हिमाचल प्रदेशातलं एक छोटं गाव. तिथल्या खत्री स्टॉलचा मालक नंदू खत्रीची इंग्रजीत त्याचं भविष्य ऐकताना झालेली गंम्मत आणि मग लगेच पायावर ताल धरायला लावणारं "मेरा डेसू यहीं अडा" हे गाणं म्हणत येणारी गावातली चंदा गोळा करणारी छोट्या मुलांची टोळी याने सुरूवात होणारी ही गोष्ट....लहान मुलांचा एखादा चित्रपट असेल असं वाटून आणि खरं तर रस्किन बॉंड आणि विशाल भारद्वाज ही दोन भारदस्त नावं वाचली म्हणून पाहायला सुरू केलेला हा चित्रपट. दीडच तासाचा आहे ही माझ्यासारख्यांसाठी आणखी जमेची बाजू. शिवाय लहान मुलांना सांगितल्या गेलेल्या कथांमध्ये रमणारी मोठी मंडळी ज्या कुठल्या कॅटेगरीत मोडतात त्यातलीच मी. एखादी कथा जेव्हा दृकश्राव्य माध्यमातून आपल्यासमोर मांडली जाते तेव्हा तिची मांडणी, लोकेशन्स, पात्रपरिचय आणि पार्श्वसंगीत या आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबीही जुळून आल्या की आपण त्या कथेचा एक भाग होऊन जातो. हा चित्रपट पाहताना तसाच काहीसा अनुभव मलाही आला.
इथे पहिल्या पंधरा मिनिटांत पंकज कपूर यांचा "नंदू" आणि श्रेया शर्मा या अत्यंत गोड दिसणार्या मुलीने तितकीच सुंदर सादर केलेली "बिनिया" या दोन व्यक्तिरेखा कधी ही कथा ऐकणार्यांच्या समुहात आपल्याला सामील करुन घेतात हे कळत नाही. बाकी व्यक्तिरेखा आणि हिमाचलमधल्या हा छोट्या गावाचं रूप हळूहळू अधोरेखित होतानाच या कथेची आणखी एक नायिका जिचं नाव या चित्रपटाला दिलंय ती म्हणजे एक जपानी पद्धतीची निळी छत्री अर्थात "ब्लु अम्ब्रेला"ही लगोलग अवतरते आणि कथा आकाराला घेते.
नंदुचा ती चहा-पाण्याची टपरी सोडून एक आणखी आवडता उद्योग म्ह्णजे गावातल्या लोकांना (किंवा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्याच्याकडे गोळ्या-बिस्किटं घेणार्या छोट्या मुलांनाही) उधार पैसे देऊन मग ते परत घ्यायच्या वेळेस दुसरं काही ना काही मागत बसायचं किंवा हडपायचं. हे अर्थात सगळ्यांना माहित आहे पण तरी कुणी नं कुणी बकरा त्याच्याकडे असतोच. चित्रपटाच्या सुरूवातीलाच एका लहान मुलाकडून दुर्बिण बळकावण्याचा त्याचा प्रयत्न पाहिला की हे आपल्यालाही स्पष्ट होतं. "लोणचं" ही त्याला अत्यंत आवडणारी गोष्ट. त्याला आता ही गावात सगळ्यांना हेवा वाटणारी बिनियाकडे असणारी छत्री स्वतःकडे हवी असावीशी वाटणं साहजिकच आहे. बिनियाला तो वार्षिक खाऊचं आमीष दाखवून ती मिळवायचा एक केविलवाणा प्रयत्न करतो त्या प्रसंगात त्या दोघांचा अभिनय, संवादफ़ेक पाहण्यासारखी आहे. इथे हा चित्रपट आपली पकड आणखी मजबूत करायला प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण चित्रपटाला जे विनोदाचं अंग दिलंय त्याने आपल्याला हे सर्व अनुभवतानाची मजा येते.....कुठल्याही लहान गावात कदाचीत अजुनही अशा प्रकारचे प्रसंग होत असतील अगदी असंही वाटून आपण या चित्रपटाशी आणखी समरस होतो...
