Tuesday, December 27, 2011

देता देता एक दिवस.....

ट्रेसीची माझी ओळख मागच्या वर्षी उन्हाळ्यातली, ती माझ्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहायला आली तेव्हाची.खरं तर तेव्हा तिच्यापेक्षा तिच्या सासूबरोबर जास्त बोलले होते मी..मला वाटतं ओरेगावच्या कुठल्यातरी टिपीकल कंट्री साइडवरून त्यांचा मुलगा,सून ट्रेसी आणि नातू इथे पोर्टलॅंडच्या जवळ मुलाला जॉब मिळेल म्हणून मुव्ह झाले होते. आई-बाप आपल्या मुलाला मदत करत असणार असं त्यांच्या बोलण्यातून वाटत होतं. नेमकं ते त्यांचं सामान वर आणत होते आणि जेवायला नवरा दुपारी घरी येणार म्हणून मी मस्त नारळाचं दूध घातलेलं कोळंबीचं कालवण करत होते. त्याने हाय करताना दार उघडं ठेवून माझी ओळख करुन दिली आणि मी आता हा वास सगळा बाहेर जाणार म्हणून मनातल्या मनात काहीतरी विचार करतानाच ट्रेसीची सासू दिलखुलासपणे म्हणाली होती...."whatever you are cooking, it smells out of this world...." हुश्श...तसंही भारतीय जेवण सर्वांनाच आवडतं म्हणा. नंतर त्यांना काहीतरी मदत हवी होती ती करून नवरा घरात आला.
यथावकाश हाय हॅलोच्या पुढेही आम्ही गेलो...अगदी फ़ार नाही पण मला बाळ होणार आणि इथे कुणी नाही तर माझी काही मदत हवी का म्हणून तिने विचारूनही झालं आणि एक दिवस पुन्हा एकदा तिची सासू मला भेटली आणि तिच्याशी बोलल्यावर मला एक छोटा धक्का बसला.म्हणजे ट्रेसीचा नवरा इथे नवीन काम शोधण्यासाठी प्रयत्न करतोय असं काहीसं माहित झालं होतं.पण याचा अर्थ सध्या त्यांच्या कुटुंबात कुणीच कमवत नाही हे माझ्यासाठी नवीन होतं.
अमेरिकन इकॉनॉमीचा फ़टका बसलेलं हे कुटूंब, ट्रेसीच्या नवर्‍याची गावातली नोकरी गेल्यामुळे तिथलं घर वगैरे कदाचित गेलं असणार, आता इथे मिळणार्‍या अनएम्प्लॉयमेंटमध्ये मिळणार्‍या पैशावर आणखी काही महिने त्याला नोकरी मिळते का हे पाहायला आले होते. इतर कुणी म्हटलं असतं तसं जे मी करायला हवं होतं ते केलं. तो इलेक्ट्रीशीयन आहे म्हणजे नवर्‍याच्या कंपनीत इलेक्ट्रीक डिपार्टमेंटमध्ये काही असेल तर नक्की कळवेन म्हणून मी सांगितलं.संध्याकाळी नवर्‍याबरोबर त्यांच्याविषयी चर्चा करताना त्यालाही धक्काच बसला आणि त्यात त्यांच्याकडचं हायरिंग फ़्रीज त्यामुळे वाईट वाटलं...
नंतर माझेही भरत आलेले दिवस आणि थंडीत य़ेणारा पाऊस...आमच्या भेटी कमी झाल्या पण समोर दिसलो की मला उगीच आपण काहीच करू शकत नाही असं वाटायचं..आणि मग मागच्या डिसेंबरमध्ये घरात बाळ आलं....आम्ही बरेच व्यस्त झालो आणि एक दिवस अकराच्या सुमारास दारावर थाप पडली. ट्रेसी आणि तिचा मुलगा कॅमेरॉन....
"आम्हाला तुझं बाळ पाहायचं..हो की नाही कॅमेरॉन?"
"अगदी नक्की...कसं सुरू आहे तुमचं??" माझा कसानुसा प्रश्न....
एका खूप छान सजवलेल्या गिफ़्ट बॅगमध्ये नव्या बाळासाठी कपडे, सॉक्स,एक सॉफ़्ट टॉय आणि अर्थातच अभिनंदनाचं छानसं कार्ड...मला घेताना भरून आलं...
आम्ही या विषयावर खरं तर कधीच बोललो नव्हतो...पण मला खूप बरं वाटलं की त्यादिवशी पहिल्यांदी ट्रेसीने मला सांगितलं...

