Saturday, November 21, 2009

दादर

त्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी असतात की आपण तिथे राहणारे नसतो पण इतकं जिव्हाळ्याचं का वाटाव असं वाटत राहात तसं माझ्या मनात "दादर".

अगदी लहानपणी जेव्हा दिवाळी किंवा कुणा नातेवाइकाच्या लग्नाची खरेदी म्हटलं की हमखास आठवणार ते म्हणजे दादरच. माझी मावशी एलफ़िन्स्टनला राहायची त्यामुळे तसंही तिच्याकडे जायला जलद गाडीतून दादरलाच गाडी बदलायचीही असायची. खरेदीच्या वेळीही सगळं झालं की मग मावशीकडे असंच न सांगता ठरलेलं असायचं. तेव्हाचं दादर म्हणजे सुविधाच्या गल्लीतून सुरु करायचं आणि फ़्रॉक पसंत पडेपर्यंत एकामागुन एक दुकानांच्या पायर्या चढायच्या. त्या भागातले सगळे कायम गर्दीचे रस्ते पालथे घालायचे हा एक वार्षिक कार्यक्रमच होता.तेव्हा वर्षाला साधारण एक नवा फ़्रॉक इतकी चैन होती म्हणून मग तो एकच घरी गेल्यावरही आवडेल असा घ्यायचा त्यामुळे कधी कधी माझी आई कंटाळुन जायची. मग प्लाझाच्या समोर एक गु-हाळ आहे त्याच्याकडे ऊसाचा रस ठरलेला. कपड्यांच्या बाबतीत माझं एक नेहमीचं रडगाणं म्हणजे ९९% वेळा दुकानात घेतलेलं घरी लेऊन पाहिलं की नाक मुरडलंच पाहिजे. केवळ तेवढ्यासाठी मला इथे अमेरिकेतली रिटर्न पॉलिसी प्रकार फ़ार आवडतो. असो..भरकटतेय. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच की दादरचा लळा लागला तो त्या दिवसांत.

मग शैक्षणिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी झाल्यावर रूपारेलला गेल्यामुळे आता दादर जरा जास्त जवळ आलं. कधीतरी मैत्रीणींबरोबर शिवाजी पार्कच्या कट्यावर बसुन गप्पा मारणं आवडायचं.बारावीच्या देसाई क्लासला शहाडे-आठवल्यांच्या गल्लीत जायचं तेव्हाचं दादरला जाणं अजुन थोडं वेगळं. बारावीचं टेंशन पण तरी क्लासच्या ग्रुपबरोबर मंजुच्या वड्याची चव जिभेला लागली ती अजुनपर्यंत मुंबईत गेलं आणि उभा वडा खाल्ला नाही तर देवळात गेलो पण प्रसाद घेतला नाही असं काहीसं वाटतं.

पण तरी त्याहीपेक्षा दादरच्या जास्त जवळ आले ते नंतर मी भगुभईला डिप्लोमा इंजिनियरिंगला गेल्यावर. माझी जिवलग मैत्रीण दुर्गेशा शिवाजी पार्कच्या जवळ म्हणजे संतुरच्या गल्लीत राहायची. आता तिथे इमारत झाली पण तेव्हा त्यांचं तिथे छोटंसं घर होतं. अभ्यासासाठी त्यांच्याकडे राहाणं अगदी नियमाचं झालं आणि दादरची ओढ अजुनच वाढली. तिच्याबरोबर आम्ही आसपासच्या भागात खादाडीचे इतके कार्यक्रम केलेत की त्यावर एक वेगळी पोस्ट होईल. तिची आजीपण जवळ म्हणजे सिंधुदुर्गच्या बाजुच्या इमारतीत राहायची. आजी एकटीच असल्याने आम्ही दोघी खूपदा तिच्याकडेच राहायचो. इंजिनियरिंगच्या अवेळी मिळणार्या सुट्ट्यांमध्येही मी अधुनमधुन त्यांच्या कडे जायचे. मग ठरवुन गेलं की सिटिलाइटच्या त्यांच्या लाडक्या कोळीणीकडून आणलेले सुरमई नाहीतर पापलेट तिची आजी टिपिकल सारस्वत पद्धतीने इतके झकास करायची की त्याच्यावर शिवाजी पार्कच्या पानपट्टीवाल्याकडचं थंड थंड पेटी पान खाणं म्हणजे काय आहे हे कळायला ते सर्व त्याच क्रमाने खायला पाहिजे. सिंधुदुर्गचं किचन त्यांच्या खिडकीतून दिसतं त्यामुळे ताजा बाजार आला असला की आजी आम्हाला आग्रह करून रात्री जेवायला तिथेही पाठवायची. माझ्या घरी माझ्या आईला तसं बाहेर खाणं हा प्रकार फ़ारसा आवडत नाही त्यामुळे त्यांच्या आग्रहाचं मला इतकं कौतुक वाटायचं ना की बास. मग रात्री परतताना शिवाजी पार्कला एखादी चक्कर मारुन आजीसाठी आठवणीने पानात मिळणारी कुल्फ़ी घेऊन जाणं आणि उरलेल्या गप्पा तिघींनी एकत्र मारणं या सर्वांत खरंच खूप आनंद होता. या अशा दिवसांनी मग दादरबद्दल वाटणारं प्रेम जरा जास्तच वाढलं. त्यानंतर मग पुढच्या शिक्षणाची आमची कॉलेजं वेगळी झाली तसा तिचा माझा संपर्क कमी झाला आणि मग आम्ही एकमेकांशी फ़क्त इ-मेल चॅटवर आलो तसं वाटलं की गेलं दादर आता. त्यानंतर तर ती नोकरीसाठी बंगलोरला गेल्यामुळे मग दादरला हक्काचं कोण असा प्रश्नच पडला.


