Showing posts with label सण. Show all posts
Showing posts with label सण. Show all posts

Tuesday, January 14, 2014

एक छोटं खाद्यवर्तुळ पूर्ण होतंय….

आपले मराठी सण जवळ आले की मला मज्जा वाटते. म्हणजे त्यावेळी ब्लॉगचे स्टॅट पाहिले की कुणीतरी त्या त्या सणाची जूनी पोस्ट वाचून गेलेलं असतं. मी पण ती पोस्ट पुन्हा वाचते आणि शक्य असेल तेव्हा अर्थात यंदाच्या सणाच्या तयारीला लागते. आपल्याकडे सणांना तोटा नाही. आपलं मनोधैर्य का काय म्हणतात ते नेहमी उंच ठेवायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या सणांना पर्याय नाही. 

मागचे काही वर्षे जेव्हा आम्ही इस्टकोस्टला होतो तेव्हा आसपासची एक दोन मराठी मंडळ आपले सण आवर्जून साजरे करायची परंपरा कायम ठेवत आमचं मनोधैर्य मध्येमध्ये उंच व्हायला बळ देत. नॉर्थवेस्टला आल्यावर मात्र मराठी मंडळ हे प्रकरण फारसं अंगी लागलं नाही. कदाचित अजून मुलं लहान आहेत, तिकडे असलेल्या जुन्या ग्रुप्समध्ये जाउन घुसायचं वगैरे मुदलात अंगात नाही, पुन्हा ते ठिकाणही थोडं लांब वगैरे असण हे सगळं जे काही असेल त्याने आमच्या मुलांना आपले सण कसे समजवायचे असे प्रश्न यायला लागले आणि मग ठरवलं की यंदा आपलं आपण करायचं. जिथे ते इतरांबरोबर वाटता येईल तिकडे तेही करावं आणि नसेल तर निदान आपली चार डोकी तरी खुश झाली पाहिजेत. 

मागच्या वेळी जानेवारीत मुंबईत असल्याने निदान संक्रांत तर व्यवस्थित साजरी झाली. आमच्यात, "सणाला काय?" या प्रश्नाचा स्पष्ट उद्देश, "खायला स्पेशल काय?" असा असल्याने परत येताना चांगल्या डझनभर गूळपोळ्या घेऊन आलो आणि चवीचवीने खाल्ल्या. 

त्यानंतर होळीला आयुष्यात पहिल्यांदाच पुरणाची पोळी बनवली. ती माझ्या अंदाजापेक्षा बरीच पोळीसदृश्य लागलीदेखील. 


श्रीखंड हा एक पदार्थ जास्त गुंतागुंतीचा नसल्याने आणि दही लावायचं काम आउटसोर्स केल्याने पाडव्याची चिंता नव्हती. 

उकडीच्या मोदकाचं आठवणीने आणलेलं आणि घरातल्या घरात हरवू नये (आणि अर्थात खराब होऊ नये) म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाने गणेश चतुर्थीला चक्क एकवीस मोदक करता आले आणि ते ज्या वेगाने करू त्याच्या प्रचंड जास्त पटीने संपलेही. 



दिवाळीला सगळा फराळ करणार होते, पण यंदा आमच्या दोघांच्याही घरून बरेच आधी फराळाचे डब्बे आले. त्यात चकलीने थोडा घोटाळा केला होता त्यामुळे नेहमीच्या हुकुमी चिवड्याबरोबर चकली करायचा प्रयोग केला आणि तुफान यशस्वी झाला. आता पुन्हा एकदा आम्ही संक्रांतीच्या उंबरठ्यावर उभे राहिलो. 




करू करू आणि इकडे चिकीचा गूळ मिळत नसल्याने होणार नाही होणार नाही हे माहित असतानाही प्रयत्न म्हणून तिळगूळ बनवून पहिला अगदी समदे नाहीत पण सात आठ लाडू झाले आणि मग चुरा जिंदाबाद म्हणून राहिलो. 

या सगळ्याचा उल्लेख काही वेळा मागच्या वर्षीच्या पोस्ट्समध्ये किंवा ब्लॉगच्या फेसबुक पानावर नुसता फोटो टाकून केला आहे.
माझी स्वतःची स्वयंपाकघरातली एकंदरीत प्रगती, रस इ.इ. पाहता मला स्वतःला हे एक सणांच्या निमित्ताने पूर्ण केलेलं खाद्यवर्तुळ पाहताना समाधान वाटतंय. अजून बरेच खास आपले मराठी पदार्थ आहेत ते कधी जमेल तसं करून पाहिन.घरात खायची आवड सर्वांना असणं हे आमच्या घरात वेगवेगळ्या पाककृती स्वतः करून पाहण्यामागचं मुख्य कारण आहे.नेहमी सगळं मी एकटी करत असते असं नाही. कारण शेवटी आम्ही दोघ या भागातले शिकाऊ उमेदवार आहोत. ज्याला जे जमतं तो ते करून पाहतो. शिवाय एखादा वेगळा पदार्थ करताना काय किंवा नेहमीची न्याहारी बनवताना काय, माझी मुलं आसपास असतात. पैकी आरुष आता जरा "हेल्पर जॉब" करायचा आहे या उत्साहात असतो. म्हणून त्यालाही काहीबाही दिलं जातं. त्याचे हजार प्रश्न, त्या गप्पांतून होणाऱ्या गमती जमती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पदार्थ सगळ्यात पहिले चाखताना त्याने दिलेली पसंतीची पावती या सगळ्यावर एक वेगळी किंवा प्रत्येक कृतीमागे एक पोस्ट लिहिता येईल. 

महत्वाचं हे आहे की आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ त्या त्या सणांच्या निमित्ताने आपण स्वतः बनवण्याची प्रोसेस एन्जॉय करणे. आमचं खाद्यवर्तुळ आम्ही हळूहळू पूर्ण करतोय आणि आपण? 

अरे हो मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. सूर्याचं हे संक्रमण आपण सर्वांना लाभदायी होवो हीच सदिच्छा. 

Monday, September 9, 2013

मी आणि सण, थोडे सैरभैर विचार


आज गणेश चतुर्थी, मला लहानपणापासून आवडणारा सण.त्यावेळी न कळत्या वयात तो आजूबाजूला साजरा केला जाई तसाच आठवतोय. मग मोठं झाल्यावर आपण नक्की आस्तिक की नास्तिक या प्रश्नातही  गणेश चतुर्थी आली की एक वेगळाच उत्साह येतोच. 

आजचीच गोष्ट. करूया, नको, वेळ मिळेल का? असा सगळा विचार करतानाही सोमवारचे दोन तास निवांतपणे हाताशी आले. मागच्या आठवड्यात नारळ किसून फ्रीज करायचं काम करून ठेवलं  होतं म्हणजे बेटर हाफने कामातला आपला हिस्सा आपल्या सवडीने करून ठेवला होता. तसही सण  साजरा करायचा म्हणजे  हे अमकं तमकं अगदी अस्सच झालं पाहिजे इतका अट्टाहास नाही. त्यामुळे असा आधी खवलेला नारळ हाताशी असेल तर आम्हाला चालतं. 

एका बाजूला नारळ परतताना मन लावून गूळ चिरला आणि नारळ गुळाची गट्टी झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड घालून ते मिश्रण एकीकडे निवत ठेवलं. या जानेवारीत निघता निघता आईने आठवणी दिलेलं मोदकाचं घरचं पीठ खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढलं आणि उकड काढायची आईची टीप आठवत बसले. हम्म! दुप्पट पाणी की  अर्ध की समान? जामच गोंधळ उडाला तेव्हा अर्ध्याहून थोडं जास्त अस मधलं प्रमाण मोजून तुक्का मारायचं ठरवलं. मग एकदम लक्षात आलं की  हे आता जास्त रसमय होतंय आय मीन इंटरेस्टिंग. म्हणजे बघा मागच्या वीसेक मिनिटात मी माझी आई मोदक कसे करायची हा एक विचार सोडला तर आणखी कशाचाच विचार करत नाहीये. 

तर ती उकड काढताना उकळत्या पाण्यात थोडं  मीठ आणि तूप घालून मोदकाचं पीठ घातलं की  एक वाफ आणायची. आता हे थोडं हाताशी यायला अवकाश आहे तोवर आधीच सुरु केलेला वरण भाताचा कुकर बंद करून दुसरीकडे फ्लॉवरची भाजी निवडून फोडणी-बीडणी करून मंद आचेवर शिजत ठेवायची. 

