Monday, July 20, 2009

सम्मेलनाच्या सुरस कहाण्या (भाग - ४)

कालच्या आशाच्या कार्यक्रमाच्या आठवणी संपता न संपतात तोच हा नवा आणि सम्मेलनाचा शेवटचा दिवस उजाडल्यासारखं वाटतय. आज कुठलीही साडी थीम नाही त्यामुळे ’झाले मोकळे आकाश’ सारखं गेले तीन दिवस साडी एके साडीतुन सुटल्यासारखं सलवार कमीजमध्ये कसलं सुटसुटीत वाटत होतं. म्हणजे मला साडी खूप आवडते पण त्यात वावरायची फ़ार सवय नसल्यामुळे तीन दिवस सतत म्हणजे थोडा ओव्हरडोस होतो. असो. आज हॉटेलमधुन चेक आऊटपण करायचं होतं त्यामुळे कसं-बसं ब्रेकफ़ास्ट संपायच्या आधी म्हणजे अगदीच साडे आठला एक दोन मिनिटे कमी असताना वगैरे पोहोचलो. पण कांदे पोहे आमच्यासाठी होते आणि कचोरी सुद्धा. कांदे पोह्यामध्ये शेंगदाणे का घातले नाहीत अशी तक्रार माझा नवरा करत होता. पण चव छान होती.

