Thursday, October 28, 2010

गाणी आणि आठवणी ६ - नवलाख तळपती दीप विजेचे येथ

आभाळ भरुन आलंय...आता हे खरं तर नेहमीच असं राहणार माहित आहे पण तरी का कोण जाणे प्रत्येकवेळी ते असंच उदास करुन ठेवतं...अगदी उठुन खोलीत थोडा प्रकाश करावा असंही वाटत नाही...आणखी काही दिवसांनी तर घड्याळ मागे केलं की मग संध्याकाळही लवकर भेटायला येणार आणि तीही जास्ती करुन सूर्याची लाली न ल्यायता..भरुन आलेल्या दिवसांत अख्खा दिवस म्हणजे जणू एक मोठी संध्याकाळच..संध्याकाळी होणारी संध्याकाळ घेऊन येणार तो काळोख......फ़ोर सिझनचं खूळ नॉर्थ-इस्टला असताना बरं होतं का असं इथे वेस्टातला पाऊस सुरु झाला की हमखास वाटतं.
खरं तर पाऊस, पावसाळा मला फ़ार आवडतो...की आवडायचा? या पावसाला मुख्य त्या पहिल्या पावसाचा मातीचा वेडा करणारा मृदगंध नाही. शिवाय कडाडणार्‍या थंडीत तो पडणार म्हणून भिजायचं सुखही नाही. एकवेळ छत्री-रेनकोट नसेल तर चालेल पण चार किलो कपडे,स्वेटर, कोट, हातमोजे हे सर्व घालुन पावसाला हाय कसं म्हणायचं...त्याऐवजी उरल्या-सुरल्या तोंडाला बोचणारी थंडी नकोशी होऊन गाडी नाहीतर घराच्या हिटरमध्ये धावायची लगबग. पावसाचे बाकी सगळे चोचले पुरवता आले नाही तरी नशिबाने बाहेर पाऊस पडत असताना लागणार्‍या आल्याच्या चहाची चव तीच आहे हा काय तो आशेचा किरण.
घरुन काम करायचं एक बरं असतं...कुठेही बसता येतं...थोडंफ़ार बाहेरच्या पावसाला पाहताही येतं आणि मुख्य म्हणजे आपल्याला हवा तसा चहा करुन त्या छोट्या क्षणाची मजा एकटीने का होईना पण घेता येते. प्रत्यक्ष कामाच्या जागच्या डिप-डिपपेक्षा बरंच बरं....अशी थोडंसं अंधारलेल्या पावसाळी वातावरणात या चहाब्रेकमध्ये स्वयंपाकघरात आले की मला दिसते मीच सकाळी लावलेल्या दिव्याची अजुन जळणारी वात....न कळत माझ्या कानात सी. रामचंद्रांच्या संगीत आणि आवाजातले कुसुमाग्रजांचे शब्द रुंजी घालतात

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात

या गाण्याला एक विशिष्ट आठवण नाही पण मला कुठच्या तरी शांत जागी हे गाणं पोहोचवतं आणि सगळं आर्त वाटतं...प्रत्येकवेळी ते ठिकाण बदलतं...काही जुन्या आठवणीही रुंजी घालत असतात...
मामाकडे मधल्या अंधार्‍या खोलीत आजीच्या पलंगाच्या वरती असणारी आणि खरं तर आजी लावेल तेव्हाच तेवणारी वात ही मुख्य आठवण.एवढ्या मोठ्या घरात माझ्या लाडक्या मामाच्याच वाट्याला घराची अंधारी बाजु का यावी असं त्यावयातही वाटणारी मी. दुसरी आठवण मी सहावीत असताना मावशी गेल्यावर त्या बारा दिवसात सकाळी पांघरुणातूनच दिसणारा रोज तिच्या फ़ोटोपुढे तेवणारा दिवा, पोटच्या पोरीचं हे असं स्वतःच्या समोर निघुन जाणं पाहताना अश्रु आटलेली आजी आणि रोज तितकीच हमसुन दुःख करणारी आई....सगळं त्या वातीच्या साक्षीने...हे सगळं आठवणीतुनही लवकर सरावं म्हणून प्रयत्न करणारी मी.....का हे असं पावसाचं मला एकटीला भेटणं हळवं करतं माहित नाही....
मी कुठल्या तरी कडव्यात माझ्यासाठी दुसरी वाट शोधते,
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट

अमेरिकेतल्या फ़्रायडे हार्बर नाहीतर हवाईच्या बेटावर ती श्रीमंती घरं पाहायला गेलेलं माझं मन दुसर्‍याच क्षणी मायदेशातल्या माझ्या लहानपणी बाबा नदीत दगड फ़ेकुन तो जाता जाता अनेकवेळा दिसायचा तसंच फ़ेकताना तिथे जाऊन पोहोचतं..श्या किती वर्षं झाली नदीवर जाऊन...नाहीतर लहानपणी सुट्या आणि आमची सूर्यानदी हे समीकरण होतं..बाहेरचा आधी उदास करणारा पाऊस आता नसतोच...मी पुन्हा एकदा गुणगुणते
बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग

एकटेपणातला पाऊस पुन्हा एकदा माझ्याबरोबर येतो आणि मी मुकाटपणे "चल, आता सवयीचे होऊया" असं म्हणून त्याचा हात घट्ट पकडून सोबत करु लागते.....मनात ते गुणगुणणं तसंच असतं....." परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, त्या माजघरातिल मंद दिव्याची वात".......

