Tuesday, August 25, 2009

आठवणी गणेशोत्सवाच्या...

गणपती आले आणि परेलची आठवण आली नाही असे कधीच होत नाही. लहान असताना माझ्या एका मावशीचा घरगुती दीड दिवसाचा गणपती गेला की वेध लागायचे ते परळ-लालबागकडच्या सार्वजनिक गणपतींचे. नशिबाने माझी दुसरी एक मावशी परेलला अगदी आंबेडकर रोडलगत राहायची. तिच्याकडे मग शक्यतो अनंत चतुर्दशीला लागुन जाणं व्हायचं. आम्ही सर्व मावसभावंडं घरातील एक-दोन मोठ्यांबरोबर मग चालत चालत प्रत्येक गल्लीतील सार्वजनिक गणपती पाहायला निघत असू.

माझ्या मावसभावांचे मित्र आसपास राहणारे असत त्यामुळे नरे पार्क आणि अशा काही गणपतीच्या ठिकाणी मोठ्या रांगात उभं राहायचे कष्ट वाचत. कुणीना कुणी त्या गल्लीत राहणारा असला की मावसभाऊ त्यांना बोलावुन आणत आणि मग त्यांची वट चालली की आम्ही पण फ़ुशारकी मारुन लवकर दर्शन करुन घेऊ. सगळीकडची चलतचित्र तर इतकी छान असत ना. आणि अनंत चतुर्दशीला तर काय खालुन जाणारे गणपती पाहताना तो दिवस कसा संपायचा कळायचही नाही.
२००२ च्या गणपती नंतर मात्र गणपती पाहायला २००८ म्हणजे मागचं वर्ष उजाडावं लागलं. आता मावशीकडेही कुणी तिथं राहात नाही. खरंतर चारेक महिन्यांच्या बाळाला घेऊन भारतात यायचं म्हणजे फ़िरणं असं होत नाही पण इतक्या वर्षांनी आले म्हणून फ़ार इच्छा होती परळचे गणपती पाहायची. आता इथे सगळीकडे एकटं फ़िरायची सवय झाली आहे पण म्हणून नाही कुणाला वेळ नव्हता म्हणून मग एका मधल्या दिवशी सकाळी जरा लवकर निघून एकटीने जमतील तितक्या गणपतींचे दर्शन घेतले.
इतकी वर्षे मुंबईचे गणपती पाहुनही जीएसबी मंडळाच्या वडाळ्याच्या गणपतीला कधी गेले नव्हते या वर्षी पत्ता शोधत तोही पाहिला.

खरं तर मुर्तीपेक्षा दागिन्यांनीच दबल्यासारखा मलातरी वाटला. असो. तिथुन मग गणेश- गल्लीत टॅक्सीने जायला बराच वेळ कुणी टॅक्सीवाला तयार होईना. विचार केला आता ट्रॅफ़िक पोलीसाला विचारुया. तितक्यात उलटया रस्त्याने एक टॅक्सीवाला स्वतःहुन आला. मला नंतर म्हणालाही की तुला एक-दोघांनी नाही सांगितलं ते मी पाहिलं पण तू त्या रस्त्यावर उभं नव्हतं राहायला हवं. मग काय थोड्यावेळ त्याच्याशी गप्पा मारल्या. मला रस्ते माहित नाही हे न जाणवु देता. पण भला माणूस होता.त्याने कुठला मधला रस्ता बंद होता म्हणून आधीच एका पतली गल्लीतून मला बरोबर आणून सोडलं. परत जाताना मी कसं गेलं पाहिजे हे पण मला समजावलं आणि मुख्य म्हणजे जे काही बिल झालं होतं त्यापेक्षा कमी पैसे घेतले, अगदी स्वतःहुन. चला भारतभेटीच्या पहिल्याच आठवड्यात एक सच्चा मुसलमान भेटल्यामुळे जरा बरं वाटलं.
गणेशगल्लीत आल्यावर आजुबाजुचे गणपती पाहायला काही जास्त वेळ लागला नाही. फ़क्त पावसाच्या रिपरिपमुळे गल्लीतुन पटापट चालता येत नव्हतं आणि अशा गणपती टू गणपती टॅक्सी मिळत नाहीत ना?? मध्येच आईचा फ़ोन आला आटपलं का?? मग सिमेंट चाळ आणी पोस्ट गल्ली तशीच सोडून एलफ़िस्टन स्टेशनला टॅक्सीने आले.
इतक्या वर्षांनी थोडा थोडा बदल झाला असला तरी वातावरण निर्मिती तीच होती. फ़क्त मला माझ्या लहानपणीची मजा मात्र कुठेतरी हरवल्यासारखी वाटली. असो. चालायचं.

