Monday, March 30, 2009

पाऊस

या रविवारी सकाळी उठल्यापासुन बाहेर एकदम कुंद वातावरण आहे. मस्त पावसाळी. अशा वातावरणात मन कसं पटकन मागे जातं कळत नाही....

७ जून किंवा त्या आसपास जो काही सोमवार असेल तो शाळेचा पहिला दिवस आणि त्यावेळी वेळेवर हजेरी लावणारा पाऊस.पावसाळी वातावरणामुळे शाळेचा आलेला कंटाळा.......... पण तरी यावर्षी वर्गशिक्षक कोण असणारची लागलेली हुरहुर. साधारण पहिला आठवडा संपेपर्यंत शाळेची पुन्हा सवय व्हायची पण तरी त्यावेळी पाऊस म्हटला की तो दिवस ठळकपणे आठवे.

शाळा संपल्यानंतर अकरावीसाठी मला रोज माटुंग्याला ट्रेनने जावे लागे त्यावेळी बाहेर पाऊस असताना गाडीच्या डब्यातले ते विशिष्ट वातावरण ईतर वेळी कधी नसे आणि कॅंटीनमधल्या वडापावची बाहेर पाऊस असतानाची वेगळी चव...आई ग्ग.....बारावीनंतर कॉलेज बदललं तरी वड्याचा पाऊस ईफ़ेक्ट बदलला नाही.

मग नंतर जेव्हा जंगल भटकंतीचा नाद लागला तेव्हा मात्र पावसाची वेगळीच नशा चढली.... भारताबाहेर जरी four seasons आणि त्यांचे रंगढंग असले तरी आपल्या इथे जो पावसाळ्यात भटकलाय त्याला हा इथला पावसाचा मधुनच येणारा दिवस नक्कीच nostalgic करुन जातो. इतर वेळी पक्षी शोधत फ़िरणारा आमचा ग्रुप आता मातीच्या सुगंधाची मजा लुटे. बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानातले पायाखालचे ट्रेल्स पण बघता बघता हरवुन जायचे ते दिवस हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म काय सांगु? साधं सिलोंड्यात (हा शब्द असाच वापरायला मजा येते म्हणजे सिलोंडाचा ट्रेल करुया बिरुया नाही तर सिलोंड्यात जाउ या) हा तर साधं सिलोंड्यात ईतकयांदा आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे हरवलोय की बस्स... प्रत्येकवेळी बाहेर आलो की सुटकेचा निश्वास टाकून सर्व जण अगदी पुन्हा कध्धी आडवाटेला जाणार नाही म्हणून शपथेवर सांगत पण पावसाळ्यातली ती हिरवाईची नशा पुढल्या खेपेसही एका नव्या न संपणा-या वाटेवर घेऊन जाई.

सर्वांच्या सवडीने मुंबईबाहेच्या जागीहि जाणे होई. सेंट्रल रेल्वेने जाताना कर्जत गेले की डोळे हिरवे होताहेत की काय असे वाटे. अशा वेळी पुढच्या कुठल्याही स्थानकावर उतरले तरी चालेल असे वाटे....लोहगडचा ट्रेक अशाच एका संध्याकाळी केला होता. मळवलीच्या पुढे पायथ्याशी चालत जाताना पायवाट कशी संपली ते कळलंही नाही; मस्त आल्हाददायक वातावरण होतं. रात्री वरच्या गुंफ़ामध्ये राहून सकाळी वरुन सभोवतालचे हिरवे डोंगर पाहताना आदल्या दिवसाचा शीण कसा सरला ते कळंलच नाही. जंगलातून परतताना मात्र खूप वाईट वाटे...विशेष करुन बोरीवलीच्या जंगलातून बाहेर आलं की लगेचच कॉंक्रिटच्या जंगलात जाताना जास्तच वाईट वाटे....पावसाचे निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेल्या हे क्षण खरंच खूप मौल्यवान आहेत हे आता जास्त जाणवते....

अशा ओल्या भटकंतीत एकमेकांनी आणलेल्या खाऊचा चट्टामट्टा कधी होई कळतही नसे. प्रत्य़ेकाकडे हमखास काही ना काही तळलेला चमचमीत पदार्थ असे. आमचा एक ठरलेला डायलॉग होता की ट्रेकमध्ये खालेल्या तळकट वस्तुंनी वजन वाढत नाही...:) पण खरतर जंगल भटकंतीची ती काही और नशा होती..मैलोनमैल पायपीट केली तरी न दमण्याचे ते मंतरलेले दिवस पावसाच्या अस्तित्वाने अविस्मरणीय होत...बाहेर पाऊस आहे आणि त्या दिवसांची आठवण नाही असे कधी होत नाही....