तेवढ्यातच निसर्ग भ्रमणाचा नवा छंद लागला होता त्यातुन ओळख झालेली माझ्यापेक्षा वयाने मोठी असली तरी खूप समजुन घेणारी नवी मैत्रीण संगिता मला मिळाली आणि दादर पुन्हा एकदा आयुष्यात आलं. खरं तर ती टेक्निकली माटुंग्याला राहायची पण दोन रस्ते ओलांडले की शिवाजी पार्क म्हणजे जवळजवळ दादरमध्येच. आणि रूपारेलच्या मागे म्हणजे दादर असं माझं ढोबळ कॅलक्युलेशन आहे त्यात तिचं घर बसतय...मग जेव्हा केव्हा रात्रीची कर्जत लोकल पकडायची असली की माझा मुक्काम पोस्ट संगिताच्या घरी असं ठरलेलं. तेव्हाही रात्री शिवाजी पार्कला चक्कर किंवा नेब्युला नाहीतर जिप्सीमध्ये कधी जाणं हेही. आणि तेव्हा तर मी नोकरीपण करत होते त्यामुळे मग तसं खर्चाचाही प्रश्न नव्हता. त्यानंतर एकदा एका आजारपणानंतर ऑफ़िसचा प्रवास थोडा त्रासदायक होत होता म्हणून एक आठवडा मी त्यांच्याकडून नोकरीही केली होती. आणि तात्पुरतं तिथेच एका ठिकाणी महिनाभर पेइंग गेस्ट म्हणूनही राहिले होते. आता दादरची जरा जास्तच चटक लागली होती असं वाटत होतं.
पण मग त्यानंतर लग्नानंतर मायदेश सोडल्यामुळे पुन्हा दादर टप्प्याबाहेर गेलं पण आठवणीतुन अर्थातच नाही. पहिल्यांदा आले तेव्हा आम्ही जुना चारेक जणांचा ग्रुप पुन्हा शिवाजी पार्कवर भेळ खात गप्पा मारत बसलो. अरे हो तिथल्या कॅंटिनचा वडाही छान आहे हे सांगायचं राहिलं. त्यानंतर अचानक एक दिवस आमच्या एका कॉमन मित्राची इ-मेल आली की एका आजारपणामुळे आमची जिवलग मैत्रीण गेली. ती तिच्याबरोबर माझं दादर घेऊन गेली असं का कोण जाणे मला इथे वाटत होतं. त्यानंतर भारतात गेले तेव्हा तिच्या घरच्यांना भेटायला गेले त्यावेळचं दादर खूप वेगळं, गर्दीतही एकटं का वाटलं माहित नाही. पण आता सर्व पुर्वीसारखं आहे असं नाही. शिवाय मुख्य जाणवलेली गोष्ट म्हणजे शिवाजी पार्काचं मराठीपण खूप कमी झाल्यासारखंही वाटलं. आधी राउंड मारताना येणारे मराठी आवाज आता कमी झाल्यासारखे वाटले.चालायचं दादरला घर घेणं हे जर म्हणायचं असेल तर मला पु.ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे मुंबईकर व्हायला तुम्हाला मुंबईत कुणी दत्तक वगैरे घेतयं का पाहा तसं वाटतं. मग आता तिथले मराठी कमी झालेच असणार.