आता पुन्हा आपलं  सगळं लक्ष मोदक उर्फ स्टार ऑफ द जेवण कडे. अर्थात अंदाजे घेतलेल्या उकडीचं तंत्र चुकल्यामुळे थोडं कोमट पाणी घालून पुन्हा मळून  घ्यायचं आणि मग पारीबाईंच्या मागे लागायचं. आज पारी करताना उकडीच्या भाकऱ्या करणारी मामी आठवली आणि पहिलीच पारी करताना ती तो उंडा हातावर गोल गोल करून मोठा करायची तसं केलं  आणि जी सुरेख पारी झाली की माझी मीच सुखावले, अर्थात तरी कळ्या जमणे ही पुढची एक अवघड पायरी होतीच. अगदी लक्ष देऊन केले त्या त्या मोदकांच्या पाऱ्या अगदी सुबक आल्या आणि काही रुसलेल्या. आमच्याकडे बाई हिचं लक्षच नाही असं म्हणणाऱ्या. 
नेहमी एकावेळी पाचपेक्षा जास्त मोदक केले नव्हते पण आज करायचा सूर चांगला लागल्याने बहुतेक गाडी चक्क अकरावर गेली. आणि मग ते शिजवताना पुन्हा काही गोंधळ होऊ नये म्हणून माझं बेकिंगचं अर्धवट ज्ञान वापरून भांड्याला आधी थोडं तेल लावून घेतलं. मोदक शिजताना नाममात्र फुलके करून घेतले त्यांनी मात्र काही फुलण्याचा चांगुलपणा दाखवला नाही. पण आज लक्ष अर्थात "स्टार ऑफ द" कडे असल्यामुळे ते नेहमीचं फ्रस्टेशन आलं नाही. 

मला अगदी पूर्वीपासून म्हणजे स्वयंपाकात खाण्याखेरीज गती नव्हती तेव्हापासून वाढायला फार आवडतं. आज नैवेद्याचं ताट वाढताना घड्याळाकडे लक्ष गेलं  आणि मग एकदम लक्षात आलं की गेले दीड तास आपण बाप्पाचा नैवेद्य, उकडीचे मोदक आणि एकंदरीत ताट पूर्ण असणे याखेरीज कुठलाही विचार केला नाही. 

मग मला जाणवलं की आज या निमित्ताने माझं खूप दिवस फक्त एकटीने थोडा वेळ मनन करणे (ध्यान करणे वगैरे माझ्या बाबतीत फारच उच्च वाटतं मला म्हणून मनन) राहिलं होतं, बहुतेक तसंच काही तरी झालं. हा एक छोटा दोन तासाचा सोहळा म्हणूया हवं तर मला माझ्याकडे थोड्यावेळासाठी का होईना घेऊन आला. 

आज बऱ्याच दिवसांनी एक पक्वान्न घरी मी मन लावून बनवलं आणि शेवटी देवाच्या नावाने ते आम्हीच खाणार. पण तो बनवायची कृती मला माझ्या पाककौशल्याकडे नव्याने पाहायला शिकवून गेली. हे सगळं आई कसं करते ते आठवून करताना मला मज आली आणि तिच्यातलं मल्टीटास्किंग माझ्यातही न कळत कसं मुरलंय हे मला कळून सुखावून गेली. 

मला वाटतं माझ्यासारखे अनेक जण असतील जे या निमिताने थोडी सजावट, एखादं  नवीन पक्वान्न करतील त्यावेळी त्यांच्या मनात दुसरा विचार असणार नाही आणि ती कृती पूर्ण झाल्यावरही मन प्रसन्न असेल. नेहमीच बाहेर जायचे छंद जोपासून मनाला ताजंतवानं करतात, आज घरातच थोडी आराधना आपल्या पद्धतीने करून तसचं ताजतवानं व्हावं. मग त्यासाठी मी आस्तिक आहे की  नास्तिक असा आर या पार प्रश्न पडण्यापेक्षा या अवस्थेला कुठलं नाव न देता आहे त्या स्थितीशी एकरूप व्हावंआणि तिची मजा लुटावी.  

आमच्या घरचं प्रसादाचं ताट कसं दिसतंय ते नक्की कळवा. 

गणपती बाप्पा मोरया.     

Thursday, December 29, 2011

मोरगल्लीचा नाताळ....


गेले काही वर्षे अमेरिकेतला नाताळ पाहते पण घरगुती पातळीवर पाहिलं तर मला नेहमी शांत शांत (किंवा अगदी खर सांगायचं तर उदास) वाटतं...म्हणजे तुम्ही अपार्टमेंटमध्ये रहा की घरामध्ये फार फरक पडत नाही..अपार्टमध्ये बाहेरचं डेकोरेशन बाल्कनी असेल तर दिसतं नाही तर मग लिविंग रूमच्या खिडकीतला ख्रिसमस ट्री तरी दिसेल..घरांचा विभाग असेल तर मात्र जरा बाहेरही डेकोरेशन, आतला ख्रिसमस ट्रीही बरेचदा मोठी बे विंडो असेल तर दिसेल आणि लायटिंग थोडी जास्त....पण शांतता म्हणाल तर दोन्हीकडे सारखीच...कधी कधी मला वाटायचं कुणी एल्फ किंवा हिमगौरीचे सात बुटके येऊन सगळा साज-शृंगार करून गायब झालेत..खर तर या घरामध्ये आणि एकंदरीत हा  सण साजरा करायला कुणी माणसं इथे राहातच नाही आहेत...या सर्वांना अगदी दिवाळी नाही पण निदान होळी, गोपाळकाला या सणासाठी तरी मायदेशात घेऊन जावं असं नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये माझ्या नेहमी मनात येत...
मग मागच्या वर्षी एका लोकल मासिकामध्ये portland शहरातल्या ख्रिसमस लायटिंगचा काही उल्लेख होता..ते पाहून खरं तर जायचं ठरवायचं होतं पण ते काही शक्य होणार नव्हतं. मग या वर्षी जरा आधीच माहिती काढून ठेवली आणि गेलोच...पीकॉक लेन उर्फ आपल्या भाषेत मोरगल्लीत...इथे १९२९ पासून या गल्लीत असणारी सगळी घरं १५ डिसेंबरपासून ते नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत डेकोरेशन करतात...आणि वेळ असते संध्याकाळी ६ ते रात्री ११. झाडून सगळी घरं वेगवेगळ्या देखाव्यांनी सजली असतात...आणि सगळ्यात मुख्य तिथे लोकांची गर्दी, त्यात काही उत्साही  ख्रिसमस कॅरोल गाणारे असा सगळा थोडा गोंधळ पण असतो...मला तर लालबाग परळ मधल्या एकामागून एका गल्लीत पाहिलेले गणपती मंडळाचे देखावे, तिथली गर्दी याचीच आठवण झाली..काळोखात सगळ्या गाड्यांनी आपले दिवे बंद करून गाडीतून मारलेली चक्कर असो किंवा थंडीसाठी मुलाला कानटोपीपासून ग्लवपर्यंतचे सगळे कपडे घालून गर्दीत घुसून साईड वॉकवरून जरा जास्त जवळून पाहिलेल्यामुळे थंडी न लागलेले आम्ही असो....त्या गल्लीतून आणलेली ही मोराची  रंगीबेरंगी  पिसे.......
मेरी  ख्रिसमस .....(हो  बिलेटेड...आम्ही नंतर सियाटलला गेल्यामुळे फोटो धुवायला वेळ लागला आहे याची मंडळ नोंद घेईलच...) 

Monday, December 20, 2010

दत्तजयंती

परदेशात आल्यावर जेव्हा इथे हॉलिडे टाइम आणि हॅपी हॉलिडेचा उठसूठ गजर सुरु होतो त्यावेळी खरंच दया येते इथल्या लोकांची. तो नोव्हेंबरमध्ये आलेला ’थॅंक्सगिव्हिंग’ नामक घरगुती जेवणाचा कार्यक्रम आणि त्याच्या दुसर्‍या दिवशीचा खरेदीचा धुमाकूळ आटपला की वेध लागतात ते नाताळचे. म्हणजे नक्की काय? तर घर सजावट, ख्रिसमस ट्री आणि कुठेकुठे रंगणारे ख्रिसमस कॅरोलचे कार्यक्रम..पण तरी हे सगळं घोटाळतं ते ख्रिसमस या एकाच सणाच्या भोवती. त्यानंतर पाहिलं तर अगदी हाताच्या बोटावर मोजणारे इथले सण, अद्यापही त्यांना उत्सव म्हणायचं जीवावर येतं.. असो..या पार्श्वभूमीवर यांच्या ख्रिसमसच्याच आसपास येणारी दत्तजयंती केवळ तेवढ्यासाठी आठवते असं नाही.


