Friday, December 4, 2009

"चीची" ची गोष्ट

लहान मूल बोलायला लागलं की आई-बाबांना जो काही आनंद होतो तो झाला आहे जुलै मध्येच. त्याबद्द्ल छोटी पोस्ट पण झालीय. तर गोष्ट "दुदु" वरून सुरू झाली आणि आता त्यावर इतके महिने झाले तरी प्रकरण तिथेच घुटमळतेय म्हणून पुन्हा एकदा पोस्टतेय...


हे चीची प्रकरण कधी सुरू झालं नक्की आठवत नाही पण बहुधा जुलैच्या शेवटी शेवटी आई आली तेव्हा ती माझ्या मुलाला, आरूषला मागच्या सनरूममध्ये बसवून पक्षी दाखवायची आणि पहिल्यांदी "ची" त्याच्या छोट्याशा शब्दभांडारात आली असावी. चिऊ कसं स्पष्ट बोलणार ना माझं छोटसं लाडकं पिल्लु ते....मग तोही आजीबरोबर ची ची असं नुसतं म्हणून आम्हाला चिऊ दाखवायला लागला. आणि त्याचवेळी खिचडी एके खिचडी खाऊन तिलाही " चीsची" म्हणून सांगु लागला. इथे हा s आहे ना तो जास्त महत्त्वाचा आहे कारण आता तो दुदु हे विसरून त्यालाही "चीचीs" असंच म्हणतोय.. तर हा s आहे ना, तो या दोन मोठ्या आणि महत्वाच्या शब्दांना वेगळं करतो. महत्वाच्या कारण आई-बाबाकडे मागायचे दोन मुख्य खाऊ आहेत ते..एक भूक जास्त असेल तेव्हा खिचडी आणि दुसरं लहान बालकांच पुर्णान्न दूध. सध्या तरी तो जेव्हा "चीची" करतो तेव्हा नक्की काय हे बहुतेकवेळा फ़क्त मलाच कळतं. ची नंतर थोडा पॉज असेल तर खिचडी आणि दोन्ही ची घाईत असतील तर दूध असं माझं समीकरण आहे पण सुरूवातीच दूध नाहीतर दुदु हे गेलं कुठे हा प्रश्न आहेच..

खरं तर आता त्यांचं शब्दभांडार वाढेल असं साधारण पुस्तक-इंटरनेटवर लिहिलंय पण आमचे साहेब आपले जे दिसतं त्याला "चीची" शब्द वेगवेगळ्या रागातच गाऊन सांगतोय..मोठेपणी कॉपी करणारा संगितकार वगैरे होणार की काय माहित नाही.

शेवटी काल रात्री अवेळी उठल्यामुळे झालेल्या झोपमोडीच्या वैतागाने बहुतेक एक संपुर्ण चीचीचीच...(बापरे काय शब्द आहे हा) गोष्ट त्याला सांगितली.आई त्याला त्याच्या एका पुस्तकात काऊचं दूध (जरा आधुनिक आजी झालीय ती आजकाल त्यामुळे तिने स्वतःच काऊ म्हटलंय...माझ्यावर दोष देऊ नका) असं नेहमी सांगुन त्याने दूध प्यावं असं म्हणत असते या बेसिकवर आधारलेली आहे...नीट ऐका..कदाचित तुमच्या घरातल्या एखाद्या लहानग्यासाठी इमर्जन्सिला उपयोगी येईल.

तर एकदा एक काऊकडे एक ची येते आणि तिला म्हणते," काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला गं कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपली दाणे खा".
मग तिच्याकडे एक भू-भू येतो. तो म्हणतो, "काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला रे कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपला खाऊ खा".
नंतर तिच्याकडे एक स्कुल-बस येते. ती म्हणते," काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला गं कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपली पेट्रोल खा".
मग तिच्याकडे एक खारु ताई येते. ती म्हणते, "काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला गं कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपली त्या झाडावरची फ़ळं खा".
नंतर तिच्याकडे एक ससुल्या येतो. तो म्हणतो, "काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला रे कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपला लॉनवरचं गवत खा".

असं मग, नंतर, मग, नंतर करत ...आता काय अधीक सांगणे न लगे...आपल्याला हवं तेव्हा गाडी आपल्या पिलाकडे गाडी वळवुन ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपुर्ण करणे. मी जी उदाहरणं दिलीत ती त्याला रोज दिसणारी, आवडणारी आहेत.. माऊला मात्र या गोष्टीत आणायचं जरा टाळलंय कारण तिला चीची दिली तर चालेल असं रात्री तरी वाटत होतं पण म्हणजे झोप पूर्ण झाली नसल्याची लक्षण होती ती. पण उंदिरमामा तिला चालला असता. अरे पण माऊने उंदिरमामाला खाल्लं असतं तर मग उंदिरमामाला चीची साठी काऊकडे कसं पाठवणार..
शिवाय आपला ओरिजिनल काऊ म्हणजे कावळा त्यालाही एंट्री नाहीये कारण ती गोची आजीने गाईला काऊ म्हटल्यामुळे झालीये...

