Friday, March 30, 2012

सो कॉल्ड "मनातलं" आणि असंच काही....

आजचं वर्तमानपत्र हे उद्याची रद्दी असते असं म्हटलं तर.....तर कशाला ते तसंच आहे म्हणा...तर अशाच एका रद्दीत एक पान मिळालं....टराटरा फ़ाडायचे पण कष्ट घेणार नव्हते तरी एक वाक्य टोचलंच...."अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका ‘मनातलं’ लिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो." आणि त्याच्या आधीचं जरा जास्त...."अनेकजणींचे ब्लॉग आज ‘दुपारच्या मासिकां’ची उणीव भरून काढतात"...बरं हे तारे तोडणारे महाशय/महाशया कोण हे कळण्याचं काही कारण नव्हतंच...रद्दीला जसा भाव नसतो तसंच रद्दीच्या कागदांना मालकही नसतो म्हणे...डायपरला प्रसिद्धी मिळायच्या आधी असं म्हणतात की रद्दीला जास्त भाव होता..कारण लहान मुलांच्या घरातली लोकं ती विकत नसत...मग दुकानदार रद्दीची वाट बघत बसायचे....म्हणून रद्दीचा भाव पुर्वी फ़ार जास्त होता म्हणे.....
असो काही संबंध लागतोय?? नाही न....या आणि अशाच प्रकारचे संबंध नसलेले लेख वाचायचे असतील तर वाचायलाच हवा फ़ेकसत्ता....हो मला जाम आवडलंय हे नाव...जरी बाकीच्या सदरांसाठी आवडत असलं तरीही जाणून-बुजून ब्लॉगर्सना उकसवायचा नवा उद्योग (खरं तर धंदा म्हणायचा मोह आवरतेय) सुरू केल्यामुळे फ़ेकसत्ता हेच नाव बरं वाटतंय....खरं तर मला जे काही सांगायचं होतं ते बर्‍यापैकी माझ्या मित्र ब्लॉगरने इथे सांगितलंय....(बरं केलंस बाबा नाहीतर आता रद्दीच्या लिंका कुठे शोधु बाबा....तू तुझ्या लेखात सगळं लिंकुन ठेवलंस ना...हाबार्स...)
मग मला काय लिहायचंय...काहीच नाही...याच निमित्ताने मला फ़क्त जाहिरात करायची संधी मिळतेय माझ्याच ब्लॉगची आणि तिचा वापर मी पुरेपुर करणार आहे...तेही स्वतःच्याच ब्लॉगवर....तसंही ब्लॉगहीट्स मिळायला आम्हा सर्व ब्लॉगर्सकडे मराठीब्लॉग्ज डॉट नेट आहेच की....त्यासाठी तरी रद्दीत जाणार्‍या वर्तमानपत्रांकडे जायची वेळ आली नाहीये....
तसं या ब्लॉगचं कौतुक/उल्लेख इ. वर्तमानपत्रात झालेत आणि त्याची योग्य दखल ब्लॉगर म्हणून उजव्या बाजुला आहेच....पण इथे कुणी भेदभाव करत नसताना वरचा तो स्त्री ब्लॉगर म्हणून झालेला शेळका उल्लेख सगळ्याच स्त्रीयांसाठी मला तरी खटकतोय आणि "ओळखीपाळखींचं" आणखी एक गलिच्छ वाक्य नाही म्हटलं तरी वाकुल्या दाखवतंय...
शिवाय असे रद्दी लेख लिहिणार्‍यांना ब्लॉग कसे वाचावे हेही शिकवायची संधी मिळतेय...एक स्त्री म्हणून मलातरी असं वाटतं की सुधारणेला सगळीकडे वाव असतो...अगदी नाठाळ मुलही आई बरोबर वठणीवर आणू शकते...अरे देवाने आम्हाला तसंच बनवलंय...म्हणून इतके दिवस पाहत बसले होते की या सदरात नक्की काय चालणार आहे....आता त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरूवात केलेच आहेत तर होऊन जाऊ दे...
ह्म्म्म तर काय म्हणायचं होतं मला...हं...मनातलं....ब्लॉगर मग तो स्त्री असो की पुरूष का ब्लॉग लिहितो हे कळायचं असेल तर त्याची पहिली पोस्ट वाचा...कदाचीत तुम्हाला कळेल की त्याला/तिला हा ब्लॉग का सुरू करायचा आहे...

