Showing posts with label हलकंफ़ुलकं. Show all posts
Showing posts with label हलकंफ़ुलकं. Show all posts

Tuesday, March 24, 2020

एक सो एक किनारे किनारे

मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकजण सध्या "भय इथले संपत नाही" अशा अवस्थेतून जात आहे. वरवरून कितीही रोजची कामं करत असलो तरी "हे" संपणार कधी याचा विचार डोकवून जाणारच. कदाचीत ही फक्त सुरुवात असेल किंवा हे सगळं एका चांगल्या वळणावर संपायला काहीच दिवस उरले असतील. अशावेळी जेव्हा आपण सक्तीने किंवा स्वप्रेरणेने घरी बसलो असू तेव्हा आपले जुने फोटो चाळताना मला आठवलं जेव्हा आम्ही ओरेगावात नवे होतो तेव्हा पहिल्यांदी इकडचा प्रसिद्ध लँडमार्क "कॅनन बीच"ला गेलो होतो. पहिल्यांदीच समुद्रावर भरपूर कपडे, कोट इ. जामानिमा करून जायची वेळ होती. 

मग एकदा सीप्लेनने हेच सौंदर्य पक्ष्याच्या नजरेनेही पाहण्याची संधी मिळाली.


मुंबई आणि एकंदरीत कोकण किनारपट्टीच्या सवयीमुळे असेल आम्ही दोघे इथल्याही प्रशांत महासागराच्या प्रेमात पडलो यात काही नवल नाही. 

त्यांनन्तर आम्ही या किनाऱ्याला नेहमी भेटी दिल्या. नकाशात पाहिलं तर ऑरेगन राज्याच्या पश्चिमेला वरती वॉशिंग्टन राज्यापासून खाली कॅलिफोर्नियापर्यंत असा भरपूर लांबलचक म्हणजे जवळजवळ ३६३ मैलाचा समुद्रकिनारा लाभला आहे. याआधी प्रशांत महासागर मी हवाई सफरीत पहिला होता आणि त्याच्या तिथल्या निळ्या/कोबाल्ट रंगाच्या प्रेमात बुडाले होते. आता तर अगदी जवळचा बीच मला फक्त ६० मैल आहे म्हटल्यावर तिथे फेऱ्या होणं साहजिकच होतं. 

आमचा पहिला हिवाळा संपल्यावर मग आम्ही मागच्या दशकभरात कितीवेळा गेलो याची गणती नाही. तसाही अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर हायवे १०१ चं बडं प्रस्थ आहे. 

आमच्या भागातल्या एक सो एक अर्थात १०१ च्या किनाऱ्याकिनाऱ्याने केलेल्या सफारीमधले काही जुने-नवे फोटो.

 हे पाहताना मला लवकरच मी यातल्या एखाद्या जागी नक्की फेरी मारून येईन याची खात्री आहे. 



आपल्यापैकी कुणाला ही सफर योग्यवेळ येताच करता आली तर नक्की करा.  



त्यामुळे bundle up आणि अर्थात एंजॉय. 


ही पोस्ट टाकेपर्यंत पाडवा येतोच आहे तर सर्वाना पाडव्याच्या शुभेच्छा आणि ब्लॉगही त्यानिमित्ताने ११ वर्षांचा होतोय याची आठवण. 

#AparnA #FollowMe

Wednesday, February 5, 2020

किर्तीमहल

माझी मावशी परळला आंबेडकर पूल संपतो, साधारण त्या भागात राहायची. माझ्या बालपणीच्या सार्वजनिक गणपती, मुंबईला प्लाझाला झालेला बॉम्बस्फोट, साऊथ मुंबईमधील फिरलेल्या जागा, नेहरू सायन्स सेंटर आणि प्लॅनेटेरियम, माझे रुपारेलमधले दिवस या सर्व आठवणी  या जागेशी खूप संबंधीत आहेत. ती तिथे राहत नसती तर मला वाटतं मला अजूनही मुंबई जितकी आवडते तितकी आवडली नसती.

कधी कधी वेळ मिळाला की मी नील आर्तेचा मुंबई कोलाज वाचते तेव्हा माझ्याही नकळत मी परळच्या त्या चाळीच्या चौथ्या मजल्याच्या समोरच्या बाल्कनीतून खाली वाहणाऱ्या नदीसारखी वाहने पाहत असते. मागच्या दारी उभं राहिलं तर कुठच्यातरी मिलची चिमनी आणि मला वाटतं वरळीच्या आकाशवाणीचा टॉवर दिसायचा. तिथून भन्नाट वारा यायचा. अजूनही येत असेल. गरमीच्या सिझनमध्ये दुपारी दोन्ही दरवाजे उघडे ठेवले की घरात पंखा लावायची गरज नसे. 

