Saturday, November 30, 2019

छोटी छोटी बातें

आज एक बातमी वाचली, नऊ वर्षांपूर्वी एका दहा वर्षांच्या मुलाने अमेरिकतेल्या एका समुद्रकिनाऱ्यावरून एका बाटलीत, एक छोटासा संदेश आणि पत्ता लिहून ती बाटली समुद्रात फेकली. नऊ वर्षांनंतर ती फ्रान्सच्या एका किनाऱ्यावर एका माणसाला मिळाली आणि त्याने पत्रद्वारा संपर्क साधला. आता त्या मुलाचे वय एकोणीस वर्षे आहे. हे पत्र मिळाल्यावर तो मुलगा मानाने पुन्हा दहा वर्षांचा झाला. ते पत्रही तसं भाबडंच होतं. 

माझीही मुलं आता नऊ आणि अकरा वर्षांची आहेत. त्यांच्याशी बोलताना काही वेळा त्यांच्या अपेक्षा किती छोट्या आहेत किंवा एखाद्या प्रसंगात ते कसा वेगळा विचार करतात हे समजतं आणि नकळत हळवं व्हायला होतं. 

परवा आरुषला त्याच्या सेकंड डिग्री ब्लॅक बेल्टच्या प्रॅक्टिससाठी सोडताना विचारलं, " आता ही शेवटची प्रॅक्टिस. उद्या टेस्ट, मग तायक्वांडो संपलं. तुला काय हवं?"  तो निरागसपणे म्हणाला, " आई, उद्या मला स्नॅकसाठी चिप्स देशील?" मी त्याच्यासाठी एखादी सरप्राईज पार्टी करू किंवा त्याला निदान बाहेर जेवायला नेऊ, असा विचार करत होते आणि हा मुलगा माझ्याकडे फक्त चिप्स मागत होता. 

आजकाल काहीवेळा रुषांक आपल्या दादाच्या "दादा"गिरीला कंटाळून असेल एक लहान भावंडं असलं तर बरं असं म्हणतो. त्याच्या बोलण्यात त्याला "भाऊ" हवाय असं दिसतंय. एड्स आम्ही दोघेच असताना मी हा विषय त्याच्याकडे काढला.  तो म्हणाला, "आपल्याला अजून बेबी मिळू शकतात का?" मी हो म्हटलं, पण त्याला सांगितलं की  तुला भाऊच मिळेल असं काही नाही. दोन मुलगे घरात आहेत म्हणजे खरं तर मुलगीच होईल किंवा आवडेल. 

तो थोडा विचारात पडला आणि म्हणाला, " मग आपल्याला आर्या आणि झिनी (या आमच्या एका मित्राच्या जुळ्या मुली) चे कपडे, खेळणी वगैरे घ्यावे लागतील." त्याला आजवर त्याच्या दादाचे, क्वचित इतर ओळखीच्या मोठ्या मुलांचे कपडे मिळतात. (नवेही मिळतात) त्यामुळे आता ही नवी मुलगी वाढवतानाच सोपं उत्तर त्याच्याकडे तयार आहे. मला त्याच्या या चिमुकल्या दृष्टीचं फार कौतुक वाटतं. 

मला वाटतं, आपण मुलांच्या मोठेपणाची तजवीज, त्यासाठीची तयारी वगैरे करणं बरोबर आहे. पण काही वेळा फक्त छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. त्यांच्याबरोबरच्या अशा संवादातली मजा काही और आहे. 

#AparnA #FollowMe


Saturday, July 27, 2019

पाववाला

आम्ही लहान असताना माझी आई आम्हाला बाहेरचं खाणं शक्यतो द्यायची नाही. ऐपतीचा भाग तर होताच पण त्यापेक्षा त्यामागची स्वच्छता वगैरे बाबी पण होत्या. त्यामुळे पावदेखील मी फार कमीवेळा खाल्ला आहे. शक्यतो शनिवार किंवा रविवारच्या दुपारी डोक्यावर काळसर रंगाची ट्रँक घेऊन एक पाववाला यायचा. तो आमच्या चाळीत एका ठिकाणी बस्तान मांडल्यासारखं करून ती उघडली की त्यातले पाव, खारी, नानकटाई इत्यादींचा संमीश्र वास दरवळून जिव्हा खवळून उठे. 

