Monday, July 27, 2020

Rest in Peace Apolonio

आमच्या ऑपरेशन्स डिपार्टमेंटच्या मुख्य व्यक्तीचं काम किती जड आहे हे जसजसं कोविडने जग व्यापतंय तसं मला जाणवतं. मी नॅन्सीच्या जागी दुरूनही नाही हे चांगलं आहे का?, हा विचार करणं चुकीचं आहे हेही मला कळतंय.
काही आठवड्यापूर्वी कामाची घरून होणारी नाचानाच असह्य होऊन एक दिवस कामावर जायचं ठरवलं त्याच दिवशी आधी सकाळी लॉगिन केल्यावर नॅन्सीची मेल पहिल्यांदी नजरेत आली आणि डोळे पाण्याने भरले. दुसऱ्या एका कक्षात  काम कारणारा पॉलो आपला आधीचा कुठलातरी न बरा होणारा आजार शेवटच्या टोकाला पोचल्यामुळे त्याच्या कॅलिफोर्नियाच्या गावाला निघाला होता. त्याने त्याचा शेवटच इ-पत्र पाठवलं होतं आणि त्याबरोबर आपला पत्ता.
त्याला जाताना आठवण म्हणून, संदेश म्हणून जर कार्ड द्यायचं असेल तर काय करायचं हे नॅन्सीने तिच्या इ-पत्रात लिहिलं होत.  मी खरं तर इथे काम सुरु करून वर्षापेक्षा थोडाच काळ जास्त झाला असेल त्यामुळे मी पॉलोला पाहिलं असेल तरी मला त्याक्षणी तो आठवला नाही. त्यात तो बेसमेंटमध्ये काम करतो आणि फार वर यायचं त्याला कामही नसे हे इतर सहकाऱ्यांनी मला सांगितलं.  पण आपला कुणी सहकारी आजारी आहे, आणि "मी माझ्या देहाची माती माझ्या गावात मिसळावी म्हणून मोठ्या प्रवासाला निघतोय",  हा त्याचा  विचार माझं डोकं खाऊन मलाच काही होऊ नये म्हणून मी एक कार्ड माझ्या बॅगमध्ये घातलं.
त्यादिवशी मर्फीच्या नियमाप्रमाणे मी निघेनिघे पर्यंत असंख्य कामे माझ्याकडे आली आणि ते कार्ड माझ्या बॅगमध्येच राहिलं. ऑफिस संपवून दुसऱ्या सिग्नलला पोचताना काय राहिलं याचा मनात अंदाज घेताना मला अचानक आठवलं की कार्ड तर आपण दिलंच नाही. पुन्हा गाडी वळवायला मार्ग नव्हता कारण घरी पोचले की मीच लावलेली एकची मिटिंग टीमला सांगून निघाले होते पोचते म्हणून. शिवाय मी ज्या रंगाची आहे त्या रंगाने सध्याच्या काळात मलाच काही होऊ नये म्हणून खरं तर मी ऑफिसला यायचं म्हटलं तर "नको गं",  म्हणून काळजी करणारे निदान चारपाच तरी जवळचे सहकारी आहेत. त्यांना चिंता नको म्हणून मी गाडी तशीच दामटली.
त्या प्रसंगांनंतर नॅन्सीने आणखी एका इमेलमध्ये पॉलोच आभाराचं पत्र आणि त्याचा पत्ता कळवला. आता मात्र हे पत्र पाठवू म्हणून मी स्वतःला बजावलं. इथे माझे स्वतःचे काही जुने आजार डोकं वर काढू पाहताहेत आणि मी पॉलोचं पत्र बॅगेत सांभाळून ठेवलंय. मला माहीत आहे त्यालाही मी आठवणार नाही पण त्याच्या पृथ्वीवरून परतीच्या  प्रवासात माझे दोन शब्द त्याची साथ करतील का अशी माझी भाबडी आशा आहे. मी हे पत्र टाकणार आहे फक्त हा दिवस जरा शांत जाऊदे असं मी म्हणतेय. दुसरं मन म्हणतंय इतकी पत्र आली आणि अनोळखी सहकाऱ्यांची तर पॉलो ते सकारात्मक घेईल की जाताना दुःखी होईल.
या कावऱ्याबावऱ्या अवस्थेत मी आहे. मागच्या आठवड्यात आधी मुलांना थोडा वेळ द्यायला एक छोटी आणि मग बरं  नाही  म्हणून आणखी दोन सलग सुट्ट्या टाकून आज मी कामावर आले. असे लागोपाठ सुट्टीचे दिवस आले की साचलेल्या कामाचा धसका घ्यायचं आता कमी झालं आहे. तरीही आजच्या दिवसातली इ -पत्रं पाहताना नॅन्सीने आमच्या पहाटे टाकलेल्या पत्राचा मायना पाहिला आणि लगेच कळलं, पॉलो गेला. त्याच्या आजाराच्या वेदना काल  रात्री कायमच्या संपल्या. त्याने मागे जे आभाराचं पत्र पाठवलं होतं ते या बातमीला जोडलं होतं. नकळत माझे हात जोडले गेले आणि डोळे पाण्याने भरले. माझ्या बॅगमधलं कार्ड आता बॅगमध्येच राहील. 



पॉलो, आज तू गेलास. तुझ्या वेदना आता मिटल्या असतील. तुला कोविड  झाला नव्हता पण तुझी वेळ आली होती आणि तुला ते माहित होतं.  कोविडच्या महामारीने सध्या ज्या तातडीने माणसं जाताहेत त्या सर्वांनाच श्रद्धांजली वाहायची गरज आहे. मी ही पोस्ट फक्त तुझ्यासाठीच लिहीत नाही हे तुला कळेल का? 

त्याच्या पत्राखालच्या सहीवर त्याचं मूळ नाव वाचताना लक्षात आलं, "पॉलो" असा घरगुती अपभ्रंश असलेलं खरं नाव किती सुंदर आहे. 

Rest in Peace Apolonio. 

#AparnA #FollowMe

7/27/2020

2 comments:

  1. खूप सुंदर लेख अप्पु. ईथेहि परीस्थिती अशीच आहे. बरेच जवळचे नातेवाईक निघून गेले.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद (अदिती की हर्षू ?)

      सर्वांनाच बळ मिळो ही प्रार्थना.

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.