खरं तर मी या विषयावर लिहायचं म्हणजे एखाद्या पाचवी फेल चंपुने पी एच डी चा प्रबंध लिहिण्या सारखं आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झालं तरी व्यावसायिक कामात मराठी लिहिणं कमी म्हणण्यापेक्षा अगदी नसल्यामुळे आता माझं मराठी जरी काही फार चांगलं राहिलं नसलं तरीपण या विषयावर लिहिण्याची हिम्मत करतेय. मराठी भाषे मधे बऱ्याच अनुदिनी सुरु झालेल्या आहेत. खूप सुंदर लेख, कविता लिहिले जातात, लोकं आपले अनुभव पण लिहितात. मला तरी सगळ्यांचच लिखाण वाचायला खूप आवडतं.
बऱ्याचशा ब्लॉग्ज वर मी आपल्या प्रतिक्रिया पण देते. बऱ्याच लोकांच्या अनुदिनीवर इतके सुंदर लेख असतात, कविता असतात, गुजगोष्टी असतात, पण केवळ काही महत्त्चाचे शब्द चुकवल्यामुळे त्या वाचतांना उगीच अडखळल्यासारखं वाटतं. बरेच लोकं अगदी साधा शब्द आहे ’आणि ’ हा दिर्घ(आणी) लिहिलेला असला की तो वाचतांना अडखळल्या सारखं वाटतं. माझा पण नेहेमीच गोंधळ उडतो ह्र्स्व आणि दिर्घ लिहितांना. तरीपण शक्यतोवर उच्चाराप्रमाणे लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर बरच शुध्द लिहिलं जाऊ शकतं.
आता माझी पण लिहिण्याची पध्द्त जी आहे ती बोली भाषेप्रमाणेच आहे. म्हणजे असं बघा, की ’लिहिलं’.. हा शब्द जेंव्हा लिहितॊ, तेंव्हा वर असलेल्या अनुस्वारामुळे ते बरोबर वाचलं जातं,जेंव्हा ’लिहिल’ असं लिहितो तेंव्हा ते बरोबर वाचलं जात नाही. म्हणजे काय, तर बोली भाषेत लिहितांना जर अनुस्वार तरी पण दिला तरच ते बरोबर वाचता येते, नाहीतर लिहिल (लिहिलं) , केल, (केलं) चा उच्चार चुकीचा केला जातो. ...
प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद करण्यात आलेली आहे, आणि हे चुकीचे मानले जात आहे. हल्ली प्रमाण भाषेत ’लिहिलं’ ऐवजी ’लिहिले’, ’केलं’ ऐवजी ’केले’ , ’सारखं’ ऐवजी ’सारखे’, असे लिहिण्याची पध्दत आहे. अर्थात आपण ( मी सुध्दा) जे बोली भाषेनुसार लिहितो, ते व्याकरणाच्या दृष्ट्या फारच चुकीचे आहे. पण निदान ते वाचताना अडखळल्यासारखं तरी होत नाही असं मला बुवा वाटतं.
अगदी साधे सोपे नियम जरी पाळले तरीही बरेच लिखण शुध्द होऊ शकतं.जसे "आणि" हा शब्द ह्रस्व लिहिणे. शब्दाच्या सुरुवातीची वेलांटी ह्र्स्व लिहिणे. बहुतेक शब्दांची शेवटच्या अक्षरची वेलांटी ही नेहेमीच दिर्घ असते. अर्थात मी या विषयामधे भाष्य करण्याइतपत मोठी नाही, पण मला जे काही प्रामुख्याने जाणवले, ते इथे लिहिले आहे. या मधे जर कांही चुका असतील तर त्या अवश्य दुरुस्त करा.यात अजुन काही नियम/सुचना घालुन आपल्या सर्वांसाठी एक नियमावली किंवा संदर्भ मिळाला तरी खूप.
जेंव्हा वेलांटी ही शब्दाच्या मधे येते, तेंव्हा मात्र ती बहुतेक वेळेस ह्रस्वंच असते. हे सगळे ठोक ताळे आहेत. आता बघा, आणि जरी ह्रस्व असला तरी पाणी हा दिर्घंच असतो. या सगळ्य़ांची कारणं शोधताना जाणवलं की शेवटी आपण अर्थानुसार तो शब्द किती दिर्घ उच्चारतो त्यानुसार ते ठरत असावे. अर्थात या विषयातल्या एखाद्या माहितगाराने हा लेख अजुन पुढे वाढवला तर झाला तर आपल्या सर्वांचाच फ़ायदा आहे. कारण आधी आपण मायाजालवर मराठीत लिहित नव्हतो ते लिहायला (आणि वाचायला) लागलो. पुढची पायरी मराठी भाषा शुद्ध लिहायचा प्रयत्न करणे असं म्हणायला काही हरकत नाही.
असो. अजुन एक मुद्दा म्हणजे मराठी शब्द, हे मराठी व्याकरणाप्रमाणेच लिहावेत. जसे प्रत्येक शब्द, जॊ इकारान्त, किंवा उकारान्त असेल तर तो नेहेमी दिर्घ लिहावा. फक्त संस्कृत मधुन घेतलेल्या शब्दांना संस्कृत प्रमाणे नियम लावावे. मराठी व्याकरणामधे संस्कृत चे शब्द घेतल्यामुळे जास्त त्रास होतो लिहितांना. इतर भाषांमधे पण संस्कृत शब्द घेतले आहेतच , पण त्यांनी व्याकरण त्या - त्या भाषेचं लावलंय म्हणुन इतर भाषांचं व्याकरण सोपं जातं मराठी पेक्षा.
शाळेत शिकलेले अजुन काही आठवलेल्या नियमात महत्त्वाचा नियम म्हणजे,
१. एकेरी शब्द नेहमी दिर्घ लिहावेत जसे मी, ही, ती.
२. आणि त्याच शब्दाचं रुप जसं ती - तिला इथे तिला मध्ये "ति" ह्र्स्व, तू - "तुला" (हा मी जास्तीत जास्त वेळा चुकीचा लिहिलेला पाहिला आहे म्हणून खास उल्लेख)
३. उच्चारानुसार लिहिले जाणारे काही शब्द उदा.
उगीच
करतील
म्हणून
जीवन
खूप
तरी
करून
देऊन
ऋतु
काही वेळा वेळ असेल तर मी चक्क एखादं मराठी पुस्तक पाहाते आणि नक्की करते माझं शुद्धलेखन बरोबर आहे का?? तुम्ही म्हणाल हा काही पर्याय आहे का? पण चुकवण्यापेक्षा बरं. तरीसुद्धा काही ना काही राहून जातेच म्हणा...
या विषयावरचा गाढा अभ्यासू म्हणून श्री अरुण फडके यांचं नाव घेता येइल. फडके यांचे बरेच कार्यक्रम होतात व्याकरणावर. त्यांची बरीच पुस्तकं पण आहेत शुध्द लेखनावर. आता इथे माझ्याकडे संदर्भासाठी नाहीयेत पण मिळवुन थोडा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्व मिळुन आपली भाषा शुद्ध लिहिण्यासाठी प्रयत्न जरुर करायला हवा यासाठी हा प्रपंच. कळावे लोभ असावा...
ता.क. या पोस्टसाठी माझे काही ब्लॉग मित्र-मैत्रीणींनी त्यांची नावे न सांगण्याच्या अटीवर मदत केली आहे. एकटीने हे एवढे नियमही लिहीणे अन्यथा जमलंच नसतं. अजुनही ज्या काही त्रुटी असतील त्या भरुन काढण्यासाठी वाचक वर्ग मदत करेल ही अपेक्षा.