Saturday, June 5, 2010

जागतिक पर्यावरण दिवस

आज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाचा इतक्या वर्षांत झालेला र्‍हास पाहुन खरं तर शंका येते हे असे वेगवेगळे दिवस साजरे करुन आपण नक्की काय करतो....कदाचीत असं असेल की नाहीतर यापेक्षा अपरिमीत हानी झाली असती...(just to look at it positively)
या वर्षीची थीम आहे, "Many Species: One Planet, One Future" म्हणजे बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण हिरवी इकॉनामी कशी आणावी असं काही किंवा सगळ्या इतर सजीव,वनस्पती इ.ना जगवुन कसं एक हरित ग्रह किंवा एक भविष्य बनवायचं असं काहीसं...थोडं डोक्यावरुन जातंय माझ्या पण मोठे देश काहीतरी करत असतील असा एक भाबडा विचार करते...
मोठी लोकं काही करो न करो, आपण एक सर्वसामान्य नागरिक आणि या पर्यावरणाचे इतके वर्षांचे हानीकारक म्हणून निदान आता तरी जागं व्हावं हे मात्र सर्वांना पटेल..या वर्षी माझ्या मुलाच्या पाळणाघरात संपुर्ण आठवडा Reduce, Reuse and Recycle असा पाळला गेला...खरं एक कशाला सगळेच आठवडे का नाही असे पाळत असं मला आपलं वाटलं पण चला निदान सुरुवात तर आहे...
मुळात जितकं आपण कमी वापरु तितकं त्याचा कचरा कमी..जमेल तिथे हे तत्व पाळणं सोप्पं आहे...खोलीत गरज असतानाच दिवे,पंखे, एसी (एसी शक्य तितका टाळावा हेच उत्तम) आणि बाहेर पडताना वीजेची उपकरणी आठवणीने बंद करणे यात आपण कमी वापरण्याचं तत्व अमलात आणू शकतो. पाण्याचंही तेच. नळाची धार थोडी कमी करावी आणि पिण्यासाठीही पाण्यासारखा धर्म नाही असं असलं तरी पुर्वीचं तांब्या-भांडं तत्व जास्त चांगलं म्हणजे जेवढं हवं तेवढंच पाणी प्यालं जात आणि बाकी उष्टं नं झाल्यामुळे वाया जात नाही...कागदाचा कमी वापर हेही महत्वाचं..मोठ्या रेस्टॉरन्ट्समध्ये रुमाल असतात तिथे पुन्हा पेपर टिश्यु वापरायचं हमखास टाळता येईल. घरीही शक्यतो ओटा पुसायला इ. फ़डकी वापरलीत तर ती धुता येतात किंवा वाटल्यास टाकता येतात. त्यासाठी खास रोज पाच-सहा बाउन्टी कशाला वापरा? शाळेतल्या वह्यांमधल्या उरलेल्या पानांची रफ़ वही बनवणं हेही एक प्रकारे वापरातली एक वही कमी करण्यासाठी मदतच करतं...आता या कमी वापरात आपण फ़क्त वाचवतोय उगाच कंजुषी नाही तर वायफ़ळपणा टाळतोय..असे अनेक उपाय आहे Reduce साठीचे...
Reuse म्हणजे पुन्हा वापरणंही नेहमीच चांगलं. उदा. लहान मुलांना घरी चित्रकला इ. उद्योग करायला पाठकोरे कागद दिले तरी काम होतं. मुळात प्लास्टिकपिशव्या टाळाव्या पण आल्याच तर शक्य असल्यास मग एक-दोनदा त्याच वापराव्यात म्हणजे निदान थोडं गिल्टी फ़िलिंग कमी. माझी आई भाज्या धुतलेलं पाणी नेहमी कुंड्यांमध्ये झाडांना घालते. माझ्या लहानपणापासुन पाहिलेलं पुनर्वापराचं हे सगळ्यात सुंदर आणि सोपं तत्व आहे. तसंच सांडपाण्यावर बागा फ़ुलवणारी एक सोसायटीही मला माहित आहे. मोठ्या लेव्हलवर जमत असेल तर तोही प्रयोग करायला हरकत नाही.
Recycle करणं केव्हाही चांगलं पण त्यासाठीसुद्धा एनर्जी लागते म्हणून वरची दोन तत्व पाळून जे उरेल आणि शक्य असेल त्याचं रिसायकलिंग करणं हे उत्तम.म्हणजे ते वर म्हटलेले पाठकोरे कागद दोन्ही बाजुनी भरले की मग सुक्या कचर्‍यात टाकावे. नेहमीच ओला आणि सुका कचरा वेगळा करणं चांगलं. आता सगळीकडे तो वेगवेगळा उचलण्याची सोयही आहे. शिवाय एखाद्याचं मोठं घर, पाठी अंगण इ. असेल तर मग ओल्या कचर्‍याचं कंपोस्ट बनवुन त्याचं खत झाडांना वापरणं हेही खूप किफ़ायतशीर ठरु शकेल. अमेरिकेतील काही गावांत एखाद्या मोकळ्या ठिकाणी आपण स्वतः आपला असा कचरा नेऊन कंपोस्ट खताच्या खड्यात नेऊन टाकु शकतो आणि नंतर गरज पडेल तेव्हा तेच खत स्वतःच्या बागेसाठी फ़ुकट घेऊनही येऊ शकतो..खूपच अभिनव कल्पना आहे ही. त्याने रासायनिक खतांचा वापर कमी होऊन पर्यावरण शुद्धीकरणासाठी मदतच होते...
खरं तर या विषयावर जेवढं मांडावं तेवढं कमी आहे..आणि असे एक दिवस साजरे करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनाला हे वळण लावणं जास्त आवश्यक आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून याचं भान आपण ठेऊया आणि आजच्या पर्यावरण दिवसापासून जमेल तितकं environmental freindly वागायचं ठरवुया.

