Showing posts with label ..... Show all posts
Showing posts with label ..... Show all posts

Monday, February 10, 2014

अर्ध्यावरती डाव मोडला….

ती माझ्या आयुष्यात थोड्या काळासाठी आली आणि तिच्या एका छोट्या कृतीने  देता देता एक दिवस मला थोडक्यात पण महत्वाचे शिकवून गेली. आनंदी राहायला खूप पैशाची आणि अपेक्षांची गरज नसते हे तिच्या बरोबर जे काही संवाद झाले तेव्हा तेव्हा नेहमीच जाणवायचं. 

नवऱ्याला पुन्हा नोकरी लागली तेव्हाचा तिचा फुललेला चेहरा, आता स्वतःचा इन्शुरन्स घेऊ शकतो असं सांगून तिच्या छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण होताहेत याचं समाधान. मुलाला इकडच्या शाळेत पाठवण्यासाठीचा आनंद, मागे एका dog shelter मधून कुत्रा दत्तक घेतानाची घटना, मी तिला जेव्हाही पाहिलं तेव्हा ती तिच्या कुटुंबात सदैव रमलेली आई/बायको, सतत हसरा चेहरा आणि समोरच्याला मदत करायची तयारी. 

मागे तिने घर घेतलं त्यावेळी आता आम्ही भेटणार नाही असं मला वाटलं. अर्थात तिची एक मैत्रीण आम्ही राहायचो त्याच इमारतीत खालीच राहायची. शिवाय मुलाची शाळा तिने बदलली नव्हती त्यामुळे मी शाळेच्या वेळेत दिसत राहीन असं तिने घर घ्यायची बातमी दिली तेव्हाच सांगितलं. मग तिच्या सामानसुमान थोडं फार लागलं असावं त्यावेळी एक दिवस दुपारी माझ्याकडे येऊन तिने मला एक राजस्थानला मिळतं, एकाखाली एक चिमण्या लटकत असतात ते शोपीस दिलं. मला खात्री आहे ती मला, भारतीय व्यक्तीला काही तरी खास द्यायचं म्हणून कुठलं तरी खास दुकान शोधत हे घेऊन आली असणार. "This is for good luck" मला तिने देताना सांगितलं आणि त्याच्याबरोबर एक सुंदर कार्ड. तिच्या घरासाठी मीही एक गिफ्ट घेतलं होतं. यानंतर आमच्या वेळा जुळल्या तर पार्किंग लॉटमध्ये भेट होई आणि लवकरच आमचीदेखील त्या जागेतून हलायची वेळ झाली. मग पुन्हा एकदा निरोपाची बोलणी आणि शुभेच्छांची देवाणघेवाण. यावेळी मात्र भेटीगाठी कठीण हे साधारण माहित. 

अर्थात मनातून ती जाणं शक्य नव्हतं. तिने तिच्या मुलाची दिलेली काही पुस्तकं आणि वस्तू माझ्याकडे आहेत त्यांचा उल्लेख नेहमी त्यांच्या आठवणीने होतो. 

माझी एक मैत्रीण अजून तिथल्याच एका इमारतीत आहे म्हणून एकदा जाऊया, भेटूया असं करता करता मागचं वर्ष असचं गेलं. काल एका सुपरमार्केट मध्ये तिची ती मैत्रीण भेटली आणि सुरवातीला मी तिच्या मुलाची चौकशी केली, अजून तो याच शाळेत असेल तर मग एकदा भेट जमवावी का असं माझ्या मनात होतं आणि ती वाईट बातमी मला मिळाली. एका वाक्यात सांगायचं तर "ट्रेसी गेली." पुढे तिने जे काही सांगितलं ते मला ऐकू तरी आलं का मला आठवत नाही. अजून मी शब्द जुळवतेय. 

