Friday, April 29, 2016

लास वेगसमधला मराठमोळा टर्बन ठसका

यंदा वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पायाला भिंगरी लागल्यागत फिरणं सुरु आहे. त्यात कामाच्या निमित्ताने का होईना पण वेगसला जायला मिळालं तर बरंच वाटतं. अंहं!!  ते what happens in Vegas साठी नाही तर आम्हाला त्याच निमित्ताने रोज सूर्यदर्शन होईल हा प्रामाणिक हेतू. तर यावेळी  आमचे एक स्नेही, जे गेली  काही वर्षे वेगसला राहतात त्यांनी आम्हाला एका मराठी उद्योजकाबद्दल  आणि त्यानिमित्ताने "अर्बन टर्बन" बद्दल सांगितलं तेव्हा आम्ही आमच्या चार दिवसाच्या निवासात एक जेवण तरी तिथे घ्यायचं निश्चित केलं.  

लास वेगस  फेम स्ट्रीपच्या मँडेले बे हॉटेलच्या बाजूने खालच्या अंगाला हार्ड रॉक कॅफेच्या बाजूला गेलं की एका छोट्या स्ट्रीपमॉल मध्ये तुम्हाला अर्बन टर्बन हे भारतीय खाद्य पद्धतीचं रेस्टॉरंट दिसेल. जर तुम्ही ऑकलँड (न्युझिलँड) ला राहिला किंवा फिरला असाल तर ही चेन तुम्हाला कदाचीत ठाऊक असेल. ही चेन अमेरिकेत प्रथम वेगसमध्ये आणायचं स्वप्न पाहिलं मराठमोळा भूषण अराळकर त्याची पत्नी जास्मिन यांनी. आम्हाला आमच्या स्नेह्यांनी याचा एक मालक मुंबईचा मराठी माणूस आहे हे सांगितलं त्यामुळे अर्थात जास्त उत्सुकता होती आणि या जागेत शिरताना समोरच मुंबईची रिक्षा पाहिल्यावर आम्ही आमची बच्चे कंपनी देखील खुश झाली. ही भारतातून अमेरिकेत खास इम्पोर्ट केली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या रिक्षामध्ये बसून photo काढू शकता.


आतमध्ये काही टिपिकल मराठी फलक आणि चित्र वगैरे आणि अत्यंत अदबशीर नोकरवर्ग  ambience आम्हाला खूप आवडला. आम्ही गेलो तेव्हा भूषण यांचा मुक्काम न्युझिलँडला होता तर जास्मिन नंतर येणार होत्या. पण आम्ही मालकांना भेटायला मागतो आहोत त्यामुळे एक अत्यंत मऊ आवाजात बोलणारे सरदारजी आम्हाला भेटायला आले आणि  नावातल्या टर्बनचा थोडाफार खुलासा झाला. हे यांचे व्यावसायिक भागीदार. मी त्याचं नाव घाईघाईत विचारलं आणि विसरले पण त्यांनी आदरातिथ्यात आम्हाला भूषण किंवा जास्मिनची कमी भासू दिली नाही. 

आम्ही मुंबईची लोकं कुठेही गेलो तरी वडापावची आठवण काढत असतो पण यावेळी मात्र खिमा पावावर मांडवली झाली. बच्चे कंपनीसाठी पाणीपुरी आणि चिकन टिक्का. खिमा पसंतीची पावती समोरून आलीच पण पाव अगदी आपल्याकडे मिळतो तसा आहे हे जास्त महत्वाचं. 

सोबतीला नान आणि चिकन करी मागवल्यावर जेवण उरणार याची खात्री झाली होती पण मधेच आमच्या सरदारजींबरोबरच्या गप्पामध्ये इथे मिळणाऱ्या खास पर्दा बिर्याणीचा उल्लेख ऐकून राहवलं नाही म्हणून मागवलीच. बरं झालं आमचं बोलणं आणि त्यांचा आग्रह हे सगळं जुळून आलं नाहीतर एका वेगळ्या डिशला आम्ही मुकलो असतो. हा तिचा पर्दानशीन फोटो पाहिलात तरही डिश काय चीज आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. 