आज कुठले कार्यक्रम पाहायचे ते काही नीट ठरत नव्हतं. पण आतापर्यंत गाणी आणि संगीताचेच जास्त कार्यक्रम पाहिले तर आज थोडंतरी वेगळं पाहुया असं करता करता सकाळी वरच्या बॉलरुमला विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांचं काही आहेस पाहिलं आणि सर्वजण वरती गेलो. आधी आम्हाला वाटलं होतं की थोडं आधुनिक भाषण वगैरे असेल.पण हे आपलं टिपिकल किर्तन असतं ना तसं होतं. म्हणजे ’जय जय रामकृष्ण हरी’ वालं. त्यांचे दोन अभंग ऐकुन मग उठलो. मला वाटतं यांचं तसं भाषण आदल्या दिवशी झालं असणार कारण ते मुख्य वक्त्यांपैकी एक होते.
मग खाली आलो. तर अर्चना जोगळेकर दिग्दर्शित ’विश्वनायिका’ चालु होतं. सहज म्हणून मी आणि सुजाता तिथे बसलो आणि मग त्यातले मधले विजय कदम आणि त्यांच्या सहकार्यांचे विनोद आवडून आमच्या नवर्यांना बोलावुन घेतले. हा कार्यक्रम छान होता. फ़क्त त्यातली गाणी आमच्यासाठीतरी एकदम नवी आणि पटकन आवडून जातील अशीही नव्हती म्हणून ते सर्व नाच पाहायला कंटाळा येत होता. पण यात बायकांच्या ज्या विविध जाती किंवा प्रकार सांगितेल आहेत ते एकदम अफ़लातून आहेत. मजा आली. आणि विजय कदमांनी त्यातले काही अमेरिकन रेफ़रन्सेस दिल्यामुळे तर सभागृह खूश होऊन जास्त टाळ्या आणि हशा चालु होत्या.
माझ्यासाठी अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे सुरुवातीला थोडसं खाता खाता स्ट्रोलरमध्ये आरुष मस्त झोपुन गेला होता आणि त्यामुळे त्याला पाहाव लागत नव्हतं.
खरतर मला शेवट काय होतो हे पाहायची इच्छा होती पण आमच्या मेजॉरिटीत जेवणाच्या रांगेसाठी मत असल्यामुळे मीही उठले. आज बम्बैया बेत असणार होता. तो म्हणजे पावभाजी आणि गुजराथ्यांशिवाय ती जास्त छान कोण करणार?? बरोबर दही-भात आणि रव्याचा लाडुही होता. म्हणून आम्ही वेळ अजिबात चुकवली नाही. आज आम्ही दोन्ही कुटुंबांनी एकत्र जेवायचंही ठरवलं होतं. आरुष झोपला असल्यामुळे बर होतं. पाव भाजी आणि गप्पा-टप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. जेवण खरंच टेस्टी होतं. मग एकएक करुन सर्वांचे पाव संपले. मिलिंद सर्वांसाठी पाव आणायला उठला. त्याला मदत करायला सुजाताही उठली. आमच्या बरोबर अजुन एक ओळखीचं जोडपं आता जॉईन झालं होतं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो. तितक्यात सुजाता मिलिंद पाव घेऊन आले आणि ती तिचा मुलगा अश्विन कुठे आहे म्हणून विचारायला लागली. अरे बापरे! म्हणजे हा त्यांच्याबरोबर गेला नव्हता?? ती म्हणाली मी त्याला इथेच थांब सांगुन गेले...शु.... हे काय नवीन आता?? एवढया मोठ्या जेवण्याच्या हॉलमध्ये याला कसं शोधायचं?? पुन्हा हा हॉल मागच्या बाजुने एक्स्पोला जोडलेला होता. तिथे जर गेला असेल तर अजुन गुंतागुंत. आता हे दोघे पुरुष त्याला शोधायला बाहेर गेले कारण बाहेर जाउन एकदम बाहेर रस्त्यावर जाउन हरवायचा धोका जास्त होता. आरुष अजुन झोपलेला होता म्हणून त्या नवा जोडप्याला स्ट्रोलरकडे लक्ष द्यायला सांगुन मी आणि सुजाता याच हॉलमध्ये त्याला शोधायला लागलो. तितक्यात मिलिंदच्या नावासाठी अनाउन्समेन्ट ऐकु आली. आवाज एवढा घुमत होता की नीट काही कळत पण नव्हतं. मग एकाकडे चौकशी केली तेव्हा त्याने जिथे अनाउन्समेन्ट करतात तिथे मागच्या बाजुला जायला सांगितले. अर्ध अंतर चालतोय तोच एक स्वयंसेवक अश्विनला घेऊन समोरुन येताना दिसला. सर्वांची नजर चुकवुन कार्ट मागच्या बाजुला गेलं आणि मग रडत कुणाला तरी तिथे सापडलं. तरी त्याच्या गळ्यात बॅच होता आणि त्यावर मिलिंदने स्वतःचा सेलफ़ोनही लिहुन ठेवला होता. असो. आता उरलेलं जेवताना ’अश्विन हरवतो तेव्हा’ हा विषय आम्हाला भरपुर पुरला. आरुषही आता उठला आणि थोडा दही-भात खाऊन तरतरीत झाला.
जेवल्यावर पुन्हा एकदा एक्स्पोला वळलो कारण मुख्य म्हणजे आता फ़ार काही कार्यक्रम नव्हते. माझ्या कॅमेर्यावी बॅटरीही संपली होती आणि फ़क्त शेवटचा "मनात नाचते मराठी" हा मराठी बाणा सारखा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षी मराठी मंडळातही पाहिला होता आणि आता हळुहळु जायचे वेधही लागले होते. मी पुन्हा एकदा भातुकलीचा संसार पाहुन आले. सुजाताचं राहिलं होतं. तिलाही फ़ार आवडला. खरेदी आता काही करायची नव्हती पण तरी आयडीयलचा स्टॉल दिसला मग काही मराठी पुस्तके आपसुक आली. आणि थोडंसं झोपाळल्या डोळ्याने मुख्य सभागृहात आलो.
आधी सर्व स्वयंसेवकांनाही मुख्य स्टेजवर एकदा (गर्दी करून) बोलावुन त्यांचे आभार प्रदर्शन झाले. मला उगाच मागे गेले असं झालं. टिमप्रमाणे बोलावुन फ़क्त डावीकडुन उजवीकडे जायला लावलं असतं तरी बरं दिसलं असतं कारण संख्याही बरीच होती. आणि मग शेवटचा "मनात नाचते मराठी" सुरु झाला. खूप मेहनतीने आणि भरपुर कलाकार घेऊन बसवलेला कार्यक्रम आहे. फ़क्त आम्ही आधी पाहुन झालाय म्हणुन चारेक वाजेपर्यंत उठलो. घर जास्त लांब नाही त्यामुळे तासाभरात पोहोचलो आणि एकदम जाणवलं की गेले दिडेक वर्ष जे चालु आहे, टिम मिटिंग, ऑल व्हॉलंटियर मिटिंग, कामानिमित्ताने केलेल्या इतर काही गोष्टी, ग्रुप इ-मेल्स आणि फ़ायनली खरंखुर सम्मेलन आज संपलय. आमच्यासाठी बरच काही शिकवुन गेलय. जाता जाता आमच्या गप्पा चालल्या होत्या त्यातलं सांगायचं तर दर दोन वर्षांनी तुमच्यासाठी कार्यक्रम, अस्सल मराठी खाणं, वाजवी दरात हॉटेल्स इ.इ. यांची सोय करायचे कष्ट कुणी दुसरं करत असेल तर अशी व्हेकेशन कुणाला नको??

