Saturday, December 31, 2011

काठावर पास...

हे वर्ष सुरु झालं होत तेच मुळी सुट्टीने....हो म्हणजे कामावर आणि ब्लॉगवर एकदम सुट्टी...पण काम तरी लवकर सुरु करावं लागलं...मग जशी आई आली तस त्या निमित्ताने ब्लॉगची सुट्टी पण थोडी फार संपवली....तरी कुठेतरी सारं काही शांत नव्हतं ....अर्थात ते तसं कधी असतं म्हणा पण तरी संदेश लिहिलं आणि त्यावरच्या प्रतिक्रिया इ.इ. पाहून फार मजा आली (मला वाटत विषय निघाला आहे म्हणून ही पोस्ट मार्केट करायचं श्रेय मी हेरंबला (त्याच्या लाडक्या कंसात) द्यायला हवं) ....त्याच्या बझवरचे लाईक आणि निरोप पाहून ओह आय मिस दिस वगैरे सारखं....

मग लगेच घेतलीच लेखणी आणि मग काही बाही सुचत गेलं....गाण्यांच्या आठवणी होत्याच पण मागचा ब्लॉग मेळावा होता त्यांना शुभेच्छा द्यायलाच हव्या होत्या...आई असल्यामुळे बरेच दिवस राहिलेलं नॉट विदाउट माय डॉटर वाचलं आणि त्याबद्दल लगेच लिहिलं गेलं....या वर्षी आमच्या भागात काही म्हणता उन्हाळा येत नव्हतं त्यामुळे जुलैला तो (एकदाचा) आल्यावर मग थोडं फिरण झालं आणि ब्लॉग पुन्हा राहिला पण मायदेशात त्यातही माझ्या मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याचं दर्द बाहेर आलंच...ऑगस्टमध्ये मैत्रीदिनाच्या निमित्ताने काही विचार बाहेर आले पण त्यावर उतारा म्हणून आईचा वाढदिवस साजरा करावा म्हणून मी ट्राय केलेल्या (सध्या ब्लॉगवरून गायब असलेल्या) श्रीतैच्या एका रेसिपीने धमाल उडवली...आणि एक गोष्ट तर मी ब्लॉगवाचकांना सांगितलीच नाही....जुलै संपता संपता बाबापण आले...मग काय फुल टु धमाल...त्यांच्याबरोबर पुन्हा मग भटकंती..मी इथे पाहिलेल्या काही जागा मला गरम हवामान असेपर्यंत दाखवायच्या होत्या त्यातून माझा माउंट हूड आणि इथे इतर बर्फाच्छादित पर्वत इ. बद्दलचा गोल गोल झालेला भूगोल मग ब्लॉगवर आला...बाबा आल्यामुळे जरा जास्त चुटूचुटू बोलायला लागलेल्या आरुषने पण मग त्याची एक जमाडी गम्मत सांगितली....

या वर्षात उदास व्ह्यायचे बरेच प्रसंग आले, जपानसारख्या घटना झाल्या...गझल पोरकी झाली....हे सगळं ब्लॉगवर मुद्दाम नाही लिहिलं ते आपसूक आलं....माझा स्वतःचा एक अगोड प्रवासही ब्लॉगवर मांडला...आणि बघितल तर एक आकडा टुकटुक करतोय "३१".

आता या कॅलेंडर इयरमधला सर्वात शेवटचा महिना सुरु झाला आणि राजेने माझ्या दोन पूर्णवर टाकलेली कमेंट कम आशीर्वाद आठवला....तो म्हणाला होता की या वर्षी शंभर पोस्टा लिही...हम्म...मग असंच सुचलं की शंभर तर अजून कधीच केल्या नाहीत मग निदान काठावर पास होऊया....तसंही मुंबई विद्यापीठाने ४० मोजायची सवय लावली होतीच आणि तीच सवय ब्लॉगवर कामाला आली..शेवटच्या क्षणाला काही तरी करून चाळीस होताहेत कळलं की आमचं हुश्श असायचं तसच ....आणि उगाच कशाला ते विन्जीनियारिंगचे दिवस आठवा म्हणून मी आपलं शाळेत पास-नापास, पास-नापास खेळतात न तसं एकदाचे माझे ३५ झाले म्हणजे "काठावर पास" म्हणून सर्वांना २०१२ साठी सुयश चिंतिते......

