Saturday, August 6, 2011

मैत्रीचं नातं....

कॉलेजमध्ये असताना बरं असतं, नातेवाईकांची भूणभूण मागे लागली की मग मैत्री हे कसं सगळ्यात सर्वश्रेष्ठ नातं आहे...we can choose our friends इ. गोंडस वाक्यांनी आपण ते अधिक गोजिरं करतो पण खरंच आहे का तसं हे तपासण्याची वेळ केव्हा नं केव्हातरी याही नात्यात येतेच आणि मग महत्वाचं कुठलं रक्ताचं की मैत्रीचं? हा प्रश्न थोडं खिन्न करुन जातो.

मागे माझी एक मैत्रीण अमेरिकेतल्याच तिच्या कामाच्या जागी थंडी, जास्त माणसं नाहीत या आणि अशा अनेक कारणांनी कंटाळली होती. मग मी तिला म्हटले सुट्टी किंवा घरुन कामाचा पर्याय असेल तर माझ्या घरी ये आठवडाभर. आरुषचा जन्म व्हायच्या आधीचा शेवटचा महिना होता म्हणून मीही घरीच होते. मलाही सोबत आणि तिलाही चेंज..अर्थात अगदी आयत्यावेळी नेमकं तिला कामावरुन सुटता आलं नाही आणि ही भेट शेवटी कायमसाठी राहिली. जरी त्यावेळी त्या प्रोजेक्टचा ताबा तिच्याकडे होता तरी तिला कसं निसटता आलं नाही हा प्रश्न मला पडला होता पण मी माझ्याच मनाला समजावलं की तुला सोबतीपेक्षा तिची नोकरी जास्त महत्वाची आहे.

नंतर पुलाखालून थोडं-फ़ार पाणी वाहून गेलं. कंटाळून ती परत मायदेशीपण गेली आणि आता एक दिवस ती पुन्हा इथे एक महिन्यासाठी येतेय असा संदेश आला. तेही कामासाठी नाही तर भाच्याला पाहण्यासाठी मस्त एक महिन्याची सुट्टी काढून.मला पुन्हा एकदा आनंद झाला.म्हटलं आता यावेळी एखाद-दोन दिवसाची धावती भेट इथेही दे. मी तसंही घरून काम करते. अर्थात हे होणार नाही हे मला चांगलंच माहित होतं आणि त्याचं कारण म्हणजे खरं तर मी तिच्या स्थळापासून बरीच दूर आहे आणि इतक्या अवास्तव अपेक्षा मी ठेवल्याही नसत्या.पण...तरी हा पण आहेच...निदान एक फ़ोन इतकी साधी अपेक्षा मात्र मी ठेवून बसले होते...आणि मग जेव्हा तितकाही वेळ तिला मिळाला नाही असं दिसायला लागलं तेव्हा न राहवून मीच फ़ोन केला. मला वाटतं तोवर तिला परत जायलाही एक-दोन दिवस उरले असावेत. का कुणास ठाऊक न कळत मी माझ्या मनात साचलेलं थोडंफ़ार बोलुन गेले. आम्ही चांगल्या मैत्रीणी आहोत त्यामुळे तिनेही मला फ़ोनवरतरी उलट काही झापलं नाही. आमच्या मैत्रीलाही या संवादामुळे कुठलाही धक्का पोहोचला नाहीये. पण एक मात्र खरं मी पुन्हा त्या सुरुवातीच्या we cannot choose our relatives च्या लुपमध्ये गेलेय.

मायदेशात गेलं तर हे अनुभव नेहमीचेच असतात. मागे इथे माझ्या नवर्‍याची एक मैत्रीण आली होती. जवळ म्हटलं तरी दीड तासाचं ड्राइव्ह. पण आम्ही अगदी जाऊन तिला आणलं. नेमकं मुलाचा पहिला वाढदिवस त्यामुळे खूप गडबड होती पण तिला वेळ दिला. त्यात फ़क्त परत जाताना स्वतः जायच्या ऐवजी पार्टीतलं कुणी तिच्याच भागात जात होतं त्यांच्याबरोबर पाठवलं तर तिच्या चेहर्‍यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. आणि त्यानंतर आम्ही गेलो तेव्हा मात्र बाईसाहेबांना भेटायला यायला मुंबईतल्या मुंबईत आमचा मुक्काम सेंट्रल-वेस्टर्न असा वेगळ्या लाइनीवर होता तर जड गेलं आणि नंतरच्या मायदेश दौर्‍यात तर स्वतःहून फ़ोन करायचंही सौजन्य नाही. काय म्हणायचं या मैत्रीला?

