Saturday, November 5, 2011

एक ओला दिवस

आठवडाभराच्या पावसाने खरं म्हणजे पाऊस या शब्दाचाच कंटाळा येतोय. पण तरी शनिवारच्या सकाळी रात्रभर बरसून दमलेला पाऊस थांबतो आणि हवा मस्त कुंद होते. पाऊस नसतो पण तरी दिवस कालच्या पावसामुळे ओलाच वाटतो. अशावेळी बाहेर छोटा वॉक करायला मला फ़ार आवडतं. थोडा थंड पण तरी फ़ार शहारणार नाही असा वारा वाहात असतो आणि उजवीकडून खाली जाणार्‍या वळणावरुन तो केसांना मागे टाकत पुढे जात असतो. हा वारा क्षणार्धात मला बोरीवलीच्या नॅशनल पार्कच्या गेटशी पोहोचवतो.

आठवडाभर सकाळी उठायचा कंटाळा केला तरी रविवारी सकाळी साडे-सातला गेटवरची हाळी आली की सहालाच जाग येई आणि खिडकीतून पाहिलं की रात्री झालेल्या पावसाच्या आठवणींनी उगवलेली सकाळ दिसे.ही सकाळ माझ्यासाठी तेव्हा खूप खास असे.ज्यांच्याबरोबर मी जंगल वाचायला शिकले, पक्षी ओळखायला शिकले त्यांना माझ्यासाठी थांबायला लागु नये म्हणून मी नेहमी वेळेच्या आधीच पोहोचे. त्यावेळी रेग्युलरली इरेग्युलर असणारी मंडळी आमच्यातही होतीच. पण तरी एकदा गेटवर पोहोचलं की थांबायला लागलं तरी चाले मला.

आता थोड्याच वेळात एकदा का आत गेलो की सिलोंडा किंवा कान्हेरी कुठेही जायचं ठरलं तरी आपणासाठी काही तरी खास असणार आहे याची जाणीव बहुदा माझा पेंशंस वाढवायला मदत करत असावी.

असे किती शनिवार किंवा रविवार याआधी आले होते जेव्हा गेटवर भेटून मग आत दिशा न ठरवता आम्ही भटकलो होतो.त्यातही पावसाळ्यात तर आधी पाहिलेल्या जागा हिरवाई वाढल्यामुळे वेगळ्या वाटायच्या. एकदा का डावीकडच्या नदीतली डॅबचिक, मूर हेन, खंड्या, बगळे ही यादी संपली की कधी कधी चिटपाखरुही दिसायचं नाही.पण शोधायचं ते वेड काही कमी होत नव्हतं. पुढच्या वेळी जास्त प्रयत्न करुयात असं वाटायचं. कधी अचानक एखादी मिक्स हंटिंग पार्टी दिसे आणि मटका लागल्याचा आनंद होई. मग ग्रुपमध्ये असणारा एक्सपर्ट सॅकचे बंद जास्त टाईट करत माझ्यासारख्या नवख्यांना साग्रसंगीत माहिती पुरवी. माहितीचा हा खजिना असाच आपल्यासमोर यावा असं वाटण्याचे ते दिवस.

पावसामुळे आलेला थंडावा आणि बाजुला वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज हे खूप मायावी आहे. अशा वातावरणात जो फ़िरला आहे त्याला माझं म्हणणं नक्की पटेल. आपण त्या तंद्रीत नक्की किती चाललो हे पायांनाही जाणवत नाही. दमणूक म्हणजे काय रे भाऊ हे पार घरी पोहोचल्याशिवाय कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आठवणींनी केलेला कब्जा वर्षानुवर्षांसाठी तसाच राहतो.

अगदी आजचा ओला दिवस मिळाला आणि मी चालायला सुरुवात केली तेव्हा तोच वारा तसाच वाहातोय आणि जणु काही मी नॅशनल पार्कच्या गेटवरुन त्या कुंद वातावरणात चालायला सुरुवात करते. मनात हाच विचार की आज काय दिसणार बरं? मी चालतेय यांत्रिकपणे आणि ते वळण, ती उतरण संपल्यासंपल्या जणु काही माझ्यासाठीच केशरी शालु नेसलेला एक मेपल माझ्यासमोर येतो आणि तंद्री भंग पावते. भानावर यायलाही वेळच लागतो कारण मन पूर्ण मागे अडकलं असतं.

