचे विद्यार्थी अचानक कुठे भेटतात आणि आवर्जुन हाक मारतात त्या त्या वेळी).
दर्शन झालं की मग हवं तसं त्या छोट्या जत्रेत फ़िरायची मोकळीक असे, अर्थात आई-बाबांबरोबरच.. त्यावेळच्या त्या जत्रा म्हणजे आणि त्यातूनही ही डोंगरीवर असल्याने मोठे पाळणे इ. नसत पण ती गोल गोल घोडे घेऊन फ़िरणारी आणि चार-पाच लाकडी पिंजरेसदृश्य पाळणे उभ्याने गोल गोल फ़िरतात म्हणजे तो पाळणेवाला हातानेच ते फ़िरत असतो ते असत आणि मला हे प्रकार विशेष आवडायचे नाहीत त्यामुळे त्यातली लोकांची मजा पाहाणे हेच होई. बाकी छोटी छोटी दुकानं मात्र बरीच असत. हातातल्या रबरी नळी कम दोर्याने वरखाली करणारे पाण्याने भरलेले फ़ुगे, आपटीबार (हा एक मस्त प्रकार नंतर काही आठवडे आम्हाला एकमेकांच्या पायाखाली अचानक फ़ोडून दचकवायला कामी येई) एखादं भातुकलीतलं खेळणं अशी खेळण्यांची छुटकू-मुटकू खरेदी होई.
अशा जत्रांमधुन रिंग फ़ेकणे हाही एक त्यावेळचा लोकप्रिय खेळ होता. तो माझे बाबा आणि दादा खेळत. फ़क्त एकदाच आम्हाला त्यात साबण आणि आगपेटीचं बॉक्स लागलं होतं हे आठवतं आणि तो आनंद मग आम्ही थोडी जादा मिठाई घेऊन साजराही केला होता जसं काही साबण आणि ते बॉक्स म्हणजे काय मौल्यवान वस्तू असाव्यात. बंदुकांनी फ़ुगे फ़ोडणे या स्टॉलवरही गर्दी असे आणि बाबा-दादा तिथेही वेळ घालवत.
खायच्या गोष्टींपैकी एक म्हणजे खजूर आणि दुसरं उकडलेले शेंगोडे आणि शेंगा हे घेतलं म्हणजे घेतलंच पाहिजे या कॅटेगरीतलं. पैकी खजूर आई बहुधा ते थंडीचे दिवस असायचे म्हणून घ्यायची पण मला वाटायचं ते फ़क्त इथेच विकायला येतात.
पण त्याहीपेक्षा माझ्या लहानपणी उकडलेले शेंगोडे हा प्रकार फ़क्त अशा देवाच्या जत्रेतच विकायला परवानगी असावी अशीच माझी समजूत होती.त्याचं काय व्हायचं आधी निर्मळची जत्रा असायची आणि मग वसईतल्या आसपासच्या चर्चेसचे सण म्हणजे एक स्पेशल रविवार जेव्हा तिथेही त्या गावचा उत्सव असे. माझ्या शाळेतल्या ख्रिश्चन मैत्रीणी तिथेही बोलवायच्या त्यामुळे तिथे आणि मग या दत्तजयंतीच्या यात्रेत अशाच ठिकाणी तो उकडलेले शेंगोडेवाला मी पाहायचे त्यामुळे वसईतल्या जत्रा म्हटलं की शेंगोडा माझ्या जीभेवर रूळायला लागतो. नंतर जरी इतर ठिकाणी किंवा भय्याकडूनही शेंगोडे घेतले गेले तरीही निव्वळ तिथले ते शेंगोडे खायला मला या सगळ्या जत्रांमध्ये पुन्हा तसंच जायला आवडेल.