फिर मिलेंगे.......

Thursday, December 29, 2011

मोरगल्लीचा नाताळ....


गेले काही वर्षे अमेरिकेतला नाताळ पाहते पण घरगुती पातळीवर पाहिलं तर मला नेहमी शांत शांत (किंवा अगदी खर सांगायचं तर उदास) वाटतं...म्हणजे तुम्ही अपार्टमेंटमध्ये रहा की घरामध्ये फार फरक पडत नाही..अपार्टमध्ये बाहेरचं डेकोरेशन बाल्कनी असेल तर दिसतं नाही तर मग लिविंग रूमच्या खिडकीतला ख्रिसमस ट्री तरी दिसेल..घरांचा विभाग असेल तर मात्र जरा बाहेरही डेकोरेशन, आतला ख्रिसमस ट्रीही बरेचदा मोठी बे विंडो असेल तर दिसेल आणि लायटिंग थोडी जास्त....पण शांतता म्हणाल तर दोन्हीकडे सारखीच...कधी कधी मला वाटायचं कुणी एल्फ किंवा हिमगौरीचे सात बुटके येऊन सगळा साज-शृंगार करून गायब झालेत..खर तर या घरामध्ये आणि एकंदरीत हा  सण साजरा करायला कुणी माणसं इथे राहातच नाही आहेत...या सर्वांना अगदी दिवाळी नाही पण निदान होळी, गोपाळकाला या सणासाठी तरी मायदेशात घेऊन जावं असं नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये माझ्या नेहमी मनात येत...
मग मागच्या वर्षी एका लोकल मासिकामध्ये portland शहरातल्या ख्रिसमस लायटिंगचा काही उल्लेख होता..ते पाहून खरं तर जायचं ठरवायचं होतं पण ते काही शक्य होणार नव्हतं. मग या वर्षी जरा आधीच माहिती काढून ठेवली आणि गेलोच...पीकॉक लेन उर्फ आपल्या भाषेत मोरगल्लीत...इथे १९२९ पासून या गल्लीत असणारी सगळी घरं १५ डिसेंबरपासून ते नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत डेकोरेशन करतात...आणि वेळ असते संध्याकाळी ६ ते रात्री ११. झाडून सगळी घरं वेगवेगळ्या देखाव्यांनी सजली असतात...आणि सगळ्यात मुख्य तिथे लोकांची गर्दी, त्यात काही उत्साही  ख्रिसमस कॅरोल गाणारे असा सगळा थोडा गोंधळ पण असतो...मला तर लालबाग परळ मधल्या एकामागून एका गल्लीत पाहिलेले गणपती मंडळाचे देखावे, तिथली गर्दी याचीच आठवण झाली..काळोखात सगळ्या गाड्यांनी आपले दिवे बंद करून गाडीतून मारलेली चक्कर असो किंवा थंडीसाठी मुलाला कानटोपीपासून ग्लवपर्यंतचे सगळे कपडे घालून गर्दीत घुसून साईड वॉकवरून जरा जास्त जवळून पाहिलेल्यामुळे थंडी न लागलेले आम्ही असो....त्या गल्लीतून आणलेली ही मोराची  रंगीबेरंगी  पिसे.......
मेरी  ख्रिसमस .....(हो  बिलेटेड...आम्ही नंतर सियाटलला गेल्यामुळे फोटो धुवायला वेळ लागला आहे याची मंडळ नोंद घेईलच...) 

Tuesday, December 27, 2011

देता देता एक दिवस.....

