Showing posts with label मैत्री. Show all posts
Showing posts with label मैत्री. Show all posts

Wednesday, March 8, 2017

ती आणि मी

जसजसं वय वाढतंय तसतसं काम करायची शक्ती वाढावी म्हणून जमेल तसं जिममध्ये जायचा मी प्रयत्न करत असते. जेव्हा सकाळी कामावर लवकर उठून जावं लागे तेव्हा घरची जबाबदारी बाबावर टाकून अगदी सहा वाजतादेखील मी तिथे दाखल झाली आहे. अशावेळी जायचा मुख्य फायदा म्हणजे जवळजवळ कुणीच आलेलं नसतं. आपली गाण्याची प्लेलिस्ट मोठ्याने लावली तरी डोळे मोठे करणारं कुणी नसणार असतं. किंवा शांततेनं दिवसाची सुरुवातही करता येते.

माझ्या वेळेत थोडंफार इथं तिथं होई. पण बरेचदा माझं आटपेस्तो एक तीन चार जणींचा ग्रुप धावून परत लॉकर रूममध्ये मला भेटे. माझी त्यांची ओळख हाय हलोच्या पुढेही गेली. पाश्चात्य देशात लॉकररूममध्ये दिगम्बर अवस्थेत या ग्रुपला पाहताना मला खर तर आता नजर मेल्यामुळे म्हणा किंवा इतका व्यायाम केल्यावर थोडा वेळ असाही काढला म्हणून काय त्यात याची सवय झाली असल्यामुळे म्हणा काही गैर किंवा लाजिरवाणं वगैरे वाटत नाही. उलट आपल्या शरीराला इतकं आपलंसं म्हणून सहज वावरणाऱ्या या बायका मला  योग्य वाटतात.
माझ्याशी त्यांच्यातली एक नेहमी बोले. नेहमीचंच रुटीन बोलणं पण तिने मला तिथे त्या पाचेक मिनिटात एकटं पडू दिलं नाही. आम्ही सर्व त्या क्षणापुरता एकमेकींच्या मैत्रिणी होत असू. या मैत्रीला आणि आम्हाला नावाची गरज नसे.

मागच्या वर्षी मी मध्ये एक वेगळं जिम सुरु केलं होतं. तिथला योगाभ्यास मला आवडत असे फक्त हे जिम थोडं महाग होत आणि नंतर कॉस्ट कटिंगच्या आमच्या दिवसात आम्ही पुन्हा जुन्या जिमवर सेट झालो. तर तिथे एका योग करताना मला "ती" दिसली. साधारण ५५ च्या आसपास वय असेल पण शरीरयष्टी कमनीय आणि योग करतानाचा फिटनेसही अगदी बरोबर. आम्ही हसलो पण तिने नक्की मला ओळखलं का हे मला माहीत नव्हतं. तसंही येत जात कितीतरी अनोळखी व्यक्ती सहजगत्या हाय करून जातात म्हणा.

मग माझं ते जिम सुटलं आणि सकाळी जिमला जायची वेळी मी थोडी उशिरा केली म्हणजे मुलांबरोबर वेळ मिळेल. त्या दिवशी मी थोडी लवकर आणि "ती" थोडी उशिरा असा एक योगायोग आला. मग मी तिला त्या जुन्या जीबद्दल विचारून माझा जुना प्रश्न निकालात काढला. तिने मला तिथेही ओळखलं होत आणि तिनेही काटकसर करायच्या दिवसात ते जिम सोडून दिलं होतं. आज त्यांचा मोठा ग्रुप नव्हता आणि लॉकर रूममध्ये आम्ही दोघीच होतो.

तिला बोलताना दिगंबरावस्थेत जास्त मोकळं वाटत असावं त्यामुळे बोलता बोलता ती माझ्या जवळ आली आणि माझे डोळे एकदम उघडले. तिचे दोन्ही स्तन रोपण केलेले होते. जगाचं आणि बरेचदा स्त्रीचं सुद्धा ज्या अवयवामुळे जास्त लक्ष वेधलं असतं तिला ते नव्हतंच. ते स्वीकारून तिने ज्या उमेदीने बाकीच्या शरीराच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं होतं त्याला मी मनातल्या मनात सलाम केला.

याआधी या संपूर्ण गृपबद्दल वाटणारा अभिमान आज काकणभर जास्त वाढला. अशा कितीतरी स्त्रिया ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करत असतील आणि तरी आपलं रोजचं रुटीन टिकवत असतील. त्यांनी शरीर झाकलं की आपण त्यांना नॉर्मलच समजून त्यांच्याशी वागतो, तुलना करतो. कधीतरी आपण कपड्याआतली त्यांची वेदना पहिली तर त्यांचे हसरे चेहरे आपल्याला बरंच काही शिकवून जातील.


आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त  "ती" आणि अशा अनेक स्त्रियांना माझे कोटी कोटी प्रणाम.
 

Sunday, August 2, 2015

गाणी आणि आठवणी १९- यारों, दोस्ती बडी ही हसीन है

आज पुन्हा एकदा जागतिक मैत्रीदिनाचा रविवार. खरं तर जवळजवळ  संपतच आला आणि आताच्या ऑनलाईन जगात प्रत्यक्ष भेटणारे मित्र -मैत्रीण कमी झाल्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाणही न बोलता. अर्थात यामुळे काही फरक पडत नाही . कारण जे बंध जेव्हा निर्माण व्ह्यायला हवे होते, ते एकदा निर्माण  झाले की मग अंतराने तसा काही फरक पडत नाही. आज खूप दिवसांनी कॉलेजच्या वर्षांमध्ये ऐकलेलं केकेच्या आवाजातलं "यारो, दोस्ती बडी ही हसीन है" लावलंय. 

तेरी हर एक बुराई पे डांटें जो दोस्त 
गम की हो धूप तो साया बने तेरा वो दोस्त 
नाचें भी वो तेरी खुशी में 
अरे यारो दोस्ती बडी ही हसीन है 
ये न हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है?

मला नाही वाटत मैत्री इतक्या सोप्प्या शब्दात कुणी समजावली असती. केकेचा सुरेल आवाज आणि लेज लुईसने गिटारच्या कॉर्ड्सवर डोलायला लावतानाच अंतर्मुख करणारं संगीत. यातला हा वर लिहिलेला मैत्रीचा भाग मला तेव्हा फार भावला होता आणि आज तोच भाग चटका लावून जातो. 

कॉलेजच्या वगैरे काळात अशी मैत्री मोप मिळाली. मैत्रीत खाल्लेला आणि दिलेला ओरडा याचा कधी कुणी हिशोब ठेवला नाही. माझ्या अभ्यासाताल्या पडत्या काळात माझ्यामागे उभ्या राहिलेल्या माझ्या मैत्रिणी आता सगळीकडे विखुरल्यात. या कडव्यात त्या पुन्हा मला एकत्र भेटतात. 

कामाच्या सुरुवातीच्या वर्षात त्रास झाल्यावर मग चांगल्या कंपनीत नोकरी मिळाल्याचा आनंद स्टेशनवरच उड्या मारून साजरा करणारा माझा मित्र मला या गाण्यामुळे उजवीकडून जाणाऱ्या गाडीसकट तसाच आठवतो. अजूनही आता न दिसणाऱ्या या उड्या आनंदवार्ता कानावर आली की दिसतात. 

फक्त जवळच्या मैत्रीबरोबर जोडले जाणारे अनेक क्षण या गाण्यामुळे डोळ्यासमोर रांग लावतात. तसं पाहायला गेलं तर अर्ध आयुष्य संपल्यात जमा आहे. आजवरच्या प्रवासात जी माणसं मैत्रीमुळे जोडू शकले, ती नसती तर खरच, क्या फिर बोलो ये जिंदगी है??




Monday, April 27, 2015

ज्युली आणि मी

"ही व्यक्ती अपघातानेच माझ्या आयुष्यात आली", असे त्या वाक्याच्या शब्दश: अर्थाने कुणाबद्दल म्हणायचं असेल तर मी ज्युलीचं नाव घेईन. माझी आई जमेल तेव्हा मला सकारात्मक रहा म्हणते. म्हणजे थोडक्यात काय, तर वाईटात पण चांगलं काय असेल ते पहा. तसं मी मागे २०१३ मध्ये मला झालेल्या कार अपघाताकडे त्रयस्थ नजरेने पाहते तेव्हा मला माझी त्या निमित्ताने झालेली ज्युलीशी भेट आठवते. 

या अपघातानंतर माझं मुळात असलेलं कंबरेचं दुखणं अधिक वाढलं तेव्हा मला माझ्या डॉक्टरने फ़िजिओ थेरपीबरोबर थेरॅप्टिक मसाज घ्यायला सांगितला आणि मग त्यासाठी योग्य व्यक्ती शोधताना एका क्लिनिकमध्ये जायला लागले. मला त्यावेळी जितक्या वेळा जावं लागे त्यामुळे प्रत्येकवेळी वेगळी थेरपीस्ट भेटे. असं करताना एक दिवस मला ज्युलीची अपाँइटमेंट मिळाली आणि मग मी अजून एक तिची स्वतःहून मागून घेतली मग नंतर लक्षात आलं की माझ्यासारखे असे तिला आधीच बुक करणारे बरेच लोकं आहेत मग तिलाच म्हटलं की मला तुझी अपाँइटमेंट हवी असेल तर काय करू आणि मग तिनेच मला सकाळी सातची  अपाँइटमेंट द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे ती करून मग मला कामावरही वेळेवर जायला बरं पडे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे अपघाताने का होईना पण ज्युली माझ्या आयुष्यात आली.

उंचीने साधारण पाच फूट सहा इंच वगैरे आणि हाडापेराने मजबूत. थोडा पसरट पण सदैव हसरा चेहरा आणि ज्या सर्विस इंडस्ट्रीमध्ये ती आहे तिथे काम करणारे, मी आजवर पाहिलेले अमेरिकन असतात तशी टापटीप राहणारी. चेहरा खूप छान रंगवलेला पण तरी तो रंग अवास्तव न होता जितकं प्रसन्न तिने दिसायला हवं तितकाच परिणाम साधणारा. ती साठीकडे येतेय हे तिने सांगितलं म्हणून मला कळलं नाही तर मला ती पन्नाशीच्या आतबाहेरच वाटली असती. तिचं बोलणं नीट कान देऊन ऐकलं की तो टिपिकल सदर्न अनुनासिक टोन अगदी थोडासा जाणवतो. त्याबद्दल कधीतरी बोलताना तिने ती  टेक्ससमध्ये मोठी झाल्याचं सांगितलं आणि ओरेगावात आल्यानंतर ते उच्चार गेल्याचं पण तिथले नातेवाईक जमले तर पुन्हा तश्या सानुनासिक उच्चारात बोलू शकत असल्याचं सांगायला ती काही विसरली नाही. आणि गंमत म्हणून प्रात्यक्षिक दाखवायला पण ती लाजली नाही. मी त्यावर मनमुराद हसले होते. 

तिच्याबरोबरची पहिली भेट वगैरे ठळक आठवत नाही आणि त्याचं मूळ कारण तेव्हा मला होणाऱ्या वेदना हे असू शकेल. पण नंतर जसं दुखणं कमी होत गेलं तसं आमच्या भेटी म्हणजे दुखण्यावरचे उपाय आणि त्याबरोबर थोडी निर्हेतुक मैत्री असा संगम असे. तोवर माझ्या दुखण्याची तीव्रता आणि त्यासाठी कधी कुठे जास्त जोर जास्त स्ट्रेच दिला पाहिजे हे तिला मी न सांगता कळायला लागलं होतं. त्यादिवशी जसं सेशन असे त्याप्रमाणे सुरुवातीला आमचं बोलणं होई मग ती माझ्यावर काम करतानाही विषय निघाला तर थोडा संवाद होई आणि मग निघायच्या आधी तिला आणि मला वेळ असेल तर तेव्हाही थोडी चौकशी.
इतर अमेरिकन लोकांना साहजिक वाटणारी भारताबद्दलची कुतूहलता किंवा मी इथे का आले/काय करते हे नेहमीचे विषय होते तसेच आपापल्या व्यवसायातले काही प्रश्नदेखील आमच्या बोलण्यात येत.गवत दुसऱ्या बाजूने कसं नेहमी हिरवं दिसतं हे नव्याने कळून घेताना कुठेतरी आमच्यातले बंध घट्ट होत होते.   

मला आठवतं तेव्हा एडवर्ड स्नोडेन चा विषय ताजा होता आणि त्याने नुकताच इतर देशात आसरा  घेतला होता. माझ्या दुखण्यावर काम करताना मी अगदी स्वतःहून विचारलं नव्हतं पण बहुतेक कुठेतरी अमेरिकेची नागरिक म्हणून ती  दुखावली गेली होती आणि माझ्या सारख्या  त्रयस्थ व्यक्तीकडे तिला त्या दिवशी व्यक्त व्हावंसं वाटलं. ती म्हणाली "All these years I used to hear that people from other countries think about Americans as Saitans and now looking at what Edward Snowden is saying looks like we are really cruel and our country people had hidden a lot of truth from us. I feel so ashamed of being an American." 

