Saturday, September 30, 2017

चेंगराचेंगरी आणि आपण

माझी मावशी परळला राहायची. तिला जाऊन आताशा महिना झाला. मी यंदा काही अचानक आलेल्या घरगुती कामामुळे मुंबईला गेले तेव्हा ती मुलाकडे पुण्याला होती त्यामुळे आमची भेट फक्त फोनवर झाली. अगं पुढच्यावेळी येशील तेव्हा माझ्याकडे राहायला घेऊन येईन या माझ्या शब्दांना आता काहीच अर्थ नाही. या मावशीकडे मी असंख्य वेळा गेले आहे. रुपारेलला असताना तर तशी संधीही होती. त्यावेळेस आम्ही वेस्टर्नवाले सोप्पं पडतं म्हणून दादरला गाडी बदलून एल्फिनस्टनच्या या पुलावरून असंख्य वेळा गेलो आहोत. तेव्हाही तो चिंचोळा रस्ता तसा का असावा असा प्रश्न पडायचा. आई बाबा आणि आम्ही मुलं एका ओळीत चालायचो. मग पूल संपला की हुश्श बाबांचा हात पकडता यायचा.मागच्या महिन्यात ताईला मी म्हटलं देखील आता आपलं परळ खऱ्या अर्थाने संपलं.  

यावेळी मैत्रिणीच्या घरी जायच्या निमित्ताने परळला जाणं झालं. तिने मला बांद्रयाला भेटून पुढे टॅक्सीने मी पाहिला नाही म्हणून वरळी सीफेसच्या मोठ्या पुलावरून टॅक्सी नेली. मग गप्पा मारून झाल्या तशी तिच्या गाडीने मला परळच्या पुलापाशी सोडलं आणि गाडी मध्ये उभी करायला जागा नसते म्हणून दुसऱ्या टोकाशी सोडून फारा दिवसांनी मी त्या पुलावरून चालले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तो रविवारचा दिवस होता त्यामुळे फार जास्त लोकंही नव्हते.
 
काल जेव्हा पेपरमध्ये ती चेंगराचेंगरीची बातमी वाचली तेव्हा काळीज हललं. काय झालं असेल या विचारानेच कसंतरी वाटलं. या ठिकाणी कधी काळी आपणही होतो या विचाराने आणखी हैराण व्हायला होतं. अशा घटनांच्या जबाबदारी कुणीतरी स्वीकारतं का? आणि समजा स्वीकारली तरी गेलेले लोकं परत येणार आहेत का? गर्दीचं मानसशास्त्र वेगळं असतं. आपल्याला मुळात एक बेसिक पेशन्स लागतो तो आपल्यात आहे का हेही या ठिकाणी तपासून पाहायला हवं. मला माहीत नाही नक्की किती लोकं एकावेळी होते पण शांतपणे एक एक जण फक्त पुढे पुढे जात राहिला असता तर झालेली घटना टळू शकली असती का असा मी आपल्या बाजूने विचार करतेय. इथे कुठेही सरकारने गेली कित्येक वर्षे इथे बदल केले नाहीत वगैरे गोष्टी तूर्तास बाजूला ठेवल्या आहेत.
 
मी एका ठिकाणी कामावर जायचे तो फक्त १७ मैलाचा रस्ता तुडवायला काहीवेळा मी तासभरही घालवला आहे कारण इथेही असा एक लोकल हायवे आहे जिथे ऑफिसच्या वेळात पार्किंग लॉट म्हणावा तशी गाड्यांची गर्दी असते पण या गाड्यांच्या जमावाला सरळ जायची शिस्त असते आणि मुंगीच्या पावलाने आम्ही पुढे सरकत राहतो. तीच गत एखादा खेळ किंवा नाटक वगैरे पाहून झालं की बाहेर पडताना आता माझा नम्बर कसा पहिला लागेल वगैरे न पाहता आहे ती रांग न मोडता शांतपणे लोकं सरळ पुढे जातात. 

