Wednesday, July 29, 2009

मज्जा नी लाइफ़

आज आई आली. बराच मस्का लावुन पण खरं तर नातवाला पाहायला म्हणून का होईना पण हो म्हणाली. गेले काही दिवस आम्ही दोघं बोलतं होतो की आरुष तिला ओळखेल का? तसं जन्मल्यापासुन त्याने त्याच्या आसपास आम्ही दोघं सोडुन तिलाच पाहिलयं आणि नंतर मी थोडे दिवस भारतात तिच्याबरोबर राहुन त्यानंतर मात्र घरी फ़क्त आम्ही आई-बाबा या दोनच व्यक्ती. त्यामुळे आता जवळ जवळ आठ-नऊ महिन्यांच्या पोकळीनंतर तो तिला ओळखेल का हा थोडा आमच्यासाठी उत्कंठेचा भागही होता.
विमानतळावर तसं काही कळत नव्हतं पण इतरवेळी नवीन माणसांना रडतो तसा रडला नाही म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं असं वाटलं. पण नंतर आम्ही ब्रेकसाठी थांबलो तिथं काउंटरला मी गेल्यावर तो तिच्याकडे एकटा थांबला तेव्हा नंतर गाडीत मी नवर्याला म्हटलं बहुतेक ओळखलंय. तोही म्हणाला तसचं वाटतय.
मजा म्हणजे घरी आल्यावर तो त्याच्या एक एक गोष्टी तिला दाखवायला लागला तेव्हा जास्त जाणवलं. त्याच्यासाठी मी अग्गोबाईची गाणी लावली की तो गिरकी घेतो तशी गिरकी घेऊन त्या प्लेअरकडे बोटं दाखवतोय म्हणजे तिला ते माहित नाही पण आता मी तुला सांगतोय ना तसं काहीसं. मग मी गाणी लावल्यावर गिरकी घेऊन वगैरे प्रात्यक्षिक. दिवस कसा मस्त गेला. आजच्या दिवसात मी कितीदा तरी त्याने ओळखलंय ह्याचे वेगळे दाखले स्वतःलाच दाखवतेय.
आई आली की घर कसं भरुन जातं. अमेरिकेत राहण्याचे कौटुंबिकदृष्ट्या बरेच तोटे असले तरी सगळयात मोठा फ़ायदा म्हणजे मुलींनाही आई-वडिलांना घरी काही महिने राहायला बोलावता येतं आणि तेही येतात. तशी ती दोघं माझ्या मुंबईतल्याच बहिणीकडे राहायला वगैरे जात नाहीत. गेली तर एखादी रात्र. इथे फ़क्त मुलीसाठी खास ते येतात. ते तेवढे महिने फ़ुलपाखरासारखे असतात. नेहमीचं जेवण गप्पांमुळे जास्त रंगतं. नेटवर मराठी सिनेमा पाहताना नेहमीपेक्षा जास्त बरं वाटतं. आपलं कौतुक,काळजी सगळं नेहमीपेक्षा जास्त. आणि नातवंडं असतील तर काय दुधात साखर. त्यांचे लाड, त्या मऊसुत पोळ्या, घरचं तुप, संकष्टीला मोदक आणि इतरवेळी न केलेल्या जिनसा. या सर्वात पुन्हा सगळीकडे भरुन राहिलेलं प्रेम.
आज्जीच्या कुशीत झोपलेल्या माझ्या पिलाला पाहुन मला येते काही महिने तरी मुन्नाभाई मधल्या त्या चाचासारखं एवढंच म्हणावसं वाटेल "अवे तो मज्जानी लाइफ़".

Tuesday, July 28, 2009

’ नाना’ आठवणी

१ जुलैला अनेक कलावंतांचं स्वागत करण्याची संधी मिळाली. पण जास्त लक्षात राहिला तो नाना. खाजगीत त्याचा उल्लेख एकेरीत करतो म्हणून इथेही ते स्वातंत्र्य घेतेय. पण प्रत्यक्षात मात्र तुम्हीच म्हटलयं.
मंदार जेव्हा नानाला घेऊन आमच्या स्वागतकक्षापाशी आला तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त लक्षं गेलं ते त्याच्या दोन्ही कानातल्या वाळ्यांकडे. एकतर नाना जे काही सिनेमामध्ये पाहुन मत केलंय त्या न्यायाने तर त्याची थोडी भितीच वाटायची. म्हणून विचारायचं म्हणून विचारलं कसा झाला प्रवास? या प्रश्नाचं दिर्घ उत्तर अपेक्षित नसतानाही तो म्हणाला. झाला आपला. पायलट चालवत होता. पण मला रात्रीच्या वेळी प्रवासात झोप येत नाही. इतरवेळी मी ड्रायव्हर जागा आहे की नाही याचा विचार करता मला झोप लागत नाही. पण इथे आत कॉकपिटमध्ये जायची सोय नाही ना? मनात म्हटलं हा वाटतो तसा भावखाऊ नाहीये. मग फ़ोटोसाठी विचारल्यावर मात्र नाही बिही काही म्हटलं नाही आणि आमच्या ग्रुपबरोबर फ़ोटोही काढुन घेतले. एक दोघांना मराठीत स्वाक्षरी देऊन मग मात्र रुमवर रवाना.
आम्ही आमची तिथली कामं संपवत होतो आणि थोड्या वेळाने स्वारी पुन्हा मंदार बरोबरच बाहेर जाताना दिसली. मी हॉटेलच्या चेकाआऊटच्या इथे काही चौकशी करत होते आणि अजुन एक मराठी जोडपं होतं त्यांच्याशी हाय हॅलो करतानाच त्यांची नऊ-दहा वर्षांची मुलगी धावत धावत आली आणि एकदम गहिवरुन म्हणाली 'mama, that was Nana..He hugged me...oh that was the first bollywood personality I met" आणि चक्क रडायला लागली. मला वाटतं लॉबीत नाना दिसला होता आणि तिला जवळ घेतल्यामुळे बाळ गहिवरली होती. मी असं फ़क्त आतापर्यंत ऐकलं होतं की लोकं रडतात, इथे ही अमेरिकेत जन्मलेली, नीट मराठीही न येणारी मुलगी चक्क आता हा टी-शर्ट धुवायचा नाही म्हणून आई-बाबांना सांगत होती. आपल्या संस्कृतीचा किती पगडा असतो माहित नाही पण बॉलीवुडचा मात्र जबरदस्त पगडा इथल्या नव्या पिढीवर आहे हे नक्की. असो.
मलाही काही काम होतं बाहेर म्हणून रस्त्यावर गेले तर पुन्हा नाना सिग्नलपाशी भेटला आणि ओळखीचं हसला. मी म्हटलं कशी वाटली सिटी? तो म्हणाला मस्त आहे. मी आता फ़क्त सब खाऊन आलो. मला काहीही चालतं पण आता मात्र रुमवर जाऊन झोपलं पाहिजे. हम्म माणसं काय किती मोठी, प्रसिद्ध झाली तरी शेवटी ती माणसंच. पण हा आपला सगळा रुबाब मुंबईत ठेऊन आला आहे असं मला उगाच वाटलं.
मग कार्यक्रमाच्या गडबडीत मी विसरुनही गेले हे सर्व आणि ४ तारखेच्या शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे आणि पणशीकर यांच्या कार्यक्रमासाठी आम्ही जरा उशीरा पोहोचलो तेव्हा मी आणि सुजाता जरा बरी जागा शोधत होतो. काळोखात एका खुर्चिला एक बॅग ठेवली होती आणि बाकीची रांग रिकामी होती. सुजाताने रिकाम्या जागी बोट करुन मागच्या रांगेतल्यांना विचारलं ’इथे कुणी बसतंय?" घाईत आमचं लक्ष नव्हतं की मागे कोण आहे. मागुन तोच तो जरा खर्जातला आवाज आला. "इथे कुणी दिसतंय का आहे?? काय तुम्ही पण." आणि कार्यक्रमात व्यत्यय न येईल इतपत हसणं. सुजाता म्हणाली अगं हा नाना आहे इथे. म्हटलं आता बसं आपण तसही लवकर उठणार आहोत. पण हा आता आमची पाठ सोडणार नव्हता बहुतेक. मग कुणीतरी त्याला कॉफ़ी आणून दिली. मला पाठुन विचारलं कॉफ़ी घेणार? मी म्हटलं खरचं नको. मग म्हणतो मी कुठे म्हणतोय खरंच घ्या म्हणून...ही..ही....आम्ही पण जरा निवांत झालो. थोड्यावेळाने पुन्हा..आता खरंच विचारतो. म्हटलं नको. मसाला चहा असता तर हो म्हटलं असतं. मग कार्यक्रमाबद्दल गप्पा सुरु झाल्या. नानाला शास्त्रीय संगीतातलं बरचं कळत हेही कळलं. मुख्य म्हणजे तो ते आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबर शेअर करत होता. त्यांच्या बाजुला खुद्द प्रसाद सावकार बसले होते. ते त्यांना बाबा म्हणतात असं दिसत होतं. जेव्हा पणशीकरांचं गाणं सुरु झालं तेव्हा विनोदाने म्हणतो या गाण्याला नावं ठेवु नका कारण यांची बहिण इथेच बसली आहे. अर्थात इतक्या ग्रेट लोकांना आम्ही कसले नावं ठेवतो म्हणा. मग राहुल आणि शौनक यांच्या बद्दल त्याचं सुरु झालं मी आपलं दोघांना चांगलंच म्हणते मुळात इतके तयारीचे आहेत ते की माझ्यासारखं कुणीतरी त्यांना नाव ठेऊ पाहाणार नाही. म्हणून मी त्या प्रकारे उत्तर देत होते तर मग शेवटी तो स्वतःच म्हणाला काय आहे मला नं राहुल जास्तच आवडतो ना? असो अशा गप्पांनी हा कार्यक्रम आणि पर्यायाने नाना माझ्या चांगलाच लक्षात राहिला. थोड्या वेळाने त्याची दुसरीकडे मुलाखत होती त्यामुळे उसके जाने का वक्त आ गया था. आम्हीपण त्यानंतर दोन गाणी ऐकुन निघालो.


