Showing posts with label पर्यावरण. Show all posts
Showing posts with label पर्यावरण. Show all posts

Friday, June 5, 2015

छोटी छोटी (पर्यावरण) की बातें

"आमच्यावेळी" ही टकळी सुरु केली की तुम्हाला काय आठवतं? मला आठवतं वर्षातून दोनच वेळा मिळणारा नवा फ्रॉक, शाळेच्या गणवेषात एक स्कर्ट आणि दोन शर्ट्स, एक पावसाळी तुटेपर्यंत किंवा साईज बदलेपर्यंत वापरली जाणारी चप्पल आणि एक उन्हाळी तिचेही वापरायचे नियम तेच, आदल्या वर्षीच्या उरलेल्या पानातून बनवलेली रफ वही, आधीच्या भावंडाने वापरलेली पुस्तकं, हे आणि असं बरचं काही. हे मी अशासाठी लिहिते कारण ही यादी काही मुलं सोडली तरी बऱ्याच जणांकडे सारखीच असायची. त्यामुळे आम्ही काही गरीब वगैरे ठरत नव्हतो, सारेच मध्यमवर्गीय आणि गरजांची कुवतही मध्यमवर्गीयचं. 

मग आमच्याकडे पैसे यायला लागले, कसे ते  पोस्टचा भाग नव्हे पण आम्ही शिकलो, प्रगत झालो का काय म्हणतात ते. मग आमच्या मुलांकडे वरचा आढावा घ्यायचा तर वरच्या प्रत्येक वस्तूला कितीने गुणायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. यातल्या किती वस्तू त्यांना खरंच गरजेच्या आहेत? त्यांचं सोडा, आपल्यासाठी आपण घेतलेल्या वस्तूंची यादी बनवायला घेतली  आणि त्यातल्या कुठल्या कमी केल्या तर आपलं अडणार नाही हे पाहिलंत तर आपण कुठेतरी आपल्या गरज अवास्तव वाढवतोय का?  हा प्रश्न नक्कीच  पडेल. 

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे तर त्यानिमित्ताने एक चितन करायला बसलं तर हे आठवायचं कारण म्हणजे मुबलक पैसा किंवा हवं ते उपलब्ध आहे म्हणून सगळं आपल्याकडे हवं या मोहापायी आपण नकळत पर्यावरणावर किती ताण देतो याकडे लक्ष द्यायची वेळ फार लांब नाहीये. बरं आजवर याकडे सरकार किंवा कुणी इतर माध्यमांनी काही करावं अशी अपेक्षा आपण बाळगतो आणि ते पूर्ण चुकीचं नसलं तरी आपला खारीचा वाटा आपण उचलणार का? 

वरती ते दैनंदिन जीवनातील उदा. द्यायचं कारण हेच आहे की तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांसाठी पर्यावरण दिन म्हणजे काही फार फॅन्सी प्रकारे साजरा केला पाहिजे असं नाहीये. हळूहळू एक एक गरज नियंत्रित केलीत, तरी बराच भर हलका होईल. आपलं योगदान दुसऱ्याच्या दारचा वृक्ष वाढवून देता येईल, तसच आपल्याला लागणारे काही कागद, काही कपडे कमी विकत घेऊनही दोन पाच झाडं कापायची थांबवीत. कुठे जवळपास चालत जाउन एखादं काम करता यावं म्हणजे तेवढाच पेट्रोलच्या साठ्यातलं आपले थेंब वाचावेत. हे आणि असं बरचं काही. बोले तो, छोटी छोटी बातें और सिर्फ ये ही नही बहुत कुछ और भी| जैसे आप सोचे और हो सके तो किसी और को सिखाये|




Tuesday, December 11, 2012

Rest In Peace 832F


येलोस्टोन, प्रत्येक निसर्गप्रेमीला जावंजावंसं वाटणारं जंगल. एकेकाळी तिथला लांडगा नामशेष झाला होता आणि मग पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ यांच्या अथक परिश्रमाने ७० वर्षानंतर म्हणजे ९५ च्या सुमारास कॅनडामधून १४ लांडगे पार्कात सोडले गेले होते. याविषयी डिस्कव्हरीची एक सुंदर डॉक्युमेंटरी सुद्धा पाहण्यासारखी आहे आणि जालावर बर्‍याच ठिकाणी याबद्दल लिहिले गेले आहे. लांडग्याचं "आ...ऊ" पार्कात पुन्हा घुमतंय ही गेले काही वर्षे सर्वच प्राणीप्रेमींसाठी एक चांगली घटना आहे. 

