Friday, April 27, 2012

अमुल्य..सिंपली प्राइसलेस.....

आपल्या लहानग्यांना मोठं होणं पाहण्यात आई-बाबांना काय सूख मिळतं हे तुला ती मोठी झाल्यावर कळेल असं माझे आई-बाबा नेहमी म्हणतात. माझ्या नशीबाने मी शेंडेफ़ळ असल्याने जास्त लाड तर झालेतच पण तरी मी तीनेक वर्षांची होईपर्यंत आईने नोकरी केली नव्हती...त्यामुळे मी तिची, आणि लाड केल्यामुळे बाबांची, थोडक्यात दोघांच्याही जास्त जवळ आहे. आणि ते शिक्षक असल्याने त्याच्या आमच्या सुट्ट्या पण एकत्र, धमाल करणे हे सगळं आमच्या नशीबात होतं.माझी मुलं मात्र आई-बाबांचा वेळ मिळणे याबाबतीत तेवढी सुदैवी नाहीत. त्यातला त्यात धाकटा...कारण तो नवव्या महिन्यात बाहेर पाळणाघरात गेलाय.

त्याला तिथे ठेवायच्या आधी आमची एक समोरासमोर मिटींग झाली होती...टोशाबरोबर...बारीक शरीरयष्टी, माझ्यापेक्षा थोडी जास्त उंची, थोडेसे पिकू लागलेले कुरळे ब्लॉंड केस आणि गोरी गोरी, हसरी..ती स्वतः एक आजी आहे हे कळल्यावर का कोण जाणे मला खूप बरं वाटलं होतं. म्हणजे आता अनुभवांती बाकीच्या सांभाळ करणार्‍या शिक्षिकाही खूप छान आहेत हे कळलं तरी ते पहिल्या प्रथमचं जे काही धाकधुक वगैरे वाटत असतं त्यावेळी तिचं आजी असणं मला उगीच धीर देऊन गेलं होतं..
मला स्वतःला "मम्मी" हा शब्द माझ्या मुलांनी मला म्हणावा असं वाटत नाही आणि आरुष माझ्याकडेच वाढला असल्याने तो "आई" बोलायला शिकला. पण ऋषांक नक्की हा शब्द शिकेल की नाही म्हणून मी त्यांच्या लिस्टवर तुमच्या भाषेतले काही शब्द यात "aai" हे मी आवर्जुन लिहिलं..त्यामुळे आमच्या पहिल्या संभाषणात तिने ते कसं बोलायचं हे माझ्याकडून शिकून घेतलं आणि त्यानंतर कधीही मला मुलांकडे संबोधताना तिचं ते "आय" मला ऐकायला फ़ार आवडायचं....
काही माणसं आपल्याला लगेच क्लिक होतात. त्याचं काही कारण नसतं..ती होतात... म्हणजे लाडक्या पुलंच्या भाषेत त्यांना रावसाहेब रांगडे असले तरी क्लिक झाले तसं मी प्रचंड घाई गडबडवाली असले तरी शांतपणे हसतमुख चेहर्‍याने काम करणारी टोशा मला क्लिक झाली. त्यावेळी तर माझे बाबा पण इथे होते आणि सुरुवातीला माझी "दो टकियों की नोकरी" आड आल्यामुळे बाळाबरोबर पाळणाघरात दोन दिवस दोन तास थांबायचं कामही त्यांनी केलं होतं..त्यावेळी त्यांनाही ती खूप चांगली वाटली..ती बाळाला छान सांभाळेल गं या बाबांच्या आधाराने मी तशी नाही म्हटलं तरी निश्चिंत झाले आणि मग आमचं एक रूटीन सुरू झालं..
त्यानंतर मागच्या ख्रिसमसला थोडे दिवस उरले होते.यावेळी सगळ्या शिक्षकांना काय द्यायचं याविषयी घरी चर्चा सुरू झाल्या आणि एके दिवशी सकाळी बाळाचा खाऊ फ़्रिजमध्ये ठेवताना टोशाने ती भयंकर बातमी मला दिली...तिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय....बापरे मी गळूनच गेले....म्हणजे आतापर्यंत सगळीकडे याविषयीची माहिती वगैरे वाचली आहे मी...पण त्यादिवशी तिच्यासमोर अश्रु लपवताना फ़ार जड गेलं..घरी आल्यावर बाबांसमोर मी मला मोकळं केलं....बाबांनाही खूप वाईट वाटलं आणि मग त्यांनी मला सांगितलं जे कदाचित बरोबरही असेल की या देशात तर सगळं वैद्यकिय सुविधा इ. पाहताना ती नक्की बरी होणार.
ती बरी होणार हे मला माहित आहे...पण हे सगळं सहन करणं, त्या ट्रिटमेंट्सचे दुष्परिणाम हेही मला माहित आहे..त्याचबरोबर आणखी एक मुद्दा खर्च....म्हणजे कितीही चांगला इंश्युरन्स असला तरी त्यात बर्‍याच गोष्टीचा आउट ऑफ़ पॉकेट खर्च पाळणाघरात काम करणार्‍या व्यक्तीला कसा परवडेल याचा अंदाज घ्यायला मला कुणी मोठी अर्थतज्ञ असण्याची गरज नाहीये..मी तिला समोरून सांगितलं की कधीही काही हवं असेल तर नक्की सांग..आम्ही तुझ्या घरचेच आहोत आणि आमच्याही मुलाची तू आम्हाला आज्जीच वाटते...त्यानंतर आमच्या ख्रिसमस गिफ़्टमध्ये आम्ही टोशासाठी काय द्यायचं हे आम्हाला जास्त विचार करायला लागला नाही.

इकडे तिच्या किमो सुरू झाल्या आणि तिच्या पाळणाघरातल्या सुट्ट्या वाढायला लागल्या...एका छोट्या ब्रेकनंतर ती परत आली आणि तिचे मला आवडणारे कुरळे केस ज्याने दिले होते त्याने परत घ्यायला सुरूवात झाली.हे सगळं सुरू होतं तरी आपलं काम ती आनंदाने करत होती.ती त्या ब्रेकनंतर परत आली तेव्हा ऋषांक आणि त्याच्या वर्गातली मुलं तिच्या अवती भोवती अशी काही गुंगायला लागली की जणू काही ती तिला सांगत होती की वि मिस्ड यु...
मला माहित आहे की हे सगळं सुरू असताना तिला नक्की भावनिक सपोर्ट सिस्टीम हवा होता आणि तिची टीम या ठिकाणी ठाम उभी राहिली..डे केअरच्या डायरेक्टर आणि बर्‍याच इतर शिक्षिकांनी तिच्यासाठी आपले केस दान करून टाकले...आता मुलांनाही काही प्रश्न नसावा की ही एकटीच बाई केस नसल्यामुळे टोपी घालून का वावरतेय..यात आठ महिन्याची गरोदर असणारी माझी आणखी एक लाडकी शिक्षिका जेनेल पण होती..

