Wednesday, December 30, 2009

२००९ ला निरोप

सध्या ब्लॉग्ज, वृत्तपत्रं, फ़ॉर्वड मेल्स सगळीकडे २००९ ला निरोपाच्या भाषा सुरू आहेत त्यामुळे थोडंसं टॅगच्या पोस्टसारखं ठरवलं आपणही देऊया आपला एक छोटासा निरोप आणि येणार्या वर्षासाठी शुभेच्छा. आपण कितीही घोष केला की हिंदु नववर्ष आता नाही पाडव्याला तरी काय आहे, शेवटी रोज जी तारीख लिहितो तिचं वर्ष बदलायचा दिवस १ जानेवारीलाच येतो. म्हणजे या नववर्षापासून कुणाची सुटका नाही.
तर काय काय घडलं २००९ मध्ये माझ्याकडे? काही नाही एका साध्यासुध्या मराठी घरात घडू शकेल तेच...सगळं घरगुती तरीही खास. सगळ्यात पहिलं मागची थंडी आवरता आवरता हा ब्लॉग चालु केला आणि आठवड्यामाजी काही बाही लिहून चालुही ठेवला. खरं तर विश्वास बसत नाही की चक्क २९ लोकांना या ब्लॉगशी दोस्ती करावीशी वाटली आणि जवळपास दहा हजार भेटी. अधेमधे काही लिहायची प्रेरणा म्हणजे माझे फ़ॉलोअर्स आणि आवर्जुन मिळणार्या प्रतिक्रिया.
त्यानंतर मुख्य म्हणजे मुलाचा पहिला वाढदिवस. कालपरवापर्यंत रांगणार्या आणि महिन्यांमध्ये मोजणी होणार्या बाळाला वाढदिवशी औक्षण करताना आधीचं वर्ष लख्खपणे तरळलं. आईची खूप आठवण झाली त्याच्यासाठी पण आई नाही येऊ शकली तरी भारतातून त्याची आत्या आणि नवर्याची एक मैत्रीण येऊ शकले हा बोनस. आता एका मित्राच्या भाषेत सांगायचं तर terrrible two चालु झालेत.
त्यानंतर बी.एम.एम.ची तयारी. जे काही थोडं-फ़ार करता आलं वॉलेंटियर म्हणून त्यातल्या शेवटच्या टप्प्याचं काम आणि मग मुख्य तीन दिवसांची धमाल. खूप सारे कार्यक्रम, भारतीय जेवण, मैत्रिणींशी गप्पा, थोडंफ़ार गॉसिप आणि बरंच काही पण फ़ुल टू मजा. त्यानंतरही जवळच्या मराठी मंडळात कार्यकारिणीत असल्याने वेगळी धमाल होतीच. सणावारी कार्यक्रम, त्याच्या मिटिंग्ज, थोडंफ़ार वेबचं काम शिकणं असं काही ना काही चालुच होतं.

उन्हाळा म्हटला की काहीतरी हिंडण्या-फ़िरण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे तसं ऑगस्टच्या सुरूवातीला लेक जॉर्जला जाऊन आलो. एकदम रिलॅक्सिंग जागा आहे. खरं तर फ़ॉलमध्ये गेलं तर रंगांचा बहर फ़ार छान पाहता येईल. पण उन्हाळ्यात बोटिंग आणि मोठमोठ्या दिवसांची मजा लुटायलाही अगदी योग्य.

त्यानंतर नेहमीचं रूटिन चालु असतानाच एकदम कोस्ट-टु-कोस्ट घरंच बदललं. आई आली आमच्याबरोबर राहायला. आणि नव्या जागी जायच्या आधी घरी आईसोबत मुलाला एकटीने सांभाळायचा वेगळा अनुभव. सॉलिड दमायला व्हायचं आणि कायम डोक्यात काही ना काही काम नाचत असायचं.अगदी गाडीचं सर्विसिंग राहिलंय इथपासुन ते घर दाखवायचं एक ना दोन.. कुणी विश्वास ठेवो न ठेवो पण कुठलंही डाएट न करता त्या तीनेक महिन्यात माझ्या वजनाचा काटा आपसुक खाली आला. असो...
सगळं आवरून कसंबसं कडाक्याची थंडी पडायच्या आत निघालो आणि जवळजवळ दुसर्याच आठवड्यात तिथे जुन्या जागी बर्फ़ पडल्याचं मैत्रीणीने कळवलं. म्हटलं नशीब नाहीतर मुव्हिंगमध्ये हाल झाले असते.
इथे महिनाच होतोय आताशी, नव्या जागी रूळायचं काम पुढच्या वर्षातच होणार आता. पण सध्यातरी सरत्या वर्षाला शांततेत निरोप आणि येणारं वर्ष सर्वांसाठीच आशेचे किरण घेऊन येवो ही अपेक्षा.....

Tuesday, December 29, 2009

तो भुरभुरतोय...

खरं तर थंडीवर आणि त्यातल्या त्यात बर्फ़ावर लिहायचं नाही असं फ़िली सोडताना असं जाम ठरवलं होतं. एकतर ओरेगावात जास्त बर्फ़ नसतो हे आणि दुसरं कारण असं काही नाही पण जितकं थोडा थोडा बर्फ़ पडताना पाहाणं छान वाटतं तितकाच वैताग तो गाडीवरून आणि घराबाहेरून काढताना येतो आणि मुख्य त्यानंतर बरेच दिवस रेंगाळणार्या थंडीचा. त्यामुळे तोंडदेखलं बर्फ़ाचं कौतुक करा आणि मग नंतर कंटाळा आला म्हणा म्हणून टाळलं...
आजही इथल्या हिवाळ्यासारखी डिमेन्टर्सवाली गडद धुक्याची सकाळ सुर्याचा पेट्रोनस चार्म घेऊन नाही येणार हे जरी माहित होतं तरी थोड्या फ़्लरीज सुरू झाल्या आणि पुन्हा तेच "वॉव! स्नो फ़ॉल" असं वाटणं झालंच....मग पुन्हा थोडा वेळ तो थांबला आणि दुपारनंतर तो छान भुरभुरतोय..अशावेळी हातात चहा नाहीतर कॉफ़ीचा कप. आणि भजी बिजी असतील तर काय बहारच...सध्या तरी मागच्या वर्षीचा फ़ुटातला बर्फ़ आठवतेय आणि इथल्या इंचवाल्या बर्फ़ाचा आस्वाद घेताना राहावत नाही म्हणून ताजे घेतलेले फ़ोटो टाकतेय....चला व्हाईट ख्रिसमस नाहीतर नाही पण आत्ता सगळीकडे पांढरी चादर पसरतीय आणि या वर्षी बर्फ़ साफ़ करायची भानगड नाहीये...घर भाड्याचं असल्याने...त्यामुळे मस्त निवांत आनंद घेतोय....