11 comments:

  1. चारही भाग वाचुन पुर्ण होई पर्यंत थांबलॊ होतो कॉमेंट पोस्ट करायला.मोठ्या मोठ्या माणसांबरोबर रहायला मिळण्याचा आनंद काही निराळाच.आणि ज्यांच्या बद्दल नुसतं ऐकलंच आहे अशा लोकांचा एक माणुस म्हणुन मिळालेला सहवास... त्या बद्दल काय बोलावं?? मागल्या जन्मीचं पुण्यं कामी आलंय... बस्स!!
    खुपच सुंदर आणि मनापासुन लिहिलंय.. छान झालाय लेख..

    ReplyDelete
  2. धन्यवाद महेन्द्रकाका. खरचं मस्त मजेत गेले तीन दिवस म्हणून थोडफ़ार लिहिता आलं. खरंच काही काही बाबतीत मागच्या जन्मीचंच पुण्य कामाला येतय...अजुनही काही आठवणी आहेत बघुया कसं जमतय ते मांडायला.

    ReplyDelete
  3. नॉस्टॅल्जिया.. नॉस्टॅल्जिया.. चारही लेख वाचले. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. ते चार दिवस माझ्या आयुष्यातले सर्वांत चांगले चार दिवस होते. नवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या; अनेक मराठी माणसं एकावेळी भेटली; ज्यांची भेट होणं बापजन्मात शक्य नव्हतं अशा कलाकारांची भेट झाली; आशा भोसलेंच्या एक नव्हे तर दोन संगीत मैफिली ऐकायला मिळाल्या; निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ चाखून बघता आले; ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट पडद्यावर बघता आला (नाहीतर अमेरिकेत कुठलं आलंय मराठी चित्रपटाचं स्क्रीनिंग?); विविध प्रकारचे मराठी कार्यक्रम बघता आले... खरोखर ते क्षण आयुष्यातल्या काही अतिदुर्मिळ क्षणांपैकी होते... :-)

    ReplyDelete
  4. खरय संकेत ते चार दिवस खूप छान होते...इतके मराठी कार्यक्रम एका छताखाली, मराठमोळ जेवण , गप्पा, मिरवण सगळं करून घेतलं....कदाचित मी तुझं चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय....नन्तर जी कोजागिरीला पार्टी झाली होती त्याला होतास का?? असो...
    अरे पण याच संमेलनात एक स्पीड डेटिंग चा पण खास अविवाहितासाठी कार्यक्रम होतं अस ऐकल होतं त्याला तू नक्की जायला हवं होतास....(किंवा कदाचित गेलाही असशील...)