मला माहित आहे त्या दिवशी ती असं म्हणाली म्हणून काही तिचं तिच्या देशावरचं प्रेम कमी होणार नाही; पण त्याचवेळी तो रागही तिने कुठल्याही सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे व्यक्त केला. बरेचदा आपला देश म्हणजे आपलं सगळचं चांगलं, असं निदान दुसऱ्या  देशाच्या लोकांसमोर तरी आपण बोलतो पण तिने तिचे हे विचार माझ्याकडे व्यक्त केले तेव्हा  ती माझ्यासाठी व्यक्ती म्हणून खूप मोठी ठरली. मला वाटतं मी खूप पुस्तकं वाचली आणि त्यांनीही मला खूप शिकवलं पण भावनेच्या उद्रेकात आपण आपल्यातल्या वाईट गोष्टीला कसं तोलावं हे समजवायला मला ज्युलीने मदत केली. 

आम्ही इतक्या विविध विषयांवर बोललो आहोत की त्यातलं आठवून लिहायचं तर दर महिन्याला एक पोस्ट फक्त ज्युली या एकाच व्यक्तीवर लिहावी लागेल. पण तरी त्यातल्या काही निवडक सांगितल्याशिवाय ज्युली कळणार नाही. 

तर माझी ट्रीटमेंट सुरु झाली जूनमध्ये म्हणजे इकडचा घरगुती भाज्या लागवड करणे, जोपासणे थोडक्यात बागकामाचा सिझन. तिच हे घर नवीन होतं. म्हणजे तिचा हे सगळं करण्याचा हा त्या घरातला पहिला सिझन. गम्मत म्हणजे माझंदेखील माझ्या या घरातलं हे पहिलंच वर्ष. त्यावर्षी पहाटेची थंडी आणि थोड्याफार फ्रोझन रात्री अजून संपल्या नव्हत्या. तेव्हा मला कुठलीच appointment मिळत नव्हती म्हणून बुधवार सकाळी सातची वेळ तिने माझ्यासाठी निश्चित केली होती. माझ्यासाठी ती इतक्या सकाळी येउन क्लिनिक उघडत असे. मी पण लवकर निघून वेळेवर पोचत असे कारण पैसे घेऊन का होईना पण कुणी त्याची सर्विस माझ्यासाठी देतोय ही माझ्यासाठी मोठी बाब होती. त्यावेळी तुला लवकर उठावं लागत असेल न असं मी विचारलं तेव्हा ती म्हणे लवकर मला तसं पण उठावच लागे आणि थंडीत बाहेर जाऊन हमिंगबर्डचं खाणं ठेवावं लागतं नाही तर आता मी इथून परत जाईपर्यंत ते उपाशी राहतील आणि मी रात्रीच त्यांचं भांडं भरून ठेवलं तर ते फ्रीज होऊन जाईल. हमिंगबर्ड फीडर माझ्याकडे पण आहे पण तोवर हा फ्रीज व्हायचा मुद्दा माझ्या लक्षातच  आला नव्हता. 

मग कधीतरी तिचं बागकाम, घर इ. बद्द्ल विषय निघाला होता तेव्हा तिने मला आवर्जून सांगितले होते की या इकोनॉमीमध्ये ती हे घर विकत घेऊ शकली कारण तिचे वडील जाताना तिच्यासाठी त्यांचं सगळं ठेवून गेले. मी नेहमी माझ्या आई वडिलांबरोबर चांगलं वागायचा प्रयत्न केला आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी सांभाळून त्यांच्याकडेही लक्ष देत गेले पण तरी त्यांनी इतकं माझ्यासाठी करावं हे काही मी धरून चालले नव्हते, हे तिचं मत, वाडवडील त्यांचं सगळं आपल्यासाठीच ठेवायला जन्माला आले आहेत अशा संस्कृतीत वाढलेल्यांना समजायला कठीण जाईल पण  ज्यांची कर्मावर श्रद्धा आहे त्यांना तिला काय म्हणायचं आहे हे लगेच लक्षात आलं असेल. ती एकंदरीत कर्मवादी आहे आणि तिचं काम ती केवळ पैसा या एकमेव उद्देशासाठी करत नाही हे मला तिच्याबरोबरच्या काळात खूप वेळा जाणवलं. 

तिचा एक भाचा त्याच दरम्यान आमच्या बाजूच्या राज्यात शिकायला आला होता. त्याला तिने आवर्जून thanksgiving साठी बोलावले होते. त्यावेळी भाबडेपणाने ती म्हणाली की हा आता कसा दिसतो तेही मला आठवत नाही कारण मी तो लहान असल्यानंतर एकदा इंडियानाला गेल्यावर पुन्हा कुठे जाणं जमलच नाही. मी माझ्या भाचा-भाचीला इकडे येईपर्यंत दर आठवड्याला आणि आताही ऑनलाईन माझ्या मुलांना त्यांच्या मावशीशी बोलायला मिळेल हे पाहते हे मी सांगितलं आणि त्यासाठी दोन वर्षातून तरी आम्ही त्यांना भेटायला जातो हे मी सहज म्हटलं त्यावेळी जाताना मला एक हग देऊन ती म्हणाली आज तू मला हे सांगितलं म्हणून मला अचानक वाटायला लागलं की मी देखील पैसे साठवून तिथे एकदा जाऊन यायला पाहिजे. माझी नाती दुसऱ्या देशात आहेत पण तिची तर याच देशात आहेत हे तिला जाणवलं असावं. मग मी तिला शिक्षणाच्या निमित्ताने का होईना तुझा भाचा आता इथे तुझ्याकडे येउन जातोय याची आठवण करून दिली. तीही हसली.
कधीकधी मला वाटतं तिचे आणि माझे प्रश्न, व्याप्ती आणि तपशील वगळता सारखेच आहेत. माझी मुलं मोठी होतानाची चिंता तर तिचा मुलगा शिक्षणात फार लक्ष न देता काहीबाही करत राहतो त्याचं कसं होणार याची तिला चिंता. मध्ये नवऱ्याची काँट्रॅक्टवाली नोकरी कायम होईल असं वाटता वाटता गेली मग नवी मिळेपर्यंत तिची घालमेल. मला स्वत:च्या करियरची धास्ती आणि आय टी या बेभरवशाच्या कामात दोघंही असल्याची टांगती तलवार नेहमीची. तिचेही नातलग आणि जवळची मंडळी याच देशात दूर गेलेली आणि माझी त्या बाबतीत काही वेगळी परिस्थिती नाही.

माझे तिच्याकडचे ऑफिशियल सेशन्स संपत आले तेव्हा मी एक दिवस तिला तू प्रायव्हेट प्रॅक्टिस करतेस का, असं विचारलं. त्याचं मुख्य कारण हे होतं की काहीवेळा असे थेरपीस्ट एकाच ठिकाणी राहत नाहीत आणि इन्शुरन्सच्या नियमाप्रमाणे माझी डॉक्टर काही मला अशा थेरपीज नेहमी प्रिस्क्राइब करणार नाही. मग तिच्याकडे इतरवेळी जायचे असल्यास हा पर्याय मला उपलब्ध राहिला असता. तिने नंतरच्या एका विसिटला तिचं कार्ड मला दिलं पण त्या विषयावर तिथे माझ्याबरोबर काही बोलणी केली नाहीत. 

मग यथावकाश मी तिच्या पर्सनल सेशनला तिच्या घरी गेले. जुन्या काळी सगळं लाकडाचं काम दिसायचं त्यापद्धतीच्या त्या घरात पूर्ण लाकडाची आणि आपल्याकडे वार्डरोब असतात तसं आतमध्ये लाकडाचं काम असलेली एक छोटेखानी खोली आतमध्ये मंद संगीत आणि एसेन्शियल ऑइलचा मस्त वास. मला थंडी वाजेल म्हणून टेबलवर गरम blanket आणि माझ्या वस्तू ठेवण्यासाठी त्या लाकडी जमानिम्याला साजेल अशी एक सन्दुक आणि दागिने काढून ठेवण्यासाठी त्यात छोटी बांबुची विणलेली वाटी. सगळ्यात महत्वाचं तिचं प्रसन्न हसू. त्यादिवशी बरेच दिवसांनी आम्ही भेटलो आणि परत निघताना तिला लगेच दुसरी पेशंट नसल्याने मी थोडा वेळ थांबले आणि माझ्याही नकळत मी तिला म्हटलं, "I missed you Julie more than my back missed you". She smiled and hugged me tight saying "I mised you too Aparna. You are such a special client of me." 

गरज, मैत्री आणि बरचं काहीशा अंधुक सीमारेषा असलेलं हे नातं. याला मी किंवा तिने काही नाव द्यायला नको. ज्युली आणि मी आपापल्या व्यक्तिगत आणि भावनात्मक लढाया आपल्या पद्धतीने लढत राहू, केव्हातरी त्यातल्या काही एकमेकाबरोबर शेयर करू आणि त्याने ज्या भावना व्यक्त होतील त्यात हे नाव नसलेलं नातं असंच परिपक्व होत राहील. 



हा लेख मी मराठी लाइव्ह च्या रविवार पुरवणीत प्रकाशीत झाला आहे. 
मी मराठी लाइव्ह च्या रविवार पुरवणीत "ज्युली आणि मी"
Posted by माझिया मना on Sunday, May 24, 2015


Sunday, August 3, 2014

ओघळलेले मोती

कधीतरी फार जुनं आठवायला लागलं की मला "दया" आणि "विमल" आठवतात. दयाने तिसरीत शाळा सोडली कारण तिने शिक्षण घेण्यापेक्षा चार घरची धुणीभांडी केल्यास, तिच्या घरी जास्त उपयोग झाला असता. तसं पाहायला गेलं तर तिसरीच्या वर्गातल्या अतिशय प्रेमळ जॉनाबाई आणि दया अचानक शाळेत यायचं बंद होणं सोडलं तर काहीच आठवत नाही. 

चौथीत आम्ही खेळाच्या तासाला सर्व मुली रिंगण करून मग आतली मुलगी एक मैत्रीण शोधते असा काही खेळ खेळायचो. ते आठवलं की आठवते विमल. माझ्यापेक्षा उंच, सावळी आणि टिकलीच्या जागी तुळस गोंदलेली माझी चौथीतली मैत्रीण. तिची टिकली पडली तरी चेहऱ्यात फरक जाणवत नसे. चौथीमध्ये मी शाळा बदलली आणि त्यानंतर मला विमल कधीच दिसली नाही. आमची मैत्री तिथेच थिजली. 

मग पुन्हा हायस्कूलमध्ये अनेक मैत्रिणी मिळाल्या. पण दहावीनंतर मी एकटीच रुपारेलला गेल्यामुळे पुन्हा ते संबंध तिथेच राहिले. रुपारेलला बारावीपर्यंत राहायचं ठरलं असल्यामुळे खरं तर मैत्रीण होणार की नाहीत मग त्या टिकतील का वगैरे अर्थातच तेव्हा न पडेलेले प्रश्न होते. पण अशी सांगून होत नाही न मैत्री? त्यामुळे तिथेही ती झालीच. त्यात मी एकटीच मेडिकलला न गेल्यामुळे मी बहुदा पूर्ण आयसोलेट होणार होते पण अम्रिता आणि श्रुती या दोघी पत्ररूपाने बरीच वर्षे टिकल्या. नशिबाने नंतर आम्ही ईमेल, सोशल साईट्सवरदेखील जोडलेले राहिलो. पण त्याच काळातल्या निदान डझनभर मैत्रिणी आणि त्याही त्या दोन वर्षात अतिशय जीवाभावाचे संबंध असलेल्या मैत्रिणी अशाच कुठेतरी हरवल्या. 

डिप्लोमाच्या वर्षातल्या मित्र-मैत्रिणींचा आढावा घ्यायचा तरी थोड्याफार फरकाने हा असाच म्हणजे अगदी मागच्या वर्षी मी त्यातल्या त्यात समिताला वीसेक वर्षांनी भेटले पण त्या भेटीत त्यावेळी मेल्स वगैरे नसल्यामुळे आता हरवलेल्या मैत्रिणीची आठवण अगदी सुरुवातीलाच निघाली. डिग्रीला पोचेपर्यंत अगदी आतासारखं "मुठ्ठी में नेट" आलं नसलं तरी सायबर कॅफे होते पण तरीही त्यावेळचेही काही संबंध हरवले. मग पुन्हा इतक्या वर्षांनतर ते शोधलेही गेले नाहीत. त्यात मुलीची बदलेलेली आडनावं माहित नसल्यामुळे त्यांचा तर शोधही मुश्कील. 

