Wednesday, December 23, 2009

ईशान्येकडून वायव्येकडे

माझ्या आईचं एक पेटंट वाक्य म्हणजे जोडीला जोडी बरोबर मिळते; कंजुसला चिकट आणि हुशारला दिड शहाणा..इ.इ....जोक्स अपार्ट..आमच्या दोघांच्या बाबतीतही ते बर्याच अंशी खरं आहे. ते म्हणजे कंजुस आणि हुशार असं काही नाही पण प्रवासाचं, नवनव्या जागा पत्ते काढून फ़िरण्याचं वेड दोघांनाही सारखंच आहे. त्यामुळे सुट्ट्या, डिल्स, विकेंड या सगळ्याचा नेहमीच पुरेपुर लाभ आम्ही उठवला आहे. मागची काही वर्षे फ़िलाडेल्फ़ियाच्या जवळ राहिलो तेव्हा तर फ़िरायची मजाच होती. कारण अमेरिकेतील दोन महत्वाची शहरं एक म्हणजे देशाची राजधानी वॉशिंग्टन डि.सी. आणि आर्थिक राजधानी न्युयॉर्क यांच्या मध्ये हे वसलंय; शिवाय जवळपास ड्राइव्ह नाहीतर विमानाने जाऊन पाहाता येणारी भरपूर ठिकाणं म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच.
मागे एकदा कामासाठी मी कॅलिफ़ोर्नियामध्ये होते. तिथलं वेगळं हवामान, निसर्ग पाहुन मी सहज एकदा याला म्हटलं, ’एकदा वेस्ट कोस्टला राहायला पाहिजे रे म्हणजे सगळी छोटी छोटी ठिकाणं पाहता येतील’. माझी वाणी इतक्यात खरी होईल असं वाटलं नव्हतं. पण नेमकी कामाची एक चांगली संधी पाहुन माझ्या बेटर हाफ़ ने आमचा मुक्काम हलवला आणि मागच्याच महिन्यात आम्ही आलो ते ओरेगन राज्यातल्या पोर्टलॅंडजवळ.


म्हणजे ईशान्येकडून वायव्येकडे म्हणजेच नॉर्थ इस्ट मधुन नॉर्थ वेस्टकडे. अमेरिकेचा नकाशा म्हणजे एक आयत आहे असं पकडलं तर त्याच्या उजव्या कोपर्यातल्या साधारण वरच्या भागातुन बरोबर डाव्या बाजुच्या वरच्या भागात कसं जाल तसं...जवळ जवळ आडव्या सरळ रेषेसारखं. नुसतं नकाशात पाहिलं तरी कळतं किती लांबचा पल्ला आहे तो..
खरं बोलताना मी मागे तसं बोलले पण जेव्हा खरंच इतक्या लांब सगळं बांधुन जायची वेळ आली तेव्हा मात्र ते शब्द मागेच घ्यावे असं वाटलं होतं. पण अर्थातच आता ते शक्य नव्हतं. घर सोडून पाहिलं आणि एकदाचे ओरेगावला (असं आम्ही आपलं लाडाने म्हणतो म्हणजे मुंबईची आठवण होते. गोरेगाव सारखं ओरेगाव.."फ़क्त इस्ट की वेस्ट ते सांग"..इति नवरा :)) आलो.
मागचे महिनाभर राहताना पुन्हा एकदा मनातल्या मनात अमेरिकेतल्या विविधतेला सलाम करतेय. अर्थात हा देशच इतका मोठा आहे की एक म्हणजे देशातल्या देशात सगळीकडे किती वाजलेचा वेगळा गजर, भिन्न टाइम झोनमुळे. त्यात निसर्गाने सगळीकडे इतकं भरभरून आणि वेगवेगळं दिलंय त्याने मी तर नेहमीच थक्क होते. नावाला म्हणायचं दुसर्या भागात आलो पण दुसर्या देशात आल्यासारखंच.