"Well you know my husband is still looking for the job and we are living on unemployment. Can your husband look for any opening in his company??"
"Oh Tracy, we talked about it and he is looking every week on his office portal....Lets hope for the best. I will surely let you know if something comes up."

त्या डिसेंबरमध्ये जेव्हा माणसांची बदलेली रुपं मी पाहात होते, एक नवा जीव या जगात आणून त्याच्या भवितव्याचा अवास्तव विचार करत बसले होते त्यावेळी मला ट्रेसीच्या छोट्या कृतीने नक्की काय वाटलं हे सांगायला खरं तर शब्द अपुरे आहेत....

मला सांगा जिथे रक्ताच्या बर्‍याच नात्यांना एक साधा फ़ोन करायला परवडत नव्हतं की बाळाचं विचारायला फ़ुरसत नव्हती...तिथे निव्वळ शेजार्‍यांच्या घरी एक नवा जीव जन्माला आला आहे, त्यांचं जवळचं कुणी इथे नाही म्हणून आपले सध्याचे प्रश्न बाजुला ठेऊन शिवाय पदरमोड करुन त्यांच्या आनंदात सहभागी होणारी माझी शेजारीण..नात्याची-गोत्याची जाऊद्या एका देशाची पण नाही...आणि त्याही पुढे जाऊन बोलायचं तर त्यांच्या देशात येऊन त्यांच्या नोकर्‍या मिळवणार्‍या कुणाशीतरी इतकं चांगलं का वागू शकते.....

आता माझ्याकडे आहे म्हणून मी काही दिलं तर माझं जाणार नाही हे खरंच पण जवळ काहीच नसतानाही आमचा विचार करून आमच्या आनंदात सहभागी होणार्‍या ट्रेसीने माझ्यासारखंच आणखीही कित्येक लोकांच्या डोळ्यात अंजन घालावं म्हणून हे लिहितेय...नाहीतर मागच्या आणि या ख्रिसमससाठी कॅमेरॉनला न विसरता आमच्या लिस्टवर ठेवताना मला नक्की काय वाटतं हे सांगणं तसं कठीण आहे...शेवटी काय आहे कुणा राजकारण्यांनी कारभार करुन मंदी आणली म्हणून मी त्यांच्या मागे लागू शकत नाही की तिच्या नवर्‍याला नोकरी मिळवून द्यायचंही माझ्या हातात नाही आहे..पण तिच्या कृतीने आत्ताच्या घडीला आपल्या शेजार्‍याला आनंदाचा एक क्षण देणं किती काही शिकवून जातं हे सगळंच शब्दात मांडण खरंच कठीण आहे...



तळटीप....
त्यानंतर आणखी दोनेक महिन्यांनी ट्रेसीच्या नवर्‍याला नोकरी लागली आणि तिचा आनंदी चेहरा मला बरंच काही सांगून गेला...फ़ार अपेक्षा नव्हतीच तिची....

She was so happy when she told me...."I wanted to tell you the good news..He got a job....Now we can get our own insurance and Cameron would be so happy to start the school this summer..."

22 comments:

  1. अप्रतिम लिहिलंयस. खूप छान.

    आणि अभिनंदन !

    ReplyDelete
  2. अपर्णा, सुंदर लिहिलं आहेस. आणि कठीण प्रसंगातच माणसं खरी कशी आहेत हे समजतं ग!

    ReplyDelete
  3. अपर्णा;
    छान लिहील आहेस, खरच आहे.. प्रत्येकाला असाच वाटत कि माझ्या आयुष्यातच सगळे प्रोब्लेम्स आहेत.. पण असा काहीसा वाचला किवा पाहिला कि पटत कि आयुष्याच्या शर्यतीत सगळेच धावत आहेत, खाच-खळगे वाट्याला आले नाहीत तर ती वाटच काय...?? अथवा ती वाटचाल करण्याची मज्जाच काय..??

    आयुष्य जितकं अनुभवू तितकाच ते पूर्णपणे जगू... साध नि सरळ गणित आहे हे... :)

    ReplyDelete
  4. अपर्णा;
    छान लिहील आहेस, खरच आहे.. प्रत्येकाला असाच वाटत कि माझ्या आयुष्यातच सगळे प्रोब्लेम्स आहेत.. पण असा काहीसा वाचला किवा पाहिला कि पटत कि आयुष्याच्या शर्यतीत सगळेच धावत आहेत, खाच-खळगे वाट्याला आले नाहीत तर ती वाटच काय...?? अथवा ती वाटचाल करण्याची मज्जाच काय..??