माझं लहानपण वसईतल्या एका छोट्या गावात गेल्याने दत्तजयंतीचाही उत्सव पाहायचं आणि तिथे असेपर्यंत जवळजवळ दरवर्षी तो साजरा करायचं भाग्य मला लाभलंय़. वसई पश्चिमेला "गिरीज" नावाचं एक छोटं गाव आहे, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र "निर्मळ"च्या जवळ. तिथे पर्वतीपेक्षा कदाचित थोडी कमी उंचीची असेल एक टेकडी आहे, "हिराडोंगरी" तिचं नाव. दरवर्षी इथे असणार्‍या दत्ताच्या देवळात दत्तजयंती साजरी होते आणि त्यानिमित्ताने देवळाच्या आसपास एक छोटी जत्रा पण भरते (किंवा तेव्हातरी भरायची...मला साधारण ९५ नंतरचं विशेष माहित नाही)

वसईतील आसपासच्या गावातील बरीच लोकं न चुकता या यात्रेला जायचे आणि त्यात माझे आई-बाबाही होते. माझी आई तशी भाविक आहे..देव खरंच आपल्याला मदत करतो वगैरे गोष्टींवर तिची भाबडी श्रद्धा आजही आहे. मी गमतीत म्हणते की गुरुवारची लक्ष्मीव्रताची पोथी तू वाचायचीस पण लक्ष्मीने मात्र आम्हाला तुझ्यापेक्षा साथ दिलीय...अर्थात तिने ही सर्व भक्ती तिच्या मुलांसाठीच केली असणार याची खात्री आहे मला...असो..

तर आम्ही प्रत्येक दत्तजयंतीला गिरीजला जायचो. बरेचदा पायीच जायचो. त्याचं कारण माझ्या बाबांना चालायला आवडतं हे जरी असलं तरी मुख्य त्यावेळी जरी एस.टी.महामंडळाने जादा बसेस सोडल्या तरी आमच्या स्टॉपला येईपर्यंत थांबायचं त्राण त्यांच्यात नसायचं म्हणून मग निदान जाताना तरी ’वन टु, वन टु’च करावं लागे. ते लवकर अंधार पडायचे दिवस आणि आमच्याबरोबर चालणारे इतर लोकही असायचे शिवाय बाबांच्या गप्पा त्यामुळे तो अर्धा-पाऊण तास कळायचाही नाही कसा जायचा ते. डोंगरीची चढणही अगदी फ़ार नाही आणि पायर्‍या आहेत. त्यामुळे मग रांगेत पोहोचायचो तेच केव्हा केव्हा पायर्‍या संपत आलेल्या असायच्या त्यावेळी.

या दर्शनातलं मला आठवतं ते म्हणजे बहुधा हे देऊळ आणि डोंगरी कुणा तरी पाटलांच्या मालकीची आहे आणि त्यांचा राजू म्हणून एक मुलगा माझ्या बाबांचा विद्यार्थी देव्हार्‍यात असे. आम्ही दिसलो की तो आम्हाला थोडा जास्त भाव देई. मूर्तीसमोर रेंगाळणं आणि हक्काचा नारळ "गुरुजी घ्या ना" म्हणून बाबांना तो देई. ते वय(आणि काळ) असं होतं की अशावेळी माझे बाबा सगळ्यांचे "गुरुजी" असल्याचा मला खूप अभिमान वाटे (खरं तर तो आजही वाटतो जेव्हा हे त्यांचे विद्यार्थी अचानक कुठे भेटतात आणि आवर्जुन हाक मारतात त्या त्या वेळी).

दर्शन झालं की मग हवं तसं त्या छोट्या जत्रेत फ़िरायची मोकळीक असे, अर्थात आई-बाबांबरोबरच.. त्यावेळच्या त्या जत्रा म्हणजे आणि त्यातूनही ही डोंगरीवर असल्याने मोठे पाळणे इ. नसत पण ती गोल गोल घोडे घेऊन फ़िरणारी आणि चार-पाच लाकडी पिंजरेसदृश्य पाळणे उभ्याने गोल गोल फ़िरतात म्हणजे तो पाळणेवाला हातानेच ते फ़िरत असतो ते असत आणि मला हे प्रकार विशेष आवडायचे नाहीत त्यामुळे त्यातली लोकांची मजा पाहाणे हेच होई. बाकी छोटी छोटी दुकानं मात्र बरीच असत. हातातल्या रबरी नळी कम दोर्‍याने वरखाली करणारे पाण्याने भरलेले फ़ुगे, आपटीबार (हा एक मस्त प्रकार नंतर काही आठवडे आम्हाला एकमेकांच्या पायाखाली अचानक फ़ोडून दचकवायला कामी येई) एखादं भातुकलीतलं खेळणं अशी खेळण्यांची छुटकू-मुटकू खरेदी होई.

अशा जत्रांमधुन रिंग फ़ेकणे हाही एक त्यावेळचा लोकप्रिय खेळ होता. तो माझे बाबा आणि दादा खेळत. फ़क्त एकदाच आम्हाला त्यात साबण आणि आगपेटीचं बॉक्स लागलं होतं हे आठवतं आणि तो आनंद मग आम्ही थोडी जादा मिठाई घेऊन साजराही केला होता जसं काही साबण आणि ते बॉक्स म्हणजे काय मौल्यवान वस्तू असाव्यात. बंदुकांनी फ़ुगे फ़ोडणे या स्टॉलवरही गर्दी असे आणि बाबा-दादा तिथेही वेळ घालवत.

खायच्या गोष्टींपैकी एक म्हणजे खजूर आणि दुसरं उकडलेले शेंगोडे आणि शेंगा हे घेतलं म्हणजे घेतलंच पाहिजे या कॅटेगरीतलं. पैकी खजूर आई बहुधा ते थंडीचे दिवस असायचे म्हणून घ्यायची पण मला वाटायचं ते फ़क्त इथेच विकायला येतात.

पण त्याहीपेक्षा माझ्या लहानपणी उकडलेले शेंगोडे हा प्रकार फ़क्त अशा देवाच्या जत्रेतच विकायला परवानगी असावी अशीच माझी समजूत होती.त्याचं काय व्हायचं आधी निर्मळची जत्रा असायची आणि मग वसईतल्या आसपासच्या चर्चेसचे सण म्हणजे एक स्पेशल रविवार जेव्हा तिथेही त्या गावचा उत्सव असे. माझ्या शाळेतल्या ख्रिश्चन मैत्रीणी तिथेही बोलवायच्या त्यामुळे तिथे आणि मग या दत्तजयंतीच्या यात्रेत अशाच ठिकाणी तो उकडलेले शेंगोडेवाला मी पाहायचे त्यामुळे वसईतल्या जत्रा म्हटलं की शेंगोडा माझ्या जीभेवर रूळायला लागतो. नंतर जरी इतर ठिकाणी किंवा भय्याकडूनही शेंगोडे घेतले गेले तरीही निव्वळ तिथले ते शेंगोडे खायला मला या सगळ्या जत्रांमध्ये पुन्हा तसंच जायला आवडेल.

आता ही पायपीट करुन दमलेलो आम्ही जर नेमकंच गिरीजमधलं कुणी ओळखीचं भेटलं तर त्यांच्या घरी दोन मिनिटांसाठी जावं लागे कारण हा त्यांच्या गावातला उत्सव म्हणून त्यांनी अगदी आपण सणाला जसे थोडं खायचं स्पेशल वगैरे केलेलं असतं तसंच केलेलं असे आणि त्यांचा मान मोडायचा नसतो असंही आई म्हणायची. सगळं आटपून किर्र अंधारात मग तिथूनच सुटणारी यात्रा स्पेशल बस पकडून घरी येईपर्यंत जत्रेतल्या आठवणी डोक्यात घोळत असत.

इतकी भाबडेपणे साजरी केलेली दत्तजयंती नेमकी कधी सुटली ते आठवत नाही. पण जवळजवळ विस्मरणात गेलेला हा सण अमेरिकेत आल्यावरही साजरा करायला मिळायला तो आमचा मित्र मंदार जोगळेकराच्या कृपेने. त्याच्या कोकणातल्या गावीही हा उत्सव साजरा होतो आणि त्याच्या मुलांना कळावा म्हणून त्याने त्याच्या घरी सुरु केला होता. मंदारच्या धीरगंभीर आवाजातल्या ॐकाराने सुरु होई. त्याच्या घरी एकत्र म्हटलेल्या आरत्या, जेवण आणि गाण्याचा एखादा कार्यक्रम याने माझ्या काही दत्तजयंत्या आणखी स्पेशल झाल्या.

आता पुन्हा एकदा दत्तजयंतीची पोकळीच आहे पण या आठवणी मात्र मला जेव्हा केव्हा मी माझ्या मुलाला दत्तजयंतीसाठी योग आला तर वर उल्लेखलेल्या मंदिरात घेऊन जाईन त्यावेळेपर्यंत निदान दिलासा देतील याची खात्री आहे. आणि खरं सांगायचं तर ही म्हणजे २०१० ची दत्तजयंती सुद्धा खासच आहे. पण त्याबद्द्ल लवकरच लिहेन त्या क्षणाचीही आठवण झाली की......:)

Tuesday, November 2, 2010

दिन दिन दिवाळी

अरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला) असतो नुसता. देवळं वगैरे आहेत पण आमच्या फिलीची मजा नाही. अर्थात इथल्या माउंट हूडची मजा काही और आहे हे मात्र खरं. लॉंग ड्राईव्हवर जाताना उजवीकडे हा असा माउंट हूड आणि रेडिओवर 'रिमझिम गिरे सावन'.. वा क्या बात है. सोबत कांद्याची भजी मिळाली की झालीच मग खरीखुरी दिवाळी. असो.