अर्थात बिनियाही अतिशय हुशार पोरगी आहे. ती काही त्याला दाद लावू देत नाही. तिची ती भूरळ घालणारी निळी छत्री आपल्यालाही भूरळ घालू लागते. या संपुर्ण चित्रपटात आपल्या चेहर्याने प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालणारी ही मुलगी फ़ार मनात बसते. तिची विधवा आई जेव्हा ही छत्री कुणा पर्यटकाने ही छत्री अशीच कशी दिली असा तिच्या मागे लकडा लावते त्यावेळी तिच्या पहेलवान भावाने स्वतः अस्वलाच्या दाताचं आणलेलं लकी लॉकेट देऊन घेतलेल्या छत्रीवरचं तिचं प्रेम चित्रपटात जागोजागी दिसतं...त्यानंतर या छत्रीने नेमकं ती तिच्या भावावर हल्ला करायला आलेल्या सापाला पळवून लावते आणि अर्थातच या छोट्याशा गावात ती आणि तिची छत्री याचं कौतुक जास्तच पसरतं. छत्री घेऊन तिच्याबरोबरच्या इतर मुलामुलींबरोबरचं गाणं हे चित्रपट पाहताना आपल्याही मनात रुंजी घालतं...आपणही नकळत म्हणतो "कुक कुकडी कुक, कुक कुकडी कुक".
आता अर्थातच अपेक्षेप्रमाणे ही छत्री हरवते आणि मग त्यानंतरची इतर चित्रपटात प्रेमभंग झालेली नायिका असते तशीच भकास बसलेली बिनिया आणि तिचं सांत्वन (अर्थात बाहेरून) करणारे नंदू आणि गावातल्या इतर काही व्यक्तिरेखा ज्यांना आधी फ़ार फ़ुटेज न खाता व्यवस्थित ओळख करून देण्यात आलंय. जसं अपेक्षेप्रमाणे ही छ्त्री हरवते तसंच अपेक्षेप्रमाणे जेव्हा ती अवतरते तेव्हा किंवा त्याआधी ती नंदूने घेतली असेल असं आपल्याला वाटू न द्यायचं काम दिग्दर्शकाने आधीच्या काही प्रसंगात नंदूचं "चोरी करना पाप है" किंवा त्याचं त्या छत्रीची बाजारतली किंमत काढणारा नंदू या सगळ्याने कमी होतो. पण तरीही बिनिया त्याच्या पोलिसांना घेऊन त्याच्या दुकानावर छापा घालते आणि इथे हा चित्रपट किंवा ही कथा बालकथेतून आपल्याला बाहेर काढून मोठ्या माणसांच्या खर्या जगात घेऊन येते.
छत्री अर्थातच नंदूच्या दुकानात सापडत नाही पण झालेल्या अपमानाने त्याच्याबरोबर आपणही व्याकूळ होतो. अर्थात आता ही छत्री जोवर येणार नाही तोवार आपण लोणच्याला हात लावणार नाही असं सांगून गावच्या लोकांसमोर लोणच्याची एक बरणी फ़ोडणारा नंदू पाहिला की चित्रपट पाहणार्या आपल्यासाठी मात्र थोडं हलकं होऊन जातं. थोडसं पु.ल.देशपांड्याच्या भानावर आलेल्या गटण्याप्रमाणे...:)
या पार्श्वभूमीवर "पर्बतों पे बर्फ़ा बरसा लागे" हे गाणं हिमाचलमधला विंटर समोर आणतो...त्या हिवाळ्यात छत्रीच्या आठवणीने उदास झालेली बिनिया दिग्दर्शकाने अतिशय मार्मिकपणे टिपली आहे.
दुसर्याच काही क्षणात पुन्हा ऋतु बदलतो आणि स्वच्छ सुर्यप्रकाशात तशीच गुलाबी छत्री नंदू गावच्या लोकांच्या समोर टाळ्यांच्या गजरात काढून कथेचा पुढचा टप्पा गाठतो. आता आधीचे काही अतृप्त आत्मे जसे लिलावती आणि तिचा नवरा यांना लोणच्याच्या बदल्यात छत्री भाड्याने देणे वगैरे उद्योग किंवा सगळीकडे ती छत्री मिरवणे हे त्याच्या शब्दात सांगायचं तर आत्मा संतुष्ट करायचे उद्योगही सुरू करतो. गावात अधेमधे येणारी चित्रपटवाली मंडळीबद्दलचे प्रसंगही कथेत थोडीफ़ार मीठ-मिरी घालतात.