आईला मस्का मारून तिची मर्जी असेल तर मग आम्हाला त्याच्याकडून खरेदी करायला मिळे. मला आठवतं दाताने अजीबात तोडता येणार नाही असा कडक पाव आणि दुसरा अतिशय लुसलुशीत पाव यापैकी एक नगाप्रमाणे त्या दुपारच्या चहासाठी आम्ही घेत असू आणि त्याबरोबर पुढच्या दिवसासाठी खारी किंवा नानकटाई यापैकी काहीतरी वजनावर घेतलं जाई. त्याची ती ट्रँक दोन माळ्याची असे. वरती खारी आणि आतमध्ये नानकटाई तर पाव त्याच्या सायकलच्या मागच्या कॅरियरला लावलेल्या पिवळ्या जाड प्लास्टिकटाईपच्या पिशवीत असत. हे सगळं घेऊन तो वर आलेला असे. जवळजवळ सर्वच बिऱ्हाडं काही न काही खरेदी करत हे त्याला माहित होतं. सर्वांचं झाली की मग तो ती ट्रँक बंद करे आणि मग ते सगळे वासही लुप्त होत. 
मग आम्ही चाळीतून ब्लॉकमध्ये आलो आणि हा पाववाला प्रकार बंद झाला आणि मग सरळ दुकानांमध्ये बेकरीवाल्याने विकायला ठेवलेले पाव, खारी वगैरे अधूनमधून घरी यायला लागली. 

अमेरिकेत आल्यावर जेव्हा केव्हा मी वडा बनवला होता तेव्हा सर्वात जास्त्त मी आपला भारतात मिळणार पाव मिस केला. अर्थात नंतर त्याचीही सवय झाली पण केव्हातरी बेकिंगचा किडा डोक्यात आला आणि आता मुलांना थोडं हेल्थी किंवा घरगुती खाऊ घालण्याच्या निमित्ताने मी आपल्या पद्धतीचा पावही घरी बनवून पाहिला. अर्थात हे खूळ फार दिवस टिकलं नाही पण जेवढे पाव बनवले तेव्हा तो वास  घेताना पाववाला नक्कीच आठवला. 
  
मागच्या विकांताला एक छोटी यर्ट ट्रिप केली. यर्ट म्हणजे छोटा पण मजबूत तंबू त्यात थोड्या बेसिक गोष्टी जसं बंक बेड, साधी गादी आणि मायक्रोवेव्ह व छोटासा फ्रिज असलेलं घर. मग बाहेर ग्रील करण्यासाठी जागा आणि बसायला लाकडी बाक. थोडं बरं कॅम्पिंग म्हणजे अगदी साध्या तंबूत राहायला नको. 

आम्ही राहिलो तिथे सहा यर्ट होते. आमच्या बाजूचा कुटुंब रात्री उशिरा आलं. त्यामुळे तेव्हा फक्त हाय हलो झालं आणि मग कॅम्पफायर आमचं आम्ही करून झोपलो ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठवल्यावर पुन्हा त्यांना पाहिलं. आम्ही घरूनच न्याहारीच्या वस्तू नेल्या होत्या म्हणजे काही बनवायला नको. त्या दुसऱ्या कुटुंबाचं काहीतरी कुकिंग सुरु होत. थोड्या वेळाने बाजूचं एक यर्ट  रिकामी झालं होतं ते स्वच्छ करायला एक माणूस आला. त्याचं काम होत आलं तसं आमच्या शेजारच्या कुटुंबातल्या माणसाने त्याला तुला ब्रेकफास्ट हवा का म्हणून विचारलं. त्या माणसाने नाही म्हटलं. 