Wednesday, December 23, 2009

ईशान्येकडून वायव्येकडे

माझ्या आईचं एक पेटंट वाक्य म्हणजे जोडीला जोडी बरोबर मिळते; कंजुसला चिकट आणि हुशारला दिड शहाणा..इ.इ....जोक्स अपार्ट..आमच्या दोघांच्या बाबतीतही ते बर्याच अंशी खरं आहे. ते म्हणजे कंजुस आणि हुशार असं काही नाही पण प्रवासाचं, नवनव्या जागा पत्ते काढून फ़िरण्याचं वेड दोघांनाही सारखंच आहे. त्यामुळे सुट्ट्या, डिल्स, विकेंड या सगळ्याचा नेहमीच पुरेपुर लाभ आम्ही उठवला आहे. मागची काही वर्षे फ़िलाडेल्फ़ियाच्या जवळ राहिलो तेव्हा तर फ़िरायची मजाच होती. कारण अमेरिकेतील दोन महत्वाची शहरं एक म्हणजे देशाची राजधानी वॉशिंग्टन डि.सी. आणि आर्थिक राजधानी न्युयॉर्क यांच्या मध्ये हे वसलंय; शिवाय जवळपास ड्राइव्ह नाहीतर विमानाने जाऊन पाहाता येणारी भरपूर ठिकाणं म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच.
मागे एकदा कामासाठी मी कॅलिफ़ोर्नियामध्ये होते. तिथलं वेगळं हवामान, निसर्ग पाहुन मी सहज एकदा याला म्हटलं, ’एकदा वेस्ट कोस्टला राहायला पाहिजे रे म्हणजे सगळी छोटी छोटी ठिकाणं पाहता येतील’. माझी वाणी इतक्यात खरी होईल असं वाटलं नव्हतं. पण नेमकी कामाची एक चांगली संधी पाहुन माझ्या बेटर हाफ़ ने आमचा मुक्काम हलवला आणि मागच्याच महिन्यात आम्ही आलो ते ओरेगन राज्यातल्या पोर्टलॅंडजवळ.


म्हणजे ईशान्येकडून वायव्येकडे म्हणजेच नॉर्थ इस्ट मधुन नॉर्थ वेस्टकडे. अमेरिकेचा नकाशा म्हणजे एक आयत आहे असं पकडलं तर त्याच्या उजव्या कोपर्यातल्या साधारण वरच्या भागातुन बरोबर डाव्या बाजुच्या वरच्या भागात कसं जाल तसं...जवळ जवळ आडव्या सरळ रेषेसारखं. नुसतं नकाशात पाहिलं तरी कळतं किती लांबचा पल्ला आहे तो..
खरं बोलताना मी मागे तसं बोलले पण जेव्हा खरंच इतक्या लांब सगळं बांधुन जायची वेळ आली तेव्हा मात्र ते शब्द मागेच घ्यावे असं वाटलं होतं. पण अर्थातच आता ते शक्य नव्हतं. घर सोडून पाहिलं आणि एकदाचे ओरेगावला (असं आम्ही आपलं लाडाने म्हणतो म्हणजे मुंबईची आठवण होते. गोरेगाव सारखं ओरेगाव.."फ़क्त इस्ट की वेस्ट ते सांग"..इति नवरा :)) आलो.
मागचे महिनाभर राहताना पुन्हा एकदा मनातल्या मनात अमेरिकेतल्या विविधतेला सलाम करतेय. अर्थात हा देशच इतका मोठा आहे की एक म्हणजे देशातल्या देशात सगळीकडे किती वाजलेचा वेगळा गजर, भिन्न टाइम झोनमुळे. त्यात निसर्गाने सगळीकडे इतकं भरभरून आणि वेगवेगळं दिलंय त्याने मी तर नेहमीच थक्क होते. नावाला म्हणायचं दुसर्या भागात आलो पण दुसर्या देशात आल्यासारखंच.


नॉर्थईस्टमध्ये मुख्य चार ऋतु वसंत(स्प्रिंग), उन्हाळा(समर), हेमंत (फ़ॉल) आणि अर्थात हिवाळा(विंटर). पानगळतीची मजा घेऊन कडाक्याच्या थंडीतल्या लांबलचक काळोख्या रात्री बर्फ़ाने पांढर्या होताना पाहायची सवय जडलेलो आम्ही आता इथे सरत्या हेमंतात आलो तरी इथे मस्त हिरवं हिरवं आहे. त्याचं मुख्य कारण इथं असणारे देवदारांच्या रांगा. तशी पानगळतीची झाडंही आहेत.


माझ्या खिडकीसमोरच एक होतं त्याची पानं जरा उशीरानेच गळली पण तसा फ़ारसा फ़रक पडत नाही इतक पाइन्सनी त्यांना कव्हर अप केलंय. इथेही म्हणायला चार ऋतु पण मुख्य पावसाळा आणि उन्हाळाच असं इथल्या लोकल्सशी बोलताना जाणवलं. थंडी जास्त नसावी असा विचार करतच होतो तोच एक आठवडा आक्टिर्कवरून थंडीच्या लाटेन जे गारठलो तेव्हा फ़िलीपण फ़िकं वाटलं. पण नशीब एक दहाच दिवस असं होतं पुन्हा आपली गुलाबी थंडी म्हणजे तापमान साधारण ० ते ११ च्या दरम्यान. रात्री जातं शुन्याच्या खाली पण तोस्तर आम्ही घरच्या हिटरमध्ये गरमीत असतो. त्यामुळे चालतं..जसं मी वेस्टात जाऊया म्हटलं तसंच नॉर्थइस्टला असतानाची नेहमीची रड म्हणजे इथे मान्सुन नाही रेची. म्हणजे पाऊस होता पण कधीही येणारा आणि एखादा दिवस फ़ारफ़ार तर तीन-चार दिवस सरळ असा..आपला भारतासारखा नाही. पण होल्ड ऑन..बहुतेक माझी जीभ काळी आहे...(बहुतेक नाही आहेच..इति अर्थातच...अर्धांग...) ती पावसाची कमी आता बहुतेक (पुन्हा बहुतेक नाही शंभर टक्केच) भरुन निघणार असं दिसतंय..गेले दहा दिवस रोज सतत आणि संततची पर्जन्यधार. सुर्यमहाराजही दिसत नाही आहेत...
इथे येतानाच्या काहीच दिवस आधीचा एक विचित्र योगायोग म्हणजे आधीच्या लायब्ररीच्या बुकसेलमध्ये चक्क हरि कुंभार (म्हणजे माझा लाडका हॅरी पॉटर हो) दिसला..मग काय उचललंन त्याला लगेच दोन डॉलरमध्ये...आणि नेमकं ते तिसरं अजकाबानच्या कैद्यावालं का निघावं...त्यातले डिमेन्टर्स आहेत ना तसं सकाळी धुकं आणि मळभ दाटुन येतं आणि दिवसभर थेंब थेंब आभाळ गळून सगळा आनंद एक्सॅक्टली डिमेन्टर्ससारखाच घेऊन जातात..म्हणजे पाऊस आणि पावसाळा मला खूप खूप आवडायचा असं भूतकाळात म्हणावं लागणार इतका पाऊस. पण जाऊदे काळ्या जीभेने जास्त न बोललेलं बरं असं तुर्तास ठरवलंय...