आणि मग येतो तो शेवटच्या वळणाआधीचा टप्पा. बिनियाने घेतलेला वेगळ्या पध्दतीने छत्रीचा शोध..यावेळी खरा चोर सापडतो आणि अर्थातच तो नंदूच असतो (ती ते कसं शोधते हे लिहिण्याचा मोह मी टाळते कारण जवळजवळ सगळीच कथा या पोस्टमध्ये आहे) पण यावेळी गावकर्यांनी त्याला आधी दिलेल्या मान-मरातबामुळे तो चोरच नाही तर खोटारडाही ठरतो आणि सगळं गाव त्याला वाळीत टाकतं...इथे पुन्हा एकदा हिमाचलमधला हिवाळा...देवदार वृक्षांवरून बरसणारा बर्फ़ आणि आधीचं हिरवगार असणारं आता पांढरंशुभ्र झालेलं कुरण हे दिग्दर्शन चित्रपट आतपर्यंत पोहोचवायला खूप मदत करतं....
त्यानंतर जे काही प्रसंग दाखवलेत त्यात हवालदिल होऊन मुलांना फ़ुकट चॉकोलेट देऊ करणारा आणि मग मुलांच्या "नंदकिशोर छत्रीचोर" अशा ओरड्यामुळे त्यांच्या मागे लागणारा नंदू....गावकर्यांच्या घालून-पाडून बोलण्याने चेहरा पाडून घेणारा नंदू...तो एका ठिकाणी दाढी करायला जातो तेव्हा न्हाव्याला "तिनका जरूर निकाल देना" किंवा त्याने देऊ केलेलं अस्वलाच्या दाताचं लॉकेट नाकारताना "चोरी का होगा तो कहीं भालू न पिछे पडे" अशा प्रकारे त्याला चिडवण्याची संधी न सोडणारे गावकरी या अशा प्रसंगातून त्याचं दीनवाणेपण समोर येतं तसं तसं आता याचं काय होणार हे आपल्यालाही कळत नाही. नकळत या इतक्या छोट्या छत्रीमुळे एखाद्या माणसाचं झालेलं हरण कुठेतरी आपल्याला आजुबाजुलाही असं कुणाला वागवलं जात असेल तर त्याचं कसं होत असेल हा एक अॅंगल दाखवून देतो.
आता पुढे काय हे आपल्याला जास्त विचारात न पाडता एक सुखद वळण कथाकार आपल्यासमोर घेऊन येतो. हे सगळे प्रसंग पाहून खूप विचार करणारा बिनियाचा चिमुकला जीव यावर एक सुंदर उपाय काढतो आणि नंदूच्या दुकानात असंच काही काम काढून जाताना ती छत्री तिथेच ठेऊन येते. छत्रीमुळे तावून-सुलाखून निघालेला नंदू तिला ती छत्री परत द्यायला जातो आणि आपल्या सुंदर हास्याने ती त्याच्याच लकबीत त्याला ती छत्री स्वतःची नाही म्हणून सांगते...खूप गोड वाटतं तिचं ते "बाय चान्स".....
त्यानंतर मग सुरुवातीला म्हटलेला तो इंग्रजीतलं भविष्य ऐकायच्या प्रसंगाने ही कथा एका चांगल्या वळणावर येऊन संपते....खत्रीच्या स्टॉलचं नाव छत्री स्टॉल झालेलं असतं....
गोष्टी ऐकायला ज्यांना आवडतं त्यांना गोष्टीचा हा दृक-श्राव्य परीणाम जरूर आवडेल. कुठल्याही चित्रपटाच्या कथेत न म्हटलेले संवाद हे पार्श्वसंगीत भरून काढू शकतं असं विधान करायचं असेल तर ब्लु अंम्ब्रेलाचं अप्रतिम पार्श्वसंगीत त्या छोट्या गावातल्या हिवाळ्यात आपल्याला नेऊन सोडतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीचा बाऊ करून एक जीवन उदासीनतेच्या वाटेवर लागलेलं असतं त्यावर एक छोटीशी मुलगी किती निरागसपणे उपाय करू शकते हा संदेशही सोप्या भाषेत हा चित्रपट देऊन जातो.
हा चित्रपट मी या हिवाळ्यात एकदा आई आणि एकदा बाबा दोघांबरोबर पाहिला आणि दोघांनाही तो खूप आवडला. २००५ मध्ये आलेला चित्रपट मला नेटफ़्लिक्सवरच्या सजेशन्स मध्ये आला होता...ज्याने कुणी ही सजेशन्सची कल्पना सुरू केलीय त्याचे आभार आहेतच. विशाल भारद्वाज जो लहान मुलांसाठीच्या "मोगली"मुळे मला तेव्हापासून आवडायचा त्याचं सादरीकरण हे या चित्रपटाचं यश आहे. यापूर्वी मी ज्यांना वाचलंय पण आठवत नाही अशा लेखकांमध्ये रस्किन बॉंड यांचं नाव आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं साहित्य मिळवून वाचायचाही प्रयत्न आहेच. त्याबद्दल जर कुणाकडे अधीक माहिती असेल तर नक्की द्या...आणि हो आपणही हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला तो कसा वाटला ते नक्की कळवा....:)
हा चित्रपट लॅपटॉपवरच्या "लवकरात लवकर (वेळ मिळेल तेंव्हा)" पाहायच्या लिस्टवर गेले वर्षभर तरी पडून आहे. आत्ता त्या लिस्टमध्ये त्याला पहिल्या क्रमांकावर आणायला हवे.