तिच्या ट्रिटमेंटमुळे बिघडणारं अर्थकारण सावरण्यासाठी या छोट्या पाळणाघरातून एक खास कार्यक्रम राबवण्यात आला.."सायलेंट ऑक्शन" यातली प्रत्येक गोष्ट फ़क्त आमच्या ग्रुप मेलवर झाली. ज्याला जे वाटलं ते ते त्यांनी त्या ऑक्शनसाठी दिलं, त्यात आजुबाजुला घरगुती तत्वावर छोटे दागिने विकणार्‍यापासून ते घरी कुकी बेक करणार्‍या एखाद्या स्टे होम मॉमपासून सगळ्यांचा समावेश होता..सगळ्यात महत्वाचं होतं ते टोशाच्या लाडक्या ऋषांकसारख्याच अन्य मुलांचा.. त्यांनी मुलांचं एक खास क्रिएटिव्ह सेशन घेतलं होतं त्यात काढलेली चित्रं...या आणि अशा सगळ्या वस्तूचं एक सायलेंट ऑक्शन दोन दिवस चाललं.सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळात.
प्रत्येक वस्तुच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या कागदावर त्याची तुम्हाला परवडणारी किंमत आणि तुमचा इमेल आय डी. अशा प्रकारे एकावर एक किंमती मांडत जायच्या. वेळ संपेपर्यंत कितीही वेळा जाऊन तुम्ही आपली किंमत वाढवू शकता. दोन दिवसानंतर तुमची किंमत जास्त असेल तर तुम्हाला मेल येईल आणि ते पैसे भरून तुम्ही ती वस्तू घेऊन जायची.. याला सगळे पालक, शिक्षक, तिथले कर्मचारी यांनी इतका भरघोस प्रतिसाद दिला या सगळ्यांचे खारीचे वाटे मिळून पाच हजार डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोळा झाली.
निसर्गाने तिला जे दुःख दिलंय ते शारिरीक दृष्ट्या तिचं तिलाच पेलायचं आहे पण आपण तिला आर्थिक बळ देऊ शकतो हे सगळ्यांच्या एकजुटीमुळे सिद्ध झालं. आणि ही इतकी मोठी रक्कम उभारण्यात ज्या सर्वांचा हातभार ते इथे काम करणारे सारेच मध्यमवर्गीय..कुणी बिल गेट्स नाही.

आपल्याकडे "एकीचे बळ" किंवा "बूंद बूंद से बढता सागर" इ.इ. मी फ़क्त पुस्तकात वाचलं होतं. पण एका साध्या पाळणाघरात काम करण्यार्‍या व्यक्तीला वार्‍याच्या वेगाने मदत करणारी ही कम्युनिटी सिस्टीम पाहून मला खरंच इथल्या लोकांबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. पाश्चात्यांकडून शिकायचंच असेल तर हे मी माझ्यासाठी नक्कीच शिकेन. कारण काय आहे कदाचित आपण स्वतःहून खूप काही इच्छा असली तरी आपल्या वैयक्तिक अडचणींमुळे करू शकणार नाही याची जाणीव मलाही आहे. पण माझ्यासारखीच दहा डोकी एकत्र आली तर कुणा एकाला थोडीफ़ार मदत नक्कीच होऊ शकते आणि ती कशी याचं नियोजन त्या मेल थ्रेडवरून मला नक्कीच मिळालं..

मागच्या आठवड्यात या कॅन्सरसाठी शेवटचा सामना करायला टोशा सज्ज झाली आहे..तिला ज्या शुक्रवारी तिच्या सर्जरीसाठी गुड लक चिंतण्यात आलं नेमकं त्याचवेळी मी कामासाठी बाहेर होते पण तिने आठवणीने मला मेल केली मी फ़क्त आता जातेय आणि तुला मला प्रत्यक्ष बाय करता येत नाहीये...खरं सांगु त्यादिवशी मला रडू आलं नाही कारण मला माहित आहे की ही लढाई ती नक्की जिंकणार आहे...आणि केवळ तेवढ्यासाठी मी असं म्हणेन की तसंही देव-बिव नावाचं काही नसतंच..असला असता तर हे भोग अशा निरागस लोकांच्या वाट्याला आलेच नसते..असो..हे सगळं मी त्यासाठी लिहित नाहीये..

मला फ़क्त इतकंच म्हणायचं आहे की आपली आर्थिक ताकत खूप मोठी नसली म्हणून आपण आजारांचा सामना करुच शकत नाही असं नाहीये..आणि आपली स्वतःची सपोर्ट सिस्टिम जर आपण उभारू शकलो तर निदान एकाला तरी आपण निदान अशा मोठ्या आजारासाठी मदत नक्की करू शकतो आणि तेही त्याचा जास्त बाउ न करता...सगळं त्या सायलेंट ऑक्शनच्या वेळी झालं तसं खेळीमेळीने....
त्या सायलेंट ऑक्शनमध्ये माझा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी काढलेलं,माझ्या सुदैवाने माझ्या घरातल्या भिंतीची शोभा वाढवणारं ,हे चित्र....माझ्यासाठी अनेक कारणांनी अमुल्य......सिंपली प्राइसलेस....

Wednesday, April 25, 2012

स्नो टाइम इज फ़न टाइम

या वर्षीच्या थंडीचा योगायोग म्हणजे सगळीकडे गरम वातावरणाने आपले पाय रोवायला सुरूवात केली आहे तरीही मी राहते त्या ओरेगावात मात्र थंडीबाई अगदी ठाणच मांडून बसल्या आहेत. म्हणजे ते आपलं फ़ेमस इक्विनॉक्स का काय थोडक्यात ऑफ़िशियली वसंताचं आगमन २० मार्चला झालं आणि २१ मार्चला आमच्याकडे ढीगभर बर्फ़..मुलं आपली सर्दी खोकल्याने हैराण आणि आम्ही त्यांना सांभाळून.
त्यानंतर मात्र वैतागलोच आणि जे आहे त्याच वातावरणाची मजा घ्यायची असं ठरलं...मग एक त्यातल्या त्यात सगळ्यांच्या तब्येती बर्‍या असलेला रविवार पाहिला आणि बर्फ़ गोळा करायला निघालो.
जायचा रस्ता साफ़ आणि बाजुला भुरभुरलेला बर्फ़ शिवाय गाडीत मुलं संपूर्ण ड्राइव्ह झोपलेली..त्यामुळे रस्त्याचीही मजा लुटता आली....
या खालच्या चित्रात डावीकडे माउंट हुड दिसतोय का? अर्थात अजून तो बराच दूर आहे म्हणा. पण गाडी एकदा का डोंगराळ भागात शिरली की तो अधूनमधून दिसत राहतो..