आता ही पायपीट करुन दमलेलो आम्ही जर नेमकंच गिरीजमधलं कुणी ओळखीचं भेटलं तर त्यांच्या घरी दोन मिनिटांसाठी जावं लागे कारण हा त्यांच्या गावातला उत्सव म्हणून त्यांनी अगदी आपण सणाला जसे थोडं खायचं स्पेशल वगैरे केलेलं असतं तसंच केलेलं असे आणि त्यांचा मान मोडायचा नसतो असंही आई म्हणायची. सगळं आटपून किर्र अंधारात मग तिथूनच सुटणारी यात्रा स्पेशल बस पकडून घरी येईपर्यंत जत्रेतल्या आठवणी डोक्यात घोळत असत.
इतकी भाबडेपणे साजरी केलेली दत्तजयंती नेमकी कधी सुटली ते आठवत नाही. पण जवळजवळ विस्मरणात गेलेला हा सण अमेरिकेत आल्यावरही साजरा करायला मिळायला तो आमचा मित्र मंदार जोगळेकराच्या कृपेने. त्याच्या कोकणातल्या गावीही हा उत्सव साजरा होतो आणि त्याच्या मुलांना कळावा म्हणून त्याने त्याच्या घरी सुरु केला होता. मंदारच्या धीरगंभीर आवाजातल्या ॐकाराने सुरु होई. त्याच्या घरी एकत्र म्हटलेल्या आरत्या, जेवण आणि गाण्याचा एखादा कार्यक्रम याने माझ्या काही दत्तजयंत्या आणखी स्पेशल झाल्या.
आता पुन्हा एकदा दत्तजयंतीची पोकळीच आहे पण या आठवणी मात्र मला जेव्हा केव्हा मी माझ्या मुलाला दत्तजयंतीसाठी योग आला तर वर उल्लेखलेल्या मंदिरात घेऊन जाईन त्यावेळेपर्यंत निदान दिलासा देतील याची खात्री आहे. आणि खरं सांगायचं तर ही म्हणजे २०१० ची दत्तजयंती सुद्धा खासच आहे. पण त्याबद्द्ल लवकरच लिहेन त्या क्षणाचीही आठवण झाली की......:)
मस्ट आठवणी लिहिल्या आहेस ग !! आम्ही दत्तजयंती अशी उत्सव स्वरुपात कधीच साजरी केली नाही. त्यामुळे तर अजूनच जास्त आवडली पोस्ट.
ReplyDelete२०१० च्या दत्तजयंतीच्या स्पेशल पोस्टची वाट बघतोय. :)
छान! दत्तजयंती नाही पण सेम आमच्या गावच्या जत्रेची आठवण झाली. सेम मज्जा मज्जा, धम्माल करायचो! १० वर्षे झाली गावची जत्रा बघुन !
ReplyDeleteअश्या स्वरुपात दत्तजयंती मी कधी साजरी केली नाही पण हे वर्णन वाचून इतर जात्रांची आठवण मात्र नक्की झाली...आमच्या इथे महाशिवरात्रीच्या दिवशी असते जत्रा ..बाकी महालक्ष्मीची जत्रा तर तुला माहिती असेलच...धमाल...लवकरच तुझ्या पिल्लुला हे अनुभवायचा योग येऊ दे... :)
ReplyDeleteआमच्या गावाकडेही दत्तजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि खूप मोठी जत्राही असते.पोस्ट वाचून सगळ्या आठवणी ताज्या झाल्या .खूप छान लिहिलंय .
ReplyDeleteतुझी लिखाणाची style मला आवडते .नेहमी वाचण शक्य होत नाही पण जेव्हा वेळ मिळतो तेह्वा सगळे पोस्ट वाचून काढते .
अगं मीही कधीच अशी छान दत्तजयंती साजरी केलेली नाही. तुझ्या इतक्या सुंदर वर्णनाने मला गिरीज ची सफर घडली. शिंगाडे हा एक मस्त प्रकार आहे. ते हिरवे असताना उकडून खायचे आणि निखार्यांवर भाजून काळे कुट्ट खरपूस झाले की मग सोलून खायचे... अहाहाSSS...!! कालिकेच्या जत्रेला याच नवरात्रात गेले होते त्याची खूप आठवण झाली. :)
ReplyDelete२०१० च्या खासम खास दत्तजयंतीची तुझ्या शब्दात वाट पाहतेय गं.
