Tuesday, November 29, 2011

एक छोटासा अगोड प्रवास....

नमनाचं फ़ॅट एकदम काढून टाकायचं असेल तर ही कहाणी आहे मला गेले काही महिने झालेल्या एका तात्पुरत्या मधुमेहाची. मागच्या वर्षी  काही महिने खरं तर या ब्लॉगच्या नियमित वाचकांना खादाडी पोस्टा वाढल्याचं लक्षात आलं असेल, काहीवेळा अतिरेकच होता. एक म्हणजे आधीच आळशासारखं कधीतरी ब्लॉगवर लिहायचं आणि मग कधी काळी कुठे कुठे खाल्या गेलेल्या खादाडी आठवणी आळवत बसायचं..हे काय गौडबंगाल आहे याचा कदाचित काहींना संशयही आलाही असेल..असो आता वेळ आली आहे ती थोडं खरं मांडायची.


गोडबंगाल वगैरे काही नव्हतं...असलंच तर अगोड, बाळा मी काय खाऊ या प्रश्नाने भरलेले काही महिने....’मधुमेह’ हा एकच शब्द..इतके दिवस ’भारत आता मधुमेहाची राजधानी आहे’ वगैरे फ़क्त ऐकलं होतं. ते संकट जेव्हा असं समोर उभं ठाकलं तेव्हा अगदी खरं सांगायचं तर मी गळपाटलेच....एकीकडे नव्या बाळाच्या चाहुलीची आनंदाची बातमी येऊन काही महिने झाले होते आणि आता आवडेल ते सग्गळं सग्गळं मनसोक्त खायचं या विचारात असतानाच दुसर्‍या त्रिसत्रातच रक्तचाचणी "जेस्टेशनल डायबेटिस" असल्याचं दाखवतेय म्हणजे आता बाळ वेळेवर आलं तर निदान सहा महिन्याचं तरी वास्तव्य करणारा हा आजार. शिवाय आयुष्यभर कायमचा टाइप २ मधुमेह व्हायची भिती. पण आता "आलिया भोगासी" म्हणून सामोरं तर जायलाच हवं. या माझ्या प्रवासाची ही छोटीशी कहाणी. कुणालातरी त्यातून थोडीफ़ार माहिती मिळाली तर फ़ायदा व्हावा म्हणून.

जेस्टेशनल डायबेटीस हा बायकांना (आणि त्यातही आशियाई वंशाच्या बायकांमध्ये जास्त आढळणारा) गरोदरपणी होणारा एक प्रकारचा मधुमेह आहे. मधुमेह म्हटलं की चला आता साखर बंद आणि तुमच्या अमेरिकेत सगळं शुगर फ़्री मिळतं ना? इतकं सोप नाही हे जेव्हा माझी पहिली डाएटिशीयन बरोबर चर्चा झाली आणि लक्षात आलं.

परदेशात या (आणि जनरलीच) आजाराबाबतीत जागरुकता जास्त आहे. सर्वप्रथम इंश्युरन्सतर्फ़े एक रक्तातली साखर मोजायचं एक यंत्र हातात आलं आणि एका नर्सने ते कसं वापरायचं हे शिकवलं. एका छोट्या लॅन्सेटने थोडंसं भोक पाडून मग रक्ताचा एक थेंब त्या यंत्राच्या स्ट्रीपवर टाकला की काही सेकंदात यंत्र साखर मोजुन ती दाखवते. मला दिवसातून चार वेळा हे करावं लागे आणि आठवड्यातून एकदा ते नर्सला कळवावं लागे. म्हणजे मुख्य डॉक्टरला दाखवून त्याप्रमाणे औषधोपचार ठरवले जात. त्याचप्रमाणे एक डायटीशीयन तुम्हाला तुमच्या शारिरीक गरजांनुसार डाएट ठरवून देते. त्यात मुख्य मोजणी असते ती कर्बोदकांची (carbohydrates) कारण ती खाल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर अवाजवी वाढू शकते. म्हणून मग ठरवून दिलेल्या मोजणीप्रमाणे जर ते खाल्ले गेले तर मग थोड्या-फ़ार गोळ्यांनी तुमचं काम भागतं.

