Friday, March 30, 2012

सो कॉल्ड "मनातलं" आणि असंच काही....

आजचं वर्तमानपत्र हे उद्याची रद्दी असते असं म्हटलं तर.....तर कशाला ते तसंच आहे म्हणा...तर अशाच एका रद्दीत एक पान मिळालं....टराटरा फ़ाडायचे पण कष्ट घेणार नव्हते तरी एक वाक्य टोचलंच...."अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका ‘मनातलं’ लिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो." आणि त्याच्या आधीचं जरा जास्त...."अनेकजणींचे ब्लॉग आज ‘दुपारच्या मासिकां’ची उणीव भरून काढतात"...बरं हे तारे तोडणारे महाशय/महाशया कोण हे कळण्याचं काही कारण नव्हतंच...रद्दीला जसा भाव नसतो तसंच रद्दीच्या कागदांना मालकही नसतो म्हणे...डायपरला प्रसिद्धी मिळायच्या आधी असं म्हणतात की रद्दीला जास्त भाव होता..कारण लहान मुलांच्या घरातली लोकं ती विकत नसत...मग दुकानदार रद्दीची वाट बघत बसायचे....म्हणून रद्दीचा भाव पुर्वी फ़ार जास्त होता म्हणे.....
असो काही संबंध लागतोय?? नाही न....या आणि अशाच प्रकारचे संबंध नसलेले लेख वाचायचे असतील तर वाचायलाच हवा फ़ेकसत्ता....हो मला जाम आवडलंय हे नाव...जरी बाकीच्या सदरांसाठी आवडत असलं तरीही जाणून-बुजून ब्लॉगर्सना उकसवायचा नवा उद्योग (खरं तर धंदा म्हणायचा मोह आवरतेय) सुरू केल्यामुळे फ़ेकसत्ता हेच नाव बरं वाटतंय....खरं तर मला जे काही सांगायचं होतं ते बर्‍यापैकी माझ्या मित्र ब्लॉगरने इथे सांगितलंय....(बरं केलंस बाबा नाहीतर आता रद्दीच्या लिंका कुठे शोधु बाबा....तू तुझ्या लेखात सगळं लिंकुन ठेवलंस ना...हाबार्स...)
मग मला काय लिहायचंय...काहीच नाही...याच निमित्ताने मला फ़क्त जाहिरात करायची संधी मिळतेय माझ्याच ब्लॉगची आणि तिचा वापर मी पुरेपुर करणार आहे...तेही स्वतःच्याच ब्लॉगवर....तसंही ब्लॉगहीट्स मिळायला आम्हा सर्व ब्लॉगर्सकडे मराठीब्लॉग्ज डॉट नेट आहेच की....त्यासाठी तरी रद्दीत जाणार्‍या वर्तमानपत्रांकडे जायची वेळ आली नाहीये....
तसं या ब्लॉगचं कौतुक/उल्लेख इ. वर्तमानपत्रात झालेत आणि त्याची योग्य दखल ब्लॉगर म्हणून उजव्या बाजुला आहेच....पण इथे कुणी भेदभाव करत नसताना वरचा तो स्त्री ब्लॉगर म्हणून झालेला शेळका उल्लेख सगळ्याच स्त्रीयांसाठी मला तरी खटकतोय आणि "ओळखीपाळखींचं" आणखी एक गलिच्छ वाक्य नाही म्हटलं तरी वाकुल्या दाखवतंय...
शिवाय असे रद्दी लेख लिहिणार्‍यांना ब्लॉग कसे वाचावे हेही शिकवायची संधी मिळतेय...एक स्त्री म्हणून मलातरी असं वाटतं की सुधारणेला सगळीकडे वाव असतो...अगदी नाठाळ मुलही आई बरोबर वठणीवर आणू शकते...अरे देवाने आम्हाला तसंच बनवलंय...म्हणून इतके दिवस पाहत बसले होते की या सदरात नक्की काय चालणार आहे....आता त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरूवात केलेच आहेत तर होऊन जाऊ दे...
ह्म्म्म तर काय म्हणायचं होतं मला...हं...मनातलं....ब्लॉगर मग तो स्त्री असो की पुरूष का ब्लॉग लिहितो हे कळायचं असेल तर त्याची पहिली पोस्ट वाचा...कदाचीत तुम्हाला कळेल की त्याला/तिला हा ब्लॉग का सुरू करायचा आहे...