मावशी घरी असली की दुपारी तिच्या हातचा ताजा भडंग खायला मिळे. त्यांचं घर शाकाहारी असल्यामुळे जेवणात वरण-भात आणि त्यावर घरच्या तुपाची धार. मला तर खूप पूर्वी सकाळी दुधाचं मोठ्ठ घमेलंसदृष्य नळ असणारं भांड खांद्यावर उचलून प्रत्येक घरी जाणारा दूधवाला भैय्या पण आठवतो. नंतर मग त्या एका चार खणाच्या ट्रेसारख्या हातात धरून नेणाऱ्या काचेच्या बाटल्यात दूध मिळू लागलं आणि मग शेवटी प्लॅस्टिकने पूर्ण जगच व्यापलं. तर ते असो. त्यांच्याकडच्या तुपाला खूप छान वास येत असे आणि ते रवाळ असे. तसं तूप मी इतक्यात खाल्लंही नाही. 

अर्थात घरचं जेवण, भाज्या इत्यादींची चव त्यांच्या कोल्हापूरकडून येणाऱ्या मसाल्यामुळे वेगळी असावी पण काही वेळा संध्याकाळ झाली की माझी मावसबहीण "चल जरा बाहेर जाऊन येऊ या" असं म्हणून मला बाहेरचं खाऊ घाली. आमच्या घरात हा प्रकार फार रुळला नव्हता. आईला सगळं घरीच खायला द्यायची सवय होती आणि तशीही रस्त्यावर खाणे संस्कृती मी राहत असणाऱ्या भागात फार प्रचलीतही नव्हती. 

तसं तर खाली उतरल्यावर उजवीकडे जाऊन सिग्नलला रस्ता ओलांडून परत डावीकडे आल्यावर एक सँडविचवाला मस्त सँडविच बनवीत असे, ते मला आवडत असे. ते किंवा मग आम्ही खाली उतरतानाच वर येणार भेळवाला दिसला की भेळ असं काहीतरी आम्ही खात असू. 

पण माझ्या मावसबहिणीच्या मनात जर काही स्पेशल असेल तर मात्र ती यातलं काही करत नसे. आधी आम्ही आंबेडकर रोडवरच थोडं चालत असू. तिथे खाली फुटपाथवरच व्यवसाय करण्याऱ्या मंडळींकडे थोडा टाईमपास अर्थात विंडो शॉपिंग केली जाई. क्वचित मावसबहीण तिच्यासाठी एखादे कानातले रिंग्ज वगैरे काहीबाही घेई सुद्धा. काही वेळा मावशीने काही काम दिलेही असे, जसे वसईवाल्याकडून भाजी घेणे किंवा आणखी पुढे चालत जाऊन शंकराला हार वगैरे वाहणे, तर ते केले जाई आणि मग आमची पावले आंबेडकर पूल जिथे संपतो (की आमच्या बाजूने सुरु होतो) तिथे वळत. 

डावीकडे गेले तर गौरीशंकरचं प्रसिद्ध दुकान. पण तिथे न जाता समोर रस्ता ओलांडून पुलाच्या उंचीखाली थोडा झाकल्यासारखा दिसणारा, खरं तर तो काही झाकला वगैरे नसणार माझीच उंची तेव्हा कमी असेल, तर तो किर्तीमहल चा फलक दिसे. 

आम्ही दोघी तशा काही अगदी खूपदा तिथे गेलो असे नाही; पण मला आठवतं तोवर मी नेहमीच माझ्या या मावसबहिणीसोबत तिथे गेले आहे. किर्तीमहलला आत गेल्यावर एक वर जायचा जिना आहे. वरचा भाग तेव्हा एअरकंडिशन्ड वगैरे होता का आठवत नाही पण आम्ही खायला वर जात असू. 

माझं बाहेर खायचं तेव्हाचं प्रमाण पाहिलं तर मला काय मागवावं हे सहसा सुचत नसे पण तेव्हा मला फार गोड आवडत नसे म्हणून मी बहुतेकवेळा वडासांबार किंवा मसाला डोसा हे घरी आई न करणारे प्रकार घेई. घरी चमच्याने खाणे वगैरे पण सर्रास नसे त्यामुळे ती हौसही इथे खाताना भागे. माझ्या बाबतीत मी डावखुरी असल्याने मला चमच्याने खाताना  डावा हात वापरावा लागतो पण नेहमीच हाताने जेवायचं तर मला उजवा हात वापरायला शिकवलं आहे. असो तर डाव्या हाताने खायला मिळालं की मला अजूनही आनंद होतो आणि भूकही चांगली भागते असा अनुभव आहे. तर आम्ही दोघी गप्पा मारत हळूहळू खायचा आनंद घेत असू. 

आमच्या या किर्तीमहलच्या मला आठवणाऱ्या भेटींमध्ये जाणवलेली एक गोष्ट म्हणजे ही माझी मावसबहीण नेहमी तिथे दहीवडाच मागवे. दहीवडा कुठल्याही ठिकाणी मागवला की ते त्यांची ती स्टीलची लंबगोलाकार वाटी एका प्लेटमध्ये ठेवून त्याबरोबर टन स्टीलचे चमचे देतात तसंच इथेही देत. तिच्यातला थोडा दहीवडा ती मला चव घ्यायला देई. मी नाही म्हणत नसे पण मला प्रत्येकवेळी ते मिट्ट गोड दही खाताना, ही हा पदार्थ का मागवते असं नेहमी वाटे. मला तेव्हा कधीही दहीवडा आवडला नाही. मला वाटतं ती मला तो कधी तरी आवडेल म्हणून चव घ्यायला देत असावी पण मला इतकं मिट्ट गोड दही खायला आवडेल असं वाटलं नाही. ती आणि मी कधीतरी त्यांची फिल्टर कॉफी शेयर करत असू. (घरी हाही प्रकार तेव्हा दुर्मीळ होता.) 

