Monday, March 30, 2009

पाऊस

या रविवारी सकाळी उठल्यापासुन बाहेर एकदम कुंद वातावरण आहे. मस्त पावसाळी. अशा वातावरणात मन कसं पटकन मागे जातं कळत नाही....

७ जून किंवा त्या आसपास जो काही सोमवार असेल तो शाळेचा पहिला दिवस आणि त्यावेळी वेळेवर हजेरी लावणारा पाऊस.पावसाळी वातावरणामुळे शाळेचा आलेला कंटाळा.......... पण तरी यावर्षी वर्गशिक्षक कोण असणारची लागलेली हुरहुर. साधारण पहिला आठवडा संपेपर्यंत शाळेची पुन्हा सवय व्हायची पण तरी त्यावेळी पाऊस म्हटला की तो दिवस ठळकपणे आठवे.

शाळा संपल्यानंतर अकरावीसाठी मला रोज माटुंग्याला ट्रेनने जावे लागे त्यावेळी बाहेर पाऊस असताना गाडीच्या डब्यातले ते विशिष्ट वातावरण ईतर वेळी कधी नसे आणि कॅंटीनमधल्या वडापावची बाहेर पाऊस असतानाची वेगळी चव...आई ग्ग.....बारावीनंतर कॉलेज बदललं तरी वड्याचा पाऊस ईफ़ेक्ट बदलला नाही.

मग नंतर जेव्हा जंगल भटकंतीचा नाद लागला तेव्हा मात्र पावसाची वेगळीच नशा चढली.... भारताबाहेर जरी four seasons आणि त्यांचे रंगढंग असले तरी आपल्या इथे जो पावसाळ्यात भटकलाय त्याला हा इथला पावसाचा मधुनच येणारा दिवस नक्कीच nostalgic करुन जातो. इतर वेळी पक्षी शोधत फ़िरणारा आमचा ग्रुप आता मातीच्या सुगंधाची मजा लुटे. बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानातले पायाखालचे ट्रेल्स पण बघता बघता हरवुन जायचे ते दिवस हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म काय सांगु? साधं सिलोंड्यात (हा शब्द असाच वापरायला मजा येते म्हणजे सिलोंडाचा ट्रेल करुया बिरुया नाही तर सिलोंड्यात जाउ या) हा तर साधं सिलोंड्यात ईतकयांदा आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे हरवलोय की बस्स... प्रत्येकवेळी बाहेर आलो की सुटकेचा निश्वास टाकून सर्व जण अगदी पुन्हा कध्धी आडवाटेला जाणार नाही म्हणून शपथेवर सांगत पण पावसाळ्यातली ती हिरवाईची नशा पुढल्या खेपेसही एका नव्या न संपणा-या वाटेवर घेऊन जाई.

सर्वांच्या सवडीने मुंबईबाहेच्या जागीहि जाणे होई. सेंट्रल रेल्वेने जाताना कर्जत गेले की डोळे हिरवे होताहेत की काय असे वाटे. अशा वेळी पुढच्या कुठल्याही स्थानकावर उतरले तरी चालेल असे वाटे....लोहगडचा ट्रेक अशाच एका संध्याकाळी केला होता. मळवलीच्या पुढे पायथ्याशी चालत जाताना पायवाट कशी संपली ते कळलंही नाही; मस्त आल्हाददायक वातावरण होतं. रात्री वरच्या गुंफ़ामध्ये राहून सकाळी वरुन सभोवतालचे हिरवे डोंगर पाहताना आदल्या दिवसाचा शीण कसा सरला ते कळंलच नाही. जंगलातून परतताना मात्र खूप वाईट वाटे...विशेष करुन बोरीवलीच्या जंगलातून बाहेर आलं की लगेचच कॉंक्रिटच्या जंगलात जाताना जास्तच वाईट वाटे....पावसाचे निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेल्या हे क्षण खरंच खूप मौल्यवान आहेत हे आता जास्त जाणवते....

अशा ओल्या भटकंतीत एकमेकांनी आणलेल्या खाऊचा चट्टामट्टा कधी होई कळतही नसे. प्रत्य़ेकाकडे हमखास काही ना काही तळलेला चमचमीत पदार्थ असे. आमचा एक ठरलेला डायलॉग होता की ट्रेकमध्ये खालेल्या तळकट वस्तुंनी वजन वाढत नाही...:) पण खरतर जंगल भटकंतीची ती काही और नशा होती..मैलोनमैल पायपीट केली तरी न दमण्याचे ते मंतरलेले दिवस पावसाच्या अस्तित्वाने अविस्मरणीय होत...बाहेर पाऊस आहे आणि त्या दिवसांची आठवण नाही असे कधी होत नाही....

हा रविवारही तसाच मनाला भूतकाळात नेणारा...दुपारी कामानिमित्त बाहेर पडले. ड्राइव्ह करताना अगदी रिपरिप पाऊस सुरु होता आणि मनाचा झोका पावसाच्या थेंबांप्रमाणे हिंदोळे घेत होता...परतीच्या वेळेस पाऊस थांबला होता पण मन उगाच जुन्याच आठवणीत गुंतत होतं. एक विचित्र हुरहुर दाटून आली होती...शेवटी संध्याकाळी आभाळ पुन्हा एकदा दाटून आलं आणि क्षणार्धात टपो-या गारांचा खच घरासमोर पडला....मला उगीच हायसं वाटलं...परत निरभ्र झालेल्या आकाशासारखं...

