Wednesday, March 21, 2018

माझा आवडता पाळीव प्राणी

मुलं रविवारच्या मराठी शाळेला जाऊ लागली त्याचं हे तिसरं वर्ष.सुरुवातीच्या वर्षांत गृहपाठ होता पण तसा आपल्या भाषेत लल्लू-पंजू लिखाण. धाकट्याचा अजून तसा झेपणेबल आहे पण मोठ्यांचा अभ्यास म्हणजे भारतातल्या शाळेच्या तोडीला येईल (आणि त्यामुळे तो या शाळेला रामराम म्हणेल) या पातळीचा.
तर हा अभ्यास करताना ते वरचं कंसातलं वाक्य सार्थक होऊ नये म्हणून या मुलांच्याच भाषेत सांगायचं तर "फन" यावी असं काही शोधावं असं "माझिया मनाने" घेतलं. घेतलं म्हणजे त्यादिवशी  झालेल्या अभ्यास चर्चेत अचानक लक्षात आलं. 
आजकाल त्यांना माहिती लिहा या प्रश्नातर्गत सहा-सात वाक्ये लिहायची असतात. इथे लिहायचं म्हटलं की आमच्या कपाळावर आठी, डोक्यात कंटाळा वगैरे जंत्री झालेली असते आणि त्याच्याशी भाषेचा संबंध नाही. हाच अभ्यास संगणकावर असेल की बाह्या सरसावल्याचं. तर ते असो.
परवाचा विषय होता "माझा आवडता पाळीव प्राणी". आता मुदलात अभ्यास करायचा नसेल तर या वयातला मुलगा पहिलं जे येईल ते ठोकून देणार त्याप्रमाणे एक चिरकलेला सूर कानावर आला,
"आई, मला  पाळीव प्राणी आवडत नाही. त्यामुळे मी त्याच्यावर काही लिहिणार नाही."
आई: अरे पण तुलाच नाही का वाढदिवसाला मासा बक्षीस मिळाला म्हणून मोठ्या हौसेने तेव्हापासून आपल्याकडे फिश टॅंक आहे. प्राणी आवडत नाही काय? 
आरुष: तो प्राणी नाही आहे. प्राणी म्हणजे कुत्रा वगैरे. 
आई: पाळीव प्राण्यामध्ये मासा येतो. इंग्लीशमध्ये पेट आहे त्याचा अर्थ. आता मासा पण आवडत नाही का? मग का बरं मागच्या महिन्यात चार मासे मेले तेव्हा भोकाड पसरलं होतं?
आरुष: हा म्हणूनच. 
हे म्हणजे मीच हातात कोलीत दिल्यासारखं. आता त्या माशाच्या आठवणीने पुन्हा भोकाड वगैरेंच्या भानगडीत तो अभ्यास राहून जायला नको म्हणून मी विषय बदलणे भाग होतं. तेव्हा हा "फन"चा विचार माझ्या डोक्यात आला. आणि सहज म्हटलं तुला नाही आवडत प्राणी न? मग का नाही आवडत त्यावर लिही. आता समोर गोंधळ. म्हणजे इथे व्यक्तीस्वातंत्र्याच्या देशात आम्ही विषय दिला मग तुम्ही त्यावर काही लिहाच असा काही रूल नसावा असं मला वाटलं म्हणून मी त्या झेंड्याला मनात सलाम करून थोडी गंमत करावी म्हणून त्याला चल मी मदत करते आणि खालील माहिती फायनल केली. 

                                   माझा आवडता प्राणी 

मला प्राणी आवडत नाहीत. प्राण्यांमुळे आई-बाबांना सगळ्यात म्हणजे त्यांना विकत आणायला खूप पैसे द्यावे लागतात.  ते आजारी पडले की आणखी खर्च येतो. प्राण्यांचे केस वगैरे घरात पडले तर खूप साफसफाई पण करावी लागते. घरातल्या माणसांना ऍलर्जी होते आणि मग त्यांना पण डॉक्टरांचा खर्च येतो. आजकाल तर प्राण्यांना ऑरगॅनिक वगैरे महागडी जेवणं देऊन तिथेही खूप पैसे द्यावे लागतात. अशा प्रकारे खूप कामं वाढतात. म्हणून पाळीव प्राणी मला आवडत नाही. 

खरं तर हा निबंध अशा प्रकारे खूप वाढवता आला असता पण लिहिणारी व्यक्ती सात-आठ वाक्यांच्या पुढे आईला जाऊ देईना आणि शिवाय हसूही आवरेना म्हणून आम्ही शेवटी थांबलो. 



नंतर काही वेळाने "लिहा रे, लिहा रे" जा बराच वेळ गजर करून झाल्यावर स्वारी खरंच हा निबंध लिहिणार होती. पण आईने बरीच पटवापटवी करून शेवटी एका इमॅजिनरी मांजरीला हाताशी धरून तो गृहपाठ सार्थकी लावला.