मी अमेरिकेला जेव्हा आले तेव्हा माझ्या नवर्याला म्हटलं होतं की आपण दोघं इथे खूप मेहनत करू म्हणजे आपल्याला दादरला निदान एक वन बीएचके तरी घेता येईल. आतापर्यंत कधीही कसाही गुणाकार भागाकार केला तरी ते स्वप्न स्वप्नच राहाणार हे आता कळतंय पण तरी दादरची ओढ काही जात नाही. फ़क्त काहीतरी संकेत असल्यासारखं नेमकं दादरच्या आसपास राहणार्या मित्र मैत्रीणी कसे काय भेटतात ठाऊक नाही पण जेव्हा जेव्हा दादर सुटतंय असं वाटतंय तेव्हाच कुणीतरी म्हणतं मी दादरचा/ची आणि मग मन मागे मागे जात पुन्हा दादर स्टेशनवर येऊन थांबतं.

23 comments:

 1. अपर्णा...तुला तर माहीत आहेच...मी व दादर हे अतुट समीकरण. दादर पूर्व व पश्चिम दोन्हीकडे मी २००० सालापर्यंत राहिलेली.इथेच थांबते नाहीतर तुझ्या पोस्ट एवढी माझी टिपणी होईल...:D
  आज एक जिव्हाळा सोडून निघते आहेस आणि अजुनही आधीचे बंध तितकेच ताजे.....:)
  मस्त झालीये पोस्ट...

  ReplyDelete
 2. dadar la ek lassi wala hota, i guess shivkailash, always enjoyed it there.

  ReplyDelete
 3. माझा तसा मुंबईशीच एकूणात फार संबंध नाही गं!!! पण जवळपास दहावीपर्यंतचे सगळे फ्रॉक दादरहून घेतलेले.....आई, आजीबरोबर तिथे जायचे....मस्त गल्लीबोळात फिरत खरेदी करायची....दिवसभर खाउगल्ल्या पालथ्या घालायच्या आणि संध्याकाळच्या पंचवटीने आम्ही परत!!!!
  but posht ekdam byest bai tumachi...

  ReplyDelete
 4. मी ठाण्याची पण कॉलेज रुईया त्यामुळे माटुंगा, दादर आहा! मस्त आहे. अजूनही जाते. बदललंय बरच पण मंजू
  वडा, कैलास लस्सी, दादर च्या कॉर्नर ला असलेल्या इराण्याचा आम्लेट पाव काय काय आठवायला लागले!!!!!
  मुंबई ती मुंबईचग.......दादर तर मस्तच.

  ReplyDelete
 5. भाग्यश्रीताई, ही पोस्ट लिहितानाच पहिली प्रतिक्रिया तुझी असेल असं वाटलं होतं आणि ते तसंच झालं म्हणून छान वाटतंय...खरं तर दादरबद्द्ल तुच हक्काने अधेमधे लिहीशील असं वाटलं होतं पण मग तुझी वाट पाहुन मीच लिहीलं....:)

  ReplyDelete
 6. गिरिश, अरे हो तो लस्सीचा उल्लेख कसा काय राहिला माहित नाही...पण इथे आल्यापासुन उसाचा रस जास्त दुर्मिळ झालाय म्हणून लगेच आठवला वाटतं....स्वागत आणि आभार...

  ReplyDelete
 7. तन्वी, अगं तुझ्या माझ्यासारख्या सगळ्या मैत्रीणी मुंबईच्या असताना तू नाही म्हटलंस तरी तुला मुंबईत तर यावंच लागणार म्हणजे संबंध आहे...आणि ते फ़्रॉकसाठी दुकानं पालथी घालायचे दिवस काय छान होते ना?? अगं यावेळी मला माझ्या दहा वर्षांच्या भाचीसाठी फ़्रॉक घ्यायचा होता ना तर एकतर सर्व वेस्टर्न नाही तर चक्क पंजाबी हेच पर्यार होते. दुकानदाराला विचारलं तर तो चक्क म्हणतो..आजकल यही चलता है....