मला आमच्या शेजारच्या माणसाचं त्याला आठवणी अन्न द्यायला हवं हा विचार खूप आवडला. मग मी त्याला तसं म्हटलं. त्यावेळी माझ्याबरोबर माझा धाकटा मुलगा पण होता. मग त्याने माझ्या मुलाला विचारलं की मी फ्रेंच टोस्ट बनवला आहे, तुला हवा आहे का? मुलाने हो म्हटलं. त्यावेळी तो सहज म्हणाला की हा पाव मी स्वतः बनवला आहे. हे सांगताना तो इतका उत्तेजित झाला होता की मला ते जाणवलं.  मी एका बेकरीत काम करतो. पहाटे २ ते ८. हा तिथला फेमस सिनामन ब्रेड आहे. माझ्या मुलाला त्याची चव खूप आवडली आणि त्याने ते त्या माणसाला सांगितलं. हे ऐकल्यावर तर तो अजूनच खुश झाला. मग त्याने आम्हाला त्या बेकरीचा साधारण पत्तादेखील सांगितला. 
त्याला पाहून का कोणजाणे मला आमचा पाववाला आठवला. तो पण त्याचे ब्रेड बनवून मग विकायला आणत असे. आम्ही आवडीने पाव घेताना त्याचा चेहरा असा फुलायचा. मला अशी साधी माणसं भेटली की फार आनंद होतो. तसं पाहायला गेलं तर पहाटे दोन वाजता कामावर जायला लागणं हे काही मजेचं वाटत नाही पण त्याला ते येतं  ते तो किती आवडीने करतोय आणि त्याबद्दल अभिमानाने इतरांना सांगू शकतो हे मला भावलं. 
आता पुढच्या वेळी कधी सिनमन ब्रेड घेतला की मला हा पाववाला नक्की आठवेल. 

#AparnA #Followme


Sunday, February 10, 2019

सात माळ्यांची कहाणी - सहावा माळा

जो जो वर जावे तो तो हवा थंड होत जाते असं म्हणतात. हवा थंड नक्की होत असेल याबद्दल काही शंका नाही पण डोकी जास्त गरम होत असावीत याबद्दल माझी खात्री आहे. सहावा माळ्यापासून हा हवा विरळ झाल्यामुळेचा डोक्याचा गरमपणा वाढला असावा का यावर संशोधन व्हायची गरज आहे. 

आमच्याकडे सहाव्या माळ्यावर म्हटलं तर चार बिऱ्हाडं राहतात पण आवाज लावणारं एक विचारेंचं कुटुंब पाहिलंत तर बाकीची तिन्ही कुटुंब झाकोळून जातील. विचारे या इमारतीत पहिल्यापासून राहतात आणि आजवर त्यांचं इथल्या कुणाशीच पटलं नाही असा इतिहास एका दुसऱ्याच व्यक्तीने मला सांगितला आहे. यांची दोन्ही मुलं कुठे परदेशात असतात. त्यामुळे आवाज वर आहे की तिथे ते यांना बोलवत नाहीत याचं फ्रस्ट्रेशन हे मला कळत नाही अशी पुस्ती माहिती देणाऱ्या व्यक्तीने जोडली होती. एकदा मला सातव्या माळ्यावर त्यांच्या वरच्या घरात राहणाऱ्या एका आज्जीना भेटायला जायचं होतं. चुकून यांची बेल वाजवली पण लक्षात आलं तर पळून न जाता मी इमानदारीत माफी मागायला थांबले तर विचारे बाईंनी माझीच तासली. बरं काढा फ्रस्ट्रेशन म्हणून मी उभी तर त्यांच्या शेजारच्या बिऱ्हाडात राहणाऱ्या कुणा आंटीना जागं करून कसा (परदेशात राहणाऱ्या) मला सेन्स नाही वगैरे ऐकवून झालं.मला मी सहाव्या माळ्यावर राहत नाही याचं इतकं बरं वाटलं की बास. 

