Sunday, August 3, 2014

ओघळलेले मोती

कधीतरी फार जुनं आठवायला लागलं की मला "दया" आणि "विमल" आठवतात. दयाने तिसरीत शाळा सोडली कारण तिने शिक्षण घेण्यापेक्षा चार घरची धुणीभांडी केल्यास, तिच्या घरी जास्त उपयोग झाला असता. तसं पाहायला गेलं तर तिसरीच्या वर्गातल्या अतिशय प्रेमळ जॉनाबाई आणि दया अचानक शाळेत यायचं बंद होणं सोडलं तर काहीच आठवत नाही. 

चौथीत आम्ही खेळाच्या तासाला सर्व मुली रिंगण करून मग आतली मुलगी एक मैत्रीण शोधते असा काही खेळ खेळायचो. ते आठवलं की आठवते विमल. माझ्यापेक्षा उंच, सावळी आणि टिकलीच्या जागी तुळस गोंदलेली माझी चौथीतली मैत्रीण. तिची टिकली पडली तरी चेहऱ्यात फरक जाणवत नसे. चौथीमध्ये मी शाळा बदलली आणि त्यानंतर मला विमल कधीच दिसली नाही. आमची मैत्री तिथेच थिजली. 

मग पुन्हा हायस्कूलमध्ये अनेक मैत्रिणी मिळाल्या. पण दहावीनंतर मी एकटीच रुपारेलला गेल्यामुळे पुन्हा ते संबंध तिथेच राहिले. रुपारेलला बारावीपर्यंत राहायचं ठरलं असल्यामुळे खरं तर मैत्रीण होणार की नाहीत मग त्या टिकतील का वगैरे अर्थातच तेव्हा न पडेलेले प्रश्न होते. पण अशी सांगून होत नाही न मैत्री? त्यामुळे तिथेही ती झालीच. त्यात मी एकटीच मेडिकलला न गेल्यामुळे मी बहुदा पूर्ण आयसोलेट होणार होते पण अम्रिता आणि श्रुती या दोघी पत्ररूपाने बरीच वर्षे टिकल्या. नशिबाने नंतर आम्ही ईमेल, सोशल साईट्सवरदेखील जोडलेले राहिलो. पण त्याच काळातल्या निदान डझनभर मैत्रिणी आणि त्याही त्या दोन वर्षात अतिशय जीवाभावाचे संबंध असलेल्या मैत्रिणी अशाच कुठेतरी हरवल्या. 

डिप्लोमाच्या वर्षातल्या मित्र-मैत्रिणींचा आढावा घ्यायचा तरी थोड्याफार फरकाने हा असाच म्हणजे अगदी मागच्या वर्षी मी त्यातल्या त्यात समिताला वीसेक वर्षांनी भेटले पण त्या भेटीत त्यावेळी मेल्स वगैरे नसल्यामुळे आता हरवलेल्या मैत्रिणीची आठवण अगदी सुरुवातीलाच निघाली. डिग्रीला पोचेपर्यंत अगदी आतासारखं "मुठ्ठी में नेट" आलं नसलं तरी सायबर कॅफे होते पण तरीही त्यावेळचेही काही संबंध हरवले. मग पुन्हा इतक्या वर्षांनतर ते शोधलेही गेले नाहीत. त्यात मुलीची बदलेलेली आडनावं माहित नसल्यामुळे त्यांचा तर शोधही मुश्कील. 

असो. आज जागतिक मैत्रीदिन वगैरे आणि मी नक्की काय आठवतेय? सहज मनात आलं, आठवतं तेव्हापासून मैत्रीची माळ ओवायला घेतो. सुरुवातीची गाठ मारायची राहून जाते आणि मग त्यातले काही मोती ओघळतात. अर्थात म्हणून आपण आपली माळ ओवायची सोडणार नसतो आणि ते ओघळणारे मोतीही या न त्या कारणाने ओघळायचे थांबणार नसतात. आजच्या या मैत्रीदिनी जसं तुम्ही तुमच्या संपर्कात असणाऱ्या जीवलग मित्र-मैत्रीणीना आठवणीने शुभेच्छा देताहात तसंच तुमच्याही काही ओघळलेल्या मोत्यांची आठवण जरूर ठेवा.