असो. आज जागतिक मैत्रीदिन वगैरे आणि मी नक्की काय आठवतेय? सहज मनात आलं, आठवतं तेव्हापासून मैत्रीची माळ ओवायला घेतो. सुरुवातीची गाठ मारायची राहून जाते आणि मग त्यातले काही मोती ओघळतात. अर्थात म्हणून आपण आपली माळ ओवायची सोडणार नसतो आणि ते ओघळणारे मोतीही या न त्या कारणाने ओघळायचे थांबणार नसतात. आजच्या या मैत्रीदिनी जसं तुम्ही तुमच्या संपर्कात असणाऱ्या जीवलग मित्र-मैत्रीणीना आठवणीने शुभेच्छा देताहात तसंच तुमच्याही काही ओघळलेल्या मोत्यांची आठवण जरूर ठेवा.

जागतिक मैत्रीदिनाच्या सर्व वाचकांना अनेक शुभेच्छा. 

Wednesday, January 22, 2014

गाणी आणि आठवणी १५ - दिल में जागी धडकन ऐसे

उदय आणि मी कॉलेजमध्ये असताना तो माझा मित्र वगैरे नव्हता. म्हणजे असायचं काही काम नव्हतं. पण त्याचा एक मित्र माझा अतिशय चांगला मित्र आहे, त्यामुळे ते कॉमन मैत्री वगैरे का काय म्हणतात तसं असावं. मग यथावकाश कामाला लागल्यावर त्या कॉमन मित्रामुळे आमचे निदान मुंबईत असेपर्यंत contacts राहिले. आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात स्वतःची गाडी असण्याचा मान उदयकडे. म्हणजे तशी सगळी जण सेटल होतहोती पण गाडी घ्यावी हे बहुतेक फक्त उदयच्याच डोक्यात पहिले आलं असावं. कदाचित त्याचा भाऊ actor आहे त्याची थोडी बॉलीवूड पार्श्वभूमी त्याला कारण असू शकेल. मला आठवतं कॉलेजमध्ये हा त्याने घातलेल्या कुठल्या कुठल्या कपड्यांचे ब्रान्ड सांगत असे. आणि प्रत्येकवेळी त्याचं  एक पालुपद असे की "एकदम ओरिजिनल है" म्हणून. आम्हाला काय कळतंय ओरिजिनल काय आणि फेक काय. खरं तर आता आठवलं की मज्जा वाटते. आता खरं काही प्रसिद्ध brand बरोबर काम वगैरे पण करून झालं तरी त्या दिवसातली गम्मत वेगळीच. बालपणीचा काळ सुखाचा टाईप. 

हम्म तर काय सांगत होते? आमची मैत्री. तर मग कामाला लागल्यावर आमच्या त्या कॉमन मित्रामुळे पुन्हा उदयबरोबर पुन्हा कधीकधी भेट होत असे. ही दोघं आणि आमचा एक कामावर भेटलेला आणखी एक मित्र अशी एक त्रयी होती. ही लोकं प्रत्येक शनिवारी दुपारी त्या आठवड्यात लागलेल्या सिनेमाला जात आणि नाही आवडला की सरळ बाहेर येत. आता कुठला चित्रपट आठवत नाही पण त्यातून ते पाच मिनिटात बाहेर आले होते. आणि तो त्यांचा रेकॉर्ड होता. त्यादिवशी नेमकी मी माझं ऑफिस सुटल्यावर त्यांना अंधेरीला भेटून मग आम्ही जेवायला गेलो असताना यांचे असे चित्रपट पाहताना बाहेर यायचे रेकॉर्ड याविषयीच्या परिसंवादाची मी मूक (किंवा खर नुसती हा हा करून मोठ्याने हसणारी) श्रोती होते. यातून दुर्बुद्धी सुचून मी पुढच्यावेळी नाटकाला जाऊया म्हणून या त्रयीला सांगून पायावर धोंडा मारून घेतला होता. 

नाटकाची पहिल्या रांगेची तिकिटं काढली आणि याचं दहाव्या मिनिटापासून "चला", "उठुया", "बोअरिंग होतंय", सुरु झालं. नाटक सोसोच होतं पण तरी असं पहिल्या रांगेतून उठून कलावंतांच्या मेहनतीचा जाहीर अपमान करणं मला पटत नव्हतं त्यामुळे मी एकटीच बसणार म्हणून सगळे कसेबसे थांबले मग मध्यंतरात उठलो तोपर्यंत "मी तुला आज ट्रेनने जायच्या त्रासाऐवजी घरी सोडतो" म्हणून त्याने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊन झालं होतं. आणि तेव्हा मी वसईला राहत होते. मग शेवटी ही लोकं मला सोडायला आणि मला विसरून माझ्याच बाबांशीच खूप वेळ गप्पा मारून परत गेली. 

तर अगदी घट्ट नाही पण तेव्हा आमची चांगली मैत्री होती. एकमेकांचे घरगुती प्रश्न सांगण्याइतपत. आमच्या आणखी एका मित्राचा मी थोडा सिरीयसली विचार करावा वगैरे सांगण्याइतपत. आम्ही मध्ये काही महिने एकाचवेळी मुंबईत सिप्झमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं त्यावेळी संध्याकाळी वेळेवर निघणार असू तर त्याच्या गाडीने तो मला बोरिवलीला सोडत असे. कंपनीच्या बसपेक्षा थोडा वेळ वाचत असे पण त्याच्याबरोबर फुल टाईमपास गप्पा होत. एकदा समोरच्या माणसाने काहीतरी चूक केली तर हा पुढच्या सिग्नलला गाड्या थांबल्या तेव्हा  हा तरातरा आपल्या गाडीतून उतरून समोरच्याला चांगला झापून आला होता. आणि वरून त्याची "भा"राखडी मी ऐकली की काय म्हणून मला, "अशावेळी कान बंद करत जा" हा सल्ला देऊनही पार.   

एकदा मी खूप वाईट मूडमध्ये होते. काय झालं होतं मला आठवत नाही, कॉर्पोरेट जगतातला एखादा पोलिटिकली वाईट दिवस असावा. बहुतेक मी नीट बोलत किंवा ऐकत नसेन त्यामुळे त्याला ते जाणवलं असावं. अचानक तो म्हणाला तू सुनिधीचं हे गाणं ऐकलंय का? आणि त्यादिवशी बोरीवली येईपर्यंत आम्ही ते गाणं ऐकून एकंदरीत सुनिधी या विषयावर गप्पा मारल्या होत्या. 

हे गाणं ज्या लयीत स्वरबद्ध केलयं त्यात गाण्यात म्हट्ल्याप्रमाणेच एक जादू आहे. कधीही ऐकलं तरी डोलायला लावणारं. तसं पाहिलं तर त्याच्या त्या "ओरिजिनल"च्या आवडीत त्याच्याकडे नेहमी चांगल्या सीडी असत. गप्पा मारत असलो तरी त्याचं गाण्याकडे (अर्थात driving कडे) लक्ष असे. यान्नी आणि मला त्याकाळी माहित नसलेले विशेष करून बाहेरच्या देशातले काही कलाकार त्याच्याबरोबर बरेचदा ऐकले तरीही सुनिधीचं "दिले में जागी" ऐकलं की मला उदय आठवतो. 

आता आमच्या वाटा खुपच वेगळ्या झाल्यात. जसं मी वर म्हटलं की त्याने गाडी लवकर घेतली तसचं आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात लग्न, मुल हेही बहुतेक त्याचंच लवकर झालंय. मागे तो इस्टकोस्टला आल्याचं कुणीतरी कळवलं आणि नेमकं आमचं packing सुरु झालं होतं. पण मला खात्री आहे की आम्ही पुन्हा कधीही भेटलो तर नक्की तासभर तरी गप्पा मारू आणि तेच या अशा मैत्रीकडून अपेक्षित असतं. 



सुनिधीचा स्वर, निदा फाजली यांचे शब्द आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम. एम. क्रीम (खरं ते Keervani आहे)  या संगीतकाराची कामगिरी, या त्रयीची कमाल या गाण्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणवते. यातील एकाने जरी थोडं डावंउजवं केलं असतं तर हे गाणं कोलमडू शकलं असतं. पण तसं ते झालं नाही. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूर,शब्दाच्या लयीत आपण पाच मिनिटं झुलत राहतो आणि हे दोन तीन वेळा ऐकलं की त्यादिवशीचा आपला जर खराब झालेला मूड असेल तर तेही विसरून जातो. मला हा अनुभव जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा तेव्हा येतो आणि मग आपसूक उदय आणि त्यादिवशीची संध्याकाळ आठवते. पुन्हा मी सिप्झच्या घामेजल्या ट्राफिकमध्ये त्याच्या गाडीतला एसी, गाणी आणि गप्पांमध्ये हरवते. ही पोस्ट  या साऱ्या आठवणी जागवण्यासाठी.
 

Sunday, August 4, 2013

मैत्री


तो गेला. जवळजवळ वर्ष होईल त्याच्या शेवटच्या ई मेलला. पण त्याच्या शब्दाला जागला, कारण त्यानंतर त्याने कधीच स्वतःहून संपर्क साधला नाही. 


त्याच्या माझ्या मैत्रीची वर्षे मोजायची नाहीत आस  माझं मीच ठरवलं होतं आणि नाहीच मोजली. इतर वर्गमित्रमैत्रिणीबरोबर झाली तशीच आमची मैत्री पण बेस्ट फ्रेंडच्या यादीत फार लवकर आला तो. माझ्या त्या वर्षी कॉलेजमध्ये घडलेल्या काही अप्रिय घटनांमधून मी सावरताना त्याला मैत्रीचा आधार द्यावासा वाटला आणि मला वाटतं तिथेच आमचे मैत्रीचे सूर जुळले. 

सुरांवरून आठवलं, हो  "गाणी" देखील आमच्या मैत्रीचं एक  अविभाज्य अंग होतं. मला गझल ऐकायला शिकवायचं सगळं श्रेय त्याला. म्हणजे मला त्या माहित नव्हत्या असं नाही पण कुठच्या वेळी कुठली गझल आठवावी यासाठी तोच हवा. मग ऐकण्यातली खुमारी वाढते हे अनुभवावं. 

त्या मैत्रीला आमचं  कॉलेज संपलं म्हणून खंड पडण वगैरे झालं नाही. तो अंधेरीचा आणि माझी कामाची जागा अंधेरी, त्यामुळे येताजाता platform वर ओझरत्या भेटी होत. मोबाईल, इ-मेल च सुकाळ व्हायच्या आधीच्या मैत्री अशाच जपल्या. कधीतरी आमचा जुना ग्रुप एकत्र खादाडी करायला जमायचा तेव्हा पुन्हा जुनाच धांगडधिंगा. 

"तू मोठी कधी होणार आहेस का" हा न विचारता विचारलेला प्रश्न मला दुसरं मुल झालं तरी तसाच. 
आताशा अगदी मेल पण कमी झाले होते पण  स्काईपवर वर्षातून एक दोनदा पोटभर बोलणी केली की  खर तर बरच कव्हर व्हायचं. त्यात पुन्हा कुठे गायब होतो वगैरे प्रश्न आलेच नाहीत. 

मग माशी शिंकली कुठे हा विचार मी करतेय तोच त्याच्या काही वैयक्तिक अडचणींचा  पाढा वाचणार एक मोठं पत्र आल. मी हतबल. काही प्रसंग असे येतात जेव्हा आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या गोष्टी सोडाव्या लागतात. तसाच विचार करून सोडून दिली. त्याने मागितली म्हणूनच इतक्या वर्षांची न मोजलेली पण जीवापाड जपलेली आमची मैत्री सोडून दिली. 

अशी ती सोडता येते का याचा विचार करत हेही वर्ष सरेल. त्याचं ठाम उत्तर मिळणार नाहीच आहे. फक्त पुन्हा अशी गाढ मैत्री नव्याने करायला आवडेल का याच उत्तर मात्र ठाम नाही आहे. हा हट्ट नाही आहे. स्वतःला पुन्हा त्या मैत्रीतून बाहेर पडतानाचा होणारा त्रास पुन्हा होऊ नये इतकचं वाटतंय. 

खर तर मागच्या आठवड्यात वीस वर्षांनी मी माझ्या एका खूप जुन्या मैत्रिणीला भेटले अगदी पहाटे एक वाजेपर्यंत तेही वीकडेला गप्पा मारल्या आणि मैत्रीचा आनंद पुन्हा अनुभवला आणि हा इकडे लिहिलेला अनुभवही मनात आहेच. दोन्ही वेगळ्या व्यक्ती असल्या तरी आजच्या जागतिक मैत्रीदिनी मला मात्र माझीच मैत्रीची ओंजळ अर्धी रिकामी, अर्धी भरलेली वाटतेय. 


जाता जाता या विषयावरच मला आवडणारं एक गाणं. 






Sunday, March 3, 2013

दक्षिण मुंबईतला खाद्यमिया ए के ए बडेमिया...