बाकी आता ख्रिसमसची धूम संपली की सगळी गारठणार आणि चिडीचूप ती ईस्टर पर्यंत.
छान आहेत आठवणी... :-)
ReplyDeleteअपर्णा,तुझे लिखाण खूप प्रभावी आहे,मी अक्षरश माझ्या लहानपणातल्या आठवणींमध्ये गुरफटले होते.मी लहानपणी रेवदांड्याला(अलिबाग तालुका) होते,तिकडे दत्त टेकडीवर अशीच जत्रा भरायची.मी माझी धाकटी बहिण,आई आणि बाबा कधी कधी काही बाबांचे मित्र आणि परिवार आम्हीं ह्या जत्रेला जात असू,अगदी दर वर्षी गेलो.असाच अनुभव जो तुम्हीं घेतलात मलाही आला आहे.दत्ताचे सजवलेले देऊळ,रोषणाई,हे देऊळ हे टेकडीवर असल्याने बऱ्याच पायऱ्या होत्या.खाली टेकडीच्या पायथ्यापासून जे काही फेरीवाले,दुकाने चालू होत,ते बरयापैकी वर पर्यंत असत.किती छान वाटायचे!लहानपणची लहानशी खरेदी,आणि थंडीतले ते आई बाबांनी केलेलं कौतुक,हास्य विनोद, लोकांचे लहान मुलांचे आवाज,उसाच्या रसाची चव आठवते....आणि भाजलेल्या शेंगा.....लवकर पडणारा काळोख आणि देवळापर्यंत पोहोचल्यावर ऐकू येणारी देवळातली भजने,आणि रस्त्यात भेटणारे ओळखीचे लोक.परतताना माझी बहिण बाबांच्या खांद्यावर डोके ठेवून झोपून गेलेली असायची आणि मी मस्त उड्या मारत पायऱ्या उतरायचे(मला आजही पायऱ्या धावत उतरायला आवडते :)).टेकडीवरून उतरताना खाली असंख्य दिवे उजळलेले दिसायचे,लांबून दिसणारे हे दिवे ताऱ्यान सारखे वाटायचे,बाबा सांगत,'डोळे बारीक करून बघ दिवे छान दिसतील आणखीन!'हे काही अनुभव मनात घर करून राहिले आहेत!
ReplyDelete'दत्तजयंती'एक आपला सण,खूप छान वाटले तू लिहिलेले कारण त्यातून मी परत एकदा दत्त जयंती ची संध्याकाळ अनुभवली!अपर्णा अशीच लिहित राहा भरभरून देत राहा.............
बरेच दिवसांनी नेटवर फिरकणे झाले म्हणून गेले दोन दिवस ब्लॉग वाचत प्रतिक्रिया देत फिरतोय.
ReplyDeleteबाकी तुमची पोस्ट वाचून कोकणात दत्तजयंतीला प्रसादाला सुंठवडा करतात त्याची आठवण आली. आणि हो, ह्यावर्षीपासून दत्तजयंती माझ्यासाठीदेखील स्पेशल आहे कारण आमच्या "हि"चा जन्म दत्तजयंतीचा. पुढे कधी वाढदिवस विसरलो तर अगदी दत्त म्हणून समोर उभी राहील. ;-)
Belated happy returns to your special person Sidh. Enjoy blogging and it's ok to forget someone's birthday. :)
Deleteहेरंब, मी पोस्टमधे म्हटल्याप्रमाणे नशीबवान आहे म्हणून दत्तजयंती अशा प्रकारे साजरी करायला मिळाली..२०१० ची पेशल पोस्ट टाकलीय बघ...:)
ReplyDeleteदिपक, तुझं गाव तर कोकणात म्हणजे जत्रांची मजा औरच असेल..जा की एकदा मुहुर्त काढून....