जागतिक मैत्रीदिनाच्या सर्व वाचकांना अनेक शुभेच्छा. 

Wednesday, July 9, 2014

लाकडाचं सौंदर्यदालन

मागे नाशिकचा दौरा झाला तेव्हा काही कारणास्तव "गारगोटी"ला भेट द्यायचं राहून गेलं. त्यानंतर एका सहकाऱ्याने एका लोकल "गारगोटी"बद्दल माहिती दिली. म्हटलं नाशिक नाही तर इकडे तरी जाऊया. या स्थळाबद्दलची माहिती इकडे आहेच.
मला इकडे जावसं वाटलं याचं खरं कारण माझा मोठा मुलगा सध्या कुठेही खेळताना सापडलेले दगडधोंडे घेऊन येतो आणि मग asteroid आहे म्हणून आम्हाला फुशारकी मारून दाखवतो. त्याला हा संग्रह पाहायला आवडेल असं मला वाटलं.
मुख्य मजला पहिला की तळघर पाहायला विसरू नका असं तिथल्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे तळघरात गेलो आणि उतरताना डावीकडे वळलो आणि मी मंत्रमुग्धच झाले. हे दालन चक्क फक्त लाकडांचं म्हणजे ज्याला इंग्रजीत petrified wood म्हणतात त्याचं होतं. आता गुगलवर तुम्हाला या प्रकाराबद्दल माहिती मिळेलच. हा प्रपंच फक्त तिथे काढलेल्या काही फोटोसाठी. एन्ज्व्याय :)
विविध प्रकारच्या वृक्षांच्या लाकडांचे नमुने 
 
जतन केलेली वनसंपदा
 

सव्वादोनशे मिलियन वर्षांपूर्वीचं खोड
खोडांचे आणखी नमुनेफुलपाखरू छान किती दिसते
सुचीपर्णी वृक्षांची सुकलेली फळे आणि काही भग्न खोडे
 

Saturday, June 21, 2014

गाणी आणि आठवणी १७ - दिल है छोटासा

मी डिप्लोमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असताना  "रोजा" रिलीज झाला होता. तेव्हा चित्रहार पाहायचो, त्यावेळी पाण्यावरचे थेंब उडवणारी आणि दक्षिणेकडच्या प्रचंड हिरव्या परिसरात चित्रित केलेल्या या गाण्यावर आणि त्याच्या संगीतावर फिदा होऊन मी आणि माझी मैत्रीण दोघी हा चित्रपट पाहायला गेलो होतो. मी शिक्षण सुरु असताना बाहेर जाऊन चित्रपट पाहायचं प्रमाण फार कमी होतं. पैसे हा प्रश्न होताच पण घरात टीव्हीपण मी आठवीत वगैरे असताना आल्यामुळे असेल आवड पण नव्हती. त्यातून त्याकाळी शनिवारी येणारा मराठी आणि रविवारचा हिंदी असे दोन चित्रपट दाखवले जात, त्यात नेमके मी महा रडके किंवा (माझ्यासाठी) पकाऊ चित्रपट पहिले गेल्यामुळे हा तेव्हा नवा असलेला प्रांत मला तेव्हातरी विशेष मनात भरला नव्हता.

रोजाची गाणी आवडणे हे रोजा पाहण्याचं पहिलं कारण असू शकेल (आणि मैत्रिणीने स्वतःच तिकीट काढून "चल गं" म्हणून नेणं हे दुसरं). मला वाटतं सुरुवातीलाच हे गाणं आहे. आम्हा दोघीसारखीच मोठं होऊन कुणीतरी खास व्ह्यायची स्वप्नं पाहणारी ही मुलगी "रोजा" म्हणजे अभिनेत्री मधुबाला या चित्रपटात कसली मस्त दिसलीय. नंतर एक दोन चित्रपटानंतर कुठे गेली काय माहित? मला या गाण्याचं प्रत्येक कडवं आवडतं आणि त्या शब्दांना न्याय देणारं रेहमानचं संगीत. तो पण तेव्हा मोठं व्ह्यायचं स्वप्न पाहत असणार. त्याची मेहनत रोजाच्या प्रत्येक गाण्यात दिसते. काही गोष्टी पहिल्याच फटक्यात आवडतात (किंवा आवडत नाहीत) तसं रेहमान पहिल्याच गाण्यात आवडला. त्याच्या संगीताच्या, सुरावटींच्या प्रेमात माझी पिढी आकंठ बुडाली. पण सगळ्यात जास्त आवडला तो "रोजा"चा हिरो "अरविंद स्वामी". 