काय म्हणता वाचल्यासारखं वाटतंय?? हो म्हणजे वटवटराव आपलं तोंड बंद ठेवणार नाहीत हे माहित होतं मला, पण इतकं सांगुन सवरुनही शेवटी फ़राळाचं ताट आणि एक छोटासा संदेश विसरलाच म्हणून मग पुन्हा एकदा स्वतःकडे श्रेय लाटून मीही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतेच कशी...आणि त्याने म्हटल्याप्रमाणे नमनाचं तेल वाहायला लागायच्या आतच पळते....:)

यावर्षीचा फ़राळ आईने अगदी मला वेळेवर पोहोचेल असा पाठवला. त्यामुळे मी स्वतः काहीही करणार नाहीये हे सु.वा.सांगणे नको...तसंही सासरहूनही फ़राळ निघालाय आणि तोही पोहोचेलच..
 
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Saturday, February 27, 2010

होळी रे होळी

होळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का? नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्हणजे होळीच्या पूर्ण दिवसात एक, फ़ार फ़ार तर दीड एवढीच काय ती कुंपणापर्यंतची धाव. मग येते ती दुसर्‍याच दिवशी खेळली जाणारी रंगपंचमी..त्यात ते नकोत्या लोकांकडून रंग लावून घेणे आणि तोही जास्त मारक्या केमिकल्सचा असला की संध्याकाळपासुन अनेक दिवस उतरवणे ही अजून एक अजिबात न आवडलेली गोष्ट. मायदेशात असताना कधीही मी रंग खेळायला उतरले नाही आहे. वरून फ़क्त रंगून एकसारखी झालेली माकडं पाहाणे एवढंच केलंय...

आठवणीत खेळलेली पहिली होळी खरं तर देशाबाहेर मागच्या वर्षी खेळलोय. न्यु जर्सीला एक हवेली म्हणून गुजराथी लोकांचं मंदिर आहे तिथे अगदी फ़ायरब्रिगेड आणि पोलिसांच्या कडक पहार्‍यात आवारात जळणारी होळी आणि त्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लोक आणि मग तिथल्या तिथेच मिळणारा गुलाल आणि दुसरे कुठले रंग फ़ासून मागच्या वर्षी एक-दोन तास चांगलेच होळी खेळलो. अगदी स्ट्रोलरमध्ये आणि मग कडेवर घेऊन आरुषपण रंगला..निमित्त आमच्या एका गुजराथी मित्राचा आग्रह आणि बाळाची पहिली होळी. बाकी हा खेळ खेळावा तो गुजराथ्यांनीच..तिथे फ़ेब्रुवारीच्या थंडीतही संध्याकाळी माणसांची अलोट गर्दी जमली होती आणि सगळी इतकी धमाल करत होते की इतकी वर्षे आपण कधीच होळी का खेळलो नाही अशी चुटपुटही लागली. आता पुढच्या वर्षी नक्की येऊ म्हणावं तर नेमकं मुक्कामाचं ठिकाण बदललं.........

आता कधी न मिळणारी पुरणपोळी जेव्हा एखाद्या मराठीमंडळाच्या कार्यक्रमात नाहीतर एखाद्या सुगरण मैत्रीणीकडे पानात येते तेव्हा इतकी आवडते खायला की इतकी वर्षे घरचीच होती म्हणून किंमत नव्हती हेही जाणवतं..पण असो...इथे साधी पोळी नाही येत तर पुरणपोळी करायचा विचारही मी मनात आणत नाही.

जाऊदे...शेवटी सण आहे तेव्हा परक्या देशात कुणी नसताना उसना का होईना पण उत्साह आणावा लागतो..अरे हो उत्साहावरून आठवलं होळी जिथे असायची त्याठिकाणी सगळी होळीची हिंदी-मराठी गाणी लाउडस्पीकरवर लावायचे ती ऐकायला मला सॉलिड आवडायचं..त्यावेळच्या चित्रहार आणि छायागीतमध्ये पण "रंग बरसे" पाहायचा नित्यनेम आणि "होली है" चा ओरडा..शिवाय ’होळी रे होळी.’...आणि ’हुताशनी माते की जय’ यांनी जरा स्फ़ुरण चढतं.....आता एकदा होळीच्यावेळी पण मायदेश दौरा केला पाहिजे...बरीच वर्ष झाली ती निळी जांभळी माकडं पाहून...

तुर्तास माझ्या भाचीने एका आदिवासी पेंटिगच्या क्लासमध्ये काढलेलं चित्र आहे ते लावते जरा फ़्रिजवर होळीच्या आठवणीसाठी...

सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा...यावर्षी जरा इको कलर मध्ये होळी खेळायचा प्रयत्न करुया.

Thursday, January 14, 2010

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला....

हुश्श! आली बाबा एकदाची.. केव्हापासून वाट पाहात होते...कोण काय?? आपली मकरसंक्रांत हो...भारतात कधी इतकी वाट पाहिली नाही तितकी अमेरिकेत वाट पाहात असते मी तिची...तिळगुळासाठी नाही कारण एकतर इथे काही ऑफ़िसमध्ये खास प्रत्येकाच्या घरचे वेगवेगळ्या चवीचे तिळगूळ, (मला येत नाहीत हे आता पोळीपुराणासारखं वेगळं सांगायची गरज नाहीये म्हणा) क्वचित गूळपोळी मिळणार नसते; ना आपण आठवणीने घातलेल्या काळ्या कपड्यांना नावाजणारं कुणी...
ह्म्म्म..एक मात्र आहे की मकर राशीत सूर्यदेवाने प्रवेश केल्याने एक मोठाच फ़रक जाणवतो तो म्हणजे साडेचार-पाचलाच अंधारणारे दिवस हळूहळू मोठे होतात आणि मुख्य ते संक्रातीपासून जास्त जाणवतात...तसं ऑफ़िशियली २१ डिसेंबरची सगळ्यात मोठी रात्र सरली की खरं तर दिवस मोठा व्हायला लागलेला असतो पण माझा स्वतःचा अनुभव संक्रांतीनंतरच तो खराखुरा जाणवतो.
आता ते लवकर मालवणारे दिवस संपताहेत याचा उत्साह आपोआपच शरीरात संचारतो...तशी जिथे असते तिथे कडाक्याची थंडी असणारच आहे, पण निदान दिवसाची लांबी तर वाढतेय...माझ्यासारखे लवकर मालवणा~या दिवसांना कंटाळणारे लोक या बाबतीत नक्कीच सहमत होतील. खरंच भारतात ज्याची किंमत नसते अशा खूप सा~या गोष्टी मायदेश सोडल्या की कशा महत्वाच्या होतात ते जेव्हा त्यातून आपण जातो तेव्हा आपसूक लक्षात येतं.


तरीही मकरसंक्रांत म्हटली की आठवतं ते सुगडीत भरलेलं बोरं, उसाचं छोटं कांड, हरभरे, गाजराचा छोटा तुकडा, तीळगूळ आणि हलवा. किती साधं रूप आहे आपल्या शेजारणीला वाण म्हणून द्यायला? आता काळपरत्वे त्यात कितीही बदल झाला तरी मला ते आमच्या शेजारच्या काकी आईला सुगडीत असं काही काही भरून द्यायच्या ते फ़ार आवडायचं. आई ते आम्हालाच द्यायची. त्याच्याबरोबर तेव्हाही दुसरं काही असायचं म्हणजे छोटा कंगवा नाहीतर एखादी ताटलीबिटली पण सुगडीवर फ़ार जीव जडला होता. त्यानंतर मी कॉलेजला जाईपर्यंत आईला सुगड मिळणं कधी बंद झालं कळलंच नाही. मागे एका वर्षी माझ्या भाचीने मला रंगवलेली सुगड पाठवली होती तेव्हा जुन्या संक्रातीची आठवण झाली. इथे जो फ़ोटो लावलाय तो त्याच सुगडीचा आहे.
संक्रातीच्या दिवशी तिळगूळ खायची पण मजा असायची. वेगवेगळ्या घरचे वेगवेगळे रंग आणि चवीचे आणि मुख्य म्हणजे दाताने तोडायला वेगवेगळा भार लागणारे तिळगूळ खाणं म्हणजे मजाच असायची. कॉलेजमध्येही मित्र-मैत्रीणी तिळगूळ घेऊन यायच्या आणि मग कुणाला कुणाच्या आईच्या हातचा तिळगूळ जास्त आवडला त्याची चर्चाही तितकीच गोड असायची. चार वर्षे एकत्र असण्याचा परिणाम म्हणजे एखाद्या वर्षी मैत्रीणीच्या घरची चव बदलली तरी कळायचं. मग तीही आवर्जुन सांगायची अगं यावेळी आईला गूळ चांगला मिळाला नाही किंवा यंदा तीळ वेगळे मिळाले...एक तीळ सातजणांनी वाटून खाल्ला असं इतर दिवशी खाताना काही कमी जास्त असलं की आई सांगते पण संक्रांतीच्या दिवशी मात्र साताठ पेक्षा जास्तच ठिकाणचे तीळगूळ खाल्ले जात आणि त्याचा परिणामही दुसर्या दिवशी दिसे....:) असो..