पण तरी पेला बराच अर्धा भरलाय बरं का? बर्फ़ नॉर्मली नसतो पण झाला की सॉलिड ही अर्थातच आमच्या साशाची टीप...तर असो. आल्या आल्या एकदा पॅसिफ़िकच्या एका बीचवर जाऊन आलो. टच ऍन्ड गो सारखंच गेलो..कारण बरंच थंड होतं....मला तर बीच खूप आवडला. नॉर्थईस्टमधल्या अटलांटिकच्या किनार्यापेक्षा खूप वेगळा जास्त उसळणारा सागर वाटतोय. तसंही आम्ही पॅसिफ़िक हवाईच्या किनार्यांवर पाहिला होता तेव्हापासून मी त्याच्या प्रेमात आहेच..(मरो ती काळी जीभ...विसरूया आता तिला...:))
आताही सगळं नॉर्थइस्ट स्नो स्टॉर्ममध्ये बुडलंय तर त्यांच्या दु:खात सामील व्हायला म्हणून खास इथल्या डोंगरांमध्ये जाऊन आलो. मस्त बर्फ़ही होता आणि शब्दात मांडू शकणार नाही असं निसर्गसौंदर्य...फ़ोटोच टाकते..काय म्हणायचं ते कळेल.


खरं सांगायचं तर एक महिना आणि त्यातही थंडी (ती अमेरिकेत कुठेही जा त्रास देतेच...तिला आवडतं) हे कॉंबिनेशन असं आहे की इतक्यात काही भाष्य करणं कठीण आहे.फ़क्त बरीच वर्ष एकाच ठिकाणी राहिल्यामुळे त्या जागेबद्द्लची जी सहजता येते ती इतक्यात येणार नाही पण इथेही आमच्यासाठी काही खास असेल.नवी ठिकाणं, परिचय आणि बरंच काही येत्या काही महिन्यात ब्लॉगवर नक्की लिहायचा प्रयत्न करेन. तुर्तास माझ्या मागच्या घरासंबंधी पोस्टना ज्या सर्वांनी प्रतिक्रिया देऊन माझा धीर वाढवला त्या सर्वांचे आभार नाही पण ही पण पोस्ट खास त्यांना इथली खुशाली कळावी म्हणून.. लोभ आहेच तो असाच वाढुदे...आपण अप्रत्यक्षरित्या "माझिया मनास" नेहमीच दिलासा देता ही या सरत्या वर्षातलीच जमेची बाजु...असो..जास्त सेंटि होईन मी....तर कळावे....इतक्यातच आम्ही ईशान्येकडून वायव्येकडे सुखरूप एक अख्खा महिना काढलाय...

Tuesday, December 22, 2009

धागा वाढता वाढता वाढतोय.....

टॅगला धागा म्हटलं तर चालेल ना? महेन्द्रकाकांनी टॅगलंय म्हणून पहिले जाऊन त्यांची उत्तरं पाहिली आणि मग गौरी आणि मग जी...बापरे इनफ़ायनाईट लुपसारखी भटकणार की काय...इंजिगियरींगची सवय सगळ्यांच्या असाइनमेन्स्टस पाहुन मग त्यातल्या निवडक उत्तरांमधुन आपलं युनिक उत्तर बनवायचं...चला त्यानिमित्ताने गौरी आणि जी यांचीही उत्तरं पाहुन ठेवलीयत...
आता प्रयत्न करतेय माझी युनिक उत्तर लिहायचा. सुचलं तसंच लिहिणार तसंही ब्लॉगवर काय लिहायच पेक्षा कसं कारण दोन मिन्ट लॅपटॉपवर बसलं तर लेकरू लगेच बाजुच्या खुर्चीवर जमेल तसं चढुन पुढचा पाय टेबलवर मग काय उठा असं चाललंय...त्यामुळे एका शब्दात लिहिलं तर होईल तरी. पण मी शक्यतो वाक्य नाही लिहिणार....कृपया स्वल्पविराम आणि टिंबांमुळे वाढलेल्या उत्तरांना फ़क्त शब्दमर्यादा वाढवली असं म्हणुया फ़ार तर पण आपण महेन्द्रकाकांसारखं नाही हं....मुळीच नाही....वाक्य बिक्य....अह्म्म्म्म....
हे सगळे प्रश्न पाहताना उगाच लोकप्रभेसारख्या मासिकात सु(?)प्रसिद्ध व्यक्ती आपल्या आवडी-निवडी लिहितात ना तसं वाटतंय...हे हे...काय हरकत आहे एक दिवसाची सु(?)प्रसिद्धी....चलो...नमनालाच तेल ओत ओत ओततेय....

1.Where is your cell phone?
किचनच्या काउंटरवर...वाट पाहातोय नवरा दिवसात एकदा तरी फ़ोन करेल याची...................

2.Your hair?
आहेत अजुन तरी...काही डोक्यावर काही बाळाच्या मुठीत....पण आहेत...शिल्लक..

3.Your mother?
माझी सखी

4.Your father?
फ़िरणं, गप्पा, तळण खाणं.....

5.Your favorite food?
सध्या तरी आयतं पानात आलेलं काहीही....आणि नंतर भांडी आवरणारं पण कुणी देईल ते....उदा. भाग्यश्रीताईंची पाणीपुरी, इ.इ.....

