Tuesday, May 12, 2015

दोन डॉलर आणि "एकमेका सहाय्य करू" पंथ

आमच्याकडे क्रेस्ट फार्म म्हणून एक फार्म टू स्कूल अशी संकल्पना असलेली संस्था (की शाळा?) आहे. मला त्या शाळेची पूर्ण माहिती नाही, पण डॉ. जेन गुडाल यांनी डोनेट केलेली ही संस्था आमच्या भागातल्या शाळेतल्या मुलांना environmental education च्या मध्ये मध्ये संधी देते असं पाहण्यात आहे. केव्हातरी त्यांचा लागवडीचा तुकडा घ्यायचं माझ्या मनात आहे. 

यावर्षीचा लागवडीचा हंगाम आता सुरु होतोय बहुतेक त्यानिमित्ताने मुलांना वाफे, रोपं आणि एकंदरीत बागकाम जवळून पाहता यावं, याची संधी म्हणून शाळेतर्फे एक फिल्डट्रिप जूनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शाळेपासून ही जागा जवळच आहे त्यामुळे नाममात्र दोन डॉलर शुल्क भरून पालकांच्या परवानगी आणि इतर माहितीचा हा फॉर्म भरताना एक कॉलम चटकन नजरेत भरला. Would you like to donate for some other student to attend? 

ही सरकारी शाळा आहे, म्हणजे इकडच्या भाषेत पब्लिक स्कूल. इथे सर्व आर्थिक स्थरातील मुलं येतात. शाळेतले बरेचसे प्रकल्प, देणग्या आणि फंडरेझर मधून चालतात कारण सरकारी मदतही आधुनिक सुविधा मिळवायला अपुरी पडत असणार. "एकमेका सहाय्य करू" पंथ हवाच. माझं स्वतःच प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत झालं आहे आणि आई-बाबाच जि.प.च्या शाळेत शिक्षक असल्याने मीही याच पंथाची पुरस्कर्ती. फक्त माझ्या पुढच्या पिढीला तसे परिस्थितीचे चटके बसत नसल्याने मी हा पंथ पुढे कसा वाढवावा हे मला नेहमीच त्यांना सहज समजवता येत नाही. असो. नमन काही संपत नाहीये. 

तर तो वरचा प्रश्न मी आमचा फॉर्म भरत असताना मुद्दाम माझ्या पहिलीत शिकणाऱ्या मुलालाच विचारला आणि त्याने नाक उडवून नाही सांगितलं. मला कळलंच नाही की फक्त दोन डॉलरसाठी हा नाही का म्हणतोय? माझ्यातली  ती (वेळ मिळाला तर) संस्कार वगैरे पण करणारी आई जागी झाली आणि मी त्याला माझ्या डिप्लोमाच्या वेळेची गोष्ट सांगितली. 

मला वाटतं चौथ्या सेमिस्टरला आम्हाला एक industrial tour असायची. या भावी इंजिनियर होणाऱ्या मुलामुलींना प्रत्यक्ष कारखान्यात जाऊन तिथले वातावरण आणि इतर तांत्रिक बाबी माहित व्हाव्यात म्हणून. आमच्यावेळी अहमदाबादला जाऊन मग येताना माउंट अबूची सहल करून परत असा प्लान होता. सगळेच जाणार होते पण त्यावेळी आम्ही तिघं भावंडं शिकत होतो त्यामुळे मला काही घरच्यांकडून लगेच चार-पाचशे रुपये फक्त माझ्यासाठी घ्यावे हे पटत नव्हतं म्हणून मी नाही म्हटलं. आमच्या केळकरसरांनी मला बोलवून माझ्याकडून कर्ज घे आणि नोकरी लागल्यावर परत कर म्हटलं. खरं तर आमच्या त्यावेळच्या प्राध्यापकांपैकी सर्वात कडक सरांनी स्वतःहून सांगितलं तर मी कर्ज म्हणून तरी घ्यावं की नाही? पण माहित नाही का मी तरीही नाहीच म्हटलं. काळ काही आपल्यासाठी थांबत नसतो. त्या ट्रीपनंतर का माहित नाही बरेच महिने मला इतर मुलं आणि मी यांच्यात उगीच एक दरी जाणवायची. त्याचा त्रास नाही वाटला पण त्यांच्या तिथले संदर्भ असेलेले विषय आले की मी आपसूक गप्प बसे. अर्थात पुन्हा एकदा, काळ काही तिथेच थांबणार नव्हता. त्यामुळे पुढच्या सेमपासून माझं-त्यांचं मैत्र पुर्ववत झालं. 

