होळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का? नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्हणजे होळीच्या पूर्ण दिवसात एक, फ़ार फ़ार तर दीड एवढीच काय ती कुंपणापर्यंतची धाव. मग येते ती दुसर्याच दिवशी खेळली जाणारी रंगपंचमी..त्यात ते नकोत्या लोकांकडून रंग लावून घेणे आणि तोही जास्त मारक्या केमिकल्सचा असला की संध्याकाळपासुन अनेक दिवस उतरवणे ही अजून एक अजिबात न आवडलेली गोष्ट. मायदेशात असताना कधीही मी रंग खेळायला उतरले नाही आहे. वरून फ़क्त रंगून एकसारखी झालेली माकडं पाहाणे एवढंच केलंय...
आठवणीत खेळलेली पहिली होळी खरं तर देशाबाहेर मागच्या वर्षी खेळलोय. न्यु जर्सीला एक हवेली म्हणून गुजराथी लोकांचं मंदिर आहे तिथे अगदी फ़ायरब्रिगेड आणि पोलिसांच्या कडक पहार्यात आवारात जळणारी होळी आणि त्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लोक आणि मग तिथल्या तिथेच मिळणारा गुलाल आणि दुसरे कुठले रंग फ़ासून मागच्या वर्षी एक-दोन तास चांगलेच होळी खेळलो. अगदी स्ट्रोलरमध्ये आणि मग कडेवर घेऊन आरुषपण रंगला..निमित्त आमच्या एका गुजराथी मित्राचा आग्रह आणि बाळाची पहिली होळी. बाकी हा खेळ खेळावा तो गुजराथ्यांनीच..तिथे फ़ेब्रुवारीच्या थंडीतही संध्याकाळी माणसांची अलोट गर्दी जमली होती आणि सगळी इतकी धमाल करत होते की इतकी वर्षे आपण कधीच होळी का खेळलो नाही अशी चुटपुटही लागली. आता पुढच्या वर्षी नक्की येऊ म्हणावं तर नेमकं मुक्कामाचं ठिकाण बदललं.........
आता कधी न मिळणारी पुरणपोळी जेव्हा एखाद्या मराठीमंडळाच्या कार्यक्रमात नाहीतर एखाद्या सुगरण मैत्रीणीकडे पानात येते तेव्हा इतकी आवडते खायला की इतकी वर्षे घरचीच होती म्हणून किंमत नव्हती हेही जाणवतं..पण असो...इथे साधी पोळी नाही येत तर पुरणपोळी करायचा विचारही मी मनात आणत नाही.
जाऊदे...शेवटी सण आहे तेव्हा परक्या देशात कुणी नसताना उसना का होईना पण उत्साह आणावा लागतो..अरे हो उत्साहावरून आठवलं होळी जिथे असायची त्याठिकाणी सगळी होळीची हिंदी-मराठी गाणी लाउडस्पीकरवर लावायचे ती ऐकायला मला सॉलिड आवडायचं..त्यावेळच्या चित्रहार आणि छायागीतमध्ये पण "रंग बरसे" पाहायचा नित्यनेम आणि "होली है" चा ओरडा..शिवाय ’होळी रे होळी.’...आणि ’हुताशनी माते की जय’ यांनी जरा स्फ़ुरण चढतं.....आता एकदा होळीच्यावेळी पण मायदेश दौरा केला पाहिजे...बरीच वर्ष झाली ती निळी जांभळी माकडं पाहून...
तुर्तास माझ्या भाचीने एका आदिवासी पेंटिगच्या क्लासमध्ये काढलेलं चित्र आहे ते लावते जरा फ़्रिजवर होळीच्या आठवणीसाठी...
सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा...यावर्षी जरा इको कलर मध्ये होळी खेळायचा प्रयत्न करुया.
अग पुरणपोळ्या म्हणजे माझा जीव की प्राण. ३-४ पुरणपोळ्या आणि डाएटिंगचे विचार होळीत घालून त्या पोळ्यांवर सोडलेली तुपाची धार. अहाहा..
ReplyDeleteआणि तू म्हणतेस तशी माकडं बनणं आणि बनवणं हे वर्षानुवर्ष चालू आहे अर्थात या फिरंग्यांच्या देशातली वर्ष सोडून. खरंच एकदा परत गेलं की पूर्वीसारखं ६-७ तास रंगात खेळायचंय.
जाउदे माझी वटवट अति झाली. पोस्ट झक्कासच आणि वारली पेंटिंगपण जाम आवडलं !!
हेरंब...हम्म मला फ़ार नाही आवडत किंवा आवडायच्या म्हणू या पुरणपोळ्या पण इथे फ़िरंग्यांच्या देशात आलं की एका वर्षात आपलं सगळं (विशेष करुन खाणं) जरा जास्तच आवडतं...आणि इकडच्या स्वारीकडून गोडाचं वेड आता माझ्यात पण हळुहळु शिरतंय....:)
ReplyDeleteमलापण ते वारली पेंटिंग फ़ार आवडलंयमाझ्या आजोळचे वारली तारपा म्हणून एक नृत्य असत ते या दिवसात करतात..बघताना झिंगायला होतं....किती वर्ष झाली तारपा पाहून पण..:(
अपर्णा, अग पुरणपोळ्या केल्यात ना मी. खास तुझी आठवण ठेवून, ये तू खायला. ठाण्याला आमच्या बिल्डिंगची खूप मोठी होळी असे आणि दस~या दिवशी एकजात सगळ्यांना रंगवून काढत. खूप मजा येई. होळीच्या भोवती एकेकाचे नाव घेऊन ठोकलेली बोंब, तडतडलेला-अर्धा कच्चा भाजलेले खोबरे...आणि मग कोणा एकाच्या घरी केलेल पॉटलॉक. धम्माल.फार फार आठवण येतेय मला.तुझ्या भाचीने काढलेले पेंटीग खूपच छान झालेय.पोस्ट मस्तच. तुम्हां सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा!:)
ReplyDeleteहा.हा.हा.. रंगलेली एकसारखी माकडं, मी ही एक माकड असायचो त्यातला काही वर्षापुर्वी, खुप मजा असायची....