आज लालबागच्या राजाचा या वर्षीचा फ़ोटो कुणीतरी पाठवला आणि मन डायरेक्ट फ़्लाईटने परळला जाऊन आल्यासारखं वाटलं. तेच ते लाऊडस्पीकर वरुन वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतीच्या गाण्यांचे मिश्र आवाज, लोकांची लगबग आणि लांबच्या लांब रांगा, मोठमोठ्या मुर्ती आणि ताज्या परिस्थितीवरची आरास. माझे़च मागच्या वर्षीचे फ़ोटो पाहुन समाधान करतेय...

Wednesday, August 19, 2009

फ़ुलोरा अ आ ई!

गेले काही दिवस हे पुस्तक हरवले होते अर्थात घरातल्या घरात; पण शोधायला मुहुर्त सापडत नव्हता. अखेर मागच्या पोस्टवर अश्विनीने तंबी दिल्यावर नेमकं सापडलं एकदाचं. आज सकाळच्या डाकेनं आलेल्या इ-पत्रात नेमकं बाळं आणि कुत्रा यातलं साम्य दाखवलं होतं आणि हे बडबडगीत आजचं वाचलं जाणं असा योगायोग आहे की म्हटलं लिहुचया आता ब्लॉगवर ही छोटी आठवण.

लहान मुलांना लिहावाचायला कधी शिकवतात (म्हणजे प्रत्यक्ष शाळेआधी) माहित नाही. पण इथल्या वाचनालयात मुलांना अंक ओळख चालु केली आहे. आता इथे आई आल्यानंतर तीसुद्धा घरी A - Z चे ब्लॉक्स कधीतरी वेळ काढायला म्हणून वाचुन घेते. बरोबरीने आताच अ आ ई पण सुरु करावी का??
राहिली गोष्ट पाळीव प्राण्यांची या अमेरिकन लोकांचं कुत्र्या-मांजरांचं प्रेम जरा जास्त आहेच ना! तशी ती लोकं अगदी सख्ख्या मुलासारखं त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यावर ओरडताना मी खूपदा पाहिलंय. म्हणजे पुष्कळ्वेळा मी आरुषला घरात चल म्हणून ओरडायला आणि शेजारचा रायन त्याच्या रॉक्सीवर खेकसताना एकदमच दिसतो....पण मी म्हणणार नाही हं की मुलं म्हणजे जणू पाळीव प्राणी कधी कधी मोह होतोही विशेष करुन या वयात जेव्हा ती सारखं सारखं आपल्या पायाशी घुटमळत असतात आणि आपल्या बर्याच गोष्टी ऐकतात पण तरी त्यांना थेट पाळीव प्राणी ...ही...ही...ही.....
ती सकाळची मेल आणि कविता खाली दिली आहे.
Life really boils down to 2 questions....
1. Should I get a dog??

OR........
2. should I have children??


मोत्या शीक रे अ आ ई
सांगूं कितीतरी बाई ॥

दादा आई म्हणताती,
अ आ इ ई कठिण किती
तुजला कधी न येईल ती;
म्हणु दे कोणी काही
शीक रे अ आ ई.

यू यू ये ये जवळ कसा,
गुपचूप येथे बैस असा,
ऐक, ध्यान दे, शीक तसा;
धडा पहिला घेई
शीक रे अ आ ई.

म्हणता तुजला येत नसे,
शिकविन तुज येईल तसे,
अ आ इ ई भुंक कसे;
कां रे भुंकत नाहीं?
शीक रे अ आ ई.

Friday, August 14, 2009

निसटलेले क्षण

सलिल-संदिपची जोडी त्यांच्या पाचशेव्या प्रयोगाला "दमलेल्या बापाची कहाणी" ही कविता प्रथमच सादर करताहेत. टी.व्ही.वर आम्ही पाहातोय. खरं मी ते आधी एकदा पाहिलंय (म्हणजे हे रेकॉर्डिंग ऐकायच्या आधी) आणि माहित नाही का ते, त्या वेळच्या वातावरणामुळे असेल कदाचित मला ते त्यांच्या "दूर देशी गेला बाबा" सारखं परिणामकारक वाटलं नव्हतं. आज पुन्हा हे पाहताना मी आईला म्हणतेय ही लोकं रडताना दाखवताहेत ना? मला या गाण्याला अजिबात रडु-बिडु आलं नव्हतं. गाणं सुरु होतं नेहमीप्रमाणे आणि सुनिल बर्वेबरोबरच्या संभाषणानंतर संदिप शेवटचं कडवं पुन्हा सुरु करतो. इथे लिहुच दे ते मला.

