Tuesday, July 21, 2009

एक असाच ओला दिवस...

असा पावसाळी दिवस आला की आपल्या मान्सुनी दिवसांची हमखास आठवण होते. आठवतात ते आयत्यावेळी मित्रमंडळाला गोळा करुन संजय गांधी नॅशनल पार्कात केलेले छोटे ट्रेल्स. गाड्या बान्द्र्याच्या पुढे जायच्या बंद पडल्या की एकमेकांना फ़ोन करुन घरी जायच्या ऐवजी आमचा अड्डा तास-दोन तासासाठी का होईना पण बोरीवलीच्या उद्यानात. आमच्यातला एक अति सुदैवी प्राणी या गेटच्या बाजुलाच राहायचा. तो बरेचदा चक्क पायात स्लिपर घालून येई. घरी अर्थातच नाक्यावर जाऊन येतो सांगितलं असणार हे नक्की.गाडीवाला कुणी असला तर कान्हेरी पर्यंत जाऊन मग हिरवं रान आणि थोडीशीच दिसणारी वाट हे हमखास आवडीच दृष्य. यासाठी इतर सर्व प्लान कुरबान.. कान्हेरीच्या पायरीवर चिंचा, पेरू, काकडी असं काहीबाही घेऊन न धुतल्या हाताने खाणं आणि एकमेकांना देणं. जास्त वर चढून नाही गेलं तरी हिरवा पिसारा लगेच नजरेच्या टप्प्यात येई आणि मग आपण एकटे असलो तरी चालेल. सगळीजणं बसून खूप गप्पा मारल्यात असही नाही. नुसतंच निसर्गाला ऐकायचं आणि हिरवा रंग डोळ्यात साठवून ठेवायचा. पावसाची जोरदार सर आली तरी तिला न जुमानता तसचं बसून राहायचं. घरी गेल्यावर बॅगमधलं काय काय ओलं झालंय ते पाहू...

गाडी नसली तर मग चालवेल तिथपर्यंत चालायचं आणि कुठे काही हालचाल दिसली तर हिरव्या गर्द राईत घुसायचं. कितीदा अशा नसलेल्या रस्त्यांमध्ये आम्ही हरवलोही आहोत. एखाद्या पक्ष्याच्या मागे जाता जाता मग परत मुख्य रस्त्याला लागेपर्यंत ज्याच्या कडे जे काही खायला असेल त्याचा चट्टामट्टा करुन आणि पाण्याचं रेशनिंग केलेले ते दिवस विसरणं खरचं अशक्य आहे. मुंबईतल्या मुंबईत हा जंगल सहवास मिळणारे आम्हीच भाग्यवान म्हणायचे. खरतर मान्सून मध्ये पक्षीगण जास्त दिसतही नसे पण किटकांची चलती होती. तेवढ्यापुरता जी शास्त्रीय नावे कुणी सांगत ती लक्षातही राहात. पुन्हा काही दिवसांनी मात्र आम्हा द्विजगण प्रिय.... पावसाळ्याचे दिवसच काही और हे मात्र नक्की.

परतीच्या वाटेवर खुपदा रिपरिपच असे. मग चालत असू तर तसेच फ़्लोट्सचे चालताना येणारे वेगवेगळे आवाज ऐकत आज काय काय पाहिलं याची छोटी (कारण जास्त पक्षी दिसलेच नसत) उजळणी. आता उरला  मान्सून  या वर्षी कुठे कुठे जायचं या़चे बेत बनवण्यात उद्यानाचा मुख्य दरवाजा कधी येई ते कळतही नसे. पायाखालची वाट मात्र नेहमीची. सिलोंड्याच्या रस्त्याने आलं तर उजवीकडे हरणं दिसतायत का याचा वेध नाहीतर आत जायला मिळालं असतं तर किती बरं याचा विचार प्रत्येक वेळी तोच पण तरी नवा. गेटपाशी आल्यावर मात्र अगदीच सैरभैर झाल्यासारखं...आता पुन्हा ते वाहनांचे आवाज, गर्दी आणि लोकलचा प्रवास. सगळंच जंगलातून जायला मिळालं तर किती बरं असं प्रत्येकवेळी वाटायचं. पण पुन्हा इथेच यायचय हे मात्र नक्की.
आज इथे असंच सारखं भरुन आलय. या हवेच्या नशेने का काय माहित नाही पण माझा मुलगा मस्त झोपलाय. त्याची झोप मोडुच नये असं लिहितानाच त्याचा आवाज यावा यापरिस योगायोग तो काय?? चला मुंबईतल्या नॅशनल पार्कमधून परतायला हवं नाही??

2 comments:

  1. masta. mi trails nahi kele, pan pavasat, ani paus nukatach padun gelyavar IIT campus chya side ne Vihaar lake side la maaraleli chakkar - athavali tuza he post vachun!

    ReplyDelete
  2. आय. आय. टी.चा कॅंम्प़स म्हणजे मिनी नॅशनल पार्कच आहे. पावसाळ्यात तिथेही नक्की असंच वाटत असणार. धन्यवाद सर्किट!

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.