नॉर्थईस्टमध्ये मुख्य चार ऋतु वसंत(स्प्रिंग), उन्हाळा(समर), हेमंत (फ़ॉल) आणि अर्थात हिवाळा(विंटर). पानगळतीची मजा घेऊन कडाक्याच्या थंडीतल्या लांबलचक काळोख्या रात्री बर्फ़ाने पांढर्या होताना पाहायची सवय जडलेलो आम्ही आता इथे सरत्या हेमंतात आलो तरी इथे मस्त हिरवं हिरवं आहे. त्याचं मुख्य कारण इथं असणारे देवदारांच्या रांगा. तशी पानगळतीची झाडंही आहेत.


माझ्या खिडकीसमोरच एक होतं त्याची पानं जरा उशीरानेच गळली पण तसा फ़ारसा फ़रक पडत नाही इतक पाइन्सनी त्यांना कव्हर अप केलंय. इथेही म्हणायला चार ऋतु पण मुख्य पावसाळा आणि उन्हाळाच असं इथल्या लोकल्सशी बोलताना जाणवलं. थंडी जास्त नसावी असा विचार करतच होतो तोच एक आठवडा आक्टिर्कवरून थंडीच्या लाटेन जे गारठलो तेव्हा फ़िलीपण फ़िकं वाटलं. पण नशीब एक दहाच दिवस असं होतं पुन्हा आपली गुलाबी थंडी म्हणजे तापमान साधारण ० ते ११ च्या दरम्यान. रात्री जातं शुन्याच्या खाली पण तोस्तर आम्ही घरच्या हिटरमध्ये गरमीत असतो. त्यामुळे चालतं..



जसं मी वेस्टात जाऊया म्हटलं तसंच नॉर्थइस्टला असतानाची नेहमीची रड म्हणजे इथे मान्सुन नाही रेची. म्हणजे पाऊस होता पण कधीही येणारा आणि एखादा दिवस फ़ारफ़ार तर तीन-चार दिवस सरळ असा..आपला भारतासारखा नाही. पण होल्ड ऑन..बहुतेक माझी जीभ काळी आहे...(बहुतेक नाही आहेच..इति अर्थातच...अर्धांग...) ती पावसाची कमी आता बहुतेक (पुन्हा बहुतेक नाही शंभर टक्केच) भरुन निघणार असं दिसतंय..गेले दहा दिवस रोज सतत आणि संततची पर्जन्यधार. सुर्यमहाराजही दिसत नाही आहेत...
इथे येतानाच्या काहीच दिवस आधीचा एक विचित्र योगायोग म्हणजे आधीच्या लायब्ररीच्या बुकसेलमध्ये चक्क हरि कुंभार (म्हणजे माझा लाडका हॅरी पॉटर हो) दिसला..मग काय उचललंन त्याला लगेच दोन डॉलरमध्ये...आणि नेमकं ते तिसरं अजकाबानच्या कैद्यावालं का निघावं...त्यातले डिमेन्टर्स आहेत ना तसं सकाळी धुकं आणि मळभ दाटुन येतं आणि दिवसभर थेंब थेंब आभाळ गळून सगळा आनंद एक्सॅक्टली डिमेन्टर्ससारखाच घेऊन जातात..म्हणजे पाऊस आणि पावसाळा मला खूप खूप आवडायचा असं भूतकाळात म्हणावं लागणार इतका पाऊस. पण जाऊदे काळ्या जीभेने जास्त न बोललेलं बरं असं तुर्तास ठरवलंय...

पण तरी पेला बराच अर्धा भरलाय बरं का? बर्फ़ नॉर्मली नसतो पण झाला की सॉलिड ही अर्थातच आमच्या साशाची टीप...तर असो. आल्या आल्या एकदा पॅसिफ़िकच्या एका बीचवर जाऊन आलो. टच ऍन्ड गो सारखंच गेलो..कारण बरंच थंड होतं....मला तर बीच खूप आवडला. नॉर्थईस्टमधल्या अटलांटिकच्या किनार्यापेक्षा खूप वेगळा जास्त उसळणारा सागर वाटतोय. तसंही आम्ही पॅसिफ़िक हवाईच्या किनार्यांवर पाहिला होता तेव्हापासून मी त्याच्या प्रेमात आहेच..(मरो ती काळी जीभ...विसरूया आता तिला...:))
आताही सगळं नॉर्थइस्ट स्नो स्टॉर्ममध्ये बुडलंय तर त्यांच्या दु:खात सामील व्हायला म्हणून खास इथल्या डोंगरांमध्ये जाऊन आलो. मस्त बर्फ़ही होता आणि शब्दात मांडू शकणार नाही असं निसर्गसौंदर्य...फ़ोटोच टाकते..काय म्हणायचं ते कळेल.