तिला दम्याचा त्रास होता हे मला आताच कळलं. अर्थात त्यावर जे काही उपचार केले जातात ते ती घेत असणार. ख्रिसमसच्या निमित्ताने डिस्नेला जायचा प्लान त्यांनी बनवला. तिकडे जायचं म्हणून सगळी तयारी करून तिला दगदग झाली  हे निमित्त की  ती लोकं तिथे गेल्यावर थोडं दाटलेलं हवामान होतं ते तिचं शरीर झेलू शकलं नाही? परामेडीक्स यायला दहा मिनिटं लागली त्यावेळी ऑक्सिजन कमी झाला त्याने ती त्या दम्याच्या attack मधून उठलीच नाही. डॉक्टरांनी दहाएक दिवस प्रयत्नांची शर्थ केली पण बहुतके तिच्या तिसरीत असलेल्या मुलाचीही नियतीला दया आली नाही ना? देता  देता एक दिवस देणाऱ्यालाच अवेळी घेऊन जाणारी ही जी कुठली शक्ती आहे, तिच्याकडे नक्कीच न्याय नाही. आज राहून राहून तिच्या लहानग्याचा चेहरा समोर येतोय आणि कसंतरीच वाटतं. एका आईच्या तळमळलेल्या आत्म्याला शांती मिळो हे नक्की कुठल्या तोंडाने बोलायचं? 

Wednesday, February 29, 2012

.......