खाऊन झाल्यावर मात्र कुठेही न रेंगाळता घरी जायचं हा आमचा शिरस्ता होता. मला वाटतं ते गोडमिट्ट दही खाऊन तिला झोप येत असावी आणि मलाही दुपारचा इतका मोठा नाश्ता करण्याची सवय नसल्याने अंग जड होत असेल. दहीवडा आणि किर्तीमहल हे समीकरण मात्र माझ्या डोक्यात फिट्ट बसलं आहे. त्यांनंतर कुणाबरोबर खास दहीवडाही खाल्ला नसावा बहुतेक. 

मग जेव्हा आम्ही ईस्ट कोस्टवरून नॉर्थवेस्टला येत होतो तेव्हा आमची मैत्रीण विजया हिने जेवायला बोलवलं तेव्हा स्टार्टर म्हणून दहीवडा बनवला होता आणि तिने दही अजिबात गोड  केलं नव्हतं.  चटण्या आणि वडाही सुंदर चवीचा. मला वाटतं दहीवड्याबद्दल माझ्या मनात जे काही किल्मिष होतं ते तिने त्यादिवशी दूर केलं. 

परवा फार दिवसांनी मला स्वतःलाच दहीवडा खावासा वाटला. शंभर पाककृती आणि सतराशे साठ टिपा वाचून मला का कोणास ठाऊक किर्तीमहलचे ते दिवस आठवले. तेव्हा आयता मिळाला असता तर नाक मुरडून झालं वगैरेही विचार करून झाले. पण आता काय स्वतः मेल्याशिवाय आपलं बनवल्याशिवाय कोण देणार? 

त्यानिमित्ताने बनवलेला आमच्या घरचा हा दहीवडा आणि या पोस्टमध्ये उल्लेखलेले सगळेच लोकं आता लांब (काहीतर परत न येण्या अंतराइतके लांब)  गेले आहेत त्या सर्व प्रसंगांची आठवण म्हणून ही पोस्ट.

#AparnA #FollowMe

Saturday, November 30, 2019

छोटी छोटी बातें

आज एक बातमी वाचली, नऊ वर्षांपूर्वी एका दहा वर्षांच्या मुलाने अमेरिकतेल्या एका समुद्रकिनाऱ्यावरून एका बाटलीत, एक छोटासा संदेश आणि पत्ता लिहून ती बाटली समुद्रात फेकली. नऊ वर्षांनंतर ती फ्रान्सच्या एका किनाऱ्यावर एका माणसाला मिळाली आणि त्याने पत्रद्वारा संपर्क साधला. आता त्या मुलाचे वय एकोणीस वर्षे आहे. हे पत्र मिळाल्यावर तो मुलगा मानाने पुन्हा दहा वर्षांचा झाला. ते पत्रही तसं भाबडंच होतं. 

माझीही मुलं आता नऊ आणि अकरा वर्षांची आहेत. त्यांच्याशी बोलताना काही वेळा त्यांच्या अपेक्षा किती छोट्या आहेत किंवा एखाद्या प्रसंगात ते कसा वेगळा विचार करतात हे समजतं आणि नकळत हळवं व्हायला होतं. 

परवा आरुषला त्याच्या सेकंड डिग्री ब्लॅक बेल्टच्या प्रॅक्टिससाठी सोडताना विचारलं, " आता ही शेवटची प्रॅक्टिस. उद्या टेस्ट, मग तायक्वांडो संपलं. तुला काय हवं?"  तो निरागसपणे म्हणाला, " आई, उद्या मला स्नॅकसाठी चिप्स देशील?" मी त्याच्यासाठी एखादी सरप्राईज पार्टी करू किंवा त्याला निदान बाहेर जेवायला नेऊ, असा विचार करत होते आणि हा मुलगा माझ्याकडे फक्त चिप्स मागत होता. 

आजकाल काहीवेळा रुषांक आपल्या दादाच्या "दादा"गिरीला कंटाळून असेल एक लहान भावंडं असलं तर बरं असं म्हणतो. त्याच्या बोलण्यात त्याला "भाऊ" हवाय असं दिसतंय. एकदा आम्ही दोघेच असताना मी हा विषय त्याच्याकडे काढला.  तो म्हणाला, "आपल्याला अजून बेबी मिळू शकतात का?" मी हो म्हटलं, पण त्याला सांगितलं की  तुला भाऊच मिळेल असं काही नाही. दोन मुलगे घरात आहेत म्हणजे खरं तर मुलगीच होईल किंवा आवडेल. 

