Monday, February 24, 2020

गाणी आणि आठवणी २२ - कोई ये कैसे बतायें

आजकाल जेव्हापासून गाणी ऍपवर उपलब्ध व्हायला लागली तेव्हापासून आपण आपल्याला हवी ती शोधून ऐकायचं सोडलं का? असं काहीवेळा वाटतं. अशावेळी आपण आपल्या त्या आवडीच्या कालखंडात जाऊन कुठलं गाणं स्वतःहून ऐकावं अशी आठवण स्वतःला करून देण्याचा एक दिवस येतो. अशावेळी मी बरीच गाणी ऐकते. त्यातलं माझं अतिशय आवडतं गाणं म्हणजे "अर्थ" चित्रपटात जगजीतने गायलेलं कैफी आझमींचं हे गाणं. 
जगजीतच्या किंवा इतरही मी ऐकलेल्या गझलांपेक्षा ही वेगळी वाटते कारण ही संपूर्ण प्रश्नात्मक गझल आहे. हिची सुरुवात आणि शेवटही प्रश्नार्थक आहे.  

                   कोई ये कैसे बताए के, वो तन्हा क्यूँ है?
                वो जो अपना था वो ही, और किसी का क्यूँ है?
                यही दुनिया है तो फिर, ऐसी ये दुनिया क्यूँ है?
                यही होता है तो आख़िर, यही होता क्यूँ है?

सुरुवातीचे हे चार प्रश्न आपण ऐकतो तेव्हा किंवा खरं तर तुम्ही चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं ऐकत नसाल तर खरं तर आपल्या मनाची तयारीही झालेली नसते की नायकाची किंवा ज्याचे हे प्रश्न तो मांडतोय त्याचा नक्की काय किस्सा आहे. 

पण तरी शब्दशः अर्थ घेतला तरी आपण म्हणू शकतो की गाणं कुठेतरी मनाला भिडतंय. म्हणजे वरवर तनहा म्हणजेएकटा पडलाय हा अर्थ असला तरी ती "तनहाई" प्रेमभंगाचीच असावी असा काही कुठे नियम नाही ना? हा "वो जो अपना" होता तो आणखी कुणाचा होतो म्हणजेही प्रेमभंगच हवा असंही जरुरी नाही. आणि मग जर तुम्हाला हा एकटेपणा कुणीतरी ज्याला तुम्ही जास्त जवळचं मानता तो दुसऱ्या कुणापाठी गेला मग पुढचे दोन सवाल तुम्ही केलेत तर काय चुकीचं आहे? 

मला वाटतं कॉलेजजीवनात अगदी मित्र-मैत्रिणीमध्येही असा "मैत्रीभंग" झाला तरी त्या अडनिड्या वयात आपण निदान पहिल्या कडव्याला आपलं म्हणू शकतो. जगजीत हे इतकं मुलायम आवाजात मांडतो की मला वाटतं "प्रेमभंग" असो "मैत्रीभंग" असो की अगदी आई-मुलाची अनबन झालेली असो. त्याच्या त्या मुलायम आवाजातूनही शब्दांची आर्तता कुणालाही एखादा जुळणारा प्रसंग आठवून हळवं व्हायला होणारच. एकदा का त्याच्या पहिल्या चार प्रश्नांशी तुम्ही सहमत झालात की उरलेली गझल आतुरतेने ऐकली जाते. कदाचीत त्याच्या सगळ्या "क्यो"ची उत्तरं मिळतील म्हणूनही आपण कां टवकारतो. 

पण पुढे तो उत्तरात न जात थोडे संदर्भ देऊन त्याचा आणखी एक प्रश्न पुढे ठेवतो. 

                       इक ज़रा हाथ बढ़ा दे तो, पकड़ लें दामन
                    उसके सीने में समा जाए, हमारी धड़कन
                    इतनी क़ुर्बत है तो फिर, फासला इतना क्यूँ है?