Friday, October 22, 2010

मर्फीचा फेरा

तसंही मर्फीमहाराज मध्ये मध्ये छोट्या फेऱ्या आमच्याकडे मारत असतात...आणि जास्त प्रेम उतू गेल तर मग मोठा दौरा असतो...मागे ती तेवीस तास उसात चक्कर मारली होती तोही त्यांचाच पराक्रम होता...यावेळी मात्र हा अख्खा आठवडा त्याचा मुक्काम माझ्याकडे आहे असं दिसतंय...मर्फी महाराज म्हणजे तेच ते मर्फीचा नियम वाले....


म्हणजे आता या (पर)देशात खर तर इतक्या एकट्या आया(single moms) आहेत की एक आठवडा जर माझा नवरा कुठे कामासाठी बाहेर गेला म्हणून काही माझ्यावर आकाश कोसळत नाही...राहू मी आणि माझा मुलगा असा एक आशादायक विचार त्याला मागच्या रविवारी airport ला सोडताना केला होता...पण अह्म्म्म...म्हणजे मुलगा बाबाला टाटा करेपर्यंत काही बोलला नाही मग मात्र जस आमच्या गाडीने airport सोडलं तसं हा एकदम मागे कार सीटमध्ये हैदोसच घालायला लागला...पहिले त्याला बाबा हवा होता, मग विमान आणि मग चक्क air show ....ऐला कशाला मागे त्याला तो air show दाखवला असं झालं मला..बरं म्हणजे हा गोंधळ तसा थोडा अपेक्षित होता पण बाकी आठवडा चांगला जाईल अशी मला अशा होती....

तसा बऱ्यापैकी ठीकठाक आठवडा कागदावर तरी होता; म्हणजे मंगळवारी मुलाच्या पाळणाघरातर्फे एक pumpkin patch भेट होती म्हणून पालकांनी मुलांना drive करायचा होत...ही तशी दुपारनंतर होती. त्यामुळे ऑफिसच काम आटपून जमू शकणार होतं...आणि येईपर्यंत संध्याकाळ म्हणजे मुलाची पण करमणूक...गुरुवारी मला एक डॉक्टरची appointment होती आणि मग शुक्रवारी तर आमचा बाबा घरी येणार म्हणजे त्या दिवशी फक्त सकाळी लेकरू शाळेत गेलं की झाली duty...किती सोप्पा दृष्टीकोण होता माझा आणि आशावादीही.पण मर्फीबाबांची कृपा होती किंवा त्यांचा आशीर्वाद नेहमीच असतो म्हणा पुढचे दिवस बाबांच्या (कामासाठी गेलेल्या आणि या नव्या पाहुण्या मर्फ़ीबाबांच्याही) कृपेने बरेच काही नवे सिक्वेन्सेस माझी परिक्षा पाहणार होते...

सोमवार तसा पहिला दिवस, नव्याची नवलाई म्हणून बरा गेला. जास्त काही नाही म्हणजे पाळणाघरात सोडतानाची रडारड आणि मुख्य म्हणजे संध्याकाळी निघताना पण लॉबीमध्ये चल मासे पाहायचे आहेत असले छोटे मोठे हट्ट इ.इ. करमणुकी होत्या; पण जेवायच्या वेळी बाबा वेबकॅमवर दिसल्यामुळे जेवण कस आटपलं कळलं नाही....मंगळवारी pumpkin patch भेट म्हणून मी खुश, तर नेमकं मागच्या आठवड्यापासून टेस्टिंगसाठी गेलेल्या एका कामातली कुलगंडी बाहेर काढायला त्या tester ला मंगळवारचाच मुहूर्त मिळाला. बरं ते fix करण्यासाठी ज्या सहकाऱ्याच सहकार्य अपेक्षित होत त्याची बायको गेले कित्येक दिवस आज होईल मग होईल करता करता मंगळवारीच बाळंत झाली. त्यामुळे तो पूर्ण दिवस गायब आणि त्याचा सेल पण बंद.....

च्यामारी आता client ला सरळ तर सांगू शकत नाही की तो नाही आहे म्हणून जास्त प्रगती नाही आणि मला मुलाला घेऊन बाहेर जायचं आहे....बाप रे मिटिंगमध्ये इतकी सांभाळासांभाळी करताना तारांबळ उडाली...कसं तरी करून एक दुसरीच चूक शोधली (if you can’t convince, confuse catergory वाली) आणि आणखी कुणाच्या तरी माथी मारून pumpkin patch भेटीसाठी एकदाची बाहेर पडले....काय सुंदर दिवस होता! तशी आता थंडी सुरु झालीय तरी सूर्यदेव प्रसन्न झाल्यामुळे जाकीटपण घालायला नको. मस्त मजा करताना पण मनात कामाचे विचार होतेच....तिथे पण सगळं झाल्यावर मुलाला परत घरीच यायचं नव्हतं, मग पुन्हा त्याला कसंबस चुचकारून (पक्षी: चॉकलेटची लाच देऊन..) आणलं आणि संध्याकाळी(पण) बाबाला वेळ नव्हता (तो म्हणतो की त्याला तिथे एक जास्तीच सेशन होत....) तरी थोडा वेळ वेबवर दाखवला आणि लवकर मुलाला झोपवून पुन्हा ऑफिसचं काम करणार होते पण कारट कसलं झोपतंय...शेवटी नाद सोडून झोपून गेले आणि पुन्हा बुधवारी काम, घर अशी मारामारी करत बसले...