पण प्रेगन्सी जसजशी पुढे जात तसतसं हॉर्मोन्सही आपलं काम जोमाने करतात आणि मग फ़क्त डाएट सांभाळलं तरी साखर वाढतेच..मग अशा परिस्थितीत काही वेळा इन्सुलिनची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. मलाही शेवटचे दोन महिने दिवसाला तीन वेळा इन्सुलिन घ्यावं लागलंय..मी खरं तर याआधी कधीच स्वतः स्वतःला (आणि तेही असं नियमाने) इंजेक्शन देईन असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं..पण यावेळी बहुधा सर्वच अनुभव घ्यायचं लिहिलं होतं. सारखं आपण कुठे नं कुठेतरी टोचतो असं उगाच वाटे पण नंतर सवय झाली.शंभरपेक्षा जास्त इंजेक्शन्सतरी या काळात मी स्वतःला टोचलीत.हे इंजेक्शन कसं टोचायचं तेही नर्स शिकवते.

इन्सुलिन घ्यावं लागलं तर रक्तमोजणी अवश्य करावी कारण इन्सुलिनमुळे एकदम साखर कमी होऊनही धोका जाणवू शकतो त्यामुळे जवळ काहीतरी गोड, कार्बवालं ठेवावं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण वेळ आली तसं नर्सेस आणि डॉक्टरनी खूप छान समजावलं. त्यामुळे मानसिक दडपण कमी व्हायला मदत झाली. माझी आता हाय रिस्क प्रेगन्सी असल्यामुळे नेहमीच्या गायनॅकऐवजी मला पेरिनेटॉलॉजिस्ट चेक करायची. गेले काही महिने ती माझी मैत्रीणच झाली होती. कितीही कामात असली तरी ती माझ्याशी भरभरुन बोलायची. तिची मुलं आता कॉलेजला होती पण माझ्या दोन वर्षाच्या मुलाची ती आवर्जून चौकशी करायची आणि शिवाय मी त्या भागातही नवीन होते त्यामुळे आसपासच्या भागाच्या टिप्स, माझं घरुन काम करणं अशा बर्‍याच विषयांवर आम्ही गप्पा मारायचो. शिवाय माझ्या इतर काही गोष्टी ठीक नव्हत्या तेव्हाचा तिचा चेहरा आणि नंतर गाडी रुळावर आणल्यानंतरच्या तिच्या प्रतिक्रिया हे सगळं इतकं पर्सनल झालं होतं की काहीवेळा मला वाटायचं हिची मी एकटीच पेशंट असावी.एकंदरित ही डॉक्टरची व्हिसीट तशी वाळवंटातली हिरवळ होती.

आहाराबद्द्ल महत्वाचं बोलायचं तर एकाच वेळी भरपूर खायच्या ऐवजी न्याहारी, स्नॅक, दुपारचं जेवण, स्नॅक, रात्रीचं जेवण आणि पुन्हा एकदा स्नॅक असं खायला हवं आणि फ़ूड लेबल्स वाचायची सवय अगदी रोजचं गणपती स्तोत्र म्हटल्यासारखी अंगिकारली तर बरं. त्यातही पाहायचं ते कार्ब कंटेन्ट. १५ ग्रॅम म्हणजे १ कार्ब असं पकडलं तर मला सकाळी न्याहारीला २ कार्ब, त्यानंतर न्याहारीला १ कार्ब, जेवताना ३ कार्ब, दुपारच्या न्याहारीला १ किंवा २ कार्ब, रात्रीच्या जेवणाला ३ कार्ब आणि झोपायच्या आधी २ कार्ब इतकं खायची परवानगी होती. त्यासाठी मला एक-दोन पॉकेट बुक्स दिली होती ज्यात पदार्थांचे न्युट्रिशलनल कंटेट होते. नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ दोन-चार वेळा पाहिल्यावर मग जास्त पुस्तकात पाहायची गरज पडली नाही पण हाताशी असलेलं बरं. कार्ब कंट्रोल मध्ये खाल्ले की कितीही प्रथिनं जसं अंडी,मासे,चिकन आणि नॉन स्टार्ची भाज्या, चीज खायला परवानगी असं साधारण वेळापत्रक. असं वाचताना वाटतं, बरं आहे की मग राहा आता चरत.