ReplyDeleteदेवेन, महालक्ष्मीची जत्रा मला माहित आहे फ़क्त जेव्हा जेव्हा घरचे गेले तेव्हा काही न काही कारणाने माझं जाणं राहिलंय...आता केव्हा मुहुर्त मिळतो देव जाणे..
ReplyDeleteसायली, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार...अगं हरभर्याचं झाड मोडेल मी सध्या बरंच वजन राखून आहे...:)
ReplyDeleteश्रीताई, हे उत्तर लिहेपर्यंत सगळीच गारठलोय बघ...इथे अमेरिकेत राहिल्यामुळे आपल्याकडे काय मजा होती याची जाणीव जास्त होते नाही????
ReplyDeleteसंकेत तुझ्या प्रतिक्रियेबद्द्ल आभारी.
ReplyDeleteश्रिया, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्द्ल आभारी...या प्रतिक्रियेची एक छान पोस्ट होऊ शकते असं मला वाटतं...आणि हो ते धावत पायर्या उतरायचं कसं विसरले मी...सेम पिंच...
ReplyDeleteनेटग्रहांची महादशा लागलेला सिद्दार्थ दे दान सुटे गिराण प्रमाणे घरोघरीच्या ऐवजी ब्लॉगोब्लॉगी फ़िरतोय असं चित्र उगाच डोळ्यापुढे उभं राहातंय..बाकी आता साकडं घातलंय तर ही महादशा सुटेल आणि आम्हाला प्रतिक्रियांप्रमाणेच एक फ़र्मास पोस्ट वाचायला मिळेल अशी अपेक्षा..
ReplyDeleteअरे जरा माझं पोरगं धावत आलं म्हणून नाहीतर तुझ्या "हि"च्या बरोबरीला बड्डे साजरा करता आला असता..(पुढची पोस्ट वाचलीस तर समदं कळेल बघ)
रच्याक, असे फ़ेमस वाढदिवस असले की बरं पडतं नं लक्षात ठेवायला नको..म्हणून मी माझ्या ब्लॉगचा जन्मपण गुढीपाडव्याच्या दिवशी ठेवलाय नाहीतर हेरंबपेक्षा वरताण असते मी वाढदिवस विसरायच्या (आता हेरंबला का मध्ये आणतेय मी..असो...) उशीरा प्रतिक्रियांना उत्तरं देण्याचा हा परिणाम आहे
हो खरच ह्यावर अजूनही लिहिता येऊ शकेल मला.आठवणी संपत नाहीत ग.किती लिहू आणि काय लिहू असा होते कधी कधी!
ReplyDeletemall मध्ये खरेदी करताना,मित्र परिवारासोबत गप्पा मारताना,कुठे बाहेर फिरायला गेलेले असताना,अचानक काहीतरी आठवते,एखादा प्रसंग असा घडतो,कोणीतरी काहीतरी बोलते किंवा आठवणीतला उदबत्तीचा सुवास...आणि मग एका पाठोपाठ एक अश्या खूप साऱ्या आठवणी रांगेने समोर येऊ लागतात.
तुझ्या दत्तजयंती वर लिहिलेल्या ह्या post,ला वाचून मी पण अशीच मागे लहानपणात हरवले होते.
आणि हो तुला पण पायऱ्या धावत उतरायला आवडते का? same pinch ..... :) :)
आठवणी, आठवणी, आठवणी....त्या जास्त त्रास द्यायला लागल्या तेव्हाच हा ब्लॉग लिहायला घेतला गं श्रिया..तुझ्या आठवणी पण तू लिहित जा......मग काही काळाने स्वतःचा ब्लॉग स्वतःच वाचतो तेव्हा पुन्हा एकदा त्या काळात हरवतो..सध्या माझं तेच चाललंय...:)
ReplyDeleteजबरदस्त..
ReplyDeleteमस्त वाटलं वाचायला!!!
:) धन्यु बाबा...
ReplyDelete