बरेच दिवस मी ज्या प्रोडक्टवर काम करते त्यातल्या एका प्रश्नासाठी मूळ कंपनीला कळवलं होतं, त्यांच्या जर्मनीमधल्या एका इंजिनियरला गुरुवारी सक्काळसक्काळी मला फोन करायला सवड झाली आणि त्याला ते रिमोटली दाखवून माझं मशीन त्याच्या ताब्यात दिलं....तोच तो मुलगी झालेला सहकारी थोडा वेळ काम करण्यासाठी आला. त्यामुळे त्याच्याशी कामाच्या चर्चा करताना आणखी एक दोन वेगळ्या गुंत्यात गुंतले...त्या जर्मनबाबाला मग सरळ कटवलं, कारण माझं मशीन माझ्या माउसवर परत नाचवायचं होत.....मंगळवारची गुंत (श्शी कसला शब्द आहे नं?? छोटे केस असल्यामुळे फारसा प्रयोग होत नाही माझ्याकडे...) तशीच होती.....ते नवे गुंते सोडवताना माझ्या डॉक्टर appointment ची reminder आली....उप्स आता काय??पण अर्थात ते मी जाणारच होते...आणि तिथे मला तसंही पावणे चारला पोहोचायचं होतं म्हणजे client कडचा इस्ट कोस्ट मधला दिवस संपला होता...त्यामुळे हे गुंता प्रकरण मी आल्यावर पाहिलं तरी चाललं असतं...

डॉक्टरकडे मला डोक्यावरून पाणी म्हणजे एक तास लागला आणि प्रवास साधारण विसेक मिनिटे diriving तरी मी आरामात सवापाचच्या आसपास घरी आले असते आणि मुलाचं पाळणाघर सहा वाजेपर्यंत चालू असतं म्हणजे त्याला येता येताही उचलता आलं असतं...तरी सकाळी काय मनात आलं तर मी त्याच्या बाईंना सांगून ठेवलं होतं की संध्याकाळी जर उशीर झाला तर बघ म्हणून...आणि बाबा घरी नसल्याचं तिला तसंही माहित होतंच...पण उशीर व्हायची शक्यता कागदावर तरी कमीच वाटत होती...

डॉक कडे जवळ जवळ वेळेवर पोहोचले आणि चक्क वेळेवर आतही गेले. पण नर्सबाई vitals घेऊन गेल्या तरी मुख्य डॉचा पत्ताच नाही....पाणी मागवून ते संपवलं ...त्या छोट्या खोलीत ठेवलेली स्पॅनिष सोडून सगळी मासिकं चालून झाली तरी ही बया काही उगवेना....बरं आल्यावर मुख्य काम पाचेक मिनटात झालं होतं तरी आमच्या गप्पा सुरूच...गप्पा म्हणजे प्रश्नोतरांचा तास..इतर वेळी मला अशी वैद्यकीय माहिती ऐकायला फार आवडते...(अरे मागच्या पोस्टमध्ये झाल की सांगून ते डागदर व्हायचं) पण आज जरा कसंतरी होत होतं. पण तरी घड्याळात अजून पाच वाजले नव्हते. त्यामुळे आपण त्या वीस मिनटाच्या मोजणीत बसत होतो....शेवटी एकदाची तिथून ५.१० ला सुटका झाली आणि मग मात्र मी धन्नो (आमची कुमारी कॅमरी) ला "चल धन्नो" म्हणून दामटले...