त्यानंतर खाली मी नवर्याला सांगत होते तर त्याने मला त्याच्याकडच्या कॅमेर्यात माझ्या मुलाला नाना हाय करतानाचे फ़ोटो काढुन ठेवले होते. योगायोग, नाही? नवरा म्हणतो मी त्याला म्हणालो तुम्ही नाना पाटेकर असाल पण हा काही तुम्हाला घाबरणार नाही. तोही म्हणाला बरोबर आहे. असो.

त्यानंतर अर्थातच आम्ही त्या मुलाखतीला गेलो. इतका वेळ मला आणि सुजाताला प्रश्न पडंला होता की काय कारण असेल त्याने तो कार्यक्रम आपल्यासारख्यांबरोबर पाहिला.

बर्याच प्रश्नांची उत्तरं मला त्या मुलाखतीत मिळाली. ती मुलाखत इथे आहे. मला मात्र नानाच्या आठवणी कायम राहतील.

Tuesday, July 21, 2009

एक असाच ओला दिवस...

असा पावसाळी दिवस आला की आपल्या मान्सुनी दिवसांची हमखास आठवण होते. आठवतात ते आयत्यावेळी मित्रमंडळाला गोळा करुन संजय गांधी नॅशनल पार्कात केलेले छोटे ट्रेल्स. गाड्या बान्द्र्याच्या पुढे जायच्या बंद पडल्या की एकमेकांना फ़ोन करुन घरी जायच्या ऐवजी आमचा अड्डा तास-दोन तासासाठी का होईना पण बोरीवलीच्या उद्यानात. आमच्यातला एक अति सुदैवी प्राणी या गेटच्या बाजुलाच राहायचा. तो बरेचदा चक्क पायात स्लिपर घालून येई. घरी अर्थातच नाक्यावर जाऊन येतो सांगितलं असणार हे नक्की.



गाडीवाला कुणी असला तर कान्हेरी पर्यंत जाऊन मग हिरवं रान आणि थोडीशीच दिसणारी वाट हे हमखास आवडीच दृष्य. यासाठी इतर सर्व प्लान कुरबान.. कान्हेरीच्या पायरीवर चिंचा, पेरू, काकडी असं काहीबाही घेऊन न धुतल्या हाताने खाणं आणि एकमेकांना देणं. जास्त वर चढून नाही गेलं तरी हिरवा पिसारा लगेच नजरेच्या टप्प्यात येई आणि मग आपण एकटे असलो तरी चालेल. सगळीजणं बसून खूप गप्पा मारल्यात असही नाही. नुसतंच निसर्गाला ऐकायचं आणि हिरवा रंग डोळ्यात साठवून ठेवायचा. पावसाची जोरदार सर आली तरी तिला न जुमानता तसचं बसून राहायचं. घरी गेल्यावर बॅगमधलं काय काय ओलं झालंय ते पाहू...

गाडी नसली तर मग चालवेल तिथपर्यंत चालायचं आणि कुठे काही हालचाल दिसली तर हिरव्या गर्द राईत घुसायचं. कितीदा अशा नसलेल्या रस्त्यांमध्ये आम्ही हरवलोही आहोत. एखाद्या पक्ष्याच्या मागे जाता जाता मग परत मुख्य रस्त्याला लागेपर्यंत ज्याच्या कडे जे काही खायला असेल त्याचा चट्टामट्टा करुन आणि पाण्याचं रेशनिंग केलेले ते दिवस विसरणं खरचं अशक्य आहे. मुंबईतल्या मुंबईत हा जंगल सहवास मिळणारे आम्हीच भाग्यवान म्हणायचे. खरतर मान्सून मध्ये पक्षीगण जास्त दिसतही नसे पण किटकांची चलती होती. तेवढ्यापुरता जी शास्त्रीय नावे कुणी सांगत ती लक्षातही राहात. पुन्हा काही दिवसांनी मात्र आम्हा द्विजगण प्रिय.... पावसाळ्याचे दिवसच काही और हे मात्र नक्की.

परतीच्या वाटेवर खुपदा रिपरिपच असे. मग चालत असू तर तसेच फ़्लोट्सचे चालताना येणारे वेगवेगळे आवाज ऐकत आज काय काय पाहिलं याची छोटी (कारण जास्त पक्षी दिसलेच नसत) उजळणी. आता उरला  मान्सून  या वर्षी कुठे कुठे जायचं या़चे बेत बनवण्यात उद्यानाचा मुख्य दरवाजा कधी येई ते कळतही नसे. पायाखालची वाट मात्र नेहमीची. सिलोंड्याच्या रस्त्याने आलं तर उजवीकडे हरणं दिसतायत का याचा वेध नाहीतर आत जायला मिळालं असतं तर किती बरं याचा विचार प्रत्येक वेळी तोच पण तरी नवा. गेटपाशी आल्यावर मात्र अगदीच सैरभैर झाल्यासारखं...आता पुन्हा ते वाहनांचे आवाज, गर्दी आणि लोकलचा प्रवास. सगळंच जंगलातून जायला मिळालं तर किती बरं असं प्रत्येकवेळी वाटायचं. पण पुन्हा इथेच यायचय हे मात्र नक्की.
आज इथे असंच सारखं भरुन आलय. या हवेच्या नशेने का काय माहित नाही पण माझा मुलगा मस्त झोपलाय. त्याची झोप मोडुच नये असं लिहितानाच त्याचा आवाज यावा यापरिस योगायोग तो काय?? चला मुंबईतल्या नॅशनल पार्कमधून परतायला हवं नाही??