खरं सांगायचं तर एक महिना आणि त्यातही थंडी (ती अमेरिकेत कुठेही जा त्रास देतेच...तिला आवडतं) हे कॉंबिनेशन असं आहे की इतक्यात काही भाष्य करणं कठीण आहे.फ़क्त बरीच वर्ष एकाच ठिकाणी राहिल्यामुळे त्या जागेबद्द्लची जी सहजता येते ती इतक्यात येणार नाही पण इथेही आमच्यासाठी काही खास असेल.



नवी ठिकाणं, परिचय आणि बरंच काही येत्या काही महिन्यात ब्लॉगवर नक्की लिहायचा प्रयत्न करेन. तुर्तास माझ्या मागच्या घरासंबंधी पोस्टना ज्या सर्वांनी प्रतिक्रिया देऊन माझा धीर वाढवला त्या सर्वांचे आभार नाही पण ही पण पोस्ट खास त्यांना इथली खुशाली कळावी म्हणून.. लोभ आहेच तो असाच वाढुदे...आपण अप्रत्यक्षरित्या "माझिया मनास" नेहमीच दिलासा देता ही या सरत्या वर्षातलीच जमेची बाजु...असो..जास्त सेंटि होईन मी....तर कळावे....इतक्यातच आम्ही ईशान्येकडून वायव्येकडे सुखरूप एक अख्खा महिना काढलाय...

34 comments:

  1. एकदम छान झाली आहे आजची पोस्ट, बरीच इनफॉरमेटीव्ह. अजुन काही फोटोस अपलोड केले असतेस तर बरं झाल असत.

    बाकी बाई तुमच आणि आमचं हरी कुंभार श्येम हाय बरं का, आम्ही समधी त्येले हरी कुंभारच म्हणतो.

    साशा मॅडम कशा आहेत. त्यांची आठवण काढली म्हणुन सांगा बरं का त्यांना :-)

    -अजय

    ReplyDelete
  2. धन्यवाद अजय. काहीतरी योगायोग आहे मला वाटलं होतं की आज बहुतेक तू पहिल्यांदा कॉमेन्टशील(काळी नाही गोरी जीभ....:) कारण तू मागे कॉमेन्टस मध्ये म्हटलं होतंस अजून या विषयावर लिही...अरे मला वाटलं फ़ोटोच जास्त होतील पण मी नंतर इतर काही रिलेडेट पोस्टस टाकु शकले तर मात्र नक्की टाकेन फ़ोटो..
    साशा आजच भेटली होती..बहुतेक पुन्हा एकदा तिच्यावर पण पोस्टेन....:)

    ReplyDelete
  3. झक्कास.. नेहमी सारखाच .. ओरेगाव .. हा हा ..

    ReplyDelete
  4. मस्तच
    तुमच्या ब्लॉगला भेट द्यायची हि माझी दुसरी वेळ खूप छान लिहिता तुम्ही एकदम सहज लिहिता.

    बाकी जीभ काळी कि गोरी आहे???? हा हा

    ReplyDelete
  5. boss lekh mast aahe ...

    Actully tula HAPPY NEW YEAR karay la aale aahe :)

    me long leave var jate aahe aai kade

    bye -Ashwini

    ReplyDelete
  6. धन्यवाद हेरंब. न्यु-यॉर्कलाही मुंबईची आठवण येते म्हणून अम्मळ जास्तच जायचो...इथे फ़क्त नावात ती कसर भरून काढतोय...बाकी मुंबई ती मुंबई....