ट्रेसीची माझी ओळख मागच्या वर्षी उन्हाळ्यातली, ती माझ्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहायला आली तेव्हाची.खरं तर तेव्हा तिच्यापेक्षा तिच्या सासूबरोबर जास्त बोलले होते मी..मला वाटतं ओरेगावच्या कुठल्यातरी टिपीकल कंट्री साइडवरून त्यांचा मुलगा,सून ट्रेसी आणि नातू इथे पोर्टलॅंडच्या जवळ मुलाला जॉब मिळेल म्हणून मुव्ह झाले होते. आई-बाप आपल्या मुलाला मदत करत असणार असं त्यांच्या बोलण्यातून वाटत होतं. नेमकं ते त्यांचं सामान वर आणत होते आणि जेवायला नवरा दुपारी घरी येणार म्हणून मी मस्त नारळाचं दूध घातलेलं कोळंबीचं कालवण करत होते. त्याने हाय करताना दार उघडं ठेवून माझी ओळख करुन दिली आणि मी आता हा वास सगळा बाहेर जाणार म्हणून मनातल्या मनात काहीतरी विचार करतानाच ट्रेसीची सासू दिलखुलासपणे म्हणाली होती...."whatever you are cooking, it smells out of this world...." हुश्श...तसंही भारतीय जेवण सर्वांनाच आवडतं म्हणा. नंतर त्यांना काहीतरी मदत हवी होती ती करून नवरा घरात आला.
यथावकाश हाय हॅलोच्या पुढेही आम्ही गेलो...अगदी फ़ार नाही पण मला बाळ होणार आणि इथे कुणी नाही तर माझी काही मदत हवी का म्हणून तिने विचारूनही झालं आणि एक दिवस पुन्हा एकदा तिची सासू मला भेटली आणि तिच्याशी बोलल्यावर मला एक छोटा धक्का बसला.म्हणजे ट्रेसीचा नवरा इथे नवीन काम शोधण्यासाठी प्रयत्न करतोय असं काहीसं माहित झालं होतं.पण याचा अर्थ सध्या त्यांच्या कुटुंबात कुणीच कमवत नाही हे माझ्यासाठी नवीन होतं.
अमेरिकन इकॉनॉमीचा फ़टका बसलेलं हे कुटूंब, ट्रेसीच्या नवर्‍याची गावातली नोकरी गेल्यामुळे तिथलं घर वगैरे कदाचित गेलं असणार, आता इथे मिळणार्‍या अनएम्प्लॉयमेंटमध्ये मिळणार्‍या पैशावर आणखी काही महिने त्याला नोकरी मिळते का हे पाहायला आले होते. इतर कुणी म्हटलं असतं तसं जे मी करायला हवं होतं ते केलं. तो इलेक्ट्रीशीयन आहे म्हणजे नवर्‍याच्या कंपनीत इलेक्ट्रीक डिपार्टमेंटमध्ये काही असेल तर नक्की कळवेन म्हणून मी सांगितलं.संध्याकाळी नवर्‍याबरोबर त्यांच्याविषयी चर्चा करताना त्यालाही धक्काच बसला आणि त्यात त्यांच्याकडचं हायरिंग फ़्रीज त्यामुळे वाईट वाटलं...
नंतर माझेही भरत आलेले दिवस आणि थंडीत य़ेणारा पाऊस...आमच्या भेटी कमी झाल्या पण समोर दिसलो की मला उगीच आपण काहीच करू शकत नाही असं वाटायचं..आणि मग मागच्या डिसेंबरमध्ये घरात बाळ आलं....आम्ही बरेच व्यस्त झालो आणि एक दिवस अकराच्या सुमारास दारावर थाप पडली. ट्रेसी आणि तिचा मुलगा कॅमेरॉन....
"आम्हाला तुझं बाळ पाहायचं..हो की नाही कॅमेरॉन?"
"अगदी नक्की...कसं सुरू आहे तुमचं??" माझा कसानुसा प्रश्न....
एका खूप छान सजवलेल्या गिफ़्ट बॅगमध्ये नव्या बाळासाठी कपडे, सॉक्स,एक सॉफ़्ट टॉय आणि अर्थातच अभिनंदनाचं छानसं कार्ड...मला घेताना भरून आलं...
आम्ही या विषयावर खरं तर कधीच बोललो नव्हतो...पण मला खूप बरं वाटलं की त्यादिवशी पहिल्यांदी ट्रेसीने मला सांगितलं...

"Well you know my husband is still looking for the job and we are living on unemployment. Can your husband look for any opening in his company??"
"Oh Tracy, we talked about it and he is looking every week on his office portal....Lets hope for the best. I will surely let you know if something comes up."