अरेच्च्या,फ़ॉल सुरु झाला नाही? मागच्या वर्षी नाही म्हटलं तरी बाळ पाउलांमुळे या साजशृंगाराकडे अम्मळ लक्ष गेलंच नव्हतं पण यावेळी मात्र इथे सुरु झालेली रंगपंचमी लक्ष वेधुन घेतेय. जायला हवं एकदा सिनिक ड्राइव्हला. कसे असतील बरं नॉर्थ-वेस्टमधले रंग?? आजुबाजुला तर उधळण भराला आलीय. कुठे पूर्ण पिवळा बहर तर कुठे लालम लाल पण जास्त मोहवुन घेतं ते आत्ताच रंगायला सुरु केलेले शेंदरी मेपल.


सृष्टीने हळदीकुंकवाची शिंपडण करावी तसे हे हिरव्यात उगवलेले थोडे फ़िकट शेंदरी रंगातले मेपल. अगदी एकांडा उभा असला तरी लक्ष वेधुन घेतो आणि अख्खी रांग असली तर पाहायलाच नको.
सध्या नेहमी ये-जा होते त्या जवळजवळ सगळ्याच रस्त्यावर रंगांची मस्त उधळण सुरु झालीय.काही ठिकाणी नव्या वस्त्या करताना बहुदा एकाच वेळी अशी झाडं लावली जातात त्यामुळे ती सारी एकाच वेळी रंगात येतात..तिथे जणु काही सृष्टी साजशृंगार करुन सजणाची वाट पाहात असते आणि पाऊसही तिला भेटायला आतुरतेने येतो. आता हळुहळु जास्त वेळ अंधार असण्याचे दिवस येताहेत पण त्याआधी रंगांची मजा घ्यायचे हे दिवस. पावसाने हैराण केलं तरी जमेच्या खात्यात रंगांकडे पाहिलं की मस्त वाटतं.

वारा मला नेऊ पाहात होता माझ्या नॅशनल पार्कात पण हे सृष्टीचे रंग मला नादात राहुनही भानावर यायला मदत करताहेत.कधीतरी वर्तमानातही जगायला हवं नाही या ओल्या दिवसाच्या निमित्ताने.......:)

15 comments:

 1. मनसोक्त आनंद लुट ग ओल्या दिवसाचा ,विविध रंगांचा ...
  पण तो वाराही तुला कधी सोडणार नाही हे ही लक्षात ठेव ... :)

  पहिला फोटू खूप आवडला ...

  ReplyDelete
 2. अप्रतिम रंग आहेत !!! खरंच सुंदर !

  ReplyDelete
 3. या गोष्टी अचानक समोर आल्या की जास्त आनंद होतो हे आहेच!

  ReplyDelete
 4. मस्त गं ! कसला ताजा टवटवीत केशरी रंग आहे तो! आई कायम बोलत असते हा तुमच्या ह्या रंग उधळणीबद्दल. सुंदर !
  आणि तुझी आठवण देखील छान. मला पण तुझ्याबरोबर नॅशनल पार्कला फिरायला घेऊन गेली ! :) :)

  ReplyDelete
 5. मस्त गं ! कसला ताजा टवटवीत केशरी रंग आहे तो! आई कायम बोलत असते हा तुमच्या ह्या रंग उधळणीबद्दल.
  सुंदर ! आणि तुझी आठवण देखील छान. मला पण तुझ्याबरोबर नॅशनल पार्कला फिरायला घेऊन गेली ! :) :)

  ReplyDelete
 6. आभारी देवेन....सगळं रामायण त्या पहिल्या फोटूमधल्या झाडामुळेच झालयं...:)

  ReplyDelete
 7. हेरंब तुझ्याकडचे रंग जास्त सुंदर असतात..मुळात इथे नॉर्थवेस्टमध्ये पण इतके छान रंग येतात हे या वर्षीच जाणवलं बघ....

  ReplyDelete
 8. सविता अगदी मनातलं ओळखलत...हे झाड असं अचानक समोर आलं आणि सगळं एकदम आठवलं...

  ReplyDelete
 9. अनघा, आपण एकदा नक्की नॅशनल पार्कला जाऊया..आता ही लिस्ट वरळी सीफेस पासून सुरु झालीय हे अचानक लक्षात आलं बघ...:D

  ReplyDelete
 10. अपर्णा,
  सर्वच फोटो मस्त...विशेष करून पहिला नि तिसरा फोटो म्हणजे तू.....फा.....न

  ReplyDelete
 11. आभार mynac ...ते पहिल्या फोटोमधलं झाड एकटच आहे पण त्याच्या इतक्या सुंदर रंगामुळे लक्ष वेधून घेतय....:)

  ReplyDelete
 12. your writing style is very nice. khup chhan. chhan watla wachun.

  ReplyDelete
 13. हाबार्स अपूर्व..:)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.