बाहेर पडल्यावर मुख्य रस्त्यावरून पहिले लोकल हायवे क्र. २१७ आणि मग interstate ५ हा माझा रस्ता होता. पण हाय....२१७ वर जायलाच ही गर्दी....मी आधीच्या सिग्नललाच पाहिलं आणि सरळ उजवीकडच्या लेन मधून कट मारून ramp वर जायची दुसरी लेन होती तिथे झेप घेतली. म्हणजे निदान दहा तरी गाड्यांना मी चकवलं आणि तेही कुठलाही नियम न मोडता...या आनंदात पुढे पाहिलं तर खरा ramp सिग्नल तुफान भरलेला होता...एक एक गाडी सिग्नल दोनतीन वेळा हिरवा झाल्यानंतरच पुढे जात होती...माझी घालमेल सुरु झाली आणि सारख घड्याळाकडे लक्ष....कारण ही अमेरिकेतली पाळणाघर मुलांना घरी नेण्यास उशीर झाला तर विशिष्ट वेळानंतर तुमची वाट न पाहता ते प्रकरण पोलिसांकडे देऊ शकतात...(किंवा देतात...) त्यामुळे कसंबसं एकदा २१७ वर आले आणि त्या मुंगीच्या पावलाने सरकणाऱ्या गाड्यांना चकवून एक लेन बदलून सर्वात बाहेरच्या लेनला गाडी आणली...ही रांग त्यातल्या त्यात पुढे तरी सरकत होती...हे करताना समोरची ऑडी जवळ जवळ चिकटणारच होती माझ्या गाडीला पण संभाळलं....या लेन मध्ये यायचा इतरही काही गाड्यांचा प्रयत्न सुरु होता पण अगदी बम्पर तो बम्पर असल्यामुळे सर्वांचीच डाळ शिजत नव्हती...माझी शिजली पण कसा काय माहित एक मोठा ट्रकोबा (उर्फ ट्रकर) माझ्यापासून दोन गाड्या सोडून घुसलाच आणि झालं इतका वेळ निदान आमची पावलं कासवाच्या गतीने पुढे चालली होती त्यांची एकदम गोगलगायच झाली.. ५५ MPH च्या लिमिटला आपण २० वर म्हणजे अपमान घोर अपमान.....या ट्रकोबाला इथे कुणी यायला सांगितलं होत??

आता मात्र पाच पंचवीस व्हायला आले आणि हे ट्राफिक किती वेळ असाच असेल काही काळत नव्हत म्हणून मी शेवटी पटापट फोनाफोनी करायला सुरुवात केली....एकदम लक्षात आल की या सप्टेंबरपासून मुलाचा वर्ग बदलला आहे आणि त्याचा नवा नम्बरच सेलमध्ये नाहीये...श्या...काय निर्लज्ज आई आहे मी.....मग बाबा, आपलं नवऱ्याला फोन लावला. त्याच म्हणणं बहुतेक पोचशील पण तरी शेजारणीला विचारून ठेव...मजा म्हणजे त्याने दिलेला नंबरही दुसऱ्याच वर्गाचा होता(म्हणजे तोही माझ्यासारखाच). पण तिथल्या बाईने मला बरोबर क्रमांकही दिला आणि मग एकदाची त्या बाईना तशी कल्पना दिली...ती काय हो, आभार, बरं झालं फ़ोन केला इ.इ. पोपटपंची वाक्य बोलली...शेजारीण मात्र त्याला तिथे आणायला तयार होती. पण तरी तिला म्हटलं एकदा I5 वर पोहोचले की वेळेचा जास्त अंदाज येईल मग परत फोन करते...

इथे ट्रकोबामुळे आमच्यापेक्षा दुसऱ्या रांगा पुढे पुढे जात होत्या. म्हणून ऑडीची पाठ सोडून मी परत उजवीकडे घुसले....तर इथे एक लेन समाप्त होत होती त्यामुळे उजवीकडच्या मंडळींचं यांना आपले म्हणा सुरु झालं होतं पर्यायाने तो ट्र्कोबाची लेन पुन्हा आपली पुढे आणि मी मागेच....कसंतरी पुन्हा डावं उजव करत हायवे ५ गाठला आणि घड्याळात पाहिलं ५:५० म्हणजे साधारण पोहोचू शकणार होते. कारण इथे सगळ्या लेन झपाझप जात होत्या....मग पुन्हा एकदा शेजारणीला कळवलं...मागच्या फेब्रुवारीत जेव्हा ही नवीन गाडी घेतली तेव्हा मी कशाला उगाच V6 वर पैसे घालवतोयस असं नवऱ्याला सांगत होते. पण आज ५ नंबरच्या हायवेवर अगदी तुफान पळवत शेवटी एकदाची आमची exit गाठली.तरी नशीब मी आधी जुनी कुमारी घेणार होते; पण नवऱ्याने कालच सांगितलं होत की हीच ने, शिवाय कार सीट यातच आहे त्यामुळे...असो...तर एकदाची V6 पॉवर कामाला आली आणि ६ ला एक मिनिट कमी असताना पाळणाघरात पोहोचले....हुश्श...

आल्यावर परत जेवण, मुलाची अंघोळ इतकी दमले की बास...त्यातून बाबा आज हॉटेलवर परत आला नव्हता...काय करतोयस विचारायचं त्राण माझ्यातही नव्हतं..जाऊदे उद्या परत येतोय म्हणून बाप लेकाना फोनवरच बोलू दिलं आणि मुलाला वेबकॅम हवाच होता म्हणून चक्क कॅमेऱ्याच software सुरु करून तो स्वत:ला त्यात पाहत आणि हसत बसाल तितक्या वेळात त्याला खाऊ घातलं, थोडं फार इतर मनोरंजन केलं आणि एकदाचा गुरुवार संपवला....त्यातल्या त्यात एक म्हणजे मी निघताना client कडची power थोड्या वेळासाठी गेली होती त्यामुळे मला काही तिथल्या सिस्टीमना कनेक्ट करून काम करायला हव होत ते कनेक्शन सुरु नव्हतं आणि ती लोक घरी गेल्यामुळे मला दुसऱ्याच दिवशी सगळं सुरु करता आल असता...