(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं


(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

हे ऐकता ऐकता न कळत कधी डोळे पाझरायला लागले कळलंच नाही. मला मुलगी नाही. पण एक गोड भाची आहे. आता ती अकराच वर्षांची आहे. पण हे कडवं मला भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीकडे एकदम घेऊन गेलं समजलंच नाही.
आमच्या घरचं हे पहिलं नातवंडं आणि त्यात मुलगी. त्यामुळे लहान असताना माझ्या खास तिला भेटायला खूप फ़ेर्या असत. मला तिच्याबरोबर खूप आवडे आणि तिला मी. ही अगदी छोटी होती पाचेक वर्षांची आणि मी लग्नानंतर अमेरिकेला आले. तेव्हा आपल्याकडे घरोघरी इंटरनेट नव्हतं. फ़ोनवर सर्व काही आपल्या लाडक्या ’अपु’ला सांगण्याची तिची धडपड आठवली. तिचा मुख्य प्रश्न असे माझ्यासाठी तिथे जेवण कोण करतं याचा. आणि एक दिवस मला आपल्या आताच शिकु लागल्या छोट्या हाताने आलेलं तिचं पत्र (त्यात मागच्या बाजुला "अपू हे पतर मी लिलं आईने नाही." असं लिहिलंही आहे) . तिचं बालपण माझ्यासाठी निसटतयं याची अचानक जाणीव झाली. पण जाणं नाही जमलं. नंतर इंटरनेटवर जसं एकमेकांना पाहायला लागलो तसं तेवढ्या वेळात मला जमेल तेवढं सगळं अगदी नवे कपडे, काढलेली चित्र असं सर्व दाखवणं पुन्हा एकदा या "झोपेतच पहातो दुरुन" ऐकुन आठवलं.
नंतर मात्र एकदाची गेले आणि तेही तिच्याच वाढदिवसाच्या बरोबर एक दिवस आधी. आता दोन वर्षांनी मोठी झाली असली तरी लहानच. जमेल तेवढे क्षण पुन्हा एकत्र काढले. मी तिला शाळेत दुपारी एकदा घ्यायला गेले तर इतकी खूश की बसं. तिच्यासाठी मी जेवण बनवलं त्याची तारीफ़. आता तो जुना प्रश्न मिटला असेल. माझ्या परतीच्या वेळी खूप आधीपास्नं तिचे भरलेले डोळे आणि २६ जुलैच्या पावसामुळे माझं विमान रद्द झाल्यामुळे तिला झालेला आनंद सगळं सगळं माझ्यासाठी तेवढंच स्वच्छ आहे. अपु तू जाऊ नकोस ना या तिच्या हाकेला माझ्याकडे कधीच उत्तर नव्हतं आणि मला नक्की काय वाटतय हे सांगुन समजायचं तिचं वय...
आता यावेळी मात्र समंजसपणा वाढलेला आहे. मी इथेच राहावं हे म्हणणं नेहमीच आहे पण मी परत जाणार हेही आता बहुतेक स्विकारलय. आणि आता अजुन मोठी झाली ना? तिला तिचं व्यस्त शालेय जीवन आलं आणि त्यात आता खरं सांगायच तर माझ्यासाठी वेळ नसणार. हा क्लास, ती परिक्षा. इतकं व्यस्त की यावेळी चक्क तिने आता मला ती सातवीत जाईपर्यंत जर मी मध्येच आले तर ती किती बिझी असेल याचा पाढा वाचला. म्हणजे मी येऊ नको असं नाही पण तरी तिला इच्छा असली तरी वेळ नाही. म्हणजे पुन्हा "बालपण गेले तुझे-तुझे निसटून, उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून, जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे" असंच काहीसं....
आताही मी निघताना डोळ्यात पाणी आहे. अजुन आम्ही सर्व इंटरेनटवर शेअर करतो. आम्ही काही वर्षांनी जरी भारतात परत गेलो तरी तिचं कॉलेज मधलं वेगळं जग असेल आणि त्यात मी हरवली असेन का गं?? सगळं या संदिपने लिहिलेल्या कडव्यासारखं. आणि आता कल्पना करणं खरं फ़ार चुकीचं आहे पण जेव्हा ही सासरी जाईल त्या काळातल्याही मुलींच्या डोळ्यात पाणी येत असेल तरी ते माझ्यासाठीही येईल का?? सगळे निसटलेले क्षण डोळ्यापुढून जाताहेत आणि आता भरल्या डोळ्यांनी काहीही लिहिणं अशक्य आहे.