आज हा विषय काढायचं कारण म्हणजे सकाळसकाळी एक बातमी ऐकली ज्याने हे सगळं आठवलं आणि वाईटही वाटलं. ती बातमी म्हणजे या पार्कातला सगळ्यात प्रसिद्ध फ़िमेल लांडगा (याला मराठीत काय शब्द आहे?) एका शिकार्‍याच्या बंदुकीला बळी पडला. ही घटना घडली वायोमिंगमध्ये पण येलोस्टॊनच्या थोडंसं बाहेर. जोवर हे लांडगे पार्कात आहेत तोवर त्यांना अभय आहे पण एकदा पार्काबाहेर माणसांच्या तावडीत सापडला की लांडगाही माणसाचं  भक्ष्य होतो. मग देश कुठलाही असो.

थोडं या प्रसिद्ध लांडग्याबद्द्ल. लमार कॅनयान पॅकची प्रमुख ८३२एफ़ लांडग्यांच्या बिहेवरियल रिसर्चसाठी गळ्याला रेडीओ बांधलेल्या लांडग्यापैकी होती. आपल्या पॅकसाठी शिकार करण्यासाठीची धडाडी आणि पिलांची अतिशय काळजी घेणे हे तिचे मुख्य गूण तिचा अभ्यास करणार्‍यांनी नोंदवून ठेवले आहेत. लांडग्यांना मूळात या पार्कात अशाप्रकारे पुन्हा आणणे आणि मग जी नवी पिढी तयार होतेय त्यांना कॉलर करून त्यांचा अभ्यास करणे हे वाचताना वाटतं तितकं सोप्पं नाहीये. त्यामागे एका मोठ्या टीमचे अथक परीश्रम आहेत. अशा प्रकारे केलेल्या संशोधनातून जी माहिती मिळते त्याने संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी हातभार लागतो.अशा प्रकारच्या हत्येने हे संशोधनाचं कामही पुन्हा नव्याने सुरू करायला लागतो. शिवाय लांडग्यासारखे प्राणी जे या पार्कात पुन्हा आणण्यासाठी इतके प्रयत्न केले गेले आहेत ते अशाप्रकारे गमवल्यावर पुन्हा तेच कार्य करणं हेही तितकं सोप्पं नाही. या वर्षात अशाप्रकारे संशोधनासाठी कॉलर केलेल्या लांडग्यापैकी ८ लांडगे मारले गेले आहेत. हा काही चांगला आकडा नाहीये.

संशोधनाच्या हिट लिस्टवर असणारा एक प्राणी पार्काच्या बाहेर गेल्यामूळे शिकार्‍यांच्या हाती लागणं यासारखं दुर्दैव ते काय? आपण जेव्हाही अशा शिकारी होतात तेव्हा माणसांचा एक बचावात्मक पवित्रा ऐकतो की ते आमच्या जागेवर आलेत. खरं आपण किती अतिक्रमण करून बसलोय याचीही आधी शहानिशा करायला हवी. आणि किती वेळा या प्राण्यांनी माणसांवर प्रथम हल्ला केलेला असतो हेही एक वेगळेच. खरं कारण दडलं असतं ते त्या प्राण्यांना मारून मिळणार्‍या कातडी, दात इ.च्या बदल्यात हाती लागणार्‍या घबाडाचं. ते कधीच उघड होणार नसतं. 

अभयारण्य करून हे प्रश्न खरंच सुटतील का हे एक कोडंच आहे. कारण अभयारण्याच्या सीमा प्राण्यांना शिकवणं कठीणच. त्यातही जर कॉलर असलेला लांडगा, शिकारी डोळेझाक करून खुशाल मारत असेल तर ज्यांना कॉलर नाही त्यांची गचांडी धरायला कितीसा वेळ?


पुन्हा एकदा निसर्ग विरूद्ध माणूस असे वाद रंगतील. ती सगळी चर्चा वाचताना मला आठवतोय मी माझ्या आतावरच्या भ्रमंतीत पाहिलेला एकमेव रुबाबदार जंगली लांडगा आणि आज ही बातमी वाचून आलेल्या आठवणीने अंगावर आलेला शहारा..

जालावरच्या चर्चेतलं लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे "Never kill an animal for doing what it is programmed to do."
May your soul Rest In Peace 832F. 

तळटीप - 

  • यलोस्टॊनमध्ये लांडगा पुन्हा आणण्याबद्दलची रोचक माहिती इथे वाचता येईल. 
  • वरचं लांडग्याचं मोफ़त चित्र साभार.



Friday, June 5, 2009

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

ही पोस्ट जाईल तोपर्यंत भारतात पेपरमधले रकानेच्या रकाने भरुन पर्यावरण दिनानिमित्ते गळे काढून तो दीन झाला असेल. पण राहावत नाही म्हणून माझीच वसुंधरा दिनाची फ़ार जुनी नं झालेली पोस्ट वाचा ही कळकळीची विनंती.
आणि या पोस्टमध्ये फ़क्त माझ्या एका मैत्रीणीने फ़ार समर्पक चित्र पाठवलंय ते पाहुन काय ते ठरवा. बाकी आपण कसा साजरा करता पर्यावरण दिन?