त्या डिसेंबरमध्ये जेव्हा माणसांची बदलेली रुपं मी पाहात होते, एक नवा जीव या जगात आणून त्याच्या भवितव्याचा अवास्तव विचार करत बसले होते त्यावेळी मला ट्रेसीच्या छोट्या कृतीने नक्की काय वाटलं हे सांगायला खरं तर शब्द अपुरे आहेत....

मला सांगा जिथे रक्ताच्या बर्‍याच नात्यांना एक साधा फ़ोन करायला परवडत नव्हतं की बाळाचं विचारायला फ़ुरसत नव्हती...तिथे निव्वळ शेजार्‍यांच्या घरी एक नवा जीव जन्माला आला आहे, त्यांचं जवळचं कुणी इथे नाही म्हणून आपले सध्याचे प्रश्न बाजुला ठेऊन शिवाय पदरमोड करुन त्यांच्या आनंदात सहभागी होणारी माझी शेजारीण..नात्याची-गोत्याची जाऊद्या एका देशाची पण नाही...आणि त्याही पुढे जाऊन बोलायचं तर त्यांच्या देशात येऊन त्यांच्या नोकर्‍या मिळवणार्‍या कुणाशीतरी इतकं चांगलं का वागू शकते.....

आता माझ्याकडे आहे म्हणून मी काही दिलं तर माझं जाणार नाही हे खरंच पण जवळ काहीच नसतानाही आमचा विचार करून आमच्या आनंदात सहभागी होणार्‍या ट्रेसीने माझ्यासारखंच आणखीही कित्येक लोकांच्या डोळ्यात अंजन घालावं म्हणून हे लिहितेय...नाहीतर मागच्या आणि या ख्रिसमससाठी कॅमेरॉनला न विसरता आमच्या लिस्टवर ठेवताना मला नक्की काय वाटतं हे सांगणं तसं कठीण आहे...शेवटी काय आहे कुणा राजकारण्यांनी कारभार करुन मंदी आणली म्हणून मी त्यांच्या मागे लागू शकत नाही की तिच्या नवर्‍याला नोकरी मिळवून द्यायचंही माझ्या हातात नाही आहे..पण तिच्या कृतीने आत्ताच्या घडीला आपल्या शेजार्‍याला आनंदाचा एक क्षण देणं किती काही शिकवून जातं हे सगळंच शब्दात मांडण खरंच कठीण आहे...



तळटीप....
त्यानंतर आणखी दोनेक महिन्यांनी ट्रेसीच्या नवर्‍याला नोकरी लागली आणि तिचा आनंदी चेहरा मला बरंच काही सांगून गेला...फ़ार अपेक्षा नव्हतीच तिची....

She was so happy when she told me...."I wanted to tell you the good news..He got a job....Now we can get our own insurance and Cameron would be so happy to start the school this summer..."

Sunday, December 18, 2011

भूलबाई आणि भूलबाबा यांच्या सोबत काही जागृत क्षण

एक तर हे भलं मोठं भलतंच शीर्षक आणि शब्दही भलतेच त्यामुळे नमनालाच हा भलता गोंधळ दूर करायचं काम करावंच लागणार असं दिसतंय. भू भू भूलबाईच आहे ते आणि तो भूलबाबाच...भुलाबाई नाही आणि नसलेला भूलाबाबा तर नाहीच नाही...’भूल’.. हो तेच ते सोप्या मराठीत ऍनस्थेशिया..आता भूलबाई आणि भूलबाबा म्हणजे कोण ते तर सांगायला नकोच. हो तेच ते ऍनास्थेशिस्ट. पहिल्यावेळी भूलबाई आणि दुसर्‍यावेळी भूलबाबा यांच्या सोबत काही जागृत क्षण घालवायचं संपूर्ण श्रेय अर्थातच माझ्य दोन (अश्राप बिश्राप....) लेकरांना...