तो दोन डॉलरच्या प्रश्नाचा उल्लेख मला माझा जुना प्रसंग आठवून गेला आणि मी तेव्हा ती मदत घेतली असती तर तो एक टप्पा आला नसता आणि ते जे काही टीमबिल्डींग मी मिस केलं ते झालं नसतं असं इतक्या वर्षांनी मला प्रथमच जाणवलं. मी मुलाला थोडक्यात माझा अनुभव सांगितला म्हणजे त्याला ही मदत देण्याची थोडी पार्श्वभूमी यावी. 

माझं सांगून झाल्यावर मुलाने मला शांतपणे विचारलं, "आई, तुला किती पैशे हवे होते?"
मी म्हटलं, "चार पाचशे रुपये". 
मग तो म्हणाला, " पण आई दोन डॉलर?"

आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. दोन डॉलर इतकी कमी गरज कुणाची असू शकेल हे माझ्या लहानग्याला जड जात होतं. मग मी एक साधारण पटेल असं उदाहरण देऊन "हम्म, देऊया" हे त्याच्याकडून वदवून घेतलं.
 
बरेचदा या पिढीला "आमच्यावेळी" हा सूर लावायच्या आधी, मुळात त्यांचा त्याच घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन पहिला तरी तो सूर न लावता काम होईल का, असा एक आशादायी विचार माझिया मनात येतोय. तुम्हाला काय वाटतं? 

 
image credits - free images on net


Friday, May 1, 2015

बोलतो मराठी

मागे एकदा गानसंस्कारावर लिहून झालं. ते सुरु आहे पण तरी ती गाणी मुलांना आवडावी म्हणून आपण त्यांना ती ऐकवणेखेरीज  फार काही करू शकत नाही. म्हणजे घोड्याला पाण्याजवळ नेण्यासारखं. त्यांना काय आवडेल याचा आपण काहीच अदमास घेऊ शकत नाही. मागे बरेच दिवस घरात आणि गाडीत वाजता वाजता हे गाणं ऋषांकच्या तोंडात कधी बसलं मला माहित नाही. 

मला स्वतःला येता जाता गुणगुणायची आईसारखीच सवय आहे. एकदा मी "लाभले आम्हास भाग्य", म्हणून थांबले आणि त्याने मग "बोलतो मराठी" पासून सुरु केलं. बरेच दिवस आम्ही हा खेळ खेळत होतो. मग एक दिवस स्काईपवर त्याच्या मावशीला तो म्हणून दाखवत असताना एकदा रेकॉर्डपण केलं. तेव्हा तो पहिली चार वाक्यच नीट बोलत होता.  

खरं तर ही पोस्ट जागतिक मराठी भाषा दिनीच यायची पण तेव्हा पुरावा नव्हता म्हणून राहिलंच. आज नेमकं महाराष्ट्र दिन आहे तर तेही एक चांगलं निमित्त आहे असं वाटतंय म्हणून आज त्याला पुन्हा विचारलं मला गाऊन दाखवशील का? तर आज थोडी जास्त प्रगती आहे. 


मला माहित आहे की एक दोन गाणी आता आली, म्हणून कदाचित त्यांची मराठी कायमची चांगली होईल किंवा मोठे होईपर्यंत राहील असं नाहीये. त्यावर जमेल तितकी मेहनत पालक म्हणून आम्ही घेऊच. पण अशी गाणी आहेत म्हणून आमच्या मुलांना आपण मराठी का बोलतो हे मला आवर्जून सांगावं लागत नाही हे मला  आवडलं. 

इथे घरातली चार आणि स्काईपवर शनिवारी वगैरे होणारी संभाषणं सोडली तर या मुलांना फार मराठीचा संपर्क नाही. त्यामुळे त्यांचं कौतुक जास्त. इतकं छान गाणं पुढच्या पिढीसाठी दिल्याबद्दल कौशल आणि टीमचे पुन्हा एकदा आभार. 

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.