मुंबईचा वेग ज्या शहरात मी आहे त्याला नसेल असं मान्य केलं तरी शिकता यायचं असेल तर हा एक गुण मी नक्की माझ्या जवळच्यांना शिकवायचा प्रयत्न करेन. आताच बाईक चालवायला शिकणारी मुलं डावीकडून पटापट बाईक काढतात त्यांचं कौतुक करायच्या ऐवजी त्यांना कान धरून बाजूला करणारं कुणीतरी आपल्याकडे हवं असं मला नेहमी वाटतं. या चेंगराचेंगरीच्या बातमी वाचून आलेली अस्वस्थता ही आहे की मला माझ्या मुक्कामी पोहोचायचं आहे मग मध्ये मार्गात काही अडथळा आला तर  माझी स्वतःची जबाबदारी काय आहे हे आपल्याला कुठे शिकवलं जाणार हे आपल्याला माहीत आहे का? या प्रश्नाचं उत्तर ज्याने त्याने शोधावं इतकंच उटांवरून शेळ्या हाकणारे माझ्यासारखे लोक म्हणू शकतात. 

या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या आत्म्यांना श्रद्धांजली वाहताना अशा घटना घडू नये म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून इथून पुढे आपण जास्त जबाबदारीने वागावं लागेल हे मात्र जरूर म्हणावसं वाटतं. 

Thursday, June 8, 2017

दोन लक्ष आभार

लिहायचं असतं पण नेमक्या वेळी हातात लेखणी (अर्थात इलेक्ट्रॉनिक) नसते आणि मग तो विषय मनातच राहून जातो. मी स्वतः माझे जुने पोस्ट्स आठवण येते तेव्हा वाचत असते. त्यावेळी वाचकही जुने लेख वाचतानाची नोंद दिसते. अशावेळी काही तरी नवीन लिहायला पाहिजे असं नक्की वाटतं पण अर्थात त्यावेळी काहीच सुचत नाही.

माझी जशी आजकाल मी कितपत सतत लिहू शकेन याची अपेक्षा नाही तसंच इथे सारखं कुणी वाचत राहील ही देखील नाही. आज एक जुनी पोस्ट वाचताना लक्ष गेलं आणि वाचकांचा काटा दोन लाखांच्या पुढे गेलाय हे चटकन ध्यानी आलं.

खरं सांगायचं तर जेव्हा या ब्लॉगरुपी गप्पा मी मारायला घेतल्या तेव्हा खरंच कुणी वाचेल आणि त्याउपर कौतुक करेल हे मला वाटलं नव्हतं. मी माझ्यासाठी लिहीत राहिले आणि जे काही थांबे घेतले तेही माझ्याचसाठी. तरीही वाचकांचा इथला सहभाग अमुल्य आहे. त्यांच्या प्रतिक्रियांनी माझा लिहायचा हुरूप वाढला आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे गेले जवळजवळ नऊ वर्षे या ब्लॉगवर जमेल तसे लिहत गेले आणि आपण वाचत गेलात. आपली दोन लक्ष पावले इथे उमटली त्याबद्दल जाहीर आभार मानण्यासाठी ही पोस्ट. आशा आहे की मी अजून इथे लिहीत राहीन आणि आपण वाचत राहाल.
                                                      दोन लक्ष धन्यवाद.

Thursday, April 6, 2017

ऐ मौत होगा तुझे भी फक्र अभी Thanks to the anonymous Organ Donor

मागच्या वर्षी जूनमध्ये खेळताना दुखावलेला गुढघा घेऊन नवरा घरी आला आणि हे प्रकरण कितपत त्रास देणार आहे याचा मी अंदाज घेत राहिले. तसं वरवर पाहताना तो ठीक होता पण आतले स्नायू पुन्हा नीट करणं भाग होतं. यथावकाश ती सर्जरी प्लॅन झाली.

मायाजालाच्या रूपाने जास्तीची माहिती घेऊन जेव्हा आम्ही शेवटी ऑपेरेशन रूममध्ये गेलो तेव्हा त्याच्यासाठी रोपण म्हणून स्वतःचा लिगामेंट किंवा एखाद्या डोनरचा लिगामेंट असे दोन पर्याय होते.