माझ्याबाबतीत म्हणाल तर मी इथे स्पष्ट म्हटले आहे की मला गप्पा मारायच्या आहेत...काय हरकत आहे?? फ़क्त पेज थ्री लोकांच्याच आयुष्याबद्दल गप्पा मारता येतात किंवा आदर्श राजकारण्यांबद्दल?? आमच्या साध्या-सोप्या-सरळ आयुष्यात काही होणारच नसतं का जे आम्ही मांडू शकतो??? स्वकीयांचं जीवनच तर आम्ही अनुभवतो नं मग लिहिलं त्यातल्या आपल्या आवडीवर ...केलं कौतुक भातुकलीच्या संसाराचं...किंवा मला आजोबा नाहीत म्हणून परदेशात भेटलेल्या एका आजोबांवर 
लिहिले चार शब्द ....बरं हे जाऊदे माहीत आहे मला मी काहीच करू शकणार नाहीये मी त्या शेतकर्‍यांसाठी पण जर त्यांचं दुःख माझ्या मनाला भिडलं आणि लिहिले मी चार मोडकेतोडके शब्द...हो आवडतात मला मी साजरे करायची ते सण आणि त्याबद्दलचे माझे अनुभव लिहिले मी .........लहानपणापासून गाणी ऐकतेय...आहेत त्याच्या आठवणी आणि मांडते त्या मी इथे ....हवी होती मलाही एक गोड बाहुली ती नाही मिळाली म्हणून दिला मी संदेश.....कुठे बिघडलं???
जास्त मी मी वाटतंय ???हो असू शकेल...पण त्यात फ़क्त कुणालातरी मला हे असं वाटतंय..तुमच्याकडेही काही शेअर करण्यासारखं आहे का बास इतकाच हेतू आहे...कुठेही अहंकार नाहीये....
बरं मी मी चं राहुदे...स्वकीयांच्या जीवनाशैलीची अपरिहार्यता जर एखाद्या सव्वीस जानेवारीला आठवली तर ते रद्दीत जाणार नाहीये...प्रत्येक सव्वीस जानेवारीला निदान एक तरी जण हे वाचुन जातो.....(हो दुपारच्या वेळीच)
देशाबाहेर असलो तरी देशात मराठीसाठी एखादा कौशल त्यासाठी काही करत असेल तर वाटते आत्मीयता आम्हालाही मग त्याने त्याच्यावर आपलं कौतुक केलं तर तेही ओळखीतुनच का??

तुझं नाही माझं नाही..लांब तिकडे इराणमध्ये कुणी स्त्री बंदी म्हणून डांबली जाते त्या अनुभवांच एक पुस्तक निघतं...कुणी दुपारी वाचू नये की काय??
एका दुपारी माझ्यादारावर टकटक करून माझ्या डोळ्यात अंजन घालणारी माझी शेजारीण माझ्या ब्लॉगवर येऊन जर आणखी चार माणसांच्या डोळ्यातही तेच अंजन घालू शकली तर त्यांच्या दुपारी काय कोमेजणार आहेत??? एका हळव्या क्षणी त्याच्या बॅकपॅकबद्द्ल वाटतं लिहावंस...काय करणार?? आवडतात मराठीतले काही कार्यक्रम..म्हणतो आम्हीही मस्त..मस्त..मस्त ..निदान असंबद्ध परीक्षण करून त्यांचं डोकं तरी फ़िरवत नसू आम्ही.......
खरं सांगु का या रेटने तर माझ्या ब्लॉगमधल्या कितीतरी पोस्टांचं महत्व मी या पोस्टमध्ये पटवून आणखी जाहिरात करू शकते..पण मुद्दा तो नाहीये.....आणि मुख्य हे मी दुपारी लिहित नाहीये...मला या जगातल्या दुसर्‍या कुठल्याही स्त्रीसारखं घरची, हापिसची, पोराबाळांची, मी या व्यतिरिक्त स्वतःसाठी करत असलेल्या अनेक गोष्टींची कामं पण आहेत..आणि सगळ्यात महत्त्वाचं  माझ्या १४२ फ़ॉलोअर्सना आणि सगळ्याच वाचकांना याची गरज नाहीये.....