देवदार वृक्षांनी दाट असलेलं इथलं अरण्य बर्फ़ाने न्हाऊन पाहायचं म्हणजे भूलोकीचा स्वर्ग....



आणि आता जसं आम्ही आमच्या नियोजित जागी जवळ येतो तसा आदल्या आठवड्यात झालेला प्रचंड स्नो आपलं अस्तित्व पावलोपावली दाखवायला सुरूवात करतोय..


या स्की रिसॉर्टचा एक मजला मागचे आठवडाभर असाच आहे....बर्फ़ाने डबडबलेला...

आणि हो हाच तो...याआधी ब्लॉगवर बरेचदा कौतुक करून झालेला माउंट हुड


हे आमचं त्या रविवारचं डेस्टिनेशन....स्नो ट्युबिंग...

या ट्युब्ज हाताने खेचून मग पट्ट्यावरून वर जायचं आणि मग आपल्याला हवं तसं त्यात बसून किंवा रेलून बर्फ़ाच्या टेकडीवरून सोडून द्यायचं....

खरंय की नाही स्नो टाइम इज फ़न टाइम...:)




तो आधीच्या फ़ोटुमध्ये माउंट हुड पाहिलात नं तो या छोट्या बर्फ़ाळ टेकडीच्या बरोबर समोर आहे आणि तिथे दिग्गज लोकांना स्कीइंग करताना पाहाणं म्हणजे मजा असते...


खरं तर अशा प्रकारे विषयाचं बंधन नसणारं ब्लॉगिंग कशाशी खातात हे माहित नसलेली मी आज हे दोनशेवं पोस्ट टाकताना असंही म्हणेन ब्लॉग टाइम इज फ़न टाइम...


Monday, April 23, 2012

दोन ओंडक्याची होते जर्सीमध्ये भेट.....