असो ...आज शेवटचा (आय मीन single mom duty चा शेवटचा) दिवस....आज सकाळी जरा लवकर काम सुरु केलंय.काल रात्री त्या पॉवर प्रकरणांमुळे काही सिस्टिम्स नव्हत्या..एका मिटिंगच्या आधी थोडे update बनवायचे होते....मुलगाही उशिरा उठला. त्याला सोडून एकदाची कामाची गाडी थोडी फार रुळावर आणली.....आता फक्त संध्याकाळी airport ला जायचं आहे आणि नेमकं पाउस संध्याकाळी सांगताहेत...बघूया, आमचा बाबा आला की मर्फीबाबा मुक्काम हलवतात का?? अर्थातच त्यांचा दुसरा फ़ेरा आमच्यावर येईपर्यंत तरी.....तुर्तास ही पाचा दिवसांची कहाणी साडे-चारव्या दिवशी संपवते....
आज कोजागिरीच्या चांदण्या रात्री तुम्ही ही पोस्ट वाचत असल्यास शुभेच्छा....फ़िर मिलेंगे....

Tuesday, October 12, 2010

जाना था जपान....

’तुला कोण व्हायचंय’ हा प्रश्न सगळी मोठ्ठी माणसं लहान मुलांना का विचारतात हे मला ज्या वयापासुन वाटतं ते आता काही दिवसांनी कदाचित मीच हा प्रश्न माझ्या लेकाला विचारेन या वयात आले तरी पडलेला गहन प्रश्न आहे...वयानुसार तो अधीकच गहन होत चाललाय ही गोष्ट वेगळी...


लहानपणी माझे बाबा मला ’गोरी’ म्हणायचे. आम्हा भावंडांत कदाचित त्यातल्या त्यात उजळ असल्याने असेल किंवा कुठे बाहेर जाताना मला समोर उभं करुन पावडर लावण्याचं काम त्यांचं असायचं म्हणूनही असेल पण हे ’गोरी’ ’गोरी’ ऐकुन सगळ्यात प्रथम मला एअर होस्टेस व्हावं असं वाटायचं..त्यासाठी काय करावं लागतं याची कल्पना त्यावेळी येणं शक्यच नव्हतं पण त्या दिसायला सुंदर असतात आणि त्यावेळी सुंदर दिसण्याची हौस हे त्यापाठचं आणखी एक कारण असावं..मग नंतर कुणीतरी हवाईसुंदरीच्या कामाचं साधारण स्वरुप सांगितल्यानंतर मात्र सुंदर दिसायची ही हौस लगेचच मावळली.घरी शेंडेफ़ळ असल्याने काम करायची वेळ तशी कमी वेळा यायची. त्यामुळे हे विमानात बसलेल्या सगळ्या प्रवाशांची उठबस माझ्यासाठी खूपच काम असणार होतं आणि तशी कामं करायच्या बाबतीत मी आळशीच आहे...

लहानपणी परळच्या मावशीकडे किंवा मामाकडे जायच्या निमित्ताने रेल्वेचा प्रवास बर्‍यापैकी व्हायचा. त्यात अन्साउनमेंट नावाचा प्रकार तेव्हा लोक जरा लक्ष देऊन ऐकायचे. मला वाटतं सगळीकडे इंडिकेटर्स नसायची किंवा असलं तरी दादरचं विशेष करुन मला आठवतं तीन नंबरच्या फ़लाटावरचं इंडिकेटर मागच्या चर्चगेटकडच्या डब्यांसाठी अजिबात सोय़ीचं नव्हतं. सोडा-वॉटरच्या काचांचा चष्मा करून लावला तरी दिसलं नसतं. तर त्या काळात जेव्हा ’प्लॅटफ़ॉर्म नं दो पर आनेवाली गाडी चर्चगेट के लिए तेज गाडी है..ये गाडी दादर से बंबई सेंट्रल तेज जाएगी’ असं ऐकायला यायचं त्यावेळी वेस्टर्न रेल्वेला आपल्या आवाजातली घोषणा व्हायला हवी असं उगाच वाटायचं..आणि मग मावसभावंडांबरोबर खेळताना गच्चीतल्या खोट्या खोट्या प्लॅटफ़ॉर्मवर येणार्‍या गाड्यांची अन्साउन्सर व्हायला मला फ़ार आवडायचं....पण खरे अन्साउन्सर कसे दिसतात हे कुणालाच कधीच दिसत नाहीत त्यामुळे आपल्याला मैत्रीणींमध्ये वट नाही मारता येणार म्हणून हे स्वप्नही लवकरच बारगळलं...शिवाय नंतर माझ्या एका मावसभावाने मला सांगितलं की हे आवाज एकदा रेकॉर्ड करतात आणि सारखे सारखे वाजवतात त्यामुळे न मिळताच माझी ही नोकरी गेली...अजुनही इप्रसारणवर जरी बोलायला मिळायलं तरी चालेल असं मी जेव्हा ऐकते तेव्हा विचार करतेच...(आहे का कुणी इप्रसारणवालं इथं)