Monday, July 20, 2009

सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग - ४)

कालच्या आशाच्या कार्यक्रमाच्या आठवणी संपता न संपतात तोच हा नवा आणि सम्मेलनाचा शेवटचा दिवस उजाडल्यासारखं वाटतय. आज कुठलीही साडी थीम नाही त्यामुळे ’झाले मोकळे आकाश’ सारखं गेले तीन दिवस साडी एके साडीतुन सुटल्यासारखं सलवार कमीजमध्ये कसलं सुटसुटीत वाटत होतं. म्हणजे मला साडी खूप आवडते पण त्यात वावरायची फ़ार सवय नसल्यामुळे तीन दिवस सतत म्हणजे थोडा ओव्हरडोस होतो. असो. आज हॉटेलमधुन चेक आऊटपण करायचं होतं त्यामुळे कसं-बसं ब्रेकफ़ास्ट संपायच्या आधी म्हणजे अगदीच साडे आठला एक दोन मिनिटे कमी असताना वगैरे पोहोचलो. पण कांदे पोहे आमच्यासाठी होते आणि कचोरी सुद्धा. कांदे पोह्यामध्ये शेंगदाणे का घातले नाहीत अशी तक्रार माझा नवरा करत होता. पण चव छान होती.

आज कुठले कार्यक्रम पाहायचे ते काही नीट ठरत नव्हतं. पण आतापर्यंत गाणी आणि संगीताचेच जास्त कार्यक्रम पाहिले तर आज थोडंतरी वेगळं पाहुया असं करता करता सकाळी वरच्या बॉलरुमला विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांचं काही आहेस पाहिलं आणि सर्वजण वरती गेलो. आधी आम्हाला वाटलं होतं की थोडं आधुनिक भाषण वगैरे असेल.पण हे आपलं टिपिकल किर्तन असतं ना तसं होतं. म्हणजे ’जय जय रामकृष्ण हरी’ वालं. त्यांचे दोन अभंग ऐकुन मग उठलो. मला वाटतं यांचं तसं भाषण आदल्या दिवशी झालं असणार कारण ते मुख्य वक्त्यांपैकी एक होते.
मग खाली आलो. तर अर्चना जोगळेकर दिग्दर्शित ’विश्वनायिका’ चालु होतं. सहज म्हणून मी आणि सुजाता तिथे बसलो आणि मग त्यातले मधले विजय कदम आणि त्यांच्या सहकार्यांचे विनोद आवडून आमच्या नवर्यांना बोलावुन घेतले. हा कार्यक्रम छान होता. फ़क्त त्यातली गाणी आमच्यासाठीतरी एकदम नवी आणि पटकन आवडून जातील अशीही नव्हती म्हणून ते सर्व नाच पाहायला कंटाळा येत होता. पण यात बायकांच्या ज्या विविध जाती किंवा प्रकार सांगितेल आहेत ते एकदम अफ़लातून आहेत. मजा आली. आणि विजय कदमांनी त्यातले काही अमेरिकन रेफ़रन्सेस दिल्यामुळे तर सभागृह खूश होऊन जास्त टाळ्या आणि हशा चालु होत्या.
माझ्यासाठी अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे सुरुवातीला थोडसं खाता खाता स्ट्रोलरमध्ये आरुष मस्त झोपुन गेला होता आणि त्यामुळे त्याला पाहाव लागत नव्हतं.
खरतर मला शेवट काय होतो हे पाहायची इच्छा होती पण आमच्या मेजॉरिटीत जेवणाच्या रांगेसाठी मत असल्यामुळे मीही उठले. आज बम्बैया बेत असणार होता. तो म्हणजे पावभाजी आणि गुजराथ्यांशिवाय ती जास्त छान कोण करणार?? बरोबर दही-भात आणि रव्याचा लाडुही होता. म्हणून आम्ही वेळ अजिबात चुकवली नाही. आज आम्ही दोन्ही कुटुंबांनी एकत्र जेवायचंही ठरवलं होतं. आरुष झोपला असल्यामुळे बर होतं. पाव भाजी आणि गप्पा-टप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. जेवण खरंच टेस्टी होतं. मग एकएक करुन सर्वांचे पाव संपले. मिलिंद सर्वांसाठी पाव आणायला उठला. त्याला मदत करायला सुजाताही उठली. आमच्या बरोबर अजुन एक ओळखीचं जोडपं आता जॉईन झालं होतं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो. तितक्यात सुजाता मिलिंद पाव घेऊन आले आणि ती तिचा मुलगा अश्विन कुठे आहे म्हणून विचारायला लागली. अरे बापरे! म्हणजे हा त्यांच्याबरोबर गेला नव्हता?? ती म्हणाली मी त्याला इथेच थांब सांगुन गेले...शु.... हे काय नवीन आता?? एवढया मोठ्या जेवण्याच्या हॉलमध्ये याला कसं शोधायचं?? पुन्हा हा हॉल मागच्या बाजुने एक्स्पोला जोडलेला होता. तिथे जर गेला असेल तर अजुन गुंतागुंत. आता हे दोघे पुरुष त्याला शोधायला बाहेर गेले कारण बाहेर जाउन एकदम बाहेर रस्त्यावर जाउन हरवायचा धोका जास्त होता. आरुष अजुन झोपलेला होता म्हणून त्या नवा जोडप्याला स्ट्रोलरकडे लक्ष द्यायला सांगुन मी आणि सुजाता याच हॉलमध्ये त्याला शोधायला लागलो. तितक्यात मिलिंदच्या नावासाठी अनाउन्समेन्ट ऐकु आली. आवाज एवढा घुमत होता की नीट काही कळत पण नव्हतं. मग एकाकडे चौकशी केली तेव्हा त्याने जिथे अनाउन्समेन्ट करतात तिथे मागच्या बाजुला जायला सांगितले. अर्ध अंतर चालतोय तोच एक स्वयंसेवक अश्विनला घेऊन समोरुन येताना दिसला. सर्वांची नजर चुकवुन कार्ट मागच्या बाजुला गेलं आणि मग रडत कुणाला तरी तिथे सापडलं. तरी त्याच्या गळ्यात बॅच होता आणि त्यावर मिलिंदने स्वतःचा सेलफ़ोनही लिहुन ठेवला होता. असो. आता उरलेलं जेवताना ’अश्विन हरवतो तेव्हा’ हा विषय आम्हाला भरपुर पुरला. आरुषही आता उठला आणि थोडा दही-भात खाऊन तरतरीत झाला.
जेवल्यावर पुन्हा एकदा एक्स्पोला वळलो कारण मुख्य म्हणजे आता फ़ार काही कार्यक्रम नव्हते. माझ्या कॅमेर्यावी बॅटरीही संपली होती आणि फ़क्त शेवटचा "मनात नाचते मराठी" हा मराठी बाणा सारखा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षी मराठी मंडळातही पाहिला होता आणि आता हळुहळु जायचे वेधही लागले होते. मी पुन्हा एकदा भातुकलीचा संसार पाहुन आले. सुजाताचं राहिलं होतं. तिलाही फ़ार आवडला. खरेदी आता काही करायची नव्हती पण तरी आयडीयलचा स्टॉल दिसला मग काही मराठी पुस्तके आपसुक आली. आणि थोडंसं झोपाळल्या डोळ्याने मुख्य सभागृहात आलो.
आधी सर्व स्वयंसेवकांनाही मुख्य स्टेजवर एकदा (गर्दी करून) बोलावुन त्यांचे आभार प्रदर्शन झाले. मला उगाच मागे गेले असं झालं. टिमप्रमाणे बोलावुन फ़क्त डावीकडुन उजवीकडे जायला लावलं असतं तरी बरं दिसलं असतं कारण संख्याही बरीच होती. आणि मग शेवटचा "मनात नाचते मराठी" सुरु झाला. खूप मेहनतीने आणि भरपुर कलाकार घेऊन बसवलेला कार्यक्रम आहे. फ़क्त आम्ही आधी पाहुन झालाय म्हणुन चारेक वाजेपर्यंत उठलो. घर जास्त लांब नाही त्यामुळे तासाभरात पोहोचलो आणि एकदम जाणवलं की गेले दिडेक वर्ष जे चालु आहे, टिम मिटिंग, ऑल व्हॉलंटियर मिटिंग, कामानिमित्ताने केलेल्या इतर काही गोष्टी, ग्रुप इ-मेल्स आणि फ़ायनली खरंखुर सम्मेलन आज संपलय. आमच्यासाठी बरच काही शिकवुन गेलय. जाता जाता आमच्या गप्पा चालल्या होत्या त्यातलं सांगायचं तर दर दोन वर्षांनी तुमच्यासाठी कार्यक्रम, अस्सल मराठी खाणं, वाजवी दरात हॉटेल्स इ.इ. यांची सोय करायचे कष्ट कुणी दुसरं करत असेल तर अशी व्हेकेशन कुणाला नको??