माझ्याबाबतीत म्हणाल तर मी इथे स्पष्ट म्हटले आहे की मला गप्पा मारायच्या आहेत...काय हरकत आहे?? फ़क्त पेज थ्री लोकांच्याच आयुष्याबद्दल गप्पा मारता येतात किंवा आदर्श राजकारण्यांबद्दल?? आमच्या साध्या-सोप्या-सरळ आयुष्यात काही होणारच नसतं का जे आम्ही मांडू शकतो??? स्वकीयांचं जीवनच तर आम्ही अनुभवतो नं मग लिहिलं त्यातल्या आपल्या आवडीवर ...केलं कौतुक भातुकलीच्या संसाराचं...किंवा मला आजोबा नाहीत म्हणून परदेशात भेटलेल्या एका आजोबांवर 
लिहिले चार शब्द ....बरं हे जाऊदे माहीत आहे मला मी काहीच करू शकणार नाहीये मी त्या शेतकर्‍यांसाठी पण जर त्यांचं दुःख माझ्या मनाला भिडलं आणि लिहिले मी चार मोडकेतोडके शब्द...हो आवडतात मला मी साजरे करायची ते सण आणि त्याबद्दलचे माझे अनुभव लिहिले मी .........लहानपणापासून गाणी ऐकतेय...आहेत त्याच्या आठवणी आणि मांडते त्या मी इथे ....हवी होती मलाही एक गोड बाहुली ती नाही मिळाली म्हणून दिला मी संदेश.....कुठे बिघडलं???
जास्त मी मी वाटतंय ???हो असू शकेल...पण त्यात फ़क्त कुणालातरी मला हे असं वाटतंय..तुमच्याकडेही काही शेअर करण्यासारखं आहे का बास इतकाच हेतू आहे...कुठेही अहंकार नाहीये....
बरं मी मी चं राहुदे...स्वकीयांच्या जीवनाशैलीची अपरिहार्यता जर एखाद्या सव्वीस जानेवारीला आठवली तर ते रद्दीत जाणार नाहीये...प्रत्येक सव्वीस जानेवारीला निदान एक तरी जण हे वाचुन जातो.....(हो दुपारच्या वेळीच)
देशाबाहेर असलो तरी देशात मराठीसाठी एखादा कौशल त्यासाठी काही करत असेल तर वाटते आत्मीयता आम्हालाही मग त्याने त्याच्यावर आपलं कौतुक केलं तर तेही ओळखीतुनच का??

तुझं नाही माझं नाही..लांब तिकडे इराणमध्ये कुणी स्त्री बंदी म्हणून डांबली जाते त्या अनुभवांच एक पुस्तक निघतं...कुणी दुपारी वाचू नये की काय??
एका दुपारी माझ्यादारावर टकटक करून माझ्या डोळ्यात अंजन घालणारी माझी शेजारीण माझ्या ब्लॉगवर येऊन जर आणखी चार माणसांच्या डोळ्यातही तेच अंजन घालू शकली तर त्यांच्या दुपारी काय कोमेजणार आहेत??? एका हळव्या क्षणी त्याच्या बॅकपॅकबद्द्ल वाटतं लिहावंस...काय करणार?? आवडतात मराठीतले काही कार्यक्रम..म्हणतो आम्हीही मस्त..मस्त..मस्त ..निदान असंबद्ध परीक्षण करून त्यांचं डोकं तरी फ़िरवत नसू आम्ही.......
खरं सांगु का या रेटने तर माझ्या ब्लॉगमधल्या कितीतरी पोस्टांचं महत्व मी या पोस्टमध्ये पटवून आणखी जाहिरात करू शकते..पण मुद्दा तो नाहीये.....आणि मुख्य हे मी दुपारी लिहित नाहीये...मला या जगातल्या दुसर्‍या कुठल्याही स्त्रीसारखं घरची, हापिसची, पोराबाळांची, मी या व्यतिरिक्त स्वतःसाठी करत असलेल्या अनेक गोष्टींची कामं पण आहेत..आणि सगळ्यात महत्त्वाचं  माझ्या १४२ फ़ॉलोअर्सना आणि सगळ्याच वाचकांना याची गरज नाहीये.....

राहिला प्रश्न ओळखी आणि पाळखींचा..पाळखींच माहित नाही पण ओळख केली की ती होते...२००९ नंतरचे माझ्यासारखे ब्लॉगर पाहिले तर त्यांच्या सुरूवातींच्या पोस्ट पाहिल्या तर चार बुकं नीट वाचलेल्या कुणालाही कळेल की हा मामला ओळखी-पाळखींचा नाही आहे....एक साईट आहे मराठी ब्लॉग्ज डॉट नेट नावाची तिथे सगळ्यांनी एकमेकांचे ब्लॉग पाहिले, वाचले, त्यांच्यातल्या समविचारींचे सूर जुळले आणि मग आपल्या लाडक्या ब्लॉगरला प्रतिसाद देणं आपसूक झाल....हे वाटेल ते झालं नाही आहे..योग्यच झालं..त्यातलेही काही संबंध राहीले काही नाही...काही नवेही जुळले गेले.....आमच्यासारख्या वाट्टेल त्या लोकांनी सगळ्यांना फ़क्त आपलं म्हटले...त्याचे टक्के काढायला मात्र कुणाला जमलं नाही.....

काय आहे आमचं गणित कच्चं असेल पण भाषा पक्की आहे..ती आणखी पक्की व्हावी म्हणून आमच्या भाषेत आम्ही लिहितो....हे लिखाण आणखी काही वर्षांनी बाकी कुणाला नाही तर निदान स्वतःला जबरदस्त आवडणार आहे याची निदान आज माझ्या ब्लॉगची जाहिरात करताना मी तरी सांगणार आहे....
कारण ही रद्दी नाहीये..यातल्या प्रत्येक पोस्टला काही न काही संदर्भ आहे...आणि इथे आलेल्या प्रत्येक कमेंटला अर्थ आहे....त्या त्या व्यक्तीची भावना आहे..आणि सगळ्यात मुख्य हे सारं माझं आहे..माझिया मनाचं आहे....मला कोणासाठी लिहावं लागत नाही...कुणी ते दुपारी वाचतंय का संध्याकाळी याची चिंता करावी लागत नाही...माझ्या स्वकीय/परकीय जे काय असेल त्या लोकांसाठी मी कदाचीत फ़ार काही करू शकत नसेन..पण जर त्याबद्द्ल मी काही लिहून थोडा-फ़ार अवेअरनेस निर्माण करू शकले तर त्याचं समाधान मला नक्कीच असेल...सगळ्यात मुख्य ते समाधान मिळवताना मला दुसर्‍या कुणाचेही पाय खेचून खेकडेगिरी करावी लागत नाही....