6.Your dream last night?
रोजचं एकच स्वप्न...आरूष झोपेतुन उठून रडतोय आणि मी नवर्याला त्याला घ्यायला सांगते आणि मी अर्थातच शांत झोप घ्यायचा प्रयत्न....

7.Your favorite drink?
शहाळ्याचे पाणी

8.Your dream/goal?
फ़क्त स्वतःसाठी काम करणं....या कंपनीसाठी त्या कंपनीसाठी बास.......कंटाळा आलाय...

9.What room are you in?
डायनिंग एरिया...त्यातल्या त्यात सेफ़ जागा वाटतेय लॅपटॉपसाठी....

10.Your hobby?
निसर्गभ्रमंती...सध्या जवळजवळ थांबलीय...

Reading
आवडते ब्लॉग्ज, हरी कुंभाराचं अझकाबानचे कैदी कितव्यांदातरी.....

11.Your fear?
सगळे पाळीव (?) आणि मोकाट कुत्रे/मांजरी

12.Where do you want to be in 6 years?
माझी मुंबई...

13.Where were you last night?
वाटलं तरी कुठे जाऊ शकतो का सद्यपरिस्थितीत..नाहीतर गेलो होतो कधीतरी पब लाइफ़ पाहायला म्हणून...जो काही सांस्कृतिक धक्का बसलाय की त्यानंतर रोज फ़क्त रात्रीचे मूलंच....

14.Something that you aren’t?
तोंडावर गोडबोलायचं आणि मागून मार-मार मारायची....

15.Muffins?
बनाना वॉलनट फ़क्त नवरा आणतो म्हणून आणि मग फ़क्त त्याच्याबरोबर चाखायचं म्हणून....

16.Wish list item?
खरंच मोठी आहे.....आणि थोडी कंटाळवाणी....

17.Where did you grow up?
वसई, जि. ठाणे..म्हणजे टेक्निकली मुंबई...

18.Last thing you did?
पोराचा डायपर बदलला...(हात धुतलेत अर्थातच....)

19.What are you wearing?
हिरवा आणि राखाडी...थोडक्यात जे मिळालं ते....

20.Your TV?
पॅनासोनिक त्याच्यावर झी सारेगमप चाललंय आणि नको तिथे वरचे नी पाहायचं कर्मात.....पार्शालिटी नेहमीप्रमाणे...जाऊदे...भरकटतेय....

21.Your pets?
सध्यातरी मुलगाच आणि नेहमीचाच तोच...

22.Friends?
वृक्ष आणि काही काही वल्ली....

23.Your life?
चाललंय नेहमीचंच....

24.Your mood?
सेलेब्रेटी...

25.Missing someone?
हो....कामवाली..............:(

26.Vehicle?
सगळ्या देशी लोकांची इथे असते तिच....कुमारी टोयोटा ...(टोयोटा कॅमरी यार...)

27.Something you’re not wearing?
कानातले...सगळ्यात पैलं लेकाच्य हातात लागतात ना आजकाल....

28.Your favorite store?
ट्रेडर जोज, खादी ग्रामोद्योग...ही खरेदीसाठी आणि नुस्तं पाहायला मुंबैतलं मेसिज उर्फ़ शॉपर्स स्टॉप
Crosswords/Landmark
पाइन्स

Your favorite color?
पांढरा आणि गोड गुलाबी....(टॉम बॉय कॅटेगरीपण शेवटी मुलगीच असतात असं अचानक लक्षात आलं)

29.When was the last time you laughed?
सक्काळीच बापाच्या मागे पोरगा त्याचा बाथटब घेऊन गेला ते ध्यान पाहुन....हे हे....

30.Last time you cried?
घर सोडताना मागच्या महिन्यात

31.Your best friend?
जगभर कामासाठी फ़िरतोय...

32.One place that you go to over and over?
diaper changing station....

33.One person who emails me regularly?
सध्यातरी ब्लॉगस्पॉटवाले...प्रत्येक कॉमेन्टसाठी इमाने इतबारे मेल करतात बिचारे...बाकीच्यांनी इमान कधीच सोडलंय...

34.Favorite place to eat?
गजाली, पी एफ़ चॅंग, तंदुरी मिळेल ती सगळी आणि दादरमधली अगणीत.............

तन्वीला सगळ्यांनीच टॅगलंय म्हणजे आतापर्यंत ती खरडत असेल...म्हणून मी पेठेकाका,हेरंब,रोहन, अजय, भाग्यश्रीताई, अश्विनी(तिचा ब्लॉग आय डी पण माहित नाही पण लेट्स सी ती प्रतिक्रियेमध्ये लिहीणार का काही....अश्विनी............ये ना..........) यांना टॅगतेय.....

Thursday, December 17, 2009

वैरीण झाली.........पोळी.......

सध्याच्या सारेगमपच्या एका भागात सलीलने त्याची एका गाण्याची प्रतिक्रिया देताना सहज म्हटलं की नव्याने स्वयंपाक शिकलेल्यांच्या पोळ्या लगेच ओळखता येतात. तसं माझी आणि माझ्या नवर्‍याची नजरानजर झाली आणि काय बोलणार एका दुखर्‍या नसेवर बोट ठेवलं गेलं. म्हणजे तसं ते रोजच ठेवलं जातं, कारण पोळीशिवाय पान हलत नाही (म्हणण्यापेक्षा पान वाढल जात नाही) आणि पोळी तर करता येत नाही. मग नाचता येईना अंगण वाकडं तस वातड पोळीसाठी इथलं विकतचं पीठ म्हणजे मैदा, नाहीतर कॉइलवाला गॅस असली कायबाय निमित्त करुन आपलं मनाचं समाधान करून घ्यायचं आणि काय...
माझ्या पिढीतल्या बाकी सगळ्याच मुलींसारखं मलाही घरातल्या स्वयंपाकघरात कधी काम करावं लागलं नाही. किंवा जास्त स्पष्ट सांगायचं तर आपल्या मुलांनी चांगलं शिकुन मोठ्ठं व्हावं म्हणून माझ्या आईने कधीच आम्हा कुणालाच अभ्यासातून बाहेर काढुन हे करा ते करा केलं नाही. जो काही वेळ असे तेव्हा तिला सटरफ़टर मदत नक्कीच केली पण स्वयंपाक अहं...कधीच नाही. त्यामुळे लग्न झाल्यावर थेट अमेरिकेत आल्यावर सर्वात जास्त आठवण झाली ती रोज मिळणार्‍या आईच्या हातच्या स्वयंपाकाची. ती तशी अजुनही येते पण तो पहिला महिना किंवा सुरुवातीचे बरेच महिने खाण्याच्या बाबतीत एकदम बेकार होते.
पहिल्यांदा नवर्‍याबरोबर जाऊन भाज्या-बिज्या घेऊन आलो. काही मसाले इतर सामान भारतातून आणलेल्या बॅगमध्येही होतं. पण कसं करायचं?? मुख्य प्रश्न. भाज्या तरी तशा सोप्प्या आणि कुकरचाही आधार होता. पण चपातीचं काय? आणि नवर्‍याला तर काय कधीही विचारलं काय करायचं जेवायला तर उत्तर चपाती-भाजी असंच असे. माझ्या आईकडे तसं भात खाणारेच जास्त म्हणायचे कारण आम्ही टेक्निकली कोकणातले. पण सासरकडचं गाव नाशकाकडे म्हणजे त्यांना जास्त सवय पोळीची. त्यामुळे जरी भाज्या साधारण फ़ोडणीचा मंत्र मारून आणि जमेल ते मसाले घालुन केल्या तरी पोळ्यांचं काय. हा काय नुसता वरण-भात-भाजी खायचा नाही शिवाय डब्यात रोजची सवय असल्याने मलाही पोळ्या आवडतात. पण स्वतः करायच्या म्हणजे गाडं कायमचंच अडलेलं.