Saturday, July 18, 2009

सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग ३)

४ जुलैच्या कार्यक्रमातलं मुख्य आकर्षण म्हणजे "मी आशा" हा कार्यक्रम. शिवाय मी आमच्या माहितीकेंद्रावर दहा ते बारा असं बसायचंही ठरलं होतं. पण आज हॉटेलवरुन यायचं असल्यामुळे तशी जास्त घाई नव्हती. खरं तर लग्नाचा शालु असा ड्रेस कोड होता पण आता माझ्या पिढीत फ़ार कुणी लग्नाचा शालु बिलु घेत असेल असं मला वाटत नाही मग मी ती हौस आपलं खास मराठी म्हणजे नाराय़ण पेठेने भागवुन घेतली.
आज ब्रेकफ़ास्ट अजिबात सोडायचा नाही असा कालपास्नंचा ’पण’ होता त्यामुळे आम्ही अगदी वेळेत म्हणजे साधारण सव्वा आठच्या दरम्यान पोहोचलो. रांग होतीच. गरम गरम उपमा आणि मोतीचुराचा लाडु असा बेत होता. बाजुला बारीक शेव आणि इतर प्रकार म्हणजे अंडं,पाव,लोणी,सिरियल, दुध इ.इ. होतेच. यार हे तीन दिवस संपल्यावर अज्जिबात वजन करायचं नाही. असं मनातल्या मनात सांगत गोडाचाही माझा वाटा मी घेतला.
आज सकाळी मला एकटीने थोडा वेळतरी मुलाला घेऊन राहावं लागणार होतं कारण यालाही हॉटेल शटलचं थोडं देखरेखीचं काम होतं. नाहीतरी नऊ वाजले होते आणि दहानंतर माझं स्वतःचं काम. एक तास काय करावं बरं असा विचार करत होते पण ओळखीच्या लोकांशी हाय हॅलो, "अगं! किती मोठा झाला हा?", "चालतो पण?", "ए, साडीत तुला नेहमी नाही पाहिलं गं.", "संध्याकाळी आशाच्या कार्यक्रमाला आहेस ना?" या आणि अनेक छोट्या छोट्या संभाषणात कसा वेळ गेला कळलं नाही.
मला खरं तर आरुषला ’अग्गोबाई, ढग्गोबाई’ दाखवायाचा होता कारण ती गाणी घरी नेहमी वाजत असतात पण तेवढा वेळ मिळेलसं वाटलं नाही. मग एक्स्पोकडे उगाच चक्कर टाकली. कारण कुठले कार्यक्रम जरी थोडे वेळेला हलले तरी एक्स्पो काय तिथेच ठाण मांडुन बसलेला असतो ना?

सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंचं गड किल्ल्यांच्या छायाचित्रांच प्रदर्शन होतं. छान होते फ़ोटो आणि सर्वांचं हवाईदर्शन घेऊन काढलेले मग काय..बघताना आमची मात्र गोची झाली होती. कारण तिथे सगळीकडे पडदेच पडदे होते आणि चिरंजीवांनी त्यातुन आरपार जाण्याचा खेळ चालु केला होता. मग एकदा मी आणि एकदा नवर्याने असं मिळुन प्रदर्शन पाहिलं. बाकीचे स्टॉल्स नंतर पाहुया असं म्हणुन आम्ही तिथुन बाहेर आलो. कामंही होती ना?
बाळाला स्ट्रोलरमध्ये ठेवुन उर्फ़ डांबुन ही माहितीकेंद्रांची कामं करणं म्हणजे काय आहे ते मला विचारा. एकतर आजुबाजुला इतर लोकं, मुलं फ़िरताहेत आणि आपल्याला चालता येत असुन आपण बांधलेले म्हणजे काय?? पण कुठूनतरी सुजाता आणि तिचा मुलगा अश्विन उगवले आणि आम्हाला पुन्हा एकदा आमचा एंटरटेनर मिळाला. सम्मेलनाचा तसा दुसरा दिवस असल्याने लोकं बरीच सरावली होती पण काही एक दिवसासाठी येणारे लोकं बरेच प्रश्न घेऊन येत होते आणि शिवाय कार्यक्रमांच्या वेळेत थोडा बदल झाल्याने त्यासाठीच्या शंका-समाधानासाठीही लोकांना या माहितीकेंद्राचाच आधार होता. थोडक्यात काय दुकान सतत चालु होतं. माझ्याबरोबर मदतीला देवकी होती आणि ती खूपच धावपळ करत होती. कार्यक्रमाच्या नव्या श्येडुयलच्या प्रती काढण्यासाठी स्वतः गेली. मलाही सर्व माहिती दिली. शिवाय माझ्या बाजुलाच एक दिवसाचा पास विकण्याचा काउंटर होता त्या व्यक्तीचं मी नाव विसरले ते पण खूप कौतुक करत होते. पण मजा येत होती. एक दोन कार्यक्रम चुकले पण मला वाटतं कुणीतरी केलं नाही तर सर्वांना मजा कशी येणार? शेवटी परक्या देशात आपलं काही करायचं म्हणजे बरचसं श्रमदानावरच होतं. माझा तर अगदी खारीचा वाटा. बरेच असे लोक मला माहित आहेत ज्यांनी इथे फ़क्त कामच केलं अगदी घरचं लग्न-कार्य असल्यावर कसं आपलेपणाने करतो तसं. असो. मला या बुथवरही खूप मजा आली. मध्ये कुणी नव्हतं तेव्हा मुलाला एकीकडे थोडं भरवुनही झालं.
जेवायच्या आधी विशेष काही पाहाणं झालं नाही. एका ठिकाणी एकांकिका स्पर्धा पाहायला बसले पण बराच वेळ त्यांचं आवाजाचं तंत्र जुळत नव्हतं म्हणून उठले. "स्वरबंध" म्हणुन इथल्या कलावंतांचा विशेष म्हणजे इथे वाढलेली मुलंही सहभागी असणारा कार्यक्रम पाहायचा होता. पण तो चक्क हाऊसफ़ुल्ल होता. आणि मला वाटतं कदाचित असं पहिल्यांदाच झालं असेल की संपुर्ण कार्यक्रमाला वस्न मोअर मिळाला होता. म्हणजे पुन्हा चारला हाच कार्यक्रम असणार होता. आता जेवणाची रांग लावणे हाच उत्तम मार्ग होता. आणि कधी न ट्राय केलेलं नागपुरी जेवण असणार होतं.
जेवणाचा बेत छान होता. कोंबडीची चव जरा वेगळी. ही वडा-भात भानगड मात्र कळली नाही. आमच्या रांगमैत्रीण म्हणाली की तिथे हा वडा आणि भात तेल घालुन खातात. खात असावेत. पण मला त्या भातावर वरण, कढी काहीतरी घेतल्याशिवाय गिळता येईल असे वाटत नव्हते. आणि वडा आपल्या मेदुवड्यासारखा आणि थोडा कोंबडी-वडे स्टाइलवाला पण तुकडे तुकडे करुन भातात घातलेला. जेवायला मजा आली कारण इथे घरी कुठे आपण रोज साग्रसंगीत जेवणावळीसारखं बनवतो. आज आम्ही सुजाताच्या कुटुंबाबरोबर एकत्र जेवलो त्यामुळे जेवणाबरोबरच गप्पाही रंगल्या. मग जेवणानंतर कुठले कार्यक्रम पाहायचे याचीही चर्चा झाली. त्यामुळे काही कार्यक्रम मी आणि सुजाता एकत्र पाहु शकु असे होते. रांगेत थकुन आमच्या बाळानेही एक डुलकी काढुन झाली होती. आता त्याचंही जेवण आटोपुन त्याच्या बाबाने त्याचा ताबा घेतला आणि मी उंडारायला मोकळी झाले.