खरं तर एकमेकांचं कौतुक करूनच तर आम्ही ब्लॉगर लिहायला शिकलो नाहीतर इतकी वर्षे वर्तमानपत्रे वाचून ती नित्यनियमाने रद्दीत जातच होती की!!! त्याने ना कुणाच्या दुपारी स्पेशल झाल्या ना कुठल्या आदर्श गोष्टी व्हायच्या थांबल्या.....आणि सगळ्यात महत्वाचं न कुणाला मराठी ब्लॉगिंग करावंसं वाटलं...त्यामुळे रद्दीतले कागद वाचण्यापेक्षा माझंच लिखाण वाचते आणि म्हणते  जय हो ब्लॉगिंग....

Friday, March 23, 2012

पाडवा गोड झाला....

आठवणींच्या ब्लॉगवर जर आठवणीच काढल्या नाहीत तर काय होतं तसंच थोडंसं गेले काही महिने झालं होतं...म्हणजे जे काही सांगायला हवं ते थोड्याफ़ार प्रमाणात लिहायला लागलेय पण तरी लेखणी अर्धी म्यान असल्यासारखी....मग त्या दिवशी मैत्रेयीच्या वॉलवर तिच्या हाताने लिहिलेला एक शेर एक मुलगी पक्षी हातातून सोडतेय अशा चित्राबरोबर दिसला..तो शेर होता.....



चल दे देती हूं आजादी

मेरे इश्क कर आज
जिसे बांध को रखा था
दिल ने बरसों से
अब वो भी कर सकेगा आवारगी!

तिच्या त्या पोस्टला कमेंट देताना आपसूकपणे तिचीच एक आवडती गझल लगेच आठवली आणि मग अर्ध्या म्यान लेखणीला बाहेर काढायची आठवण आली....येस्स....गाणी.....माझ्याबरोबर गाणी नसती तर मला वाटतं मी कधीच हरवून गेले असते...
विशेष करून उत्तर अमेरीकेतल्या सहा महिन्यापेक्षा कमी-अधीक काळ असणार्‍या थंडीत....कारण किती नाही म्हटलं तरी ते वातावरण खूप जास्त मानसिक परीणाम करणं..एकवेळ कुणी आपल्याला काही बरं-वाईट बोललं तर ते विसरणं शक्य असतं पण हिवाळी, मळभी वातावरणावर निदान माझ्यासाठी तरी गाण्याशिवाय इलाज नाही....
अशाच एका थंडीत माझी ओळख मैत्रेयीबरोबर झाली....तिचं माझं नातं गुरू-शिष्येचं...माझ्या पेन्सिलव्हेनियातल्या वास्तव्यात माझ्यासाठी घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एका घरगुती गणपती उत्सवात नरेंद्र चिरमुले यां एका अत्यंत गुणी तबलावादकाची ओळख होणं आणि मग त्यांनी माझ्यासाठी मैत्त्रेयीकडे पुन्हा गाणं शिकवायची विनंती करणं. म्हणजे बरीच वर्षे तिने आपलं घर-मुलं यासाठी गाणी शिकवणं सोडलं होतं. अर्थात गाण्याचे लोकल कार्यक्रम ती तेव्हाही करायची पण शिकवायचं थांबवलं होतं.
माझी तिची फ़ोनवरची भेट म्हणजे माझा मी करून दिलेला परिचय...खरं तर तिने काही न विचारता (आणि फ़ी पण न सांगता) तू ये मग जर आपल्या दोघींना जमत असेल तर हे करून पाहू अशा अर्थीचं बोलणं होतं. आता त्याआधीची माझी स्वतःची गानपार्श्वभूमी अशी काहीच नव्हती. निव्वळ गाणं ऐकायला आवडतं...हिंदुस्थानी क्लासिकल ऐकते थोडंफ़ार पण कळत काहीच नाही. तिला हे मी अगदी स्वच्छ शब्दात तिला सांगितलं आणि "सा रे ग म" पासून आमची शिकवणी सुरू झाली. तिला गुरूवार जमत होता म्हणून मग त्यादिवशी ऑफ़िसवरून घरी आलं की साडे सात ते साडे आठ अशी वेळ आम्ही ठेवली होती. साधारण दीड वर्षे म्हणजे आरुषचे पोटातले साडे-आठ महिने पूर्ण होईपर्यंत मी तिच्याकडे प्रत्येक आठवड्याला जात होते. त्यानंतर अर्थात आरुषचा जन्म झाल्यानंतर ते थांबलं आणि मग पुन्हा सुरू करायचा विचारही करायच्या आत अठरा महिन्यांच्या आरूषला घेऊन आम्ही पार ३००० मैल लांब आलो.
असो...तर हे नमनाचं तेल संपल्यावर गाण्याकडे वळायला हवं. मला वाटतं २००७ च्या हिवाळ्यात, मी आणि वंदना म्हणून आणखी एक विद्यार्थिनी माझ्याच बरोबर शिकायला यायची, आम्ही दोघी बरेचदा मैत्रेयीला नॉन क्लासिकलही म्हणायला लावायचो. आम्हाला शिकवताना तिला ऐकायची संधी सोडायची नाही असं आमचं न बोलता ठरलंच होतं जणू..आणि अशाच एका दिवशी स्वतः रचलेली आणि कंपोज केलेली एक गजल मैत्रेयीने आम्हाला ऐकवली.