तो थोडा विचारात पडला आणि म्हणाला, " मग आपल्याला आर्या आणि झिनी (या आमच्या एका मित्राच्या जुळ्या मुली) चे कपडे, खेळणी वगैरे घ्यावे लागतील." त्याला आजवर त्याच्या दादाचे, क्वचित इतर ओळखीच्या मोठ्या मुलांचे कपडे मिळतात. (नवेही मिळतात) त्यामुळे आता ही नवी मुलगी वाढवतानाच सोपं उत्तर त्याच्याकडे तयार आहे. मला त्याच्या या चिमुकल्या दृष्टीचं फार कौतुक वाटतं. 

मला वाटतं, आपण मुलांच्या मोठेपणाची तजवीज, त्यासाठीची तयारी वगैरे करणं बरोबर आहे. पण काही वेळा फक्त छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. त्यांच्याबरोबरच्या अशा संवादातली मजा काही और आहे. 

#AparnA #FollowMe


Saturday, July 27, 2019

पाववाला

आम्ही लहान असताना माझी आई आम्हाला बाहेरचं खाणं शक्यतो द्यायची नाही. ऐपतीचा भाग तर होताच पण त्यापेक्षा त्यामागची स्वच्छता वगैरे बाबी पण होत्या. त्यामुळे पावदेखील मी फार कमीवेळा खाल्ला आहे. शक्यतो शनिवार किंवा रविवारच्या दुपारी डोक्यावर काळसर रंगाची ट्रँक घेऊन एक पाववाला यायचा. तो आमच्या चाळीत एका ठिकाणी बस्तान मांडल्यासारखं करून ती उघडली की त्यातले पाव, खारी, नानकटाई इत्यादींचा संमीश्र वास दरवळून जिव्हा खवळून उठे. 

आईला मस्का मारून तिची मर्जी असेल तर मग आम्हाला त्याच्याकडून खरेदी करायला मिळे. मला आठवतं दाताने अजीबात तोडता येणार नाही असा कडक पाव आणि दुसरा अतिशय लुसलुशीत पाव यापैकी एक नगाप्रमाणे त्या दुपारच्या चहासाठी आम्ही घेत असू आणि त्याबरोबर पुढच्या दिवसासाठी खारी किंवा नानकटाई यापैकी काहीतरी वजनावर घेतलं जाई. त्याची ती ट्रँक दोन माळ्याची असे. वरती खारी आणि आतमध्ये नानकटाई तर पाव त्याच्या सायकलच्या मागच्या कॅरियरला लावलेल्या पिवळ्या जाड प्लास्टिकटाईपच्या पिशवीत असत. हे सगळं घेऊन तो वर आलेला असे. जवळजवळ सर्वच बिऱ्हाडं काही न काही खरेदी करत हे त्याला माहित होतं. सर्वांचं झाली की मग तो ती ट्रँक बंद करे आणि मग ते सगळे वासही लुप्त होत. 
मग आम्ही चाळीतून ब्लॉकमध्ये आलो आणि हा पाववाला प्रकार बंद झाला आणि मग सरळ दुकानांमध्ये बेकरीवाल्याने विकायला ठेवलेले पाव, खारी वगैरे अधूनमधून घरी यायला लागली. 

अमेरिकेत आल्यावर जेव्हा केव्हा मी वडा बनवला होता तेव्हा सर्वात जास्त्त मी आपला भारतात मिळणार पाव मिस केला. अर्थात नंतर त्याचीही सवय झाली पण केव्हातरी बेकिंगचा किडा डोक्यात आला आणि आता मुलांना थोडं हेल्थी किंवा घरगुती खाऊ घालण्याच्या निमित्ताने मी आपल्या पद्धतीचा पावही घरी बनवून पाहिला. अर्थात हे खूळ फार दिवस टिकलं नाही पण जेवढे पाव बनवले तेव्हा तो वास  घेताना पाववाला नक्कीच आठवला. 
  
मागच्या विकांताला एक छोटी यर्ट ट्रिप केली. यर्ट म्हणजे छोटा पण मजबूत तंबू त्यात थोड्या बेसिक गोष्टी जसं बंक बेड, साधी गादी आणि मायक्रोवेव्ह व छोटासा फ्रिज असलेलं घर. मग बाहेर ग्रील करण्यासाठी जागा आणि बसायला लाकडी बाक. थोडं बरं कॅम्पिंग म्हणजे अगदी साध्या तंबूत राहायला नको. 

आम्ही राहिलो तिथे सहा यर्ट होते. आमच्या बाजूचा कुटुंब रात्री उशिरा आलं. त्यामुळे तेव्हा फक्त हाय हलो झालं आणि मग कॅम्पफायर आमचं आम्ही करून झोपलो ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठवल्यावर पुन्हा त्यांना पाहिलं. आम्ही घरूनच न्याहारीच्या वस्तू नेल्या होत्या म्हणजे काही बनवायला नको. त्या दुसऱ्या कुटुंबाचं काहीतरी कुकिंग सुरु होत. थोड्या वेळाने बाजूचं एक यर्ट  रिकामी झालं होतं ते स्वच्छ करायला एक माणूस आला. त्याचं काम होत आलं तसं आमच्या शेजारच्या कुटुंबातल्या माणसाने त्याला तुला ब्रेकफास्ट हवा का म्हणून विचारलं. त्या माणसाने नाही म्हटलं. 