पहिल्यावेळी मी म्हणजे अगदी झाशीच्या राणीसारखं ठरवलं होतं की काही भूल-बिल घेणार नाही. सगळ्या वेदना सहन करुन आई व्हायचा आनंद घेईन. पण कस्सचं काय? हॉस्पिटलमध्ये जाऊन दोनेक तास उलटले असतील..कळा तर सहन होतच नव्हत्या पण मुलानेच आचकायला सुरुवात केली...(म्हणजे आता मी इतकं सहजपणे लिहितेय पण तेव्हा मात्र बोलती बंद झाली होती) हां तर काय सांगत होते मुलाची स्पंदनं कमी व्हायला लागली आणि मग माझ्या डॉक्टरने इमर्जन्सी सीझेरियनचा निर्णय घेतला. सगळी आधीची डॉक्टर मंडळी (योगायोगाने ते सगळे पुरुष डॉक्टर होते) ऑपरेशन थिएटरकडे (बहुधा) गुप्त झाली आणि मी ज्या खोलीत होते तिथे भूलबाई अवतरली.

देवदयेने छोट्या छोट्या आजारांची मला कमी भासत नाही त्यामुळे मुलं-बिलं व्हायच्या आधीच आय.टी.देवीच्या कृपेने लो-बॅक पेनचा दागिना केव्हाचा मिरवतेय आणि आज नेमकं त्या दुखण्यानेही अक्षरशः थैमान घातलं होतं..त्यात या बाई दत्त म्हणून समोर..अरे मी तिथे कळवळतेय आणि ही शांतपणे स्वतःची ओळखपरेड करते आणि मला जे काही सगळं माहित आहेच तीच कॅसेट परत घासतेय.



भू.बा:  Hi, my name is Sally and I am going to give you anasthesia today. (इथे नको असताना पॉज..म्हणजे तिने पॉज घेऊनही मला तिचं नाव लक्षात नाहीए..आताही मी ठोकलंय ते सध्या मोठ्या मुलाच्या कार्स चित्रपट पाहायच्या नादामुळे मला तो बर्‍याचदा सॅली म्हणतो म्हणून तेच घुसडलंय आणि ही बया तेव्हा मी कळवळतेय आणि पॉज....) We will be starting the procedure in a short while, meantime following (कुठलेतरी) standards (इथे मला उगीचच FDA standards असं का आठतवतंय...ब्वा) I have to ask you a few questions. How are you feeling today?

मी: ( मनात $%&*@#) प्रगट आधी नवर्‍याला...काय रे इतकी धाड भरलीय ते दिसतंय म्हणून का ही मीठ चोळतेय?? (मराठी किंवा खरं तर मायदेशातली भाषा परदेशात फ़्रस्टेशनचा कळस झाला की खरंच जाम कामाला येते...)

मी प्रगट(तिला): hmm hmm...(ह्म्म ह्म्म याचा अर्थ काय वाट्टेल ते घेता येतो असा इतक्या वर्षांचा अनुभव आहे म्हणून हे ह्म्म हम्म) इथे मात्र लवकर गं बाई हवं तर आधी भूल दे आणि नंतर काय पाहिजे ते विचार गं...

त्यानंतर असेच पॉज घेऊन मला नाव, वय, सोशल सिक्युरिटीचे शेवटचे नंबर आणि एकंदरीत त्या फ़ॉर्मात असलेले कुठले कुठले आकडे विचारून मग ते शांतपणे लिहिणे असा माझ्या वेदनांना न जुमानता जाहीर कार्यक्रम सुरू केला.मी मध्ये मध्ये आशेने नवर्‍याकडे पाहून पाहिले पण तो म्हणजे तुझी परीक्षा तूच दे पेपर...मी कशाला कॉपी करायला मदत करू अशा अविर्भावात टेनिसची मॅच पाहिल्याप्रमाणे एकदा तिच्याकडे (सुहास्य वदनाने) आणि माझ्याकडे (आता मी काय करू अशा नजरेने) पाहात होता...मी मात्र आता या वेदना अशाच टळतील आणि मग शेवटचा प्रश्न तुला भूलेसारखं वाटतं का? होsssssssssssssssssss..असं म्हणून मोकळी होईन असं वाटलं.....

प्रत्यक्षात मात्र मी नवर्‍याला म्हटलं, ’हे काय? माझा क्रेडीट कार्डचा नंबर, त्याच्या मागचे ते तीन नंबर आणि महत्वाचं कार्डची एक्सापायरी तारीख हे आकडे कसे काय विसरली ती गोर्‍यांच्या देशात?"