अजुन कार्यक्रम सुरु व्हायला वेळ होता त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा एक्स्पोकडे मुक्काम वळवला. थोडी छोटी मोठी खरेदी केली. एक्स्पोमध्ये माझ्यासाठी खास गम्मत होती ती म्हणजे भातुकलीचा संसार. एप्रिलमध्ये मी याबद्दल लिहीले होते इथे तर चक्क करंदीकरकाका आपल्या संसारातील थोडी भातुकली इथे घेऊन आले होते. आमच्या बाळाला खेळायला त्यांनी वेगळी ठेवलेली भातुकली दिली. मला तर पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटत होतं. फ़क्त पाहुन समाधान केलं आणि चिक्कार फ़ोटो काढले. बाकी इतर एक दोन स्टॉलवर चक्कर मारता मारता दोन वाजायला आले.
आता कालचा अनुभव गाठीशी होता. पण आमची एक मैत्रीण वाद्यवृंदला निवेदन करणार होती म्हणुन प्रथम तिथे आम्ही एकत्र गेलो. कार्यक्रम सुरेख होता. मराठी गाणी फ़क्त वादकांनी बासरी,सतार, जलतरंग आणि तबला याच्या साथीने वाजवलेली. थोडा वेळ हा कार्यक्रम पाहुन उठलो कारण वरच्या माळ्यावर राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी आणि श्री. पणशीकर यांचा कार्यक्रम होता. आता आम्ही दोघीच फ़क्त वर गेलो. आणि आमचे पुरुषगण यात आम्हा दोघींना मुलगेच असल्याने तेही त्यांच्या आवडीचे कार्यक्रम पाहायला. हा कार्यक्रम वेगळ्या कारणासाठी लक्षात राहिला. पण ती आठवण वेगळी लिहेन. हाही कार्यक्रम खूप रंगला. थोड्या वेळात स्वरबंधसाठी पुन्हा रांग मोठी आहे असा फ़ोन आला मग इथुन उठलो. स्वरबंधचा कार्यक्रमही छान होता. पण मुख्य सभागृहात नाना पाटेकरची मुलाखत होती. मी इतका वेळ सारखेच गाण्याचे कार्यक्रम पाहातेय आणि रात्री आशा म्हणजे पुन्हा तेच म्हणून मी आणि माझा नवरा मुलाला घेऊन तिथे पळालो.


मुलाखत इतकी छान रंगली की मजा आली. मी तसं नाना पाटेकरचं एकही मराठी नाटक पाहिलं नाही पण मुलाखतीमधुन बरीच माहिती कळली.
आता मात्र मुलाला थोडं हॉटेलवर नेऊन कपडे बिपडे बदलुन आणुया असा विचार करुन दुसरे कार्यक्रम पाहायचा विचार रद्द करुन सरळ हॉटेलवर आलो. जरा ताजंतवानं होऊन जेवायला निघाल्यावर बरं वाटलं.
रात्री जेवणाचा मालवणी थाट होता. कोंबडी होती वडे का ठेवले नव्हते माहित नाही. कदाचित सकाळी पण वडा-भात होता म्हणून असेल. कोलंबीचा रस्सा मस्त झाला होता. पण वाढताना थोडं रेशनिंग होतं. जेवताना आम्ही ज्या टेबलला बसलो होतो तिथेच सारेगमप मराठीचे सई, सायली आणि मंगेश हे कलाकारही भेटले. पैकी सईबरोबर आधीही गप्पा मारल्या होत्या. आता ती आमच्या कडे अमेरिकेत कसं असतं याबद्दल बोलत होती. त्यांना एकंदरित इथे आवडलं पण त्यांच्या विसामुळे त्यांना दुसर्याच दिवशी निघावं लागणार होतं त्यामुळे त्यांचं कुठे फ़िरणं झालं नव्हतं. मंगेशला बरेच प्रश्न होते आणि आम्हाला त्यांच्याकडुन कळलं की आशाच्या कार्यक्रमासाठी त्यांना कोरसला गायला आयत्यावेळी बोलावलं होतं.
जेवुन खाउन बाहेर आलो तर कार्यक्रम एक तास उशीरा असल्याचा बोर्ड लावला होता. आता आली का कंबख्ती?? साड्या नेसुन हे असं ताटकळायचं आणि ते पण लहान मुलाला घेऊन म्हणजे जरा बाका प्रसंग होता पण आम्ही मग आरुषला खूप दमवलं. म्हणजे आमची ती कार्यक्रम पाहायला मिळावा यासाठी केलेली खास व्युहरचनाच म्हटली तरी चालेल. कार्यक्रम सुरु झाला आणि स्ट्रोलरमध्ये थोडावेळ इथे तिथे फ़िरवल्यावर स्वारी जी झोपली ती दुसर्या दिवशीच उठली.