Monday, August 10, 2009

अशीही एक मंगळागौर

अमेरिकेत आल्यावर पंढरीच्या वारीचा बुक्का कपाळी लावावा तसं पहिलं ड्रायव्हिंग लायसन्स पदरात पाडून घेतलं आणि मग नवनवीन ठिकाणी जायच्या आधी "आधी वंदु गणराया" उक्तीप्रमाणे पहिला नमस्कार मॅपक्वेस्ट्ला करुन रस्त्याचा नकाशाचं (इथल्या भाषेत डिरेक्शन्सचं) दान पदरात पाडून घ्यायचं. हे नमन झालं की मग एकदा गाडीत बसलं की मग बहुतेक करुन मुक्कामाच्या जागीच गाडीतुन उतरायचं. अर्थात कधी एखादा रस्त्याचं नाव नेमकंच वाचलं गेलं नाही की मग मारा गिरक्या नाहीतर कुणाच्या घरी जात असु तर करा त्यांना फ़ोन. आणि मैलोनमैलचे हायवे बिनबोभाट तुडवल्यावर गाडी अडायची ती मुक्कामाचं ठिकाण हातभर अतंरावर असताना."डुबी जब दिल की नैया सामने थे किनारे" सारखं.
तसं प्रवासाचं मला भारी वेड. आणि योगायोगाने नोकरीसाठीही बरचं भटकावं लागलं. आठवडाभर क्लायंटकडे आणि विकेन्डसाठी फ़क्त घरी. त्या पहिल्या चार वर्षात नवनव्या ठिकाणी रेन्टल गाडी घेऊन हिंडण्यात फ़ार मजा होती. दरवेळी रस्ते चुकायचे आणि नवे रस्ते शोधायचे. कधीकधी अगदीच नाही सापडलं तर मग एखाद्या दुकानात नाहीतर पेट्रोल पंपाला थांबुन विचारायचं.पण तरी बर्याच ठिकाणी मी या माझ्या वर उल्लेखलेल्या मॅपक्वेस्ट नामे दैवताच्या कृपेने नीट पोहोचायचे. आता नाही म्हटलं तरी जरा अतिआत्मविश्वास आल्यासारखं झालं होतं. आणि अशातच आमच्या ओळखीत एका ठिकाणी मंगळागौरीचा कार्यक्रम (अर्थातच फ़क्त महिलांसाठी) एका बाईंच्या घरी करण्याचं ठरलं. त्यांनी एक शनिवार पक्का केला आणि झाडून सगळ्यांना बोलावलं. हो शनिवारच कारण मंगळागौर मंगळवारी साजरी करायला अर्थातच कुणालाही जमणार नव्हतं.
आमच्या पेन्सिल्व्हेनियात आधीच उतार-चढावामुळे डोंगरासारखं वाटणारे भाग जास्ती आहेत. आणि टिपिकल अमेरिकन मेंटेलिटीची अति एकांतवासाची घरंपण भरपुर. ही अशी घरं जितकी एकांतात तितकी जास्त महागही असतात त्यामुळे आम्ही त्यांना सरसकट मिलियन डॉलर हाऊसेस म्हणतो. असो.
त्यामुळे माझी एक मैत्रीण मला म्हणालीही की एकत्र जाऊया. पण त्यासाठी मला आधी तिच्या घरी एक तास जा मग तिच्या घरुन पुन्हा इथे या. आणि परत जाताना तिच्या घरुन माझ्या घरी. विचारानेच कंटाळा आला. आणि मॅपक्वेस्टवर डिरेक्शन्स पाहिली तर हे घर माझ्या घरापासुन जास्त जवळ पडणार होतं. फ़क्त माझ्या बाजुने जाणारं दुसरं कुणी तिथे नसणार होतं म्हणून मग मी एकटीनेच येईन असं ठरवलं.
सगळ्यांनी जागरण करायचं ठरवलं होतं आणि रात्रीच्या जेवणाचा बेत होता त्यामुळे निघायची वेळ संध्याकाळची होती. मी माझ्या घरचं आटोपुन निघाले आणि नेहमीप्रमाणे रस्त्याला लागले. गाडीत आवडीची गाणी लावली. सुरुवात बरी झाली आणि लोकल हायवे संपल्यानंतर तो तसा टिपिकलवाला भाग चालु झाला. मुख्य म्हणजे सिंगल लेन आणि थोडे छोटे रस्ते आणि दोन्ही बाजुला शेतं.थोडं कंट्रीसाईड सारखं. काही मोठी-मोठी रॅंचेस. एक घर गेलं की बर्याच वेळाने दुसरं घर. रस्त्यावर कुठेही पेट्रोलपंप किंवा दुकानं नाहीत. गाड्यांची रहदारीदेखील जेमतेम.
पोहोचायला एक-दोन मैल उरले असताना मला एका ठिकाणी डावीकडे वळायचं होतं ते काही केल्या मिळेना. मग चुकले असेन असं समजुन आधी तसच सरळ थोडं पुढे जाऊन पाहिलं. छ्या! असं-कसं झालं? मग पुन्हा उलट्या बाजुने तसंच जाऊन पाहिलं तरी मिळेना. नंतर विचार केला की फ़ोन करुया तर पाहते तर फ़ोनला लिंकच नाही. आता कठीणच होतं. मग विचार केला की परत घरी जाऊया. पण हे उलट-सरळ जायच्या नादात रानभूल पडल्यासारखं तेही वळण कळत नव्हतं. सगळेच रस्ते सारखे वाटायला लागले. आता फ़ोनला लिंक येईपर्यंत सरळचं जात राहुया असा विचार केला. सहज म्हणुन गाडीच्या गॅस इंडिकेटरकडे नजर टाकली तर शेवटचा क्वार्टर बापरे! एकतर शेवटचा क्वार्टर लवकर संपतो आणि इथे तर कुठे इंधनाची सोयही दिसत नाही. त्यामुळे एका ठिकाणि फ़ोनला लिंक आल्यावर सरळ एका घराच्या एँट्रन्समुळे उजवीकडे जरा जास्त जागा होती तिथे सरळ हजार्ड लाइट्स लावुन गाडी बाजुला घेतली आणि फ़ोन लावायला सुरुवात केली. आता अंधारही पडायला लागला होता. आणि इथे तसही बर्याच रस्त्यांवर दिवेही नसतात.