    आयुष्य जितकं अनुभवू तितकाच ते पूर्णपणे जगू... साध नि सरळ गणित आहे हे... :)

    ReplyDelete
  5. खरंय गं...खरंच मोठी गोष्ट आहे...म्हणजे सगळी सोंग आणता येतात पण पैश्याचं नाही....आणि तरी देखील भेटवस्तू घेऊन हसतमुखाने येणं...म्हणजे भारीच...
    मी विचारात पडले...मला जमेल का असं काही....? उत्तर ठामपणे नाही देता आलं...

    ReplyDelete
  6. ह्म्म्म! कुठेतरी हा प्रसंग मनात घर करुन गेला. छान लिहिलंस गं !

    ReplyDelete
  7. ग्रेट अनुभव !! खरंच काही वेळा लोकं साध्याशा वागण्यातून एवढे मोठे धडे देऊन जातात की बास..

    अनघा + १

    ReplyDelete
  8. स्वत:चं दु:ख विसरून दुसर्‍याच्या आनंदात सहभागी होण्याची कला सगळ्यांनाच जमत नाही. अशीच माणसे आपलं आयुष्य सुंदर करुन जातात. छान अनुभवकथन.

    ReplyDelete
  9. आभारी अपूर्व आणि हो अभिनंदन आताही चालेल ...नुकतंच बाळ वर्षाचं झालंय पण तू हे वाचलं नाहीस का...

    ReplyDelete
  10. गौरी खरय ग....कठीण प्रसंगात माणसाचं खर रूप दिसतं....

    ReplyDelete
  11. श्वेता ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जून लिहिल्याबद्दल खूप खूप आभार...आयुष्यात खाचखळगे यायचेच...पडता पडतही दुसऱ्याला आधार देणारी ट्रेसी म्हणून मला वेगळी वाटली...

    ReplyDelete
  12. अनघा तुझ्यासारखं माझंही झालं होत ते गिफ्ट घेताना....आणि ती गेल्यावर मी अश्रू आवरू शकले नाही.....खूप मोठं मन असण म्हणजे नक्की काय ते हेच का ग....

    ReplyDelete
  13. दीपक मलाही हा प्रसंग कायम लक्षात राहणार..आता वाढदिवसाला येत आलं नाही म्हणून कॅमेरोन पुन्हा ऋषांकसाठी खेळ घेऊन आला तेव्हा मग विचार केला की मला हे ब्लॉगवर लिहायला हवंच ......

    ReplyDelete
  14. हेरंब मलाही हा धडा खूप मोलाचा वाटतोय....

    ReplyDelete
  15. दिपक, तू म्हणतोस तसच आहे ....अशी माणसं आपलं जीवन सुंदर करून जातात..त्या दिवशी इतर काही कटू प्रसंगाचा विचार मी करत बसेल होते त्या ऐवजी ट्रेसीच्या कृतीने मी इतकी भारावले की देण्याचा हा एक सुंदर विचार माझा दिवस चांगला करून गेला....

    ReplyDelete
  16. Khup aavdali hi post.

    AN lihilas suddha kiti oghvat.

    ReplyDelete
  17. हृदयस्पर्शी आणि तितकीच सुंदर पोस्ट.

    ReplyDelete
  18. खूप खूप आभार सागर आणि सिद्धार्थ...

    ReplyDelete
  19. अप्रतिम ! फार छान अनुभव.. अमेरिकेत आम्हालाही अशी काही प्रेमळ माणसं भेटली..
    असा ठासून भरलेला चांगुलपणा पाहीला की कावरं बावरं व्ह्यायला होतं. ठेचा लागायची व त्यामुळे सतत 'सावध' रहायची सवय लागल्याने.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार रे राफ़ा..

      "ठेचा आणि सावध" हो अगदी नेमक्या शब्दात लिहिलंस बघ...ही पोस्ट माझ्या खूप जवळची आहे. कधीही वाचली की तो प्रसंग डोळ्यासमोर येतो आणि नकळत पाणी येतं. बरं एक चांगली बातमी तुझ्या कमेंटच्या निमित्ताने, मागच्याच महिन्यात ट्रेसीने नवीन घर घेतलं आणि ती आता जरा दोन गावं पल्याड गेली. आम्हाला घरी यायचं निमंत्रण आहेच....
      आपण म्हणतो नं चांगलं वागलं तर त्याची चांगली फ़ळं नक्की मिळतात. हिच्यासाठी मला ते अगदी अगदी प्रत्यक्ष पुरावा म्हणून देता येईल....:)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.