तो डॉक्टर आहे पण त्याला अभिनय आवडतो ही जादा माहिती कॉलेजमधल्या कुणाकडून तरी समजल्यावर, "अरे वा डॉक्टर चालेल नं भावी इंजिनीयर मुलीला", असं म्हणून वर्गातल्या सगळ्याच मुली त्याच्या प्रेमात. आधीचे सगळे क्रश विसरून परी यासम हा वाटणारा चित्रपटातला रिषी. मग त्याची वासिम खानबरोबरची बोलणी, पळून जायचा प्लान वगैरे मध्ये त्याला किती लागतं तरी "यार कसला दिसतो न तरी पण" आम्ही दोघी एकमेकींच्या कानात. मला वाटतं आमचं बजेट जास्त असतं तर कदाचित आम्ही हा चित्रपट बाहेर जाऊन पुन्हा एक दोनवेळा पहिला असता. शिवाय मुंबईच्या बॉम्बस्फोटाचे ताजे साक्षीदार म्हणून देखील हा चित्रपट आमच्यासाठी माईलस्टोन होता. 

त्या वयात हा "क्रश" जसा साहजिक होता तसचं "दिल है छोटासा" सारख्या गाण्यांनी भारावून जाणंही साहजिक होतं. माझ्या बाबांकडच्या कुटुंबात मी पहिली इंजिनियर. माझे दहावीचे मार्क मी बोर्डात वगैरे आले नसले तरी आमच्या घरात सगळ्यांना भारी कौतुक वाटण्याजोगे. मला बारावी मध्ये मुंबईत फ्री सीट मिळवण्याइतके मार्क्स मिळाले नाहीत आणि पेमेंट किंवा बाहेर जाउन शिकायची ऐपत नव्हती.तसं कागदावर जातीची सवलत पण होती पण त्यातही दोन टक्क्यांची स्पर्धा होतीच. 

असो बोलायची वस्तुस्थिती न पाहिलेल्या स्वप्नांचं काय होणार याची खात्री नसताना रोजाची स्वप्नं त्या वयात आपली वाटणं सहज होतं. 

तिला रिषीबरोबर लवकर लग्न न करता शिकायचं होतं शिवाय त्याने आपल्या बहिणीला नकार देऊन आपल्याला वरलं याचा राग होताच. मग ती त्याच्या प्रेमातही पडते आणि तो संकटात सापडल्यावर अगदी  राष्ट्रपतीकडे दाद मागायलाही जाते. दिसायला सुंदर, हळवी आणि करारी अशी मुलगी व्हावं असं मलाच काय माझ्याबरोबरीच्या बऱ्याच मुलींना वाटलं. मला वाटतं "मणिरत्नम" हे दाक्षिणात्य नावदेखील माझ्या पिढीला तेव्हा कळलं आणि लक्षात राहिलं. नंतर जेव्हा चित्रपट पहिले गेले तेव्हा हा कुणाचा वगैरे प्रश्न पडू लागले किंवा मणीरत्नम या नावाने बरेच चित्रपट आवर्जून पहिले गेले. अजूनही मी चित्रपट पाहण्यासाठी वेडी होत नाही किंवा मला कथा वगैरे लक्षात राहत नाहीत. पण रोजा पाहिल्यानंतर मला चित्रपट पहायचा जो काही रस निर्माण झाला त्याचं श्रेय चित्रहारमध्ये पाहिलेल्या आणि अतिशय आवडलेल्या या गाण्यात आहे. 