"काळजी करू नकोस..मी देईन ते तिला..."- इति अर्थातच अर्धांग.....

"कळेल तुला कधीतरी कसं वाटतं ते....’ असं पण बोलायची सोय नाही....

शेवटी ते पेपर्स घेऊन कुठे तरी अगम्य दिशेला (हॉस्पिटलमध्ये सगळ्या दिशा अगम्यच असतात आणि फ़ायनली त्यातल गमायला लागलं की आपण परत जायच्या लिफ़्टात बसलेलो असतो हे उसात(आणि जनरली कुठेही थोड्या मोठ्या) हॉस्पिटलवारी झालेले पेशंट आणि त्यांचे अर्धांग नक्की मान्य करतील....) असो तर तिला अर्थातच दिशा माहित होत्या त्यामुळे ती आणखी बराच वेळ गायब होऊन मला भूल द्यायची सोडून गूल होऊन मी तिच्या नावाने कडाकडा बोटं मोडून हाडांचा चुरा व्हायच्या एक सेकंद आधी (आणखी एका अगम्य दिशेला असणार्‍या) ऑपरेशन थिएटरमध्ये भेटली....

Hope you recognize me. I have everything ready now...Are you ready??

आर यु रेडी?? म्हणजे इतका वेळ काय आपण कबड्डी खेळत होतो?? दे गं बाई दे आता....मी काही बोलणार तितक्यात रात्री बारा वाजताही असणार्‍या इंटर्न्सच्या गराड्यामुळे वाचली ती....इकडे उठसूठ सी-सेक्शन्स करत नाहीत म्हणून ही गर्दी होती की यांच्यात मध्यरात्रीपण अशी गर्दी करणं नॉर्मल आहे देवजाणे..पण वाचली ती आणि मी अर्थातच सुखेनैव तिनेच दिलेल्या गुंगीत जाऊन एकदाची शांत झाले....

you did good....

ही तिची मलमपट्टी होती की पोपटपंची माहित नाही पण त्याच्या विचार करायचा नाही हे बहुधा तिच्याच इंजेक्शनमध्ये होतं...


त्यानंतर माझा या जातीबरोबर पुन्हा सामना व्हायचा तसा काही संबंध नव्हता पण दुसर्‍या बाळंतपणाच्यावेळी पहिल्यावेळच्या अनुभवाने आधीच एपिड्युरल घ्यायचं हे मी जाम ठरवलं होतं.म्हणजे नर्सला सुरूवातीलाच तसं सांगितलं की त्या ऑनकॉल भूल डॉक्टरला बोलावून घेतात. आपल्यालाही जास्त वेळ दर्द नको आणि कदाचित त्यांनाही इतर पेंशंट मॅनेज करायला बरं पडत असेल...असो...

तर यावेळी मी खरं म्हणजे मागचा प्रसंग पूर्ण विसरून गेले होते..थोडी सहनशक्तीही वाढली असावी शिवाय आधी हाय हॅलो करुन तो भूलबाबा गेला त्यानेही मागच्या प्रसंगाची काही आठवण व्हावी असं काही केलं नाही....अरे हो...यावेळी भूलबाबा आय मीन पुरूष डॉक्टर होता. अर्थात त्याने काय फ़रक पडणार होता माहीत नाही...पण मध्ये काय झालं माहीत नाही. नर्सची ड्युटी बदलली, नवी नर्स आणखी प्रसन्न होती. कदाचीत तिच्या सुरूवातीलाच मी भेटले म्हणून असेल शिवाय प्रसूती जवळ आली असेल तर एक नर्स फ़क्त एकच पेशंट पाहते त्यामुळे आठ तास काम करुन दमली नव्हती.आमची मैत्रीच व्हायची पण हाय माझं दर्द मध्येच आलं..मी तिला सांगून ठेवलं की बाई मला प्रचंड लो बॅक पेन आहे त्यामुळे आता हा आला नाही तर काही खरं नाही...हो...तो हाय करून गेला आणि मी हाय हाय करते तरी काही उगवेचना....

"मी त्याच्यापुढे आधी रडायला हवं होतं का रे म्हणजे त्याला कळलं असतं...."