मला पीठ मळण्यापासुनच जो कंटाळा आला असे तो गॅसवर तवा ठेऊन त्या नवर्‍याच्या भाषेत हॉस्टेलच्या चपात्या होईस्तोवर म्हणजे पोळ्यांचा कंटाळाच..त्यातुन या पदार्थाचं एक त्रांगडं म्हणजे बाकी जवळजवळ सर्व पदार्थ रेसिपी वाचुन करता येतात आणि बिघडले तर थोडेफ़ार सुधरताही येतात पण पोळीची रेसिपी वाचुन मऊसूत पोळी करणार्या व्यक्तीचा मी जाहिर सत्कार करायला तयार आहे.फ़ोनवर आईला विचारुन पोळी करायची कशी??
मग इथे ज्या सुग्रास जेवण करणार्‍या मैत्रीणी भेटल्या त्या सगळ्यांकडून पोळ्या कशा करायच्या हे शिकायचाही प्रयत्न केला.कुठेही जेवायला बोलावलं की साधारण भाज्या, गोड पदार्थ इत्यादींच कौतुक पहिल्यांदी होतं. पण आम्ही दोघं कुठे गेलो की मऊसुत पोळीचा लचका तोडता-तोडता लगेच आणि जवळ जवळ एकत्रच पोळीला दाद देत असु तेव्हा त्या घरच्यांचा चेहर्‍यावरचा भाव खरंच पाहण्यासारखा असे.

अर्थात आमच्याकडे येऊन जर चुकून घरची पोळी ताटात आली तर त्यांना लगेच कळेल ते दाद का मिळतेय..पण तशी मी हुशार आहे.एकतर कुणाला बोलावल्यावर शक्यतो पोळीला जमेल तेवढं टाळता येईल असंच काहीतरी मेन्युवर ठेवायचं नाहीतर सरळ भारतीय दुकानात विकत मिळणारी पोळी मायक्रोवेव्ह करून पानात आणि हेही नसेल तर मग पोळीचा सख्खाच भाऊ पराठा भरपुर बटर लावुन दिला की कोण पोळीची आठवण काढील?
मला तर वाटतं ही बया माझ्यासारख्या काहींना कधीच प्रसन्न होत नसावी. सुरुवातीला इथं मिळणारं गोल्डन टेम्पल जरा मैद्यासारखं वाटलं म्हणून इतर पीठं वापरून पाहिली तर त्यांनीही मला कधी साथ दिली नाही. म्हणजे आमच्या इतर मित्रमैत्रीणींच्या घरी जाऊन "अरे वा, चांगल्या होतात वाटतं पोळ्या. कुठलं पीठ वापरतेस?" म्हणून ते वापरावं तरी ते माझ्याकडे आल्यावर येरे माझ्या मागल्या. मग कुणी म्हणे अगं पीठ कोमट पाण्याने मळ, नाहीतर मळताना त्यात दूध घाल.एक ना दोन कितीतरी सल्ले पण माझ्या स्वयंपाकघरात मंत्र मारल्यासारखी पोळी वातड ती वातडच..

त्यानंतर आमच्याकडे माझे सासु-सासरे आले दोन-तीन महिन्यांसाठी. माझी पोळीबद्दलची रड त्यांच्या कानावर गेली असावी. सासुबाई माझ्यासाठी खास गिरणीत दळलेलं पीठ घेऊन आल्या.मुख्य त्यांनी माझ्या घरी पहिल्यांदाच इलेक्ट्रिकचा गॅस पाहिला त्यामुळे त्यांची माझ्याबद्दलची (की माझ्या नेहमी बिघडणार्‍या पोळ्यांबद्दलची) कणव वाढली. मग त्या स्वतःच मुक्काम संपेपर्यंत पोळ्या करायच्या आणि तेही मी आणलेल्या इथल्या पिठाच्या. मी परत गेले की तू मी आणलेलं पीठ वापर, मग चांगल्या होतील असा दिलासा पण दिला. पण अगदी माझ्या आईसारखंच मला पोळ्या करायला मात्र त्या शिकवु शकल्या नाहीत. किंवा कदाचित त्यांनी माझी एकंदरित प्रगती पाहुन तो विचारच सोडला असावा.

त्यानंतर मग आम्ही घर घेतलं आणि इलेक्ट्रिकच्या गॅसची कटकट संपली. आता तरी पोळी प्रसन्न होईल अशा विचारात मी होते. पण थोडा वातडपणा कमी झाला इतकंच आणि फ़ुलके थोडे बरे व्हायला लागले.म्हणजे नवर्‍याच्या भाषेत होस्टेल बदललं..मी म्हटलं त्याला अरे पोळी करणं किती चॅलेंजिंग आहे माहित आहे का तुला?? तर यावर साहेबांचं उत्तर म्हणजे, त्या खाणं किती चॅलेजिंग आहे माहित आहे का तुला?? काय बोलणार मी स्वतःच माझ्या चपात्यांना चॅलेंजिग चपाती म्हणते..फ़क्त याची व्याख्या आमच्या दोघांच्या दृष्टीने वेगळी आहे इतकंच. आणि आता तर काय पुन्यांदा कॉइलवाला गॅस इकडच्या घरात त्यामुळे परत एकदा बोंबाबोंब. वैरीण आहे माझी ही पोळी दुसरं काय?