जवळ जवळ साडे नवाच्या सुमारास सुरू झालेल्या कार्यक्रमाबद्दल बोलायचे तर खरंच शब्द कमी पडतील. पहिल्याच गाण्याला जो सुर लागला त्याला पंच्याहत्तरीतील बाई गातेय असं म्हणणं कठीणच गेलं असतं आवाजातला गोडवा वयोपरत्वे कमी होणं साहजिक आहे पण सुरांचा साज अप्रतिम. सुधीर गाडगीळांचे प्रश्न आणि आशाताईंची एकामागुन एक येणारी सुमधुर गाणी अहाहा! मध्ये त्यांना ब्रेक म्हणुन सुदेश भोसले आणि सारेगमप वाल्यांनी काही गाणी म्हटली. तीही छान होती. मग आशाजी आणि सुदेश यांनी गोमु संगतीनं चालु केलं आशाजी मस्त नथ आणि कोळणीसारखा हिरवा पदर लावुन नाचल्या. शिवाय त्यांनी थोडी फ़ार मिमिक्री केली. त्यातली गुलाम अलींची स्टाईल तर एकदम सही होती. आणि लता मंगेशकरांची तर नक्कल फ़ारच मजेदार फ़िल देते. साडेबारा वाजता मात्र आम्ही निघालो कारण आम्हाला आता चालत हॉटेलवर जायचे होते आणि शनिवारची रात्र सिटिमध्ये उगाच रिस्क नको. मला वाटतं त्यानंतर तीन-चार अजुन गाणी होऊन तो कार्यक्रम संपला.
आता उद्या संपणार अशी रुखरूख वाटत पावलं हॉटेलच्या दिशेने चालत होती. काही कलाकार इतक्या रात्री हॉटेलबाहेर जेट लॅग मुळे किंवा बहुतेक फ़ुकायला जमले असावेत सचिन खेडेकर आणि इतर काही मंडळी...आज काम, कार्यक्रम, खाणं, खरेदी सगळं कसं अन्डर वन रुफ़ छान झालं होतं. आता मात्र डोळ्य़ावर झोपेचा अंमल चढु लागला. मनात आशाचा आवाज ..."चांदण्यात फ़िरताना....."

Thursday, July 9, 2009

सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग २)

हा तर काय सांगत होते पहिल्या दिवसाची सुरूवात तर उशीरा पोहोचल्यामुळे पेढाच जास्त गोड मानुन केली पण समोरुन येणारी अमेरिकेत वाढणार्‍या छोट्या पिढीची मिरवणुक पाहुन मात्र बाकीच्या चिंता विसरले.

ढोल, ताशे आणि अगदी पारंपारिक पद्धतीनं सजलेले बाळगोपाळ अगदी दृष्ट लागण्यासारखे गोड दिसत होते आणि त्यांनी एक छोटं नृत्य सादर केलं त्याने तर अजुनच बहार आली.
आता मला माझी मैत्रीण सुजाता आणि तिचं कुटुंबही भेटलं होतं. त्यामुळे आरुषला हक्काचा एंटरटेनर मिळाला होता. मात्र स्वारी अजुन म्हणावी तशी रमली नव्हती आणि मलाही पैठणीमुळे उगाच दबल्यासारखं होत होतं; त्यामुळे मुख्य सभागृहात जायचं जरा टाळलं. उगाच इथे तिथे पाहुण्यांची रेलचेल पाहात बसलो. भारतातुन आलेली कलाकार मंडळी इथे तिथे बागडत होती. सलील, संदीप (हे म्हणजे जोडीनेच दिसतात हा!), सारेगमप मधले काही कलाकार आणि इतर काही मंडळी होती. मी आपली नवर्‍याची वाट पाहात म्हणजे मुलाबरोबर काही करता येईल का म्हणून उगाच वेळकाढुपणा करत होते.
मध्येच सुजाता आली आणि तिने आतमध्ये काय चालु आहे त्याची माहिती दिली. मी म्हटलं अग कुठलातरी कार्यक्रम पाहिला पाहिजे. पण मुलांच्या व्यापात काही सुचत नव्हतं. शेवटी जादुचा प्रयोग पाहावा असं ठरलं. जादुगार आणि लहान मुलांचे कार्यक्रम इ. एकदम दुसर्‍या टोकाला होते. त्यामुळे मध्ये मी सरळ कॉरिडॉरमध्ये ब्रेक घेऊन मुलाच्या पोटात थोडं काही ढकललं. जादुगार खुपच छान रमवत होता मुलांना पण एक वर्षाच्या मुलांना काय त्याचं कौतुक? शेवटी तिथुनही बाहेर आलो आणि पुन्हा मुख्य सभागृहाच्या भागात गेलो.
इतक्यात एका ठिकाणी रांग लागल्यासारखं वाटलं आणि घड्याळाकडे लक्ष गेलं. अरेच्या! साडे अकरा होतील म्हणजे बरोबर आहे. पेशवाई पंगतीच्या थाटाची तयारी करायला हवी. नशीब की नवरा पण कुठुनतरी एकदाचा उगवला आणि आम्ही त्या न संपणार्‍या रांगेत थांबलो.
त्या पेशवाई थाटाचं वर्णन म्या काय करावं. खादाडी हा आमचा दोघांचा विक पॉइन्ट त्यामुळे नावावरुन जरा हाय एक्सपेक्टेशन ठेवुन होतो आम्ही. म्हणजे आता वांग्याची भाजी, वालाची उसळ, बटाटा भाजी, पुरी, चपाती, मसालेभात, साधा वरण भात, श्रीखंड-पुरी, चपाती इ.इ. होतं पण उगाच पेशव्यांशी संबंध कळला नाही. नंतर कुणीतरी आम्हाला म्हणालं की अगं पेशवे को. ब्रा. होते ना त्यांच्यात हाच थाट... मला आपलं उगाच पु.लंच्या एका लेखातलं "खा लेको मटार उसळ" असं एक वाक्य आठवलं.
सकाळपासुन व्यवस्थित असं पहिलच खाणं असो किंवा काय, मला चवी आवडल्या आणि आयतं कुणी इतर प्लान करुन इतके पदार्थ पानात असताना काय रडायचं. आमच्या पिलुनेही गरम गरम वरण भात तुप खाल्लं. त्यामुळे तर मला जास्तच समाधान वाटलं.
आता एकतरी कार्यक्रम पाहुया असा विचार करत होते. पण मुलाची लक्षणं ठिक दिसत नव्हती. पण कसा काय तो नवरा स्वतःच म्हणाला मी याला हॉटेलवर घेऊन जातो तू बघ काहीतरी. हुश्श. आता जरा कार्यक्रमाची रुपरेषा पाहुया म्हणून बघते तर अगदी जंत्रीच होती. म्हणजे कुठे तरुणाई, कुठे मैतर, कुठे अवघा रंग...काय करावं म्हणजे सर्व एकाच वेळचे होते पण अजुन सुरु काहीच झालं नव्हतं.