तर त्यांच्या शेजारी या आंटी राहतात इतकंच कळलं. माझ्या अनुभवावरून आणखी या आंटी एकट्या आहेत का काय या सर्व माहितीत मला काहीच रस राहिला नाही. लिफ्टच्या एका कडेला हीदोघे आणि लिफ्टच्या दुसऱ्या बाजूचा फ्लॅट अगदी अलीकडे भाड्याने गेला. मागच्या वर्षापर्यंत पाटील कुटुंबीय इथे राहत होते. श्री पाटील शिक्षक आणि त्यांची पत्नी बीएआरसीमध्ये काम करत असे. त्यांना मुलं नाहीत आईने उगाच पुरवलेली माहिती. मी खरं ते सेक्रेटरी होते तेव्हा काहीतरी कामासाठी त्यांच्याकडे गेले तेव्हा मला फार प्रसन्न वाटलं. इतक्या घाईतसुद्धा मला तेव्हा संक्रांत नुकतीच सरत होती म्हणून तिळगुळ, हळदीकुंकू वगैरे देणाऱ्या पाटलीणबाई मला फार आवडल्या. सरही बोलायला चांगले आणि सोसायटीसाठी मुद्दाम वेळ देऊन काम करणारे वाटले. मग इतक्यात त्यांना बीएआरसीच्या क्वार्टर्समध्ये जागा मिळाली त्यामुळे आहे तसा फ्लॅट भाड्याने देऊन ते गेले. 

आमच्या बरोबर वरती म्हणजे जिन्याच्या जवळच्या फ्लॅटमध्ये एक आज्जी त्यांच्या मुलाच्या कुटुंबाबरोबर राहतात. त्यांचा मुलगा, सून इत्यादी कुटुंब मी पाहिले न पाहिले असेल पण त्या त्यांच्या नातवाला संध्याकाळी खाली खेळायला घेऊन गाऊनवरच उतरतात तेवढं मी पाहिलं आहे. आणि जे काही त्या माळ्यावर एक दोन वेळा गेले असेल तेव्हा दरवाजा सताड उघडा ठेवून तिथेच फतकल मारून आज्जी बसलेल्या असतात हे पाहिलं आहे. मला तसं टिपिकल चाळ मेन्टॅलिटीमधली माणसं पहिली की थोडा वैतागच येतो. एक दोनवेळा दुपारी कुणीतरी जोरात ओरडून मग मुलाचा रडण्याचा आवाज वगैरे आला तेव्हा नक्की या आज्जीच्या नातवाचा असेल असं वाटून गेलं, 

एकदंरीत आवाजी मजल्यांची सुरुवात आमच्याकडे सहाव्या माळ्यावरून होते. त्यामुळे जो जो वर जावे तशी डोकी गरम होतात अशी एक नवी म्हण सुरु करावी असंच म्हणते. 

#AparnA #FollowMe

Tuesday, January 29, 2019

सात माळ्यांची कहाणी - पाचवा माळा

या ज्या इमारतीचं मी गेले चार माळे वर्णन करतेय त्यातल्या सर्वात महत्त्वाचा माळा म्हणजे पाचवा माळा. का हे वेगळं सांगायला हवंच का? अस्मादिकांचं मुंबईतलं घर पाचव्या माळ्यावर आहे. पण अर्थात तेच काही महत्वाचं कारण नाही. असंही साऊथ मुंबईमध्ये टॉवर संस्कृती यायच्या आधीही चार माळ्याच्या (बिना लिफ्टवाल्या) इमारती होत्या.थोड्या फार इथे उपनगरातही असाव्यात. पण इमारतींची उंची वाढली ती पाच माळे आणि त्यापुढून म्हणजे खऱ्या अर्थी टॉवर ही व्याख्या पाच माळ्यांच्या पुढे सुरु होते. 