कॉलेजमध्ये असताना स्टायपेंडरूपी स्वकमाई सुरू झाली, त्यावेळेपासून मी आणि माझी एक मैत्रीण, आम्ही दोघींनी मिळून मुंबईतल्या बर्‍य़ाच खादाडी जागांना भेटी दिल्या. कुठलं डाएट किंवा बचत वगैरेची चिंता नसलेली, थोडीशीच कमाई असली तरी त्यात दोघींसाठी रविवार टू रविवार परवडेल, असे दिवस होते ते. त्यावेळी एकदा रविवारच्याच एका पुरवणीत खास दक्षिण मुंबईतल्या काही खास जागांबद्दल एक लाळगाळू लेख आला होता. त्याचं कात्रण जवळ ठेऊन त्यातल्या जमेल तशा ठिकाणी खाद्ययात्रा घडली. त्यावेळी नेहमी गेलो ते स्टेडियम, सामोवार, दिल्ली दरबार अशा जागा पटकन आठवतात आणि आठवतं ते बडेमिया. ते संध्याकाळी,गाडी लागते, भरपूर गर्दी, वगैरे वर्णन वाचून दोघी मुलींनीच जावं का हा मुख्य  प्रश्न पडल्यामुळे आणि निव्वळ त्यासाठी तेव्हा कुठल्या मुलाला "चल रे आमच्याबरोबर" असं काही विचारलं नसल्यामुळे राहून गेलेलं बडेमिया. मग देश सोडल्यावरही जेव्हा जाणं होणार तेव्हाही जाणं राहिलं. 

यावेळी तर एकंदरित ट्रिपचा नूर फ़ार बाहेर पडण्यासारखा नव्हताच. पण एखादा दिवस असा येतो जेव्हा काही गोष्टी तुमच्यासाठी लिहिलेल्या असतात त्याप्रमाणे ते घडतं. इतर वेळी कितीही प्लान केलं तरी ते शक्य होत नाही. असा अनुभव जानेवारीतल्या एका रविवारी आला. 

त्यादिवशीची संध्याकाळ मी ठेवली होती ती "सप्तसूर" या महाराष्ट्र सरकार आयोजित एका कार्यक्रमासाठी. म्हणजे नमनाचं तेल आणखी अगदी थेंबभर टाकायचं म्हटलं तर तिथे शान गाणार होता म्हणून मला तिथे जायचंच होतं. तसं गेलोही. नेमकं शानचा घसा बसल्यामुळे त्याने दोन गाणी म्हणून मग सपशेल माफ़ी मागून माझा त्या कार्यक्रमातला उत्साह कमी करून टाकला. म्हणजे बाकीचे कलावंत छान गात नव्हते असं नाही पण मनात "शान, शान"चा जप करत गेल्यामुळे मग मी तिथून उठायचा विचार केला. 

माझ्याबरोबर त्यादिवशी आपल्याच ब्लॉगजगतातला माझा मित्र दिपक आणि माझे आणखी एक स्नेही होते. शिवाय बाहेर सचिन उर्फ़ सपा (त्या कार्यक्रमासाठी उशीरा आल्याने) ताटकळत होता.त्यामुळे बाहेर यायच्या कारणात शान बरोबरच सपालाही थोडं श्रेय द्यायला हरकत नसावी.गाण्यातला "सा" अशा प्रकारे आटोपला आणि आम्हा मंडळीत अचानक खायचा "खा" लागला. त्यावर दोनच मिनिटांची एक साधक (खाऊन पोटं बिघडली नसल्याने बाधक चा तसा काही संबंध आलाच नाही) चर्चाही झाली. 

दोन मिनिटं अशासाठी की मी आता इतक्या वर्षांनी जात असल्याने मला ताजच्या जवळचं "दिल्ली दरबार"सोडून एकही नाव आठवत नव्हतं. आणि दिपकला मला वाटतं त्याच्या कुठल्यातरी पुरानी यादें ताजा झाल्याने लगेच "बडेमियां" आठवलं. हे तसं माझ्याही लिस्टवर आधीच्या नमन क्र. १ मध्ये म्ह्टल्याप्रमाणे देशात असल्यापासून होतं.बाकीच्यांनाही चालणार होतं. लगेच  गाण्यासाठी बाहेर असणार्‍या गर्दीला मागे सारून आम्ही खाणार्‍यांच्या गल्लीत आलोही. 



ताजच्या मागच्या गल्लीत एका गाडीत भटारखाना सुरू आहे, कबाबचा धूर निघतोय, बाजुला गर्दी, रस्ता क्रॉस करणारी गर्दी, ज्या नशीबवंताना गल्लीत गाडी उभी करायला मिळालीय तिथे त्यांची गर्दी या एकंदरीत गर्दीमय वातावरणात गाडीवरचा "बडेमिया"चा बोर्ड संध्याकाळच्या वेळेस झगमगतोय. मला वाटतं दररोज संध्याकाळी लागणार्‍या या गाडीवर पहाटे एक वाजेपर्यंत खवय्यांची गर्दी तशीच असते. 

आम्ही भारतीय रेल्वेला संधी दिल्याने आमच्याकडे गाडी नव्हतीच त्यामुळे उभं राहून खायचा पर्याय होता. पण दिपकचं सजेशन होतं की इथे समोर एक "खंडहर" आहे, आम्ही तिथेच बसायचो हे त्याने इतकं ठामपणे सांगितलं की आता "खंडहर" पाहाणे क्रमप्राप्त.(हे आम्ही कोण हे बहुतेक तोच सांगेल ;) ) खरं अगदी खंडहर नव्हतं पण रस्त्यावरच्या खाण्यासाठी बसून खायचा पर्याय जितका चांगला कल्पू शकाल तितकीच बरी जागा होती."अगं, ताजमधले गोरे पण इथे येतात" - इति दिपू आणि कुठल्यातरी चित्रपटातल्या संवादाचा रेफ़रन्स..जो तिथे लक्षात आला तरी आता बिल्कुल आठवणार नाही. बरं "चल बसूया", असं म्हणायचं तर इथे पण आधी नंबर लावायला लागतो. थोडक्यात रामाची सिता म्हणजे तुफ़ान गर्दी पब्लिक फ़िदा वगैरेवाला जॉइंट म्हणजे बडेमिया. एकदा का आपला नंबर आला आणि आत गेलं की मग त्यांचा मेन्यु पाहाणे आले.

मेन्युवरचं सर्वच मागवावं का असा विचार येणं साहजिकच आहे. त्यासाठी खूप वेळ पण मिळाला कारण आम्हाला बसवून गेल्यावर कुणी आमच्याकडे साधं पाणी विचारायला देखील आलं नाही. पण त्यादिवशी उगाच मूड खराब करायला नको म्हणून त्याऐवजी दिपकने मला अगदी ठेवणीतली सलीम फ़ेकुची नक्कल करून दाखवली. म्हणजे आय विश की ते संवाद मला आता तसेच्या तसे आठवावे पण आम्ही बहुदा हैद्राबादीत वाहावले असू त्यामुळे की काय पण एकजण उगवला. तर आधी म्हटलं तसं सगळंच खायचं होतं पण त्यातल्या त्यात आपण इथलं काय खावं असा विचार करून आम्ही बडेमिया फ़ेमस कबाब, चिकन मलई टिका, चिकन रेश्मी टिका रोल (फ़ोटोत शोधू नका तो आधीच खाल्ला गेलाय), आणखी काही चिकनचे प्रकार, रुमाली रोटी इ.इ. मागवली आणि समोर वेटर दुसर्‍या कुणासाठी प्रचंड सजवलेलं रोटीसदृश्य काहीतरी नेताना दिसला त्यामुळे मग आम्ही तो परतला तसं लगेच ते काय होतं हे त्यालाच विचारून आमच्या तोंडातलं पाणी गिळून टाकलं आणि ती बैदा रोटी पण आमच्या ऑर्डरला टाकली. 

आता पुन्हा एकदा वाट पाहाणे आले. साधारणपणे अशा प्रकारे दोन तीन रांगांमधून जायची वेळ आली की समजायचं जे खाणं येणार ते फ़र्मास असणारच. त्यामुळे आमचा हा अंदाज काही खोटा ठरला नाही. त्याने आमची सुरूवातीची सगळी ऑर्डर टेबलावर आणून ठेवली आणि तो सलीम फ़ेकू, आमचा नंबर घेऊन बसवून मग बराच वेळ भाव न देणारा तिथला ऍडमिनवाला, शिवाय न गायलेला तो शान सगळं सगळं विसरून आम्ही तुटून पडलो. ज्यांना मसालेदार खाणं आवडतं त्यांच्यासाठी या खाण्याबद्दल काय लिहायचं..हे फ़ोटोच पुढचं सगळं सांगतील.मला तसंही एकदा का भारतात गेलं की आपल्या चवीचं खायला जवळजवळ सगळंच आवडतं. पण तरी चिकन मलई टिका आणि रोलमधला रेश्मी टिका लाजबाब.


हे सगळं खाल्यावर पुन्हा मी एवढ्या लांब येईन का याची शंका आल्याने बिर्यानीलाही संधी दिली आणि नाही नाही म्हणता तिचाही फ़न्ना उडाला. इतक्या लवकर की उगा तिचा फ़ोटो-बिटो काढायचा प्रयत्नही आमच्या ऑफ़िशियल फ़ोटूग्राफ़रने केला नाही. त्यामुळे या पोस्टला मिळणारे काही दुवा (?) अर्थातच कमी होतील. जाता जाता खरं तर यांच्याकडे शाकाहारीची व्हरायटीदेखील आहे हे लक्षात आलं पण तोवर पोटातली जागा खर्‍या अर्थाने संपली होती. 

इतकं सगळं खाऊन बिल हजारही आलं नाही, ही दक्षिण मुंबईतल्या जागांचे भाव लक्षात घेतले (का यार मला सारखं सारखं दक्षिण मुंबई आणि घर असे संदर्भ लागतात?) हा तर इतलं बिलही नक्कीच सगळ्यांना परवडण्यासारखं आहे. फ़क्त मुंबईच्या या टोकाला, असं रात्रीच्या वेळी जाणं व्ह्यायला हवं. तर मित्रमंडळींबरोबर खाणं झालं आणि जागा संपलीबिंपली काही म्हटलं तरी ते खंडहर उतरून (हो उतरताना पलीकडच्या बाजुला गोरे होत) खाली येईपर्यंत निदान पानाइतकी जागा झाली आणि खरं तर असं मसालेदार सामीष असं सगळं हाणल्यावर एक पान तो बनताही है..

मघई पानं चघळत जो चर्चगेटकडे जाताना अशा अनप्लान्ड खादाडी संध्याकाळी आणखी मिळाव्यात असाच विचार मी तरी करत होते. आणि आजच्या रविवारी इकडे असलं काही शोधूनही सापडणार नाही हाच विचार करून त्या रविवारच्या खाद्य आठवणी जाग्या करत होते. 

ता.क. माझ्या पोस्टमधल्या फ़ोटोंना नेहमी नसणारा एक जास्त प्रोफ़ेशनल लूक असणार्‍या वरील  फ़ोटोसाठी खास आभार दिपकचे. 

Sunday, August 5, 2012

मैत्रीच्या धूसर सीमारेषा


कुठल्या तरी सुट्टीत "मैने प्यार किया" पाहिला होता..वरळीच्या सत्यम, शिवम, सुंदरमला..हे इतकं आठवतंय कारण ती सुट्टी बरेच दिवस परळला राहिले होते आणि मुंबई अंगात भिनली होती..त्यानंतर मग बारावीचं वर्ष चर्नीरोड त्यामुळे ती आणखीच भिनली...राणीच्या नेकलेसला रोज रात्री पाहायची सवय खरं तर चांगली (आणि परवडणारी) नाही...आता जेव्हा जगातल्या आणखी फ़ेमस शहरांना भेटी दिल्या जातात तेव्हाही आठवते ती मुंबईच....अरेच्च्या कुठे हरवले मी?? असं होतं हे मुंबईची आठवण आली की.....:)

हा तर तो "एमपीके", त्यातलं एक वाक्य चांगलं लक्षात आहे कारण मी त्याच्याशी कधीच सहमत नसते..मला वाटतं त्या सिनेमात बहुतेक सलमानचे पिक्चरमधले बाबा (चुभुद्याघ्या) म्हणतात "एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते". मला माहित नाही का ते पण मला ते अतिरेक टोकाचं विधान वाटलं होतं...
म्हणजे खरं तर तोवर माझे मित्र म्हणजे माझी मावसभावंडंच होती आणि कॉलेजमध्ये पण अकरावी बारावीला दोस्ती होण्याइतपत मुलांशी संबंध आलाही नाही.पण त्यानंतर मात्र व्यावसायिक शिक्षणक्रमाच्या निमित्ताने डिप्लोमा आणि डिग्रीला मैत्रीणी मिळाल्या तसेच मित्रही मिळाले...अगदी जीवाभावाचे.....त्यांच्याशी ओळख करून घेतानाही कधी काही दुसरे विचार मनात आले नाही...याचा अर्थ मुलं आवडलीच नाहीत असा नाही पण जसं मित्र हा एक वर्ग असतो तसा क्रश हा एक वेगळा वर्ग असतो...नोकरी करतानाही टीममधल्या एखाद्या मुलाबरोबर मैत्री व्हायचे प्रसंगही येतात...या सगळ्या मैत्रींना त्या वर उल्लेखलेल्या वाक्यात टाकलं तर मग काही खरं नाही न?