मला आमच्या शेजारच्या माणसाचं त्याला आठवणी अन्न द्यायला हवं हा विचार खूप आवडला. मग मी त्याला तसं म्हटलं. त्यावेळी माझ्याबरोबर माझा धाकटा मुलगा पण होता. मग त्याने माझ्या मुलाला विचारलं की मी फ्रेंच टोस्ट बनवला आहे, तुला हवा आहे का? मुलाने हो म्हटलं. त्यावेळी तो सहज म्हणाला की हा पाव मी स्वतः बनवला आहे. हे सांगताना तो इतका उत्तेजित झाला होता की मला ते जाणवलं.  मी एका बेकरीत काम करतो. पहाटे २ ते ८. हा तिथला फेमस सिनामन ब्रेड आहे. माझ्या मुलाला त्याची चव खूप आवडली आणि त्याने ते त्या माणसाला सांगितलं. हे ऐकल्यावर तर तो अजूनच खुश झाला. मग त्याने आम्हाला त्या बेकरीचा साधारण पत्तादेखील सांगितला. 
त्याला पाहून का कोणजाणे मला आमचा पाववाला आठवला. तो पण त्याचे ब्रेड बनवून मग विकायला आणत असे. आम्ही आवडीने पाव घेताना त्याचा चेहरा असा फुलायचा. मला अशी साधी माणसं भेटली की फार आनंद होतो. तसं पाहायला गेलं तर पहाटे दोन वाजता कामावर जायला लागणं हे काही मजेचं वाटत नाही पण त्याला ते येतं  ते तो किती आवडीने करतोय आणि त्याबद्दल अभिमानाने इतरांना सांगू शकतो हे मला भावलं. 
आता पुढच्या वेळी कधी सिनमन ब्रेड घेतला की मला हा पाववाला नक्की आठवेल. 

#AparnA #Followme


Wednesday, March 21, 2018

माझा आवडता पाळीव प्राणी

मुलं रविवारच्या मराठी शाळेला जाऊ लागली त्याचं हे तिसरं वर्ष.सुरुवातीच्या वर्षांत गृहपाठ होता पण तसा आपल्या भाषेत लल्लू-पंजू लिखाण. धाकट्याचा अजून तसा झेपणेबल आहे पण मोठ्यांचा अभ्यास म्हणजे भारतातल्या शाळेच्या तोडीला येईल (आणि त्यामुळे तो या शाळेला रामराम म्हणेल) या पातळीचा.
तर हा अभ्यास करताना ते वरचं कंसातलं वाक्य सार्थक होऊ नये म्हणून या मुलांच्याच भाषेत सांगायचं तर "फन" यावी असं काही शोधावं असं "माझिया मनाने" घेतलं. घेतलं म्हणजे त्यादिवशी  झालेल्या अभ्यास चर्चेत अचानक लक्षात आलं. 
आजकाल त्यांना माहिती लिहा या प्रश्नातर्गत सहा-सात वाक्ये लिहायची असतात. इथे लिहायचं म्हटलं की आमच्या कपाळावर आठी, डोक्यात कंटाळा वगैरे जंत्री झालेली असते आणि त्याच्याशी भाषेचा संबंध नाही. हाच अभ्यास संगणकावर असेल की बाह्या सरसावल्याचं. तर ते असो.
परवाचा विषय होता "माझा आवडता पाळीव प्राणी". आता मुदलात अभ्यास करायचा नसेल तर या वयातला मुलगा पहिलं जे येईल ते ठोकून देणार त्याप्रमाणे एक चिरकलेला सूर कानावर आला,
"आई, मला  पाळीव प्राणी आवडत नाही. त्यामुळे मी त्याच्यावर काही लिहिणार नाही."
आई: अरे पण तुलाच नाही का वाढदिवसाला मासा बक्षीस मिळाला म्हणून मोठ्या हौसेने तेव्हापासून आपल्याकडे फिश टॅंक आहे. प्राणी आवडत नाही काय? 
आरुष: तो प्राणी नाही आहे. प्राणी म्हणजे कुत्रा वगैरे. 
आई: पाळीव प्राण्यामध्ये मासा येतो. इंग्लीशमध्ये पेट आहे त्याचा अर्थ. आता मासा पण आवडत नाही का? मग का बरं मागच्या महिन्यात चार मासे मेले तेव्हा भोकाड पसरलं होतं?
आरुष: हा म्हणूनच. 
हे म्हणजे मीच हातात कोलीत दिल्यासारखं. आता त्या माशाच्या आठवणीने पुन्हा भोकाड वगैरेंच्या भानगडीत तो अभ्यास राहून जायला नको म्हणून मी विषय बदलणे भाग होतं. तेव्हा हा "फन"चा विचार माझ्या डोक्यात आला. आणि सहज म्हटलं तुला नाही आवडत प्राणी न? मग का नाही आवडत त्यावर लिही. आता समोर गोंधळ. म्हणजे इथे व्यक्तीस्वातंत्र्याच्या देशात आम्ही विषय दिला मग तुम्ही त्यावर काही लिहाच असा काही रूल नसावा असं मला वाटलं म्हणून मी त्या झेंड्याला मनात सलाम करून थोडी गंमत करावी म्हणून त्याला चल मी मदत करते आणि खालील माहिती फायनल केली. 