17 comments:

  1. अगं झाडे लावायला हवीत आणि ... या जुलै मध्ये २-३ ट्री प्लान्टेशनचे प्रोग्राम करतोय... :)

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर रे रोहन...झाडे आणि तीही आपल्या मातीतली लावायला आणि जगवायला हवीत..तुझा उपक्रम अगदी स्तुत्य आहे. माझ्या खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
  3. रोहन म्हणतोय ते खरं... झाडे लावायला हवी.

    सरकारनेही धोरणे बदलायला हवीत, चायना मेड वस्तू आणि त्यांचा दर्जा पाहून काही काळात ह्या मोबाईल्स चा इ-कचरा जमा होणार आहे... त्याची विल्हेवाट कशी लावणार आहेत ते ?

    ReplyDelete
  4. आनंद खरंय मोबाईल्स, पी.सी. हा सगळा कचरा सगळीकडेच समस्या करणार आहेत...झाड लावण्याबद्द्ल बरंच बोललं जातं..विशेषत: आपल्याकडे मान्सुनमध्ये पण पुढे त्याचं काय होतं ते देवालाच माहित...

    ReplyDelete
  5. सगळं खरं आहे ग. पण आपली मानवजात पृथ्वीमातेला पूर्णतः ओरबाडून खाल्ल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. wall-e मध्ये दाखवलेली परिस्थिती प्रत्यक्षात यायला अजून फार तर १०० वर्षं पुरेशी आहेत ... दुर्दैवाने !!

    ReplyDelete
  6. हम्म्म..तुझं म्हणणं खरंय हेरंब...

    ReplyDelete
  7. Bharatat Aapan nehemeech rduce aani re use karat aalo. Towel juna zala ki hatpusani tehi fatoo lagal ki tyache poche. krayche. uralel ann badal karoon waprayach june kapade molkaraneela dyayche ,dudhachya pishwya doon wapraychya Bhajee dhutalel pani zadana ghalaych itydi tech jari aapan chaloo thewal an paper towel etc nahee waparale, diwe garaj nastana band thewale ,tari khoop fark padel. tuza lekh samayik aahe an sateek hee.

    ReplyDelete
  8. आशाताई, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप आभार...आपण योग्य मुद्दे मांडले आहेत..
    आपण पुन्हा आपल्या पुर्वीच्या काही सवयी पुन्हा अंगी बाणवल्या तर खरंच खूप मदत होईल...

    ReplyDelete
  9. तुझ्या याआधीच्या http://www.marathimandali.com/?p=317 लेखावरच मी माझी मते मांडलेली आहेत... हे असे दिवस वर्षातून एकदाच का पाळावेत, हा मुद्दा मलाही खटकतो... जर तुम्ही समजंस असाल, पर्यावरणाची व लोकांची जर तुम्हाला काळजी वाटत असेल, योग्य पर्याय/माहिती तुम्हाला ज्ञात असेल, तर का असे दिवस रोज अशा लोकांनी (त्यात मी पण आहेच) पाळले जावू नयेत?

    तुझ्या लेखाचा सारांश सांगायचाच झाला, तर आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ह्या(?) सर्व अनिष्ट गोष्टींवर आळा घालण्यासाठी, पण आळस व स्वार्थीपणा यांपुढे या पर्यायांचा टिकाव लागणे अवघड आहे सध्यातरी... पुढच्या वर्षी भारतात मॉन्सून जर डिसेंबर मध्ये दाखल झाला व महाराष्ट्रात त्याच्यामुळे एकही पावसाचे फटकारे देखील पडले नाही तर कोणालाही नवल वाटू नये किंवा उत्तर भारतातील नद्यांना आलेल्या पुरामुळे राजस्थानमध्ये हाहाकार माजला तरी नवल वाटू नये... हे झाले भारताबद्दल... जागतिक पर्यावरणावर मानवाने जाणुन-बुजून केलेले आघात हे आता त्यालाच वेदना पोहोचवाहेत कारण तो सुद्धा पर्यावरणाचा एक भाग आहे हे त्याला आता कुठे उमगतंय पण "कळतंय पण वळत नाही!" अशी स्थिती मनःस्थिती आहे!