जाऊदे जास्त विचार करतेय का मी?? की आजही अशीच झोपमोड होणार किंवा आरूषची गाडी ची, चीची आणि त्यांची भावंडं यावरून पुढे कधी जाणार याची?
नशीब आई, आज्जी, बाबा,दादा ह्यांना तरी चीची च्या सुरात नाही म्हणत ते...

30 comments:

  1. काऊ ... कावळ्याची गाय बनवून टाकली .. हे हे .. बेष्ट हाय ... मला एकदम सर्व असे डोळ्यासमोर उभे राहते आहे. तुम्ही आणि आई बसून आरुषला श्टोरी सांगत आहात अशी फ्रेम... मस्त...

    ReplyDelete
  2. अरे रोहन, आईचं मिंग्लिश आहे ते. तसे पण इथे तिला कावळे नाही दिसले आणि आरूषच्या एका लाडक्या पुस्तकात cow says moooooooooo... असं काहीसं होतंच. मग ती तिथली काऊ इथे चिकटली. आणि अरे गोष्ट मी एकटीच त्याला रात्रीचे दोन-बीन वाजता सांगत होते. तुला software मधली never ending loop माहित आहे ना? ही त्या category मधली आहे. म्हणजे हव्वी तितकी मोठी करता येईल. आज तर मी चीची मागायला बाबा आणि आजीला पण गोष्टीत बोलावलं होतं. त्यांना अनुक्रमे "ओटमील" आणि "आईस्क्रीम" खायला जा असं काऊकरवी सांगितलं...
    आता काय तो उठतोच अचानक तर काय संताप करणार?? आनंदाने सामोरे जातेय इतकंच...ही पोस्ट तो मोठा होईल तेव्हा त्याला वाचायला देईन आणि आमच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील..

    ReplyDelete
  3. होय ... हे तर नेव्हर एंडिंग आहेच. पण ही पोस्ट तो मोठा झाल्यावर वाचताना त्याच्या डोळ्यातले भाव टिपायला मज्जा येइल... :) त्या सारखा आनंद नसेल... !

    ReplyDelete
  4. अगदी खरंय तुझं...

    ReplyDelete
  5. आज दिवसभर धावपळ होती त्यामुळे आत्ताशी कुठे जरा निवांत वेळ झाला तशी तुझ्या चीची कडे धाव घेतली.:)सहीच झालीये चीची ची पाचा उत्तरी कहाणी.
    बाकी आजीने काऊला गाय म्हटल्याने ख~या काऊची गोची झालीय गं...हेहे...मस्त.मग काय आज रात्रीही पुढचे प्रकरण रंगणार वाटते...:)

    ReplyDelete
  6. अगं ते काय सांगायचं?? आज पण झाल तर काही खर नाही .....

    ReplyDelete
  7. पहिली गोष्ट तर तुमची गोष्ट लय भारी....खरा मस्त आहे आरूष, त्याने तुला विचार करायला लावला....मुलं काय करायला लावतील नेम नाही गं!!!!!
    आणि दुसरी तू माझा ब्लॉग नीट नाही वाचलेला...जा कट्टी.....

    ReplyDelete
  8. तन्वी, तुझं खरंय मुलं काय काय करायला लावतील...:)
    पण तुझ्या ब्लॉगचं काय?? मला काय बी समजत नाय वो बाय...कुटं काय लिवायचं सुचवलं असल तर आटवन करून द्येवा माज्या काय बी धेन्यात येत नाय बगा. चार बुकं शिकली पन वेवारी जगात कदीकदी अडानीच वो....

    ReplyDelete
  9. आणि हो सर्वांसाठी अपडेट...आज तरी गोष्टीची गरज रात्री पडली नाही...हा काउंट वाढो हेच काय ते मागणं.....:)

    ReplyDelete
  10. hehehe mast aahe chi chi ... kavu chi chi dete he tar ekdam bhari :)
    -ashwini

    ReplyDelete
  11. धन्यवाद अश्विनी ....:)

    ReplyDelete
  12. आमच्या घरातही एक छोटीशी प्रिन्सेंस आहे.

    ReplyDelete
  13. princess??? आम्हाला पण एक राजकन्या हवी होती हरेकृष्णाजी...त्यांच्याबरोबर तर गोष्टी सांगायला अजुनच मज्जा येते...तुम्ही नक्की एन्जॉय करत असाल ....

    ReplyDelete
  14. yeah . Two little princess. One is now 9 yrs and another 1 yrs old.

    We were too little disappointed to see boy.

    ReplyDelete
  15. चीची मस्त आहे, मला लहान मूलं आवडत नाहीत फारशी कारण लाडाने त्यांना उच्चून घेतलं तर पहिले चष्मा खेचतात, पण असा कोणी चीची म्हणणारा छोटूकला भेटला, तर त्याच्या त्या चीची वर फिदा होऊन स्वत:हून चष्मा काढून त्यांना देईन. :)

    ReplyDelete
  16. धन्यवाद चुरापाव आणि स्वागत...अहो तुमचं खरं आहे..सगळी लहान मुलं चष्मा खेचतात..आरुषपण खेचतो...पण असं कुणी स्वतःहुन चष्मा काढुन देत असेल तर मज्जा आहे त्याची....