माझ्या सेलमध्ये माझ्या माहितीत तिथे जाणार्या सर्व मैत्रीणींचे नंबर होते त्यामुळे शहाणपणा करुन मी ज्यांच्या घरी ही मंगळागौर असणार होती त्यांचा घरचा नंबर घ्यायलाही विसरले होते. एक-एक मोबाईल नंबर फ़िरवायला सुरुवात केली आणि माझे धाबे दणाणले. बहुतेक तिथे इतक्या लोकांच्या आवाजात कुणालाही रिंग ऐकु येत नव्हती. सगळ्यांचे नंबर व्हॉइस-मेलमध्ये जात होते. आणि इथेतर माझ्या काळजाचे ठोके वाढायला लागले होते. कारण मला कळतही नव्हते की मी नक्की कुठे आहे म्हणजे मी नवर्याला तरी फ़ोन करुन मला घ्यायला बोलावु शकेन. काय करावं कळत नव्हतं नशिबाने एका मैत्रीणीने तिचा फ़ोन उचलला आणि हाय कंबख्क्त ती त्या मंगळागौरीच्या इथे नव्हती कारण तिच्या मुलाचा वाढदिवस होता. आणि मुख्य म्हणजे तिला जेव्हा कळलं की मी कुणाकडे जातेय तेव्हा तिलाही माझ्यासाठी टेंशन आलं कारण तिच्यामते त्यांचं घर थोडं असं फ़ोनवरुन समजावुन सांगुन मिळण्यासारखं नाही. ती स्वतः बाहेर जेवायला असल्याकारणाने ती मला दुसरे कुठले नंबर देऊ शकणार नव्हती. पण मला परत फ़ोन करायला सांगुन हा फ़ोन मी ठेवला. आता मात्र मला जरा जास्त दडपण आलं. शेवटी मी माझ्या अजुन एका मैत्रीणीच्या घरी फ़ोन केला कारण ती जरी मंगळागौरीला असली तरी तिचा नवरा घरी असणार म्हणजे तो काहीतरी करुन मला त्या घरचा नंबर शोधुन देईल असं मला वाटलं. माझा त्याला फ़ोन लागला तेवढ्यात माझ्या मैत्रीणीनेच त्याला फ़ोन करुन सांगितलं होतं की ती मला फ़ोन करायचा प्रयत्न करतेय पण तिचा लागत नाहीये. ही स्वतः कोणाबरोबर जेव्हा त्या घरी गेली तेव्हा तिला रस्ता पाहुन कल्पना आली की हा थोडा ट्रिकी रस्ता आहे आणि एकटीने येणारी मीच होते.
हे होइस्तोवर बराच वेळ झाला होता. मी ज्या घराबाहेर थांबले होते तिथुन बहुतेक एक अमेरिकन बाई बराच वेळ मला गाडीत पाहात असणार. मी साधारण सेफ़ व्यक्ती आहे अशी काही कल्पना झाल्यावर ती आपल्या गेटच्या बाहेर आली आणि मला दिसली. मी खिडकीची काच खाली केली आणि तिने मला विचारलं की मी बराच वेळ तुला इथं पाहातेय काही मदत हवी आहे का? मग मी तिला रस्त्याचं नाव सांगुन विचारलं की मी कुठे आहे म्हणुन. तिने जी खूण मला सांगितली ती मला साधारण कळली कारण इतका वेळ जा ये करताना मी एका सेव्हन वे स्टॉप साइनला दोनदा तरी थांबले होते आणि माझं डावं वळण त्या स्टॉप साइनच्या एका कोनाला होतं जे आरामात चुकतं. तिचे आभार मानतेय तोच माझ्या मैत्रीणीचाच मला फ़ोन लागला आणि मी सुटकेचा निश्वास टाकुन तिला सांगितलं मला त्या स्टॉप साईनपाशी यायला.
यावेळी मी जरा नीट पाहिलं. साधारण चार रस्त्याला स्टॉप साइन असेल तर एकच डावं वळण असतं आणि रस्त्यांची नावंही नीट दिसतात. इथे जरा प्रकरण थोडं ट्रिकी होतं. म्हणजे मुख्य
चार रस्तेच होते पण अजुन थोडं पुढे जाऊन डावीकडे दोन आणि उजवीकडेही वळणं होती. ती थोडी दूर असल्याने त्या रस्त्यांची नावंही दिसत नव्हती. म्हणजे इथं पहिल्यांदी येणारा प्रत्येकजण चुकतच असेल अशी निदान मी माझी समजुत करुन घेतली आणि साधारण डावीकडे बाजुला थांबले.याला आपण सात रस्ता म्हणुयात असंही डोक्यात आलं.
थोड्याच वेळात मला घ्यायला आमच्या होस्टबाईच त्यांची गाडी घेऊन आल्या आणि पुढे त्यांना फ़ॉलो करत जाताना मी म्हटलं या घरी कुणी हरवलं तर फ़क्त त्याच आणू शकतील. एकदाची पोहोचले आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊनच काय ती पहिल्यांदी भेटले.
जमलेल्या सगळ्या बायकांच्या गप्पा-गाणी यांना ऊत आला होता. मी मात्र आता रात्री पुर्ण जागुन सकाळीच निघण्याचं स्वतःच ठरवुन टाकलं कारण पुन्हा रात्रीच्या पारी हरवण्याची माझी बिल्कुल इच्छा नव्हती. नंतर उरलेली रात्र खरचं खूप मजा आली. सर्वांनी पुस्तकं, इंटरनेट वरुन माहिती काढुन सगळं साग्रसंगीत मंगळागौरीचं जागरण केलं. अगदी बसफ़ुगडी, गाठोडं इ. सुद्धा. म्हणजे मुंबईत राहिल्यामुळे किंवा आमच्याकडे अशा काही प्रथा नसल्याने मला स्वतःला मंगळागौर भानगड तशी माहित नव्हतीच. बरेच खेळही तिथेच कळले. खूप मजा आली. खायचं पण सर्व छान-छान आणि आयतं होतं.
सकाळी मला त्या काकु अगदी मुख्य रस्त्यापर्यंत सोबतीला आल्या; तरीही सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो हा त्यांच्या घरी जाण्याचा प्रवास आणि तो सात रस्ता.