खूप उलट-सुलट विचार केला की वाटतं, कितीही नाही म्हटलं तरी रक्ताचं नातं म्हणून ज्या काही adjustments केल्या जातात त्या सगळया मैत्रीसाठी किती जणं करतील? अगदी मला स्वतःला इथे खूप कंटाळा येतो म्हणून माझ्याकडे मी जर कुणाला राहायला बोलावलं तर तो येईल? की त्यांच्या सख्ख्या भाऊ-बहिणीकडे ही परिस्थिती असेल त्यासाठी सगळ्या कामाच्या आणि घरगुती adjustments करुन जाईल?? उत्तर स्पष्ट आहे. मग का आपण असं उगाच म्हणतो की मैत्रीचं नातं वेगळंच म्हणून? वेगळं म्हणजे जिथे अपेक्षा जरी नाही ठेवल्या तरी त्यांची पूर्ती करण्यासाठीची तशी गरज नसते असं काहीसं आहे का?

अर्थात सगळीकडेच असं नसतं..म्हणजे वर म्हटलेले प्रसंग आहेत तसेच त्याच्याच विरोधी घडलेल्या घटनाही आहेत..तरीही जितकी जास्त लगबग रक्ताच्या नात्यांसाठी केली जाते तितकं लक्ष काहीवेळा मैत्रीकडे दिलं जातं का? किंबहुना हा आपला मित्र/मैत्रीण आहे म्हणजे नातेवाईकांसारखं तो काही आपल्यावर रागावणार नाही असं थोडं taken for granted मत बरेचदा असतं..आपणही मैत्रीमध्ये तेवढं माफ़ करतो आणि विसरुन पुन्हा मैत्री जोडतो कारण मैत्री ही नेहमी हवीहवीशी असते.

नवनवीन मित्र-मैत्रीणी जोडले जातात. माझ्याकडून ते सर्व माझ्या संपर्कात राहतील असे प्रयत्न मी नेहमीच करते..आता तर इमेल, सोशल नेटवर्किंग साइट्स, नेट, चॅट यासर्वांमुळे संपर्क करणेही सुलभ झालंय. पण तरी कुठेतरी जर कम्युनिकेशन गॅप आली की मग अंतर पडू लागलं की मग ते नातं पुन्हा जोडणं कठीण होतं; तसं होऊ न देणं याचा आपण नेहमीच प्रयत्न करावा असं आजच्या या आंतरराष्ट्रीय मैत्री दिनी स्वतःलाच सांगावंस वाटतं..

लहानपणी एकदा शाळा बदल,मग घर बदल आणि त्यानंतर कॉलेजमध्येही बारावीतलं कुणी माझ्याबरोबर असं नव्हतं. त्यामुळे नाही म्हटलं तरी "लंगोटीयार" का काय म्हणतात ते मला नाहीत. पण तरी आतापर्यंतच्या वाटचालीत भेटलेल्या मैत्रीचा मोठा गोतावळा आहे..हा ब्लॉग सुरु केल्यानंतर ब्लॉगमुळेही बरेच नवे मित्र-मैत्रीणी मिळाले...वेगवेगळ्या वेळी भेटलेल्या या सर्वांचं मोल माझ्यासाठी खूप आहे. त्या त्या काळासाठी त्यांचं माझ्याबरोबर असणं महत्त्वाचं आहे.अशा सर्व मित्र-मैत्रीणींना मैत्री-दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

HAPPY FRIENDSHIP DAY !!!

18 comments:

  1. ह्म्म! असं अनुभव मोस्टली सगळ्यांनाच येतात. माझंही असंच काहिसं. साला मैत्री कधी टिकवता आलिच नाही. कधी माझ्या चूकीमुळे, कधी मित्रांच्या तर कधी काहिश्या गैरसमजामूळे.
    यह तो होता ही रहता हैं ! कुणाच्या मनात काय चाललयं काय सांगता येत नाही.
    वाढदिवसाच्या दिवशी आपल्या एखाद्या जिवलग मित्राने एक कॉल, टेक्स्टही न करणं जीवाला किती लागत असेल ना अ‍ॅप्स!
    काय माहित पण तुझ्या लेखावरुन पटतं की मैत्रीचं नातं हे कदाचित अशाच प्रसंगांमूळे वेगळं असावं!

    मैत्री दिवसांच्या हार्दीक शुभेच्छा! :)

    ReplyDelete
  2. ह्म्म्म... पटलं.. पण तरीही "We can choose our friends" यावर जास्त विश्वास आहे माझा :))

    मैत्रीदिनाच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  3. सर्वप्रथम, " मैत्रीदिनाच्या शुभेच्छा! "

    अपर्णा, अगं प्रत्येक रिलेशन मधे डावं उजवं असायचंच. ते सांभाळून नातं जितकं जपता येईल तितका प्रयत्न करायचा. बाकी, नातेवाईकही तोडता येतात व तोडलेही जातात पण नातं तुटत नाहीच. पुन्हा एकत्रही येतात. मैत्रीचे मात्र तसे नाही. निवडही आपली आणि नसेलच जमत तर पूर्णविरामही आपल्या हाती असू शकतो.

    ReplyDelete
  4. लेख चांगला झालाय
    माझ्या मनात सुद्धा हे सतत चालू असत.मला मैत्री दुरावण्याचे अनुभव खूप लवकर आले.
    का झाले?कसे झाले?अन आता कितीही जुळवायचं म्हटल तरी पहिल्यासारखे नाही होत.
    कुठेतरी मनात सल राहते.
    चूक कुणाची हा प्रश्न कितीही टाळायचा म्हंटला तरी टाळता येत नाही.
    नाती दुरावतात हे खर .
    रक्ताच्या नात्य संदर्भात कितीही झाल तरी मन मरून का होईना हाकेला ओ द्यावाच लागतो .