    ReplyDelete
  17. अपर्णा,
    चीची खूप वेळा वाचली प्रत्येक वेळेला जास्तच आवडत होती. कसलं सही असतात न छोटुकले....आता आमचा हाय ड्यूड, हे मॅन, हाय गाईज, कुल असे झाले आहे.
    तुझ्या आई मुळे अजिंक्यचे लहानपण पुन्हा आठवले.

    ReplyDelete
  18. धन्यवाद अनुजाताई. मी ही गोष्ट माझी मलाच नंतर या सर्व आठवणी जास्त स्पष्ट लक्षात राहाव्यात यासाठीच लिहुन ठेवली आहे...पुढे जाऊन तो काय काय म्हणेल काय सांगावं...तुमचं खरंय..."कुल ड्युड" चा जमाना आहे...

    ReplyDelete
  19. हा हा.. चीची आणि काउ.. मजा आहे. बर झाल चांगली गोष्ट मिळाली आमच्या बाळराजांना सांगायला. कॉपीराईटचा प्रॉब्लेम नाही ना येणार :P LOL

    ReplyDelete
  20. @हेरंब स्वागत....कॉपीराइटचा मोबदला म्हणून आम्हाला एक नवी गोष्ट मिळाली तर चालेल...:)

    ReplyDelete
  21. तुझी ही कहाणी व आरूषची चीची खूप गोड वाटली !
    ... ची ची च्या वेग वेगळ्या टॊन ने होणाऱ्या अर्थ बदलां मुळे
    मला एकदम आठवण झाली माझ्या मुलींच्या लहानपणीची

    मोठी अमिता नुकतीच ४१ पूर्ण....लहानपणी म्हणयची बब....बब
    त्याचा अर्थ असायचा दोन दोन ! कुठलीही गोष्ट दोन दोन दोन्ही हातात !
    ....
    धाकटी चारच वर्षाने लहान ती ही म्हणायची बsssss बasssss ... आणि फतकलं मारूनच बसायची अगदी रस्त्यातही.... कारण तिला कडेवर घ्यायला हवे असायचे !!

    ReplyDelete
  22. हा हा..पेठेकाका..मला वाटतं प्रत्येक मूल बोलायला लागलं की त्याचा स्वतःचा एक शब्दकोष होतो तात्पुरता आणि त्यात एकाच शब्दाचे अनेक अर्थ. मुलांचं लहानपण आठवणं म्हणजे काय असतं ते आपल्या वयाची माणसं कदाचित जास्त चांगलं सांगु शकतील..:)

    ReplyDelete
  23. गणगोत या पु.ल देशपांडे च्या पुस्तकातला दिनेश पण लय भारी आहे ,
    जमल्यास नक्की वाचा .

    ReplyDelete
  24. @आठवणी धन्यवाद. आपण आवर्जुन लिहीलंत..माझे पु.ल. आवडते आहेत आणि तो लेखही मी वाचला आहे..आता नाही म्हटलं तरी विस्मरणात गेलाय पण नक्की वाचेन पुन्हा...आणि हो स्वागत...असेच भेट देत राहा....

    ReplyDelete
  25. अपर्णा,
    चीची एकदम मस्त, खरच आपली बाळ मोठी झाल्यावर आपण हे सगळं जाम मिस करु. आर्यन सगळ्या सजिव, निर्जीव, हलणार्‍या, न हलणार्‍या गोष्टींना 'बssssssssss' असे म्हणतो आणि त्याचा अर्थ भू भू असा घ्यायचा :))))))))))

    ReplyDelete
  26. हो गं सोनाली...खरं तर इथे लिहिलंय म्हणून एका अर्थी बरं आहे म्हणजे नंतर जसंच्या तसं आठवेल तरी...

    ReplyDelete
  27. रच्याक, आमच्याकडे सगळी बाळ गोपाळ मंडळी "माश्यांना" चीची असे म्हणतात बरे का? सुरमई, पापलेट, बांगडा, सरंगा काही असो. मंम्ममध्ये 'चीची' असली की राजीखुषीने जेवण होते ;-)

    ReplyDelete
    Replies
    1. सही रे सिद्धार्थ...मला मासे खायला मिळणार असतील तर मी पण "चीची" करायला तयार आहे.....तसंही चीचीचा अर्थ बदललाच आहे तर हा नवा अर्थ पक्का करायचा का.....:)

      Delete
  28. रत्नागिरीला या. माशाचे एक सो एक प्रकार खायला मिळतील. अगदी नक्की.

    ReplyDelete
    Replies
    1. रत्नागिरी (माशांमुळे) नक्की टॉप लिस्टला ठेवणारे... :) .आता फ़क्त येणार कधी त्याचाच गुंता सोडवायला हवा...:(

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.