पतंगांचं आधी इतकं माहित नव्हतं पण एक वर्षी गिरगावात होते संक्रांतीला आणि पतंगांनी भरलेलं आकाश पाहून फ़ारच गम्मत आली होती...जिथे पाहावं तिथे पतंगच पतंग....काटाकाटी तरी नक्की कुठच्या हिशेबाने करत असतील काय माहित असंही मनात आलं....पण एक मात्र खरं या दिवशी सगळीकडे एकदम उत्साहाचं वातावरण असायचं..
देश बदलला तशी संक्रात साजरं करायचं रूपही बदललं...तिळगूळ करायचं धाडस केलंच नाही....तसंही स्वयंपाकघर हा प्रांत माझा नाहीच...आता इथं खायचं तर केलं पाहिजे यासाठीच मुख्य करून जाते (आणि मनातल्या मनात माझ्या नवर्याच्या अंधेरीच्या घरी मऊसूत पोळ्या करणार्या विमलच्या आठवणी (दोघंही बापरे कंसात कंस......) काढतो) )नशीबाने तिळगूळ मात्र आईकडून नेहमी यायचा. आणि मग एखाद्या मराठी मंडळात गेलो की तिथेच काय ते विकेन्डला संक्रातीचा सोहळा अगदी गूळपोळीसकट. मागच्या वर्षी तर चक्क बोरन्हाण केलं होतं आणि त्यामुळे आरूषचा पण नंबर लागला. आता यावेळी आईबरोबर असल्याने इथल्या गुळाला तो चिकटपणा नाही म्हणून गूळपोळी काही होत नाही हेही कळलं पण घरगुती तिळगूळ झाला.



या ब्लॉगच्या सगळ्या वाचकांना सूर्याचं मकर राशीतलं हे संक्रमण काही ना काही चांगले बदल घेऊन येवो आणि आपला स्नेह या वर्षी अजून वाढो ही सदिच्छा...तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला....

Tuesday, November 3, 2009

दिव्यांची आरास





मोठी माणसं घरात असली की सगळे सण कसे नीट आठवण करुन दिले जातात. आता जी पौर्णिमा गेली ती "त्रिपुरी" यावर्षी आई घरात असल्यामुळे तिने आठवण करुन दिली. मग या दिवशीही एक दिव्यांची माळ घरात लावली. ती लावता लावता मला मागची त्रिपुरी आठवली.
मुंबईत बोरिवली पश्चिमेला मंडपेश्वर भागात ज्या गुंफ़ा आहेत तिथे प्रथमच त्रिपुरी पौर्णिमेला जायचा योग आला आणि प्रत्येक जणांनी केलेली दिव्यांची आरास पाहुन डोळे आणि मन तृप्त झाले. मुंबईजवळच राहुनही कधीच जाणं का झालं नाही माहित नाही आणि आता मायदेश सोडुन काही वर्ष झाल्यानंतर का होईना जाणं झालं हेही नसे थोडके. शक्य असेल तर या दिवशी मुंबईकरांनी (आणि इतरांनीही)  तिथे नक्की जायलाच हवं.
इथे एक छोटी टेकडी आहे, जिच्या आत या गुंफ़ांमधलं महादेवाचं मंदिर आहे. आसपास जो काही परिसर आहे तिथे या दिवशीच्या संध्याकाळी तिथे मोठमोठ्या रांगोळ्या काढुन त्याभोवती दिवे, पणत्या, समया ठेवुन दिव्यांची आरास केली जाते. सगळी जणं आपापले दिवे किंवा काही नुसतं तेल घेऊन मग ते सगळीकडे लावतात. कुठला दिवा विझला की तो मागुन येणारा कधी लावतो कळणारही नाही. काळोख व्हायला लागला तसा तो परिसर या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला आणि कानावर तिथे लावलेले शांत सुरातले अभंग. दिवाळीचं हे वेगळं रुप प्रत्येक मुंबईकराने डोळ्यात साठवायलाच हवे आणि या गुंफ़ा जतन करण्यासाठीही पाठिंबा. जास्त लिहिण्यापेक्षा फ़ोटो लावते. पुढच्या वर्षी नक्की जाल..






























Saturday, October 31, 2009

एवढा मोठा भोपळा...






सध्या सगळीकडे घरांपुढे कोरलेले भोपळे आणि त्यात लावलेल्या मेणबत्या दिसतात. काही ठिकाणी वेगवेगळे रंग आणि आकाराचे भोपळे सुबकरित्या रचुन ठेवलेत..सरता उन्हाळा आणि कापणीचा हंगाम संपल्याच्या आठवणी आहेत. आता भले सगळीच जण शेती करत नाहीत. पण हे ऋतुप्रमाणे घरसजावटीची अमेरिकन पद्धत माझ्या आईलाही खूप आवडते..


त्यानिमित्ताने आपली भोपळयातल्या म्हातारीची गोष्ट आठवली. तसंही लेकाला गाणी म्हणून झोपवायचं जवळ जवळ बंद आहे गेले दोन महिने (आजी आहे ना आता इथे हक्काची) म्हटलं जरा गोष्टतरी सांगुया. लहान मुलांच्या बर्याच गोष्टी ऐकताना पडलेले काही प्रश्न कायमच आहेत मला. जसं म्हातारी एवढ्याशा भोपळ्यात मावुच कशी शकते?? पण काही आठवडे आधी एका फ़ार्ममध्ये गेलो होतो निमित्त होतं सफ़रचंद खुडणी करायचं..(apple picking) तिथे लगे हातो भोपळे, द्राक्ष आणि अर्थातच सफ़रचंद असं सर्व काही वेगवेगळ्या विभागात लावलं होतं आणि ते पाहायला जायला आपल्या बैलगाड्यांसारख्या पण बैलाऐवजी यंत्र अशा गाड्या होत्या. इथे सगळ्यात मोठ्ठा पाचशे  पौंडाचा एवढा मोठा भोपळा पाहुन मात्र आता पुन्हा तो म्हातारी त्यात बसली कशी हा प्रश्न पडणार नाहीये...तुमच्यापैकी कुणाची मुलं लहान असतील किंवा माझ्यासारखे काही अजुन तो प्रश्न मनात ठेऊन असतील तर नक्की यातले फ़ोटो दाखवा. त्यांच शंकानिरसन होऊन जाईल..अरे आणि फ़क्त भोपळेच किती प्रकारचे आणि रंगाचे असावेत??


मान गये..बरेच दिवस ठरवत होते त्यावर लिहिन आज सुदिन उगवलाच आहे तर लगे हातो तेही फ़ोटो टाकुन देते.





भोपळ्याची आठवण आजच यायचं कारण आज इथे अमेरिकतला एक सण "हॅलोविन" साजरा होतोय. त्यानिमित्ताने सगळीकडे कोरलेले भोपळे आणि त्यात ठेवलेल्या मेणबत्या इ. दिसतयं. कधी नव्हे ते आम्हीही मुलाच्या निमित्ताने "ट्रिक ऑर ट्रीट" साठी जाऊन आलो. अरे आपण हे आधीच का नाही केलं असं ती आलेली वेगवेगळ्या चवीची चॉकोलेट्स खाताना वाटतंय.
या सणामागचं नक्की शास्त्र माहित नाही आहे पण जे काही ऐकलंय त्यावरुन मला वाटतं या दिवसात रात्री मोठ्या होत्यात तसं भुताच्या आठवणी जाग्या होत असाव्यात. तर अशा वाईट मृतात्म्यांना पळवुन लावायचं म्हणजे स्वतःच वेगवेगळे शक्यतो भीतीदायक कपडे घालुन संध्याकाळ झाली की फ़िरायचं आणि घरोघरी जाऊन म्हणायचं "ट्रीक ऑर ट्रीट?" म्हणजे आता घाबरवु की तुम्ही मला काही देताय?? मग समोरचा निमुटपणे ट्रीट म्हणजे चॉकोलेट देतो. गावात एखादा भूतबंगलाही उभारला असतो. त्यात जायचं म्हणजे पण मजाच असते.

आजकाल काही काही लोकं चॉकोलेट ऐवजी मुलांच्या खेळायच्या वस्तुही जसं प्ले डो इ. देतात. समजणारी मुले ती इतकी गोळा केलेली चॉकोलेट्स हट्टाने खातात म्हणून असेल. आम्हाला काय ते टेंशन नव्हतं. म्हणजे सुरुवातीला आमच्या बाळाला कळत नव्हतं की हे काय चालु आहे म्हणुन तो असं लोकांकडून काय घ्यायचं म्हणून नुसताच पाहात होता. मग एक-दोन घरं झाल्यावर आम्ही त्याला एक चॉकोलेट खायला दिलं मग मात्र अंदाज आला त्यालाही या ट्रीटचा. त्याच्यापुढच्या घरात तो आपला स्वतःहुन अजुन हात पुढे करतोय. मजा आहे..