स्वतःचा लिगामेंट घेणे म्हणजे दुसऱ्या मांडीवरती जखम. आमच्यासाठी अशा परक्या देशात फारशी सपोर्ट सिस्टीम नसताना ही जास्तीची जखम महाग पडेल का असा विचार करून  आणि अर्थात आमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने आम्ही लगेच रोपण करायचा पर्याय निवडला. त्या अनामिक शक्तीवर विश्वास ठेवून मी एकीकडे काम करत राहिले आणि दुसरीकडे डॉक्टर त्यांचं काम करत राहिले. 

मला काहीवेळा या फ्री कंट्रीमध्ये तुम्हाला जरा जास्तच लवकर फ्रीडम देतात असं वाटतं. विशेष करून आजाराच्या बाबतीत. सगळी इन्शुरन्स नावाच्या मोठ्या आम्हा सध्या माणसांच्या आवाक्यात नसलेल्या राक्षसाची कृपा. तर आमचा पेंशट जागा झाल्यावर चला आता घरला जा अशी एकंदरीत तयारी दिसली आणि डिस्चार्ज पेपर देताना मला नर्सने एक लिफाफा दिला. 

कुणाचा तरी इहलोकाचा प्रवास संपला होता पण त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची शेवटची इच्छा म्हणा किंवा कदाचित स्वतःहून ऑर्गन डोनेशन केलं होतं. त्या कागदावर एका संस्थेच्या नावावर आपण आभार प्रदर्शनाचं कार्ड पाठवावं याची सोय केली होती. खरं हा भला आत्मा कोण आणि आम्ही हे दान स्वीकारणारे कोण हे आम्हा दोन कुटुंबाना कधीच कळणार नाही. पण हे आभार मला त्या कुटुंबालाच नाही तर माझ्यातर्फे आणखी काही जणांपर्यंत पोहोचवायचे आहेत. म्हणून हा पोस्ट प्रपंच. 

अवयवदानाविषयी समाज जागृत व्हावा म्हणून एक फिल्म निर्माण केली आहे; तिचं नाव आहे "फिर जिंदगी". यु ट्यूबवर संपूर्ण फिल्म उपलब्ध आहे. या लिंकवर ती नक्की पहा. मी ही फिल्म आई-बाबांबरोबर पहिली आणि नकळत बाबा म्हणून गेले की त्यांना देहदान करायची इच्छा आहे. मी चमकून आईकडे पाहिलं पण तिची यासाठी तयारी दिसली नाही. तर याबाबतीत कायद्याने कागदपत्र केली तरच ते निदान भारतात तरी शक्य आहे असं मला कळलं. बाबांचं माहित नाही पण माझं ऑर्गन डोनेशन मी माझं पहिलं ड्रायवर लायसन्स आलं तेव्हापासून करून ठेवलं आहे. आता नवऱ्यानेही त्याच्या लायसन्सला ते जोडलं आहे.

या चित्रपटाच्या आणि आमच्या अनुभवाने मला तरी याचा चित्रपटात एक वाक्य आहे ते पुन्हा इथे  टाकावंसं वाटतं ते म्हणजे हे असं एक दान आहे, मरणालादेखील अभिमान वाटेल. "ऐ मौत होगा तुझे भी फक्र अभी" चित्रपट नक्की पहा आणि या विषयाचा विचार करा.

मला आज या पोस्टच्या निमित्ताने त्या अनोळखी आत्म्याचे जाहीर आभार मानायचे आहेत. #AparnA

Wednesday, March 8, 2017

ती आणि मी

जसजसं वय वाढतंय तसतसं काम करायची शक्ती वाढावी म्हणून जमेल तसं जिममध्ये जायचा मी प्रयत्न करत असते. जेव्हा सकाळी कामावर लवकर उठून जावं लागे तेव्हा घरची जबाबदारी बाबावर टाकून अगदी सहा वाजतादेखील मी तिथे दाखल झाली आहे. अशावेळी जायचा मुख्य फायदा म्हणजे जवळजवळ कुणीच आलेलं नसतं. आपली गाण्याची प्लेलिस्ट मोठ्याने लावली तरी डोळे मोठे करणारं कुणी नसणार असतं. किंवा शांततेनं दिवसाची सुरुवातही करता येते.