मैतरच्या इथे जरा लवकर सुरु होईलसं वाटलं म्हणून बसले. पण तिथेही छोट्या छोट्या गोष्टी चालुच. पण पुन्हा उठुन दुसरीकडे जायचाही कंटाळा आला होता. शेवटी अडीचच्या दरम्यान कार्यक्रम सुरु झाला पण वेळेत संपवायचा असल्या कारणाने त्यांनी मध्ये मध्ये तो (सांगुन) कापला त्यामुळे उगाच पुर्ण कार्यक्रम बसलो असं झालं. आणि नंतर प्रत्येकवेळी ही टिप वापरली, त्यामुळे थोडे थोडे बरेच कार्यक्रम कव्हर करता आले. म्हणजे इथेही टिकमार्क..:)
असो. चारच्या दरम्यान खाली आले तर तरुणाई बहुतेक वेळ बदलल्यामुळे आताच चालु झाला होता. पण अजुन घरची एक ट्रिप राहिली होती म्हणून सरळ हॉटेलवर जाऊन पुन्हा घरी गेलो आणि दोन दिवसांच्या बॅगा भरुन परत घरी आलो. परत आलो ते जवळ जवळ संध्याकाळच्या जेवणाच्याच वेळेला. कारण जेवण साडे-आठ पर्यंतच होतं. शिवाय आता जेवणाचा कोल्हापुरी थाट असणार होता. म्हणजे तांवडा नाहीतर पांढरा रस्सा असेल म्हणून पोटातले कावळे जरा जास्तच जोराने ओरडत होते. असो. जेवण मात्र खरच छान होतं. कोंवडीचा रस्सा रंग माहित नाही पण एकदम अस्सल होता. अहो म्हणजे गुजराथी केटरर आहे हे ज्यांना माहित आहे तेच हो म्हणतील. बाकी बेतही फ़क्कड होता. चला आता एकतरी कार्यक्रम दोघ (खर तर तिघं) मिळुन पाहुया असं म्हणत होते. म्हणजे मुलगा झोपला तरच.
दुपारी हॉटेलवर जरा जास्तच झोप झाली होती की काय माहित नाही पण पोराची झोपेची लक्षण नव्हती. पण "हास्य पंचमी" सोडवत नव्हती. तिघही आपल्या जागा घेऊन बसलो. तिथे मागच्या लोकांना स्टेजवरचं दिसावं म्हणून दोन-तीन मोठ्या स्र्किन्स होत्या त्यातली एक आमच्या रांगेपासुन तशी जवळ होती आणि त्यावरची माणसं हलताना पाहुन मुलाला गम्मत वाटत होती. म्हणून मुलगाही आनंद घेत होता. कार्यक्रमाची सुरुवात मोठीच दिमाखदार आणि विक्रम गोखले, प्रभावळकरांसारखे दिग्गज कलावंत असल्यामुळे छान चालु होतं. मध्येच आमच्या मुलाने असहकार आंदोलन पुकारल्यामुळे मी शेवटी त्याला घेऊन मागे किंवा बाहेर जायचा विचार केला. नशीवाने मागच्या बाजुच्या जाजमावर माझ्या सारख्या इतर आया आणि त्यांची पोरे होती. त्यामुळे जमेल तेवढं स्क्रिनवर आणि मध्ये मध्ये इथे तिथे बागडणार्‍या बाळाला असा माझा दुहेरी प्रयोग चालु झाला.

हा कार्यक्रम म्हणजे जुन्या विनोदी नाटक, नाटककार अशी थोडी माहिती सांगुन मग त्यातला एखादा भाग सादर होणार असं चाललं होतं. जोपर्यंत पु.लंची आणि इतर लोकपसंतीचे भाग चालु होते तोपर्यंत टाळ्या- हशा यांची रेलचेल होती. पण "पळा पळा कोण पुढे पळेतो" यातलं सादरीकरण चालु झालं तेव्हा मात्र आधी एक-दोन मग अर्धी रांग करता करता अर्ध्याहुन अधिक लोक अक्षरश: पळुन गेले. म्हणजे आम्ही मागच्या बाजुला होतो तर मध्ये मध्ये माझ्या मुलाला ही इतकी लोकं आपल्याशी पकडा पकडी खेळतायत का म्हणून तोही तुरुतुरु पळत होता. मध्ये एक दोन अपिरीचीत माणसांच्या मागेही गेला. बापरे.
खर तर मलाही पळावसं वाटत होतं पण माझा नवरा त्याच्या टिमचा काही प्रॉब्लेम सोडवायला त्याचवेळी बाहेर गेला होता. आणि आयत्या वेळी निर्णय घेतल्यामुळे आम्हाला जवळचं हॉटेल मिळालं नव्हतं म्हणून माझी गोची झाली. असो. यथावकाश नवरा आला आणि तोपर्यंत प्रशांत दामलेंचं ’लग्नाची गोष्ट" आणि संजय नार्वेकर इ. असलेलं "यदाकदाचित" असे दोन छान नाटकांमधले प्रसंग पाहायला मिळाले. पळालेल्या लोकांनी हे मिस केलं बघ. आम्ही एकमेकांना सांगत होतो.
रात्रीचे अकरा साडेअकरानंतर घरी जायचं नव्हतं त्यामुळे इतकं बर वाटत होतं. पळुन पळुन दमलेलं माझं पिलु स्ट्रोलरमध्ये शांत झोपलं होतं. त्याची झोपमोड नको म्हणून आम्ही चालतच रुमवर निघालो. आता दुसर्‍या दिवशी कार्यक्रम पाहण्याची वेगळी व्युहरचना करण्याचे प्लान बोलता बोलता चालु झाले.

Tuesday, July 7, 2009

सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग १)

काल माझा बी.एम.एम. संमेलनातला आशाजींचे स्वागत करण्याचा प्रसंग लिहिता लिहिता मनात आले की आता सर्वच आठवणी लिहुन काढुया. एकतर हे आमचे प्रथमच सहभागी झालेले संमेलन आणि त्यातुन आम्ही दोघही त्यात स्वयंसेवक म्हणून कामही केले. त्यामुळे थोडं हळवेपण जास्तच. बघुया जसं आठवेल, जमेल तसं थोडं थोडं लिहिन म्हणते. जर जास्त डोस झाला तर जसा जुलै महिना अमेरिकेत आईस्क्रीम खायचा महिना म्हणून समजला जातो तसा जुलैचा ब्लॉग संमेलना़चा ब्लॉग म्हणून ओळखुया झालं.
तर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की रोज ड्राईव्ह करुन जाउया आणि गाडी फ़िलाडेल्फ़िया सिटीत पार्क करुया. तसं पाहायला गेलं तर अंतर फ़ार फ़ार तर अर्ध्या तासाचं असेल. शिवाय हॉटेलचे नाही म्हटलं तरी साधारण चारशे- साडेचारशे डॉलर्स वाचतील हा हिशोबही होताच. या संमेलनासाठी आशाजी येणार म्हणून त्यांचा एक हिन्दी गाण्यांचा कार्यक्रम २ तारखेला म्हणजे मुख्य संमेलन सुरु व्हायच्या आधी ठेवला होता. आयत्या वेळी स्वयंसेवकांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य असणार असे जाहीर झाले आणि झालं माझा जीव खालीवर व्हायला लागला.
आधी आम्ही आमचा मुलगा लहान असल्यामुळे ह्या कार्यक्रमाला जायचे नाही असे ठरवले होते. पण चकटफ़ुची पाटी पाहिल्यावर चान्स घेऊया असा विचार साहजिकच मनात आला. शिवाय पुढे संमेलनाचे तीन दिवस आमचा दिवटा काय पराक्रम करेल त्याची रंगीत तालीमही होईल म्हणून जाऊया असे ठरले.
२ तारखेचा कार्यक्रम एकतर वेळेच्या खूपच उशीरा सुरू झाला, आमचा मुलगा गाडीत झोपला पण गाडीतुन स्ट्रोलरवर ठेवेपर्यंत जो ऊठला तो बराच वेळ झोपलाच नाही. शिवाय कार्यक्रमही विशेष रंगला नाही म्हणून शेवटी तिथुन निघालो.