खरं तर अशा प्रकारची पोस्ट या ब्लॉगवर साधारण दोन वर्षांपुर्वीच्या जुलैमध्येच येणार होती...म्हणजे यायला काहीच हरकत नव्हती..पण ओंडका क्रमांक एक किंवा खरं तर ओंडकी उर्फ़ माझिया मनातली "मी" हिने अति डोकं लावून विमानाचं तिकिट काढताना गोंधळ केल्याने काही केल्याने ओंडका क्रमांक दोन उर्फ़ वटवट सत्यवान याला प्रोजेक्टरुपी लाटेने च्यामारीकेच्या दुसर्‍या किनारपट्टीवर वेगळं ठेवलं..
यावेळी मात्र ओंडकीला आधीच पुर्वीच्या चुका न करण्याची अक्कल आल्याने (वाचा...लेसन्स लर्न्डच्या कृपेने...) आधी उल्लेखलेले हे दोन ओंडके मागच्या आठवड्यात एकदाचे जर्सीतल्या एका शांत कुटिरेत भेटले.....शांत कुटीर उर्फ़ सत्यवानाचं घर हा या (अघोषित) मेळाव्याचा मुख्य पंडाल होता हे आता लक्षात आलं असेलंच.....
या दोन परिच्छेदात अशा प्रकारे ही पोस्ट या ठिकाणी खरं तर संपली आहे... पण प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या असंख्य अलिखित नियमाप्रमाणे थोडी फ़ार असंबद्ध बडबड केल्याशिवाय किंवा थोडक्यात त्या आधी म्हटलेल्या शांत कुटिरेचं रुपांतर हास्यकल्लोळ, तू हे कर तरच मी हे करेन या आणि अशा असंख्य कलकलाटाने भरल्याशिवाय ही पोस्ट कशी पूर्ण होणार???
मागे काही दिवसांपूर्वी वटवटच्या फ़ेबुवर (मी फ़ेबुवर नाही आहे हो...फ़ेस आला तोंडाला माझ्या त्यांची प्रायव्हसी सार्वजनिक करण्याची पद्धत पाहून..असो तर..) हां तर त्या वटवटच्या फ़ेबुवर गाजलेल्या एका फ़ोटोमुळे घडलेल्या एका छोट्याशा मेळाव्याचा हा मोठा वृत्तांत....वॉर्न करायचं काम केलंय नंतर पोस्ट संपत नाही वगैरे किंवा पुन्हा एकदा मनातलंच इ.इ. छाप प्रतिक्रियांचं मूल्य शून्य असेल हा (आगाऊ) इशारा...:)
तर झालं असं किंवा खरं तर झालं काहीच नाही माझं एक हापिसचं काम नेमकंच पूर्व किनारपट्टीच्या जवळ निघालं..आणि मी फ़क्त त्याच्यात माझ्यासाठी शनिवारचा एक दिवस मागितला (नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारही मागावा लागला ही वेगळी बाब पण वरिजिनल प्लानमध्ये माझ्याकडे फ़क्त शनिवार होता) सुदैवाने नव्या यॉर्कातलं विमानतळ कामासाठी वापरावं लागत असल्याने मी यावेळी हॉटेलमध्ये न राहता नव्या जर्सीतल्या एका शांत कुटीरेची निवड केली...(म्हंजे काय आहेच माझी साधी राहणी आणि साधेच विचार) आता ह्याच शांत कुटीरमध्ये राहणारा ब्लॉग ओळखीमुळे आता चांगली गट्टी जमलेला हेरंब उर्फ़ वट्टू (आता ओंडका म्हणायचा मोह होतच नाहीये कारण गप्पाची भट्टी चांगलीच जमल्यामुळे आमची गट्टी जमलीय नं...) याने माझं हे असं आगाऊपणे त्याच्या (आता अशांत केलेल्या) कुटीरेमध्ये येणं खिलाडूपणे स्विकारून मध्यरातीला माझ्यासारख्या सभ्य मुलीला नवीन यॉर्कातल्य कुणी त्रास देऊ नये म्हणून खास जातीने हजर राहून माझ्यातला सुजाण ड्रायव्हर जागा केला...(होय कंपनीने भाड्याने दिलेल्या गाडीला ड्राइव्ह करून शांत कुटिरकडे न्यायचं पवित्र कार्य मीच पार पाडलंय आणि यावर दोन शब्द येताहेतच...)
अरे हे काय...नाही नाही काही नाही तर मेळाव्याचं पहिलं पुष्प गुंफ़ायला सगळ्यात महत्वाची मदत केली ती विमानतळातल्या एअर ट्रेनने बंद पडून...त्यामुळे अर्थातच आमच्या आनंदावर विरजण पडायचं काहीच कारण नव्हतं म्हणा..कारण ती भर आम्ही तिथेच उपलब्ध असलेल्या बस सर्व्हिसवर आमचा भार टाकून लगेच भरुन काढली....:) आणि हो तो वर म्हटलेला ऐतिहासिक फ़ेबु फ़ोटोने (इथून पुढे ऐतिहासिक हा शब्द बर्‍याच उल्लेखांमध्ये अध्याहृत असेल हे चा वांच्या ध्यानात आलं असेलच) तर त्यादिवशीच्या फ़ेबुवर तर बॉंबच फ़ुटला..."हे काय नवीन आता?" "हा मेळावा कधी झाला आता?" या आणि इतर प्रश्नांनी वट्टुच्या फ़ेबुला फ़ेस आला.....त्यामुळे अर्थातच ही पोस्ट लिहायची जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली...( आणि हेच नाही बर्‍याच जबाबदार्‍या त्याने माझ्यावर टाकल्या....मी त्यातल्या किती कशा पेलल्या ते त्याला हवं तर तो लिहील आणि नाही लिहिलं तर इथे वट्टूची वट वाढवायची संधी मी सोडणार नाही हे तुझ्या ध्यान्यात आलं असेलच नं सत्यवाना...)
तर आता त्याने मला इतकं प्रेमाने आणि मध्यरात्रीही एकही जांभई न देता (आणि हातात फ़ुले-बिले अस्लं काही आणून ते सांभाळायचा त्रास मला न देता) विमानतळावर रिसिव्ह केलं याबदल्यात मीही त्याला माझ्या कामासाठी घेतलेल्या गाडीने (चक्क) नवीन यॉर्कातले रस्ते, एव्हेन्यु न चुकवता, एकही भोंग्याची देवाणघेवाण न करता आणि सगळ्यात मुख्य एन वाय पि डीवाल्यांना न पिडता वाहतुकीचे नियम काटेकोर पाळीत इप्सित स्थळी म्हणजे शांत कुटीरेमध्ये घेऊन गेले...इथे खरं तर तांत्रिक दृष्ट्या कामाचा दिवस सुरु व्हायला काहीच तास शिल्लक राहिल्याने आम्ही विश्राम करून मेळाव्याचा विचार नंतर करायला हवा होता पण काही (किंवा खर तर बर्‍याच बाबतीत) आमचं लाइक माइंड असल्याने विश्रामाचा विचार बाजुला ठेवून आम्ही सरळ चर्चेला सुरूवात केली..चर्चांचे विषय महत्वाचे नव्हते कारण ते सारखेच बदलत होते.
मॅगी बस दो मिनिट....खाने और पकाने के लिए....:)
प्रत्येक छोट्या मोठ्या मेळाव्यांमधला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दीडिखा आय मीन खादाडी यावर मात्र एक छोटा वाद निर्माण झाला...(म्हणजे थोडक्यात नॉर्मल मेळाव्यासारखंच) तर झालं असं सत्यवानाने काय खाणार असा प्रश्न विचारल्यावर जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून नको रे वगैरे करून माझिया मनाला खास सत्यवान स्पेशल मॅगीचे वडे खायची इच्छा झाली आणि त्यात माझी फ़क्त दोन मिन्टात बनलेलं मॅगी देऊन ती धुडकावण्यात आली...अर्थात सुदाम्याचे पोहे खाऊन वाढलेल्या संस्कृतीतले आम्ही दोघं असल्याने हा वाद मॅगी लगेच संपवून (आणि भांडी घासायची जबाबदारी सत्यवानाकडेच देण्यात येऊन) आम्ही पुन्हा एकदा चर्चा सुरू केल्या...आणि पुन्हा तेच आधी म्हटल्याप्रमाणे वातावरणावरून सुरू झालेल्या या चर्चा विविध वळणांनी फ़क्त हास्याचे फ़वारे, लोल्स आणि मंडळींना आवाहन इ.इ. रुपी फ़ोडण्या पडत पुढे सरकत संपायचं नावच घेत नव्हत्या.....