नवरोबाला केव्हा शांत राहायचं ते बरोबर कळतं त्यामुळे तो काही ढिम्म बोलला नाही...

शेवटी माझी नवी मैत्रीण त्याला जाऊन घेऊन आली आणि साहेबांना यकदम मी पण त्यांच्या पेशंटच्या लिस्टवर असण्याचा साक्षात्कार झाला (असावा...) त्याने मला मी अमुक मात्रेचा डोस देऊन पाहातो मग तू मला सांग कसं वाटतंय ते ....वगैरे वगैरेने सुरू केलं....आणि पहिलं इंजेक्शन दिलं....माझं आपलं हाय हूय सुरुच.....माझी मैत्रीण कंफ़्युज...मी (मनातून) वैतागलेली...आणि भूलबाबा सुसंवाद रंगवताहेत...


 
भू.बा.. So tell me on the scale of 1 to 10 how much is the pain??

मी... I think its still 8 or 9

भू.बा.. I gave you blah blah blah dose....and you think its 8 or 9?? OK let me start over...Do you still feel the pain??

मी... ya absolutely.....

भू.बा.. Ok ..Now considering you were in pain before we start, do you think its going down?

मी... Actually its increasing...

भू.बा.. Which side is the pain?

मी... Right side

भू.बा.. ok and you think its still the same or more? I have the epidural in and its suppose to reduce the pain

मी... ya..Actually doctor i have low back pain already on my right hand side...Disc issues...

भू.बा... what do you mean?

मी (वेदनेच्या मार्‍यातही) त्याला व्यवस्थित समजावते....

भू.बा.. This epidural is not for that...i am treating you for the pain you have now..

मी... काय रे हा पण त्यातलाच आहे का?? असा काय हा?

भू.बा.. what was that?/

मी.. oh sorry I was talking to my husband...I mean I know this is a different epidural.

भू.बा.. You are confusing me...Let me ask you again, is the pain going down now?

मी... No its going up...I am in more pain...

भू.बा.. You are the first patient who is saying after giving the injection the pain is going up,,,

मी... I told you I already have low back pain...

भू.बा.. I can't treat you for that now...

मी... I know that but the pain is going up....

भू.बा.. I am going out of this room for five minutes..lets see if I need to increase the dose...

मी... Ok..THANKS....

गेला बिचारा...मला बिचारीला टाकून....हा सुसंवाद जेवढा वाटतो तेवढा सुसंवादी अर्थातच नव्हता..काश अशी कुठली भाषा असती ज्यात मला माझा वैताग,त्याचं कंफ़ुजन कम चिडचिडेपण दिसलं असतं...म्हणजे मला कळतच नव्हतं मी त्याला माझा बॅक प्रॉब्लेम फ़क्त संदर्भ म्हणून सांगत होते आणि त्याचं मात्र....असो....
तो पुन्हा थोड्या वेळाने स्वतःचं भिरभिरलेलं डोकं शांत करून आला...माझ्या नव्या मैत्रीणीने भावनिक आधार आणि नवरोबाने काही न बोलायची मात्रा पुन्हा उगाळून मलाही शांत केलं असावं....मग पुन्हा सुसंवाद रंगवून तो जो गेला तो काही माझ्या नशीबाने माझी नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने पुन्हा दिसला नाही...

शेवटी काय आहे मला इतकं कळलं की भूल देणा"री असो की "रा"आपल्या वेदनांवर त्यांच्याकडे उतारा असला तरी त्याच्यामार्गे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खूप सारी कंफ़ुजन्स, बीप बीपाट, त्रागा, यातूनच जाणार....भूलयोगाचा महिमा दूसरं काय??


फ़ोटू महाजालावरुन साभार...