इथे मात्र "बात" वेगळी आहे याची झलक मिळते. हा दुरावा वेगळा आहे हेही लक्षात येतं. पण तरीही "फासला" आहेच आणि त्याचं कारण तो समोरच्याला विचारतो आहे हेही पक्क होतं. आपण आपल्या परिस्थितीला आणि तेही ती या नायकाच्या परिस्थितीशी जुळत नसेल तर बाजूला काढून त्याच्या प्रश्नाचं पुढे काय उत्तर मिळतं का म्हणून त्या गिटारच्या तारा आपल्या मनात वाजवत पुढे ऐकतो. 

                          दिल-ए-बरबाद से निकला नहीं, अब तक कोई
                      इक लुटे घर पे दिया करता है, दस्तक कोई
                      आस जो टूट गई फिर से, बंधाता क्यूँ है?

त्याचं उत्तर मिळतंच असं नाही हे इथे स्पष्ट व्हायला सुरुवात होते. खरं तर शायर इथे नक्की काय म्हणू पाहतोय हे आपलं आपण शोधायचं. "लुटे हुए घर पे दस्तक" म्हणजे जो कोणी होता तो गेला आणि आपण ठोठावतोय आणि पुन्हा त्याच गोष्टी/व्यक्तीची आस लावू पाहातोय. आता मी तरी जास्त संदिग्ध होते आणि पुढे हा काय शेवट करेल त्याची वाट पाहते. 

                           तुम मसर्रत का कहो या, इसे ग़म का रिश्ता
                       कहते हैं प्यार का रिश्ता है, जनम का
                       रिश्ता है जनम का जो ये रिश्ता तो, बदलता क्यूँ है?

इथे निदान त्याचं चित्र स्पष्ट होतंय. म्हणजे नातं आनंदामुळे आहे की दुःखामुळे हे समोरच्याने ठरवायचं पण शेवटी ते प्रेमाचं आजन्म टिकणारं नातं का बरं बदललं. हा अंतिम प्रश्न आहे. 
गाणं आपल्याला प्रश्नात ठेऊन फॅट चटकन संपलं अशी भावना येते. 

जर तुम्ही खरंच एखादं नातं गमावल्याच्या काळात हे गाणं ऐकलं तर ते तुम्हाला अंतर्मुख करेल. त्या नात्याची वीण कशी उसवली गेली असावी या प्रश्नाने तुमच्या रात्री जाग्या राहतील आणि त्या तशाही अवस्थेत तुम्हाला साथ करायला फक्त आणि फक्त जगजीतचाच मुलायम आवाज लागेल. मला वाटतं कुठचेच संदर्भ न देताही एखाद्या जेनेरीक औषधाचं काम गाणं करतंय. 

माझा एक मित्र जो मी बऱ्याच वर्षांपूर्वी गमावला आहे, त्याने हे गाणं आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदी ऐकवलं होतं. त्याला एकंदरीत मध्येच गाण्याच्या लकेरी छेडायची सवय होती आणि या गाण्यातला सुरुवातीचा प्रश्न "यहीं होता है तो आखिर, यही होता क्यूँ है?" हे तो गायचा. मला वाटतं आता माझ्या वयातल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या आयुष्यात माणसं गमवायला सुरुवात केली आहेत. कधी ती असून नसल्यासारखी असली तरीही गमावलीच म्हणायची. तर या आमच्या मित्राने आम्हा सर्वांच्या आठवणीत तोच प्रश्न विचारला असेल का? 

#AparnA #FollowMe


Wednesday, February 5, 2020

किर्तीमहल

माझी मावशी परळला आंबेडकर पूल संपतो, साधारण त्या भागात राहायची. माझ्या बालपणीच्या सार्वजनिक गणपती, मुंबईला प्लाझाला झालेला बॉम्बस्फोट, साऊथ मुंबईमधील फिरलेल्या जागा, नेहरू सायन्स सेंटर आणि प्लॅनेटेरियम, माझे रुपारेलमधले दिवस या सर्व आठवणी  या जागेशी खूप संबंधीत आहेत. ती तिथे राहत नसती तर मला वाटतं मला अजूनही मुंबई जितकी आवडते तितकी आवडली नसती.

