Tuesday, August 21, 2012

पाऊस


उन्हाची काहिली वाढून तो अवेळी येतो...वळीव म्हणतात त्याला....त्यावेळी येणार्‍या मृदगंधाने जीव वेडावतो...पण तो लगेच येत नाही...सजणीला भेटायला येणार्‍या साजणाने तिला झुरवावे तसा तो धरित्रीला झुरवतो....त्यानंतर उष्मा आणखी वाढतो..त्याच्या आठवणीने जमीन आणखी कोरडी पडते....त्याची वाट पाहात राहते...आणि मग नगारे वाजवत तो येतो आणि त्याच्या आगमनाची ग्वाही हिरवा शालू लेवून तीही सजते....

वळीव आणि नंतर मग आलेला हा पाऊस नेहमीचा झाला की आपणही सुखावतो....त्याच्याबरोबर भटकायला बाहेर पडतो....मान्सुनमधला पाऊस हा असाच असतो नाही???....हवाहवासा? त्याच्याबरोबर दूर हरवून जावं असाच..

मग तो कधीतरी दूरदेशी अचानक कुठेही भेटतो. त्याच्या आगमनाला इथे ऋतुचा संकेत नसतो. स्प्रिंग येणार म्हणून पाऊस, समर जास्त होतोय म्हणून पाऊस, रंगवलेल्या झाडांची नक्षी उतरवायला फ़ॉलमध्ये येणारा पाऊस आणि तापमान शून्याच्या खाली नाहीये म्हणून बर्फ़ाऐवजी येणारा विंटरमधलाही पाऊसच...त्याला खरं तर पाऊसही म्हणवत नाही...त्याची बोळवण, "आजचा दिवस धुपलाय" किंवा "फ़ारच रेनी आहे" अशी होते...तेव्हाही तो आवडत नाहीच असं नाही. पण त्याचा त्रास मात्र जास्त जाणवतो...कदाचित देशातल्या मान्सुनची सवय आणि काय?

एखादा संपूर्ण आठवडा पावसाळी असणार हे बातम्यांमध्ये वाचून माहित झालेलं असतं......तरी सोमवारच्या सकाळपासून मळभ पाहून फ़ार विचित्र व्हायला होतं...त्याची दिवसभरची पिरपिर अस्वस्थ करते...अशावेळी माझी जुनी दुखणी "पाठ" नावाच्या अवयवाची सेकंदा सेकंदाला जाणीव करून देतं...पण ही अस्वस्थता या दुखण्याची नाहीये असं सारखं वाटतं...मन संध्याकाळच्या मुलांबरोबरच्या रूटिनमध्ये गुंतायला पाहातं आणि एका वाईट बातमीची मेल येते....

ती बातमी मनात सलत असताना मी माझी मुलांसोबतची नित्यकर्म आवरते आणि दमून बसणार तोच बाहेरचा दिवसभर रिपरिप पडणारा पाऊस थैमान घालायला लागतो..खरं तर इथे त्याचं जोरदार कोसळणं असं नित्याचं नाही..इथला आणि विशेषत: या मोसमातला त्याचा नेहमीचा बाज शांतपणे बरसण्याचा..पण आज जसं मनात विचारांनी कल्लोळ करायला सुरूवात केली तसाच पावसाचा आवाज वाढत जातो...त्याने मनातला गोंधळ शांत होईल का? माहित नाही..

दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत खरं तर पाऊस थांबून लख्ख सूर्यप्रकाश येतो...पण मनात मात्र कालचा ढगाळ दिवस तसाच असतो.....

अपर्णा,
५ जून २०१२

5 comments:

 1. सगळं वातावरणच कोंदट, ढगाळ झालंय :((

  ReplyDelete
 2. असंच काहीसं...

  आठवते का तुझी पावसाची हुरहुर
  वैशाख वणव्यात जळताना,
  मग विसरुन कसं चालेल चातकाला
  मृगाच्या पावसात भिजताना..

  ReplyDelete
 3. मळभ खरच खूप अस्वस्थ करते मग ती वातावरणातली असो वा मनातली.

  ReplyDelete
 4. आकाशातलं मळभ मनातही उतरतं ते असं ..!!

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.