  ReplyDelete
 8. अनुजाताई, तुझं माझं कॉलेजला जायचं ठिकाण एकाच भागात म्हणजे तुला हा लेख वाचताना नक्की जुन्या आठवणी आल्या असतील....

  ReplyDelete
 9. कोहम स्वागत आणि आभार...

  ReplyDelete
 10. mumbai baddal kharach mala kahi mahit nahi :) me lokal la jam ghabarte mojun 4-5 vela aale asen pan jitkya vegane aale titkya ch vegane parat mumbai sodali :)

  tari pan tuza lekh chan aahe :)

  -Ashwini

  ReplyDelete
 11. अश्विनी अगं आम्हाला लहानपणापास्नंची लोकलची सवय त्यामुळे भिती-बिती काही वाटली नाही कधी. पण प्रवासाचा शीण तेव्हा आणि आता दोन्हीवेळी सारखाच..पण मुंबई ती मुंबई असं मला बाबा वाटतं. इथे न्युयॉर्कला गेलं की मुंबईची जाम आठवण येते...

  ReplyDelete
 12. hello sir / mam
  ya cchanda vishaye cchan lihile aahe.
  aami etv chhaya serial karta kahi cchand / aavad / gharaguti udyog / kahi changale collection jyanche asel ashanche interview ghet aahot.
  jar tumala kasali aavad asel tar pls 9867722166 ya no. var mala call kara.
  suhas modar

  ReplyDelete
 13. आईशप्पत !! माझ्या दादरबद्दल कधी लिहिलंस तू ?! :p

  काय मस्त वाटतंय ! सही ! एकेक दुकान...एकेक हॉटेल...एकेक गल्ली !!! मी जन्मल्यापासून तिथेच फिरतेय ! :) मस्त !

  ReplyDelete
 14. आईशप्पथ अनघा तुझा ब्लॉग वाचायला घ्यायच्या आधीच लिहिलंय..:P
  मला वाटत एके काळी कदाचित संतूरच्या गल्लीमधून आपण एकमेकासमोरून गेलोही असू...:)

  ReplyDelete
 15. मी तर ठाणे सोडून तीन वर्षांपूर्वीच दादरकर झालेय. आता दादरची सवय पण झालीय. फार काही फिरले नाही दादरमधेसुद्धा पण दादरला रहाण्याची मजा और आहे गं.

  ReplyDelete
 16. हो की नाही कांचन?? बघ पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे कुणी न कुणी दादरच भेटत..हे ठिकाण माझ्यासाठी खूप खास आहे...नशिबाने मला तिथे राहणाऱ्या मैत्रिणी मिळतात...:)

  ReplyDelete
 17. Feeling nostalgic!!!!!!!!!!! :')

  Mastach!!!

  Mumbai is MUmbai... Apan Mumbaikar LUCKY ahot sagale!!! ;) :)

  ReplyDelete
 18. अगदी खरंय संतोष तुमचं.....
  आपण खरंच लकी आहोत की मुंबई आपल्या इतक्या जवळची आहे..कितीही दूर असलं की मुंबई हे नाव ऐकलं तरी दोन गप्पा जास्त होतात ....:)

  ReplyDelete
 19. जन्म आणि बालपण जरी डोंबिवली असले तरी कुर्ल्याच्या एका बटाट्याच्या चाळीत
  आजी आजोबा रहायचे त्यांच्या सोबत दिवाळीला दादरच्या फुल बाजारात आणि मग श्रीकृष्णाचा वडा आणि काकासोबत दादर चौपाटी असे समीकरण होते. पुढे दहावी नंतर कुर्ल्यात स्थलांतरित झाल्यावर कॉलेज चेंबूर ला असले तरी रुईया नाक्यावर हजेरी लागणे सुरु झाले ह्या काट्यावर रुईया पेक्षा इतर कॉलेज ची मुल जास्त असतात असे माझे मत आहे. पार्कात जाणे आणि जिप्सीत बसलेल्या परचुरे ला हाय करणे नित्याचे झाले. हळूच काळ्या पिशवीत बियर ची बाटली आणि कीर्ती कॉलेज जवळ मिळतो म्हणून कीर्तीचा वडापाव ( ह्या वडापाव ने एका उत्कृष्ट वडापाव स्पर्धेत मुंबईतून २ क्रमांक मिळवला होता ) घ्यायचा आणि मग समुद्राच्या साक्षीने आणि त्यात सोडलेल्या सांडपाण्याच्या सुगंधा समवेत तारुण्यातील स्वप्ने , निराशा , आशावाद सारे काही लंब्या चौड्या मैत्रीच्या आणाभाका खाल्लेले मयुरपंखी दिवसांची आठवण तुझ्या लेखामुळे झाली.