मैत्री ही कुठल्याही वयात आपल्या आयुष्यात येऊ शकते आणि ती येतानाच तिचं भविष्य घेऊन येते..काही ओळखी होता होता राहतात..म्हणजे आपल्याला ती व्यक्ती आवडत नसते असं नसतं पण ती ओळख मर्यादित स्वरूपात राहणार असेल तर ती तशीच राहते आणि धूसरही होऊन जाते...याउलट एखादी ओळख मग तो मित्र असो वा मैत्रीण जेव्हा पहिल्या भेटीदरम्यान न संपता येणार्‍या गप्पांनी सुरू होते ती काळाच्या ओघात नक्की टिकणार याची खात्री असते...अशा मैत्रीला वय/लिंगाच्या मर्यादा नसतात... 

मला जितकं सहज एखाद्या माझ्या वयाच्या व्यक्तीशी बोलता येतं, त्याच सहजतेने मी माझ्यापेक्षा दशकाने लहान असलेल्या व्यक्तीशीही सूर जुळवू शकते....माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीला मात्र तसे संस्कार घेऊन आपण लहानपणापासून वाढतो म्हणून मान हा दिलाच जातो. पण एकदा सुरुवातीचे ते एकमेकांचा अंदाज घ्यायचे दिवस संपले की मग मात्र अशा मैत्रीचाही निखळ आनंद उपभोगता येतो...
वेगवेगळ्या वयांशी मैत्री असल्याचा फ़ायदा हा की आपल्याला आपल्यापेक्षा मोठ्या मित्र-मैत्रीणींच्या अनुभवाचा सल्ला उपयोगी पडू शकतो, त्यांच्याकडून आपण काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो तर आपल्यापेक्षा वयाने लहान असणारे मित्र-मैत्रीणी आपलं लहानपण टिकवून ठेवतात. 

माझ्या भाच्यांना कदाचित म्हणूनच मी नावाने हाक मारायला शिकवलं..आमच्यातल्या मैत्रीमुळे मला अजून माझ्या भाचीबरोबर भातुकली खेळताना लहान होता येतं..माझ्या मुलांबरोबर तर मला उशांनी भांडताही येतं...

तसंच काहीसं मित्रांचं...म्हणजे मी मुलगी आहे त्यामुळे मित्रांशी बोलतानाची एक विशिष्ट मर्यादा आपसूक राखली जाते किंवा अगदी खरं सांगायचं तर ती मित्राकडूनही राखली जाते..कुणी कुणाशी किती मोकळं व्हावं याचे काही अलिखित नियम असतात आणि ते अशा ठिकाणी आपसूक पाळले जातात. फ़क्त तरीही समाजात अशा मैत्रीकडे निकोप दृष्टीने पाहिलं जात नाही...एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र (आणि तेही जास्त वेळा एकत्र) दिसले, त्यातही ते एकत्र बाहेर खायला, फ़िरायला जाताना दिसले की यांचं जुळलंय अशाच भावनेने सर्वसाधारणपणे पाहिलं जातं.

प्रत्यक्षात ते तसं असायलाच हवं असं नाही. मग कधीतरी त्यापैकी कुणाला तसं सरळ विचारलंही जातं. एखादा बेधडक असेल तर तो अशा प्रश्नांना उडवून लावील पण एखादी साधी अशावेळी अति कॉशस होऊन आपली मैत्रीही कमी करायला सुरुवात करील..आणि मग समाज म्हणून मैत्रीवर संशय घेणारी व्यक्ती कदाचित त्यावेळी नक्कीच खजील होईल..

हे सगळं अशा प्रकारे घडण्यापेक्षा मैत्री दिनाच्या निमित्ताने आपणही निकोप मैत्री जोपासायला शिकुया...."तुमची फ़क्त मैत्री आहे नं? मग तुम्ही कशाला समाजाला घाबरता?" असं बोलणं खूप सोपं आहे पण एक स्त्री म्हणून याकडे पाहताना यातलेही धोके मला जाणवताहेत...आणि केवळ तेवढ्यासाठी अनेक द्राविडी प्राणायाम करून मैत्रीच्या धूसर सीमारेषांची जाणीव करून देण्याच्या समेवर आणण्याचा प्रयत्न करणारी ही एक छोटी पोस्ट...

मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा... :) 

Tuesday, June 12, 2012

इट्स ओके......ऑर मे बी इट्स नॉट.....बट हु केअर्स....


कसं असतं नं लहान असताना आपल्याला एक खास मैत्रीण असते...मग तिला आणखी एक मैत्रीण मिळते...काही वेळा आपण तिघी मैत्रीणी होतो आणि काहीवेळा ती तिसरी आवडली नाही की मग आपल्या "खास"शी भांडण तरी होतं नाहीतर तिला सरळच सांगितलं जातं..."एक तर ती किंवा मी".....आणि हे ती किंवा मी ला किती अर्थ असतो देव जाणे...पण होतं असंही..पुन्हा मैत्री आपला मार्ग क्रमू लागते......हसणं, खेळणं, खिदळणं आणि हो भांडणंही....कट्टी आणि बट्टी...दोघी जणु काही मैत्रीणीच...

आता मोठं झाल्यावर मात्र असं "एक तर ती किंवा मी" असं नाही होत....मुळात आता इथे एकवालीचा संदर्भच नसतो...आता असतो तो सरळ एक ग्रुप किंवा दुसरा ग्रुप...या दोन ग्रुपमध्ये आपली स्वतःची वन ऑन वन मैत्री कुठेतरी चाचपडत राहते....कट्टीही नाही आणि बट्टीही नाही......मधलंच काहीतरी....बोलताना सगळं काही आलबेल असल्यासारखं दाखवलं तरी मुठीतून बरंच काही निसटल्याची जाणीव दोन्हीकडे......

कळपप्रिय प्राण्याला कळप तर हवाच पण तरी त्यात दोन वेगळे कळप असले की मग कुणाला कुठे ठेवायचं याचा एक नवाच गुंता....स्वतः मात्र कुठेतरी एकांत शोधावा असं अशावेळी माझं मला माझ्यासाठी वाटतं....नकोच ते नवे कळप..सगळीकडे नुस्तं हाय हॅलो आणि वर्तमानात बोलून या ओळखींना कुठला भूतकाळ न ठेवता कुठल्या भविष्याचीही चिंता नको असं काहीसं करता यायला हवं नाही?? मुख्य परक्या देशात आणि लौकिक अर्थाने परक्यांबरोबर तरी.....

प्रत्यक्षात हे नेहमी जमणार आहे असंही नाही....तसं करायचंच ठरवलं, तर होतो आपला धोब्याचा कुत्रा..ना इधर का ना उधर का....सगळीकडे दुरून डोंगर साजरे लुक मिळवून त्या ग्रुपमध्ये तेवढ्यापुरता असायची तयारी असेल तर हा स्टॅंड पण काही वाईट नाही...

नाहीतर आधी एका ग्रुपचा घट्ट भाग व्हायचं....काही कारणाने दुसरं आणखी चांगलं (म्हणजे नक्की काय हे मला खरं तर कळत नाहीच) किंवा वेगळं किंवा क्लिक होणारं काही मिळालं की मात्र तिथे बस्तान हलवायचं यापेक्षा हे काय वाईट...

फ़ार विचार केला तर काहीच कळत नाही...म्हणजे एका ग्रुपमधून सरळ दुसर्‍यात जायचं हे बरोबर की साफ़ चूक???एक बरंय की सध्या स्वतःचं आयुष्य स्वतःच्याच कुटुंबाभोवती इतकं फ़िरतयं की घरची चार डोकी सोडली तर कुठल्याच ग्रुप-बिपची तशी गरज नाहीये...

पण इकडे-तिकडे मात्र हा अमक्या ग्रुपमधला तमक्यात गेला वगैरे ऐकते आणि उगाच वाटतं, नसेल झेपलं तिला इथलं काहीतरी, नसेल आवडलं या ग्रुपमधल्यांचं काहीतरी आणि मिळाला असेल मधल्या मध्ये दुसरा जास्त क्लिक होणारा ग्रुप आणि हे सगळं समजावून  सांगण्याइतका पेशंसही नसेल उरला...जे काय असेल ते.......बदलला ग्रुप...

आज इतकं भारी का होतंय.....आई ग्ग....माहित नाही...मागे ठेऊन आले होते काही मैत्रीचे कळप आणि त्यातले काही भरकटताहेत...ही बहुदा त्या आठवणींमुळे उडालेली एक खपली....केवळ तेवढ्यासाठी सध्या कुठल्याच कळपाचा भाग नसल्याचं समाधान आणि काय??? 

Is it OK?? Or may be its not.....But who cares??? Isn't that the attitude anyway.....

Monday, April 23, 2012

दोन ओंडक्याची होते जर्सीमध्ये भेट.....