पण अखेरीस घड्याळाचा काटा फ़ारच पुढे गेल्याने आम्ही साधारण तीनेक तासाच्या विश्रामाचा ठराव मंजुर करून पहिले सत्र (अक्षरश: वेळेअभावी) आटोपते घेतले..
आता दोन दिवस माझ्या कामाचे असल्याने त्याविषयावर ब्लॉगवर लिहिण्यात काहीच पॉइंट नाहीये पण झलक म्हणून हा नकाशा पाहिलात तर कामही किती अटीतटीचे झाले हे लक्षात येईल..(इथे मी दोन दिवसांत पाच राज्यांचा दौरा करुन एक नवाच उच्चांक प्रस्थापित केला हे काही सुजलेल्या मनगटाने लिहायचं नाहीये मला पण लिहिताना ते ओघानेच आलं आहे याची पुन्हा एकदा सु.वा. नोंद करतीलच.)
हा माझा छोटासा प्रवास कामाचा आणि गाडी परत देण्यापर्यंतचा...
तर (एकदाचं काम आटोपून) पुन्हा परत येताना आधीचा विमानतळाचा अनुभव लक्षात घेऊन भाड्याची गाडी परत द्यायचं ठिकाण आम्ही बदललं होतं...नशीबाने शांत कुटीरेपासून ते खरं तर तीनच मैलावर होतं. पण पाच राज्य जितकी लवकर कव्हर करता आली त्याच्या ऐवजी या तीन मैलापैकी शेवटचे तीनशे यार्ड कव्हर करताना आली...म्हणजे इतकं विक्रमी वेळेत येऊनही अखेर हेची फ़ळ इ.इ. विचार माझिया मनात येणार तोच वटवट्याने कुणालाही रस्ता न विचारायचा (जगातल्य यच्चयावत पुरूष जमातीचा) नियम मोडीत काढून चक्क रस्त्यातल्या पोलीसाची मदत घेतली...आणि त्याने अर्थातच आम्हाला चुकवले नाही हे इथे नोंदवायला हवं....इथेही मर्फ़ीबाबा आले का असा अभद्र विचार डोक्यातून काढून टाकून मी तर सरळ मनातल्या मनात मेळाव्याचे दुसरे पुष्प गुंफ़ायला सुरूवातही केली..
आणि या पुष्पाचं संपूर्ण श्रेय शांत कुटीरमालक सत्यवानाला जातंय. कारण माझ्या लाडक्या नवीन यॉर्कात एका शुक्रवारच्या संध्याकाळी हे पुष्प गुंफ़ायची कल्पना फ़क्त त्यालाच सुचू शकते...
सत्यवान म्हणे पोळीपेक्षा
फ़मिलिया
 पिझा भारी
हे शहर आधीच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मला माझ्या मुंबईची याद देते त्यामुळे इथे जायला मी तसंही कधीही तयार असतेच इथे तर मेळाव्याचा प्रश्न होता..आता मागे हटणे नाही..तिथल्या (नेहमीच्याच) वार्‍यांना न जुमानता आम्ही आमची पदयात्रा जारी ठेवली...आणि त्याचबरोबर काही मार्मिक गोष्टींवर आपल्या टिपण्ण्या करून माझं मनोरंजन करायची संधी सत्यवानाने सोडली नाही...जास्त गर्दीच्या ठिकाणी मोठ्याने हसायची संधी मी नेहमीच साधून घेते....टाइम्स स्क्वेअरला ती मी पुरेपुर साधली हे आता पुन्हा सांगायला नको.....:)
गार्लिक नॉट्स...यम्म्म
आता प्रश्न होता तो म्हणजे पोटपुजेचा...माझी लाडकी पोळी त्याच्या घरी करून द्यायचा माझा लाडीक हट्ट सत्यवान काही पुरवणार नाही हे माहित होते (खरं तर म्हणूनच मी ती ऑफ़र त्याला प्रत्येक पुष्पाच्या ब्रेकमध्ये दिली होती हे आता मेळावा संपून दुसरा आठवडा उजाडल्याने सांगायला हरकत नाय) तर खायच्या बाबतीतले सगळे हक्क मी आधीच वट्टुला दिले असल्याने त्याने त्याची चांगलीच वट असलेल्या मध्ये मला सगळ्यात ब्येस्ट पिझा म्हणजे फ़मिलिया या जगप्रसिद्ध दुकानात पिझा खायला नेलं..तिथेच गार्लिक नॉट या खाद्यपदार्थाशी त्याने माझा परिचय करुन दिला त्यामुळे नंतर रात्रीच्या सत्रासाठी आम्ही ते आठवणीने बांधून घेतले (आणि खायला आठवणीने विसरलो. म्हंणजे वट्टुने आतापर्यंत ते एकट्यानेच गट्ट्म केले असणार....)
चॉकलेट आइस्क्रिम कोई शक??
तर अशा प्रकारे पिझा खाल्यामुळे आम्हाला गोडाचे वेध लागले त्यामुळे मग नंतर लगेचच आम्ही आमचा मोर्चा "कोल्ड स्टोन"कडे वळवला..हे ठिकाण आमच्या लाइक मांइड्स मधलं आहे हे जाता जाता नोंदायला हरकत नाही.इथे तुम्हाला हवं ते आइस्क्रीम, त्यांतल्या अन्य पदार्थांसोबर थंड दगडावर मिक्स करून दिलं जातं..म्हणून कोल्ड स्टोन (अरेच्च्या हाही एका जळाऊ पोस्टचाच विषय आहे...)
तर त्यानंतर एक कॉफ़ी आणि एक चॉकोलेट फ़्लेव्हरच आइस्क्रिम हातात आल्याने चर्चा थोड्या मंदावल्या पण पटापट आइस्क्रिम संपवून चर्चासत्र आम्ही जारी ठेवले....
साधी राहणी आणि साधं खाणं
आता साधारण दहा वाजत आल्याने एका सभ्य मुलीला शांत कुटीरमध्ये न्यायची जबाबदारी कार्यवाहक या नात्याने सत्यवानाने (पुन्हा एकदा) आनंदाने पार पाडली.
आता मात्र चर्चेमध्ये आणखी एक प्रतिनिधी असावा असे आम्हांस वाटू लागले आणि तोच फ़ेबुचा फ़ोटो पाहून अचंबित झालेल्या खुद्द पोटोबा लेखिकेने दूरध्वनीवरून आपली हजेरी लावली..हा दूर ध्वनी इतका दूरवरून आला होता की त्यामुळे आमची पोटोबाची घरगुती सोय न केल्याने तिलाच आम्ही बोल  लावले....त्यातच माझ्यासाठी तर सत्यवानाला पोळी नाही तर निदान पापड तरी भाजून दे सदृश्य मागण्या मांडण्यात आल्या..अर्थात घेतलेल्या जबाबदार्‍या कशाप्रकारे झटकून टाकायच्या यावरती एक पी एच डी पूर्वीच झाल्याने मी निश्चिंत होते..शिवाय पहिल्या पुष्पाच्या दिवशीच शांत कुटीरचा एक मुआयना केल्यावर पोळीचं पीठ काय मीठही असेल की नाही अशा शंका आल्याने इथे काही आपल्या पाककुशलता सत्यवानाला दाखवून अवलक्षण करायची वेळ येणार नाही याची खात्री मा.म.ला होती...
त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या दिवसाचे पुष्प कशा प्रकारचे गुंफ़ायचे याच्या काही माफ़क चर्चा करून आम्ही दुसरे पुष्प संपवले..खरं तर तोस्तर तांत्रिक दृष्ट्या तिसरा आणि शेवटचा दिवस सुरू झाला होता हे पुन्हा एकदा सु.वां...च्या.....
तिसरा दिवस घाईत जाणार असे सुरूवातीपासूनच वाटत होते कारण पाहुणे मंडळीने किंवा खरं तर मी शांत कुटीरेच्या माझ्या कक्षात कागदपत्र, वायरी इ.ची बरीच गर्दी केली होती..ती आवरणे हे जिकिरीचे काम होते..कारण शांत कुटीरवाले यात काहीच सहकार्य करणार नव्हते..सहकार्य कस्लं खरं तर सकाळी भरपूर मस्का लावून पाव जातीने भाजून देऊन वर खाताना आणखी मस्का मारून मला आग्रहाने खायला लावले...लवकरच ही मस्कापट्टी मी कॉफ़ीची जबाबदारी घ्यावी म्हणून होती हे लक्षात आले.....अर्थात त्यामुळे शाही कॉफ़ी बनवायची संधी मला मिळाली...
बटर लावता लावता