Friday, August 7, 2009

फ़ुलोरा... छोट्यांसाठी पण चारोळीच

लेकाला सारखं इथल्या लायब्ररीत नेताना लक्षात आलं कळत नकळत नर्सरी राइम्सकडे तो जास्त ओढला जातोय. खाता-पिता तिथल्या कविता साभिनय म्हटल्या की स्वारी खुश असते. म्हणजे त्यात काही वैट नाहीये. तेही शैक्षणिक आहे पण नकळत आपण आपल्या गाण्यांना विसरतोय की त्याच मार्केटिंग कमी पडतय असं होऊ नये म्हणून शेवटी आज बरेच दिवसांनी "फ़ुलोरा" हातात घेतलंय. ’मी माझा’ मुळे चारोळी प्रसिद्ध झाल्या असं बर्याच जणांना वाटतं पण मी म्हणते खोटं आहे. त्या आधीच फ़ेमस होत्या. लहान मुलांची कितीतरी गाणी म्हणजे चारोळ्याच आहेत.
बघा ना छोट्यांना चारोळी आणि ज्यात खूप अभिनय करता येईल असं काही तर हवं नाही का? मी तर माझ्या पद्धतीने खूप सारी गाणी रिमिक्स पध्दतीने म्हणते. म्हणजे जी ओळ त्याला आवडत असेल ती वेगवेगळ्या चालीत आणि आवाजात म्हणजे तेवढाच तोंडाचा आ जास्त वेळा होतो आणि दोन घास जास्त पोटात जातात :)
असो. तशी गाणी अशी शोधली की सापडत नाहीत. पुन्हा बालवर्गात जावं लागणार असं दिसतंय. तसही माझं शालेय शिक्षण मराठीत झाल्यामुळे किंडरगार्टन सध्या चालु आहेच. दुसरीकडे बालवर्गपण रिपिट करते. म्हणजे मग कुठेच कमी पडायला नको. असो. एक-दोन छोट्या इथे देतेय. वय वर्ष एकसाठी चारोळीच बेश्ट.

१. मनिमाऊ मनिमाऊ
नेहमीच तुला हवा खाऊ
उठता-बसता गुरुगुरु
म्याव म्याव सदा सुरु

२. गरगर फ़िरुनी दमला भोवरा
मनात म्हणाला थांबु का जरा
पण एका पायावर उभं कसं राह्यचं
सारखं डोकं खाली जायचं.