माझ्या वेळेत थोडंफार इथं तिथं होई. पण बरेचदा माझं आटपेस्तो एक तीन चार जणींचा ग्रुप धावून परत लॉकर रूममध्ये मला भेटे. माझी त्यांची ओळख हाय हलोच्या पुढेही गेली. पाश्चात्य देशात लॉकररूममध्ये दिगम्बर अवस्थेत या ग्रुपला पाहताना मला खर तर आता नजर मेल्यामुळे म्हणा किंवा इतका व्यायाम केल्यावर थोडा वेळ असाही काढला म्हणून काय त्यात याची सवय झाली असल्यामुळे म्हणा काही गैर किंवा लाजिरवाणं वगैरे वाटत नाही. उलट आपल्या शरीराला इतकं आपलंसं म्हणून सहज वावरणाऱ्या या बायका मला  योग्य वाटतात.
माझ्याशी त्यांच्यातली एक नेहमी बोले. नेहमीचंच रुटीन बोलणं पण तिने मला तिथे त्या पाचेक मिनिटात एकटं पडू दिलं नाही. आम्ही सर्व त्या क्षणापुरता एकमेकींच्या मैत्रिणी होत असू. या मैत्रीला आणि आम्हाला नावाची गरज नसे.

मागच्या वर्षी मी मध्ये एक वेगळं जिम सुरु केलं होतं. तिथला योगाभ्यास मला आवडत असे फक्त हे जिम थोडं महाग होत आणि नंतर कॉस्ट कटिंगच्या आमच्या दिवसात आम्ही पुन्हा जुन्या जिमवर सेट झालो. तर तिथे एका योग करताना मला "ती" दिसली. साधारण ५५ च्या आसपास वय असेल पण शरीरयष्टी कमनीय आणि योग करतानाचा फिटनेसही अगदी बरोबर. आम्ही हसलो पण तिने नक्की मला ओळखलं का हे मला माहीत नव्हतं. तसंही येत जात कितीतरी अनोळखी व्यक्ती सहजगत्या हाय करून जातात म्हणा.

मग माझं ते जिम सुटलं आणि सकाळी जिमला जायची वेळी मी थोडी उशिरा केली म्हणजे मुलांबरोबर वेळ मिळेल. त्या दिवशी मी थोडी लवकर आणि "ती" थोडी उशिरा असा एक योगायोग आला. मग मी तिला त्या जुन्या जीबद्दल विचारून माझा जुना प्रश्न निकालात काढला. तिने मला तिथेही ओळखलं होत आणि तिनेही काटकसर करायच्या दिवसात ते जिम सोडून दिलं होतं. आज त्यांचा मोठा ग्रुप नव्हता आणि लॉकर रूममध्ये आम्ही दोघीच होतो.

तिला बोलताना दिगंबरावस्थेत जास्त मोकळं वाटत असावं त्यामुळे बोलता बोलता ती माझ्या जवळ आली आणि माझे डोळे एकदम उघडले. तिचे दोन्ही स्तन रोपण केलेले होते. जगाचं आणि बरेचदा स्त्रीचं सुद्धा ज्या अवयवामुळे जास्त लक्ष वेधलं असतं तिला ते नव्हतंच. ते स्वीकारून तिने ज्या उमेदीने बाकीच्या शरीराच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं होतं त्याला मी मनातल्या मनात सलाम केला.

याआधी या संपूर्ण गृपबद्दल वाटणारा अभिमान आज काकणभर जास्त वाढला. अशा कितीतरी स्त्रिया ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करत असतील आणि तरी आपलं रोजचं रुटीन टिकवत असतील. त्यांनी शरीर झाकलं की आपण त्यांना नॉर्मलच समजून त्यांच्याशी वागतो, तुलना करतो. कधीतरी आपण कपड्याआतली त्यांची वेदना पहिली तर त्यांचे हसरे चेहरे आपल्याला बरंच काही शिकवून जातील.


आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त  "ती" आणि अशा अनेक स्त्रियांना माझे कोटी कोटी प्रणाम.
 

Monday, February 13, 2017

कांच पे दिल आ ही गया

सध्या सगळीकडे दिलाची चर्चा सुरु झालीय. फेब्रुवारीमध्ये जर दोघांचा एकत्र फोटो टाकला नाही तर फाऊल मानला जातो म्हणून एक दिवस आधीच आमचा फोटो प्रोफाईलला लावायचं प्रथम कर्तव्य मीदेखील पार पाडलंय. पण यार हे एक दिवसाचं आणि एकाच प्रकारचं प्रेम वगैरे मानणारी माझी पिढी नाही.