या प्रसंगामुळे मला अर्थातच माझ्या घरी जसं एक काम तू, एक काम मी हे नेहमी सुरू असतं त्याची कमी भासली नाही... आणि हे सत्र अगदी जरा पेन दे नंतर आता मी पेन दिलं होतं तर पुस्तक तू घेऊन ये अशी सारखीच कामाची समप्रमाणात वाटणी करून वट्टूने आपली लाइक माइंड्सची पेटंट्स पक्की करायचं कामही हा मेळाव्यात हिरीरिने केलं...
हीच ती शाही कॉफ़ी
इथे एक महत्वाचा मुद्दा लिहायचा राहूनच गेलाय की मी पहिल्या पुष्पाच्या दिवशी पोहोचले तेव्हा शांत कुटीरमध्ये माझा स्वच्छ कक्ष पाहून मला मी नक्की अपेक्षा केली होती त्या घरात आले होते का या शंकेचं तिसर्‍या पुष्पात ज्या काही घरगुती गप्पा झाल्या त्यात झालं...ते म्हणजे निदान दोन दिवसांची का होईना पण नोटीस देऊन आल्यामुळे सत्यवानाने आपलं साफ़ सफ़ाई कौशल्य पणाला लावून मेळाव्याच्या स्वागत समितीचं काम एकहाती संपवलं होतं...मला पोळी करायची संधी मिळू नये याची सोयही तेव्हाच केली असावी असा त्यावेळी मला दाट संशय आला..
सगळ्यात जास्त रंगलं ते तिसरं सत्र..कारण इतक्या वेळ विस्मरणात गेलेले (अर्थात आम्हा दोघांचेच) ब्लॉग हा विषय यात होता...(विस्मरण या शब्दावर श्लेष आहे हे चा वांच्या.....) .चित्रपट हा सर्वच ब्लॉगर्सचा लाडका विषय त्यामुळे त्यावर एक साधक चर्चा सुरू झाली. पण चित्रपट कलावंत, त्यांची नावे आणि कहाण्या लक्षात ठेवायचं माझं कौशल्य पाहता (आणि या विषयावरच्या रसिक वाचक/ब्लॉगर्सची अनुपस्थिती लक्षात घेता) ही चर्चा बाधक होईल का अशी शंका येऊन त्याऐवजी चित्रपटापट सत्यवानाचं पुनरूज्जिवन करून आठवड्याला अनेक चित्रपट पाहून झाल्यावर निदान एका तरी चित्रपटावर पोस्ट लिहायची असा एक ठराव सर्वानुमते (म्हणजे मत मांडणं आणि ठराव पास करणं दोन्ही करणारी व्यक्ती मीच होते म्हणा) हां तर ठराव सर्वानुमते संमत झाला..
गाणी आणि आठवणीं या विषयावर एक छोटी चर्चा शेवटी मला गावंसं वाटावं लागण्यावर आली आणि मेळावा आटोपणार याचे बिगुल वाजायला लागले...(गाणं ऐकताना पेंगलेल्या सत्यवानाचे डोळे याची साक्ष देतच होते म्हणा)
अखेर बाहेर जेवायच्या बोलीवर शांत कुटीरेचा मी निरोप घेतला...खरं तर मेळाव्याच्या निमित्ताने त्या कुटीरेमध्ये केलेला कलकलाट, खादाडी, गप्पा, .. सोडून पाय निघत नव्हता..पण विमानतळाने आल्यावेळसारखेच सहकार्य केले तर कायमचाच मेळावा होण्याची सत्यवानाला काळजी लागली त्यामुळे वेळेच्या बाबतीत आम्ही कुठलंच कॉम्प्रोमाइज किंवा साध्या भाषेत आय एस टी केलं नाही..त्यामुळे सुसंगत चर्चा, खादाडी, फ़िरणे इ.. होऊ शकले हे सु.वां..च्या.....
परत निघाल्यावर ट्रेनने नवीन जर्सिमधून नवीन यॉर्कात जाणे या विषयावर खरं तर एक वेगळी कंपोस्ट होऊ शकते...(सत्यवान इथल्या इथे तुला निदान चारेक पोस्टींची संधी म्या उदार मनाने देत आहे...वाचतोय्स का??) या प्रवासात मला मी मुंबईच्या मेळाव्याला गेले होते तेव्हा असलेल्या मेगाब्लॉकची आठवण झाली एकंदरीत मेगाब्लॉक आणि मेळावा यांचं नातं जूनं दिसतंय तर..... शेवटी एकदाचे वेळेच्या थोडं फ़ार आधी पोहोचल्यावर मुंबईत रविवारी होणारा मेगाब्लॉक नव्या यॉर्कात शनिवारी दुपारी रंगीत तालीम म्हणून करतात की काय विचार असा एक टिपिकल मुंबैकरीण म्हणून माझ्या मनात डोकावून गेला.
एअरपोर्टची छोटी खादाडी
तर आमची वरात सुस्थितीत विमानतळावर पोहोचल्यावर एक शेवटचा खादाडी प्रयत्न झाला....आणि मग मात्र सेक्युरिटी चेक इनकडे पावलं वळवावीच लागली...
ब्लॉगिंगमुळे जर चार चांगल्या लोकांशी संबंध आले तर दोन जणांच्या मेळाव्यानेही बरंच काही (म्हंजे काय ते आता विचारू नका. पोस्ट प्लान्ड परिच्छेदांच्या कधीच पुढे गेली आहे...) साध्य होतं हे या तीन पुष्पांच्या निमित्ताने लक्षात आलं आहे..फ़क्त घरच्या सर्व मंडळींना पुन्हा लवकर वेठीस धरता येणार नाही याची कल्पना असल्याने पुढचा मेळावा ओरेगावात घ्यायचे योजिले आहे...तरी इच्छुकांनी विमानांची डिल्स पाहायला सुरूवात करावी..तारीख काय कधीही फ़ायनल करता येईल...
जाता जाता माझिया मनात एक जूनीच कविता नव्याने आल्याशिवाय राहवत नाही...
दोन ओंडक्यांची (आपलं ब्लॉगर्सची) होते नव्या जर्सीत भेट
एक डायरेक्ट फ़्लाईट दूर सारे
पुन्हा ओरेगावी (होईल तेव्हा) भेट.....
तळटीप...फ़क्त महत्वाचे काही फ़ोटो तातडीने वरच्या पोस्टमध्ये टाकण्यात आले आहेत...आणखी फ़ोटो सवडीने पिकासावर टाकण्यात येतीलच. इच्छुकांनी करभरणी (वाचा: आपली मौल्यवान प्रतिक्रिया/सूचना इ..) देऊन नावनोंदणी करावी......:) आणि हो ही सक्तीची करभरणी का लागू झाली यासंबंधी काही शंका असल्यास जरा एकदा गुगलबाबांच्या वर्तुळात चक्कर मारून यावे...कसे...:)