ता.क.फ़ोटोअर्थातच मायाजालावरुन साभार हे काय सांगणं??
Tuesday, December 15, 2009

फ़ुलोरा... असा होता गाव

सामान लावताना पुस्तकांच्या खोक्यात "फ़ुलोरा" दिसलं आणि लक्षात आलं अरे, आई आल्यापासुन आपण गाणी शोधत नाही आहोत. मागे मारे ठरवलं होतं की आपणही इथे एक गीतपुष्पांचा फ़ुलोरा मांडुया आणि एक आज्जी क्या आ गयी और गाने-वाने की छुट्टी...आता आज्जी आहे म्हटलं की बाळ झोपण्यासाठी पहिलं प्राधान्य तिलाच आणि तिची गाणी इतकी वेगवेगळी असतात की मग पुस्तकांची गरज लागत नाही. पण आता जास्तीत जास्त महिना आणि मग जाईल ना आज्जी. नंतर हे प्रकरण माझ्याचकडे येणार तेव्हा आताच तयारी केलेली बरी म्हणून मग उघडलं एकदाचं आणि ही एक मस्त कविता हाती लागली. खास छोट्या कंपनीसाठी. लिहिली आहे, पद्मिनी बिनीवाले यांनी.
"असा होता गाव"

एक होता हलवाई
त्याचे नाव दलवाई
बसल्या बसल्या दुकानात
खात राही मिठाई...

एक होता धोबी
रोज नवी खुबी
शर्ट नवा पॅंट नवी
घालून स्वारी उभी...

एक होता शिंपी
कापड घेई फ़ार
दिवाळीचे कपडे
शिमग्याला तयार...

एक होता गवळी
पाणी घाली दुधात
म्हैस फ़ार पाणी पिते
अशा मारी बात...

असे होते लोक आणि
असे होते गाव
राजा होता असातसा
माहित नाही नाव...

Sunday, December 13, 2009

सखी शेजारीण

नवीन जागा ती पण परदेशात असली की शेजारी नसणार हे जवळजवळ गृहित धरलं होतं. कसंबसं एका जागी बस्तान बसवुन चार-दोन डोकी ओळखीची झाली होती तोवर घरंच बदललं...त्यामुळे नव्या जागी आल्याच्या दुसर्याच संध्याकाळी दारावर टकटक ऐकुन मी नवर्याला म्हटलं, "अरे, जरा हळू धाव आरूषबरोबर.बघ, खालच्या माळ्यावर राहणारे वरती आले वाटतं." नवर्याने दार उघडलं. मी किचनमध्ये फ़ोडणी देता देता मनाची तयारी करत होते; मुलाच्या दाणदाण धावण्याची काय काय कारणं द्यायची, माफ़ीनामा इ.इ. पण हे काय? दारातला आवाज चक्क "हाय मी साशा. तुमच्या खालच्या माळ्यावरच राहाते. काल मी पाहिलं तुम्हाला ये-जा करताना आणि मी आज पम्पकिन मफ़िन्स बनवले तेव्हा म्हटलं ओळखही होईल आणि काही हवं नको विचारताही येईल."(अर्थात इंग्रजीत) मी अक्षरश: तीन-ताड उडाले. आतापर्यंत अमेरिकन शेजार्यांनी माझ्या कुठच्याही अपार्टमेन्टमध्ये येऊन ओळख-बिळख केलेली कधी आठवत नाही. फ़क्त जेव्हा आम्ही घर घेतलं तेव्हाच काय त्या अशा शेजार्यांशी ओळखी. मग आता इतकं प्रेमाने आलेल्या व्यक्तीला भेटलं तर पाहिजे म्हणून मीही लगेच गॅस आईकडे सोपवुन तिला नमस्कार करायला दारात आले.