आम्ही त्याला एक डायनॉसोरसारखा कपडा आणला होता. तो घालुन आमच्या आसपासच्या काही ओळखीच्या आणि काही अनोळखी घरांमध्ये फ़िरलो. थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर मात्र घरात आल्यावर त्याचं चॉकोलेटचं मडकं आम्ही लपवुन ठेवलंय. तो झोपला की आम्ही ती हळूहळू खाऊ...किती दुष्ट आई-बाप आहोत ना?? अहो पण याच वर्षी. पुढच्या वर्षी त्याची चॉकोलेट्स ढापायची काही नवीन ट्रीक आम्हालाच शोधावी लागेल.

Wednesday, October 14, 2009

दिपावलीच्या शुभेच्छा..

दिवाळी सण मोठा
नाही आनंदा तोटा

या दिपावलीच्या निमित्ताने इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला दिपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा... फ़राळाचं एक अप्रतिम ताट मायाजालावर मिळालंय तेही ठेवलंय. गोड मानुन घ्या आणि असाच लोभ राहु द्या.


आपल्या येण्याने, प्रतिक्रिया देण्याने अजुन काही लिहावंसं वाटतं म्हणून आज जास्त काही लिहित नाही....फ़क्त एकच प्रेमाची विनंती... आवाज आणि प्रदुषण करणारे फ़टाके फ़ोडताना जरा थोडा आपल्या पर्यावरणाचा विचार करा. दिवाळीतल्या रांगोळीतल्या रंगासारखे थोडे रंग काही फ़ुलझाडे अंगणात लावुन साजरे करता आले तर नक्कीच फ़ायदा होईल पर्यावरणाला आणि आपल्या चित्तवृत्तीला प्रसन्न करण्यासाठी...

Sunday, September 27, 2009

आठवणी दसर्‍याच्या ...

दसरा म्हटलं की फ़क्त प्राथमिक शाळेच्या आठवणी सर्वप्रथम डोळ्यापुढे येतात. उपनगरातील एका छोट्या गावातली ही एक जि.प.ची शाळा असल्यामुळे तिथे पाटीपुजन असायचं. चौथीपर्यंत मी या शाळेत होते. दसर्‍याच्या  आदल्या रात्रीच बाबा काळ्या पाटीला स्वच्छ धुऊन पुसुन खडुने १ आकडा वापरुन सरस्वतीचं चित्र काढुन देत आणि मग नेहमीपेक्षा लवकर सकाळी शाळेत ही पाटी, बरोबर झेंडुची फ़ुलं आणि नारळ असं घेऊन शाळेत जाऊ. त्या दिवशी अभ्यास (मुख्य म्हणजे चौथीतला गणिताचा तास) नसे ह्याचं मुख्य आकर्षण असे. खरंच शाळेत असताना खूपदा दसरा,स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन यादिवसांच्या महत्वापेक्षाही त्यादिवशी शाळेत जाऊनही शिक्षक आपल्यावर साहेबगिरी करु शकत नाहीत याचा आसुरी आनंद जास्त असे. तरी काही शिक्षक सवयीप्रमाणे निदान रांगेत सरळ न उभं राहाणे किंवा इतर व्यक्तींची भाषणे चालु असताना गप्पा मारणे इ. फ़ुटकळ कारणांसाठी ओरडुन त्यांचा जन्मसिद्ध हक्क सिद्ध करुन जात. असो.

तर पहिली ते चौथी दसर्‍याला पाटीपुजन करताना छान वाटायचे. बाईंनी आणलेली सरस्वतीची तसबीर टेबलावर ठेवलेली असे आणि आपण नेलेली पाटीवरची सरस्वती आपल्यासमोर. स्वतःची आणि मैत्रीणींनी आणलेली फ़ुलं, थोडी बाईंनी दिलेली अशी, आणि थोडं हळद-कुंकु असं ल्यालेली पाटीवरची सरस्वती अगदी दागिन्यांनी नटलेली वाटे. पुजा झाल्यावर आरती आणि मग आम्हीच आणलेल्या नारळाचा, साखर घालुन केलेला प्रसाद खाऊन हात चिक्कट होतं. माध्यमिकची शाळा मात्र ख्रिस्ती मिशनर्यांनी चालवलेली (पण मराठी माध्यमातीलच) असल्याने तिथे हे सण साजरे होत नसे. मला त्यावेळी माझ्या आधीच्या शाळेची खूप आठवण येई. दसर्याला म्हटलेली "हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली" आता पुर्ण येत नाही पण आठवते.
आई-बाबा दोघेही शिक्षक असल्याने तेही पाटीपुजनाला गेलेले असत. साधारण नऊ-दहा वाजता शाळा सुटे आणि मग दुपारपर्यंत आई-बाबा पण घरी येत. त्यांचा शाळेतला प्रसादही ते आमच्यासाठी घेऊन येत. मग जेवणं होईपर्यंत गुळ किंवा साखर-खोबरं खायला मला फ़ार फ़ार आवडे. इथे फ़्रोजन नारळ्याच्या ओल्या किसात साखर घातली तर उगाच गोडुस चोथा खाल्यासारखं वाटतं. शिवाय कोलेस्टेरॉलचं भुत मानगुटीवर असतं ते वेगळंच. खरंच अशावेळी बालपणीचा काळ सुखाचा हे पुन्हा पुन्हा पटतं नाही??
दसर्‍याला जेवणं काहीतरी गोडाचं असे बहुतेक वेळा नव्या तांदळाची खीर नाहीतर पुरणपोळी. मला गोड तेव्हातरी विशेष आवडत नसे. पण सगळीजणं दुपारच्या जेवणाला एकत्र असली की मला नेहमीच आवडे. या दुपारी आई-बाबा घरी असत, जरा सुस्तावलेली दुपार अजुनही आठवते. मग संध्याकाळी आई नेहमी सिमोल्लंघनाची आठवण करी, शेजारी-पाजारी सोनं वाटायला जात असू. आमचे शेजारचे एक काका मला नेहमी हे घे सोनं आणि तुला बांगडी कर असं म्हणतं. दरवर्षी दागिने बदलले असत. त्या तशा दागिन्याने आतापर्यंत मला वाटतं मी नखशिखान्त नटले असते. पण मजा यायची ते सोनं द्यायला. मागच्या वर्षी माझ्या भाचीला तसलंच काही सांगताना मला फ़ार मजा आली.
कॉलेजला वगैरे मात्र दसरा सुट्टी असणे याखेरीज जास्त काही आठवत नाही. मात्र घरी पुस्तकांची पुजा आवर्जुन करायचो. घरचे संस्कार. अजुनही लॅपटॉप, पुस्तकांचं कपाट याची पुजा करते. इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षी एका छोट्या कंपनीत माझं शेवटचं प्रोजेक्ट होतं, तिथलं टिपिकल मराठमोळं वातावरण. त्यावर्षी मात्र दसर्याच्या पुजेला कंपनीत मलाही आमंत्रण होतं. पुन्हा एकदा शाळेची आठवण आली. दसरा थोड्या वेगळ्या पद्धतीने का होईना पण साजरा झाला. दिवाळीचं गिफ़्ट दसर्‍याला वाटायची त्यांची पद्धत होती म्हणजे दिवाळीला ते उपयोगी पडेल असं काहीसं. मग त्यावर्षी मलाही एक मिठाईचा पुडा मिळाला होता. माझ्या कॉलेजमधल्या एक-दोन मित्रांनी "तुझे काय बाबा जाशील तिथे लाड" अशी प्रतिक्रियाही दिलेली आठवते.
आमच्या भागात अगदी जवळपास कुठे रावण वगैरे जाळत नसत. त्यामुळे प्रत्येक दसर्याच्या की त्यानंतरच्या दिवसाच्या नक्की आठवत नाही पण बातम्यांमध्ये गिरगाव चौपाटीवरचा रावण जाळताना दाखवत तो मात्र आठवणीने पाही. तेव्हा नेहमी मला एकदा तरी गिरगावला तेव्हा गेलं पाहिजे असं फ़ार वाटे पण बारावीत असताना मी चर्नीरोडला राहिले तेव्हा त्या दसर्याला मी काय करत होते ते मात्र अजिबात आठवत नाही. कदाचित सुटीसाठी घरीच गेले असेन. असो. दसरा गेला की दिवाळी अशी हाकेवर आल्यासारखं वाटे. त्यामुळे कधी एकदा सहामाही परिक्षा उरकते आणि शाळेला दिवाळीची सुट्टी पडते असं होई. नशीब माझी शाळेतली प्रगती चांगली होती नाहीतर या मानसिकतेने फ़क्त सुट्या आणि शाळेचे न शिकणार्या दिवसातच रमुन आतापर्यंत पुढचा सगळा बट्ट्याबोळ झाला असता.
आजच्या दसर्‍याला हे सर्व आठवुन विद्यादेवीची पुन्हा एकदा उपासना करायचं ठरवतेय. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा.