मध्ये असाही काळ आला की कोण व्हायचं यापेक्षा कोण व्हायचं नाही हेच जास्त ठरवलं जायचं..उदा. आई-बाबा शिक्षक असतानाही शिक्षक अजीबात व्हायचं नाही किंवा फ़रसाणवाला झालं तर मग स्वतःच्याच दुकानातलं सारखं सारखं खाऊन कसं चालेल म्हणून फ़रसाणवाला नको..किंवा वडेवाला झालं तर सारखं वडे तळत राहावं लागेल मग खाणार कधी असं नको तिथं डोकं चालायला लागलं...घरी दादा-ताईंबरोबर माझं कधी काळी शब्दाला शब्द सुरु झालं की ’तू वकिल हो’ हा बाबांचा सल्लाही मी कधीच मनावर घेतला नाही. विमान चालवायचं माझं स्वप्न मात्र त्याला खूप पैसे लागतात हे पहिल्या फ़टक्यातच(पवनहंसला CPL ची चौकशी केली होती..सात लाख...डोळेच फ़िरले...) कळल्यामुळे मात्र तिथेच विरलं....

त्यानंतर मात्र जसं जसं अक्कल नावाचा प्रकार वाढायला लागला तेव्हा आपल्याला खरंच कुणीतरी व्हायला पाहिजे असं वाटायला लागलं. अर्थात याबद्दल जिच्याशी मी खर्रीखुर्री चर्चा करु शकणार होते ती माझी मावसबहीण शिल्पा नावाचं एकमेव व्यक्तिमत्व होतं..मला का कुणास ठाऊक डॉक्टर व्हावं असं प्रचंड वाटायचं आणि हे तिच्याकडे जेव्हा मी सांगितलं तेव्हा तिला इंजिनियर व्हायचं (का ते तिलाही माहित नव्हतं) फ़क्त हा आमच्यावेळी इंजिनियर आणि डॉक्टर एवढं दोनच होऊन मग मोठ्ठं होता येतं अशा प्रकारच्या काळातल्या आजुबाजुच्या गोष्टींचा परिणाम असावा असंही वाटतं....आता इंजिनियर आणि डॉक्टर ही स्वप्न आमच्या दोघींत वाटुन घेतल्याने थोडं सोपं झालं होतं...

अर्थात वाटणं आणि एखादी गोष्ट ..त्यातल्या त्यात शैक्षणिक, प्रत्यक्षात येणं यात जमीन-अस्मानाचा फ़रक होता. आमच्या दोघींच्याही बाबतीत तर जे व्हायचं ते व्हा पण फ़्री सीट आणि मुंबईतल्या मुंबईत असं कंपल्सरी होतं..म्हणजे कुठलंही प्रायव्हेट कॉलेज, होस्टेल असले लाड आमच्या आर्थिक आवाक्यातले नव्हतेच...दहावीला चांगले मार्क मिळाले तरी बारावीला पीसीबीच्या त्रिकुटाने घात केला आणि माझं घोडं डिप्लोमा मार्गे डिग्रीला जाऊन इंजिनियरिंगच्या गंगेत न्हालं..तर मुंबईत इंजिनियरिंगला नाही पण त्यावेळी कळव्याला निघालेल्या मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकलला ऍडमिशन मिळाल्याने माझी मावसबहीण डॉक्टर झाली आणि त्यानंतर सायनला तिने पदव्युत्तर शिक्षणही घेतलं...आता मागे वळून जेव्हा ’तू इंजिनियर, मी डॉक्टर’ हे सोप्पं समीकरण मांडलेल्या आम्ही आठवतो तेव्हा खरंच वाटतं की आमच्या दोघींच्या बाबतीत ’तुम्ही कोण होणार?’ हे म्हणजे जाना था जापान पहुंच गए चीन असं काहीसं झालं...