    ReplyDelete
  10. विशाल, प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद :)
    मला जे काही म्हणावंसं वाटत होतं ते किती योग्य शब्दात मांडलंस रे...अधुन-मधुन हे असे दिवस साजरे करतानाच आपण आपले डोळे रोजच उघडे ठेवावेत हेच खरं...

    ReplyDelete
  11. मस्त लेख आहे.
    खरंतर मला अमेरिकेपेक्षा भारतात "Reduce Reuse and Recycle" चे प्रमाण जास्त आढळले. अगदी लहानपणापासून वीज पाणी बचतीचे धडे शिकत आलोय. भारतात रद्दी / भांगारला पैसे मिळतात ह्याची सवय. अमेरिकेत रद्दी टाकताना जीवावर यायचे. :) सध्या पुण्यामध्ये बर्याच घरात ओला कचरा जिरवून खत बनवतात. वीज बचत आपोआप होते कारण महावितरणच त्याची काळजी घेते!

    -निरंजन

    ReplyDelete
  12. मस्त लेख आहे.
    खरंतर मला अमेरिकेपेक्षा भारतात "Reduce Reuse and Recycle" चे प्रमाण जास्त आढळले. अगदी लहानपणापासून वीज पाणी बचतीचे धडे शिकत आलोय. भारतात रद्दी / भांगारला पैसे मिळतात ह्याची सवय. अमेरिकेत रद्दी टाकताना जीवावर यायचे. :) सध्या पुण्यामध्ये बर्याच घरात ओला कचरा जिरवून खत बनवतात. वीज बचत आपोआप होते कारण महावितरणच त्याची काळजी घेते!

    -निरंजन

    ReplyDelete
  13. निरंजन, भारतात खरं तर चंगळवाद नव्हता त्यामुळे आपण नेहमीच ही तत्व पाळत आलो..फ़क्त नव्या पिढीला मात्र त्याची तितकी कदर नाही..निदान शहरात...
    अमेरिकेचं म्हणाल तर जगात सगळ्यात जास्त कचरा इथेच निर्माण होतो..नशीब की थोडं फ़ार recycle करतात....
    आणि आपल्या महामंडळाबद्द्ल काय म्हणावं??? :)

    ReplyDelete
  14. पर्यावरण दिन वगैरे प्रकार पाश्चात्यांनी सुरू करावेत हा एक मोठा विरोधाभास आहे. वरं, पर्यावरणाची वाट त्यांनी लावली म्हणून त्यांनी अपराधी भावनेने चालू केलं म्हणावं तर, त्यांचं अजून चालूच आहे आपल्याहूनही जास्त. पुन्हा आपल्यासारख्या विकसनशील देशांना शहाणपणा शिकवायला पुढे. 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान'. असो. चालयचंच. थोडं (थोडं काय भलतंच) विषयांतर झालं. शेवटी आपणही पृथ्वीवरच राहतो, आपण आपला वाटा उचलणं गरजेचं आहेच.

    ReplyDelete
  15. विषयांतर नाही खरं तर विषयाला धरुनच आहे..पण काय करु शकतो आपण पडलो विकसनशील नाही का?? आपण फ़क्त त्यांनी केलेल्या चुका निदान पर्यावरणाच्या बाबतीत तरी करु नयेत असं वाटतं पण आपणही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतो तेव्हा हळहळायला होतं बघ...

    ReplyDelete
  16. आपण पडलो (विक)सहनशील नाही का?? :)

    बाबाशी आणि हेओशी सहमत...
    पहिले हापिसातले ते कागद गायब करा.. कंपनी पर्यावरण वाचवा म्हणून बोंबा मारते पण सर्व ठिकाणी टिशू पेपर ठेवते.. लोक कापडी रुमाल वापरायचे विसरुनच गेले आहेत...
    हापिसात भरपुर सौरप्रकाश असुनही लाईट्स चालूच असतात.. मी तर फ्रेशरुममधून बाहेर पडताना सगळ्या लाईटस बंद करतो.. :)

    ReplyDelete
    Replies
    1. आका, आपण आपल्यातर्फ़े जितकं जमेल तितकं करत राहावं..तुझ्याप्रमाणेच मीही असे नकोसे दिवे बंद करते...सगळीच जण का करत नाही हा प्रश्न मलाही पडतो. आपण जमल्यास त्यांनाही सांगु शकतो....एकंदरित या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि आपण सर्वांनीच आपापला खारीचा वाटा उचलावा हेच योग्य......:)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.