भटकंती हे माझं खरं प्रेम आहे (एकटीने आणि त्याच्याबरोबर देखील :) ). एकेकाळी (म्हणजे अगदी मागच्या वर्षापर्यन्त) फिरस्तेगिरी करता करता खरेदी हे पण एका बाजूला प्रेमाने करत होते. आता अचानक विरक्ती वगैरे आली नाही पण काही कारागीर जी काही कला निर्माण करून ठेवतात, त्याला आपण कितीही पैसा दिला तरी त्यांची बिदागी देऊ शकत नाही असं काहीवेळा वाटायला लागलं. अशावेळी एक मधला मार्ग मिळाला तो म्हणजे त्यांच्या अनुमतीने त्या कलेचे फोटो काढायचे आणि शॉपिंग वगैरे करायचं वारं शिरलं तर सरळ फोटो पाहत बसायचं.

आज असेच जुने फोटो पाहताना आमच्या पहिल्या अलास्का फेरीमध्ये एका बंदराला जहाज लागलं तिथे एक छोटी टूर केली होती त्यातल्या एका थांब्याजवळ एक कलादालन होतं. तिथे मिळालेले हे काचकलेचे काही नमुने. हे संपूर्ण दुकानच घेऊन घरी जावं इतके सुंदर आकार आणि रंग त्यांच्याकडे होते. नंतर आमच्या ओरेगावच्या समुद्रकिनारी ग्लास ब्लोईंगचं प्रात्यक्षिक पाहताना हे महाकठीण काम आहे हे लक्षात आलं.

तर अशी ही कला आपण काय पैसे देऊन विकत घेणार? त्या गरम भट्टीत डोकं थंड ठेवून काम करणाऱ्या कलाकारांसाठी व्हेलेंटाईन दिवसही कामाचा असणार. मी मागे एक काचेची बाटली पुन्हा चेपवून त्यावर मणी वगैरे लावून सजवलेलं ताट विकत घेतलं होतं; जे घरच्या साफसफाईत तुटलं. त्यानंतर मी मनमोकळेपणाने अशा चित्रांचा आधार घेते. यात एक ट्रेनचं एक अतिशय सुंदर ग्लास मॉडेल सहाशे डॉलरला पाहिलं तर मी फोटो का काढते हा प्रश्न कुणी मला नक्कीच विचारणार नाही. हजारो ख्वाहिशें मधली ही स्वतः ग्लास ब्लो करायची ख्वाईश ते प्रात्यक्षिक पाहिल्यावर लगेच विरून गेली हे वेगळं सांगायला नकोच.

तर माझ्या काचेवरच्या प्रेमाखातरची, प्रेमदिवसाच्या निमित्ताने आठवलेली ही चित्रगंगा. आखिर कांच पे दिल आ ही गया. यंजॉय :)