आणि आपलं ऑल टाइम हिट...हॉल ऑफ़ फ़ेममध्ये कध्धीच गेलेलं

३. ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाउस आला मोठा

Wednesday, August 5, 2009

बोबडे बोल

गेले काही दिवस आम्ही ती जुनी एक जाहिरात आठवतोय ज्यात नवरा-बायको आपल्या मुलाला बोलायला शिकवत असतात आणि मग नवरा म्हणतो "झेकोस्लोव्हाकिया बोला" असं काहीतरी. निमित्त आहे अर्थातच चिरंजीवांची इतके दिवसाची हु, आछ आणि असं काहिबाही बोललेलं अचानक "दुदु" रुपाने भेटीला आलं.
"अरे हा बोलला!". माझं मत तो कामाचं बोलतो. म्हणजे अगदी सुरुवातीपासुन त्याला बेसिक म्हणजे "आई" "बाबा" असं त्याच्याबरोबर बोलुन आणि त्याला शिकवुन दाखवत होते. अर्थात मुलगे जरा उशीरा बोलतात हा जगमान्य सल्ला माहित असल्याने इतक्या लवकर आउटपुट मिळेल अशी अर्थातच अपेक्षा नव्हती. मध्येच कधीतरी त्यानं बाबाबाबा असं म्हणायला सुरुवातही केली होती. पण अर्थातच ते "बाबा" नव्हतं. म्हणजे एकतर तो बाबाकडे पाहुन तसं बोलत नव्हता आणि दोन बा म्हणुन थांबतही नव्हता त्यामुळे अर्थातच आम्ही काही तो बोलतो बिलतो असं काही जाहिर केलं नाही. आणि तसं मुलं आधी नुसतं ब्लॅबर करतातच ना हे थोडं तसचं. नंतर तर मी तो "आई", "बाबा" हा धोशही थोडा कमी केला आणि एकदम नॉर्मली त्याच्याशी बोलणं चालु ठेवलं. पण मागच्या महिन्यात जेव्हा बी.एम.एम.ला आम्ही गेलो होतो, तेव्हा स्ट्रोलरच्या कप-होल्डरला त्याचा दुधाचा सिपी कप ठेऊन मी त्याला इथे तिथे हिंडवत होते. बहुधा नेहमीची दुधाची वेळही टळून गेली होती. थोड्या वेळाने छोटे साहेब स्वतःच तो सिपी कप माझ्याकडे घेऊन आले आणि चक्क "दुदु"?? मी काय सॉलिड उडाले. कधी एकदा नवर्याला सांगते असं झालं.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे नाही की त्याला शिकवणारे सगळे शब्द सोडुन फ़क्त रोज दुदु घे असं म्हटलेलं दुदु त्याने सर्वप्रथम त्याने म्हटलं. मला पक्की खात्री आहे ही आजची पिढी बरोबर त्यांना काय हवं तेच पहिले करणार आणि ते बरोबर त्यांच्या फ़ायद्याचं असणार. पुढच्या शब्दाची अजुन वाट पाहातोय म्हणजे तसा एखादा शब्द तो म्हटल्यासारखं करतो झेकोस्लोव्हाकियासारखं. पण मी एखाद्या दिवशी जेवण द्यायचं विसरले तर वरण-भात किंवा खिचडी असं काही म्हणेल. आणि खरंच आई हा शब्दतर माझी आई इथे आल्यापास्नं घोकतेय पण हा ढिम्म दाद देत नाही तिला. बाबा कधीतरी आपल्या मागे म्हटल्यासारखं तरी करतो आजीसाठी पण कधीतरी "ताजी" पण आई?? अहं..अजिबात नाही. मी माझ्या आईला म्हटलं अगं सध्या त्याला सगळ्यात सहज आईच उपलब्ध आहे त्यामुळे त्याला काही गरज नाही आई म्हणण्याची. कदाचित सर्वात शेवटीच म्हणेल.
आजकाल मध्येच तो काही नाही बोलला तरी आम्हाला काहीतरी अर्थपुर्ण ऐकु येतं आणि मग आम्ही तिघं त्याबद्दल चर्चा करतो. त्यातल्या त्यात दे दे बर्यापैकी स्पष्ट वाटतं. म्हटलं ना कामाचं काय ते सर्व पहिलं. तो काय म्हणेल ते म्हणेल माझा नवरा मात्र अजुनही वाट पाहातोय त्याच्या "झेकोस्लोव्हाकिया"ची.