Thursday, April 12, 2012

हिंदोळेच मनाचे.............:(

एका साध्या सोप्या आयुष्यात एक नवी नोकरी येते...येत नाही ती आपण निवडली असते...."आई" व्हायची.....जगात सगळ्यात कठीण काम आई होणं आहे हे आजवर फ़क्त ऐकलेलं असतं....पण त्याचा नक्की अर्थ काय हे आपलं आपल्यालाच अनुभवायचं असतं.....एकदा का पहिलं मूल झालं आणि मनाचे ते हिंदोळे अनुभवले की सारं सहज सोप असावं असं उगीच वाटतं..पण नाही ....ते तसं नसतंच नं मुळी...
आपण पुन्हा एकदा "आई" होतो आणि पुन्हा तेच....यावेळी तर त्याला बाहेर ठेवायचा (कठोर) निर्णय एखाद्या प्रोजेक्ट प्लानप्रमाणे आधीच झालाय....नवव्या महिन्यात तो जायला लागतो..तिथली त्याचा संभाळ करणारी "टोशा" त्याला सहजगत्या आवडू लागते....आपणही आपल्या रोजच्या दैनंदिनीत रूळावतो..मनातली खंत जराही वर न काढता....थोडक्यात निर्ढावतो....हो निर्ढावणंच ते...दुसरं काय म्हणणार??
मग पुन्हा एक वळण येतं...आजाराचं....त्या निमित्ताने माझ्याच मुलाला जास्त वेळ द्यायची संधी मला मिळते...मी पुन्हा माझे जुने, घरी फ़क्त मुलाला सांभाळायचे, दिवस जगते....चार दिवस घड्याळाची चाकं त्याच्या दैनंदिनीप्रमाणे फ़िरू लागतात....कॉन्फ़रन्स कॉलच्या आवाजापेक्षा त्याची बातचीत, बकबक आणि खेळाची सवय होते.....मित्रमंडळांचे फ़ोन घेता घेता निसटून जातात...हातात किबोर्ड ऐवजी छोटी वाटी, चमचा, खणांचं ताट आणि खेळणी येतात...सगळं विसरून पुन्हा हे करताना अजिबात वेगळं वाटत नाही....त्याची तब्येत सुधारावी म्हणून त्याला आवडेल, झेपेल ते सर्व करायची मनाची आपोआप तयारी होऊन जाते..
चार दिवस कसे गेले कळतही नाही आणि तो पाचवा दिवस उगवतो....मागचे कित्येक महिन्यांचं निर्ढावलेपण गळून पडतं..आजचा पाळणाघरातला टाटा जसा त्याला कंफ़्युज करतो त्याहीपेक्षा मला तो जास्त अपराधी करतो, टोचतो....
परत येताना मी सुन्न असते...आज कामात लक्ष लागेल का? माहित नाही.....हे मी सगळं पुन्हा त्याच्यासाठी करू शकेन का? माहीत नाही...आणि हो त्यासाठी मला तो आजारी पडायला नको आहे...
माझ्या बाळाला जसं चांगलं आरोग्य दे असं मला त्या कुठे असेल त्या कर्त्या करवित्याला सांगायचं आहे नं तसंच माझ्याही मनाला पुन्हा एकदा सावरायला माझं मलाच शिकायचं मला बळ दे हेही सांगायचं आहे....

जेव्हा एखाद्या परिस्थितीतून हवा तो मार्ग काढता येणार नसतो तेव्हा सामोरं जाणं इतकंच पालक म्हणून मला करायला हवं...नाही का???

अपर्णा,

१२ एप्रिल, २०१२



Tuesday, April 3, 2012

गाणी आणि आठवणी ११ - माय लव लेटर



एप्रिल महिना मला फ़ार आवडतो...म्हणजे फ़क्त हे एकंच कारण नाहीये त्याचं..पण एप्रिल फ़ुलपासून कशी धमाल असते...शाळा/परीक्षा पण आटोपायच्या त्यावेळी कैर्‍या शोधायला जायची मजा तर होतीच पण अगदी देश बदलला तरी मार्च कसाही गेला तरी एप्रिलपासून हिवाळ्याचा भयाणपणा कमी व्हायला लागतो म्हणूनही..थोडक्यात काय तर देश असो वा परदेश एप्रिल इज द ब्येस्ट.....म्हणून विचार करत होते की एप्रिलच्या ब्लॉग पोस्टची सुरूवात जरा धमाल असायला हवी...आणि अर्थात त्यासाठी जास्त ताण नाही द्यायला लागला...म्हणून आज हे एक धमाल गाणं आणि त्याची आठवण...
..................................................................................................................................................................................................
माझ्या गाण्याच्या आठवणी जेव्हा मागे जाऊन माझी मीच वाचते तेव्हा मला त्यात नेहमी एक गंभीर वळण दिसतं...म्हणजे गाणी गंभीर नसली तरी आठवणी का इतक्या हळव्या असाव्यात असं वाटण्याइतपत....आणि म्हणून मी आठवत होते की असं एखादं तरी गाणं हव की ज्याच्या आठवणीने आपण तुफान हसत सुटल पाहिजे...जस इतरवेळी मित्रमंडळात किंवा कुठला चित्रपट पाहताना कैच्याकै कमेंट्स करताना खी खी करून हसतो तस...म्हणजे नुसतं गाण्यासाठी का म्हणून सिरीयस व्हा..असा मी नुसता विचार करताक्षणीच आठवलेलं हे गाणं आहे..मुख्य म्हणजे हे फारसं कुणाला आता आठवत पण नसेल याची खात्री आहे मला...पण करमणुकीची हमखास खात्री.....