ReplyDeleteआणि विशाल भारद्वाज <--> मोगली हे समीकरण मला ठाऊक नव्हते गो. दोन फेवरेट गोष्टींची ही नवी लिंक कळल्यावर आणखी गंमत वाटली.
पाहिलाय ... नितांत सुंदर आहे हा सिनेमा.
ReplyDeleteमस्तच वाटतीये गोष्ट. आणि हिमाचल म्हणजे डोळ्यांना सुख.
ReplyDelete‘मी कधी बघणार?’ च्या यादीत अजून एक भर अपर्णा तुझ्यामुळे :)
सिद्धार्थ अरे लॅपटॉपवर आहे तर मग बघायला देरी किस बात की?? इथे (जर तू पूर्ण वाचलं असशील तर) सगळं कथानकच मांडलंय पण तुझ्या नजरेने पहा तुला नक्की आवडेल....:)
ReplyDeleteविशाल भारद्वाज <--> मोगली हे खरं म्हणजे मी मोगलीचं गाणं असं लिहायला हवं होतं..बाकी तर मोगली मला वाटतं डब्ड आहे..नीट माहिती नाहीये....:)
सचिन मला वाटलं होतं तू चांगले दोन-तीन तरी गुल्शन ग्रोव्हरसारखे बदमाश लोकं असलेलेच सिनेमे पाहातोस का? मला बरं वाटतंय की तू पाहिलास आणखी तुला तो सुंदरही वाटला..आभार्स रे...
ReplyDeleteगौरी, वर लिहिलेली गोष्ट जर तुला आवडली असेल तर त्याचा पिक्चरी परीणाम फ़ारच सुरेख आहे इतकंच म्हणेन..बाकी तू कळवच मुहुर्त काढलास की....
ReplyDeleteAparnaji;
ReplyDeleteThanks a lot... Kadhi pasun pahin asa manaat hota pan tumchya post ne asa kahi kutuhal nirmaan zala... ki same day mi movie shodhun download kela.
Atishay sundar citrapat ahe... mala movies awadat nahit... pan ha movie tar ekdum WORTH WATCHING asa ahe!!!
Thanks once again!!! :)
संतोष, आपण लगेच सिनेमा पाहून कमेंटपण दिलीत त्याबद्दल डबल आभार...:)
ReplyDeleteआणि खरं म्हणजे मी पण पूर्वी फ़ार सिनेमे पाहात नसे पण देश बदलला तशी सवय बदलली..खरं तर सिनेमा या विषयावर लिहायचा माझा हक्क नाहीये हे मी फ़िफ़्टी फ़स्ट डेटच्या पोस्टलाच कबूल केलंय पण असे चित्रपट पाहिले की राहवत नाही आणि मग त्यातून अशा पोस्टेचा जन्म होतो..आणि हा चित्रपट तर मी दोनदा पाहीलाय....:)
मी ही पाहिलेलाय. नितांत सुंदर सिनेमा आहे.
ReplyDeleteश्रीताई, मला साधारण तुम्ही नेहमी चित्रपट पाहण्यार्यांनी हा चित्रपट नक्की पाहिला असणार याची खात्री होती...आता पुन्हा अशा पद्धतीचे सिनेमे पाहशील तेव्हा ते मला सजेस्ट जरूर कर...आभार्स....:)
ReplyDeleteकधीपासून वॉचलिस्ट मध्ये पडून आहे. लगेच बघतो.
ReplyDeleteहेरंब काय सांगतोस काय?? मुझे विश्वास नहीं हो रहा है चित्रपटापट सत्यवान को अपुन खूद एक चित्रपट देखने की याद दिला रहे है....वॉच, मग परत post पूर्ण वाच आणि कळव नक्की...तुला कसा काय वाटला ते......:)
ReplyDeleteby the way what is this चित्रपटापट सत्यवान ???..:D :D