Tuesday, April 3, 2012

गाणी आणि आठवणी ११ - माय लव लेटरएप्रिल महिना मला फ़ार आवडतो...म्हणजे फ़क्त हे एकंच कारण नाहीये त्याचं..पण एप्रिल फ़ुलपासून कशी धमाल असते...शाळा/परीक्षा पण आटोपायच्या त्यावेळी कैर्‍या शोधायला जायची मजा तर होतीच पण अगदी देश बदलला तरी मार्च कसाही गेला तरी एप्रिलपासून हिवाळ्याचा भयाणपणा कमी व्हायला लागतो म्हणूनही..थोडक्यात काय तर देश असो वा परदेश एप्रिल इज द ब्येस्ट.....म्हणून विचार करत होते की एप्रिलच्या ब्लॉग पोस्टची सुरूवात जरा धमाल असायला हवी...आणि अर्थात त्यासाठी जास्त ताण नाही द्यायला लागला...म्हणून आज हे एक धमाल गाणं आणि त्याची आठवण...
..................................................................................................................................................................................................
माझ्या गाण्याच्या आठवणी जेव्हा मागे जाऊन माझी मीच वाचते तेव्हा मला त्यात नेहमी एक गंभीर वळण दिसतं...म्हणजे गाणी गंभीर नसली तरी आठवणी का इतक्या हळव्या असाव्यात असं वाटण्याइतपत....आणि म्हणून मी आठवत होते की असं एखादं तरी गाणं हव की ज्याच्या आठवणीने आपण तुफान हसत सुटल पाहिजे...जस इतरवेळी मित्रमंडळात किंवा कुठला चित्रपट पाहताना कैच्याकै कमेंट्स करताना खी खी करून हसतो तस...म्हणजे नुसतं गाण्यासाठी का म्हणून सिरीयस व्हा..असा मी नुसता विचार करताक्षणीच आठवलेलं हे गाणं आहे..मुख्य म्हणजे हे फारसं कुणाला आता आठवत पण नसेल याची खात्री आहे मला...पण करमणुकीची हमखास खात्री.....