    ReplyDelete
  5. पदरचे पैसे खर्च करून? असेल तसं. कारण, माझ्या माहितीप्रमाणे नावनोंदणी आधीपासून झाली असली तरीही अगदी अधिवेशन जवळ आल्यानंतरही त्यांना अपेक्षित एवढी स्वयंसेवकसंख्या नव्हती. त्यामुळे अगदी शेवटी त्यांनी स्वयंसेवकांना सगळं फुकट आहे असं जाहीर केलं. आणि मी अधिवेशनाच्या आधी आणि नंतर झालेल्या कोणत्याच कार्यक्रमांना नव्हतो कारण, मी ह्यूस्टनचा आहे. मी ग्रॅज्युएट झाल्यावर पेनसिल्वेनियात एका कन्सल्टंटकडे होतो. आम्ही फिलाडेल्फियापासून जवळजवळ ७० मैलांवर राहायचो आणि माझ्याकडे गाडी नव्हती. त्यामुळे येणं शक्य नव्हतं. आणि तसंही मला माहितही नव्हतं की फिलाडेल्फियामध्ये अधिवेशन आहे. माझा एक मित्र UPenn मध्ये होता राहुल जोशी नावाचा. तू ओळखतेस का त्याला? मंदार जोगळेकरची आणि त्याची मला वाटतं ओळख आहे. त्यामुळे मंदारकडून त्याला कळलं आणि त्याने मला सांगितलं. आणि म्हणून मी नाव नोंदवलं.

    आणि स्पीड डेटिंगला जाता आलं नाही गं मला. I think, त्याच रात्री ‘मी आशा’ हा कार्यक्रम होता. आणि त्यामुळे आम्ही त्याची तयारी करत होतो. खुर्च्यांना लेबलं लावण्याचं काम आमच्याकडे होतं. आणि त्यातून त्यांनी ऐनवेळी स्टेज थोडं पुढे आणलं होतं. त्यामुळे खुर्च्यांची रचनाही बदलावी लागली होती. एकंदरीत, स्पीड डेटिंगला जाण्याएवढा वेळ नव्हता. आणि म्हणूनच माझं लग्न अजून झालं नाहीये... ;-)

    ReplyDelete
  6. आल लक्षात काही विद्यार्थी आणि अशा इतर आयत्या वेळी आणलेल्या स्वयंसेवकांना ती सुविधा होती....आम्ही मंदारला चांगलं ओळखतो त्यामुळे सहभागी झालो...नंतर इतर बरीच लोक परिचयात आले...आणि त्यानंतर आम्ही पण OR मध्ये आलो...तू वाचला असशीलच अर्थात....या विकांताला तुझ्याच प्रतीक्रियाना उत्तर देतेय...पुन्हा एकदा आभार....:)
    स्पीड डेटिंग येत्या BMM ला शिकागोला जाणार असशील तर कर...अजून डोक्यावरचे केस आहेत तोवर वेळ आहे...नाही तर घरी कांदे पोह्यांची तयारी सुरु करायला सांगितल तरी मुलाचं काम होतं की...) Good luck.

    ReplyDelete
  7. आमच्या घरी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगण्याची गरजच नाहीये. उलट त्यांनीच कधीपासून मला पटवायला सुरुवात केली आहे. ‘आता नोकरी लागली तुला. आता आपण मुली बघायला सुरुवात करूया. आत्ता सुरुवात केली तर लग्न लगेच जमेल असं नाही.’ वगैरे वगैरे. मी ऑगस्टमध्ये भारतात जाऊन आलो फक्त १५ दिवसांसाठी. त्या १५ दिवसांतही मी तीन मुली बघितल्या! आता बोल!

    ReplyDelete
  8. That means you are on right track...:)

    ReplyDelete
  9. तरी बरं मी फक्त बघितल्या मुली. ‘जमलंच तर साखरपुडा उरकून घेऊया आता आला आहेस तर!’ असाही एक मतप्रवाह होता घरात...

    ReplyDelete
  10. मतप्रवाह, हाहाहाहाहाहा....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.