खरं तर अशा प्रकारची पोस्ट या ब्लॉगवर साधारण दोन वर्षांपुर्वीच्या जुलैमध्येच येणार होती...म्हणजे यायला काहीच हरकत नव्हती..पण ओंडका क्रमांक एक किंवा खरं तर ओंडकी उर्फ़ माझिया मनातली "मी" हिने अति डोकं लावून विमानाचं तिकिट काढताना गोंधळ केल्याने काही केल्याने ओंडका क्रमांक दोन उर्फ़ वटवट सत्यवान याला प्रोजेक्टरुपी लाटेने च्यामारीकेच्या दुसर्‍या किनारपट्टीवर वेगळं ठेवलं..
यावेळी मात्र ओंडकीला आधीच पुर्वीच्या चुका न करण्याची अक्कल आल्याने (वाचा...लेसन्स लर्न्डच्या कृपेने...) आधी उल्लेखलेले हे दोन ओंडके मागच्या आठवड्यात एकदाचे जर्सीतल्या एका शांत कुटिरेत भेटले.....शांत कुटीर उर्फ़ सत्यवानाचं घर हा या (अघोषित) मेळाव्याचा मुख्य पंडाल होता हे आता लक्षात आलं असेलंच.....
या दोन परिच्छेदात अशा प्रकारे ही पोस्ट या ठिकाणी खरं तर संपली आहे... पण प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या असंख्य अलिखित नियमाप्रमाणे थोडी फ़ार असंबद्ध बडबड केल्याशिवाय किंवा थोडक्यात त्या आधी म्हटलेल्या शांत कुटिरेचं रुपांतर हास्यकल्लोळ, तू हे कर तरच मी हे करेन या आणि अशा असंख्य कलकलाटाने भरल्याशिवाय ही पोस्ट कशी पूर्ण होणार???
मागे काही दिवसांपूर्वी वटवटच्या फ़ेबुवर (मी फ़ेबुवर नाही आहे हो...फ़ेस आला तोंडाला माझ्या त्यांची प्रायव्हसी सार्वजनिक करण्याची पद्धत पाहून..असो तर..) हां तर त्या वटवटच्या फ़ेबुवर गाजलेल्या एका फ़ोटोमुळे घडलेल्या एका छोट्याशा मेळाव्याचा हा मोठा वृत्तांत....वॉर्न करायचं काम केलंय नंतर पोस्ट संपत नाही वगैरे किंवा पुन्हा एकदा मनातलंच इ.इ. छाप प्रतिक्रियांचं मूल्य शून्य असेल हा (आगाऊ) इशारा...:)
तर झालं असं किंवा खरं तर झालं काहीच नाही माझं एक हापिसचं काम नेमकंच पूर्व किनारपट्टीच्या जवळ निघालं..आणि मी फ़क्त त्याच्यात माझ्यासाठी शनिवारचा एक दिवस मागितला (नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारही मागावा लागला ही वेगळी बाब पण वरिजिनल प्लानमध्ये माझ्याकडे फ़क्त शनिवार होता) सुदैवाने नव्या यॉर्कातलं विमानतळ कामासाठी वापरावं लागत असल्याने मी यावेळी हॉटेलमध्ये न राहता नव्या जर्सीतल्या एका शांत कुटीरेची निवड केली...(म्हंजे काय आहेच माझी साधी राहणी आणि साधेच विचार) आता ह्याच शांत कुटीरमध्ये राहणारा ब्लॉग ओळखीमुळे आता चांगली गट्टी जमलेला हेरंब उर्फ़ वट्टू (आता ओंडका म्हणायचा मोह होतच नाहीये कारण गप्पाची भट्टी चांगलीच जमल्यामुळे आमची गट्टी जमलीय नं...) याने माझं हे असं आगाऊपणे त्याच्या (आता अशांत केलेल्या) कुटीरेमध्ये येणं खिलाडूपणे स्विकारून मध्यरातीला माझ्यासारख्या सभ्य मुलीला नवीन यॉर्कातल्य कुणी त्रास देऊ नये म्हणून खास जातीने हजर राहून माझ्यातला सुजाण ड्रायव्हर जागा केला...(होय कंपनीने भाड्याने दिलेल्या गाडीला ड्राइव्ह करून शांत कुटिरकडे न्यायचं पवित्र कार्य मीच पार पाडलंय आणि यावर दोन शब्द येताहेतच...)
अरे हे काय...नाही नाही काही नाही तर मेळाव्याचं पहिलं पुष्प गुंफ़ायला सगळ्यात महत्वाची मदत केली ती विमानतळातल्या एअर ट्रेनने बंद पडून...त्यामुळे अर्थातच आमच्या आनंदावर विरजण पडायचं काहीच कारण नव्हतं म्हणा..कारण ती भर आम्ही तिथेच उपलब्ध असलेल्या बस सर्व्हिसवर आमचा भार टाकून लगेच भरुन काढली....:) आणि हो तो वर म्हटलेला ऐतिहासिक फ़ेबु फ़ोटोने (इथून पुढे ऐतिहासिक हा शब्द बर्‍याच उल्लेखांमध्ये अध्याहृत असेल हे चा वांच्या ध्यानात आलं असेलच) तर त्यादिवशीच्या फ़ेबुवर तर बॉंबच फ़ुटला..."हे काय नवीन आता?" "हा मेळावा कधी झाला आता?" या आणि इतर प्रश्नांनी वट्टुच्या फ़ेबुला फ़ेस आला.....त्यामुळे अर्थातच ही पोस्ट लिहायची जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली...( आणि हेच नाही बर्‍याच जबाबदार्‍या त्याने माझ्यावर टाकल्या....मी त्यातल्या किती कशा पेलल्या ते त्याला हवं तर तो लिहील आणि नाही लिहिलं तर इथे वट्टूची वट वाढवायची संधी मी सोडणार नाही हे तुझ्या ध्यान्यात आलं असेलच नं सत्यवाना...)
तर आता त्याने मला इतकं प्रेमाने आणि मध्यरात्रीही एकही जांभई न देता (आणि हातात फ़ुले-बिले अस्लं काही आणून ते सांभाळायचा त्रास मला न देता) विमानतळावर रिसिव्ह केलं याबदल्यात मीही त्याला माझ्या कामासाठी घेतलेल्या गाडीने (चक्क) नवीन यॉर्कातले रस्ते, एव्हेन्यु न चुकवता, एकही भोंग्याची देवाणघेवाण न करता आणि सगळ्यात मुख्य एन वाय पि डीवाल्यांना न पिडता वाहतुकीचे नियम काटेकोर पाळीत इप्सित स्थळी म्हणजे शांत कुटीरेमध्ये घेऊन गेले...इथे खरं तर तांत्रिक दृष्ट्या कामाचा दिवस सुरु व्हायला काहीच तास शिल्लक राहिल्याने आम्ही विश्राम करून मेळाव्याचा विचार नंतर करायला हवा होता पण काही (किंवा खर तर बर्‍याच बाबतीत) आमचं लाइक माइंड असल्याने विश्रामाचा विचार बाजुला ठेवून आम्ही सरळ चर्चेला सुरूवात केली..चर्चांचे विषय महत्वाचे नव्हते कारण ते सारखेच बदलत होते.
मॅगी बस दो मिनिट....खाने और पकाने के लिए....:)
प्रत्येक छोट्या मोठ्या मेळाव्यांमधला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दीडिखा आय मीन खादाडी यावर मात्र एक छोटा वाद निर्माण झाला...(म्हणजे थोडक्यात नॉर्मल मेळाव्यासारखंच) तर झालं असं सत्यवानाने काय खाणार असा प्रश्न विचारल्यावर जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून नको रे वगैरे करून माझिया मनाला खास सत्यवान स्पेशल मॅगीचे वडे खायची इच्छा झाली आणि त्यात माझी फ़क्त दोन मिन्टात बनलेलं मॅगी देऊन ती धुडकावण्यात आली...अर्थात सुदाम्याचे पोहे खाऊन वाढलेल्या संस्कृतीतले आम्ही दोघं असल्याने हा वाद मॅगी लगेच संपवून (आणि भांडी घासायची जबाबदारी सत्यवानाकडेच देण्यात येऊन) आम्ही पुन्हा एकदा चर्चा सुरू केल्या...आणि पुन्हा तेच आधी म्हटल्याप्रमाणे वातावरणावरून सुरू झालेल्या या चर्चा विविध वळणांनी फ़क्त हास्याचे फ़वारे, लोल्स आणि मंडळींना आवाहन इ.इ. रुपी फ़ोडण्या पडत पुढे सरकत संपायचं नावच घेत नव्हत्या.....
पण अखेरीस घड्याळाचा काटा फ़ारच पुढे गेल्याने आम्ही साधारण तीनेक तासाच्या विश्रामाचा ठराव मंजुर करून पहिले सत्र (अक्षरश: वेळेअभावी) आटोपते घेतले..
आता दोन दिवस माझ्या कामाचे असल्याने त्याविषयावर ब्लॉगवर लिहिण्यात काहीच पॉइंट नाहीये पण झलक म्हणून हा नकाशा पाहिलात तर कामही किती अटीतटीचे झाले हे लक्षात येईल..(इथे मी दोन दिवसांत पाच राज्यांचा दौरा करुन एक नवाच उच्चांक प्रस्थापित केला हे काही सुजलेल्या मनगटाने लिहायचं नाहीये मला पण लिहिताना ते ओघानेच आलं आहे याची पुन्हा एकदा सु.वा. नोंद करतीलच.)
हा माझा छोटासा प्रवास कामाचा आणि गाडी परत देण्यापर्यंतचा...
तर (एकदाचं काम आटोपून) पुन्हा परत येताना आधीचा विमानतळाचा अनुभव लक्षात घेऊन भाड्याची गाडी परत द्यायचं ठिकाण आम्ही बदललं होतं...नशीबाने शांत कुटीरेपासून ते खरं तर तीनच मैलावर होतं. पण पाच राज्य जितकी लवकर कव्हर करता आली त्याच्या ऐवजी या तीन मैलापैकी शेवटचे तीनशे यार्ड कव्हर करताना आली...म्हणजे इतकं विक्रमी वेळेत येऊनही अखेर हेची फ़ळ इ.इ. विचार माझिया मनात येणार तोच वटवट्याने कुणालाही रस्ता न विचारायचा (जगातल्य यच्चयावत पुरूष जमातीचा) नियम मोडीत काढून चक्क रस्त्यातल्या पोलीसाची मदत घेतली...आणि त्याने अर्थातच आम्हाला चुकवले नाही हे इथे नोंदवायला हवं....इथेही मर्फ़ीबाबा आले का असा अभद्र विचार डोक्यातून काढून टाकून मी तर सरळ मनातल्या मनात मेळाव्याचे दुसरे पुष्प गुंफ़ायला सुरूवातही केली..
आणि या पुष्पाचं संपूर्ण श्रेय शांत कुटीरमालक सत्यवानाला जातंय. कारण माझ्या लाडक्या नवीन यॉर्कात एका शुक्रवारच्या संध्याकाळी हे पुष्प गुंफ़ायची कल्पना फ़क्त त्यालाच सुचू शकते...
सत्यवान म्हणे पोळीपेक्षा
फ़मिलिया
 पिझा भारी
हे शहर आधीच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मला माझ्या मुंबईची याद देते त्यामुळे इथे जायला मी तसंही कधीही तयार असतेच इथे तर मेळाव्याचा प्रश्न होता..आता मागे हटणे नाही..तिथल्या (नेहमीच्याच) वार्‍यांना न जुमानता आम्ही आमची पदयात्रा जारी ठेवली...आणि त्याचबरोबर काही मार्मिक गोष्टींवर आपल्या टिपण्ण्या करून माझं मनोरंजन करायची संधी सत्यवानाने सोडली नाही...जास्त गर्दीच्या ठिकाणी मोठ्याने हसायची संधी मी नेहमीच साधून घेते....टाइम्स स्क्वेअरला ती मी पुरेपुर साधली हे आता पुन्हा सांगायला नको.....:)
गार्लिक नॉट्स...यम्म्म
आता प्रश्न होता तो म्हणजे पोटपुजेचा...माझी लाडकी पोळी त्याच्या घरी करून द्यायचा माझा लाडीक हट्ट सत्यवान काही पुरवणार नाही हे माहित होते (खरं तर म्हणूनच मी ती ऑफ़र त्याला प्रत्येक पुष्पाच्या ब्रेकमध्ये दिली होती हे आता मेळावा संपून दुसरा आठवडा उजाडल्याने सांगायला हरकत नाय) तर खायच्या बाबतीतले सगळे हक्क मी आधीच वट्टुला दिले असल्याने त्याने त्याची चांगलीच वट असलेल्या मध्ये मला सगळ्यात ब्येस्ट पिझा म्हणजे फ़मिलिया या जगप्रसिद्ध दुकानात पिझा खायला नेलं..तिथेच गार्लिक नॉट या खाद्यपदार्थाशी त्याने माझा परिचय करुन दिला त्यामुळे नंतर रात्रीच्या सत्रासाठी आम्ही ते आठवणीने बांधून घेतले (आणि खायला आठवणीने विसरलो. म्हंणजे वट्टुने आतापर्यंत ते एकट्यानेच गट्ट्म केले असणार....)
चॉकलेट आइस्क्रिम कोई शक??
तर अशा प्रकारे पिझा खाल्यामुळे आम्हाला गोडाचे वेध लागले त्यामुळे मग नंतर लगेचच आम्ही आमचा मोर्चा "कोल्ड स्टोन"कडे वळवला..हे ठिकाण आमच्या लाइक मांइड्स मधलं आहे हे जाता जाता नोंदायला हरकत नाही.इथे तुम्हाला हवं ते आइस्क्रीम, त्यांतल्या अन्य पदार्थांसोबर थंड दगडावर मिक्स करून दिलं जातं..म्हणून कोल्ड स्टोन (अरेच्च्या हाही एका जळाऊ पोस्टचाच विषय आहे...)
तर त्यानंतर एक कॉफ़ी आणि एक चॉकोलेट फ़्लेव्हरच आइस्क्रिम हातात आल्याने चर्चा थोड्या मंदावल्या पण पटापट आइस्क्रिम संपवून चर्चासत्र आम्ही जारी ठेवले....
साधी राहणी आणि साधं खाणं
आता साधारण दहा वाजत आल्याने एका सभ्य मुलीला शांत कुटीरमध्ये न्यायची जबाबदारी कार्यवाहक या नात्याने सत्यवानाने (पुन्हा एकदा) आनंदाने पार पाडली.
आता मात्र चर्चेमध्ये आणखी एक प्रतिनिधी असावा असे आम्हांस वाटू लागले आणि तोच फ़ेबुचा फ़ोटो पाहून अचंबित झालेल्या खुद्द पोटोबा लेखिकेने दूरध्वनीवरून आपली हजेरी लावली..हा दूर ध्वनी इतका दूरवरून आला होता की त्यामुळे आमची पोटोबाची घरगुती सोय न केल्याने तिलाच आम्ही बोल  लावले....त्यातच माझ्यासाठी तर सत्यवानाला पोळी नाही तर निदान पापड तरी भाजून दे सदृश्य मागण्या मांडण्यात आल्या..अर्थात घेतलेल्या जबाबदार्‍या कशाप्रकारे झटकून टाकायच्या यावरती एक पी एच डी पूर्वीच झाल्याने मी निश्चिंत होते..शिवाय पहिल्या पुष्पाच्या दिवशीच शांत कुटीरचा एक मुआयना केल्यावर पोळीचं पीठ काय मीठही असेल की नाही अशा शंका आल्याने इथे काही आपल्या पाककुशलता सत्यवानाला दाखवून अवलक्षण करायची वेळ येणार नाही याची खात्री मा.म.ला होती...
त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या दिवसाचे पुष्प कशा प्रकारचे गुंफ़ायचे याच्या काही माफ़क चर्चा करून आम्ही दुसरे पुष्प संपवले..खरं तर तोस्तर तांत्रिक दृष्ट्या तिसरा आणि शेवटचा दिवस सुरू झाला होता हे पुन्हा एकदा सु.वां...च्या.....
तिसरा दिवस घाईत जाणार असे सुरूवातीपासूनच वाटत होते कारण पाहुणे मंडळीने किंवा खरं तर मी शांत कुटीरेच्या माझ्या कक्षात कागदपत्र, वायरी इ.ची बरीच गर्दी केली होती..ती आवरणे हे जिकिरीचे काम होते..कारण शांत कुटीरवाले यात काहीच सहकार्य करणार नव्हते..सहकार्य कस्लं खरं तर सकाळी भरपूर मस्का लावून पाव जातीने भाजून देऊन वर खाताना आणखी मस्का मारून मला आग्रहाने खायला लावले...लवकरच ही मस्कापट्टी मी कॉफ़ीची जबाबदारी घ्यावी म्हणून होती हे लक्षात आले.....अर्थात त्यामुळे शाही कॉफ़ी बनवायची संधी मला मिळाली...
बटर लावता लावता