कधी कधी वेळ मिळाला की मी नील आर्तेचा मुंबई कोलाज वाचते तेव्हा माझ्याही नकळत मी परळच्या त्या चाळीच्या चौथ्या मजल्याच्या समोरच्या बाल्कनीतून खाली वाहणाऱ्या नदीसारखी वाहने पाहत असते. मागच्या दारी उभं राहिलं तर कुठच्यातरी मिलची चिमनी आणि मला वाटतं वरळीच्या आकाशवाणीचा टॉवर दिसायचा. तिथून भन्नाट वारा यायचा. अजूनही येत असेल. गरमीच्या सिझनमध्ये दुपारी दोन्ही दरवाजे उघडे ठेवले की घरात पंखा लावायची गरज नसे. 

मावशी घरी असली की दुपारी तिच्या हातचा ताजा भडंग खायला मिळे. त्यांचं घर शाकाहारी असल्यामुळे जेवणात वरण-भात आणि त्यावर घरच्या तुपाची धार. मला तर खूप पूर्वी सकाळी दुधाचं मोठ्ठ घमेलंसदृष्य नळ असणारं भांड खांद्यावर उचलून प्रत्येक घरी जाणारा दूधवाला भैय्या पण आठवतो. नंतर मग त्या एका चार खणाच्या ट्रेसारख्या हातात धरून नेणाऱ्या काचेच्या बाटल्यात दूध मिळू लागलं आणि मग शेवटी प्लॅस्टिकने पूर्ण जगच व्यापलं. तर ते असो. त्यांच्याकडच्या तुपाला खूप छान वास येत असे आणि ते रवाळ असे. तसं तूप मी इतक्यात खाल्लंही नाही. 

अर्थात घरचं जेवण, भाज्या इत्यादींची चव त्यांच्या कोल्हापूरकडून येणाऱ्या मसाल्यामुळे वेगळी असावी पण काही वेळा संध्याकाळ झाली की माझी मावसबहीण "चल जरा बाहेर जाऊन येऊ या" असं म्हणून मला बाहेरचं खाऊ घाली. आमच्या घरात हा प्रकार फार रुळला नव्हता. आईला सगळं घरीच खायला द्यायची सवय होती आणि तशीही रस्त्यावर खाणे संस्कृती मी राहत असणाऱ्या भागात फार प्रचलीतही नव्हती. 

तसं तर खाली उतरल्यावर उजवीकडे जाऊन सिग्नलला रस्ता ओलांडून परत डावीकडे आल्यावर एक सँडविचवाला मस्त सँडविच बनवीत असे, ते मला आवडत असे. ते किंवा मग आम्ही खाली उतरतानाच वर येणार भेळवाला दिसला की भेळ असं काहीतरी आम्ही खात असू. 

पण माझ्या मावसबहिणीच्या मनात जर काही स्पेशल असेल तर मात्र ती यातलं काही करत नसे. आधी आम्ही आंबेडकर रोडवरच थोडं चालत असू. तिथे खाली फुटपाथवरच व्यवसाय करण्याऱ्या मंडळींकडे थोडा टाईमपास अर्थात विंडो शॉपिंग केली जाई. क्वचित मावसबहीण तिच्यासाठी एखादे कानातले रिंग्ज वगैरे काहीबाही घेई सुद्धा. काही वेळा मावशीने काही काम दिलेही असे, जसे वसईवाल्याकडून भाजी घेणे किंवा आणखी पुढे चालत जाऊन शंकराला हार वगैरे वाहणे, तर ते केले जाई आणि मग आमची पावले आंबेडकर पूल जिथे संपतो (की आमच्या बाजूने सुरु होतो) तिथे वळत. 

डावीकडे गेले तर गौरीशंकरचं प्रसिद्ध दुकान. पण तिथे न जाता समोर रस्ता ओलांडून पुलाच्या उंचीखाली थोडा झाकल्यासारखा दिसणारा, खरं तर तो काही झाकला वगैरे नसणार माझीच उंची तेव्हा कमी असेल, तर तो किर्तीमहल चा फलक दिसे. 

आम्ही दोघी तशा काही अगदी खूपदा तिथे गेलो असे नाही; पण मला आठवतं तोवर मी नेहमीच माझ्या या मावसबहिणीसोबत तिथे गेले आहे. किर्तीमहलला आत गेल्यावर एक वर जायचा जिना आहे. वरचा भाग तेव्हा एअरकंडिशन्ड वगैरे होता का आठवत नाही पण आम्ही खायला वर जात असू. 