तर ही आमची इथली पहिली सखी शेजारीण "साशा".आणि आम्ही आल्या आल्या झालेली आमची पहिलीवहिली तिनेच खास प्रयत्न करून घेतलेली भेट. ती गेली तीन वर्ष या भागात राहाते. गेले तीन महिन्यांपासुन नोकरी गेल्याने तिच्या रुमपार्टनरबरोबर इंशुरन्सचा अभ्यास करुन नवी नोकरी/व्यवसायाच्या मागे असलेली. "जिम आणि मी फ़क्त एकत्र राहातो. No romantic relations" असं खास आवर्जुन स्वतःच सांगितलं. मग आपलं नेहमीचं संभाषण कुठून आलो, काय करतोय इ.इ. माझ्या याआधी झालेल्या ओळखी झालेल्या काही इतर अमेरिकन्स प्रमाणे आमची सर्वांची, अगदी आता काही आठवडेच इथे असणार्या माझ्या आईचंसुद्धा नाव लिहुन घेतली.
तशी थोडी थंडी इथंही आहे, त्यामुळे आम्हाला ब्लॅंकेट्स, कर्म्फ़रटर्स हवी आहेत का? मुलासाठी काही माहिती हवी आहे का? स्वयंपाकघरात काही भांडी-कुंडी लागणारेत का? एक-ना दोन हजारो मदतीचे हात एकदमच पुढे करणारी. आपल्या इथे साधना कट म्हणतात ना तसे केस पण थोडे तिरके वळवलेले, साधारण पाच फ़ुट चार इंचापर्यंत उंची, गोरी गोरी पान, निसर्गंत: लालसर गाल, तिच्या घरात असणार्या मांजरासारखेच घारे डोळे आणि अतिशय प्रेमळ मुलायम आवाज अशी "साशा". तिने आणलेले मफ़िन्स खरंच छान होते अगदी तिच्या आवाजासारखे मुलायम. अरे हो आणि त्याच्यावर तिने तिची रेसिपीसुद्धा प्लॅस्टिकच्या पिशवीत लिहुन ठेवली होती. किती अभिनव असतात ना काही माणसं? भारतीय माणसांबद्द्ल तिला थोडं आकर्षण असणार असं एकंदरित बोलण्यातुन वाटत होतं.मी म्हटलं तिला नंतर सगळं सामान आलं की एकदा चहाला ये. तिचा मदतीचा आग्रह जरा जास्तच होता म्हणून मी फ़क्त तिला विचारलं इथुन लायब्ररीत जायलासुद्धा बस आहे का?
त्यानंतर आमच्याशी थोडावेळ इतरही काही विषयांवर ती बोलली. तिला म्हटलं मी की आई आता काही आठवडेच राहिल तर अगदी आवर्जुन म्हणाली की मग तुम्ही तिला पॅसिफ़िक दाखवायला नक्की घेऊन जा आणि तिथे खूप वारं असतं म्हणून आईच्या कानात घालायला कापुस न्यायला विसरू नका. आणखी काही इथल्या हवामान विषयक टिपा देऊन आणि थोड्या जुजबी गप्पा संपवुन ती गेली. माझ्या आईला फ़ारच बरं वाटलं की मला एकतरी संपर्क करू शकणारी शेजारीण आहे. माझ्या आधीच्या घरून निघताना तिला नव्या जागेबद्द्ल सगळ्यात जास्त काळजी हीच होती बहुतेक.
थोड्याच वेळात दारावर पुन्हा टकटक. अतितत्परतेने लगेच मला हवी ती बसची माहिती काढुन आणली पण तिने. आता मला जरा काळजीच वाटायला लागली कारण माहित नाही हा मदतीचा अतिरेक न ठरो असंही वाटून गेलं. शिवाय एक-दोन भेटीतच जास्त सलगीत आलेल्या माणसांबद्द्ल मला सगळ्यात प्रथम तर भितीच वाटते. न जाणो आपल्याला ही आपुलकी जबरदस्ती न होवो.
आधीच सामान अजून आलं नाही अशा अपुरया स्वयंपाकघरात रविवारी झटपट कांदेपोहे केले तेव्हा उगाच साशाची आठवण झाली.तसंही तिच्या त्या पम्पकिन मफ़िनच्या रिकाम्या डिशमध्ये काय द्यावं हा प्रश्न होताच.आणि त्यातुन आदल्या रात्री आणलेला उरलेला पिझ्झा गरम करायला ओव्हनचा ट्रेपण नव्हता. चला नाहीतरी ती इतकं म्हणून गेलीय तर घेऊया तिची मदत अशा दुहेरी तिहेरी हेतुने गेले कांदेपोहे आणि बाजुला थोडं फ़रसाण घालुन. दाराबाहेर मला पाहुन लगेच माझा हात प्रेमाने दाबुन ती मला घरात घेऊन गेली आणि तिचा दिवाणखाना आतुन पाहिल्यावर मी थक्कच झाले. घरी टि.व्ही. नाही हे तिनं तसंही पहिल्या भेटीत सांगितलंच होतं.( माझ्या नवरयाला त्यामुळे पडलेला प्रश्न म्हणजे आता हिच्या घरचं फ़र्निचर कुठच्या दिशेकडे पाहिल...असो) तर अगदी आटोपशीर पण छान इंटेरिअर केलं होतं.
फ़ायरप्लेसच्या वरच्या भागात बरोबर तिथं असणार्या भागाच्या आकाराची मोठी फ़्रेम आणि समोर एकच तीन माणसं बसु शकतील असा सोफ़ा. मधल्या उरल्या जागेत मोठा रग. मोठ्ठा शब्द्पण कमी पडेल असा. जरा आडवा वाटेल असा. मला तो भारतीय वाटला पण लगेच मी काही विचारलं नाही. आणि सगळ्यात वेगळं म्हणजे आडव्या समोरासमोरच्या भितींना टेकवुन ठेवलेल्या चक्क "कायाक" म्हणजे त्या एक किंवा दोन माणसंच पाय लांब करून बसू शकतील अशा होड्या. लांबच्या लांब दिवाणखान्याला शोभतील अशा. एकावर एक तीन एका बाजुला आणि दुसरया बाजुला दोन. मी काही विचारायच्या आतच ती म्हणाली "आवडल्या ना? मीच बनवल्यात." बापरे. आता तोंडात बोट घालण्याचीच पाळी होती. मग बेडरूममध्ये त्यांची सुबक वल्ही बनवली होती तीही दाखवली. लगेच आणखी एका बोटीचा फ़ोटोही दाखवला; आपण स्पीडबोट म्हणतो ना तशी. ही तिला आता विकायची आहे कारण ठेवणं परवडत नाही.
मग बोलता बोलता तिनेच सांगितलं की अशीच एकदा समुद्रावर असताना कायाक सरळ करताना की काय तिच्या पाठीचा कणा, गळा असं सर्व ताणलं गेलं आणि त्यामुळे तिची मोठी गळ्याची सर्जरी झाली. त्याचा मोठा व्रण पाहून मला जरा गलबलंच. आणि या सगळ्यात वाईट म्हणजे हे सर्व तिचा नवरा सहन करू शकला नाही; म्हणून त्यांचा घटस्फ़ोट झाला. जेव्हा आधाराची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तो गेला. त्याला घरातलं सगळं फ़र्निचर हवं होतं आणि तिला तसंही कमी सामान चाललं असतं म्हणून मग तेव्हापासून ती एकटी आहे.आणि कधीतरी हा जिम तिच्या अपार्टमेन्टमध्ये रूममेट म्हणून आला असावा. त्याच्याशीही तिने माझी ओळख करून दिली. थोडासा पायाचा प्रॉब्लेम असल्याने लंगडणारा असला तरी तो खूप मदतशील आहे अशी तिची टिपणी होती.
मला फ़क्त तिला पोहे देऊन, माझ्यासाठी ट्रे घेऊन यायचं होतं आणि तरी बराच वेळ गेला. वरती मुलाची आन्हिकं आटपायची होती. तिचा निरोप घेईस्तोवर बरंच काही तिला बोलायचं होतं असं वाटत होतं. मला तिने तिची सर्व पुस्तक, ती योगाभ्यास करते हे दाखवलं आणि मुख्य म्हणजे तिचं जे मांजर आहे, खरं म्हणजे बोका, तो खरं तर तिच्या सर्जरी नंतर तिला सोबती म्हणून कसा आला आहे अशा बर्याच गोष्टी सांगितल्या. तिला मध्येच आजारपण वर आलं की दिसेनासं होतं आणि ते या बोक्याला कळतं मग तो तिला नमस्काराची पोझ घेऊन आणि हातावर हात ठेवुन आधार देतो. एकीकडे मला तिच्याबद्द्ल नक्कीच काहीतरी वाटत होतं पण तरी या लोकांची आयुष्य वेगळी आणि अति गुंतागुंतीची असतात हे पुन्हा एकदा कळत होतं.
मग मागच्याच रविवारी आमचं सामान आलं आणि मुव्हर्स ते वरती आणू लागले तशी पुन्हा एकदा दारावर टकटक. अरे साशा?? हे काम चालु आहे तर मी तुमच्या बाळाला माझ्या घरात घेऊन जाऊ का म्हणजे तो मध्येमध्ये न आल्यामुळे तुमचं पटापट होईल. मी आईला आणि आरूषला त्यांच्याकडे थोडावेळासाठी पाठवलं. मला खरंच आश्चर्य वाटलं की फ़ारशी ओळख नसलेल्या आमचा इतका विचार करणारंही कुणीतरी आहे.
आतापर्यंतची सगळी घरं आणि तिथली वास्तव्यं वेगवेगळ्या कारणांसाठी लक्षात राहिलीत पण इथल्या वास्तव्यात सगळ्यात जास्त लक्षात राहिल ती आमची सखी शेजारीण आणि तिनं दाखवलेली आपुलकी यासाठी असं सध्यातरी वाटतंय...