    ReplyDelete
  7. धन्यवाद विक्रम..मला वाटलं होतं शांत वादळं जास्तवेळा येतात आयुष्यात आणि ब्लॉगवरही :))
    अभी जीभ के बारे में कुछ बोलनेकाच नही...जो होता है देखने का और एंजॉय करने का...:)

    ReplyDelete
  8. धन्यवाद आशु..(अति अनुबंधचा परिणाम...ही ही...) अगं तुलाही खूप खूप शुभेच्छा..आईकडे जातेस म्हणजे मजा आहे...आम्ही फ़ॉर चेंज आईलाच इथे घेऊन आलो आहोत....तिथे तसंही वेळ वाटलेला असतो इथे बरं पडतं १००% मी आणि आई....

    ReplyDelete
  9. मस्तं लिहिलंयस... माझी कितीतरी दिवसांपासूनची इच्छा आहे वेस्ट कोस्टला रोड ट्रिप काढायची. वेगसपासून सुरू करून एल.ए., कॅली, ओरेगाव पर्यंत. पण त्यासाठी मस्तं एक आठवडा तरी हवा तरच मजा येईल!

    ReplyDelete
  10. "जोडीला जोडी बरोबर मिळते; कंजुसला चिकट आणि हुशारला दिड शहाणा..इ.इ.."

    सुरुवातच एकदम जबरदस्त!! आवडली.. म्हणजे काय मी आता स्वतःला हुशार समजायला हरकत नाही... ( हा हा हा....:) )

    पण पोस्ट खुपच सुंदर झालंय.्सगळी माहिती कव्हर् केली आहे. फोटो चा आकार थोडा लहान वाटतो कां??

    आणि हो.. नकाशामुळे लवकर समजलं सगळं, तसा इतिहासात मी थोडा कच्चाच आहे म्हणा..

    ReplyDelete
  11. अनामिक, आमचा मुलगा इतका लहान नसता तर ही पूर्ण मुव्हिंगची ट्रिप रोडट्रीप करावी असं आमचं दोघांचं एकमत (न भांडता झालेलं...) होतं....अर्थात शेवटी उडूनच आलो..पण आमच्या माहितीतलं एक कुटुंब डेलावेअर मधुन लास वेगस ला ड्राइव्ह करुन आले होते...मग कधी सुरूवात करताय वेगसहून?? मला यायला आवडेल आणि ड्राइव्ह करायला पण...

    ReplyDelete
  12. हा हा महेन्द्रकाका तुम्ही पण ना.....मला आता सुपर्णाताईंना भेटून इतर गुण (शांतपणा, सहनशक्ती इ.इ...) तपासले पाहिजेत....ही ही ही....
    नकाशाची साईज मिडियम आणि फ़ोटोची स्मॉल आहे...सगळं मोठठं वाटेल असं वाटलं....करु का फ़ोटो पण मोठे?? पण नकाशा छान आहे ना?? माझ्या ब्लॉगच्या वाटेला कधीही न जाणार्या नवर्याने मी सांगितलं म्हणून पटकन एक बनवुन दिला...त्याला दाद पोहोचवते....

    ReplyDelete
  13. अपर्णा हुशारला दिड शहाणा....या न्यायाने नेभळटाला मुखदुर्बळ जोडी मिळाली की आटोपलाच कारभार...हीही... अगदी छान डिटेल्स दिले आहेस. नकाशा आणि फोटोंमुळे अजूनच जास्त स्पष्ट झाले. बाकी तुझ्या वाणीला जरा कामाला लाव...म्हणजे नववर्षात धमाल येईल. आपली भेट होईल...कसं?अग एक महिना झालाही? कमाल झाली नाही....आपण आत्ता तर बोललो...ट्रक आत्ताच सामान भरून निघालाय... :) बाकी तू जिकडे तिकडे वेस्टर्न लाईनची नावे जोड...ओरेगाव सहीच.

    ReplyDelete
  14. हा हा हा भाग्यश्रीताई, एकदम डिटेलमध्ये वाचलंस तू...वेस्टला आल्यावर वेस्टर्नची नावं....:) अगं सेंन्ट्रलला पण होते एक पहिलं भांबावलेलं आणि काकडलेलं वर्ष पण तेव्हा काही सुचलंही नसतं...आणि काय शेवटी वेस्टर्न ते वेस्टर्न...ही ही.....
    आणि वाणी म्हणजे तु अजुनही ये की आम्ही घरीच आहोत आणि तुही वेस्टात..काय??? पोळी नाही करणार घाबरू नकोस हवं तर स्वयंपाकघर तुझ्याच ताब्यात देते.....कसं...??