आजही मी हे गाणं ऐकलं की माझ्या त्या टीनएज मध्ये  जाते. प्रेमात पडायला तेव्हा आवडलं असतं का याचं उत्तर रिषी देतो आणि मोठं होऊन भव्य दिव्य काही करायची प्रेरणा पी. के. मिश्रा (आणि जो कुणी मूळ  तमिळ कवी असेल) यांचे शब्द आणि ए आर नावच्या तेव्हा नुकतचं येऊ घातलेल्या वादळ ही प्रेरणा घेऊन जातं. मी आपसूक गुणगुणते, 
                                  चांद तारोंको छुने की आशा 
                                  आसमानों मी उडने की आशा 

Thursday, June 12, 2014

उन्हाळ्याचं वर्तुळ

अजगरासारख्या सुस्तावलेल्या दुपारी चिंचेच्या झाडाखाली खाट सरकवून नदीवरून येणारा वर खात पाय लांब करणे ही उन्हाळ्यातली माझी अत्युच्च आठवण आहे. खाटेवर जागा पकडणे ही एकमेव महत्वाची बाब. त्यासाठी जेवतानाच आधी विचार करून वेळेत किंवा खरं म्हणजे सगळी एकत्र जेवत असताना आपलं लवकर आटपणे आणि परसदारी भसाभस चूळ भरून मागच्या वाड्यात झपाझप जाऊन एकदा बूड टेकलं की मग आजूबाजूला हळूहळू जमणाऱ्या मोठ्या मंडळींच्या गप्पा ऐकत उन्ह सरायची वाट पहायची. 

त्या गप्पांमध्ये कळणारे आणि न कळणारे कितीतरी विषय चघळले जात. आईचे बाबा, म्हणजे माझे मी न पाहिलेले आजोबा, ही त्यांची सर्व मुले एकत्र जमली की गप्पांमध्ये येणारी हमखास व्यक्ती. त्यांना आई, मावश्या, मामाच काय पण  अख्खा गाव "दादा" म्हणे. मामांच्या ओटीवर त्यांचा तरुणपणातला फोटो आहे. दिसायला राजबिंडे आणि देश स्वतंत्र व्हायच्या आधीच्या काळापासून तेव्हाच्या काँग्रेसमध्ये. तेव्हा जयंतीबेन म्हणून काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या त्यांच्या कार्यालयात काम केलेले. दादा गेले त्याच वर्षी नेहरू वारले असा दाखला आई नेहमी देते. तुरुंगवासही भोगला; पण त्याचा पुरावा घेऊन सरकारी सोयी उपटल्या नाहीत. फक्त एका मुलीचं लग्न पाहून संपलेल्या आयुष्याने या मुलांच्या आयुष्यात कष्टाची वर्तुळं वाढली हे काही वेगळं सांगायला नको. 

"त्या दुपारी" या म्हणजे दादा गेल्यानंतरच्या काळातल्या आणखी काही आठवणी ऐकून न कळत्या वयातही मनाला यातना व्ह्यायच्या. तेव्हा खरं सांगायचं तर आमची तेव्हाची परिस्थिती म्हणजे त्याकाळचे मध्यमवर्गीयच किंवा कदाचीत त्याहून एक पायरी खाली. चाळीतलं दोन खोल्यांचं घर, वर्षाला एक पावसाळी आणि एक उन्हाळी चप्पल, दिवाळीलाच काय ते नवीन कपडे (मध्ये कधीतरी कुणी कापड भेट म्हणून दिलं असलं तर एक  जादा फ्रॉक), शाळेत आणि बारावीपर्यंत जुनी पुस्तकं (आणि इंजिनीयरींगला रेंटवर मिळणारी) असे आमचेही दिवस. पण तरी त्या उन्हाळ्यात आमच्या आई-बाबा आणि नातेवाईक यांच्या होणाऱ्या गप्पा ऐकल्या की  आम्हाला आमची ती परिस्थिती खूप म्हणजे खूपच चांगली वाटायची. 

अखेर आमचीही ती परिस्थितीदेखील नाही म्हणता सुधरली. आमची तिघांची शिक्षणं होऊन थोडे कमवते झालो. मुंबईत चांगल्या ठिकाणी घर वगैरे तेव्हाही स्वप्नच होतं. चाकरमान्यासारखं उपनगरातून चर्चगेटपर्यंत आणि नंतर सिप्झ असे दोन्ही महात्रासदायक प्रवास सुरु झाले. माझ्या वयाच्या आसपासचीच असणारी आम्ही सगळीच भांवडं नोकरीच्या रामरगाड्यात अडकलो आणि मग "त्या दुपारी" फारसा गाजावाजा न करता  कुठेतरी गायब झाल्या. 