हे सर्व खाऊन पोटं तृप्त होऊन आणि उरलं खाणं दुसऱ्या दिवशीच्या लंचसाठी घेऊन आम्ही परतलो ते आमच्या स्नेह्यांना धन्यवादाची पावती देत. त्यानंतर दोन दिवस सकाळी भरपूर काम आणि संध्याकाळी बच्चेकंपनी बरोबर भटकंती असा भरगच्च कार्यक्रम होता. शेवटच्या दिवशी विमान प्रवासाला काही तास वेळ होता तेव्हा अगदीच राहवलं नाही म्हणून शेवटी One for the road म्हणून  एकदा इथे धावती भेट दिली. आम्हाला घाई आहे हे कळल्यावर फक्त आमची एकच ऑर्डर असल्याप्रमाणे पंधरा मिनिटांत जेवण आमच्यासमोर हजर.

यावेळी शीग कबाब आणि आपली मुंबईची लाडकी फ्रँकी, पुन्हा एकदा चिकन टिक्का आणि बच्चेलोकांसाठी चिकन नगेट्स वगैरे मामला होता.


पैकी फ्रँकी सोडल्यास सगळं खाणं बेस्ट होतं. यावेळीदेखील पोटोबा तुडुंब भरल्यामुळे मुलांना इथले गुलाबजाम खिलवायचे राहिलेच. शिवाय त्यांच्या मेन्यूवर नसलेले चिकन कोल्हापुरी वगैरे पदार्थ ते सांगितलं तर खास बनवून देतात ही माहितीपण थोडी उशीराने हाती आली. त्यामुळे पुन्हा केव्हा जायचं याचे वेध पोटोबांना आधीच लागले आहेत. आपलं काय मत आहे?

Friday, April 8, 2016

एका सुरुवातीची सात वर्षे


दरवर्षीप्रमाणे गुढी पाडवा आला की आता तीच गुढी ब्लॉगवर पण उभारायची हे आठवून हसायलाच येतं. पण यंदा मात्र काही हसू बिसू नाही. काय म्हणता विश्वास नाही बसत? पहा की हा फोटो. दोन वेगवेगळ्या गुढ्या आणि चक्क ताजा कडूनिंब आणि रांगोळीसुद्धा. 


तर मागे वळून पाहतेय आणि जसा आरुष पुढच्या महिन्यात आठ होईल तसा ब्लॉगदेखील सात वर्षांचा होतो हे लक्षात येतंय. मागच्या अनेकानेक पोस्ट मध्ये ब्लॉग लिहायची कारणे अधून मधून येउन गेली आहेत. ती सगळी संग्रहीत केली तर ब्लॉग १०१ वगैरे काही लिहिता येईल पण आणखी एक प्रांजळ कारण या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिते. आरुषला घेऊन मी भारतात काही महिने राहिले आणि जवळच्या माणसांची बदललेली रूपं आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं माझ्याभोवती असलेल्या अपेक्षांचं ओझं पाहून मी गप्प झाले होते. मला व्यक्त व्हायची आणि गप्पा मारायची गरज होती. पण मला त्यावर उपप्रश्न नको होते. त्यावेळी सुरु झालेला हा  माझा स्वतःशी संवाद अजून सुरु आहे याने काही वेळा मला स्वतःलाच विचारात पडायला होतं. आता काही नवीन सुचणार नाही असं वाटत असतानाच काही तरी आपसूक मनाशी येतं आणि मी इथेच व्यक्त होते. 
इथले बरेचसे संवाद मी ज्या व्यक्तींबरोबर केले पाहिजेत, ते मी केले नाहीत आणि त्याची गरजही नाही. पण माझ्या डोक्यातून ते निघून जाणं ही माझी वैयक्तिक गरज हा ब्लॉग पूर्ण करतोय. आशा आहे की हा संवाद मध्ये मध्ये खंड पडला तरी सुरु राहील. 
सर्व ब्लॉगवाचकांचे मनापासून आभार. आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा.