Showing posts with label पाऊस. Show all posts
Showing posts with label पाऊस. Show all posts

Sunday, June 23, 2013

पाऊसवाट

पावसाचं माझं नातं जुनंच,  तरीही इकडे नेहमी पडतो म्हणून रुसवाच जास्त. मग एखाद आठवडा उघडीप मिळाली  की जणू  त्याने इतके दिवस केलेला छळ विसरतेच मी. मस्त शनिवारपर्यंत बाहेर जायची सगळी कामं करत राहते. रविवारी पण मुलांना बाहेर न्यायचा बेत करते आणि रविवारची सकाळ उजाडते तीच काळोख दाटलेली. 

का कुणास  ठाऊक,  आज त्याच्यावर रुसावंस वाटत नाही. उलट आजची त्याची रिपरिप मला माझी त्याच्यावरची जुनी प्रीती आठवून देणारी वाटते. काल रात्रीच एका जुन्या, जन्मजन्मांतरीचे संबंध असणाऱ्या मैत्रिणीशी गप्पा झाल्याचा हा परिणाम तर नसेल ना ? काल आमचे जुने भटकंती दिवस आठवत होतो. पुढच्या पावसाळ्यात तिच्या नव्या घरी राहायला भेटायचं आमंत्रण घेऊन संपलेला तो फोन माझ्या मनावर रेंगाळत असावा. सकाळी बहुतेक मग त्या भटकातीच्या आठवणीचीच धुंदी मला पुन्हा पावसाच्या जुन्या प्रेमात नव्याने भाग पाडतेय.

तसा अगदी धो धो नाहीये म्हणून मग "फ्रेश एअर"च्या निमित्ताने रेनी jacket घालून बाहेर चालायला जायचा एक छोटेखानी कार्यक्रम होतोच. चालत असते मी त्या रुळल्या पाउलवाटेने सराइतासारखी. खाली लक्ष द्यायची गरज नस्तेच. मग उंच वाढलेल्या गवताचा एक माळ  लागतो आणि मी जागेच भान विसरून जाते. 

ते भिजलं गवत मला आठवण करून देत असतं जुने पावसाळे असेच नवनवीन जागी गवत तुडवून वाट शोधेलेले आणि कधी हरवलेले. मनाने मी आधीच कित्येक मैल लांबच्या त्या अनवट जागी पोहोचली असते आणि एकदम साद येते "आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे" माझ्या पिल्लाचा हात हातात घेऊन मग उरल्या पाउलवाटेच कौतुक करत आम्ही घरी येताना मध्येच  एका ठिकाणी थोड्या कमी उंचीच्या गवतातून पण गम्मत म्हणून चालतो. 


आधीच्या माझं मन हरवलेल्या त्या वाटेला मनातल्या मनात मी "पाऊसवाट" म्हणून नाव देऊन टाकलेलं असतं आणि माझ्यासमोर असतो प्रसन्न सुरु झालेला एक ओला  दिवस.   

Tuesday, August 21, 2012

पाऊस


उन्हाची काहिली वाढून तो अवेळी येतो...वळीव म्हणतात त्याला....त्यावेळी येणार्‍या मृदगंधाने जीव वेडावतो...पण तो लगेच येत नाही...सजणीला भेटायला येणार्‍या साजणाने तिला झुरवावे तसा तो धरित्रीला झुरवतो....त्यानंतर उष्मा आणखी वाढतो..त्याच्या आठवणीने जमीन आणखी कोरडी पडते....त्याची वाट पाहात राहते...आणि मग नगारे वाजवत तो येतो आणि त्याच्या आगमनाची ग्वाही हिरवा शालू लेवून तीही सजते....

वळीव आणि नंतर मग आलेला हा पाऊस नेहमीचा झाला की आपणही सुखावतो....त्याच्याबरोबर भटकायला बाहेर पडतो....मान्सुनमधला पाऊस हा असाच असतो नाही???....हवाहवासा? त्याच्याबरोबर दूर हरवून जावं असाच..

मग तो कधीतरी दूरदेशी अचानक कुठेही भेटतो. त्याच्या आगमनाला इथे ऋतुचा संकेत नसतो. स्प्रिंग येणार म्हणून पाऊस, समर जास्त होतोय म्हणून पाऊस, रंगवलेल्या झाडांची नक्षी उतरवायला फ़ॉलमध्ये येणारा पाऊस आणि तापमान शून्याच्या खाली नाहीये म्हणून बर्फ़ाऐवजी येणारा विंटरमधलाही पाऊसच...त्याला खरं तर पाऊसही म्हणवत नाही...त्याची बोळवण, "आजचा दिवस धुपलाय" किंवा "फ़ारच रेनी आहे" अशी होते...तेव्हाही तो आवडत नाहीच असं नाही. पण त्याचा त्रास मात्र जास्त जाणवतो...कदाचित देशातल्या मान्सुनची सवय आणि काय?

एखादा संपूर्ण आठवडा पावसाळी असणार हे बातम्यांमध्ये वाचून माहित झालेलं असतं......तरी सोमवारच्या सकाळपासून मळभ पाहून फ़ार विचित्र व्हायला होतं...त्याची दिवसभरची पिरपिर अस्वस्थ करते...अशावेळी माझी जुनी दुखणी "पाठ" नावाच्या अवयवाची सेकंदा सेकंदाला जाणीव करून देतं...पण ही अस्वस्थता या दुखण्याची नाहीये असं सारखं वाटतं...मन संध्याकाळच्या मुलांबरोबरच्या रूटिनमध्ये गुंतायला पाहातं आणि एका वाईट बातमीची मेल येते....

ती बातमी मनात सलत असताना मी माझी मुलांसोबतची नित्यकर्म आवरते आणि दमून बसणार तोच बाहेरचा दिवसभर रिपरिप पडणारा पाऊस थैमान घालायला लागतो..खरं तर इथे त्याचं जोरदार कोसळणं असं नित्याचं नाही..इथला आणि विशेषत: या मोसमातला त्याचा नेहमीचा बाज शांतपणे बरसण्याचा..पण आज जसं मनात विचारांनी कल्लोळ करायला सुरूवात केली तसाच पावसाचा आवाज वाढत जातो...त्याने मनातला गोंधळ शांत होईल का? माहित नाही..

दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत खरं तर पाऊस थांबून लख्ख सूर्यप्रकाश येतो...पण मनात मात्र कालचा ढगाळ दिवस तसाच असतो.....

अपर्णा,
५ जून २०१२

Wednesday, March 3, 2010

गाणी आणि आठवणी १ - अबके सावन ऐसे बरसे

इंजिनियरिंगमधल्या कुठल्या तरी मान्सुनमध्ये "सीखो ना नैनो की भाषा" ऐकलं...तसंही आधी "अबके सावन" आणि अशा गाण्यांनी शुभाजींची गायकी आवडायला लागली होतीच...पण हे गाणं त्याच्या व्हिडिओसकट आवडलं...खरं तर कुठलंही अशा अर्थाचं गाणं करायला गेलं तर खूप जास्त शृंगारिक होऊ शकतं. पण यातल्या नायक नायिकेचा तात्पुरता विरह अगदी नेमक्या प्रसंगात दाखवण्याचं कसब खूपच छान साधलं गेलंय या व्हिडिओमध्ये आणि सोबतीला अतिशय सुंदर सुरावटींमधुन येणारा शुभाजींचे आर्त सूर....


सगळं जग जेव्हा मेच्या सुट्टीत हापुसचा आनंद घेत असतं तेव्हा मुंबै (आणि आपल्या इथल्या बर्‍याच) युनिव्हर्सिटीची मुलं "जास्त आंबे खाऊ नकोस..झोप येईल" असलं काही घरच्यांचं ऐकत बिचारी अभ्यास करत असतात आणि मग नंतर मग लगेच पुढच्या महिन्यात जेव्हा तेच जग छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल,साडीचे ओचे, ड्रेसच्या ओढण्या आणि पॅंटवर उडणारा चिखल सांभाळात शाळा-कॉलेज,ऑफ़िस कुठेकुठे म्हणून जगरहाटीत धावत असतात तेव्हा तीच आधी सांगितलेली गरीब बिचारी मुलं आपली वार्षिक सुट्टी आपल्या मर्जीप्रमाणे घालवत असतात त्यावेळी ऐकलंलं आणि अनेक वेळा पाहिलं गेलेलं हे गीत आहे...त्यामुळे कधीही ऐकलं की मला ती सुट्टी, बाहेर भरुन आलेलं आभाळ आणि हातात गरम भुट्टा नाहीतर उकडलेल्या शेंगा, चहा, भजी किंवा वेगवेगळी गरमागरम खाणी असलेली मी आठवते....कसे येणार ते दिवस परत? एकदा कॉलेजजीवन संपलं की संपल...पण...असो...

आज इथे असंच आभाळ भरुन आलंय आणि माझ्याच ऑरकुटमधल्या फ़ेवरिट व्हिडीओ पाहताना पुन्हा एकदा वार्षिक सुट्ट्यांचे ते दिवस आठवताहेत...खरंच गाण्यांबरोबर किती आठवणी निगडीत असतात ना? माझ्यासाठी तर अशी अतोनात गाणी आणि काही काही आल्बमसुद्धा काही जागा, प्रसंग यासाठी लक्षात आहेत...

पाऊस आणि गाणी हा तर एक अविस्मरणीय धागा आहे...नैनो की भाषा मध्येही सुरूवात पहाटेपासून आहे पण पाऊस येतोच...आणि पाऊस आपल्याबरोबर अनेक आठवणी घेऊन येतो...कधी त्या डोळे ओलावुन जातात तर कधी त्या आठवणींमधला मिस्किलपणा पुन्हा एकदा चेहेर्‍यावर येतो...
आणि मग नेमकं जर याच गाण्यानंतर "अबके सावन" लागलं तर..पावसाळ्यातला दुग्धशर्करा योग म्हणतात तो हाच...असं झालंय ही बहुधा आता त्या चॅनेलचं नाव आठवत नाही पण तिथे कायम गाणी असायची आणि मग पसंद आपकी स्टाइलमध्ये पावसात ही गाणी आगेमागेही लागायची...त्याचा आनंद फ़क्त एका विमानप्रवासाच्या वेळी शोभाजी प्रत्यक्षच भेटल्या त्याशी होऊ शकतो....खरंच या आवाजात आणि व्यक्तिमत्वात काहीतरी वेगळं आहे..नाहीतर जी काही दोन मिन्टं एअरपोर्टवर भेटलो होतो ते असं अनिवारपणे आठवावं आणि त्यांचीच गाणी ऐकली जावीत...ऑरा या शब्दाचा खरा अर्थ अशा काही व्यक्ति भेटल्या की अचानक समजतो नाही???
गाणी आणि आठवणी आपल्यापैकी बर्‍याच जणांचा आवडीचा छंद असणार हे नक्की....अशाच काही आठवणी अधुनमधुन या ब्लॉगवर घेऊन यायचा विचार आहे...
 
फ़ोटो मायाजालावरून साभार...

Tuesday, July 21, 2009

एक असाच ओला दिवस...

असा पावसाळी दिवस आला की आपल्या मान्सुनी दिवसांची हमखास आठवण होते. आठवतात ते आयत्यावेळी मित्रमंडळाला गोळा करुन संजय गांधी नॅशनल पार्कात केलेले छोटे ट्रेल्स. गाड्या बान्द्र्याच्या पुढे जायच्या बंद पडल्या की एकमेकांना फ़ोन करुन घरी जायच्या ऐवजी आमचा अड्डा तास-दोन तासासाठी का होईना पण बोरीवलीच्या उद्यानात. आमच्यातला एक अति सुदैवी प्राणी या गेटच्या बाजुलाच राहायचा. तो बरेचदा चक्क पायात स्लिपर घालून येई. घरी अर्थातच नाक्यावर जाऊन येतो सांगितलं असणार हे नक्की.



