Tuesday, December 11, 2012

Rest In Peace 832F


येलोस्टोन, प्रत्येक निसर्गप्रेमीला जावंजावंसं वाटणारं जंगल. एकेकाळी तिथला लांडगा नामशेष झाला होता आणि मग पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ यांच्या अथक परिश्रमाने ७० वर्षानंतर म्हणजे ९५ च्या सुमारास कॅनडामधून १४ लांडगे पार्कात सोडले गेले होते. याविषयी डिस्कव्हरीची एक सुंदर डॉक्युमेंटरी सुद्धा पाहण्यासारखी आहे आणि जालावर बर्‍याच ठिकाणी याबद्दल लिहिले गेले आहे. लांडग्याचं "आ...ऊ" पार्कात पुन्हा घुमतंय ही गेले काही वर्षे सर्वच प्राणीप्रेमींसाठी एक चांगली घटना आहे. 

आज हा विषय काढायचं कारण म्हणजे सकाळसकाळी एक बातमी ऐकली ज्याने हे सगळं आठवलं आणि वाईटही वाटलं. ती बातमी म्हणजे या पार्कातला सगळ्यात प्रसिद्ध फ़िमेल लांडगा (याला मराठीत काय शब्द आहे?) एका शिकार्‍याच्या बंदुकीला बळी पडला. ही घटना घडली वायोमिंगमध्ये पण येलोस्टॊनच्या थोडंसं बाहेर. जोवर हे लांडगे पार्कात आहेत तोवर त्यांना अभय आहे पण एकदा पार्काबाहेर माणसांच्या तावडीत सापडला की लांडगाही माणसाचं  भक्ष्य होतो. मग देश कुठलाही असो.

थोडं या प्रसिद्ध लांडग्याबद्द्ल. लमार कॅनयान पॅकची प्रमुख ८३२एफ़ लांडग्यांच्या बिहेवरियल रिसर्चसाठी गळ्याला रेडीओ बांधलेल्या लांडग्यापैकी होती. आपल्या पॅकसाठी शिकार करण्यासाठीची धडाडी आणि पिलांची अतिशय काळजी घेणे हे तिचे मुख्य गूण तिचा अभ्यास करणार्‍यांनी नोंदवून ठेवले आहेत. लांडग्यांना मूळात या पार्कात अशाप्रकारे पुन्हा आणणे आणि मग जी नवी पिढी तयार होतेय त्यांना कॉलर करून त्यांचा अभ्यास करणे हे वाचताना वाटतं तितकं सोप्पं नाहीये. त्यामागे एका मोठ्या टीमचे अथक परीश्रम आहेत. अशा प्रकारे केलेल्या संशोधनातून जी माहिती मिळते त्याने संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी हातभार लागतो.अशा प्रकारच्या हत्येने हे संशोधनाचं कामही पुन्हा नव्याने सुरू करायला लागतो. शिवाय लांडग्यासारखे प्राणी जे या पार्कात पुन्हा आणण्यासाठी इतके प्रयत्न केले गेले आहेत ते अशाप्रकारे गमवल्यावर पुन्हा तेच कार्य करणं हेही तितकं सोप्पं नाही. या वर्षात अशाप्रकारे संशोधनासाठी कॉलर केलेल्या लांडग्यापैकी ८ लांडगे मारले गेले आहेत. हा काही चांगला आकडा नाहीये.

संशोधनाच्या हिट लिस्टवर असणारा एक प्राणी पार्काच्या बाहेर गेल्यामूळे शिकार्‍यांच्या हाती लागणं यासारखं दुर्दैव ते काय? आपण जेव्हाही अशा शिकारी होतात तेव्हा माणसांचा एक बचावात्मक पवित्रा ऐकतो की ते आमच्या जागेवर आलेत. खरं आपण किती अतिक्रमण करून बसलोय याचीही आधी शहानिशा करायला हवी. आणि किती वेळा या प्राण्यांनी माणसांवर प्रथम हल्ला केलेला असतो हेही एक वेगळेच. खरं कारण दडलं असतं ते त्या प्राण्यांना मारून मिळणार्‍या कातडी, दात इ.च्या बदल्यात हाती लागणार्‍या घबाडाचं. ते कधीच उघड होणार नसतं. 

अभयारण्य करून हे प्रश्न खरंच सुटतील का हे एक कोडंच आहे. कारण अभयारण्याच्या सीमा प्राण्यांना शिकवणं कठीणच. त्यातही जर कॉलर असलेला लांडगा, शिकारी डोळेझाक करून खुशाल मारत असेल तर ज्यांना कॉलर नाही त्यांची गचांडी धरायला कितीसा वेळ?


पुन्हा एकदा निसर्ग विरूद्ध माणूस असे वाद रंगतील. ती सगळी चर्चा वाचताना मला आठवतोय मी माझ्या आतावरच्या भ्रमंतीत पाहिलेला एकमेव रुबाबदार जंगली लांडगा आणि आज ही बातमी वाचून आलेल्या आठवणीने अंगावर आलेला शहारा..

जालावरच्या चर्चेतलं लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे "Never kill an animal for doing what it is programmed to do."
May your soul Rest In Peace 832F. 