ReplyDeleteहोळी आणि रंगपंचमीच्या रंगेबिरंगी शुभेच्छा!
भाग्यश्रीताई, आता पोळी खायला बोलावलंस तर मी लगेच येईन; माझ्यापेक्षा लवकर माझा नवरा जास्त जोरात पळत येईल...आजच आम्ही ऑनलाइन पोळी मागवायची का ते पाहात होतो....
ReplyDeleteआणि हो अगं ते भाजलेलं खोबरं मला पण खूप आवडायचं...विसरलेच बघ...
होळीच्या शुभेच्छा....
आनंद आताही तुम्हाला माकड व्हायची संधी आहे...हैद्राबादला होळी खेळतात का माहित नाही..पण नसल्यास तुम्हीच सुरु करा...सगळ्यांना आवडेल...:)
ReplyDeleteअग पुरणपोळ्या म्हणजे माझा जीव की प्राण. ३-४ पुरणपोळ्या आणि डाएटिंगचे विचार होळीत घालून त्या पोळ्यांवर सोडलेली तुपाची धार. अहाहा..
ReplyDeleteवारली पेंटिंगपण जाम आवडलं !!
(हेरंब माझ्याआधी कमेंट टाकून माझी cltr C ची सोय करतो नेहेमी,......)
अत्ताच २ पुरणपोळ्या तुप आणि दुधात भिजवुन खल्ल्या. रात्री होळी पहायला जायचे आहे, आर्यनला घेवुन. त्याला मजा वाटेल. रंग खेळायला मला पण नाही आवडत.
ReplyDeleteआपलं सेम सेम बरं हे, मलाही पुरणाची पोळी आवडत नाही, ऐकूनच व्य्याआआआऽऽऽक (विक्रांत देशमुखांचे बोल, त्यांना पुरण आवडतं, पुर्या आवडत नाहीत!!!) होतं मला..! सगळे म्हणतात की पाहुण्या-घरी गेला की तिथे तुला कोणत्याही मोसमात पुरणच खावं लागेल... पण मी कुठं ऐकतो कोणाचं..! असो..
ReplyDeleteअन हो, ती नीळी-जांभळी कारटी आमचेच भाऊ-बांधव असतात (पण कोणी भगिनी नसतात बरं..!), उद्या परत तो चानस येतोय, रंगण्याचा..! रंगून निघणार, अन ताई तू बस टीव्हीवर भारतातले कार्यक्रम पाहत..! पुढच्या वेळी बघ जमलं तर यायचा योग असेल मायदेशात परत तर! (आयला, काय बोललो मी मागच्या वाक्यात, माझं मलाच कळू नाही राहिलंय, जाऊ देत, समजून घे..!)
ह्ह्यीऽऽह्याऽऽऽह्याऽऽऽ..!
;)
बाकी ते वारली चित्रशैलीने काढलेले आदिवासी चित्र पाहून तर मला इकडे "झिंगालाला झिगालाला ह्ह्हूऽऽ.." असं काहीसं करावं वाटतंय, तुलाही तसंच वाटत असणार, म्हणून तू ते फिजला अडकवलंय बहुतेक!!!! ;)
हा हा..! (लयंच हासणं झालं आता..!)
होळी अन् धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
- विशल्या!
तन्वी तू डाएट कॅटेगरीत येतेस हेच नवीन आहे मला मुळी...मग ctrl C साठी हेरंबचे आभार मानायचे का?? हे हे हे....
ReplyDeleteसोनाली, आर्यनला नक्की मजा येणार....आरुष मागच्यावेळी नऊ महिन्यांचा असेल तरी त्याने खूप मजा केली..त्याला मुळात इथे हिवाळ्यात इतकी लोकं एकत्र दिसणं हेही नवलच असेल म्हणा...हा हा हा..
ReplyDeleteविश्ल्या, होळी आणि भांग हा उल्लेख राहिला होता (म्हणजे करण्याचंही तसं काही काम नव्हतं म्हणा) पण तुझ्या कॉमेन्टने ती कमी भरून निघाली आहे....:)
ReplyDeleteआतापर्यंत तुझं चांगलंच माकड झालं असेल...या वर्षी कुठला रंग फ़ॉर्मात आहे ते कळव...:)
पुराणाची पोळी. . सर्वात आवडता प्रकार !!! आज आडवा हात मारलाय पोळ्यांवर!!! होळीच्या शुभेच्छा!!!
ReplyDeleteएकदम बरोबर अपर्णा.. मला तर वाटलेलं की तन्वीकडून ते 'डायट' चुकून CTRL C झालंय ;-)
ReplyDeleteमनमौजी चापा चांगल्या आमच्या वाट्याच्या पण चापा पोळ्या ....(या आमच्या सभ्य भाषेतल्या बोंबाच समजुया....)
ReplyDeleteहेरंब, म्हणून खरं तर मी ctrl C ची सुविधा बंद केली आहे..पण comments च्या पानावरुन अशी कॉपी होते...ही ही ही....
ReplyDelete