ऊन आता इकडेही तापायला लागलं आहे, आई-बाबा त्यांच्या नातवंडाना भेटायच्या निमित्ताने, फार दिवसांनी ,"त्या दुपारी" शनिवारी किंवा रविवारी येऊ पाहताहेत. पुन्हा जुने विषय रंगतात. फक्त आई आता दादांबद्दल बोलायच्या ऐवजी आम्ही आमच्या लहानपणी कसा दोन खोल्यात अभ्यास केला, त्याबद्दल बोलते. बाजुला खेळता खेळता मुलाने एका कानाने हे टिपलेलं असतं आणि तो निरागसपणे विचारतो,"आई, खरच?" त्याचा बदललेला चेहरा मला काही सांगू पाहतो. त्याला माझ्या तेव्हाच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटत आहे, हे मला स्पष्ट दिसतं. त्याच्या डोळ्यात माझी मी पाहताना माझं "उन्हाळ्याचं वर्तुळ" नकळत पूर्ण होतं. 

Wednesday, May 21, 2014

भरून भरून ........

माझ्याबरोबर भगुबाईला असणारा एक मित्र गेले काही वर्षे त्याचं करीयर गुजरातमध्ये करतोय. बरेच दिवस त्याच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण आमच्या batch मधल्या मुलांच्या त्या ग्रुपमधल्या मुलांना मी जितकं ओळखते, त्यावरून तरी त्याचं भविष्य तिथे उज्ज्वल असल्याशिवाय तो तिथे जाऊन स्थायिक वगैरे होणार नाही हे मला माहित आहे. तेव्हापासून गुजरात, तिथली इकोनॉमी इत्यादीबद्दल एक कुतूहल आहे आणि पुढचं कुतूहल अर्थातच ते नाव जे गेले कित्येक महिने सगळ्यांच्याच तोंडावर आहे. 
माझा राजकारणाचा अभ्यास तसा कमीच आहे आणि कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा इतका आत्मविश्वास मला कुणाही पक्षाबद्दल आला नाही; कारण सगळीकडे कामसू आणि कामापुरते असे दोन्ही कार्यकर्ते पाहण्यात आले. मग कुणा पक्षाला चांगलं म्हणायचं हा संभ्रम होणारच. 
पण जेवढी माहिती "मोदी" या वलयाबद्दल मला वाचायला मिळाली आणि त्यांची जी काही online भाषणं मी ऐकलीत त्याने मला या व्यक्तीबद्दल आदर आहे. पक्ष म्हणून खरं प्रत्येक पक्षाने त्यांच्या त्यांच्या कमकुवत जागा जेव्हा जेव्हा त्यांना सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा दाखवून दिल्या आहेत. पण तरी खंबीर नेता मिळाला तर आपण बदल घडवून आणू शकतो असा आत्मविश्वास ज्या नेतृत्वाकडे असायला हवं ते मोदींकडे असेल असं त्यांना ऐकताना जाणवतं.
त्यांच्या मुंबईला केलेल्या भाषणात त्यांनी १८ ते २८ या वयाबद्दल आणि त्यावेळी संधी मिळाल्या नाहीत तर काय होऊ शकतं याबद्दल व्यक्त केलेले विचार मला दहाबारा वर्षांपूर्वी माझा माझ्या करियरशी सुरु असलेला धडा आठवून गेला आणि वाटलं खरच तेव्हाही असाच नेता असता तर? आणि आताचं त्यांचं निवडून आल्यानंतरचं भाषण, ज्यात ते हळवे झालेत, हे सगळं पाहिलं की आत कुठेतरी या व्यक्तीशी आपली नाळ जुळते आहे असं वाटतं. त्याचं कालचं भाषण मी दोनवेळा ऐकलं.  रडणं म्हणजे एका वेगळ्या प्रकारे व्यक्त होणं. हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. तेवढं भावूक होण्यासाठी आपला भूतकाळ कारणीभूत असतो असं मला वाटतं. तळागाळातून वर आलं की  ते जुने दिवस आठवणींच्या तळाशी असतात. त्या कधी डोकं वर काढतील सांगता येत नाही. अशावेळी  आसवांनी वाट मोकळी करून दिली तर त्यात त्या व्यक्तीचा कमकुवतपणा न दिसत त्याची सच्चाईच दिसते. बदलेले दिवस काळ अर्थातच दाखवेल आणि यातून काही न काही चांगलं हळूहळू का होईना नक्की घडेल. 