Thursday, December 8, 2011

हुरहुर


तसं जायचं त्याचं अचानकच ठरलं; पण तो अख्खा आठवडा जाणार यापेक्षा धक्का बसला होता तो त्याचं ठिकाण कळल्यावर...फ़िलाडेल्फ़िया...दोन वर्षांपासून आम्हा दोघांपैकी कुणीतरी तिथं जायला हवं या मतावर एकमत होतं फ़क्त वेळ आणि अर्थात पैसा याचं गणित जमायला हवं होतं.माझं कामानिमित्त न्यु-जर्सीला जाणं होता होता वर्षही सरायला आलं आणि अचानक त्याचं जाणं ठरलं..नाव ऐकल्यावर खरं म्हणजे गलबलायलाच झालं.इतर कुठं जाणं असतं तर नको रे, टाळता येईल का बघ नं असं नक्की तोंडातून गेलं असतं...


पण ही जागा जोवर ते घर आहे तोवर तरी वाकुल्या दाखवणार....


मला अपेक्षा होती तसंच रात्रीच्या फ़्लाइटने उशीरा पोहोचलं तरी त्याचा फ़ोन आलाच...त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायच्या शेकडो रस्त्यांना आणि जीपीसच्या मार्गदर्शनाला न जुमानता तो त्याच रस्त्यानं जाईल अशी आशा होती..त्याची गाडी माझ्या घराच्या वळणावर आली आणि आम्ही बोलत होतो...


"मी कुठून जातोय माहित आहे का तुला?"


"हो....कसं आहे सगळं?" माझा गिळता आवंढा....


"सगळं तसंच आहे गं..काहीच फ़रक नाही..." तो....


"रो आणि डीनीसचं ख्रिसमसचं डेकोरेशनसुद्धा आणि कोपर्‍यावरच्या घराची मागच्या डेकला केलेली गोल गोल लाइटिंग, त्याच्या बाजुचे ते लायटिंगचे रेनडियर आणि फ़ुगवलेला चायनीज स्नो मॅनचा फ़ुगापण...बेट्टीला रात्री मध्येच लाइट लावायची सवय आहे नं...तिच्या वरच्या बेडरुमची लाइट सुरू आहे...." हे सगळं त्याने न बोलता मला एकदम दिसलं.......माझी मला पुन्हा मी माझ्या समोरच्या अंगणातल्या पायर्‍यावर बसलेली दिसू लागली...


"चल इथे बरेच पोलिस असणार आहेत..मी ठेवतो."


"ह्म्म्म" माझा हो आणि सुस्कारा एकदमच...


दुसर्‍या दिवशी त्याची संध्याकाळी तिथे वारी असणार ठाऊक होतं पण त्याआधीच मी माझ्या तिथल्या किचनमध्ये पोहोचले होते..किचन आणि सनरुम यांना जोडणार्‍या पायरीवर बसून मागच्या लॉनमधल्या खारी आणि ससे पाहायची माझ्या मुलाला सवय होती...त्याचं ते त्यावेळचं चिमुकलं ध्यान माझ्या समोर आलं...


"घर कसं आहे??" मी.


"चांगलं ठेवलंय" तो...


आणखीही बरंच काही बोललो आम्ही..सगळं घराबद्दलच...जणू ते घर म्हणजे आमच्या बोलण्यातली एक तिसरी आणि अत्यंत जवळची व्यक्ती...मला माहित नाही त्यातलं नक्की किती ऐकलं मी..पुन्हा खरंखुरं मागे गेल्यामुळे असेल घराला आपली आठवण येत असेल का असले प्रश्नही पडायला लागले..आणि ती बेचैनी आणखी वाढली फ़क्त....

आठवड्याच्या सगळ्या संध्याकाळी वार लागल्याप्रमाणे तो आमच्या एकएक जुन्या मित्रपरिवाराला भेटतोय..आणि मध्ये मध्ये माझेही फ़ोन..


मैत्रीण जणू माझ्या मनातलं जाणून मला मुद्दाम दुपारी फ़ोन करून म्हणालीही...


"बस हो गया अभी...आ जाओ नं वापस?? मुझे आपका वो घर बहुत याद आता है....."



आता वाटतं गेले दोन वर्षात नव्हतोच गेलो तेच बरं होतं....काळाची चाकं आपण उलट फ़िरवू शकत नाही याची जाणीव नव्हती त्यामुळे जे नाही त्याच्या वेदनेचा सल कमी होता........आता मात्र तो इथे नाही यापेक्षा तिथलं काय मनात कायमचं जाऊन बसलंय याचीच हुरहुर.........