                                   माझा आवडता प्राणी 

मला प्राणी आवडत नाहीत. प्राण्यांमुळे आई-बाबांना सगळ्यात म्हणजे त्यांना विकत आणायला खूप पैसे द्यावे लागतात.  ते आजारी पडले की आणखी खर्च येतो. प्राण्यांचे केस वगैरे घरात पडले तर खूप साफसफाई पण करावी लागते. घरातल्या माणसांना ऍलर्जी होते आणि मग त्यांना पण डॉक्टरांचा खर्च येतो. आजकाल तर प्राण्यांना ऑरगॅनिक वगैरे महागडी जेवणं देऊन तिथेही खूप पैसे द्यावे लागतात. अशा प्रकारे खूप कामं वाढतात. म्हणून पाळीव प्राणी मला आवडत नाही. 

खरं तर हा निबंध अशा प्रकारे खूप वाढवता आला असता पण लिहिणारी व्यक्ती सात-आठ वाक्यांच्या पुढे आईला जाऊ देईना आणि शिवाय हसूही आवरेना म्हणून आम्ही शेवटी थांबलो. 



नंतर काही वेळाने "लिहा रे, लिहा रे" जा बराच वेळ गजर करून झाल्यावर स्वारी खरंच हा निबंध लिहिणार होती. पण आईने बरीच पटवापटवी करून शेवटी एका इमॅजिनरी मांजरीला हाताशी धरून तो गृहपाठ सार्थकी लावला. 

   


Monday, February 13, 2017

कांच पे दिल आ ही गया

सध्या सगळीकडे दिलाची चर्चा सुरु झालीय. फेब्रुवारीमध्ये जर दोघांचा एकत्र फोटो टाकला नाही तर फाऊल मानला जातो म्हणून एक दिवस आधीच आमचा फोटो प्रोफाईलला लावायचं प्रथम कर्तव्य मीदेखील पार पाडलंय. पण यार हे एक दिवसाचं आणि एकाच प्रकारचं प्रेम वगैरे मानणारी माझी पिढी नाही.

भटकंती हे माझं खरं प्रेम आहे (एकटीने आणि त्याच्याबरोबर देखील :) ). एकेकाळी (म्हणजे अगदी मागच्या वर्षापर्यन्त) फिरस्तेगिरी करता करता खरेदी हे पण एका बाजूला प्रेमाने करत होते. आता अचानक विरक्ती वगैरे आली नाही पण काही कारागीर जी काही कला निर्माण करून ठेवतात, त्याला आपण कितीही पैसा दिला तरी त्यांची बिदागी देऊ शकत नाही असं काहीवेळा वाटायला लागलं. अशावेळी एक मधला मार्ग मिळाला तो म्हणजे त्यांच्या अनुमतीने त्या कलेचे फोटो काढायचे आणि शॉपिंग वगैरे करायचं वारं शिरलं तर सरळ फोटो पाहत बसायचं.

आज असेच जुने फोटो पाहताना आमच्या पहिल्या अलास्का फेरीमध्ये एका बंदराला जहाज लागलं तिथे एक छोटी टूर केली होती त्यातल्या एका थांब्याजवळ एक कलादालन होतं. तिथे मिळालेले हे काचकलेचे काही नमुने. हे संपूर्ण दुकानच घेऊन घरी जावं इतके सुंदर आकार आणि रंग त्यांच्याकडे होते. नंतर आमच्या ओरेगावच्या समुद्रकिनारी ग्लास ब्लोईंगचं प्रात्यक्षिक पाहताना हे महाकठीण काम आहे हे लक्षात आलं.

तर अशी ही कला आपण काय पैसे देऊन विकत घेणार? त्या गरम भट्टीत डोकं थंड ठेवून काम करणाऱ्या कलाकारांसाठी व्हेलेंटाईन दिवसही कामाचा असणार. मी मागे एक काचेची बाटली पुन्हा चेपवून त्यावर मणी वगैरे लावून सजवलेलं ताट विकत घेतलं होतं; जे घरच्या साफसफाईत तुटलं. त्यानंतर मी मनमोकळेपणाने अशा चित्रांचा आधार घेते. यात एक ट्रेनचं एक अतिशय सुंदर ग्लास मॉडेल सहाशे डॉलरला पाहिलं तर मी फोटो का काढते हा प्रश्न कुणी मला नक्कीच विचारणार नाही. हजारो ख्वाहिशें मधली ही स्वतः ग्लास ब्लो करायची ख्वाईश ते प्रात्यक्षिक पाहिल्यावर लगेच विरून गेली हे वेगळं सांगायला नकोच.