तेव्हा आम्ही चाळीत राहत होतो. आमच्या शेजारी एक मारवाडी कुटुंब राहायचं आणि त्यांच्याकडे (किंवा फक्त त्यांच्याकडे) टेपरेकॉर्डर होता...त्याचा आवाज अर्थात त्या घरातल्या मुलांच्या मर्जीवर वर-खाली व्हायचा...किंवा फक्त वर व्हायचा असं म्हटल तरी चालेल...कमीबिमी नाही.एकतर बंद नाही तर उच्च सुरात काही ना काही सुरु असायचं...
म्हणजे सकाळी त्या घरच्या कर्त्या पुरुषाने उच्च आवाजात कुठली भजन सुरु केली की तो दुकानात गेल्यावर त्याचा मुलगा क्र येऊन त्याची लाडकी श्रीदेवीच्या पिक्चरमधली गाणी बापापेक्षा अम्मळ जास्त आवाजात लावे, मग क्र ची आवड आणि आवाज असं करत क्र. पर्यंत हा कार्यक्रम चढत्या आवाजात आणि अर्थात "उनकी उनकी पसंद के" गीतात सुरु असे...आम्ही त्यांचे सख्खे (म्हणजे भिंत शेअर करणारे) शेजारी असल्याने हा सारा अत्याचार सहन करायची ताकत आमच्या कानात सगळ्यात जास्त होती असं म्हणायला हवं....बरं त्यांना हा अत्याचार बंद करा म्हणून सांगायची काही सोय नव्हती कारण त्यांची तोंड उघडल्यावर ऐकू येणाऱ्या ओव्या (वाचा: शिव्या) ऐकण्यापेक्षा असतील ती गाणी परवडली अशी गत होती....
जोवर हिंदी किंवा ओळखीची गाणी असत तोवर ठीक होतं म्हणजे कानाचा पडदा तग धरून तरी असे...पण जर त्यांची गावी फेरी झाली असेल तर अस्सल मारवाडी मिट्टीमधली गाणी सारखी सारखी ऐकायची म्हणजे मोठं संकट...शाळा सुरु असे त्या दिवसात या गाण्यांचा फारसा त्रास जाणवला नाही कारण संध्याकाळी एकदा का दुकान बंद करून पैसे मोजायची वेळ आली की गल्ला भरला असेल त्याप्रमाणे छन छन वाजणारी नाणी ऐकावी लागत...जेव्हा पैसा सगळीकडेच कमी दिसे तेव्हा हा वाणी आम्हाला चांगलाच श्रीमंत वाटे..असो मी त्या गंभीर वळणावर नेहमीप्रमाणे वळायच्या आत आपण त्या गाण्याकडे वळूयाच कसं...:)
तर या वरील सगळ्या गानपार्श्वभूमीवर (नाणी विसरूया आता...तस पण नोटांचा जमाना हाय आणि क्रेडीट कार्डांचा) एक असा काळ किंवा महिना आला जेव्हा त्या घरातल्या समस्त मंडळींना आवडणार एक गाणं किंवा खर तर एक अल्बम मिळाला...म्हणजे मुलांनी सुरु केलेला धिंगाणा क्र पासून पाचपर्यंत सर्वांना आणि चक्क बापाला पण आवडला..त्यामुळे सकाळची भजन बिजन सोडून ही जी एक कसेट त्यांनी टाकली ती बहुदा पूर्ण घासल्यावरच बाहेर काढली असणार....यस येतेय मी त्या चाळप्रसिध्द गाण्यावर....पण आधी जरा थोडे धक्के..
तेव्हा आता सारखे उठ सुठ अल्बम निघत नव्हते ना त्यांच्या चित्रफितीचा पूर यायचा...शिवाय असे फारसे नट-नटी पटकन उठून चला माझ्या गाण्याचा अल्बम काढा म्हणणारे आणि ते अल्बम लगेच बाजारात आणणारे ही बाजारात जास्त नव्हते.....
तर तेव्हा नुकताच लोकांच्या थोड्या फार विस्मरणात गेलेल्या "पद्मिनी कोल्हापुरे" ही होती मुख्य गायिका आणि तिला खास या अल्बमद्वारे पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणण्याचं धैर्य केल होत आपले सर्वांचे लाडके "बप्पीदा"....:)

सोन्याचा भाव वाढल्यापासून बप्पीदाबद्दल मुळात असलेला आदर (आठवा: "जब कोई बात बिघड जाये" ) आता जरा काकणभर (सोन्याचं नाही) अधिक झाला आहे हे जाता जाता सांगायलाच हवं.....तर बप्पीदा आणि पद्मिनी हे combination (काहींच्या मत जर असेल तर ) त्या दोघांनी मिळून गायलेलं हे गाणं त्यावेळी आमच्या चाळीत तुफान हिट होत...ते गाणं होतं....

. - सॉरी सॉरी सॉरी सर आज मुझे जल्दी जाना घर....
. -  रुको रुको रुको मगर टाईप करू पहले लेटर
प. -  क्या??
ब. -  लव लव लेटर माय लव लेटरआणि मध्ये कधी तरी ती हे पण म्हणते सी यु लेटर...