राहिला प्रश्न ओळखी आणि पाळखींचा..पाळखींच माहित नाही पण ओळख केली की ती होते...२००९ नंतरचे माझ्यासारखे ब्लॉगर पाहिले तर त्यांच्या सुरूवातींच्या पोस्ट पाहिल्या तर चार बुकं नीट वाचलेल्या कुणालाही कळेल की हा मामला ओळखी-पाळखींचा नाही आहे....एक साईट आहे मराठी ब्लॉग्ज डॉट नेट नावाची तिथे सगळ्यांनी एकमेकांचे ब्लॉग पाहिले, वाचले, त्यांच्यातल्या समविचारींचे सूर जुळले आणि मग आपल्या लाडक्या ब्लॉगरला प्रतिसाद देणं आपसूक झाल....हे वाटेल ते झालं नाही आहे..योग्यच झालं..त्यातलेही काही संबंध राहीले काही नाही...काही नवेही जुळले गेले.....आमच्यासारख्या वाट्टेल त्या लोकांनी सगळ्यांना फ़क्त आपलं म्हटले...त्याचे टक्के काढायला मात्र कुणाला जमलं नाही.....

काय आहे आमचं गणित कच्चं असेल पण भाषा पक्की आहे..ती आणखी पक्की व्हावी म्हणून आमच्या भाषेत आम्ही लिहितो....हे लिखाण आणखी काही वर्षांनी बाकी कुणाला नाही तर निदान स्वतःला जबरदस्त आवडणार आहे याची निदान आज माझ्या ब्लॉगची जाहिरात करताना मी तरी सांगणार आहे....
कारण ही रद्दी नाहीये..यातल्या प्रत्येक पोस्टला काही न काही संदर्भ आहे...आणि इथे आलेल्या प्रत्येक कमेंटला अर्थ आहे....त्या त्या व्यक्तीची भावना आहे..आणि सगळ्यात मुख्य हे सारं माझं आहे..माझिया मनाचं आहे....मला कोणासाठी लिहावं लागत नाही...कुणी ते दुपारी वाचतंय का संध्याकाळी याची चिंता करावी लागत नाही...माझ्या स्वकीय/परकीय जे काय असेल त्या लोकांसाठी मी कदाचीत फ़ार काही करू शकत नसेन..पण जर त्याबद्द्ल मी काही लिहून थोडा-फ़ार अवेअरनेस निर्माण करू शकले तर त्याचं समाधान मला नक्कीच असेल...सगळ्यात मुख्य ते समाधान मिळवताना मला दुसर्‍या कुणाचेही पाय खेचून खेकडेगिरी करावी लागत नाही....

खरं तर एकमेकांचं कौतुक करूनच तर आम्ही ब्लॉगर लिहायला शिकलो नाहीतर इतकी वर्षे वर्तमानपत्रे वाचून ती नित्यनियमाने रद्दीत जातच होती की!!! त्याने ना कुणाच्या दुपारी स्पेशल झाल्या ना कुठल्या आदर्श गोष्टी व्हायच्या थांबल्या.....आणि सगळ्यात महत्वाचं न कुणाला मराठी ब्लॉगिंग करावंसं वाटलं...त्यामुळे रद्दीतले कागद वाचण्यापेक्षा माझंच लिखाण वाचते आणि म्हणते  जय हो ब्लॉगिंग....

24 comments:

  1. अहाहा अहाहा.. जबरीच... सही काढलीयेस फाटक्याची !!! मेला आता फाटक्या. यापुढे काहीही लिहिताना दहा हजार वेळा विचार करेल तो !!!

    ReplyDelete
  2. अपर्णा, मस्तच धुतलंस त्या नेटक्या/की ला. लगे रहो.

    ReplyDelete
  3. Aparna, sahich ekdam........
    Phatakya la changalach phadalas...
    too good.

    Shradha

    ReplyDelete
  4. mast ahe !! surekh lihilay. GOOD.