पण तरी घरी येइस्तो जवळ जवळ रात्रीचे साडे-बारा वाजले. मुलाचीही झोप नीट झाली नाही म्हणून इतर वेळी साडे सहालाच पांघरुणात उठणारं कार्ट ऊठलंच नाही. पहिल्या दिवशी सर्वजणी पैठणी नेसणार म्हणून मलाही तयार व्हायला उशीर झाला.
आठला तरी निघु असं रात्री म्हणणारे आम्ही साडे-आठपर्यंत घरीच. नऊ पर्यंत नाश्त्याची वेळ होती. मिळेल असं काही वाटत नव्हतं पण आमची गाडी जरा कुठे ट्रॅफ़िक नसल्यामुळे हायवेवरुन भरधाव जात असताना अचानक समोर दोन्ही बाजुच्या मध्यभागी काही वेळा थोडी जागा सोडलेली असते तिथे गाडी घेऊन टपुन बसलेल्या मामाने त्याची गाडी सटकन आमच्या गाडीच्या पाठी आणली. मी म्हटलं नवर्‍याला कितीवर चालवत होतास रे. तर म्हणे पंच्याहत्तर. झालं आता मोठं तिकीट मिळणार असं वाटतंय तेवढयात मामासाहेबांनी आमच्यावरुन उडी पुढे मारली आणि समोरच्यासाठी दिवे चालु केले. हुश्श! आमच्या नशीबाने आमच्या समोरचा जास्त जोरात होतं म्हणून कावळा पुढचं मोठं सावज पकडायला उडाला वाटतं.
सुरुवातीचाच अनुभव हा असा. कसंबसं नऊच्या ठोक्याला आमचा स्ट्रोलर आत घेऊन पोहोचले पण अर्थातच न्याहरीची वेळ संपली होती आणि आमची दोघांची लाडकी साबुदाण्याची खिचडी (खास आषाढीचा बेत) आणि दुधी हलवा यांना आम्ही मुकलो. अर्थात थोडंफ़ार वेळेच्या आत येऊनही लोकांच्या भरगोस (की भरपेट) प्रतिसादामुळेही न मिळालेली लोकं होती मग आम्ही आपलं त्यातच समाधान केलं की आपण तसही उशीरा आलो होतो. स्वागतासाठी ठेवलेला पेढा खाउन तोंड गोड केलं आणि मुलाचा स्ट्रोलर घेऊन उरलेल्या दिवसातले कुठले कार्यक्रम हा पाहायला देईल याचा विचार करत राहिले. नवर्‍याने आपला मोर्चा कधीच कामावर वळवला होता. कारण ते लांबच्या हॉटेलमधुन लोकांना घेऊन येणारी शटलबद्द्ल काही अडचणी असतील तर त्यासाठी हॉटेलला थांबणार होते.
थोड्या वेळाने नवर्‍याचा फ़ोन आला की बास झाली धावपळ. उरलेल्या दिवसांसाठी मी आपल्याला हॉटेल बुक केलय... तर अशी झाली सुरुवात ३ जुलैची.. उरलेली कहाणी उद्या. आतापुरता एवढेच.

Monday, July 6, 2009

ती आली, तिला पाहिले.....

२००७ मध्ये अधिवेशनाची स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवताना किंवा अगदी ह्या ब्लॉगचे नामकरण करताना कुणी म्हटले असते की बाई तू आताच काही महिन्यांमध्ये ह्या नावाचा इतिहास ज्या व्यक्तीशी संबंधीत सांगतेस ती अशी तुझ्याशी समोरासमोर ऊभी राहुन गप्पा करील, तर मी ती गोष्ट उडवून लावली असती. पण १ जुलै माझ्या आतापासुन कायम स्मरणात राहिल हे मात्र खरे.
म्हणजे झालं असं की या वर्षीचं बी.एम.एम.चं अधिवेशन आमच्या फ़िलाडेल्फ़ियात भरणार म्हणून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या समित्यांवर काम करत होतो आणि कलावंतांचं खास स्वागत करणारा आमचा गट जेव्हा शेवटच्या मिंटींगला काम वाटप होत होतं तेव्हा ३० जूनला मेरिऑटला माझी ड्युटी होती. पण शेवटच्या क्षणी काही इतर कलांवंतांचे बेत बदलल्यामुळे तू १ तारखेला येशील का असं आमची लिडर मला फ़ोनवर विचारू लागली तेव्हा मी जरा विचारात पडले. कारण मग घरी माझ्या एक वर्षाच्या मुलाला कोण पाहणार, नवरा आयत्या वेळी ३०च्या ऐवजी १ ला राहु शकेल का अनेक प्रश्न. पण नवरोबाने सहकार्य केल्यामुळे मी १ ला जायला तयार झाले.
हॉटेलवर पोहोचले आणि त्या दिवशीच्या गेस्ट लिस्टवरचं एक नाव पाहिलं आणि दिल की धडकन एकदम तेज....मनात मोर नाचु लागला आणि चांदण्यात फ़िरवरणारा तो आवाज कानी घुमू लागला. अहो चक्क "आशा भोसले" हे नाव त्या यादीत होतं. हळुहळू एक एक कलावंत, ग्रॅंड स्पॉन्सर इ. इ. येत होते. त्यांचंही स्वागत करण्यात गम्मत होती. पण सगळीकडे आपला एकच प्रश्न "ती आली का?"
जरी लिस्टवर नाव असलं तरी अशा ठिकाणी स्वाभाविकपणे जे होतं तेच होईल असा साधारण अंदाज होता म्हणजे जी लोकं जरा जास्ती पुढे करणारी किंवा मोठ्या जागी काम करणारी असतात त्यांच्यापुढे आपण काय टिकणार?? पण असो.
आमचा स्वागतकक्ष आणि मेरिऑटचं फ़्रन्ट डेस्क यात तसं बरच अंतर होतं. म्हणजे ते हॉटेलच्या मुख्य दरवाजाला तर आम्ही लॉबीच्या दुसर्या टोकाला जिथे त्यांचं एस्कलेटर आणि एलेव्हेटरला जायचा रस्ता होता तिथं. साधारण दोनेकच्या सुमारास फ़्रन्ट डेस्कच्या इथे काही कामानिमित्त्त जाणं झालं तर काय अहो साक्षात आमची लहानपणापास्नंची गोड गळ्याची आराध्यदेवता समोर. तिला घेऊन येणारी व्यक्ती तिचं चेक इन करण्यासाठी पुढे होती आणि आशाजी तिथे उभ्या होत्या. प्रवासाने नक्कीच दमल्या असणार पण मला वाटतं एक चाहती म्हणून नमस्कार तर नक्कीच करावा. मी थांवले. नमस्कार करुन म्हणजे डोक्यात इतका गोंधळ चालु होता त्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न करत त्यांच्याशी बोलु लागले की मला विश्वासच बसत नाहीये की आपण आता माझ्यासमोर उभ्या आहात. त्या तरीही माझ्याशी खूप छान हसल्या. माझ्या नशीबाने त्यांना मी आधी कुठे तरी भेटल्यासारखं वाटत होतं म्हणून त्या मला तो संदर्भ द्यायचा प्रयत्न करत होत्या...इतक्यात किरण त्यांच्या चाव्या घेऊन आल्यामुळे अर्थातच भेट संपली. आणि अशा प्रसंगी जे नेहमी होतं तेच म्हणजे कॅमेरा आणि वही दुसरीकडे. किरणकडे उगाच मस्का मारुन पाहिलं की अरे एक फ़ोटो काढला पाहिजे आणि माहितीतलं उत्तर अगं ती आता पाच तारखेपर्यंत इथेच आहे..असो...
आता मला फ़ोटो, स्वाक्षरी यासर्वांपेक्षा लक्षात राहिल ती शांतपणे हसुन माझ्याशी गप्पा मारणारी माझी लहानपणापासून गाण्यातुन शेवटी प्रत्यक्ष भेटलेली आशा....खरचं ती आली, तिला पाहिले आणि बास...मी धन्य झाले....