    ReplyDelete
  15. मस्तच रे... आरे रे ..आनी माला इतक्या उशिरांन सापडला हा ब्लाग.?....

    .मीनलजी च्या ब्लागवर फिरता-फिरता इकडे येन्याची भुयारी वाट सापडली .. सुरवातिला आंधारात चुकलो की काय वाटत होते, पन पुर्न ब्लाग फिरलो आणि वाट चुकल्याचाही आनंद झाला.

    आप्ला.

    साळसूद पाचोळा.

    ReplyDelete
  16. धन्यवाद आणि स्वागत सचिन..तू इतकं आवर्जुन लिहिलंस आणि तुझी प्रतिक्रिया इतकी छान मांडलीस की माझ्याकडे तुला लिहायला शब्दच नाहीत...असाच येत राहा..अशा प्रतिक्रिया आल्या की खरंच खूप बरं वाटतं...I am flattered..

    ReplyDelete
  17. मस्त लिहीलय बाईसाहेब.....ओरेगाव-गोरेगाव मस्त.....बाकि जोडीच्याबाबतीतला नियम अगदी योग्य आहे...नकाशा दिलास आणि दिशांची नावं मराठी आणि ईंग्लिशमुळे दिल्यामुळे सोपे झाले नाहितर ईशान्य आणि वायव्य म्हटले की घोळ सुरु...लवकरच आग्नेय आणि नैरुत्यही प्रवास कर म्हणजे तेही डिटेल्स आम्हाला मिळतील....

    ReplyDelete
  18. हे हे तन्वीबाय तुमी पन ना...नकाशा तुमी लोकं नावाजनारचं...ते माजं कुक्वाने काडून दिला म्हनलं तर समदं कौतुक तर व्हनारच.....पन आता हिथं नकाशात पाहुन घेतलासा ना केवडं लांब आलु ते ??? आता जरा दम धरा की...लगेच कुटं त्ये नेरुत्येला धाडतासा?? आता परतच जायाचं बघा ते एक पुरी प्रदक्षिना करुन म्हमईला....आपलं गोरेगाव नी अंधेरी नी बोरीवली ह्येच बरं की वो.....

    ReplyDelete
  19. मला आवडलं नव्या जागा कळल्या अमेरिकेतलं गोरेगाव हाहाहा

    ReplyDelete
  20. धन्यवाद प्रसाद....:)

    ReplyDelete
  21. अपर्णा,

    खू SSSS प छान पोस्टलीस !! जणू तुझ्या बरोबरच थंडीत गोठत का होईना हिंडतोय असेच भासत होते. नवा देश नवे प्रांत आता मी तुझ्या डोळ्यातून्च पहाणार ना ? मजा वाटली ते वाच्तांना नहे पहातांना !

    ReplyDelete
  22. खूप खूप आभारी पेठेकाका...प्रयत्न करेन लिहायचा...

    आणि हो टॅगल्यापास्नं तुम्ही पण पोस्टलं..बिस्टलं म्हणायला लागलात बरं वाटतंय वाचायला....:)

    ReplyDelete
  23. आता मलाही तुमची भाषा शिकायला हवीच ना ? करतोय प्रयत्न , चुकलेमाकले तर दुरूस्त करून घ्या मात्र !

    तू सांगीतले म्हणून नवा ब्लॉग टाकला आहे !

    ReplyDelete
  24. धन्यवाद सुलभा आवर्जुन लिहिल्याबद्द्ल. आपण अशीच भेट देत जा. आणि हो फ़ोटोचं सारं श्रेय इथल्या निसर्गाला दिलं पाहिजे.

    ReplyDelete
  25. तुझ्या ब्लॉगवर text सिलेक्ट करता येत नाही, पर्यायाने कोणीही लेख कॉपी करु शकत नाही, याच्यामागचं मला गुपीत कळु शकेल काय. मी सुद्धा असाच प्रयत्न माझ्या ब्लॉगवर करुन पाहतो.

    plz mail me @ ajay.sonawane@gmail.com

    धन्यवाद.