इस विराने देस में न दिल लगे मेरा

रात है लंबी कब होगा सबेरा....

ही गजल पूर्ण ऐकली तेव्हा आमच्या दोघींच्या अंगावर काटा आला. आम्ही तिला ती पुन्हा गायला सांगितलं आणि तिच्या संमतीने ते रेकॉर्डही करून घेतलं..

आपण आपला देश सोडतो आणि अगदी देशातल्या देशातही दुसर्‍या प्रांतात जास्त काळासाठी जातो तेव्हा कधी ना कधी अशा लंबी रातेंचा सामना आपण केला असेलच ना? त्यात उत्तर अमेरीकेत तर हिवाळ्यात एकदा का घड्याळ मागे झालं की रात्री खर्‍या अर्थानेही मोठ्याच होतात. मी तेव्हा निरागसपणे मैत्रेयीला विचारलंही होतं, "क्या आपने ये गजल विंटर में लिखी है?" यावरचं तिचं प्रसन्न हसू मला आजही आठवतंय..



इस विराने देस में न दिल लगे मेरा
रात है लंबी कब होगा सबेरा....
ना कोई चहलपहल
बस कांच के महल
जाने क्यों जमा दिया मैंने यहां डेरा
रात है लंबी कब होगा सबेरा
ना लगे अपनापन
सब अपनी धून में मगन
जाने क्यों समझ बैठी
इस देस को मेरा........
इस विराने देस में न दिल लगे मेरा
रात है लंबी कब होगा सबेरा....
वरचे शब्द वाचले आणि तिच्या आवाजातलं गाणं ऐकलं की मला वाटत नाही आणखी काही सांगायची गरजही लागणार आहे.....आपापल्या सोयीने आपल्या एकटेपणाला हे गाणं सोबत करू शकतं आणि त्यासाठी परदेशातच असायला हवं असंही नाही आहे....आपले प्रश्न हे फ़क्त आपले असतात. या अवस्थेतून जेव्हा आपण जातो तेव्हा कदाचित आपणही यातल्या निदान दुसर्‍या कडव्याशी नक्की सहमत होऊ शकतो....
गेले कित्येक दिवस गाण्यांच्या आठवणी लिहीणं मी थांबवलं आहे..याचा अर्थ गाणी मनात वाजायची थांबली होती असा नाही पण लिहायचा तो मूड येत नव्हता. पण सगळ्यात वरच्या प्रसंगात म्हटल्याप्रमाणे मैत्रेयीशी तो संवाद सुरू झाला आणि गाणी सोडून अनेक विषयांवर आम्ही बोललो. त्याच बोलण्यांत मग मी तिच्याकडे हे गाणं ब्लॉगवर टाकायची परवानगी मागितली..तिने ती लगेच दिलीच आणि गाणंही लगेच उपलब्ध करून दिलं. मी तिच्याबरोबर नुस्त्या पेटीवर ऐकलेल्या गाण्यापेक्षा हे गाणं वेगळा परीणाम करतं..तिचा कसलेला आवाज आणि गाण्यातली समज मी तिची शिष्या म्हणून समजवण्याची माझीच पात्रता नाहीये..खरं तर मला आज हिंदुस्थानी क्लासिकल ऐकायची जी काही समज आली त्यात तिचाच वाटा आहे हे म्हणणं जास्त समर्पक आहे....पण आज या पाडव्याला, या ब्लॉगच्या वाढदिवशी, मला माझ्याच गुरूला माझ्या ब्लॉगवाचकांसमोर सादर करायला मिळणं यापेक्षा आनंद तो काय??
आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणांवर अत्यंत गुणी आणि मोठ्या उंचीवर जाऊनही ज्यांचे दोन्ही पाय खंबीरपणे जमिनीवर आहेत अशा अनेक व्यक्तींबरोबर मला प्रत्यक्ष शिकायची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. मैत्रेयीचं स्थान त्या दृष्टीने माझ्यासाठी खूप मोठं आहे....आम्ही फ़क्त गुरू-शिष्या अशा कधीच नव्हतो..तिच्या घरगुती कार्यक्रमात तिनं माझी, "ही माझी पहिली शिष्या" म्हणून ओळख करून देणं माझ्यासाठी खूप मोठं आहे........
अजूनही मला जर परत पेन्सिलव्हेनियाला जायला मिळालं तर माझ्या स्वतःच्या घरासाठी जितकं जायला आवडेल तितकंच पुन्हा एकदा माझं गाणं सुरू करायला मैत्रेयीच्या घराची घंटी वाजवायलाही मला नक्की आवडेल...तो सुदिन येणार का माहित नाहीए पण आज हा पाडवा गोड करताना

May I take this pleasure to introduce my teacher, my guru, the best person I met who opened the big doors not just to Hindustani Classical music but help me take little steps in other aspects of day to day life mentoring me even now to take care of myself whenever I felt lonely in the other coast of US of A......

Ladies and gentlemen please put your hands together for Maitrayee Patel....:)



वरती तो व्हिडीओ आहे तिथे "इस विराने" नक्की ऐका आणि टाळ्यांचा प्रतिसाद मैत्रेयीपर्यंत जाऊद्या...:)



तळटीप . मैत्रेयीबद्दलची अधीक माहिती तिच्या साइटवर इथे आहे...