तर अशा या महत्वाच्या मजल्यावर आमचं घर आणि आणखी दोन घरं आहेत. इथे जरा सर्वधर्मसमभावाचं वातावरण आहे. आमच्या शेजारी राहतात ते मराठीच कुटुंब शेणवे म्हणून आणि लिफ्टकडचे दोन फ्लॅट्स एकत्र करून तिथे मिसेस डिकॉस्टा आपला नवरा आणि तीन मुलं यांच्याबरोबर राहतात. 

मी म्हटलं तर फक्त व्हिसीटींग फॅकल्टी त्यामुळे मला या शेजाऱ्यांनी ओळखायचं काही काम नाही. शेणवे बाई अगदी तस्सच माझ्याशी वागतात. लिफ्टच्या उजव्या बाजूच्या घरात त्या राहतात आणि त्यांना एक गोजिरवाणी मुलगी आहे पण बिलकुल हास्य नाही. एकदा मी शनिवारी बाहेर पडताना स्वतः हसून काही बोलायचा प्रयत्न केला तर फक्त "आज विकेंड" म्हणजे काय ते आपण अर्थ काढा असं काहीसं. तर ते असो. त्या कुठेतरी नोकरी करतात आणि त्यांचा नवरा आयटीत आहे ही आईने दिलेली मौल्यवान माहिती. 

पण समोरचं डिकॉस्टा कुटुंब तसं त्यामानाने चांगलं. केव्हातरी आई आजारी होती म्हणून मी एकटीच गेले होते तेव्हा माझ्याशी खास ओळख करून तब्येतीची चौकशी केली. नंतर एका रेस्टॉरंटबाहेरच्या दाबेली स्टॉलकडे आंटी दिसल्या तेव्हा त्यांच्याबरोबर मुलगा होता त्याच्याशी ओळख करून दिली. केव्हातरी ते अंकलपण लिफ्टमध्ये भेटले की मुलांची चौकशी. मुलांना घेऊन गेले तेव्हा त्यांचं कौतुक वगैरे केलं. 
नेमके काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे रात्री मोठया आवाजात गाणी आणि दुसऱ्या दिवशी बाहेर कचऱ्यात ठेवलेल्या बाटल्यांचे थर पाहून मी लिफ्टमध्ये अंकलना विचारलं "काय मोठी पार्टी की काय?" त्यावर अंकलनी मला सांगितलं "माझ्या मुलांच्या गर्लफ्रेंड्सबरोबर त्यांना पार्टी करायची होती. मी म्हटलं की काय ते घरीच करा. आपली मुलं कुठे बाहेर जाऊन काही भलत्या बातम्या यायच्या ऐवजी मला वाटलं आपलं इतकं मोठं घर आहे ते केव्हा कामाला येणार?" मलाही त्यांचं म्हणणं पटलं. 

आता राहिलं माझं घर. कोणे एकेकाळी इन्व्हेस्टरचा असलेला हा फ्लॅट मी मुंबईत माझं घर असावं म्हणून घेतला आणि मग अनेकांनी भरीस घातल्यामुळे भाड्याने दिला. दोन-तीन वेळा भाडेकरू बदलून आणि घराची यथेच्छ वाट लावून घेतल्यावर काही इतर घरगुती अडचणींमुळे थोडं काम करून मग रिकामीच ठेवला. काही वर्षांपूर्वी मग थोडं बेसिक फर्निचर करून आईबाबांना इथेच राहा म्हणून सांगितलं. घर राहतं राहतं आणि मी जाते तेव्हा मलाही राहायला मिळतं. या घराशी माझं वेगळं नातं आहे. माझी पहिली सरप्राईज ट्रीप मी याची चावी माझ्याकडे होती त्यामुळे करू शकले. घरात कुणीच नव्हतं आणि बॅग्ज तिथे ठेऊन मग आई आणि ताईकडे मी गेले होते. एकटीने तिथून तीनेक आठवडे काम करून आईच्या एका शस्त्रक्रियेच्यासाठी मी थांबूही शकले. एकदा माझी एक कोल्हापूरची मैत्रीण मला भेटायला आणि थोडीफार मुंबई भटकंती (आणि मुख्य शॉपिंग) साठी आली होती तेव्हा एक विकेंड आम्ही दोघीच मस्त राहिलो आणि भटकलो. अजूनही कधी एकटीने राहायची वेळ आली तर माझी पहिली पसंती पाचव्या माळ्यावरच्या माझ्या घरालाच असेल. 