एक चौसोपी वाडा....आजोबांच्या काळातला...तीन मुलं आणि त्यातल्या एकाच्या वाट्याला आला मधला हिस्सा....घर जुन्याकाळचं  कुडाचं ....कधी कधी दोन दिवस बाहेर गेलं तर बाजूची दोन्ही कुडं एकमेकांशी गप्पा मारायला यायची...असं करता करता या मधल्या घराचा मधला भाग म्हणजे एक छोटा बोळ झाला होता...शेवटी एकदाची भिंत आली पण बोळ तसाच राहिला...त्याची तक्रार त्या घरच्या मालकाने कधीच केली नाही...उलट त्याऐवजी मागच्या वाड्यात चिंचेच्या झाडाखाली खाट घालून उन्हाळ्याच्या रात्री चांदण्याशी गप्पा मारत नैसर्गिक एअर कंडीशनरमध्ये आरामात झोपला...त्याच्या विनोदी गप्पा सुरु झाल्या की हसता हसता झोप कशी यायची कळायचं पण नाही...कुठल्याही गंभीर विषयाला विनोदाकडे कसं वळवायचं हे त्याच्याकडून शिकायला हवं म्हणूनच त्याच नाव त्याला साजेसं होतं...
पावसाळ्यात गावची नदी त्याच्या आंब्याच्या झाडाला भेटायला यायची...तस झाल की कामावरून घरी जायचा त्याचा रस्ता बंद व्ह्यायचा मग "नदी आली", म्हणून तो आमच्याकडे यायचा...त्यात पाचवी ते दहावीसाठी त्याची मोठी मुलगी आमच्याकडे होती त्यामुळे तिला भेटायला पण त्याच्या फेऱ्या व्हायच्या..त्याची परिस्थिती कशीही असली तरी आमच्या घरी येताना त्याचा हात रिकामा नसे...कधी बिस्कीटचा पुडा तर पावसाळ्यात परसात लावलेल्या ताज्या भाज्या किंवा भात झाला की घरचे जाड पोहे काही ना काही गम्मत असे...आणि तो परत गेला तरी एक गम्मत असे....एक दोन दिवसांनी घरात कुठे तरी एक चिट्ठी मिळे...कुठल्यातरी घरगुती ताज्या घडामोडीवर आपले विनोदी मौलिक विचार त्यात असत..नाही तर कधी कधी त्याच्या मुलीसाठी त्याच्याच विनोदी ढंगात काही सूचना..हसून हसून मुरकुंडी वळे....दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत त्याच्या घरी गेलं तरी कुणाला तरी बकरा बनवून एक चिट्ठी अशी निघे आणि त्यात तर चिट्ठी लिहिणाराही कुणी तिथे हजर नसणारा नातलग असे....दुपारच्या चहाला करमणुकीचा फराळ...
सुटीचा वार आला की काहीवेळा त्याच्या अंगात बल्लव संचारे. अशावेळी एकीकडे कापून मुरायला ठेवलेल्या कोंबडीचे काही तुकडे पळून चुलीत जात आणि काही वेळाने आमच्या हातात गरम काळसर तुकडा पडला की "ताटात वाढून खा" असले आयांचे नियम धूडकावून ते मट्ट करून वर “आणखी काय भाजलंय रे?” असं म्हणून आम्ही अजून उसकवल्यासारखा माळ्यावर चढून कुठे करांदे काढ नाही तर रताळी, बटाटा, सुके बोंबील अशा सर्वांची आहुती आधी चुलीच्या आणि मग सगळ्यांच्या पोटात जाई...ती कमी झालेली कोंबडी वाढणाऱ्या बाईच्या लक्षात आली तरी आमच्या पोटाला त्याने काही कमी पडत नसे...आणि हे सगळं भाजकाम करताना त्या बाजूच्या आक्रमणाने  वेडावाकडा आकार केलेल्या घरात मोठमोठ्या ढांगा टाकत  वेगाने चालण्याची त्याची लकब...
वर्ष सरली… आम्ही सर्व मोठे झालो आपापल्या उद्योगांना लागलो...हळू हळू गाव पण गावातली वस्ती सोडून पाड्यावर आला..म्हणजे हमरस्त्याच्या जवळ....आमच सुरुवातीला उल्लेख केलेलं मधलं घर मात्र नेहमी तसंच राहीलं  आणि त्यात होणार आमच आदरातिथ्यही....अगदी चार महिन्याच्या आरुषला घेऊन गेले तरी माझ्यासाठी ते सगळं तसच होत....बाळंतीण आणि जावई घरी येणार म्हणून पुन्हा खास सारवून घेतलेला वाडा, त्यातली खाट आणि नदीवरून येणारा गार वारा....
"मला राहायला यायचं होत रे"
"तू आता काय राहशील इथे आणि ते पण तुझ्या मुलाला घेऊन...इथे किती वेळ लाईट नसते..." त्याचा थोडा उदास सूर....
मी मात्र तशीच जुन्या शाळकरी मूडमध्ये...."चल असं काही नाही....आधी नाही का राहायचो..."
"थांब मी करांदे  भाजलेत...जावयाला माहित नसेल....त्याच्या देशावर हे सगळं मिळत नाही ना..." त्याने विषय नाही बदलला तो पण त्याच्या जुन्या अवतारात गेला....तसाही तो त्यातून बाहेर आलाच नव्हता म्हणा...
त्या दुपारी अप्रतिम चवीचं जेवून तृप्त झालेलो आम्ही निघालो तेव्हा गावच्या रीतीप्रमाणे तोच माझ्या पाया पडायला लागला....आणि पहिल्यांदीच एकमेकासाठी नेलेल्या गिफ्ट्स देताघेताना आम्ही खूप रडलो होतो.... पहिल्यांदीच.....
त्यानंतर मागची लग्नातली भेट खूपच जास्त धावती....त्याला बलसाड पकडायची होती......आणि मला दुसऱ्या दिवशीच विमान...
"तू खूप बारीक वाटतोयस...."
"हिला सांग जरा मला रोज कोंबडी करून घायला....नाही ग आता पूर्वीसारख्या कोंबड्यापण राहिल्या नाहीत ना....आणि मी बॉयलर खाणारा नाही तुला तर माहीतच आहे..." त्याचं आणि आमचं सर्वांच आणखी एकदोन विषयावरून चांगल हसून झाल्यावरच निरोप घेतला होता....
त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये नेतानाही असाच काही विचार त्याने केला असेल का की आता २६ जानेवारी आली आणि तिच्यापाठीच रविवार कशाला कुणाचे सुट्टीचे प्लान्स खराब करा...त्यापेक्षा ३० ला तस पण म. गांधी पुण्यतिथी आहे..लोकांना लक्षात राहायला पण बर आणि मुख्य म्हणजे तीस ते तीस असा महिना मोजायचा असेल तर मीच त्यांना सांगेन, "कुठे महिना झाला मला जाऊन....काय पण तुम्ही भाऊजी तरी तुम्हाला सांगत होतो जास्त मुलांना शिकवत जाऊ नका...आपलं गणित ती बिघडवून टाकतात...आमचं बघा बांधकाम खातं..म्हणून घराचं बांधकाम बिघडलेलं".....
रडता रडताही हसवून जाणारा असा माझा विनोद मामा...त्याच्या आठवणीनी हळवा झालेला महिना... आणि कदाचित हे वर्ष....