Tuesday, March 20, 2012

निळ्या छत्रीचा धडा अर्थात ब्लु अम्र्बेला

हिमाचल प्रदेशातलं एक छोटं गाव. तिथल्या खत्री स्टॉलचा मालक नंदू खत्रीची इंग्रजीत त्याचं भविष्य ऐकताना झालेली गंम्मत आणि मग लगेच पायावर ताल धरायला लावणारं "मेरा डेसू यहीं अडा" हे गाणं म्हणत येणारी गावातली चंदा गोळा करणारी छोट्या मुलांची टोळी याने सुरूवात होणारी ही गोष्ट....लहान मुलांचा एखादा चित्रपट असेल असं वाटून आणि खरं तर रस्किन बॉंड आणि विशाल भारद्वाज ही दोन भारदस्त नावं वाचली म्हणून पाहायला सुरू केलेला हा चित्रपट. दीडच तासाचा आहे ही माझ्यासारख्यांसाठी आणखी जमेची बाजू. शिवाय लहान मुलांना सांगितल्या गेलेल्या कथांमध्ये रमणारी मोठी मंडळी ज्या कुठल्या कॅटेगरीत मोडतात त्यातलीच मी. एखादी कथा जेव्हा दृकश्राव्य माध्यमातून आपल्यासमोर मांडली जाते तेव्हा तिची मांडणी, लोकेशन्स, पात्रपरिचय आणि पार्श्वसंगीत या आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबीही जुळून आल्या की आपण त्या कथेचा एक भाग होऊन जातो. हा चित्रपट पाहताना तसाच काहीसा अनुभव मलाही आला.
इथे पहिल्या पंधरा मिनिटांत पंकज कपूर यांचा "नंदू" आणि श्रेया शर्मा या अत्यंत गोड दिसणार्‍या मुलीने तितकीच सुंदर सादर केलेली "बिनिया" या दोन व्यक्तिरेखा कधी ही कथा ऐकणार्‍यांच्या समुहात आपल्याला सामील करुन घेतात हे कळत नाही. बाकी व्यक्तिरेखा आणि हिमाचलमधल्या हा छोट्या गावाचं रूप हळूहळू अधोरेखित होतानाच या कथेची आणखी एक नायिका जिचं नाव या चित्रपटाला दिलंय ती म्हणजे एक जपानी पद्धतीची निळी छत्री अर्थात "ब्लु अम्ब्रेला"ही लगोलग अवतरते आणि कथा आकाराला घेते.
नंदुचा ती चहा-पाण्याची टपरी सोडून एक आणखी आवडता उद्योग म्ह्णजे गावातल्या लोकांना (किंवा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्याच्याकडे गोळ्या-बिस्किटं घेणार्‍या छोट्या मुलांनाही) उधार पैसे देऊन मग ते परत घ्यायच्या वेळेस दुसरं काही ना काही मागत बसायचं किंवा हडपायचं. हे अर्थात सगळ्यांना माहित आहे पण तरी कुणी नं कुणी बकरा त्याच्याकडे असतोच. चित्रपटाच्या सुरूवातीलाच एका लहान मुलाकडून दुर्बिण बळकावण्याचा त्याचा प्रयत्न पाहिला की हे आपल्यालाही स्पष्ट होतं. "लोणचं" ही त्याला अत्यंत आवडणारी गोष्ट. त्याला आता ही गावात सगळ्यांना हेवा वाटणारी बिनियाकडे असणारी छत्री स्वतःकडे हवी असावीशी वाटणं साहजिकच आहे. बिनियाला तो वार्षिक खाऊचं आमीष दाखवून ती मिळवायचा एक केविलवाणा प्रयत्न करतो त्या प्रसंगात त्या दोघांचा अभिनय, संवादफ़ेक पाहण्यासारखी आहे. इथे हा चित्रपट आपली पकड आणखी मजबूत करायला प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण चित्रपटाला जे विनोदाचं अंग दिलंय त्याने आपल्याला हे सर्व अनुभवतानाची मजा येते.....कुठल्याही लहान गावात कदाचीत अजुनही अशा प्रकारचे प्रसंग होत असतील अगदी असंही वाटून आपण या चित्रपटाशी आणखी समरस होतो...
अर्थात बिनियाही अतिशय हुशार पोरगी आहे. ती काही त्याला दाद लावू देत नाही. तिची ती भूरळ घालणारी निळी छत्री आपल्यालाही भूरळ घालू लागते. या संपुर्ण चित्रपटात आपल्या चेहर्‍याने प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालणारी ही मुलगी फ़ार मनात बसते. तिची विधवा आई जेव्हा ही छत्री कुणा पर्यटकाने ही छत्री अशीच कशी दिली असा तिच्या मागे लकडा लावते त्यावेळी तिच्या पहेलवान भावाने स्वतः अस्वलाच्या दाताचं आणलेलं लकी लॉकेट देऊन घेतलेल्या छत्रीवरचं तिचं प्रेम चित्रपटात जागोजागी दिसतं...त्यानंतर या छत्रीने नेमकं ती तिच्या भावावर हल्ला करायला आलेल्या सापाला पळवून लावते आणि अर्थातच या छोट्याशा गावात ती आणि तिची छत्री याचं कौतुक जास्तच पसरतं. छत्री घेऊन तिच्याबरोबरच्या इतर मुलामुलींबरोबरचं गाणं हे चित्रपट पाहताना आपल्याही मनात रुंजी घालतं...आपणही नकळत म्हणतो "कुक कुकडी कुक, कुक कुकडी कुक".