माझ्याकडे मदतीला येणाऱ्या दोन्ही तायांना मी सांगितलं आहे या घरात आई-बाबा असो वा नसो मी आले की तुम्हीच माझ्यासाठी यायला हवं आणि सध्या तरी त्यांनी ते मान्यही केलं आहे. माझं घर तसं इमारतीच्या मागच्या भागात येत त्यामुळं मुख्य रस्त्याची वर्दळ मला पाहायला मिळत नाही पण मुलं खाली खेळत असतील तर ते वरून दिसतं. तसही हा घरांना बाल्कनी नाही आहे त्यामुळे बाहेर जायचा फील नाही. ही एक तक्रार सोडली तर माझं घर मला फार आवडतं. 

या माळ्यावर एक खडूस आणि एक नॉर्मल कुटुंब आणि एक आमचं, अर्थात कसं ते स्वतःच काय सांगणार अशी त्रिकूट राहतो. पण या माळ्यावर मी ती एक पार्टी सोडली तर कुणाचाच आवाज वाढलेला कधी ऐकला नाही. एकच लहान मुलगी आणि ती बहुतेक आईबरोबर राहणारी असल्यामुळे तोही आवाज नाही. अशा शांत माळ्यावर राहायला कुणाला आवडणार नाही? 

 
#AparnA #FollowMe

Saturday, January 12, 2019

सात माळ्यांची कहाणी - चौथा माळा

चौथा माळा म्हणजे, ज्यांनी ऑफिशियली लिफ्ट वापरली पाहिजे त्याची सुरुवात करणारा माळा. खरं तर तिसऱ्या माळ्याने तो मान मागायचा प्रयत्न केला होता पण चढउतारापेक्षा चढताना खरं दमायला होतं ते चौथ्या माळ्यालाच. त्यामुळे हा माळा यासाठी निवडला गेला तर नवल वाटायला नको. 

चौथ्या माळ्यावरच्या लोकांनाही या गोष्टीची जाणीव का अभिमान इतका की कुठेही लिफ्टमध्ये गेले की पहिले चार आकडाच दाबतील. माझी एक मावसबहीण तिच्या इमारतीत चौथ्या माळ्यावर राहते. ती आमच्याकडे पाचव्या माळ्यावरून खाली जाताना आधी चार आणि मग ग्राउंड दाबते. सवय आणि काय? :)

इतर माळ्यावर चार घरे असताना चौथ्या माळ्यावर लिफ्टजवळचे दोन फ्लॅट जोडल्यामुळे तशी तीनच बिऱ्हाड आहेत. यात चढताना जिन्यासमोरचं घर एका विक्षिप्त माणसाचं आहे असं मला वाटतं . विक्षिप्त अशासाठी की बरेचदा मी यांना लिफ्टमध्ये वर जाताना इतरांना उगाच "टुकटुक" करून जाताना पाहिलं आहे. 

एकदा मी लिफ्टमध्ये बहिणीबरोबर वर जात होते तर हा विक्षिप्त माणूस आला. मग वर जायच्या आधी उगाच दार उघडून मागून येणाऱ्या कुणालातरी "तुम्ही थांबा आता" म्हणून मग लिफ्ट वर नेली. लिफ्टमध्ये एकावेळी तीनच व्यक्ती जाऊ शकतात हा नियम आहे पण त्यासाठी अशाप्रकारे कुणालातरी खास सांगण्यासाठी लिफ्ट थांबवणे मला तरी विक्षिप्तपणाचे वाटते. 