माझं बाहेर खायचं तेव्हाचं प्रमाण पाहिलं तर मला काय मागवावं हे सहसा सुचत नसे पण तेव्हा मला फार गोड आवडत नसे म्हणून मी बहुतेकवेळा वडासांबार किंवा मसाला डोसा हे घरी आई न करणारे प्रकार घेई. घरी चमच्याने खाणे वगैरे पण सर्रास नसे त्यामुळे ती हौसही इथे खाताना भागे. माझ्या बाबतीत मी डावखुरी असल्याने मला चमच्याने खाताना  डावा हात वापरावा लागतो पण नेहमीच हाताने जेवायचं तर मला उजवा हात वापरायला शिकवलं आहे. असो तर डाव्या हाताने खायला मिळालं की मला अजूनही आनंद होतो आणि भूकही चांगली भागते असा अनुभव आहे. तर आम्ही दोघी गप्पा मारत हळूहळू खायचा आनंद घेत असू. 

आमच्या या किर्तीमहलच्या मला आठवणाऱ्या भेटींमध्ये जाणवलेली एक गोष्ट म्हणजे ही माझी मावसबहीण नेहमी तिथे दहीवडाच मागवे. दहीवडा कुठल्याही ठिकाणी मागवला की ते त्यांची ती स्टीलची लंबगोलाकार वाटी एका प्लेटमध्ये ठेवून त्याबरोबर टन स्टीलचे चमचे देतात तसंच इथेही देत. तिच्यातला थोडा दहीवडा ती मला चव घ्यायला देई. मी नाही म्हणत नसे पण मला प्रत्येकवेळी ते मिट्ट गोड दही खाताना, ही हा पदार्थ का मागवते असं नेहमी वाटे. मला तेव्हा कधीही दहीवडा आवडला नाही. मला वाटतं ती मला तो कधी तरी आवडेल म्हणून चव घ्यायला देत असावी पण मला इतकं मिट्ट गोड दही खायला आवडेल असं वाटलं नाही. ती आणि मी कधीतरी त्यांची फिल्टर कॉफी शेयर करत असू. (घरी हाही प्रकार तेव्हा दुर्मीळ होता.) 

खाऊन झाल्यावर मात्र कुठेही न रेंगाळता घरी जायचं हा आमचा शिरस्ता होता. मला वाटतं ते गोडमिट्ट दही खाऊन तिला झोप येत असावी आणि मलाही दुपारचा इतका मोठा नाश्ता करण्याची सवय नसल्याने अंग जड होत असेल. दहीवडा आणि किर्तीमहल हे समीकरण मात्र माझ्या डोक्यात फिट्ट बसलं आहे. त्यांनंतर कुणाबरोबर खास दहीवडाही खाल्ला नसावा बहुतेक. 

मग जेव्हा आम्ही ईस्ट कोस्टवरून नॉर्थवेस्टला येत होतो तेव्हा आमची मैत्रीण विजया हिने जेवायला बोलवलं तेव्हा स्टार्टर म्हणून दहीवडा बनवला होता आणि तिने दही अजिबात गोड  केलं नव्हतं.  चटण्या आणि वडाही सुंदर चवीचा. मला वाटतं दहीवड्याबद्दल माझ्या मनात जे काही किल्मिष होतं ते तिने त्यादिवशी दूर केलं. 

परवा फार दिवसांनी मला स्वतःलाच दहीवडा खावासा वाटला. शंभर पाककृती आणि सतराशे साठ टिपा वाचून मला का कोणास ठाऊक किर्तीमहलचे ते दिवस आठवले. तेव्हा आयता मिळाला असता तर नाक मुरडून झालं वगैरेही विचार करून झाले. पण आता काय स्वतः मेल्याशिवाय आपलं बनवल्याशिवाय कोण देणार? 

त्यानिमित्ताने बनवलेला आमच्या घरचा हा दहीवडा आणि या पोस्टमध्ये उल्लेखलेले सगळेच लोकं आता लांब (काहीतर परत न येण्या अंतराइतके लांब)  गेले आहेत त्या सर्व प्रसंगांची आठवण म्हणून ही पोस्ट.

#AparnA #FollowMe