आता अर्थातच अपेक्षेप्रमाणे ही छत्री हरवते आणि मग त्यानंतरची इतर चित्रपटात प्रेमभंग झालेली नायिका असते तशीच भकास बसलेली बिनिया आणि तिचं सांत्वन (अर्थात बाहेरून) करणारे नंदू आणि गावातल्या इतर काही व्यक्तिरेखा ज्यांना आधी फ़ार फ़ुटेज न खाता व्यवस्थित ओळख करून देण्यात आलंय. जसं अपेक्षेप्रमाणे ही छ्त्री हरवते तसंच अपेक्षेप्रमाणे जेव्हा ती अवतरते तेव्हा किंवा त्याआधी ती नंदूने घेतली असेल असं आपल्याला वाटू न द्यायचं काम दिग्दर्शकाने आधीच्या काही प्रसंगात नंदूचं "चोरी करना पाप है" किंवा त्याचं त्या छत्रीची बाजारतली किंमत काढणारा नंदू या सगळ्याने कमी होतो. पण तरीही बिनिया त्याच्या पोलिसांना घेऊन त्याच्या दुकानावर छापा घालते आणि इथे हा चित्रपट किंवा ही कथा बालकथेतून आपल्याला बाहेर काढून मोठ्या माणसांच्या खर्‍या जगात घेऊन येते.
छत्री अर्थातच नंदूच्या दुकानात सापडत नाही पण झालेल्या अपमानाने त्याच्याबरोबर आपणही व्याकूळ होतो. अर्थात आता ही छत्री जोवर येणार नाही तोवार आपण लोणच्याला हात लावणार नाही असं सांगून गावच्या लोकांसमोर लोणच्याची एक बरणी फ़ोडणारा नंदू पाहिला की चित्रपट पाहणार्‍या आपल्यासाठी मात्र थोडं हलकं होऊन जातं. थोडसं पु.ल.देशपांड्याच्या भानावर आलेल्या गटण्याप्रमाणे...:)
या पार्श्वभूमीवर "पर्बतों पे बर्फ़ा बरसा लागे" हे गाणं हिमाचलमधला विंटर समोर आणतो...त्या हिवाळ्यात छत्रीच्या आठवणीने उदास झालेली बिनिया दिग्दर्शकाने अतिशय मार्मिकपणे टिपली आहे.
दुसर्‍याच काही क्षणात पुन्हा ऋतु बदलतो आणि स्वच्छ सुर्यप्रकाशात तशीच गुलाबी छत्री नंदू गावच्या लोकांच्या समोर टाळ्यांच्या गजरात काढून कथेचा पुढचा टप्पा गाठतो. आता आधीचे काही अतृप्त आत्मे जसे लिलावती आणि तिचा नवरा यांना लोणच्याच्या बदल्यात छत्री भाड्याने देणे वगैरे उद्योग किंवा सगळीकडे ती छत्री मिरवणे हे त्याच्या शब्दात सांगायचं तर आत्मा संतुष्ट करायचे उद्योगही सुरू करतो. गावात अधेमधे येणारी चित्रपटवाली मंडळीबद्दलचे प्रसंगही कथेत थोडीफ़ार मीठ-मिरी घालतात.
आणि मग येतो तो शेवटच्या वळणाआधीचा टप्पा. बिनियाने घेतलेला वेगळ्या पध्दतीने छत्रीचा शोध..यावेळी खरा चोर सापडतो आणि अर्थातच तो नंदूच असतो (ती ते कसं शोधते हे लिहिण्याचा मोह मी टाळते कारण जवळजवळ सगळीच कथा या पोस्टमध्ये आहे) पण यावेळी गावकर्‍यांनी त्याला आधी दिलेल्या मान-मरातबामुळे तो चोरच नाही तर खोटारडाही ठरतो आणि सगळं गाव त्याला वाळीत टाकतं...इथे पुन्हा एकदा हिमाचलमधला हिवाळा...देवदार वृक्षांवरून बरसणारा बर्फ़ आणि आधीचं हिरवगार असणारं आता पांढरंशुभ्र झालेलं कुरण हे दिग्दर्शन  चित्रपट आतपर्यंत पोहोचवायला खूप मदत करतं....
त्यानंतर जे काही प्रसंग दाखवलेत त्यात हवालदिल होऊन मुलांना फ़ुकट चॉकोलेट देऊ करणारा आणि मग मुलांच्या "नंदकिशोर छत्रीचोर" अशा ओरड्यामुळे त्यांच्या मागे लागणारा नंदू....गावकर्‍यांच्या घालून-पाडून बोलण्याने चेहरा पाडून घेणारा नंदू...तो एका ठिकाणी दाढी करायला जातो तेव्हा न्हाव्याला "तिनका जरूर निकाल देना" किंवा त्याने देऊ केलेलं अस्वलाच्या दाताचं लॉकेट नाकारताना "चोरी का होगा तो कहीं भालू न पिछे पडे" अशा प्रकारे त्याला चिडवण्याची संधी न सोडणारे गावकरी या अशा प्रसंगातून त्याचं दीनवाणेपण समोर येतं तसं तसं आता याचं काय होणार हे आपल्यालाही कळत नाही. नकळत या इतक्या छोट्या छत्रीमुळे एखाद्या माणसाचं झालेलं हरण कुठेतरी आपल्याला आजुबाजुलाही असं कुणाला वागवलं जात असेल तर त्याचं कसं होत असेल हा एक अ‍ॅंगल दाखवून देतो.
आता पुढे काय हे आपल्याला जास्त विचारात न पाडता एक सुखद वळण कथाकार आपल्यासमोर घेऊन येतो. हे सगळे प्रसंग पाहून खूप विचार करणारा बिनियाचा चिमुकला जीव यावर एक सुंदर उपाय काढतो आणि नंदूच्या दुकानात असंच काही काम काढून जाताना ती छत्री तिथेच ठेऊन येते. छत्रीमुळे तावून-सुलाखून निघालेला नंदू तिला ती छत्री परत द्यायला जातो आणि आपल्या सुंदर हास्याने ती त्याच्याच लकबीत त्याला ती छत्री स्वतःची नाही म्हणून सांगते...खूप गोड वाटतं तिचं ते "बाय चान्स".....