    ReplyDelete
  5. अगो तू तुझ्या ब्लॉगचे नाव "माझिया मना" ऐवजी माझिया जना असे बदलायचे सोडून पुन्हा आपल्याच मनातले लिहीत राहिलिस? फेकसत्तामध्ये आपले नाव छापून आणून प्रसिद्धी मिळवण्यासाठी किती हा खटाटोप? ;-)

    बाकी काही असो पण त्या अंजाना/अंजानीमुळे तुझ्या ब्लॉगवरील वाचायाच्या राहून गेलेल्या चांगल्या लिंक ह्या पोस्टमुळे प्रकाशझोतात आल्या... वाचेन पण कमेंट करणार नाही कारण आपली ओळख पाळख नाही ना गो ... :D

    ReplyDelete
  6. खरं म्हणजे सिद्धार्थ + १ म्हणणार होते. पण मग विचार केला माझी आणि सिद्धार्थची नुकतीच ओळख झाली आहे त्याचा उगाच असा गैरफायदा नको. :D
    तर या अंजान्यामुळे तुझ्या ब्लॉगवरच्या अनेक इंटरेस्टिंग पोस्टींची तू एकत्र यादी दिलीस हे बरं झालं.

    ReplyDelete
  7. सध्या सगळेच जण "धुलाई" च्या मागे आहेत वाट्टत ;)

    हेरंब +१

    ReplyDelete
  8. कुठे रे हेरंब...मी कसली काढतेय....मी तर फ़क्त माझ्या लिंका टाकल्यात...:) मला त्याने सरसकट माझ्या ब्लॉगला "त्या" उल्लेखात टाकलं असेल तर ते तसं नाही हे सांगायचा एक भाबडा प्रयत्न म्हण हवं तर......

    ReplyDelete
  9. अपर्णा, आभारी...आणि ब्लॉगवर स्वागत....स्त्री शक्ती वगैरे तुझ्या ब्लॉगवर पण लिहिणार का?? असं कसं आपण गप्प बसून चालेल म्हणून लिहिलं थोडं.....

    ReplyDelete
  10. श्रद्धा, आभारी...आणि ब्लॉगवर स्वागत....अर्रेच्च्या या पोस्टच्या निमित्तानेच दोन नवीन वाचक आले बघ म्हणावं :)

    ReplyDelete
  11. आभारी अपूर्व..आशा आहे की तू ती हेरंबची लिंक पण वाचली असशील...कारण तिथे सगळे रेफ़रंस आहेत ...मी फ़क्त जाहिरात...:)

    ReplyDelete
  12. सिद्धार्थ शु....एक गोष्ट सांगु का तुला खाजगीत..अरे माझ्या ब्लॉगला दोन वर्षे झाली तेव्हा मी त्या दोन वर्षातल्या काही माझ्या आवडत्या पोस्टचं संकलन करून त्याचं एक पान ब्लॉगला लावायचं म्हणत होते...त्यावरही एक वर्ष निघून गेलं त्यामुळे माझ्याकडे सगळ्या लिंका होत्या...(खरं तर खूप सार्‍या मी टाकल्याच नाही) त्यामुळे ही सुवर्णसंधी म्या कशी सोडणार..:D

    आणि हो माझिया जना....खी खी खी.....दुसरं कोणतरी शोधायला लागेल यावर लिहायला..आपलं मनातलंच बरं आहे....:)

    ReplyDelete
  13. अरे गौरी तू सिद्धार्थला ओळखत नव्हतीस...माहीतच नव्हतं मला...चला आता ओळख झाली नं लवकरच हापूसवरून छळेल तो तेव्हा ओळख विसरणार नाहीस...:)
    आणि हो माना त्या अंजानाचे आभार..आळशी कुठचे......थांबा आता अजून दोन-तीन लिंका वाढवते....गृहपाठ म्हणून...
    आणि हो कमेंट नाही टाकली तर फ़रक नाही पडत..ते तेव्हा लिहिलं, लिहून गेलं....:)

    ReplyDelete
  14. योमु, बरेच दिवसांनी....ओळख आहे नं....:P
    अरे काही नाही रे बरेच दिवसांची लॉंड्री राहिली होती असं वाटलं....:)

    ReplyDelete
  15. Khupch chan kan pilani kelit tumhi. Ani khare sangu ka mala he sagalech blog khup avadtat mast vatate vachun.