पण जेव्हा हे प्रत्यक्ष मी आचरणात आणलं तेव्हा लक्षात आलं की माझ्या आवडीचे किंवा सवयीचे कितीतरी पदार्थ खायचं प्रमाण एकदम कमी झालं होतं..दोनच चपात्या, फ़ळ कमी किंवा दिवसाला एक छोटं वगैरे, शिवाय भात बंद किंवा अगदी कमी हे माझ्याच्यानं कठीण वाटत होतं..शेवटी माझ्या जिभेला देशी जेवणाची चटक आणि अगदी डाळींपासून सगळीकडे असणारे कार्ब माझे वैरी झाले होते...हे सगळं नीट सांभाळण्यात माझं वजन दोनेक महिने वाढलंच नव्हतं आणि मग जेव्हा ते डॉक्टरच्या लक्षात आलं तेव्हा मग पुन्हा डाएट बदल आणि काय जास्त खायचं याबद्दल एक चर्चा.

याचं एक उदा. देते समजा मला पोळ्या खायच्या असतील तर मध्यम आकाराच्या पोळीला १ कार्ब असा अंदाज घेतला तर मी (फ़क्त) दोन पोळ्या, उसळ असेल तर अक्षरशः मोजणीचा अर्धा कप उसळ (कारण उसळीमध्ये प्रथिनांबरोबर कर्बोदकंही भरपुर असतात) आणि फ़रसबी सारखी भाजी, सॅलड असं खाऊ शकते. आणि खात असल्यास हवी तितकी चिकन,अंडी इ. पण रोज रोज मांसाहार करायला आवडलंही पाहिजे आणि त्याचाही थोडा-फ़ार पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी यात भात अजिबात घेतला नाहीये. कारण एक म्हणजे भातात जास्त कार्ब असतात त्यामुळे एका पोळीच्या बदल्यात फ़क्त अर्धा कप शिजलेला भात (ते बाजारातले मोजणीचे कप आणून हे मोजून पाहिलं तर कळेल एक छोटी मूद अर्धा कपाची म्हणावी) हे म्हणजे जवळजवळ उपाशी राहिल्यासारखं होणार. हे सगळं सविस्तर सांगायचं कारण म्हणजे मोजून-मापून खायचं आणि तेही पोटात एक जीव वाढत असताना म्हणजे काय कसरत आहे याची थोडीफ़ार कल्पना यावी म्हणून.

मला फ़ळं खायला फ़ार आवडतात पण फ़ळांमधली साखर पाहता ज्या दिवशी चिकन-बिकन खाऊन पोट फ़ुल्ल असेल त्यादिवशी मधल्या वेळचं खाणं म्हणून एखादं छोट्यात छोटं फ़ळ खायची संधी मी साधून घेई. त्यातही सफ़रचंदासारखी फ़ळं कारण त्यातल्या त्यात त्यांचा अलाउन्स जास्त आहे. नाहीतर बेरी वर्गातली फ़ळं म्हणजे जास्तीत जास्त अर्धा कप वगैरे म्हणजे दाताखाली तरी आली का ते पहावं लागेल. शिवाय आता फ़ळं खातोच आहोत तर एकदम साखर वाढू नये म्हणून सोबतीला चीज किंवा सुकामेवा खायचा म्हणजे मग ते साखर वाढणं थोडं लांबतं.

असो. चीजचा विषय आलाच आहे म्हणून सांगते एक कप दुधात १५ ग्रॅमतरी कार्ब असतात म्हणजे सकाळच्या न्याहारीला एक कप दूध घेतलं तर एक कार्बवाली पावाची स्लाइस आणि त्याला कुठलंही प्रोटीन लावुन जसं पीनट बटर, आल्मंड बटर वगैरे किंवा सरळ अंडी. त्याऐवजी एका चीज स्लाइसमध्ये कार्ब अगदीच नगण्य असतात म्हणजे सरळ एक मस्त चीज-टोस्ट खायचा आणि दूध नंतर स्नॅकला वगैरे टाकायचं असं मी बरेचदा करी. मधल्या वेळातही चीज खा असा सल्ला माझ्या डॉक्टरने मला दिला होता. पण हे नुस्तं चीज खायचं मला जाम जीवावर यायचं शिवाय आता इतकं फ़ॅट खाऊन जेव्हा मधुमेह संपेल तेव्हाच कोलेस्टेरॉलचा राक्षस पुढ्यात येईल ही पण एक भिती. इथे तसं थोडीफ़ार लाईट, फ़ॅट-फ़्री चीज मिळतात त्यातले अनेक प्रकार मग मी प्रत्येक वेळी ट्राय केले. त्यातली काही आवडली, काही शिक्षा म्हणून खाल्ली पण निदान त्याने माझी साखर आटोक्यात राहिली आणि वजन न वाढायचा प्रश्नही निकालात निघाला.