तर माझ्या काचेवरच्या प्रेमाखातरची, प्रेमदिवसाच्या निमित्ताने आठवलेली ही चित्रगंगा. आखिर कांच पे दिल आ ही गया. यंजॉय :)












#Aparna #FollowMe

Saturday, August 13, 2016

संधी

मुलं जसजशी शाळेची भाषा शिकायला लागतात तसा त्यांचा मातृभाषेशी संपर्क कमी होतोय असं सध्या जाणवतंय. अर्थात त्यात त्यांचा किंवा आमचा कुणाचाच दोष नाही. त्यांच्या आसपास सध्या घरी सोडून इतरत्र मराठीचं वातावरण नसल्याने यावर फार काही उपाय नाही. घरी फक्त कानीकपाळी "मराठी बोला रे"चा ओरडा करणे हे मात्र आम्ही दोघ मायेने (?) करतो. 

त्यादिवशी घरी खेळायला एक मित्र असताना आमच्या संभाषणात थोडा ओरडा खायची वेळ आली तशी उगाच दया येऊन तेवढा एक भाग मी आरुषबरोबर मराठी मध्ये बोलले. शिवाय त्याच्या मित्रासमोर तो ओरडा खातोय हे मित्राला कळू न द्यायची दखल मी घेतेय हे सांगायला मी काही विसरले नाही. तेव्हा त्याला अर्थातच ते मी काही वेगळं किंवा त्याच्या फायद्याचं करतेय असं काही वाटलं नाही.

हा जो त्याचा मित्र आहे त्याची भारतीय वंशाची आई माझ्याच मुलांसारखी इथे वाढलेली आहे आणि बाबा अमेरिकन. या जोडप्याची आणि पर्यायाने त्यांच्या घरचीच भाषा इंग्रजी. त्याची आई केव्हातरी लहानपणी मातृभाषेत रस न दाखवल्याचं दुःख करते. तिला अर्थातच फक्त इंग्रजीच येते. 

काल अचानक याच मित्राची आठवण घरी कशावरून तरी निघाली आणि एकदम आरुषला हसायला आलं. मी विचारलं तेव्हाचा आमचा छोटा संवाद.
आरुष:   आई मी त्यादिवशी थोरिनच्या घरी गेलो तेव्हा त्याची आई त्याला एकदम जोरदार ओरडली.
मी:         बघ म्हणजे सगळे ओरडतात. (मी आपलं त्यातल्या त्यात स्वतःला जस्टीफाय करायचं सोडलं नाही)
आरुष:   हो सगळे ओरडतात (हेखिक्ककरून आणि दात दाखवून) पण थांब त्यात एक गम्मत झाली.
मी:         काय? (मनातल्या मनात एक धपाटा पण देतात का काय इथले पालक?)
आरुष:   ती ओरडली आणि मला सगळं कळलं कारण ती सगळं इंग्लिशमध्ये बोलत होती.
मी:        ओह
इथे दोघ पण मोठा पॉज.
आरुष:  आई तू तिला तिच्या मुलाला त्यांची भाषा शिकवायला सांगशील का? म्हणजे त्यादिवशी तू तो आपल्याकडे आला तेव्हा त्याला कसं कळलं नाही माझी आई मला ओरडते तसं मला पण कळणार नाही.

अर्थात घरी मराठी बोलायला हवं या माझ्या जुन्या कॅम्पेनला मार्केट करण्याची संधी काही मी सोडली नाही. तूर्तास घरी सगळ्यांनी विशेषतः शेंडेनक्षत्राने देखील आपसात मराठी बोलायचा फतवा आपोआप निघाला आहे. अर्थात लहान मूल आईबाबाने रागवलेलं जसं विसरतं तसं आणखी काही दिवसांनी इथल्या उन्हाळाच्या सुट्ट्या संपतील आणि शाळा सुरु झाली की हा फतवा विसरला जाईल हे भय आहेच. 



Sunday, January 31, 2016

फ्रोजन

नवीन वर्ष ओरेगावात उजाडलं तेव्हा आम्ही सुशेगात कुणाच्या तरी दर्याकिनाऱ्याच्या (भाड्याच्या) बंगल्यात मित्रमंडळींसोबत थंडीतला सुर्याचा थोडाफार उबारा अनुभवत होतो. तसं पाहिलं तर एकदा का सप्टेंबरचा पहिला आठवडा गेला की जून किंवा जुलैपर्यंत अनऑफिशियली इकडे हिवाळाच आणि तोही संततधार पावसाचा चिल्ड विंटर. पण नेमकं कोस्टल वेदर सनी असण्याचा फायदा आम्हाला घेता आला. 



दृष्ट लागणारे सुर्यास्त पाहून १ तारखेला रात्री घरी पोहोचलो आणि रविवारी जिमला जायला दरवाजा उघडला तोच बर्फाची चादर. तसंही सुट्टीवरून आल्याआल्या बाहेर जायचा फार उत्साह होताच असंही नाही आणि हे निमित्त मिळालं. 