तळटीप - 

  • यलोस्टॊनमध्ये लांडगा पुन्हा आणण्याबद्दलची रोचक माहिती इथे वाचता येईल. 
  • वरचं लांडग्याचं मोफ़त चित्र साभार.



10 comments:

  1. मला वाटले असे प्रकार फक्त भारतात होतात.
    ह्या प्राण्यांचे आपण मानव असाच निर्वंश करायला लागलो तर निसर्ग एकेदिवशी मानवाला जरूर धडा शिकवेल.

    ReplyDelete
    Replies
    1. निनाद, याबाबतीत घरोघरी मातीच्या...
      मी जेव्हा इंजिनियरिंगला असताना पक्षीनिरीक्षणाला सुरूवात केली होती तेव्हाच्या सुरूवातीच्या एका फ़िल्ड ट्रीपला मला अशी माहिती कळली होती की बगळ्याला जे ब्रिडिंग प्लुमेज म्हणजे तुर्‍य़ासारखं येतं ते टोपीवर लावण्यासाठी इंग्लंड आणि एकंदरीत युरोपमध्ये त्यांच्या इतक्या कत्तली झाल्या होत्या की बगळेही एंडेंजरमध्ये गेले होते.
      आपण एकंदरीत प्राण्यांच्या किंवा निसर्गनिर्मित वस्तू घ्यायच्याच असतील तर निदान त्या सर्टीफ़ाइड म्हणजे नैसर्गिक मृत्यू झालेल्या प्राण्यांच्या आहेत हे तरी पाहायला हवं.

      अलास्काला गेलो होतो तेव्हा तिथे अशा प्रकारची सर्टीफ़ाइट फ़रची जॅकेट्स २०० पासून हजारेक डॉलर्सना होती कारण ती सर्टीफ़ाइड होती. मग स्वस्तातलं जेव्हा मिळतं त्याचा सोर्स कळला असेलच.

      Delete
  2. Surprising.. yellowstone chya etka javal zalay..!
    'Never cry wolf' navacha pustak vachlay ka? Hyach vishayavar ahe..

    ReplyDelete
    Replies
    1. पराग ब्लॉगवर स्वागत. सध्या म्हणजे मला वाटतं यावर्षीपासून पार्काच्या बाहेर हंटिंग लीगल केलंय. हा त्याचा परीणाम.
      never cry wolf हा सिनेमापण आहे नं? मी दोन्ही पाहिलं नाहीये. लायब्ररीत पुस्तक मिळतं का ते पाहते. आभार.

      Delete
  3. लांडग्याच्या मादीसाठी मराठी शब्द लांडगी किंवा लांडगीण असू शकतो. जसे वाघीण,कोल्ही. असो,लेखातून काढलेला निष्कर्ष पटण्यासारखा आहे.
    मंगेश नाबर

    ReplyDelete
    Replies
    1. आभार मंगेश.

      "लांडगी" शब्द बरोबर असेल असं वाटतं.

      Delete
  4. " May your Soul rest in peace 832 F "

    आक्रमणाचे बळी वाढतच चाललेत... जाणार आहेत. :(

    ReplyDelete
    Replies
    1. होय गं श्रीताई. आपली भूक मोठी आहे आणि आधुनिक शस्त्रास्त्रांबरोबर प्राण्यांची ताकत कमी... :(

      Delete
  5. अपर्णा - मी तुझ्या ( कि तुमच्या) ब्लॉग चा नवीन वाचक आहे. पण मनापासून सांगतो 'काय वाट्टेल ते' वाले महिंद्र काका , वटवट सत्यवान वाला हेरंब आणि ह्याच्या बरोबर मी तुमच्या लिखाणाचा 'फ्यान' झालोय. खूप वेगळे विषय खूपच वेगळ्या पद्धतीने हाताळ्ताय त्या बद्दल अभिनंदन !.
    जमलं तर २०१२ चा 'महाराष्ट्र टाईम्स' चा दिवाळी अंक वाचा. त्यात ह्या विषयावरच भारतात चाललेलं संशोधन हयावर छान लेख आहे. त्याच विषयावर मराठीत एक 'आजोबा' नावाचा पिक्चर पण येतोय.

    दिवसेंदिवस माणूस इतका 'स्व' त्वा कडे झुकतोय की येणारा काळ सावध पणे राहण्याचा आहे हे नक्की.

    बाकी 'ब्लॉग ' ला शुभेच्छा !!

    ~मिलिंद

    ReplyDelete
    Replies
    1. मिलिंद, आपलं ब्लॉगवर खूप स्वागत आणि इतकं आवर्जून लिहिल्याबद्दल आभार.
      महाराष्ट्र टाईम्सचा अंक मिळाला तर नक्की वाचेन.गेला महिना मायदेशी असल्याने उत्तर द्यायला उशीर झाला आहे पण आपण वाचत असाल अशी आशा. :)

      आपण जे "स्व"त्वाकडे झुकतोय म्हंणताय ते अगदी पटतंय..आणि एकंदरीतच "माझं, मला" वाढत चालल्याने माणूसकी हरवली जातेय...

      पुन्हा नक्की भेट द्याल अशी अपेक्षा.

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.