त्यानंतर मग सुरुवातीला म्हटलेला तो इंग्रजीतलं भविष्य ऐकायच्या प्रसंगाने ही कथा एका चांगल्या वळणावर येऊन संपते....खत्रीच्या स्टॉलचं नाव छत्री स्टॉल झालेलं असतं....
गोष्टी ऐकायला ज्यांना आवडतं त्यांना गोष्टीचा हा दृक-श्राव्य परीणाम जरूर आवडेल. कुठल्याही चित्रपटाच्या कथेत न म्हटलेले संवाद हे पार्श्वसंगीत भरून काढू शकतं असं विधान करायचं असेल तर ब्लु अंम्ब्रेलाचं अप्रतिम पार्श्वसंगीत त्या छोट्या गावातल्या हिवाळ्यात आपल्याला नेऊन सोडतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीचा बाऊ करून एक जीवन उदासीनतेच्या वाटेवर लागलेलं असतं त्यावर एक छोटीशी मुलगी किती निरागसपणे उपाय करू शकते हा संदेशही सोप्या भाषेत हा चित्रपट देऊन जातो.
हा चित्रपट मी या हिवाळ्यात एकदा आई आणि एकदा बाबा दोघांबरोबर पाहिला आणि दोघांनाही तो खूप आवडला. २००५ मध्ये आलेला चित्रपट मला नेटफ़्लिक्सवरच्या सजेशन्स मध्ये आला होता...ज्याने कुणी ही सजेशन्सची कल्पना सुरू केलीय त्याचे आभार आहेतच. विशाल भारद्वाज जो लहान मुलांसाठीच्या "मोगली"मुळे मला तेव्हापासून आवडायचा त्याचं सादरीकरण हे या चित्रपटाचं यश आहे. यापूर्वी मी ज्यांना वाचलंय पण आठवत नाही अशा लेखकांमध्ये रस्किन बॉंड यांचं नाव आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं साहित्य मिळवून वाचायचाही प्रयत्न आहेच. त्याबद्दल जर कुणाकडे अधीक माहिती असेल तर नक्की द्या...आणि हो आपणही हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला तो कसा वाटला ते नक्की कळवा....:)

Tuesday, March 13, 2012

का नडे???

"तुला त्या कानड्यात काय दिसलं एवढं??" माझा नुकताच ओळख झालेला एक कलिग होता त्याचे हे २००१ मधले उद्गार मला कायम लक्षात राहतात..कारण तेव्हा खरं तर मला स्वतःलाच ते माहित नव्हतं. पण तो आवडला होता...जाम आवडला होता...माझं इंजिनियरिंग संपता संपता माझ्या तिथल्या सगळ्या मित्र-मैत्रीणींनाही हे अगदी तोंडपाठ झालं होतं....की कुठल्याही मॅचबद्दल चर्चा सुरू झाली की जीव जाईस्तो मी त्याची बाजू मांडत राहणार....आणि मुख्य म्हणजे माझं क्रिकेटपेक्षा जास्त प्रेम टेनिसवर आहे हे त्यांना, मला सगळ्यांना माहित होतं तरी क्रिकेटचा विषय आला आणि कुणी भिंत हलत नाही असलं काहीही म्हटलं की मी तिथे हटकणारच.....इथे तर या कलिगला जवळजवळ महिन्याभरातच कळलं (आणि मी त्या कंपनीत महिनाभरच टिकले होते म्हणा) की माझ्या क्रिकेटबद्दलच्या बोलण्यात जास्त नाव राहुलचं येतंय....त्याला कुणी वावगं म्हटलं की अक्षरशः तिळपापड होतो....