या प्रसंगामुळे मला अर्थातच माझ्या घरी जसं एक काम तू, एक काम मी हे नेहमी सुरू असतं त्याची कमी भासली नाही... आणि हे सत्र अगदी जरा पेन दे नंतर आता मी पेन दिलं होतं तर पुस्तक तू घेऊन ये अशी सारखीच कामाची समप्रमाणात वाटणी करून वट्टूने आपली लाइक माइंड्सची पेटंट्स पक्की करायचं कामही हा मेळाव्यात हिरीरिने केलं...
हीच ती शाही कॉफ़ी
इथे एक महत्वाचा मुद्दा लिहायचा राहूनच गेलाय की मी पहिल्या पुष्पाच्या दिवशी पोहोचले तेव्हा शांत कुटीरमध्ये माझा स्वच्छ कक्ष पाहून मला मी नक्की अपेक्षा केली होती त्या घरात आले होते का या शंकेचं तिसर्‍या पुष्पात ज्या काही घरगुती गप्पा झाल्या त्यात झालं...ते म्हणजे निदान दोन दिवसांची का होईना पण नोटीस देऊन आल्यामुळे सत्यवानाने आपलं साफ़ सफ़ाई कौशल्य पणाला लावून मेळाव्याच्या स्वागत समितीचं काम एकहाती संपवलं होतं...मला पोळी करायची संधी मिळू नये याची सोयही तेव्हाच केली असावी असा त्यावेळी मला दाट संशय आला..
सगळ्यात जास्त रंगलं ते तिसरं सत्र..कारण इतक्या वेळ विस्मरणात गेलेले (अर्थात आम्हा दोघांचेच) ब्लॉग हा विषय यात होता...(विस्मरण या शब्दावर श्लेष आहे हे चा वांच्या.....) .चित्रपट हा सर्वच ब्लॉगर्सचा लाडका विषय त्यामुळे त्यावर एक साधक चर्चा सुरू झाली. पण चित्रपट कलावंत, त्यांची नावे आणि कहाण्या लक्षात ठेवायचं माझं कौशल्य पाहता (आणि या विषयावरच्या रसिक वाचक/ब्लॉगर्सची अनुपस्थिती लक्षात घेता) ही चर्चा बाधक होईल का अशी शंका येऊन त्याऐवजी चित्रपटापट सत्यवानाचं पुनरूज्जिवन करून आठवड्याला अनेक चित्रपट पाहून झाल्यावर निदान एका तरी चित्रपटावर पोस्ट लिहायची असा एक ठराव सर्वानुमते (म्हणजे मत मांडणं आणि ठराव पास करणं दोन्ही करणारी व्यक्ती मीच होते म्हणा) हां तर ठराव सर्वानुमते संमत झाला..
गाणी आणि आठवणीं या विषयावर एक छोटी चर्चा शेवटी मला गावंसं वाटावं लागण्यावर आली आणि मेळावा आटोपणार याचे बिगुल वाजायला लागले...(गाणं ऐकताना पेंगलेल्या सत्यवानाचे डोळे याची साक्ष देतच होते म्हणा)
अखेर बाहेर जेवायच्या बोलीवर शांत कुटीरेचा मी निरोप घेतला...खरं तर मेळाव्याच्या निमित्ताने त्या कुटीरेमध्ये केलेला कलकलाट, खादाडी, गप्पा, इ.इ. सोडून पाय निघत नव्हता..पण विमानतळाने आल्यावेळसारखेच सहकार्य केले तर कायमचाच मेळावा होण्याची सत्यवानाला काळजी लागली त्यामुळे वेळेच्या बाबतीत आम्ही कुठलंच कॉम्प्रोमाइज किंवा साध्या भाषेत आय एस टी केलं नाही..त्यामुळे सुसंगत चर्चा, खादाडी, फ़िरणे इ.इ. होऊ शकले हे सु.वां..च्या.....
परत निघाल्यावर ट्रेनने नवीन जर्सिमधून नवीन यॉर्कात जाणे या विषयावर खरं तर एक वेगळी कंपोस्ट होऊ शकते...(सत्यवान इथल्या इथे तुला निदान चारेक पोस्टींची संधी म्या उदार मनाने देत आहे...वाचतोय्स का??) या प्रवासात मला मी मुंबईच्या मेळाव्याला गेले होते तेव्हा असलेल्या मेगाब्लॉकची आठवण झाली एकंदरीत मेगाब्लॉक आणि मेळावा यांचं नातं जूनं दिसतंय तर..... शेवटी एकदाचे वेळेच्या थोडं फ़ार आधी पोहोचल्यावर मुंबईत रविवारी होणारा मेगाब्लॉक नव्या यॉर्कात शनिवारी दुपारी रंगीत तालीम म्हणून करतात की काय विचार असा एक टिपिकल मुंबैकरीण म्हणून माझ्या मनात डोकावून गेला.
एअरपोर्टची छोटी खादाडी
तर आमची वरात सुस्थितीत विमानतळावर पोहोचल्यावर एक शेवटचा खादाडी प्रयत्न झाला....आणि मग मात्र सेक्युरिटी चेक इनकडे पावलं वळवावीच लागली...
ब्लॉगिंगमुळे जर चार चांगल्या लोकांशी संबंध आले तर दोन जणांच्या मेळाव्यानेही बरंच काही (म्हंजे काय ते आता विचारू नका. पोस्ट प्लान्ड परिच्छेदांच्या कधीच पुढे गेली आहे...) साध्य होतं हे या तीन पुष्पांच्या निमित्ताने लक्षात आलं आहे..फ़क्त घरच्या सर्व मंडळींना पुन्हा लवकर वेठीस धरता येणार नाही याची कल्पना असल्याने पुढचा मेळावा ओरेगावात घ्यायचे योजिले आहे...तरी इच्छुकांनी विमानांची डिल्स पाहायला सुरूवात करावी..तारीख काय कधीही फ़ायनल करता येईल...
जाता जाता माझिया मनात एक जूनीच कविता नव्याने आल्याशिवाय राहवत नाही...
दोन ओंडक्यांची (आपलं ब्लॉगर्सची) होते नव्या जर्सीत भेट
एक डायरेक्ट फ़्लाईट दूर सारे
पुन्हा ओरेगावी (होईल तेव्हा) भेट.....
तळटीप...फ़क्त महत्वाचे काही फ़ोटो तातडीने वरच्या पोस्टमध्ये टाकण्यात आले आहेत...आणखी फ़ोटो सवडीने पिकासावर टाकण्यात येतीलच. इच्छुकांनी करभरणी (वाचा: आपली मौल्यवान प्रतिक्रिया/सूचना इ.इ.) देऊन नावनोंदणी करावी......:) आणि हो ही सक्तीची करभरणी का लागू झाली यासंबंधी काही शंका असल्यास जरा एकदा गुगलबाबांच्या वर्तुळात चक्कर मारून यावे...कसे...:)

Wednesday, September 21, 2011

गाणी आणि आठवणी १० - सखी मंद झाल्या तारका

सप्टेंबर २००६ मधला एक विकांत....नुकतंच घर घेतलं होतं आणि माझ्या मैत्रीण कम्पुमधल्या आम्ही चौघी एकाच देशात होतो..त्यातली एक तर फक्त तीन महिन्यासाठी होती...दुसरी तळ्यात मळ्यात आणि बाकी आम्ही दोघी तशा थोड्या आधीपासून अमेरिकेत होतोच.......मध्ये २००३ पासून एकमेकींचा संपर्क फक्त मेल आणि कधी तरी फोनवर होता...त्यातल्या एकीच लग्न झालं होतं पण अजून तिचा नवरा प्रत्यक्ष भेटला नव्हतं...त्यातल्या त्यात मी फिली, एक डीसी आणि दुसऱ्या दोघी नवीन योर्कात असल्यामुळे मी मध्यस्थी म्हणून एक विकांत भेटूया असं ठरलं ...
कुणाचे ५० % ,कुणाचे आणखी किती करता सगळ्या १००% वर आल्या आणि त्या सप्टेंबरमध्ये भेटलो...एकच रात्र होती...त्यात जीवाची फिली करून रात्री दमून आल्यावर पण त्या वर उल्लेख केलेल्या मैत्रिणीच्या नवऱ्याला जाम उत्साह होता म्हणून त्यानेच केलेल्या कॉफीचे कप घेऊन मस्त बैठक मांडून गप्पाची मैफल रंगवली...
लग्न झाल्यानंतरचे दिवस, त्यातले प्रत्येकाचे प्रश्न, एक ना दोन किती तरी विषय...आम्हा सर्वात तो नवखा आहे असं अजिबात वाटलं नाही...आणि मग कुठली मराठी मंडळी जमली की विषय गाण्याकडे वळतोच तसं आमचही झालं..

आपलीच लोक म्हटल्यावर प्रत्येकानेच सूर लावले...त्या दिवशी खूप सुंदर सुंदर मराठी आणि फक्त मराठीच गाणी आम्ही आठवली ...जमतील ती गायली आणि मग अचानक त्याने मला बाबुजींच त्याचं सर्वात आवडतं गाणं घेऊया का म्हणून विचारलं...ते गीत होत "सखी मंद झाल्या तारका....."

हे गाणं माहित तर होतच, पण त्या दिवशी गाताना त्याची सगळी कडवी माझ्या पूर्ण लक्षात आहेत असं अचानक मलाच साक्षात्कार झाला.त्याला पण आश्चर्य वाटलं...त्या दिवशी फक्त सुरुवात केली की लगेच शब्द पुढे यायचे...खरच ती रात्र खूप वेगळी होती...ती दादही...त्यासाठी आपला आवाज उच्च कोटीचा असायला हवा असं काही नाही...बस ती एक मेहफिल असते जी जमून जाते...
त्या निमित्ताने एखादं गाणं आपल्याला नव्याने भेटतं तसंच झालं..यात खूप काही आलापी नाहीत पण तरी "आता तरी येशील का?" हा प्रश्न खूप व्याकुळपणे विचारला आहे असं वाटतं...पहिल्या तीन कडव्यात थोडी पार्श्वभूमी तयार करून मग शेवटच्या कडव्याला "बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी...पण सांग तू येशील का?" हे सूर चढतात तेव्हा त्या सखीचा हेवाच वाटतो....
खरं म्हणजे हेच काय बाबूजींच्या कुठल्याही गाण्याबद्दल काही बोलावे असं निदान माझं तरी काही कर्तृत्व नाही पण तरी या गाण्याची आठवण लिहावीशी वाटते ती त्या दिवशी सूर जुळलेल्या आम्हांसाठी..
काय योगायोग आहे माहित नाही...त्या दिवशी आय पॉडमधल्या मराठी फोल्डरमध्ये randomly ऐकताना नेमक हेच गाणं लागलं आणि चटकन तीच रात्र आठवली...ते ऐकताना मनात आलं या सप्टेंबरमध्ये पाच वर्ष होतील....
आता पाहिलं तर आम्ही पुन्हा एकदा वेगवेगळ्या देशात आहोत...त्या नंतर ती आणि तिचा नवरा आम्ही फक्त एकदा भेटलो..पुन्हा कधीच न भेटण्यासाठी...एक नातं न बोलता विरून गेलं...बाकीच्या मैत्रिणीही पुन्हा एकदा मेलामेलीत आल्या...माहित आहे मला आम्ही पुन्हा कधीच एकत्र भेटणार नाही....त्याला कारणंही वेगवेगळी असणार आहेत...पण नसलो भेटणार तरी एक गाणं आहे माझ्याकडे जे मला त्या नितांत सुंदर विकांताची, आणि एकत्र गायलेल्या गाण्याची सुंदर आठवण नेहमीच सोबतीला देणार आहे.......

Saturday, August 6, 2011

मैत्रीचं नातं....

कॉलेजमध्ये असताना बरं असतं, नातेवाईकांची भूणभूण मागे लागली की मग मैत्री हे कसं सगळ्यात सर्वश्रेष्ठ नातं आहे...we can choose our friends इ. गोंडस वाक्यांनी आपण ते अधिक गोजिरं करतो पण खरंच आहे का तसं हे तपासण्याची वेळ केव्हा नं केव्हातरी याही नात्यात येतेच आणि मग महत्वाचं कुठलं रक्ताचं की मैत्रीचं? हा प्रश्न थोडं खिन्न करुन जातो.

मागे माझी एक मैत्रीण अमेरिकेतल्याच तिच्या कामाच्या जागी थंडी, जास्त माणसं नाहीत या आणि अशा अनेक कारणांनी कंटाळली होती. मग मी तिला म्हटले सुट्टी किंवा घरुन कामाचा पर्याय असेल तर माझ्या घरी ये आठवडाभर. आरुषचा जन्म व्हायच्या आधीचा शेवटचा महिना होता म्हणून मीही घरीच होते. मलाही सोबत आणि तिलाही चेंज..अर्थात अगदी आयत्यावेळी नेमकं तिला कामावरुन सुटता आलं नाही आणि ही भेट शेवटी कायमसाठी राहिली. जरी त्यावेळी त्या प्रोजेक्टचा ताबा तिच्याकडे होता तरी तिला कसं निसटता आलं नाही हा प्रश्न मला पडला होता पण मी माझ्याच मनाला समजावलं की तुला सोबतीपेक्षा तिची नोकरी जास्त महत्वाची आहे.

नंतर पुलाखालून थोडं-फ़ार पाणी वाहून गेलं. कंटाळून ती परत मायदेशीपण गेली आणि आता एक दिवस ती पुन्हा इथे एक महिन्यासाठी येतेय असा संदेश आला. तेही कामासाठी नाही तर भाच्याला पाहण्यासाठी मस्त एक महिन्याची सुट्टी काढून.मला पुन्हा एकदा आनंद झाला.म्हटलं आता यावेळी एखाद-दोन दिवसाची धावती भेट इथेही दे. मी तसंही घरून काम करते. अर्थात हे होणार नाही हे मला चांगलंच माहित होतं आणि त्याचं कारण म्हणजे खरं तर मी तिच्या स्थळापासून बरीच दूर आहे आणि इतक्या अवास्तव अपेक्षा मी ठेवल्याही नसत्या.पण...तरी हा पण आहेच...निदान एक फ़ोन इतकी साधी अपेक्षा मात्र मी ठेवून बसले होते...आणि मग जेव्हा तितकाही वेळ तिला मिळाला नाही असं दिसायला लागलं तेव्हा न राहवून मीच फ़ोन केला. मला वाटतं तोवर तिला परत जायलाही एक-दोन दिवस उरले असावेत. का कुणास ठाऊक न कळत मी माझ्या मनात साचलेलं थोडंफ़ार बोलुन गेले. आम्ही चांगल्या मैत्रीणी आहोत त्यामुळे तिनेही मला फ़ोनवरतरी उलट काही झापलं नाही. आमच्या मैत्रीलाही या संवादामुळे कुठलाही धक्का पोहोचला नाहीये. पण एक मात्र खरं मी पुन्हा त्या सुरुवातीच्या we cannot choose our relatives च्या लुपमध्ये गेलेय.

मायदेशात गेलं तर हे अनुभव नेहमीचेच असतात. मागे इथे माझ्या नवर्‍याची एक मैत्रीण आली होती. जवळ म्हटलं तरी दीड तासाचं ड्राइव्ह. पण आम्ही अगदी जाऊन तिला आणलं. नेमकं मुलाचा पहिला वाढदिवस त्यामुळे खूप गडबड होती पण तिला वेळ दिला. त्यात फ़क्त परत जाताना स्वतः जायच्या ऐवजी पार्टीतलं कुणी तिच्याच भागात जात होतं त्यांच्याबरोबर पाठवलं तर तिच्या चेहर्‍यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. आणि त्यानंतर आम्ही गेलो तेव्हा मात्र बाईसाहेबांना भेटायला यायला मुंबईतल्या मुंबईत आमचा मुक्काम सेंट्रल-वेस्टर्न असा वेगळ्या लाइनीवर होता तर जड गेलं आणि नंतरच्या मायदेश दौर्‍यात तर स्वतःहून फ़ोन करायचंही सौजन्य नाही. काय म्हणायचं या मैत्रीला?

खूप उलट-सुलट विचार केला की वाटतं, कितीही नाही म्हटलं तरी रक्ताचं नातं म्हणून ज्या काही adjustments केल्या जातात त्या सगळया मैत्रीसाठी किती जणं करतील? अगदी मला स्वतःला इथे खूप कंटाळा येतो म्हणून माझ्याकडे मी जर कुणाला राहायला बोलावलं तर तो येईल? की त्यांच्या सख्ख्या भाऊ-बहिणीकडे ही परिस्थिती असेल त्यासाठी सगळ्या कामाच्या आणि घरगुती adjustments करुन जाईल?? उत्तर स्पष्ट आहे. मग का आपण असं उगाच म्हणतो की मैत्रीचं नातं वेगळंच म्हणून? वेगळं म्हणजे जिथे अपेक्षा जरी नाही ठेवल्या तरी त्यांची पूर्ती करण्यासाठीची तशी गरज नसते असं काहीसं आहे का?

अर्थात सगळीकडेच असं नसतं..म्हणजे वर म्हटलेले प्रसंग आहेत तसेच त्याच्याच विरोधी घडलेल्या घटनाही आहेत..तरीही जितकी जास्त लगबग रक्ताच्या नात्यांसाठी केली जाते तितकं लक्ष काहीवेळा मैत्रीकडे दिलं जातं का? किंबहुना हा आपला मित्र/मैत्रीण आहे म्हणजे नातेवाईकांसारखं तो काही आपल्यावर रागावणार नाही असं थोडं taken for granted मत बरेचदा असतं..आपणही मैत्रीमध्ये तेवढं माफ़ करतो आणि विसरुन पुन्हा मैत्री जोडतो कारण मैत्री ही नेहमी हवीहवीशी असते.

नवनवीन मित्र-मैत्रीणी जोडले जातात. माझ्याकडून ते सर्व माझ्या संपर्कात राहतील असे प्रयत्न मी नेहमीच करते..आता तर इमेल, सोशल नेटवर्किंग साइट्स, नेट, चॅट यासर्वांमुळे संपर्क करणेही सुलभ झालंय. पण तरी कुठेतरी जर कम्युनिकेशन गॅप आली की मग अंतर पडू लागलं की मग ते नातं पुन्हा जोडणं कठीण होतं; तसं होऊ न देणं याचा आपण नेहमीच प्रयत्न करावा असं आजच्या या आंतरराष्ट्रीय मैत्री दिनी स्वतःलाच सांगावंस वाटतं..

लहानपणी एकदा शाळा बदल,मग घर बदल आणि त्यानंतर कॉलेजमध्येही बारावीतलं कुणी माझ्याबरोबर असं नव्हतं. त्यामुळे नाही म्हटलं तरी "लंगोटीयार" का काय म्हणतात ते मला नाहीत. पण तरी आतापर्यंतच्या वाटचालीत भेटलेल्या मैत्रीचा मोठा गोतावळा आहे..हा ब्लॉग सुरु केल्यानंतर ब्लॉगमुळेही बरेच नवे मित्र-मैत्रीणी मिळाले...वेगवेगळ्या वेळी भेटलेल्या या सर्वांचं मोल माझ्यासाठी खूप आहे. त्या त्या काळासाठी त्यांचं माझ्याबरोबर असणं महत्त्वाचं आहे.अशा सर्व मित्र-मैत्रीणींना मैत्री-दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

HAPPY FRIENDSHIP DAY !!!

Tuesday, April 28, 2009

मैत्रीबद्द्ल थोडे वेगळे काही....

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो, गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं, अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....
सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे, त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....
आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा
अलिकडेच वाचलेला एक स्र्कॅप.. "मैत्री" आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात हमखास येणारं नातं. जेवढं लिहावं तेवढं कमीच. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. पण कुठेतरी नक्कीच भावलेला. मैत्रीचं नातं कायम राहो असंच वाटतं पण असाही क्षण येतो जेव्हा हेही नातं दुरावलं जातं. कधीकधी कळतही नाही की ह्या दुराव्याची सुरुवात केव्हा झाली आणि जेव्हा कळतं तेव्हा फ़ारच उशीर झालेला असतो.
माझ्या कॉलेजमधल्या काही मैत्रीणी जेव्हा मेडिकलला गेल्या तेव्हा साधारण लक्षात आलं की हा एकमेकींना न देता दिलेला निरोपच आहे. त्यावेळी इ-मेल आणि चॅट या भानगडी पण नव्हत्या. अगदी सुरुवातीला एकमेकींना पत्र लिहिली गेली पण मुंबईतल्या मुंबईत ज्या होत्या त्यांच्याशी संपर्क तुटलाच. तरी मुंबईबाहेर शिकणा-या दोन मैत्रीणी पत्ररुपी भेटीने टिकुन राहिल्या...आता आम्ही इ मेलवर अपग्रेडपण झालो. नशीब...
ईंजिनियरींगची काही लोक ओरकुटरुपाने पुन्हा भेटले. पण कॉलेजमधली चार वर्ष जिच्याबरोबर खूप धमाल केली ती हळुहळु कशी लांब गेली हे कळलं तरी चुकवु शकले नाही. आता पुन्हा लग्न-मुल झाल्यावर संपर्क आला पण ती पुर्वीची निखळ मजा येत नाही असं वाटतं....कधीकधी तर काय कस चाललंय च्या पुढे गाडी जात नाही.
याच दरम्यान पक्षीनिरीक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मैत्रीची नवी पालवी फ़ुटली. आता स्वत:मध्येही बरीच मॅच्य़ुरिटी आली होती. ही माझी मैत्रीण माझ्यापेक्षा वयाने मोठी, घरातली एकुलती एक, व्यवसायाने प्राध्यापिका. हा काळ म्हणजे नव्याने बेस्ट फ़्रेन्ड्स बनवण्याचा नव्हता. आम्ही सर्व एकत्र भटकायचो. काहीवेळा बोलता बोलता वाद होत, पण तात्पुरते. जेव्हा भेटणार तेव्हा आणि इतर वेळी फ़ोनवर मनमुराद गप्पा मारणार. वैयक्तिक प्रश्न माहित जरी असले तरी एकमेकांची इच्छा असेल तरच त्याची चर्चा. आयुष्यात वेळेवर जोडीदार न भेटलेली पण त्याबद्द्ल जास्त खंत न करता नेटाने बाकीच्या सर्व गोष्टींचा, छंदांचा मनमुराद आनंद लुटणारी आमची ही मैत्रीण खुपदा आमच्या हेव्याचा विषयही बनली.
नंतर मी देशाबाहेर असल्याने नाही म्हटलं तरी थोडी गॅप आली पण २००५ च्या भारतभेटीत शिवाजी पार्कच्या गर्दीत आम्हाला बरोबर हुड्कुन काढून भेळेची पुडी हातावर ठेऊन "खा..काही होत नाही पोटाला" म्हणून जमवलेली गप्पांची मैफ़ल आवरण्याचं कारण पार्कात व्हायला लागलेला अंधार !!! पुन्हा निघायच्या आधी नेब्युलाबाहेर खात खात निरोपाच्या गप्पा मारताना गलबलुन आलं पण पुन्हा भेटणार याची खात्री.
२००८ च्या फ़ेब्रुवारीत एकदा घरी फ़ोन लागत नव्हता आणि अचानक लक्षात आलं की आपली गुड न्य़ुज अजुन कळवली नाही म्हणुन हिच्याकडे फ़ोन केला. बरं नाही म्हणुन आज जास्त बोलुया नको हे थोडं विचित्र वाटलं पण म्ह्टलं पुढ्च्या महिन्यात पुन्हा फ़ोन करुया.. अजुन एका कॉमन मित्राला पण याविषयी म्हटलं तर त्यानेही काही जास्त लक्ष दिलं नाही. नंतरचे दिवस स्वतःच्या होणा-या बाळाच्या तयारीत फ़ोन राहुनच गेला आणि दुस-या मित्राची इ-मेल आली....our dear friend is no more.......एकदम गळुन गेले...पाठोपाठ बाकीच्या सर्वांनी मला खास करुन खूप विचार न करण्याची ताकीदही दिली....
शेवटच्या स्टेजला कळलेला कॅन्सर दोन महिन्यात तिची सुटका करुन गेला. कसं पचवायचं, तिच्या आईला फ़ोन करायची पण हिम्मत झाली नाही. काही महिन्यापुर्वी मुंबईत गेल्यावर भेटुन आले पण आतुन कुठे तरी धागा तुटल्यासारखा झाला होता. आजपर्यंत अनेकदा मैत्रीच्या पडत्या काळात मनाला सांभाळता आले. नव्या मैत्रीने आयुष्यात स्थान मिळवले पण हा दुरावा कधी न भरुन येणारा आहे. वरचा स्क्रॅप वाचताना मला या दुराव्याचीच तीव्रतेने आठवण होतेय...मागच्या एप्रिलमध्ये कायमसाठी दुरावलेल्या माझ्या मैत्रीणीसाठी हा धागा समर्पित.