Friday, October 8, 2010

The Lucky Dog

" नेमेचि येतो" मध्ये मोडणारे इथले (बोटावर मोजता येण्याइतके) लंबे विकांत. म्हणजे खरं तर महिनोनमहिने आधी फ़िरायचं वेळापत्रक (कामाच्या वेळापत्रकाप्रमाणेच(??)) बनवलं पाहिजे पण इथे महिने काय? आठवड्यावर सुट्टी आली तरी आम्ही आपले झोपलेलोच...काही नाही नेहमीचंच घरची आणि ऑफ़िसची कामं (किंवा या सर्वांत बिजी असण्याचा बहाणा) पण मग बुधवार पर्यंत गाडी आली की "श्या! तीन दिवस काय घरी बसायचं?" म्हणून मग आधी जागा, मग तिथली आमची वाट पाहणारी हॉटेलं धुंडाळा..यातुन सुवर्णमध्य साधुन एखादं ठिकाण एकदाचं नक्की केलं की मग अक्षरशः घोड्यावर बसायचं..
म्हणजे शुक्रवारी चारला ड्राइव्हला सुरुवात करु म्हणत साडे-तीन पर्यंत कसं-बसं ऑफ़िसचं काम आटपलं आणि मग तहानलाडू, भूकलाडू, बाकी सामान बॅगामध्ये कोंबायचं..लिस्ट-बिस्ट कुठली? जे काही डोक्यात असेल ते घेऊन एकदाचं पाच पर्यंत निघालं म्हणजे यकदम टायमावर समजायचं; असाच हाही लॉंग विकेंड आमच्या अशाच आयत्या वेळच्या प्लानिंग(???) प्रमाणे सॅन-युआन बेटांवर जाण्यासाठी शुक्रवारी रात्री निघालो.
आधी ठरवलं होतं की त्या चारपैकी एका बेटावर राहायचं आणि मग तिथे भटकंती, व्हेल वॉचिंग इ. करुया पण....म्हणजे अर्थातच बुधवारी विचारलं तर शुक्रवार-शनिवार रात्रीची हॉटेल जवळजवळ बुक्डचं होती आणि जी होती त्यांचे भाव अक्षरशः गगनाला भिडले होते...म्हणजे त्याच पैशात आम्ही (अर्थातच वेळेत ठरवलं असतं तर) छानपैकी कॅलिला पण जाऊ शकलो असतो..
मग त्यातल्या त्यात बरा पर्याय म्हणजे अल्याड राहायचं आणि सकाळी फ़ेरीने बेटावर जाऊन भटकंती करायची. हेही वाईट नव्हतं म्हणा...तसंही फ़ेरीमध्ये आपली गाडी घेऊन जाता येतं आणि ती साधारण तासभराची आहे....पुर्वी फ़ेरी बुकिंगची सोय होती पण आता ती सरकारतर्फ़े चालवली जाते आणि first come first serve तत्वावर..तेही आमच्या पथ्यावरच होतं म्हणा नाहीतर ते बुकिंग नसतं मिळालं तरी सगळंच मुसळ केरात.
मजल दरमजल करत तो पाचेक तासाचा रस्ता काटून हॉटेल मुक्कामी शुक्रवारी रात्री साडे-दहा, पावणे अकराच्या आसपास पोहोचलो. नशिबाने पोरगं गाडीतच झोपलं होतं. पण दुसर्‍या दिवशी एक्झ्यॅक्टली काय करायचं ते नीट ठरवलं नसल्याने आधी हॉटेललाच नेट लावुन थोडा अभ्यास केला आणि चार पैकी त्यातल्या त्यात प्रगत फ़्रायडे हार्बरला जायचं ठरवलं.ती फ़ेरी होती एकदम सहाच्या दरम्यान नाहीतर नऊ आणि मग तडक साडे-अकराची. म्हणजे नवाची पकडली तर पूर्ण दिवस फ़िरता येईल असा विचार करुन एकदाची पाठ टेकली.
आदल्या दिवशीचा काम आणि प्रवासाचा शीण असल्यामुळे अर्थातच साताच्या गजराला अगदी लगेच उठणं झालं नाही आणि मुख्य एका दोन वर्षांच्या मुलाची आन्हिक उरकेपर्यंत अर्थातच जवळ जवळ आठ चाळीस झालेच.(पोरं असली की ब्लेमिंग सेशनला काही प्रॉब्लेमच येत नाही, नाही?? नवरा-बायकोमधले वाद कमी करण्याचा दुवा जणू) "जाऊदे गं, अजुन डायरेक्शन नाही पाहिले आपण नंतरचीच पकडूया" या नवरोबाच्या म्हणण्याकडे जास्त लक्ष न देता त्याला म्हटलं रिसेप्शनिस्टकडून चार ओळी खरडून घे...ट्राय करुया..नशीबाने तसं फ़ेरीचं अंतर हॉटेलपासून जवळ होतं पण तरी तिथेही रांग असू शकते आणि तेही लॉंग विकेंड असल्यामुळे अम्मळ जास्तही असेल असला काही विचार करायला आम्हाला वेळ नव्हताच...
आने दो भई...

शेवटचं वळण घेऊन तिकिटाच्या खिडकीत आम्ही गेलो तेव्हा मी गाडीतल्या घड्याळात पाहिलं तर नऊला अक्षरशः एक मिनिट बाकी होतं.तिथे चारेक वेगवेगळ्या फ़ेरींसाठी अनेक रांगां होत्या आणि त्यातल्या बर्‍यापैकी गच्च दिसत होत्या. त्यातली एक रांग तिने आम्हाला सांगितली ज्यात आम्ही त्यात तिसरे बिसरे असू आणि त्यांची अनाउन्समेन्ट ऐकायला आली "final call for Friday Harbour" हळूच काचेतून मागे पाहिलं तर आमच्या मागे कुण्णीच नव्हतं आणि त्यांचा माणूस राहिलेल्या गाड्यांना मार्गदर्शन करत आम्हाला थोडा वेळ थांबवुन आत सोडलं.आत शिरल्यावर लक्षात आलं की त्या साधारण शंभरेक गाड्यांची कपॅसिटी असणार्‍या फ़ेरीमधली आमची शेवटची गाडी होती..थोडं मागे घेऊन त्याने आमच्या गाडीला मागे सपोर्ट लावले आणि आमचं घोडं गंगेत आपलं ते बोटीत न्हालं....

समोरच्या रांगेत उभी आमची धन्नो...आणि आमचा नंबर शेवटचा...धप्पाक...
आम्ही आत येत असताना डावीकडे नंतरच्या फ़ेरीसाठी गाडी न घेता जाणार्‍या प्रवाशांसाठीची रांग होती त्यातला एक माणूस आमच्या गाडीकडे पाहताना "The Lucky Dog" म्हणाला होता त्याचा अर्थ मला आम्ही गाडी पार्क करुन उतरताच सुटणार्‍या बोटीच्या भोंग्याचा आवाज ऐकला तेव्हा लगेच कळला....आमच्या पुढची गाडी निदान तासेकभर आधी नंबर लावुन उभी असेल आणि आम्ही मस्त आयत्यावेळी येऊन शेवटची का होईना सीट पकडून एकदाचे त्यांच्याच बरोबरीने बोटीवर येऊ शकलो...मजा म्हणजे बाहेर सोडताना ते ही मधली रांग पहिले सोडतात त्यामुळे बाहेर पडताना पण थोडेफ़ार लकीच....
या ट्रिपमध्ये एकंदरितच बर्‍याच वेळा आम्ही असे लकी ठरलो पण त्याबद्द्ल फ़िर कभी....सध्या गाडीचा आणि बोट सुटल्यावर खेचल्या जाणार्‍या पाण्याच्या फ़ोटोकडे पाहात तो lucky dog क्षण एवढंच पुरे.
हुश्श...एकदाची ट्रीप सुरु झाली ब्वा..

Sunday, October 3, 2010

उन्हाळा सरतोय पण आपल्या खाद्य आठवणी मागे ठेऊन

सप्टेंबर हा महिना हवामानाच्या बाबतीत तसा बोनस असतो. म्हणजे, पहिल्या विकांताला एकदा का इथला लेबर डे संपला की उन्हाळा तसा संपलेला असतो, पण लगेच काही थंडी आलेली नसते. पण ऑक्टोबरची तशी काही खात्री देता येत नाही..त्यामुळे थंडीची तयारी करायला सुरुवात होते...म्हणजे तेच ते आपलं कपडे वगैरे झालंच तर हा...उन्हाळ्यात बाहेर काढलेली ग्रील असेल तर तिला कोरडं करुन अंगडं टाकुन ठेवुन द्या. अरे हो ग्रीलवरुन आठवलं, आमच्या फ़िलीच्या घराला मागच्या बाजुच्या ओट्यावर आधीपासुन बसवलेलं ग्रील होतं..त्याला गॅसचं कनेक्शनही होतं, त्यामुळे उन्हाळाभर आम्ही काही न काही भाजुन खात असायचो..मला आवडतं पण शिवाय एक दिवस नेहमीच्या भाजी-पोळी जेवणापासुन सुट्टी असाही स्वार्थ त्यात साधला जातो.पण आता ओरेगावात हे चोचले कसे पुरवायचे किंवा एखादं छोटं ग्रील घेऊया का असा विचार सुरु होताच. ही समस्या आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पुलवरचं मोठं एकदम शेफ़ ग्रील पाहिलं आणि सुटली...


आता थोडं गार वातावरण सुरु होतंय तर त्यांनीही ते ग्रील बंद करुन ठेवलंय...आणि मला आठवतेय असंच माझ्या शेजारणीबरोबर केलेला ग्रील बेत...तिला एकदा तंदुरीची चव मला चाखवायची होती तर तिला मला सोकाय सामन आणि तोही एका विशिष्ट प्रकारच्या लाकडावर कसा भाजतात ते दाखवायचं होतं..बाकीच्या भाज्या अशाच जे काही त्यादिवशी आणलं होतं ते ग्रीलवर पडत गेलं...म्हणजे अक्षरशः ग्रीलभर झालं असं म्हटलं तर जास्त बरोबर ठरेल...आणि एकेक करुन पोटात कसं गेलं ते कळलंही नाही


खरं तर जास्त काही लिहीण्यापेक्षा मला वाटतं फ़ोटोच काय ते सांगतील. शिवाय मागे फ़ार्मविलेची पोस्ट वाचुन जर या भाज्यांचं तुम्ही काय करता असा कुणाला प्रश्न पडला असेल तर ती शंकाही मिटेल कसं???

मग यंज्वाय...जाता जाता....आपल्याकडे ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात हा मेन्यु कसा लागेल हे कुणी ट्राय करुन पाहणार असेल तर नक्की कळवा.
आमचा साधा मेन्यु...मका,बटाटा,झुकिनी,तंदुरी तंगडी आणि सोकाय (sockeye) सामन

चीज भरलेली मिरची माझी खासियत

बल्लवाने फ़क्त मध्ये मध्ये पलटी मारली की झालं
इतकं सारं ग्रील होतंय मग तोंडी लावायला एक छोटा पिझा नको का?
झालं! ताटात एकदा का थोडं थोडं आलं की कॅमेर्‍याची आठवण कुणाला?