देशापासून इतक्या दूर असले की काही क्षणांची आर्तता जास्त जाणवते. भावना त्याच असतात फक्त आपण तिथे नसतो. आत्ता वाटलं म्हणून सगळं सोडून येता आलं असतं तर किती बरं असं वाटायचा हा क्षण मला धरून ठेवायचा नाहीये. मला काय बदलता येईल मला नक्की माहित नाही किंवा सांगायचं तर त्यांचा अजेंडा, प्लान इत्यादींबद्दल काही लिहावं अशी माझ्या अभ्यासाची व्याप्ती नाही. पण या क्षणी जर मला कुठे असायचं असेल तर ते माझ्या देशात हे सांगायला मात्र आज लिहायलाच हवं. तुम्ही कुठेही राहिलात तरी चांगल्या गोष्टी आपल्या देशात घडाव्यात असं तुम्हाला वाटणं साहजिक असतं किंवा काहीवेळा देशाबाहेर राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या देशात होणाऱ्या घटनांचा संदर्भ तुमच्या रोजच्या भावनांशी जास्त तीव्रतेने जोडता. त्यात जसं चुकीच्या घटनामुळे होणारा संताप असतो तसचं चांगल्या गोष्टीच कौतुकही असतं. 
मला आजकाल "अच्छे दिन आएंगे" हा वाक्प्रचार आवडतो आणि तसचं हे सगळं वातावरण अनुभवताना समोरचा सद्गदित झाला तस माझेही डोळे पाणावतात. भावनेच्या भरात कदाचित असंच लिहीतही राहीन ज्यात नक्की काय म्हणायचं आहे हेही वाहवून जाईल. आज सगळचं भरून भरून आलंय हेच खरं. 

Thursday, May 8, 2014

गाणी आणि आठवणी १६ - ऋतू हिरवा

हे गाणं माहित नाही असा मराठी गानप्रेमी विरळा. वेगवेगळ्या वेळी हे गाणं ऐकलं आणि प्रत्येक वेळी तितकंच भावलं. त्यामुळे या गाण्याची सलग आठवण नाही पण म्हणून त्याला गाणी आणि आठवणीमध्ये स्थान द्यायचं नाही हेही रूचत नाही. 
सगळ्यात पहिले जेव्हा ही कसेट बाजारात आली आणि ऐकली तेव्हाचा आशाताईचा स्वर आणि सुमधुर संगीताचा बाज भावला. यातला कोरसही तितकाच खास. श्रीधरजींचे आभार मानावे तितकेच कमी आणि शांता शेळके यांचेही. तेव्हा आम्ही वसईला राहत असताना वसई गावात एक होतकरू तरुणांचा गाण्याचा ग्रुप होता. मी त्या ग्रुपचं नाव विसरले आहे आणि आता त्यापैकी कुणी माझ्या संपर्कात नाही. पण त्यांनी एक स्थानिक गायकांना घेऊन एक गाण्याचा कार्यक्रम केला होता. त्यात बसवलेल्या अनेक गाण्यात हे गाणं सगळ्यात छान बसलं होतं. सहगायकांनी मूळ गाण्याच्या तोडीचा कोरस गायला होता. मला वाटतं त्या कार्यक्रमाची सांगता या गाण्यानी झाली होती. त्या रात्री तिथून निघताना मन हिरवं झालं होतं. त्यानंतर कधीही त्यातले कलावंत कुठे दिसले की त्यांनी गायलेलं ऋतू हिरवा आठवे. 

मग अमेरीकेत आल्यावर ताईने आठवणीने कसेट पाठवली आणि तो मोसम नेमका वसंत ऋतुचा होता. इस्ट कोस्टचा वसंत म्हणजे हिवाळ्यानंतरचा पाऊस पडून आलेल्या हिरवाईचा महोत्सव. त्यावेळी केलेल्या सगळ्या लॉंग ड्राईवला एकदा तरी हे गाणं ऐकून तल्लीन झालो नाही असं झालं नाही. 