Tuesday, August 25, 2009

आठवणी गणेशोत्सवाच्या...

गणपती आले आणि परेलची आठवण आली नाही असे कधीच होत नाही. लहान असताना माझ्या एका मावशीचा घरगुती दीड दिवसाचा गणपती गेला की वेध लागायचे ते परळ-लालबागकडच्या सार्वजनिक गणपतींचे. नशिबाने माझी दुसरी एक मावशी परेलला अगदी आंबेडकर रोडलगत राहायची. तिच्याकडे मग शक्यतो अनंत चतुर्दशीला लागुन जाणं व्हायचं. आम्ही सर्व मावसभावंडं घरातील एक-दोन मोठ्यांबरोबर मग चालत चालत प्रत्येक गल्लीतील सार्वजनिक गणपती पाहायला निघत असू.

माझ्या मावसभावांचे मित्र आसपास राहणारे असत त्यामुळे नरे पार्क आणि अशा काही गणपतीच्या ठिकाणी मोठ्या रांगात उभं राहायचे कष्ट वाचत. कुणीना कुणी त्या गल्लीत राहणारा असला की मावसभाऊ त्यांना बोलावुन आणत आणि मग त्यांची वट चालली की आम्ही पण फ़ुशारकी मारुन लवकर दर्शन करुन घेऊ. सगळीकडची चलतचित्र तर इतकी छान असत ना. आणि अनंत चतुर्दशीला तर काय खालुन जाणारे गणपती पाहताना तो दिवस कसा संपायचा कळायचही नाही.
२००२ च्या गणपती नंतर मात्र गणपती पाहायला २००८ म्हणजे मागचं वर्ष उजाडावं लागलं. आता मावशीकडेही कुणी तिथं राहात नाही. खरंतर चारेक महिन्यांच्या बाळाला घेऊन भारतात यायचं म्हणजे फ़िरणं असं होत नाही पण इतक्या वर्षांनी आले म्हणून फ़ार इच्छा होती परळचे गणपती पाहायची. आता इथे सगळीकडे एकटं फ़िरायची सवय झाली आहे पण म्हणून नाही कुणाला वेळ नव्हता म्हणून मग एका मधल्या दिवशी सकाळी जरा लवकर निघून एकटीने जमतील तितक्या गणपतींचे दर्शन घेतले.
इतकी वर्षे मुंबईचे गणपती पाहुनही जीएसबी मंडळाच्या वडाळ्याच्या गणपतीला कधी गेले नव्हते या वर्षी पत्ता शोधत तोही पाहिला.

खरं तर मुर्तीपेक्षा दागिन्यांनीच दबल्यासारखा मलातरी वाटला. असो. तिथुन मग गणेश- गल्लीत टॅक्सीने जायला बराच वेळ कुणी टॅक्सीवाला तयार होईना. विचार केला आता ट्रॅफ़िक पोलीसाला विचारुया. तितक्यात उलटया रस्त्याने एक टॅक्सीवाला स्वतःहुन आला. मला नंतर म्हणालाही की तुला एक-दोघांनी नाही सांगितलं ते मी पाहिलं पण तू त्या रस्त्यावर उभं नव्हतं राहायला हवं. मग काय थोड्यावेळ त्याच्याशी गप्पा मारल्या. मला रस्ते माहित नाही हे न जाणवु देता. पण भला माणूस होता.त्याने कुठला मधला रस्ता बंद होता म्हणून आधीच एका पतली गल्लीतून मला बरोबर आणून सोडलं. परत जाताना मी कसं गेलं पाहिजे हे पण मला समजावलं आणि मुख्य म्हणजे जे काही बिल झालं होतं त्यापेक्षा कमी पैसे घेतले, अगदी स्वतःहुन. चला भारतभेटीच्या पहिल्याच आठवड्यात एक सच्चा मुसलमान भेटल्यामुळे जरा बरं वाटलं.
गणेशगल्लीत आल्यावर आजुबाजुचे गणपती पाहायला काही जास्त वेळ लागला नाही. फ़क्त पावसाच्या रिपरिपमुळे गल्लीतुन पटापट चालता येत नव्हतं आणि अशा गणपती टू गणपती टॅक्सी मिळत नाहीत ना?? मध्येच आईचा फ़ोन आला आटपलं का?? मग सिमेंट चाळ आणी पोस्ट गल्ली तशीच सोडून एलफ़िस्टन स्टेशनला टॅक्सीने आले.
इतक्या वर्षांनी थोडा थोडा बदल झाला असला तरी वातावरण निर्मिती तीच होती. फ़क्त मला माझ्या लहानपणीची मजा मात्र कुठेतरी हरवल्यासारखी वाटली. असो. चालायचं.

आज लालबागच्या राजाचा या वर्षीचा फ़ोटो कुणीतरी पाठवला आणि मन डायरेक्ट फ़्लाईटने परळला जाऊन आल्यासारखं वाटलं. तेच ते लाऊडस्पीकर वरुन वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतीच्या गाण्यांचे मिश्र आवाज, लोकांची लगबग आणि लांबच्या लांब रांगा, मोठमोठ्या मुर्ती आणि ताज्या परिस्थितीवरची आरास. माझे़च मागच्या वर्षीचे फ़ोटो पाहुन समाधान करतेय...