Wednesday, March 25, 2009

ग्रैंड ओपनिंग

"दिसामाजी काही तरी लिहावे" असा विचार खरं तर अमेरिकेत आल्यापासून मनात घोळतो आहे. पण काही ना काही कारणाने दिस काय गेली पाच वर्षे झाली तरी काही नाही. मागे एकदा माझ्या भटकंतीचा ब्लॉग सुरु केला होता पण आधी लिहिलेले दोन लेख फ़क्त electronically compile केले आणि गाडी तिथेच थांबली. असो !!

आता पुन्हा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा blog सुरु करायचं धैर्य करतेय. बरेच दिवस मनात घोळतंय पण नेमका विषय सुचत नाही. शेवटी लक्षात आलं की मुळात ब्लॉग सुरु करायचं सुचतंय कारण आजकाल मनमोकळ्या गप्पा मारता येत नाहीत. मग ठरलं तर जसं सुचेल, आठवेल तसं लिहायचं यात कदाचित कुणा त्रयस्थाला रस वाटणार नाही पण आपलं आपल्याला मोकळं वाटलं तरी खूप झालं.आठवणींची नोंद होईल ती वेगळी.

दुसरा प्रश्न नावाचा पण यासाठी मला जास्त विचार करावा लागला नाही. आशा भोसलेंची मी जबरदस्त फ़ॅन आणि विशेष करुन "माझिया मना जरा थांबना" हे गाणं जास्त जिव्हाळ्याचं. याची कडवी तर जास्त सुरेख आहेत. कितीतरी कठीण प्रसंगातून तरुन जायची ताकद यातल्या शब्दात आहे. त्यामुळे हेच नाव ठरलं.

हा पहिला लेख लिहायची एक गंमत आहे. इथे सध्या हिवाळा संपून वसंत यायची तयारी सुरू आहे म्हणजे आपला स्प्रिंग हो !! तर या विकेन्डला मस्त सुर्यप्रकाशामुळे जरा आल्हाददायक वाटत होतं. माझ्या समोरच्या घरातील शेजारणी बाहेर गप्पा मारत होत्या. त्यातली एक खुपदा समोरासमोर तरी भेटते पण दुसरीला भेटून वर्ष झालं असावं आणि ही बया एकटी राहते. पन्नाशीच्या आसपास असावी.. म्ह्टलं जरा हाय हॅलो तरी करुया. ती याआधी जेव्हा भेटली होती तेव्हा ती नोकरी गेल्याचं म्हणाली होती. त्यावेळी ती बाजुच्या गावात दुकान काढायचं म्हणत होती. यावेळी मी तिची खुशाली घेताना म्हणाली की मी माझ्या दुकानात सहा दिवस तिच्या शब्दात six days a week काम करते. मग मी सहजच दुकान कुठे आहे तेही विचारलं, त्य़ावेळी ती दुकानाची जागा बदलणार असल्याचं कळलं.

मी शेजारधर्म म्हणून शिवाय ह्या नवीन जागेच्या भागात माझं जाणं होतं म्हणून म्ह्टलं की मी मारीन एखादी चक्कर. यावर ती पटकन म्हणाली well the place is in mess now but the grand opening is in May....पाहिलं याला म्हणतात अमेरिकन ईंग्लिश. हा शब्द मी आतापर्यंत एखाद्या सुपरमार्केटचा एखादा भाग renovate झाल्यावर पुन्हा सुरू होताना, वापरताना खुपदा ऎकलाय. तेव्हाही तो oversize वाटे पण वाटलं कदाचीत सुपरमार्केट असल्यामुळे ठीक आहे पण बघा, छोट्या छोट्या gift itemsचं दुकान किती मोठं असेल? पण opening मात्र grand...

बस्स !!! मग आता सुज्ञास अधिक सांगणे न लगे. माझ्या blogची grand opening झाली आहे आणि ती पण वेळेवर!!! आता यातला grand अमेरीकन आहे की खरा ते हा ब्लाँग मला कसा पुढे नेता येतो त्यावरुन कळेलच पण सुरुवात तर झाली आहे.

काय मजा आहे पहा पुर्वी आपण पाडव्याला नवीन दुकान वगैरे सुरु करायचो आणि आता माझ्यासारखे लोक नवीन ब्लॉग पाडव्याच्या मुहुर्तावर सुरु करायला लागली आहेत. ईंटरनेटचा महिमा दुसरं काय??

माझ्या आजुबाजुला कायम ऊं ऊं करत नाचणारं माझं बाळ आता जरा शांत झोपलं आहे म्हणून सर्व गप्पा आत्तच नाही मारता यायच्या मला. त्याच्या उठल्यानंतरच्या खाउच्या तयारीला लागायला हवं. बघुया दिसामाजी नाही तरी मासी एक दोनदा तरी ईथे चक्कर मारीन म्हणते. बाकी मायबाप वाचकांचा लोभ वाढला तर माझाही ईथला राबता नक्की वाढवेन. तर आतापुरता रामराम.
पाडव्याच्या शुभेच्छा :)