आता आई बाबा आशाताईंचा नवीन अल्बम "साकार गांधार हा" घेऊन आलेत. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहेन पण त्यानिमित्ताने आशाताईंचा या वयातही तरुण असणारा आवाज याचा आईबाबांबरोबर विषय झाला आणि पुन्हा एकदा आधीचा अल्बम म्हणून "ऋतू हिरवा"ची पुन्हा आठवण झाली. त्यांच्या जुन्या आवाजाची तुलना म्हणून नाही पण ऐकावसं वाटलं म्हणून. 
योगायोग म्हणजे आताच वसंत सुरु झाला आहे. तसा सदाहरित सुचीपर्णी वनाचा प्रदेश असला तरी हिवाळ्यात ती झाडं सोडली की बाजूला काड्या आणि रखरखाटच असतो. यंदा इतर वर्षांच्या तुलनेने इथे काय म्हणतात ते "स्प्रिंग चांगला आहे". आजूबाजूला हिरवाई पसरते आहे आणि नेमकं कानात ऋतू हिरवा वाजतंय. या सगळ्या भावना शब्दात पकडणं कठीण आहे. पण आईबाबांबरोबर कुठचा लांबचा प्रवास करून येताना हे गाणं त्याना तल्लीन होऊन ऐकताना पाहणं हीदेखील माझ्यासाठी सुखद आठवण आहे. या प्रवासात फक्त शांता शेळके यांचे शब्द असतात आणि आशाताईंचे आलाप. या गाण्याचा कोरस म्हणजे गाण्याचा प्राण आहे. जर मन कुठच्या कारणाने बेचैन झालं असेल तर मनाला शांत करायचा उपाय म्हणजे हे गाणं आहे. 

मला वाटतं हे गाणं माझ्यासाठी या आणि अशा बऱ्याच आठवणी निर्माण करत राहील. तरीही अधुऱ्या आठवणींची ही पोस्ट माझ्यासाठी खासच. 

Tuesday, April 15, 2014

कहानी में ट्विस्ट

माझ्या घरात दोन माकडं आहेत. ती घरामध्ये धांगडधिंगा घालत असतात आणि माझ्या डोक्याला काही न काही तरी खुराक लावून देत असतात. ती एकमेकांशी आणि आम्हा दोघांशी भांडतात,मज्जा करतात आणि काही वेळा शाळेतल्या त्यांच्या इतर मित्रांना त्रास देतात. तो त्रास आटोक्यात असेल तर ठीक पण नेहमीचं झालं की मग त्यांची टीचर एखादी नोट पाठवते. हे "लवलेटर" घरात आलं की त्या संध्याकाळी मग मी स्वतःशी विचार करते की आता यांना थोडा आवर घालायचं कसं शिकवायचं. मागे मोठं माकड हरवलं होतं ती गोष्ट तुम्ही वाचली आहे का? इकडेच आहे ती. त्यावेळी मी त्याला त्याच्या आवडत्या थॉमस इंजिनाची एक गोष्ट रचून सांगितली होती. त्यामुळे आता त्याला माझा फोन क्रमांक माहित आहे. म्हणजे त्याने पुन्हा हरवू नये पण अशी चुकामूक झालीच तर तो निदान आपला पत्ता कळवू शकेल. तेव्हा ती गोष्ट ब्लॉगवर टाकायची होती पण आज उद्या करता राहूनच गेली. 

सध्या लहान माकड फॉर्मात आलयं आणि वेळ आली आहे त्याच्यासाठी अशी एक गोष्ट तयार करायची तर ही त्या गोष्टीची गोष्ट. 

खर पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला सर्वांनाच चांगली माहित आहे. माकड, उंदीर आणि मांजर तिघं मिळून खीर बनवतात आणि मांजरीताई एकटीच सगळी खीर संपवते. मग ती "मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी" म्हणताना बुडून जाते. माझ्या सुरुवातीच्या गोष्टीत मी मांजरीला बुडू दिलं नव्हतं कारण मित्र एकमेकांना मदत करतात आणि मित्रांकडे एकमेकांना वाचवायचा उपाय असतो असा काही नवा संदेश मला मुलांना द्यावासा वाटला. (शिवाय मारून टाकणे aka violence चा बागुलबुवा होताच) मग मागचे काही महिने ही गोष्ट आमची लाडकी झाली. जेवणात एक घास जास्ती खाणे किंवा नकळत नावडत्या भाज्या घशाखाली उतरवणे अशी कामं या गोष्टीने बिनबोभाट होऊ लागली. 