Friday, December 4, 2009

"चीची" ची गोष्ट

लहान मूल बोलायला लागलं की आई-बाबांना जो काही आनंद होतो तो झाला आहे जुलै मध्येच. त्याबद्द्ल छोटी पोस्ट पण झालीय. तर गोष्ट "दुदु" वरून सुरू झाली आणि आता त्यावर इतके महिने झाले तरी प्रकरण तिथेच घुटमळतेय म्हणून पुन्हा एकदा पोस्टतेय...


हे चीची प्रकरण कधी सुरू झालं नक्की आठवत नाही पण बहुधा जुलैच्या शेवटी शेवटी आई आली तेव्हा ती माझ्या मुलाला, आरूषला मागच्या सनरूममध्ये बसवून पक्षी दाखवायची आणि पहिल्यांदी "ची" त्याच्या छोट्याशा शब्दभांडारात आली असावी. चिऊ कसं स्पष्ट बोलणार ना माझं छोटसं लाडकं पिल्लु ते....मग तोही आजीबरोबर ची ची असं नुसतं म्हणून आम्हाला चिऊ दाखवायला लागला. आणि त्याचवेळी खिचडी एके खिचडी खाऊन तिलाही " चीsची" म्हणून सांगु लागला. इथे हा s आहे ना तो जास्त महत्त्वाचा आहे कारण आता तो दुदु हे विसरून त्यालाही "चीचीs" असंच म्हणतोय.. तर हा s आहे ना, तो या दोन मोठ्या आणि महत्वाच्या शब्दांना वेगळं करतो. महत्वाच्या कारण आई-बाबाकडे मागायचे दोन मुख्य खाऊ आहेत ते..एक भूक जास्त असेल तेव्हा खिचडी आणि दुसरं लहान बालकांच पुर्णान्न दूध. सध्या तरी तो जेव्हा "चीची" करतो तेव्हा नक्की काय हे बहुतेकवेळा फ़क्त मलाच कळतं. ची नंतर थोडा पॉज असेल तर खिचडी आणि दोन्ही ची घाईत असतील तर दूध असं माझं समीकरण आहे पण सुरूवातीच दूध नाहीतर दुदु हे गेलं कुठे हा प्रश्न आहेच..

खरं तर आता त्यांचं शब्दभांडार वाढेल असं साधारण पुस्तक-इंटरनेटवर लिहिलंय पण आमचे साहेब आपले जे दिसतं त्याला "चीची" शब्द वेगवेगळ्या रागातच गाऊन सांगतोय..मोठेपणी कॉपी करणारा संगितकार वगैरे होणार की काय माहित नाही.

शेवटी काल रात्री अवेळी उठल्यामुळे झालेल्या झोपमोडीच्या वैतागाने बहुतेक एक संपुर्ण चीचीचीच...(बापरे काय शब्द आहे हा) गोष्ट त्याला सांगितली.आई त्याला त्याच्या एका पुस्तकात काऊचं दूध (जरा आधुनिक आजी झालीय ती आजकाल त्यामुळे तिने स्वतःच काऊ म्हटलंय...माझ्यावर दोष देऊ नका) असं नेहमी सांगुन त्याने दूध प्यावं असं म्हणत असते या बेसिकवर आधारलेली आहे...नीट ऐका..कदाचित तुमच्या घरातल्या एखाद्या लहानग्यासाठी इमर्जन्सिला उपयोगी येईल.

तर एकदा एक काऊकडे एक ची येते आणि तिला म्हणते," काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला गं कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपली दाणे खा".
मग तिच्याकडे एक भू-भू येतो. तो म्हणतो, "काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला रे कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपला खाऊ खा".
नंतर तिच्याकडे एक स्कुल-बस येते. ती म्हणते," काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला गं कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपली पेट्रोल खा".
मग तिच्याकडे एक खारु ताई येते. ती म्हणते, "काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला गं कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपली त्या झाडावरची फ़ळं खा".
नंतर तिच्याकडे एक ससुल्या येतो. तो म्हणतो, "काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला रे कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपला लॉनवरचं गवत खा".

असं मग, नंतर, मग, नंतर करत ...आता काय अधीक सांगणे न लगे...आपल्याला हवं तेव्हा गाडी आपल्या पिलाकडे गाडी वळवुन ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपुर्ण करणे. मी जी उदाहरणं दिलीत ती त्याला रोज दिसणारी, आवडणारी आहेत.. माऊला मात्र या गोष्टीत आणायचं जरा टाळलंय कारण तिला चीची दिली तर चालेल असं रात्री तरी वाटत होतं पण म्हणजे झोप पूर्ण झाली नसल्याची लक्षण होती ती. पण उंदिरमामा तिला चालला असता. अरे पण माऊने उंदिरमामाला खाल्लं असतं तर मग उंदिरमामाला चीची साठी काऊकडे कसं पाठवणार..
शिवाय आपला ओरिजिनल काऊ म्हणजे कावळा त्यालाही एंट्री नाहीये कारण ती गोची आजीने गाईला काऊ म्हटल्यामुळे झालीये...

जाऊदे जास्त विचार करतेय का मी?? की आजही अशीच झोपमोड होणार किंवा आरूषची गाडी ची, चीची आणि त्यांची भावंडं यावरून पुढे कधी जाणार याची?
नशीब आई, आज्जी, बाबा,दादा ह्यांना तरी चीची च्या सुरात नाही म्हणत ते...