  आजही भारतात जेव्हा येतो तेव्हा एक महिन्यासाठी दादरला महाराष्ट्रातील पहिली वातानुकुलीत आणि संगणीकृत वाचनालय , श्रीकृष्ण च्या बाजूला आणि धुरी हॉल च्या खाली असलेले तेथे नोंदणी करतो. आणि त्या निमित्ताने दादर ला फिरून येतो.

  ReplyDelete
  Replies
  1. दादरच्या पोस्टवर माझ्यासारख्या आणखी एका नॉन दादरकराचं स्वागत....:)

   निनाद तुझ्यासारखं मीही जेव्हा मायदेशात जाते तेव्हा दादरला हक्काने जाते...तिथे माझं हक्काचं कुणी असलं/नसलं तरी.......

   जिप्सीतला परचुरे आणि एकंदरीत बरीच मराठी कलावंत मंडळी दिसायची ना??
   ही पोस्ट माझ्यासाठी प्रचंड नॉस्टॅल्जिक करणारी आहे....आज परत वाचतेय आणि यात किती आठवणींचा उल्लेख राहिला आहे तेही आठवतेय...:)

   Delete
 20. जिप्सी मध्ये अनेक मराठी कलावंतांचा राबता असतो.
  आजही कधी गेलो की एक क्षण वाटत की मोहन काका बसले आहेत.
  शिवाजी पार्क च्या कट्ट्यावर पंचक्रोशीतून लोक येतात.
  आमचा हळूच कणेकरांच्या कंपू मध्ये चंचू प्रवेश व्हायचा.
  कधी कधी सोमनांचा मिलिंद जॉगिंग करतांना दिसायचा. त्याला आम्ही लंगोटी यार असल्यासारखे हाय करायचो.
  सर्व वयोगटांचा आबाल वृद्धांचा लाडका कट्टा
  आजही ते मंतरलेले दिवस माझ्या स्वप्नात येतात.
  येथे घर असणे हे आजही माझे स्वप्न आहे.
  अर्थात मुंबईत घर घेणे हे एक मोठे दिवास्वप्न झाले आहे.
  आजही तोंडावर पार्कातील बर्फाच्या गोलेवाल्याचा मलई गोळ्याची चव रेंगाळते.
  मात्र लहानपणी दादर चौपाटीच्या पाण्यात एकेकाळी आपण खेळलो होतो ह्यावर विश्वास बसणार नाही इतके घाणेरडे सांड पाणी आता समुद्रात दिसते.
  कैलास नाथ ची लस्सी ही पिण्यासाठी नसून फक्त खाण्यासाठी असते.
  शिवाजी मंदिर च्या बाहेरील भेळ व स्वामी समर्थांच्या गल्लीतील वडापाव फर्मास
  बाजूला शिवसेना भवनाच्या खाली आयुर्वेदिक वस्तूंचे दुकान मस्तच
  जर्मनीत आयुर्वेदिक दुकानात मिळणाऱ्या गोष्टी येथे जाम स्वस्त मिळतात.
  आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाचकांसाठी अली बाबांची गुफा
  आयडील बुक ......
  बस नाम हि काफी हे.

  ReplyDelete
  Replies
  1. निनाद, पुन्हा एकदा आठवणींमध्ये हरवतेय.....तुझ्या वरच्या कमेंटशी सहमत...विशेष करून मुंबईत घर घेणं हेच एक दिवास्वप्न....अगदी अगदी...आम्ही अजून पैसेच जमवतोय दादरसाठी...असो...
   जिप्सीवरून आठवलं...तू हे पाहिलंस का? कदाचित आवडेल...:)
   आभार पुन्हा एकदा आवर्जून लिहिल्याबद्दल.....:)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.