Monday, August 10, 2009

अशीही एक मंगळागौर

अमेरिकेत आल्यावर पंढरीच्या वारीचा बुक्का कपाळी लावावा तसं पहिलं ड्रायव्हिंग लायसन्स पदरात पाडून घेतलं आणि मग नवनवीन ठिकाणी जायच्या आधी "आधी वंदु गणराया" उक्तीप्रमाणे पहिला नमस्कार मॅपक्वेस्ट्ला करुन रस्त्याचा नकाशाचं (इथल्या भाषेत डिरेक्शन्सचं) दान पदरात पाडून घ्यायचं. हे नमन झालं की मग एकदा गाडीत बसलं की मग बहुतेक करुन मुक्कामाच्या जागीच गाडीतुन उतरायचं. अर्थात कधी एखादा रस्त्याचं नाव नेमकंच वाचलं गेलं नाही की मग मारा गिरक्या नाहीतर कुणाच्या घरी जात असु तर करा त्यांना फ़ोन. आणि मैलोनमैलचे हायवे बिनबोभाट तुडवल्यावर गाडी अडायची ती मुक्कामाचं ठिकाण हातभर अतंरावर असताना."डुबी जब दिल की नैया सामने थे किनारे" सारखं.
तसं प्रवासाचं मला भारी वेड. आणि योगायोगाने नोकरीसाठीही बरचं भटकावं लागलं. आठवडाभर क्लायंटकडे आणि विकेन्डसाठी फ़क्त घरी. त्या पहिल्या चार वर्षात नवनव्या ठिकाणी रेन्टल गाडी घेऊन हिंडण्यात फ़ार मजा होती. दरवेळी रस्ते चुकायचे आणि नवे रस्ते शोधायचे. कधीकधी अगदीच नाही सापडलं तर मग एखाद्या दुकानात नाहीतर पेट्रोल पंपाला थांबुन विचारायचं.पण तरी बर्याच ठिकाणी मी या माझ्या वर उल्लेखलेल्या मॅपक्वेस्ट नामे दैवताच्या कृपेने नीट पोहोचायचे. आता नाही म्हटलं तरी जरा अतिआत्मविश्वास आल्यासारखं झालं होतं. आणि अशातच आमच्या ओळखीत एका ठिकाणी मंगळागौरीचा कार्यक्रम (अर्थातच फ़क्त महिलांसाठी) एका बाईंच्या घरी करण्याचं ठरलं. त्यांनी एक शनिवार पक्का केला आणि झाडून सगळ्यांना बोलावलं. हो शनिवारच कारण मंगळागौर मंगळवारी साजरी करायला अर्थातच कुणालाही जमणार नव्हतं.
आमच्या पेन्सिल्व्हेनियात आधीच उतार-चढावामुळे डोंगरासारखं वाटणारे भाग जास्ती आहेत. आणि टिपिकल अमेरिकन मेंटेलिटीची अति एकांतवासाची घरंपण भरपुर. ही अशी घरं जितकी एकांतात तितकी जास्त महागही असतात त्यामुळे आम्ही त्यांना सरसकट मिलियन डॉलर हाऊसेस म्हणतो. असो.
त्यामुळे माझी एक मैत्रीण मला म्हणालीही की एकत्र जाऊया. पण त्यासाठी मला आधी तिच्या घरी एक तास जा मग तिच्या घरुन पुन्हा इथे या. आणि परत जाताना तिच्या घरुन माझ्या घरी. विचारानेच कंटाळा आला. आणि मॅपक्वेस्टवर डिरेक्शन्स पाहिली तर हे घर माझ्या घरापासुन जास्त जवळ पडणार होतं. फ़क्त माझ्या बाजुने जाणारं दुसरं कुणी तिथे नसणार होतं म्हणून मग मी एकटीनेच येईन असं ठरवलं.
सगळ्यांनी जागरण करायचं ठरवलं होतं आणि रात्रीच्या जेवणाचा बेत होता त्यामुळे निघायची वेळ संध्याकाळची होती. मी माझ्या घरचं आटोपुन निघाले आणि नेहमीप्रमाणे रस्त्याला लागले. गाडीत आवडीची गाणी लावली. सुरुवात बरी झाली आणि लोकल हायवे संपल्यानंतर तो तसा टिपिकलवाला भाग चालु झाला. मुख्य म्हणजे सिंगल लेन आणि थोडे छोटे रस्ते आणि दोन्ही बाजुला शेतं.थोडं कंट्रीसाईड सारखं. काही मोठी-मोठी रॅंचेस. एक घर गेलं की बर्याच वेळाने दुसरं घर. रस्त्यावर कुठेही पेट्रोलपंप किंवा दुकानं नाहीत. गाड्यांची रहदारीदेखील जेमतेम.
पोहोचायला एक-दोन मैल उरले असताना मला एका ठिकाणी डावीकडे वळायचं होतं ते काही केल्या मिळेना. मग चुकले असेन असं समजुन आधी तसच सरळ थोडं पुढे जाऊन पाहिलं. छ्या! असं-कसं झालं? मग पुन्हा उलट्या बाजुने तसंच जाऊन पाहिलं तरी मिळेना. नंतर विचार केला की फ़ोन करुया तर पाहते तर फ़ोनला लिंकच नाही. आता कठीणच होतं. मग विचार केला की परत घरी जाऊया. पण हे उलट-सरळ जायच्या नादात रानभूल पडल्यासारखं तेही वळण कळत नव्हतं. सगळेच रस्ते सारखे वाटायला लागले. आता फ़ोनला लिंक येईपर्यंत सरळचं जात राहुया असा विचार केला. सहज म्हणुन गाडीच्या गॅस इंडिकेटरकडे नजर टाकली तर शेवटचा क्वार्टर बापरे! एकतर शेवटचा क्वार्टर लवकर संपतो आणि इथे तर कुठे इंधनाची सोयही दिसत नाही. त्यामुळे एका ठिकाणि फ़ोनला लिंक आल्यावर सरळ एका घराच्या एँट्रन्समुळे उजवीकडे जरा जास्त जागा होती तिथे सरळ हजार्ड लाइट्स लावुन गाडी बाजुला घेतली आणि फ़ोन लावायला सुरुवात केली. आता अंधारही पडायला लागला होता. आणि इथे तसही बर्याच रस्त्यांवर दिवेही नसतात.
माझ्या सेलमध्ये माझ्या माहितीत तिथे जाणार्या सर्व मैत्रीणींचे नंबर होते त्यामुळे शहाणपणा करुन मी ज्यांच्या घरी ही मंगळागौर असणार होती त्यांचा घरचा नंबर घ्यायलाही विसरले होते. एक-एक मोबाईल नंबर फ़िरवायला सुरुवात केली आणि माझे धाबे दणाणले. बहुतेक तिथे इतक्या लोकांच्या आवाजात कुणालाही रिंग ऐकु येत नव्हती. सगळ्यांचे नंबर व्हॉइस-मेलमध्ये जात होते. आणि इथेतर माझ्या काळजाचे ठोके वाढायला लागले होते. कारण मला कळतही नव्हते की मी नक्की कुठे आहे म्हणजे मी नवर्याला तरी फ़ोन करुन मला घ्यायला बोलावु शकेन. काय करावं कळत नव्हतं नशिबाने एका मैत्रीणीने तिचा फ़ोन उचलला आणि हाय कंबख्क्त ती त्या मंगळागौरीच्या इथे नव्हती कारण तिच्या मुलाचा वाढदिवस होता. आणि मुख्य म्हणजे तिला जेव्हा कळलं की मी कुणाकडे जातेय तेव्हा तिलाही माझ्यासाठी टेंशन आलं कारण तिच्यामते त्यांचं घर थोडं असं फ़ोनवरुन समजावुन सांगुन मिळण्यासारखं नाही. ती स्वतः बाहेर जेवायला असल्याकारणाने ती मला दुसरे कुठले नंबर देऊ शकणार नव्हती. पण मला परत फ़ोन करायला सांगुन हा फ़ोन मी ठेवला. आता मात्र मला जरा जास्त दडपण आलं. शेवटी मी माझ्या अजुन एका मैत्रीणीच्या घरी फ़ोन केला कारण ती जरी मंगळागौरीला असली तरी तिचा नवरा घरी असणार म्हणजे तो काहीतरी करुन मला त्या घरचा नंबर शोधुन देईल असं मला वाटलं. माझा त्याला फ़ोन लागला तेवढ्यात माझ्या मैत्रीणीनेच त्याला फ़ोन करुन सांगितलं होतं की ती मला फ़ोन करायचा प्रयत्न करतेय पण तिचा लागत नाहीये. ही स्वतः कोणाबरोबर जेव्हा त्या घरी गेली तेव्हा तिला रस्ता पाहुन कल्पना आली की हा थोडा ट्रिकी रस्ता आहे आणि एकटीने येणारी मीच होते.
हे होइस्तोवर बराच वेळ झाला होता. मी ज्या घराबाहेर थांबले होते तिथुन बहुतेक एक अमेरिकन बाई बराच वेळ मला गाडीत पाहात असणार. मी साधारण सेफ़ व्यक्ती आहे अशी काही कल्पना झाल्यावर ती आपल्या गेटच्या बाहेर आली आणि मला दिसली. मी खिडकीची काच खाली केली आणि तिने मला विचारलं की मी बराच वेळ तुला इथं पाहातेय काही मदत हवी आहे का? मग मी तिला रस्त्याचं नाव सांगुन विचारलं की मी कुठे आहे म्हणुन. तिने जी खूण मला सांगितली ती मला साधारण कळली कारण इतका वेळ जा ये करताना मी एका सेव्हन वे स्टॉप साइनला दोनदा तरी थांबले होते आणि माझं डावं वळण त्या स्टॉप साइनच्या एका कोनाला होतं जे आरामात चुकतं. तिचे आभार मानतेय तोच माझ्या मैत्रीणीचाच मला फ़ोन लागला आणि मी सुटकेचा निश्वास टाकुन तिला सांगितलं मला त्या स्टॉप साईनपाशी यायला.
यावेळी मी जरा नीट पाहिलं. साधारण चार रस्त्याला स्टॉप साइन असेल तर एकच डावं वळण असतं आणि रस्त्यांची नावंही नीट दिसतात. इथे जरा प्रकरण थोडं ट्रिकी होतं. म्हणजे मुख्य
चार रस्तेच होते पण अजुन थोडं पुढे जाऊन डावीकडे दोन आणि उजवीकडेही वळणं होती. ती थोडी दूर असल्याने त्या रस्त्यांची नावंही दिसत नव्हती. म्हणजे इथं पहिल्यांदी येणारा प्रत्येकजण चुकतच असेल अशी निदान मी माझी समजुत करुन घेतली आणि साधारण डावीकडे बाजुला थांबले.याला आपण सात रस्ता म्हणुयात असंही डोक्यात आलं.
थोड्याच वेळात मला घ्यायला आमच्या होस्टबाईच त्यांची गाडी घेऊन आल्या आणि पुढे त्यांना फ़ॉलो करत जाताना मी म्हटलं या घरी कुणी हरवलं तर फ़क्त त्याच आणू शकतील. एकदाची पोहोचले आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊनच काय ती पहिल्यांदी भेटले.
जमलेल्या सगळ्या बायकांच्या गप्पा-गाणी यांना ऊत आला होता. मी मात्र आता रात्री पुर्ण जागुन सकाळीच निघण्याचं स्वतःच ठरवुन टाकलं कारण पुन्हा रात्रीच्या पारी हरवण्याची माझी बिल्कुल इच्छा नव्हती. नंतर उरलेली रात्र खरचं खूप मजा आली. सर्वांनी पुस्तकं, इंटरनेट वरुन माहिती काढुन सगळं साग्रसंगीत मंगळागौरीचं जागरण केलं. अगदी बसफ़ुगडी, गाठोडं इ. सुद्धा. म्हणजे मुंबईत राहिल्यामुळे किंवा आमच्याकडे अशा काही प्रथा नसल्याने मला स्वतःला मंगळागौर भानगड तशी माहित नव्हतीच. बरेच खेळही तिथेच कळले. खूप मजा आली. खायचं पण सर्व छान-छान आणि आयतं होतं.
सकाळी मला त्या काकु अगदी मुख्य रस्त्यापर्यंत सोबतीला आल्या; तरीही सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो हा त्यांच्या घरी जाण्याचा प्रवास आणि तो सात रस्ता.