तेव्हा आम्ही चाळीत राहत होतो. आमच्या शेजारी एक मारवाडी कुटुंब राहायचं आणि त्यांच्याकडे (किंवा फक्त त्यांच्याकडे) टेपरेकॉर्डर होता...त्याचा आवाज अर्थात त्या घरातल्या मुलांच्या मर्जीवर वर-खाली व्हायचा...किंवा फक्त वर व्हायचा असं म्हटल तरी चालेल...कमीबिमी नाही.एकतर बंद नाही तर उच्च सुरात काही ना काही सुरु असायचं...
म्हणजे सकाळी त्या घरच्या कर्त्या पुरुषाने उच्च आवाजात कुठली भजन सुरु केली की तो दुकानात गेल्यावर त्याचा मुलगा क्र येऊन त्याची लाडकी श्रीदेवीच्या पिक्चरमधली गाणी बापापेक्षा अम्मळ जास्त आवाजात लावे, मग क्र ची आवड आणि आवाज असं करत क्र. पर्यंत हा कार्यक्रम चढत्या आवाजात आणि अर्थात "उनकी उनकी पसंद के" गीतात सुरु असे...आम्ही त्यांचे सख्खे (म्हणजे भिंत शेअर करणारे) शेजारी असल्याने हा सारा अत्याचार सहन करायची ताकत आमच्या कानात सगळ्यात जास्त होती असं म्हणायला हवं....बरं त्यांना हा अत्याचार बंद करा म्हणून सांगायची काही सोय नव्हती कारण त्यांची तोंड उघडल्यावर ऐकू येणाऱ्या ओव्या (वाचा: शिव्या) ऐकण्यापेक्षा असतील ती गाणी परवडली अशी गत होती....
जोवर हिंदी किंवा ओळखीची गाणी असत तोवर ठीक होतं म्हणजे कानाचा पडदा तग धरून तरी असे...पण जर त्यांची गावी फेरी झाली असेल तर अस्सल मारवाडी मिट्टीमधली गाणी सारखी सारखी ऐकायची म्हणजे मोठं संकट...शाळा सुरु असे त्या दिवसात या गाण्यांचा फारसा त्रास जाणवला नाही कारण संध्याकाळी एकदा का दुकान बंद करून पैसे मोजायची वेळ आली की गल्ला भरला असेल त्याप्रमाणे छन छन वाजणारी नाणी ऐकावी लागत...जेव्हा पैसा सगळीकडेच कमी दिसे तेव्हा हा वाणी आम्हाला चांगलाच श्रीमंत वाटे..असो मी त्या गंभीर वळणावर नेहमीप्रमाणे वळायच्या आत आपण त्या गाण्याकडे वळूयाच कसं...:)
तर या वरील सगळ्या गानपार्श्वभूमीवर (नाणी विसरूया आता...तस पण नोटांचा जमाना हाय आणि क्रेडीट कार्डांचा) एक असा काळ किंवा महिना आला जेव्हा त्या घरातल्या समस्त मंडळींना आवडणार एक गाणं किंवा खर तर एक अल्बम मिळाला...म्हणजे मुलांनी सुरु केलेला धिंगाणा क्र पासून पाचपर्यंत सर्वांना आणि चक्क बापाला पण आवडला..त्यामुळे सकाळची भजन बिजन सोडून ही जी एक कसेट त्यांनी टाकली ती बहुदा पूर्ण घासल्यावरच बाहेर काढली असणार....यस येतेय मी त्या चाळप्रसिध्द गाण्यावर....पण आधी जरा थोडे धक्के..
तेव्हा आता सारखे उठ सुठ अल्बम निघत नव्हते ना त्यांच्या चित्रफितीचा पूर यायचा...शिवाय असे फारसे नट-नटी पटकन उठून चला माझ्या गाण्याचा अल्बम काढा म्हणणारे आणि ते अल्बम लगेच बाजारात आणणारे ही बाजारात जास्त नव्हते.....
तर तेव्हा नुकताच लोकांच्या थोड्या फार विस्मरणात गेलेल्या "पद्मिनी कोल्हापुरे" ही होती मुख्य गायिका आणि तिला खास या अल्बमद्वारे पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणण्याचं धैर्य केल होत आपले सर्वांचे लाडके "बप्पीदा"....:)

सोन्याचा भाव वाढल्यापासून बप्पीदाबद्दल मुळात असलेला आदर (आठवा: "जब कोई बात बिघड जाये" ) आता जरा काकणभर (सोन्याचं नाही) अधिक झाला आहे हे जाता जाता सांगायलाच हवं.....तर बप्पीदा आणि पद्मिनी हे combination (काहींच्या मत जर असेल तर ) त्या दोघांनी मिळून गायलेलं हे गाणं त्यावेळी आमच्या चाळीत तुफान हिट होत...ते गाणं होतं....

. - सॉरी सॉरी सॉरी सर आज मुझे जल्दी जाना घर....
. -  रुको रुको रुको मगर टाईप करू पहले लेटर
प. -  क्या??
ब. -  लव लव लेटर माय लव लेटर



आणि मध्ये कधी तरी ती हे पण म्हणते सी यु लेटर...

आता धृपदच इतक जमलंय अगदी यमकासकट तर हे आणि यातली इतर गाणी चाळ ऐकून सांगते कुणाला.....खरं म्हणजे त्या टेप रेकॉर्डरमधून जे काही आम्ही गाणी या नावाखाली ऐकलय त्यापुढे हे म्हणजे अगदी श्री कृष्णाने सांगितलेली गीता नसली तरी दर सोमवारी चाळी खालून "तुजविण शंभो मज कोण तारी" म्हणणारे एक वृद्ध आजोबा जात निदान त्या लेवलच होत असं म्हणायला हरकत नाही...
बाकी पु नी एका ठिकाणी म्हणून ठेवल्याप्रमाणे शेजारच्यांचा ठणाणा करणारा रेडीओ आपल्यासाठी वाजतोय अशा आनंदात ऐकावा त्याप्रमाणे ही टेप आम्ही नुसती ऐकून नाही तर त्यावर थोडा विनोदी घरगुती नाचबीच करून धमाल केलीय...तेव्हा ते "एकता का वृक्ष" यायचं त्यातला नाच बऱ्याच गाण्यावर जातो...बाप्पिदाच्या बिट्सचा परिणाम असावा आणि नाविलाज को क्या इलाज असही असेल....
आज नक्की किती वर्षापूर्वी ऐकलं होत तेही आठवत नाही पण तरी वरचे शब्द चालीसकट आठवले यात या गाण्याचं यश आहे असं बप्पीदा कधी मला भेटले (आणि चुकून पद्मिनीताई पण दिसली) तर मी नक्की सांगणार आहे...
अजूनही जर असं काही गाणं आहे यावर विश्वास बसत नसेल तर (आपल्या जबाबदारीवर) इथे त्याचा आस्वाद घ्या....तुम्ही पण हसत हसत नाचायला (किंवा लोळायला) लागाल ..माझी खात्री आहे....:) आणि हो त्या एकता का वृक्ष च्या स्टेप्स नक्की ट्राय करा....ही ही ही.....:)