    ReplyDelete
  5. अपर्णा, श्रीताईशी सहमत. ओळखी, थोड्या काळाचा सहवास, एका ग्रूपमध्ये असणं या सगळ्यापेक्षा खरी, वर्षानुवर्षं भेट झाली नाही तरी टिकणारे मैत्री विरळाच, नाही का?

    ReplyDelete
  6. same to same .............asach anubhav malahi aalay.....

    ReplyDelete
  7. Happy belated friendship day... :-)

    ReplyDelete
  8. दीपक, बरं झालं लिहिलंस.मला ही पोस्ट टाकेपर्यंत उगाच वाटत होतं की असे अनुभव येऊन मग विचार करत बसणारी मी एकटीच...
    मैत्री टिकवायचा माझ्या परीने मी सर्वतोपर प्रयत्न करते अर्थात जर एखादं नात जास्त टेकन फ़ॉर ग्रान्टेड मोडमध्ये गेलं की मात्र ते कठीण होतं बघ....

    ReplyDelete
  9. हेरंब पण पटलं नं...:)
    माझाही तसा विश्वास आहे की we can choose our friends फ़क्त काही नाती त्यानंतर बदलतात म्हणून मग असे विचार येत असावेत....

    ReplyDelete
  10. श्रीताई, अगदी लाखातलं बोललीस..फ़क्त अगं पूर्णविराम होता होता आपण फ़ार दोलायमान मनस्थितीतून जातो असं नाही का वाटत तुला?

    ReplyDelete
  11. सागर वेलकम टु द क्लब...बाकी ते मन मारुन हो म्हटलं जातं याचा मी विचार केलाच नव्हता...:)

    ReplyDelete
  12. गौरी तू अगदी थोडक्यात वेगळाच विचार मांडून जातेस गं...इसी बात पे आता आपण कधी भेटणार आहोत का हे माझ्या मनात येऊन गेलं बघ..अर्थात भेटायला नक्की आवडेल पण जमवायचं कसं...:)

    ReplyDelete
  13. वैभव, ब्लॉगवर स्वागत आणि सागरला म्हटलं तस वेलकम टु द क्लब...असो घरोघरी मातीच्या चुली तसं दिसतंय हेही...:)

    ReplyDelete
  14. मैथिली, आभारी..सध्या नवीन शैक्षणिक वर्षाची लगबग आहे का? ब्लॉगवर बरेच दिवसांनी दर्शन दिलंस..:)

    ReplyDelete
  15. वाचायची राहिली होती हि पोस्ट पण मैत्रीबद्दलची सगळी मते पटली. कॉलेज जीवनातली मैत्री आणि आत्ताची ह्यात खूप फरक आहे. "दिल चाहता है" मधला दूरवर दिसणाऱ्या तीन जहाजांचे दृष्य आणि त्यानंतरचे संवाद आठवतात का? तो चित्रपट पाहिला तेंव्हा मी दुसऱ्या वर्षाला होतो आणि मला देखील कितीही दूर गेलो तरी आमची मैत्री टिकून राहील वैगरे वैगरे वाटले होते. पण नंतर खूप गणितं बदलतात, निस्वार्थी मैत्री खूप अभावाने अनुभवायला मिळते.

    ReplyDelete
  16. सिद्धार्थ, "दिल चाहता है" चं ते दृश्य आठवतंय...हा पिक्चर आम्ही तीन जणांनी मिळून पहिला होता आणि तेव्हा तसंच वाटलं होतं..सुदैवाने त्यातला एक मित्र आहे पण तरी तू म्हणतोस तस गणित नक्की बदलत..
    माझी आई म्हणते तुमची पिढी खूप साऱ्या गोष्टीचा हिशोब करते त्यामुळे पटापट संदर्भ बदलतात..आपली पुढची पिढी तर फक्त फेबुमधले पाचकशे फ्रेंड्सवाली असेल नाही?

    ReplyDelete
  17. अपर्णा,
    खूप छान लिहिलं आहेस! परदेशात मला असे अनुभव जास्त आले आहेत. मैत्रीबद्दल विचार केला तर असं वाटतं की, दोन व्यक्तींमध्ये 'मैत्री' फक्त एकासाठीच असू शकते, दुसर्‍यासाठी फक्त काही अरेंजमेंट सारखं.....म्हणजे, मी ज्याला मित्र म्हणतो तो मला मित्र म्हणेलच असं नाही, पण ज्याला मी भाऊ म्हणतो तोही मला भाऊच म्हणतो!

    ReplyDelete
  18. सारंग, ब्लॉगवर हार्दिक स्वागत. तू म्हणतोस तसं असेलही कदाचित म्हणजे "अरेंजमेंट" सारखं. फक्त आपल्याला ते कळायला वेळ लागतो नाही का?

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.