गाडीवाला कुणी असला तर कान्हेरी पर्यंत जाऊन मग हिरवं रान आणि थोडीशीच दिसणारी वाट हे हमखास आवडीच दृष्य. यासाठी इतर सर्व प्लान कुरबान.. कान्हेरीच्या पायरीवर चिंचा, पेरू, काकडी असं काहीबाही घेऊन न धुतल्या हाताने खाणं आणि एकमेकांना देणं. जास्त वर चढून नाही गेलं तरी हिरवा पिसारा लगेच नजरेच्या टप्प्यात येई आणि मग आपण एकटे असलो तरी चालेल. सगळीजणं बसून खूप गप्पा मारल्यात असही नाही. नुसतंच निसर्गाला ऐकायचं आणि हिरवा रंग डोळ्यात साठवून ठेवायचा. पावसाची जोरदार सर आली तरी तिला न जुमानता तसचं बसून राहायचं. घरी गेल्यावर बॅगमधलं काय काय ओलं झालंय ते पाहू...

गाडी नसली तर मग चालवेल तिथपर्यंत चालायचं आणि कुठे काही हालचाल दिसली तर हिरव्या गर्द राईत घुसायचं. कितीदा अशा नसलेल्या रस्त्यांमध्ये आम्ही हरवलोही आहोत. एखाद्या पक्ष्याच्या मागे जाता जाता मग परत मुख्य रस्त्याला लागेपर्यंत ज्याच्या कडे जे काही खायला असेल त्याचा चट्टामट्टा करुन आणि पाण्याचं रेशनिंग केलेले ते दिवस विसरणं खरचं अशक्य आहे. मुंबईतल्या मुंबईत हा जंगल सहवास मिळणारे आम्हीच भाग्यवान म्हणायचे. खरतर मान्सून मध्ये पक्षीगण जास्त दिसतही नसे पण किटकांची चलती होती. तेवढ्यापुरता जी शास्त्रीय नावे कुणी सांगत ती लक्षातही राहात. पुन्हा काही दिवसांनी मात्र आम्हा द्विजगण प्रिय.... पावसाळ्याचे दिवसच काही और हे मात्र नक्की.

परतीच्या वाटेवर खुपदा रिपरिपच असे. मग चालत असू तर तसेच फ़्लोट्सचे चालताना येणारे वेगवेगळे आवाज ऐकत आज काय काय पाहिलं याची छोटी (कारण जास्त पक्षी दिसलेच नसत) उजळणी. आता उरला  मान्सून  या वर्षी कुठे कुठे जायचं या़चे बेत बनवण्यात उद्यानाचा मुख्य दरवाजा कधी येई ते कळतही नसे. पायाखालची वाट मात्र नेहमीची. सिलोंड्याच्या रस्त्याने आलं तर उजवीकडे हरणं दिसतायत का याचा वेध नाहीतर आत जायला मिळालं असतं तर किती बरं याचा विचार प्रत्येक वेळी तोच पण तरी नवा. गेटपाशी आल्यावर मात्र अगदीच सैरभैर झाल्यासारखं...आता पुन्हा ते वाहनांचे आवाज, गर्दी आणि लोकलचा प्रवास. सगळंच जंगलातून जायला मिळालं तर किती बरं असं प्रत्येकवेळी वाटायचं. पण पुन्हा इथेच यायचय हे मात्र नक्की.
आज इथे असंच सारखं भरुन आलय. या हवेच्या नशेने का काय माहित नाही पण माझा मुलगा मस्त झोपलाय. त्याची झोप मोडुच नये असं लिहितानाच त्याचा आवाज यावा यापरिस योगायोग तो काय?? चला मुंबईतल्या नॅशनल पार्कमधून परतायला हवं नाही??