    ReplyDelete
  16. वर्षा प्रतिक्रियेसाठी आभार..फ़क्त मीच केली नाहीये कानपिळणी...ज्यांना ज्यांना जमलंय ते ते करताहेतच कारण शेवटी आपण जरी आपल्यासाठी ब्लॉग लिहित असलो तरी एखाद्या निनावी पत्रकाराने अशा प्रकारे आम्हालाही गृहीत धरु नये ना?
    असो आता तसंही त्याच्या तलवारीची (??) धार बोथट झालीय असं ऐकते...महिला ब्लॉगर्सबद्दल तर चक्क बरंही म्हटलंय (म्हणे) असो...मी माझं काम केलं.....
    आणि तुम्हाला त्या सगळ्या पोस्ट आवडतात हे वाचुन आनंद झाला...वाचत रहा....:)
    पुन्हा एकदा स्वागत आणि आभार....

    ReplyDelete
  17. फाटक्याला पार फाडून टाकलाय.. मूर्खपणाचा कळस आहे ते सदर म्हणजे. स्वघोषीत ्टीकाकारांच्या अर्धवट समजावर लिहिलेले लेख वाटले होते ते.
    लोकसत्ताच्या संपादकांना पण बरं वाटत असेल, या मिनित्ताने का होईना पण लोकसत्ता बद्दल लिहिलं जातंय ब्लॉग वर, आणि हिट्स पण मिळताहेत. टीआरपी वाढतोय लोस चा.

    ReplyDelete
  18. मी एक साइटवाला आहे मग मी का तुमच्या पोस्टला चांगले म्हनून :P

    ReplyDelete
  19. त्या फाटक्यांना म्हणावं तुम्हाला काय हवे ते विषय सांगा...ब्लॉगर मंडळी तयारच आहेत लिहायला
    ते लोक जनातलं लिहितात म्हणून ते वाचकांना जवळचे वाटत नाही आपण मनातले लिहितो ( जे त्यांना जमत नाही) तर जळता का ?

    ReplyDelete
  20. अगदी काका....तुमची पोस्टही मी वाचली...आता हा विषय बंद करून मी तर माझ्या ब्लॉगवर लक्ष देतेय....त्यांनी म्हणे कुठल्याशा मराठी संकेतस्थळावरही यविषयी चर्चा सुरू केलीय...इथे इतका वेळ कुणाला आहे...ज्यांना वाचायचं ते आपल्या पोस्टस वाचतील नाहीतर तेही असो....
    प्रतिक्रियेबद्दल आभारी...

    ReplyDelete
  21. हा हा हा राजे...या निमित्ताने साइटवाली लोकं ब्लॉगवर आली की?? तुमच्या प्रतिक्रियेचा अर्थ पोस्ट आवडली आहे असाच मी घेतेय...:)

    ReplyDelete
  22. सागर अगदी बरोबर कुणाचा तरी जळून कोळसा झालाय म्हणून असली सदरं चालवताहेत ते....:)
    आभार रे...

    ReplyDelete
  23. एकाने म्हणून सोडलेलं नाही त्या फाटक्याला. माझ्याही मनात एकदा विचार आला होता की एक सणसणीत लेख लिहावा पण मग विचार केला की उगाच त्या फाटक्याला काय आपल्या ब्लॉगवर प्रसिद्धी द्यायची? ते म्हणतात ना की कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा रहात नाहीत तसंच सांगते - वाचक माझा ब्लॉग दिवसातल्या कोणत्याही प्रहरात वाचतात, मी वाचण्यासारखं लिहिते म्हणून उलट ते आणखीन लेखनाची अपेक्षा ठेवून आहेत, हे मला माहित असताना उगाच कशाला फाटक्याच्या जड शब्दांनी डोक्याला ताप करून घ्यायचा? मला तर लोकसत्ताची किव येते की त्यांनी ही असली सुमार सदरं सुरू केलीत. कदाचित म्हणूनच माझ्यासारख्या वाचकांनी लोकसत्ताकडे पाठ फिरवली आहे.

    ReplyDelete
  24. कांचन,आभार..खरं आहे...
    मी पण माझ्या लेखात माझ्याच ब्लॉगला प्रसिद्धी दिली आहे... :)
    अवांतर..हो, फ़ेकसत्ता वाचणं कमीच झालंय.....बातम्या काय कुठेही जाऊन वाचता येतात...आणि मत आपलं आपल्याला बनवायचं असतं...त्याबाबतीत सगळ्याच वर्तमानपत्रांचा अनुभव थोडाफ़ार सारखाच....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.