Sunday, June 23, 2013

पाऊसवाट

पावसाचं माझं नातं जुनंच,  तरीही इकडे नेहमी पडतो म्हणून रुसवाच जास्त. मग एखाद आठवडा उघडीप मिळाली  की जणू  त्याने इतके दिवस केलेला छळ विसरतेच मी. मस्त शनिवारपर्यंत बाहेर जायची सगळी कामं करत राहते. रविवारी पण मुलांना बाहेर न्यायचा बेत करते आणि रविवारची सकाळ उजाडते तीच काळोख दाटलेली. 

का कुणास  ठाऊक,  आज त्याच्यावर रुसावंस वाटत नाही. उलट आजची त्याची रिपरिप मला माझी त्याच्यावरची जुनी प्रीती आठवून देणारी वाटते. काल रात्रीच एका जुन्या, जन्मजन्मांतरीचे संबंध असणाऱ्या मैत्रिणीशी गप्पा झाल्याचा हा परिणाम तर नसेल ना ? काल आमचे जुने भटकंती दिवस आठवत होतो. पुढच्या पावसाळ्यात तिच्या नव्या घरी राहायला भेटायचं आमंत्रण घेऊन संपलेला तो फोन माझ्या मनावर रेंगाळत असावा. सकाळी बहुतेक मग त्या भटकातीच्या आठवणीचीच धुंदी मला पुन्हा पावसाच्या जुन्या प्रेमात नव्याने भाग पाडतेय.

तसा अगदी धो धो नाहीये म्हणून मग "फ्रेश एअर"च्या निमित्ताने रेनी jacket घालून बाहेर चालायला जायचा एक छोटेखानी कार्यक्रम होतोच. चालत असते मी त्या रुळल्या पाउलवाटेने सराइतासारखी. खाली लक्ष द्यायची गरज नस्तेच. मग उंच वाढलेल्या गवताचा एक माळ  लागतो आणि मी जागेच भान विसरून जाते. 

ते भिजलं गवत मला आठवण करून देत असतं जुने पावसाळे असेच नवनवीन जागी गवत तुडवून वाट शोधेलेले आणि कधी हरवलेले. मनाने मी आधीच कित्येक मैल लांबच्या त्या अनवट जागी पोहोचली असते आणि एकदम साद येते "आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे" माझ्या पिल्लाचा हात हातात घेऊन मग उरल्या पाउलवाटेच कौतुक करत आम्ही घरी येताना मध्येच  एका ठिकाणी थोड्या कमी उंचीच्या गवतातून पण गम्मत म्हणून चालतो. 


आधीच्या माझं मन हरवलेल्या त्या वाटेला मनातल्या मनात मी "पाऊसवाट" म्हणून नाव देऊन टाकलेलं असतं आणि माझ्यासमोर असतो प्रसन्न सुरु झालेला एक ओला  दिवस.   

4 comments:

  1. मस्त झालीय पोस्ट. कालच मुंबईहून पुण्याला येताना घाटात मुसळधार पाऊस आणि आजूबाजूला ढगांचे साम्राज्य असा नजारा होता. शहरात पावसाचा कंटाळा आला असला तरी काल प्रवासात भेटलेला पाऊस खूप सुखावून गेला. मस्त फ्रेश वाटले. दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला.

    ReplyDelete
    Replies
    1. सिद्धार्थ निवांतवेळी भेटणारा पाऊस सर्वांना आवडतो असं दिसतंय. भापो :)

      Delete
  2. पावसाळा म्हणजे सगळीच हिरवाई. निसर्गाचीही अन मनाचीही! मस्त!

    ReplyDelete
    Replies
    1. ते तर आहेच गं श्रीताई. तुझ्याकडे पाऊस आला की नाही?

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.