#Aparna #FollowMe

Saturday, February 4, 2017

Genius is when to know to (Re)start

२०१६ माझ्यासाठी एक प्रकारचं निरोपाचं वर्ष ठरणार, अशी सगळी लक्षणं शेवटच्या तिमाहीत दिसायला लागली होती. कामाच्या जागी श्रेय कमी, अपेक्षेचा महापूर, त्यामुळे झालेली तब्येतीची हेळसांड आणि त्याचा सरळ सरळ परिणाम घरच्या मंडळींवर दबाव येणे. आता इतक्यात मायदेशवारी केवळ ज्येष्ठ नागिरकांची आरोग्यतक्रार आल्यामुळे आयत्यावेळी उड्डाण कराव अशा प्रकारे अगदी शेवटच्या क्षणी स्वतःचा एकमेव ब्रेक रद्द करून जाऊन आलेली. या सर्वातून सही सलामत वाचताना ब्लॉगलाच निरोप द्यावासा वाटणं साहजिकच आहे. शिवाय जे लिहिलं आहे त्यापेक्षा काही वेगळं सांगायचं आहे असं वाटत नसायचं त्यामुळे सगळ्यात पहिले तर त्याच त्या जुन्या लिंकांची पिंक टाकायला सुरुवातही केली. एकदाचं मागचं साल संपलं आणि या आठवड्यात परत च्यामारिकेत आले. सुदैवाने टाके कुणाची सर्जरी वगैरे न होता गोळ्या-औषधं असं शेपटावर निभावलं आणि इथल्या त्या सुरुवातीच्या विचित्र शांत पोकळी दिवसांचा सामना करताना काल  ताईच्या सल्ल्याने आणि जेटलॅगदेवाच्या तावडीत सापडू नये म्हणून "डियर जिंदगी" नावाचा चित्रपट पाहिला. 
चित्रपट हा विषय माझ्या ब्लॉगसाठी वावडा नाही पण अनेक दिग्गज लोकांनी त्यावर टिपणी करून झाली असणार म्हणून ही पोस्ट त्यातलं वाक्य उचलून थोडं त्याला "माझिया मना"पण बहाल केलय म्हणून नामोल्लेख. शिवाय आपण भारतीय लोकं मुदलात डॉक्टर वगैरेंना असंख्य दोष देऊ, शंभर वैद्य करू, तरी आपल्याला बरं वाटणार नाही पण तोच डॉक्टर बॉलीवूड रूपाने अवतरला तर काय म्हणावं महाराजा? त्याचे गोडवे गागळ्याचा खरा डॉक्टर गाठावा लागेल अशी अवस्था. तर माझा आपला बुडत्याला काडीचा आधार. 
ऑगस्ट पासून या ब्लॉगवर इकडची काडी तिकडे झाली नाही पण बया ब्लॉगच्या फेसबुकवर बागडतेय एक म्हणे नेम टॅग आहे #AparnA नावाचा त्याबद्दल काहीबाही लिहिते. हे काही गौडबंगाल वगैरे नाही. याला आजकालच्या भाषेत life अर्थात "जीवन" ऐसे नाव आहे. आता लेखणी उचलेपर्यंत मध्ये काय घडलं याची जंत्री नाही देणार पण एक परामर्ष घेऊन सुरुवात करीन म्हणते. 
आपली सर्वांचीच "रोजमर्रा कि जिंदगी" कुठल्यातरी रुटीन किंवा काळात अडकली असते तशीच माझीही. माझे ठरलेले तीन-चार स्तंभ आहेत; महत्वाचं स्थान माझं कुटूंब, माझी पिल्लं हे असायला हवं, त्यांनतर माझी नोकरी आणि त्याचबरोबरीने माझ्याबरोबर गेली तेरा वर्षे हवी तेव्हा हवी तशी साथ करणारे पालक आणि अर्थात नंतर माझे छंद, ब्लॉग इ. अशी उतरती भाजणी असायला हवी. पण मी शेवटच्या त्रिसत्रात इतकं काम केलं आणि त्यातच गुरफटले की बाकीचे स्तंभ हळूहळू माझ्यापासून लांब गेलेच पण मी स्वत:च्याच तब्येतीची हेळसांड करून घेतली. माझ्या पालकांना ज्या तक्रारी सत्तरीत सुरु झाल्या त्यांची शिकार मी चाळीशीतच झाले. हे सगळं इतकं कॉमन आहे म्हणे की जेव्हा मी हे खाजगीत नवऱ्याला सांगितलं तर तो म्हणाला काही नवीन सांग. कामाच्या ठिकाणी प्राधान्य द्यायचं मुख्य कारण माझं एक छोटं स्वप्न साकारायची संधी माझ्या अमेरिकन साहेबाने मला दिली होती. हे स्वप्न होतं माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी जोडायच्या शृंखलेतली महत्वाची कडी किंवा खरं सांगायचं