परवा या गोष्टीमध्ये सांगताना सुरुवातीलाच असं ठरलं की आज मांजर खीर नुसतीच राखत बसणार, अजिबात खाणार नाही. मग माकड आणि उंदीर गेले आंघोळ करायला आणि मांजर बसली आपली राखत. तेवढ्यात तिथे एक मोठ्ठा हत्ती आला (हत्ती मोठ्ठाच असतो पण माझं छोटं माकड, "हो? एवदा मोथा?" म्हणतं ते पाहण्यासाठी आणि एक घास घशात घालण्यासाठी असे बझवर्ड्स वापरणं जरुरीचं आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच) 

हत्ती म्हणाला," मांजरी ताई, मांजरी ताई मला खीर खायची आहे". मांजर म्हणाली, " अरे पण उंदीर आणि माकड आंघोळीला गेले आहेत तोपर्यंत कुणीच खीर खाणार नाही. मी बसलेय राखण करत. तुला दुसरं काही काम असेल तर ते करून ये." हत्तीने विचार केला या तिघांनी मिळून खीर केली आहे आणि ते ती आपल्याला पण देणार आहेत मग आपण ती फुकट घायची का? (इथे आमची घरची तल्लीन झालेली माकडं मान हलवून नाही वगैरे म्हणताहेत) तो जंगलात गेला आणि त्याला तिथे एक मोठं आंब्याचं झाड दिसलं (इकडे नेहमी न मिळणारे आंबे हे आमच्या घरातल्या तमाम माकडांचं अतिशय आवडतं फळ आहे विशेष नमूद करायला हवं) त्याने चौघांसाठी चार आंबे त्याच्या सोंडेने काढून घेतले आणि तो परत मांजरी खीर राखत बसली होती तिथे आला. 

तितक्यात माकड आणि उंदीर त्यांची आंघोळ आटपून आले आणि त्यांनी मांजरीसोबत हत्तीला पाहिलं. त्यांना पाहून मांजरी म्हणाली, "हे बघा आज आपल्याबरोबर कोण आलं आहे खीर खायला?" हत्ती म्हणाला," मी मांजरीकडे खीर मागितली तेव्हा ती मला म्हणाली की ती तुमच्यासाठी थांबली आहे. मला अशी शेयर करणारी मित्रमंडळी खूप आवडतात म्हणून मी पण तुमच्यासाठी एक गम्मत आणली आहे". असं म्हणून हत्तीने सगळ्यांना एक एक आंबा दिला. मग त्या चौघांनी मिळून खीर आणि आंबे असे दोन दोन डेझर्टस खाल्ले. 

मी - गोष्ट ?
दोन्ही माकडं - संपली… 
मी - मग आपल्याला आज नवीन काय कळलं?
मोठं माकड - नवीन फ्रेंड्स बरोबर शेयल कलायचं. 
मी - मस्त. आणि मित्रांबरोबर बोलताना ओरडून बोलायचं नाही. जर मांजरी सुरुवातीला हत्तीला ओरडून बोलली असती तर कदाचित हत्तीने तिला सोंडेने फेकून दिलं असतं आणि सगळी खीर खाल्ली असती पण मांजरी त्याच्याबरोबर चांगलं बोलली आणि म्हणून त्यांचा काय फायदा झाला? 
मोठं माकड - त्यांना दोन दोन डेझर्टस मिळाले. 
मी - म्हणून मित्रांबरोबर मग ते शाळेत असो शेजारी असो कुठेही असो कसं वागायचं?
लहान माकड - चांगलं वागायचं. 

चांगलं वागायचा हा धडा कितपत चालतो ते लवकरच कळेल. तोवर आम्ही माकड, उंदीर, मांजर आणि हत्ती अशी आमची नवीन गोष्ट वेळ पडेल तशी सांगत राहणार. कधी कधी कहानी  में ट्विस्ट फॉर्म्युला चालतो कधी नाही. देखते है यह कहानी कितना रंग लाती है?