त्यानंतर सोमवारी शाळा बंद आणि मंगळवारी निसरडे रस्ते म्हणून शाळा उशीराने उघडणे वगैरे प्रकारात २०१६ अगदी वाजत गाजत आलं असं म्हणायला हरकत नाही. मागच्या आठवड्यात आमच्या पूर्वीच्या मुक्कामी "जोनास" येउन गेला त्यापुढे इकडे खरं तर अगदीच फुटकळ बर्फ म्हणायचा पण यावेळी जरा विंटर ब्रेकमुळे मुरलेला निवांतपणा असल्यामुळे असेल थोडा निसर्गाचा आनंद जास्तच लुटला. दोन दिवस आमचाही गाव फ्रोजन होता त्यातली काही क्षणचित्रे. 
 




 

 
या अशा हवामानाला चहाची जोड तर हवीच. याच सुट्टीत आपुलकीने घरी येऊन गेलेल्या मैत्रीची आठवण या कपमध्ये मावेल का बरं :)

 

Wednesday, December 31, 2014

चले चलो

खरं मला या पोस्टचं नाव hibernation द्यायचं होतं पण त्याचा मराठी अर्थ निष्क्रियता आहे हे पाहिल्यावर तो विचार रद्द केला. निष्क्रिय या शब्दा मध्ये जो ढिम्मपणा आहे तो मनात आणलं तरी प्रत्यक्षात आणणं कठीण इतके आपण परिस्थितीने बांधले असतो. माझं जाऊदे, माझ्या आसपासच्या सत्तरीतल्या पालक मंडळींना पाहिलं तर तर तेही नुसतेच बसून राहिलेत असं क्वचितच दिसतं. 

तर असो. सांगायचा मूळ मुद्दा पूर्ण विसरायच्या आधी हेच म्हणायचं होतं की या वर्षी जसा छान वसंत आणि मग थोडा वाढीव उन्हाळा मिळाला, इथवर सगळं कसं चांगलं सुरु होतं. नुसतं विकेंड टू विकेंडच्या ज्या सगळ्या ट्रिपा केल्या त्याबद्दल लिहायचा पेशन्स असला तर हातून बरीच प्रवासवर्णनं लिहून झाली असती आणि त्यांची आठवण संग्रहीत राहिली असती. बघूया आता पुढच्या वर्षी या जुन्या ट्रिप्सबद्दल काही खरडता आलं तर. 
पण मग पानगळती सुरु झाली आणि नेहमीचेच छोटे छोटे प्रश्नदेखील मोठे वाटू राहिले. उगीच होणारी चिडचिड स्वतःलाच त्रास देऊ लागली. ऑफिशियली हिवाळा एकवीस डिसेंबरनंतर येतो पण इकडे आधीच त्याचा इफेक्ट येऊ लागला.  

 त्या दिवशी एक अस्वल थंडीत झोपून राहतं आणि बाकीचे प्राणी त्याच्या गुहेत येऊन मज्जा करून जातात अशा अर्थाची एक बालगोष्ट वाचून  झाल्यावर असंच आपण पण हायबरनेट करावं असा विचार मनात आला. थंडी इतकी कडाक्याची आहे की कामासाठी बाहेर पडूच नये, तिकडे कोणाचं काय सुरु असेल आपल्याला काय त्याचं, तिकडे कशाला आपल्याच घरात काही मज्जा सुरु असतील तरी आपण त्याचा भाग न बनता सरळ त्या अस्वलासारखं ढिम्म झोपून राहावं असं या थंडीने किंवा त्यामुळे येणारे आजार आणि इतर कटकटींमुळे झालंय. तरीदेखील एक उडी थोडं साऊथला मारून आलोय आणि मग पुन्हा आजारांची रांग मार्गी लावतोय. या परीस्थितीत एक मोठा आरामाचा कार्यक्रम तर हवाच. 

अर्थात असं काहीही वाटलं तरी प्रत्यक्षात जास्तीत जास्त तासभर स्वतःच्या दुखण्यांना देऊन आपण सावरतो. हा थोड्या वेळचा चढ आहे पुन्हा उतारावर आपलीपण गाडी लागेल ही आशा असते आणि तसंही हायबरनेट करायची सोय नाही हे वास्तव आहेच. 

आम्हाला शाळेत या दिवसात शनिवारी आमचे ड्रीलचे सर एक दो एक दो करायला लावायचे. आज ही पोस्ट लिहिताना जरा मागे ब्लॉगकडे लक्ष दिलं तेव्हा लक्षात आलं. या वर्षी महिन्यांची अनुक्रमणिका पहिली तर अगदीच एक दो, एक दो आहे एखादवेळेस तीन. बाकी, प्रकार बदल, वगैरे काही नाही. म्हणूनच सुरुवातीला लिहिताना ब्लॉग पण निष्क्रिय झालाय का असा विचार करत होते. पण या एक दो, एक दो मध्येच पुढे चालायचं बळ  मिळेल असं वाटलं. छोटी छोटी पावलं का होईना पण हालचाल आहे. म्हणून हे स्वतःचं स्वतःला सांगणं की चले चलो.

उद्या दिनदर्शिका बदलायची तर त्याचं स्वागत निष्क्रिय शब्दाने करण्यापेक्षा "चले चलो". शुभेच्छा तर सर्वांसाठी आहेतच. Welcome 2015 आणि जाता जाता २०१४ मधल्या काही महत्वाच्या भटकंतीचं हे कोलाज.