उतरताना जिन्याजवळचं घर बाहेरुन पाहण्यासारखं इमारतीतलं एकमेव घर आहे असं म्हणायला हरकत नाही. हे घर एका कलाकाराचं आहे हे कळण्यासारखा बाहेरचा लाकडी सुबक दरवाजा. उजवीकडे लाकडी घनता आहे. जिला अतिशय सुरेख लाकडी लोलक असलेली दोरी आहे. या सर्वांपेक्षा सुरेख त्यांच्या आडनावाची पाटी  आहे. इथे चव्हाण कुटुंबीय राहतात. त्यांची मुलगी राधा आर्कीटेक्चर आहे. ही  पाटी तिनेच केली आहे. तिची आई मंत्रालयात मोठ्या पदावर आहे. त्या घरात असल्या की संध्याकाळी विशेषतः रात्री, त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच असतो. त्यांतून मिसेस चव्हाणांचा मोठा आवाज आणि टीव्ही सिरीयलचा आवाज आणि काही वेळा घरी आलेल्या पाहुण्यांचा आवाज अशी आवाजांची स्पर्धा सुरु असते. एकदा मी भारतात मुक्कामाला असताना या घरातून मला पुरणपोळी आणि मटणाचा नैवेद्य मिळाल्यामुळे मी या घरच्या कुठल्याच आवाजाची तक्रार करत नाही. या घराच्या बरोबर वर माझं छोटं घर आहे हे आणि राधानं माझ्या अमेरिकेच्या घरची आडनावाची पाटी बनवली आहे, हे सांगायचं राहिलं. आमची पाटी तिच्या घरापेक्षा छान झाली आहे असं मला वाटतं. त्यानंतर तिने माझ्या वरच्या घराची पण पाटी बनवावी अशी माझी इच्छा होती. पण तो योग अजून आला नाही आहे. 

लिफ्टच्या उजव्या बाजूला जोडलेले दोन फ्लॅट्स हे या इमारतीमधील पहिले जोडलेले फ्लॅट्स. या घरात एक दोन भावांचं एकत्र कुटुंब राहतं. "बहिणी-बहिणी, जावा-जावा" आईने पुरवलेली जादाची माहिती. मी या घरातून जा-ये  पाहिली नाही म्हणजे शांत कुटुंब असणार असं माझं गृहीतक. तसंही आजकालच्या जमान्यात कोण एकत्र कुटुंबात राहातं? ते तसं राहतात यातच बरंच काही आलं. माझ्या दोन मावश्या पैकी एक सख्खी जोडी आणि दुसऱ्या आईच्या मामेबहिणी याही जावा-जावा आहेत. पण मुलं मोठी झाल्यावर जागा पुरत नाही या कारणाखाली का होईना, वेगळी चूल मांडलीच. या पार्श्वभूमीवर मला या बिऱ्हाडाचं कौतुक वाटतं. 

या घरात मुलं असायला हरकत नाही. पण मी जाते तेव्हा शाळा सुरु असतात. त्यामुळे हीच काय इतर माळ्यावरची मुलंही विरळाच दिसतात. त्यामुळे खरं चौथा माल शांततेत गणला जायला हवा होता. 

पण आधी म्हटलं तसं हस्की आवाजातल्या चव्हाण बाईंचा आवाज, तसंच त्यांच्या रात्री मोठ्या होणाऱ्या टीव्हीचा आवाज आणि त्यांच्याकडे पूजा किंवा इतर निमित्ताने होणारी पाहुण्यांची रेलचेल या कारणांमुळे तसा एकंदरीत जागृत असा हा चौथा माळा. 

#AparnA #FollowMe