तर हे झाड लावायची कल्पनाच माझी. माझ्या पेट्रिऑटिक साहेब, त्याचा साहेब आणि एकंदरीत मालकवर्ग यांच्याकडे ही संकल्पना गली उतरवताना माझे तीन-चार महिने तरी खपले होते आणि या वृक्षाने मूळ धरलं तसं मी ज्यांच्यावर विश्वासाने काम सोपवलं होतं त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, माझं मन कळवळलं पण कॉपोरेटच्या जंगलात सिंह राजा असतो. तिथे या वाघाच्या बच्चीचं किती चाललं या विषयावर मी लिहिणार नाही. ते ज्याचं त्याने समजून घ्यायचं. त्याचवेळी माझ्या आधीच त्रस्त शरीराने मनाची साथ दिली आणि तब्येतीचा बिगुल वाजला. माझ्याच्याने झेपेल तितकं काम करून मी माझंच पाऊल विचारपूर्वक मागे घेतलं. पण हा निर्णय होईपर्यंत होरपळलं ते माझं कुटुंब आणि ज्यांना काडीचा फरक पडला नाही ते अर्थात कामापुरते असणारे असे महास्वार्थी लोकं. मग वरती म्हटलं तसं मलाच उपरती झाली आणि माझा मीच एक एक निरोप घ्यायचं मनात ठरवलं. 
ही पोस्ट मी माझ्या यावेळच्या जेटलॅगमध्ये लिहितेय, हे चांगलं की वाईट, माहीत नाही; पण मागचं धडा शिकवून जाणारं वर्ष आणि २०१७ च्या सुरुवातीलाच थोडंफार आजारपण या सर्व पार्श्वभूमीवर हळव्या मानाने लिहिलेलं कितपत खरं ठरतं माहित नाही पण तेव्हा नाही तरी आता एक आढावा घ्यावासा वाटला. आता याच पार्श्वभूमीवर "डियर जिंदगी" नावाचा चित्रपट पाहिला. "शारुख आणि आलिया" दोघे भोगासी आलीये तरीही पाहिला. "दंगल"पाहताना गाढ झोपणाऱ्या व्यक्तीने खरं तर कुठलेच चित्रपट पाहू नये (ए कोण ते  जेटलॅग म्हणतंय :) )  आणि कुठल्याही चित्रपटाचा उल्लेख करू नये असे म्हणतात तरी पहिला आणि तरी मताची पिंक टाकतेय. ("पिंक" चित्रपट नंतर पाहणार आहे आणि प्रॉमिस त्यावर काहीही लिहिणार नाही कारण तेही दिग्गज लोकांनी टिम्ब टिम्ब टिम्ब ... )  तर हा चित्रपट पाहून मला माझ्यासाठी लेखनथेरपीची एकदम आठवण झाली. यात एक वाक्य आहे "Genius is when to know to STOP". मला यात थांबला तो संपलाची लक्षणं तर वाटलीच पण त्याचवेळी कुठे स्टॉप मारलाय हे आठवलं. चित्रपटाबद्दल अनेकांनी उत्तमोत्तम लिहून झालं आहे. मी काही वेगळं सांगायचं प्रश्नच नाही. माझं निरीक्षण इतकंच आहे कि तसं पाहायला गेलं तर हे कामाचं न  पेलणारं ओझं/ दडपण, मुलं मोठी करायची चिंता आणि त्याचवेळी घरातील ज्येष्ठांची आजारपणं, हे माझ्या पिढीतील सगळ्यांच्याच वाट्याला आलंय. जीवनाची ही नवीन व्याख्या आहे. त्याचवेळी इतर काही मैत्रिणींप्रमाणे मीही माझ्या चाळीशीचे प्रश्न घेऊन जातेय. यातलं काहीही मी बदलू शकणार नाही. मग का थांबा? why say STOP? निदान ब्लॉगवर तरी. 
 पुन्हा एकदा इतकंच सांगायचं आहेकी हे स्वैर आणि बदलणारे विचार सांगायचं माझं हक्काचं व्यासपीठ असल्यामुळे, मी, माझ्या पद्धतीप्रमाणे लिहिणार. फुकट/विकत कसं हवं ते तुम्ही वाचा. पण त्याचा अर्थ लावताना किंवा आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंध जोडताना शंभरवेळा विचार करा. 
या सालात पुन्हा एकदा जोमाने लिहायचा प्रयत्न आहे. त्यातलं हे पहिलं व्यक्त पुष्प. अव्यक्त भावना मांडता येतील का हे माहित नाही पण जे काही मांडावंसं वाटणार ते नक्की लिहिणार. म्हणून म्हणायचं  महाराजा "Genius is when to know to (Re)Start" जय हो ब्लॉगिंग :)
#AparnA Feb 1st 2017.