    -अजय

    ReplyDelete
  26. महेंद्रंच्या मताशी सहमत. फोटो जरा मोठ्ठे चालतील अजुन, नाहीच तर मुख्य फोटोला लिंकुन टाक म्हणजे फुल साईझचे बघता येतील.

    त्याचं काय आहे, फोटो म्हणले की जरा जिव्हाळ्याचं वाटतं मला

    ReplyDelete
  27. अजय, मी तुला ते पाठवते.सध्या जरा पोरगं लॅपटॉप लॅपटॉप फ़ार वेळ करू देत नाही..पण नक्की शोधते...

    ReplyDelete
  28. अनिकेत आज या ब्लॉगचं भाग्य उजाडलं म्हणायचं...what a pleasant surprise....:)
    चला तुमच्या दोघांच्या सांगण्यावरून साइज वाढवली आहे. सध्या फ़ोटो वेगळे अपलोड करणं नेहमी होत नाही. शिवाय आम्ही पडलो amateur हून जास्त amateur ...त्यामुळे उगाच भाराभार फ़ोटो काढले जातात...पुढच्या वेळी लिंकचाही प्रयत्न करेन...आणि हो अशीच भेट देत राहा....

    ReplyDelete
  29. अखेर ही ब्लॉग पोस्ट वाचण्याचा योग आला. हेहे ... सारखे राहून जात होते. ते ईशान्य - वायव्ये वरुन तुझे आणि भाग्यश्री ताइंचे सं भाषां झालेले ते सुद्धा आठवले. :D बाकी लिखाणाबद्दल उगाच 'अप्रतिम', 'छान हां' असे कमेंट देत बसत नाही. नेहमीप्रमाणे फक्कड़ झाले आहे. :) ते ओरेगाव - गोरेगाव आवडले. मस्त.. :)

    ReplyDelete
  30. अरे रोहन, तू इतकं आवर्जुन आमचा संवाद वाचला होता म्हणून तुला भागच होतं ही पोस्ट वाचायला :)) पण एक अनुभव म्हणूनही तुला आवडलं असेल..शिवाय यानंतर ओरेगावचं काही लिहिलं तर संदर्भ लागेल सर्वांना म्हणून मी ही पोस्ट टाकली...

    ReplyDelete
  31. Chaan lihilay.. :)
    Portland, OR far masta ahe.. to varcha photo Haystack rock cha ahe na? Amhi Cannon beach la alo hoto mage..
    Tithla varnan ajun liha.. :)

    ReplyDelete
    Replies
    1. पराग, चला कुणीतरी ओरेगाव पाहून मग छान म्हटलंय त्याबद्दल आभार..:)
      होय तो फ़ोटो कॅनन बीचचा आहे. तिथून मग खाली सगळा १०१ खूप सुंदर आहे. तुम्ही तसा ड्राइव्ह केला असेल तर नक्की सहमत व्हाल. हे जवळजवळ सगळेच फ़ोटो कॅनन बीचला जातानाचे आहेत. आम्ही अगदी भर डिसेंबरमध्येच गेलो होतो. आता तीन वर्षे झाली त्यामुळे ही पोस्ट या कमेंटच्या निमित्ताने वाचताना मलाच एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला होतंय. कॅनन बीच आणि एकंदरीत १०१ बद्दल लिहायचं होतं ते राहूनच गेलं.
      तूर्तास ही पोस्ट पण पहा...फ़ार सुंदर समुद्रकिनारा आहे.

      Delete
  32. खूपच छान लिहिले आहेस अपर्णा ! आम्ही पण सध्या पूर्वेचीच रांग पकडत आलोय इथे लिटिल इंडिया मध्ये. सगळीकडे आपलीच माणसे.
    त्यामुळे भारतात आल्यासारखेच वाटत आहे. गेल्या १९ वर्षात भारतीय माणसे पाहण्याची सवयच नाहीये. शीर्षक तर छानच ईशान्येकडून
    वायव्येकडे ! या मधल्या दिशा विसरायला झाले होते.

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.