आता धृपदच इतक जमलंय अगदी यमकासकट तर हे आणि यातली इतर गाणी चाळ ऐकून सांगते कुणाला.....खरं म्हणजे त्या टेप रेकॉर्डरमधून जे काही आम्ही गाणी या नावाखाली ऐकलय त्यापुढे हे म्हणजे अगदी श्री कृष्णाने सांगितलेली गीता नसली तरी दर सोमवारी चाळी खालून "तुजविण शंभो मज कोण तारी" म्हणणारे एक वृद्ध आजोबा जात निदान त्या लेवलच होत असं म्हणायला हरकत नाही...
बाकी पु नी एका ठिकाणी म्हणून ठेवल्याप्रमाणे शेजारच्यांचा ठणाणा करणारा रेडीओ आपल्यासाठी वाजतोय अशा आनंदात ऐकावा त्याप्रमाणे ही टेप आम्ही नुसती ऐकून नाही तर त्यावर थोडा विनोदी घरगुती नाचबीच करून धमाल केलीय...तेव्हा ते "एकता का वृक्ष" यायचं त्यातला नाच बऱ्याच गाण्यावर जातो...बाप्पिदाच्या बिट्सचा परिणाम असावा आणि नाविलाज को क्या इलाज असही असेल....
आज नक्की किती वर्षापूर्वी ऐकलं होत तेही आठवत नाही पण तरी वरचे शब्द चालीसकट आठवले यात या गाण्याचं यश आहे असं बप्पीदा कधी मला भेटले (आणि चुकून पद्मिनीताई पण दिसली) तर मी नक्की सांगणार आहे...
अजूनही जर असं काही गाणं आहे यावर विश्वास बसत नसेल तर (आपल्या जबाबदारीवर) इथे त्याचा आस्वाद घ्या....तुम्ही पण हसत हसत नाचायला (किंवा लोळायला) लागाल ..माझी खात्री आहे....:) आणि हो त्या एकता का वृक्ष च्या स्टेप्स नक्की ट्राय करा....ही ही ही.....:)

9 comments:

 1. गाणे ऐकायच्याच आधीच माझा हसून हसून पोट दुखू लागले आहे. अप्रतिम लिखाण.. छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या जीवनात घडत असतात त्या एकदम वाचताना खूप मजा आली. डोळ्यासमोर सगळी चाळ उभी केली तू. खूप छान. खरतर खूप दिवसांनी मी इतकी हसले आहे.. धन्यवाद..
  आणि मी ते गाणे पूर्ण ऐकूच शकले नाही. ( ध्रुवपदा नंतर पुढचं ऐकायची हिमंतच नाही झाली माझी.) तुम्ही लई भारी आहात.. रोज रोज हे गाणे ऐकत होतात.. आई गं...
  बप्पी ला पप्पी..(गाण्यातल्या सारखंच यमक जुळवला आहे..)

  ReplyDelete
 2. गाणे ऐकायच्याच आधीच माझा हसून हसून पोट दुखू लागले आहे. अप्रतिम लिखाण.. छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या जीवनात घडत असतात त्या एकदम वाचताना खूप मजा आली. डोळ्यासमोर सगळी चाळ उभी केली तू. खूप छान. खरतर खूप दिवसांनी मी इतकी हसले आहे.. धन्यवाद..
  आणि मी ते गाणे पूर्ण ऐकूच शकले नाही. ( ध्रुवपदा नंतर पुढचं ऐकायची हिमंतच नाही झाली माझी.) तुम्ही लई भारी आहात.. रोज रोज हे गाणे ऐकत होतात.. आई गं... बप्पी ला पप्पी..(गाण्यातल्या सारखंच यमक जुळवला आहे..)

  ReplyDelete
 3. मधु, ब्लॉगवर सहर्ष (खरं तर सहसत म्हणायचं होतं मला) स्वागत...:)
  "बप्पीची पप्पी" हे वाचुन अशक्य लोळतेय मी....:D :D तुमच्या कमेंटनी आजचा दिवस एकदम धमाल जाणारे.....
  आभार आणि भेटुया पुन्हा....

  ReplyDelete
 4. 'गाणी आणि आठवणी' मध्ये हे गाणं म्हणजे तुळशीत भांग !!! ;)

  ReplyDelete
 5. हे हे हेरंब....गाण्याचं सोड आठवण कशी वाटली???...D :D

  ReplyDelete
 6. मग तुळस कशाला म्हणतोय मी असं वाटतंय तुला? ;)

  ReplyDelete
 7. यावेळी माझी जरा लेट पेटली..बरं झालंस पुन्हा प्रतिक्रिया दिलीस ते हेरंब.....:)

  ReplyDelete
 8. hasun hasun pot dukhala.

  Tufaan mail ekdam.

  Happy unhala........

  shrads

  ReplyDelete
 9. आभारी श्रद्धा....अगं यंदा कुणी उन देतं का उन?? अशी जाहिरात करावी लागणार आहे बहुतेक...:)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.