तरीही पोटापेक्षा खूपदा जिभेच्या चोचल्यांनी मात करायचे प्रसंग यायचे आणि तसंही पोटात एक जीव आहे म्हटल्यावर ते होणारच तेव्हा काही वेळी मी चक्क चीट केलंय किंवा मग पाककृती ट्विस्ट केल्यात. म्हणजे पाव-भाजी खायची होती म्हणून मग बटाट्याऐवजी फ़्लॉवर घातला आणि अगदी थोडासा बटाटा माझ्या भाजीमध्ये घालून मग बाकीच्यांसाठी नेहमीप्रमाणे बटाटावाली पावभाजी बनवली. मी मात्र एकच पाव खाल्ला. त्यादिवशी बाजुला सॅलड जरा जास्त घेतलं थोडं चीजही खाल्लं. मग साखरोबा प्रसन्न झाले. पण नेहमीच ही युक्ती खपत नसे. समोसा खायच्या अतीव इच्छेसाठी मी एकदा जेवताना चक्क चपाती/भात असं कुठलंही कार्ब न खाता फ़क्त ग्रील चिकन सॅलडबरोबर खाऊन मग नंतर चारच्या चहाला एक अख्खा समोसा समाधानाने पोटात ढकलला होता. खाण्यासाठी वाट्टेल ते म्हणतात ते यालाच का असं त्यादिवशी मला वाटलं.

चॉकलेटही असंच मोजून-मापून स्नॅक म्हणून थोडं फ़ार पोटात ढकलंलय.मग एकदा चॉकलेटच्या आयलमध्ये बराच वेळ काढून माझ्या कार्ब काउन्टमध्ये बसेल असं डार्कमधलं ८५% डार्क चॉकोलेट मिळालं लिन्टचं. त्यात कार्ब अगदी कमी आणि तब्येतीलाही ते चांगलं. त्यामुळे मग लिन्टचं पाकिट प्रत्येकवेळी माझ्या कार्टमध्ये असे. चिप्सही खाव्याशा वाटत. इथे मिळणार्‍या ब्लु कॉर्न चिप्स एकावेळी दहा वगैरे खाल्या तर चालू शकतात शिवाय त्यांची काही पाकिटं फ़्लॅक्ससीड्स फ़्लेवरची असली तर आणखी चांगलं. सोबतीला ऍव्होकाडो घेई म्हणजे मग पोटभरी होई. आवडीच्या खाण्याची निदान चव मिळावी म्हणून या दिवसात काही प्रकार घरी करणे किंवा दुसर्‍या काही चालण्याजोग्या पळवाटा शोधण्याचंही काम केलं आणि अधेमधे सगळे खाद्यप्रकार थोडेफ़ार का होईना खाल्ले.

कधी कधी फ़ार कंटाळा यायचा, वाटायचं साधं पोळी-भाजी, वरण-भात इतकंही खायला होऊ नये पण मग अशावेळी आपल्यापेक्षा जास्त असाध्य आजार किंवा ज्यांना कायमचा मधुमेह असेल त्यांचं काय असा काहीतरी विचार करुन मनाचं समाधानही करुन घेतलं आहे.शेवटी मानसिक आरोग्य राखणंही खूप महत्त्वाचं आहे. या महिन्यांमध्ये काही अति कटू प्रसंगही आले आणि त्यांचा सामना करताना जितकी मला माझ्या बेटर हाफ़ची मदत झाली तितकीच माझी अवस्था माहित असणार्‍या माझ्या मित्र-मैत्रीणींचीही झाली.नकळत का होईना पण बझवर माझ्याशी गप्पा मारणार्‍यां मैत्रीनेही आधार दिला.