Saturday, August 1, 2009

झी मराठीचं चुकतंय बुवा

आता नवा मराठी सा रे ग म प जरा निवांत पाहुया म्हणतच होते आणि संध्याकाळी यु ट्युबवर अश्विनचं चॅनल चालु तर काय हे?? या व्हिडीओ मध्ये स्पष्ट लिहिलंच आहे. म्हणे झी नं कुणी DMCL नावाच्या कंपनीला हाताशी धरुन सारेगमप चे सर्व व्हिडिओ काढुन टाकायला लावले आहेत. च्यामारी हे बरं आहे. म्हणजे स्वतः जजेसच्या संगनमताने हवे तसे निक्काल लावायचे. शोच्या टि.आर.पी. साठी हवे ते स्पर्धक काढ घाल, कॉल बॅक करायचे. एस एम एस चा धंदा करायचा आणि काही लोकं त्यातलं चांगलं यु ट्युबवर पाहतात त्यांच्या तोंडचा घास पळवायचा?? काय हे?? आता मध्येच आम्हाला लिटिल चॅम्पसची आठवण झाली, सायलीचा आवाज ऐकायचा असेल तर झी ला फ़ोन करायचा की काय?? आणि जे लोक देशाबाहेर राहतात त्यांना थोडातरी आपल्या भाषेतला जरा कुठला चांगला कार्यक्रम आपल्या सवडीने बघायचा असेल तर काय करायचं त्यांनी??
काळ बदलला आहे याची झीला कल्पना आहे का?? अरे कोण कुठली सुझन बॉयल पण तिच्या ऑडीशनच्या या यु ट्युबला काही कोटी हिट्स आहेत आणि ७५००० च्या वर रेटिंग्ज; तर ब्रिटन गॉट टॅलन्टवाले कुणाच्या पाठी गेले नाहीत. मराठी माणसं कुणी वर जायला लागला की त्याचे पाय खेचतात असं ऐकलं होतं त्याचं हे मुर्त उदा. आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर माझ्या मते झीवाले त्यांचे स्पॉन्सर्स, जाहिराती आणि एस.एम.एस.च्या रुपाने मिळणारा पैसा यातुन भरपुर फ़ायदा मिळवत असणार यात काही वाद नाही. पुन्हा मध्ये मध्ये सी.डी. काढतात त्यांचंही उत्पन्न आहे. मग ही अजुन हाव नक्की कशासाठी?? खरतर कार्यक्रम संपल्यानंतरही खूप दिवस चालणारी चकटफ़ु जाहिरात म्हणजे हे व्हिडीओ असं भरल्या कपासारखं ते का नाही गृहीत धरत?
अश्विनचं हे चॅनल खूप लोकप्रिय आहे म्हणून त्यांनी असं करावं का? त्याचे व्हिडीओ कॉमेन्टस ९९% वेळा परफ़ेक्ट असतात आणि खूपदा त्यात झीची पोल खोललेली असते. आता इतक्यात झालेल्या आजचा आवाजच्या वेळी तर त्याच्या आणि युजर कॉमेन्टस मध्येही आपसात तुंबळ नाही तरी छोटी युद्ध चालु होती. पण मला वाटतं तसही लोकंही काही इतकी दुधखुळी राहिली नाहीत की त्यांना ही झीची चालुगिरी कळत नसावी. आणि यु टुय्बच्या कॉमेन्ट्सद्वारे आपण आपलंही मत मांडु शकत होतो जे इतरवेळी आपण आपल्यात मांडत असु. पण त्याला हे झीवाले घाबरले??
आपण फ़क्त आपल्याला आवडलेली गाणी, काही विस्मृतीत गेलेली गाणी आणि काही पसंत पडलेले आवाज या सर्वासाठी हा कार्यक्रम पाहातो. निदान मी तरी निकालासाठी हे कार्यक्रम पाहण्याचं सोडलय. आणि खरं तर माझ्यासारखे प्रेक्षक जे हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच भारतात गेलेत त्यांनी तरी यु ट्युबवर जेव्हा पाहिलं तेव्हाच त्यांना पहिल्यांदा या कार्यक्रमाबद्दल कळलं. आमच्याकडे बी.एम.एम. साठी आलेल्या काही कलावंतांनीही खूप कॅज्युअली विचारलं की तुम्ही यु ट्युबवर आमचं हे हे पाहिलं असेल आणि काय झालं त्यात?? शेवटी कलाकार म्हणून त्यांचं लाइव्ह प्रेझेंटेशन पाहायला पैसे मोजुन गेलोच की आम्ही आणि भारतातही जातातच. उलट यु टुबवर आपली जाहिरात होते असाच विचार त्यांनी केलेला वाटला.
केवळ दुसरं कुणी आपले कार्यक्रम दाखवुन त्याबद्दल आपले विचार मांडतय म्हणून जर हा झीचा अट्टाहास असेल तर हे म्हणजे कोंबडं झाकलं म्हणून सुर्योदय न होण्यासारखं आहे. आणि आता पर्यंत सारेगमप ची लोकप्रियता पाहता या कार्यक्रमातुन मिळणार्या पैशाची भीक झीला लागली असेल तर तसंही नक्कीच नाही आहे. मग का हा उगाचच उगारलेला बांबु?? अरे हे इंटरनेटचं युग आहे..आपणही आपली मत थोडी अपग्रेड करुया....