त्याच्यात काय आवडलं हे
"हे, हे आणि हे" अशा शब्दात सांगणं तसं आताही अवघडच आहे...त्याने "त्या" वर्ल्डकपमध्ये (आपण घेतला नाही तरी) केलेल्या सर्वाधिक धावा, आपल्या समोरचा फ़लंदाज दिग्गज असो किंवा आताच बॅट धरलेला कुणी दोघांनाही सारख्याच समंजसपणे दिलेली सयंत साथ, संघाला आपल्या मैदानावर असण्याची गरज असण्याच्या क्षणी खेळपट्टीवर घट्ट रोवून ठेवलेले पाय, धावफ़लक हळूहळू हलता ठेवण्याने होणारा पूर्ण संघाचा फ़ायदा यात त्याचं वैयक्तिक नुकसान झालं तरी संघ महत्त्वाचा हे सगळं सगळं त्या "हे, हे आणि हे" मध्ये बसवायचं म्हणजे कठीण आहे........आणि खरं तर कशासाठी ही एक वेगळा दुय्यम प्रश्नच..म्हणजे त्यातून काय सिद्ध व्हायला हवंय..त्याची कारकीर्द जशी मला भावली तशी बाकी कुणाला भावली नसली तरी पटली तर नक्कीच असेल.....शिवाय आता हा प्रश्न जास्त सलतो कारण जिथे तो सगळ्यात जास्त पटतो, भावतो त्या कसोटीतून बाजुला व्हावं हेच पटत नाहीये...सहन होत नाहीये.....

मला नेहमी वाटतं की सचिनची खेळी पाहायला मिळणार्‍या पिढीत मी जन्माला आले हे माझं भाग्य पण त्याहीपेक्षा जास्त अशा प्रखर सूर्याच्या तेजाने झाकोळून न जाता स्वतःचा वेगळा प्रकाश पाडण्याचं सामर्थ्य असणारा एक तारा राहुल द्रविड याला एका बाजुला आपल्या संघाची गडगड सुरू असताना पाय रोवून खेळायला बघायला मिळणार्‍या पिढीतली मी आहे हेही माझं अहोभाग्यच

....आणि हा संयतपणा ज्याज्यावेळी त्याने दाखवला आहे त्याच्याविरोधात बोलणार्‍यांची तोंड गप्प झाली आहेत...फ़क्त त्यांनी ती नेहमी बंद ठेवली नाहीत आणि त्याच्या त्याच संयतपणाचं वेगळ्या अर्थाने भांडवल करायचा प्रयत्न केला. अर्थात त्याने कधी कुठल्या वादात आपलं तोंड घातलं नाही.....कारण तिथंही तो "वॉल"सारखा शांत होता. आपल्या संघाला जेव्हा आपली गरज आहे तेव्हा ती पूर्ण करायचं त्याच्याकडचं कंत्राट त्यानं कधी सोडलं नाही....

राहुल द्रविडबद्दल मी काय लिहिणार??

....मला वाटतं ही पोस्ट कदाचीत त्याच्या जाण्याबद्दल नाहीचेय मुळी....मागच्या पोस्टमधल्या हतबलतेनंतर आपण खरं तर अलिप्तपणा आणू हा जो काही माझा स्वतःचा स्वतःला सांगण्याचा प्रयत्न आहे त्याला लागलेली ही एक ठेच....जाणार्‍या व्यक्तींना सारखं पाहात राहायचा काही प्रकार गेले काही महिने माझ्या बाबतीत होतोय त्याची ही परिसीमा म्हणावी आणि हे सारं क्रमाने माझ्या लक्षात राहावं म्हणून केलेली ही काही नियतीची उपाययोजना असावी........
इथवर ही पोस्ट वाचल्या गेली असेल तर मग हे स्पष्टीकरण थोडं आवश्यक आहे....कारण बाबा मुंबईला परत गेले आणि कितीही उदास व्हायचं नाही असं ठरवलं होतं तरी एक विचित्र उदासीनता आलीच. मग मागच्या पोस्टेतून ते सारं अखेर मांडलं गेलंच..त्यानंतर जवळजवळ लगेचच्याच आठवड्यात इथेच भेटलेली, ब्लॉगवरही जिच्याबद्द्ल बोललं गेलंय ती मैत्रीण साशा तिच्या घरच्यांना भेटायला, त्यांच्याजवळ जायला दूर पार या देशाच्या मध्यबिंदुवर गेली, तिला सोडायला गेलेलो मनाने परतही आलो नसू तितक्यात आणखी एक मुलांच्या निमित्ताने जवळ आलेलं कुटूंबही कामाची जागा बदलल्याने आणखी दुसरा कोपरा धरून तिथं मुव्ह झालं...त्यांना खरं तर जाऊन आता आठवडाच होईल तितक्यात मी ही बातमी वाचतेय..म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर काय चाललंय काय? असंच वाटावं...म्हणजे प्रत्येकाच्या जाण्याचा माझ्या वैयक्तिक आणि दैनंदिन आयुष्याशी घनिष्ठ संबंध असायलाच हवा असं नाही पण मनात ते प्रोसेस होताना त्याचे नसलेले संबंध जोडले जातात..उदासीनतेचा पूर दाटून येतो.....
गेले काही दिवस हिवाळ्यानेही थैमान घातलंय...थंडी, सोसाट्याचा वारा, पाऊस आणि अगदी कालपर्यंत रात्रभर आणि दिवसाही पडणारा बर्फ़....आणि या अशा वातावरणाचा परीणाम अर्थातच मुलांच्या तब्येतीवर नाही झाला तर नवलच...पण या सगळ्या मार्‍याशी सामना करत कुठेतरी माझिया मनाला स्वतःला सावरायला हवं..आशेचं पाणी घालून चैत्रपालवी फ़ुलवायला हवी...नाहीतर कुणीही मनाच्या जखमेवर घातलेल्या फ़ुंकरीने बरं वाटायच्या ऐवजी सगळंच
"का नडे?" च्या मोठ्या प्रश्नावर रेंगाळत राहील.....