माझे शेवटचे महिने आणि सणासुदीचे दिवस एकत्र आले होते. म्हणजे अगदी नवरात्रापासून ते इथली हॅलोविन (त्यात तर चॉकोलेट, कॅंडीचा कहर असतो) नंतर दिवाळी आणि शेवटी ख्रिसमस..यावेळी जिभेवर नियंत्रण ठेवणे म्हणजे माझ्यासाठी पराकोटीचे झाले होते..दोघांच्याही घरुन आलेल्या फ़राळापैकी बराचसा मी चाखला पण नाही..कारण शेवटी माझ्याहीपेक्षा पोटातल्या जीवाला त्या वाढीव साखरेचा त्रास होऊ नये ही भावना होती आणि त्याच भावनेने जीभेवर मात केली.

आई होणं हे काय असतं हे दुसर्‍यांदा वेगळ्या तर्‍हेने अनुभवलं.मला आठवतं मी अगदी नवरात्रात कोंबडी ओव्हनमध्ये ग्रील केल्याचे फ़ोटो बझवर टाकून बर्‍याच जणांचे बोल खाल्ले होते..पण अर्थातच त्यावेळी हे सत्य मी कुणाला सांगू इच्छित नव्हते की मी यापेक्षा जास्त काही खाऊही शकत नाही आणि नाहीतर उपाशीही राहू शकत नाही.ती प्लेट ज्यांनी नीट पाहिली आहे त्यात फ़क्त कोंबडी आणि सॅलडचं दिसेल..पोळी/भात काही नाही..हे असं सगळं सांगत राहिले तर मला वाटतं ही पोस्ट कधी पूर्णच होणार नाही.

पण या काही महिन्यांत जी वेळ माझ्यावर आली ती कुणावर आल्यास थोडं फ़ार माझ्या अनुभवाने कुणाला फ़ायदा झाला तर बरं म्हणून बरेच दिवस विचार करुन मी हे सगळं लिहितेय. माझा मुलगा आणखी काही दिवसांनी वर्षाचा होईल आणि सध्यातरी सारं सुरळीत आहे. पण जसं आपण आपल्या प्रिय व्यक्तींच्या फ़क्त आठवणींवर जगू शकत नाही तसंच खाण्याच्याही आठवणींवर जगणं कठिण असतं हे या काही महिन्यांत मला कळलं. खूप काही दिव्यातुन गेले नाही पण हा अनुभव बरंच काही शिकवून गेला. यापुढेही खाण्यावरचं प्रेम तसंच राहिल, पण सगळंच थोडं नियंत्रणात आणलं तर मला पुढे होणारा धोका टळू शकतो हेही कळलं. त्यादृष्टीने प्रयत्नही राहतील. काही सवयी अशाच सुटल्या आहेत म्हणजे बिनसाखरेचा चहा कधी प्यायला लागले ते कळलंच नाही. गोड वस्तुंसाठीही पर्याय किंवा कमी प्रमाण, पीठ लावून तळलेल्या वस्तू कमी खाणे किंवा मग प्रथिनं, कोशिंबीरींचा समावेश आता आपसूक झालाय. तसंच जमेल तसे योगासनं, नियमितपणे चालण्यासारखा व्यायाम या काही गोष्टी आहेत ज्यांनी मदतच होते.

हे मूल होता होता मी बरीच बदललेय. खाण्याबद्दलच्या माझ्या संकल्पनांना वेगळा आकार आलाय. अजूनही ब्लॉगवर खाद्य आठवणी येत राहतील पण तरी ते महिना-पंधरा दिवसातून कधीतरी केलेलं चिटिंग असेल. बरेच दिवस "उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म." हे जे काही वाचायचे त्याचा अर्थ अगदी सुस्पष्ट होतोय.एका अगोड प्रवासाचा शेवट गोड करता येईल अशी आशा.



तळटीप: "डायबेटीस अवेअरनेस मंथ"च्या शेवटच्या आठवड्यात हा लेख प्रसिद्ध करताना सहानुभूती मिळवणे हा उद्देश नाही.मला तेव्हाही ती नको होती. हवं होतं फ़क्त मार्गदर्शन. या विषयावर कुणाला जर माझी मदत मिळू शकणार असेल तर नक्की करेन. आपण माझ्या aparna.blogspot@gmail.com या आय डी वर संपर्क साधा.