हा रविवारही तसाच मनाला भूतकाळात नेणारा...दुपारी कामानिमित्त बाहेर पडले. ड्राइव्ह करताना अगदी रिपरिप पाऊस सुरु होता आणि मनाचा झोका पावसाच्या थेंबांप्रमाणे हिंदोळे घेत होता...परतीच्या वेळेस पाऊस थांबला होता पण मन उगाच जुन्याच आठवणीत गुंतत होतं. एक विचित्र हुरहुर दाटून आली होती...शेवटी संध्याकाळी आभाळ पुन्हा एकदा दाटून आलं आणि क्षणार्धात टपो-या गारांचा खच घरासमोर पडला....मला उगीच हायसं वाटलं...परत निरभ्र झालेल्या आकाशासारखं...

15 comments:

 1. छान ब्लॉग आहे."शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी होऊ घातली आहे. अधिक माहितीसाठी http://marathi-e-sabha.blogspot.com/ येथे भेट द्या. सहभागी होण्यास उत्सुक असाल तर shabdabandha@gmail.com येथे लवकरात लवकर संपर्क करा.
  धन्यवाद.
  -शब्दबंध

  ReplyDelete
 2. जमतय बरं कां.. बघा असा वेळ काढायचा म्हंट्लं की निघतोच वेळ. मस्त लिहिता तुम्ही.. सुंदर..

  ReplyDelete
 3. धन्यवाद! वेळ काढते जमेल तसा पण कधीकधी वेळकाढुपणा नडतो.. :)

  ReplyDelete
 4. वाह! भर उन्हाळ्यात मला पावसाने भिजावेसे वाटतेय. कर्जत ची हिरवळ आणि पावासाळ्यात खाल्लेले मक्याचे कणीस आठवले...
  हल्ली पावसाळ्यात आम्ही माथेरान ला हुदंडत असतो.. सगळ्या आठवणी जाग्या केल्यास..

  लेखातला काव्यात्मक वाक्यांचा वापर खुप आवडला. असेच लिहित रहा.

  तोडलसं ग.. :-)


  दिपक

  ReplyDelete
 5. धन्यवाद दिपक. अरे काव्यात्मक वगैरे काही नाही रे....हा माझा रविवार exactly कसा गेला त्याची सत्यकथा आहे...बघ ना गारांचा फ़ोटो एकदम ताजा वाटतो का??? ;)

  ReplyDelete
 6. शेवट एकदम मस्त.
  मला उगीच हायसं वाटलं...परत निरभ्र झालेल्या आकाशासारखं....

  ReplyDelete
 7. धन्यवाद योगेश. आज आपल्या ह्या मतामुळे परत एकदा मी हा लेख वाचतेय आणि अचानक जाणवतय की मी या ब्लॉगवर लिहिलेलं माझं सर्वात लाडकं लिखाण आहे हे..पाऊस आवडतो ना शेवटी काय करणार? आता मुंबईत चालु झाली असेल पावसाची लगबग..

  ReplyDelete
 8. सिलोंडयात ... एकदम ४-५ वर्ष मागे गेलो. ५ दिवस मुक्काम ठोकला होता SGNP मध्ये कैंपसाठी. कसली मज्जा आलेली सांगू.

  तुमचे आधीचे ब्लॉगपोस्ट वाचतोय अधून मधून.. :) लिखाण मस्त. खास करून त्यात जेंव्हा सहजता असते ना ते जास्त भावते... !

  ReplyDelete
 9. धन्यवाद रोहन. काहीकाही गोष्टींबाबत ती सहजता आपसूक येते. आणि बर्याचदा तो अनुभव जुना झाल्यामुळे किंवा अजुन कशाने तरी तसं लिहिणं होत नाही. शेवटी माझी कॅटेगरी फ़क्त एक सिधीसाधी ब्लॉगर हीच आहे. ते लिखाण वगैरे मोठी लोकं करतात ना?? :)
  आपण फ़क्त आठवणींचे कप्पे जमलं तर उलगडायचे. कधीकधी ते स्वतःसाठीचं पण होऊन जातं एक आऊटलेट म्हणून. परक्या देशात आणि कधी कधी मायदेशातही राहुन भावना मांडायचं एक साधन शेवटी...

  ReplyDelete
 10. मस्तच! छान वाटलं लेख वाचून. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. पहिल्या पावसात आवर्जून भिजायला जायचो मी. किंबहुना, आईच म्हणायची, ’पहिल्या पावसात नेहमी भिजावं. घामोळं जातं’ ते कुंद वातावरण, तो मातीचा सुगंध, हिरव्या रंगाने सजलेलीं आणि पाऊस पडल्यामुळे रसरशीत दिसणारी झाडं या सगळ्या गोष्टींमधली मजा या बेगडी आणि कृत्रिम अमेरिकेत नाही...

  ReplyDelete
 11. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 12. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 13. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 14. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 15. धन्यवाद संकेत...खरं तर अमेरिकेत बर्‍याचशा गोष्टी नाहीत या प्रकारात जास्त मोडतात विशेष करुन भारतीय़ांसाठी....तरी इथे आपण अजुन का आहोत हा प्रश्न मला नेहमीच पडतो...:)
  पावसाबद्द्ल तर काय बोलु आणखी? ही माझी खूप आवडती पोस्ट आहे...ज्या रविवारी मी ती लिहिली आहे तो अगदी जसाच्या तशा माझ्यासमोर उभा राहतो...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.